सुटका

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
29 Mar 2010 - 10:10 am

(मरणानंतर माणसाचे काय होत असेल, ह्या पुढचे दुसरे जीवन ईथेच पृथ्वीवर असेल की दुसऱ्या एखाद्या ग्रहावर? असा विचार कधीना कधी सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. मी असेही भाष्य ऐकले होते, की मरणानंतरचा काही काळ मृतात्म्याला खूप कठीण जातो. पुढचा प्रवास सुरू झाला नसतो. एक लोंबकळणारी विचित्र अवस्था असते. शरीर सोडले, तरी ईच्छारूप शरीराचे बंध सुटलेले नसतात. आपल्या संस्कतीत मरणानंतर आप्तस्वकीयांनी करण्याचे अनेक विधी सांगीतले आहेत. तेराव्या दिवशीचे श्राद्ध तर मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि पुढचा प्रवास ठीक होवो यासाठी फ़ार महत्वाचे मानले जाते. चिनी संस्कृतीत देखील बरेच साम्य असणारे अशा प्रकारचे विधी आहेत.

लेखकाचे कल्पना स्वातंत्र्य वापरून पुढचा छोटासा प्रसंग लिहीला आहे. एखादा कोणी अभागी, ज्याच्या मरणाची कदाचित जवळच्यांना कल्पना देखील नसावी. त्याचे काय होत असेल? त्याच्यासाठी मरणोत्तर विधी झाले नसतील. तो मरण पावला हे माहीत नसल्याने तसा शोक देखील केला नसेल. कुठल्या अवस्थेत तो असेल?

डिसक्लेमर- हा लेख अंधश्रद्धा वाढवावी म्हणून लिहीलेला नाही. मिपावर आजकाल जशा भविष्य वर्तनाविषयी मनोरंजक कहाण्या येत आहेत. आणखी काही ईतर क्षेत्रातील मनोरंजक कथा म्हणून ही कहाणी देखील चालवून घ्यावी ही विनंती.)

*********************************

दमट ओल्या चिकण मातीचे अंथरुण
खडबडीत ढेकळांनी ओली भळभळ दाबली गेलेली
वरुन भसाभसा ढकललेले दगडमातीचे पांघरुण
उरला सुरला श्वास चिखलात बुडबुडून फ़ुटलेला

डोळ्यात माती गेल्यावर मिटलेले डोळे तसेच वजनाने गच्च
छातीचा भाता वरच्या प्रचंड भारासकट हलायला असमर्थ
क्षणापुर्वी गात्रा गात्रांत खेळणाऱ्या रक्ताचा चिकट लगदा झालेला
एकेकाळी श्वासावर चालणारे शरीर हाडामासांचे बाहुले बनलेले

मेंदूच्या आत नुसते करडे पांढरे लिबलिबीत गोळे उरलेले
एकेकाळी मनसोक्त विहरणारे विचारांचे दूत थिजून विरलेले
रक्तावर चालणाऱ्या मेंदूतील कणांपासून मन बनले नसावे
कारण त्याच्या संवेदना अजूनही माझ्या पर्यंत पोहचत आहेत

पण जरा थांब. हा “मी” आहे तरी कोण?
क्षुल्लक हेव्यादाव्यांवरुन मारल्या गेलेला एक कमनशिबी?
वाट पहाणाऱ्या एकाकी कुटुंबाचा अन्नदाता?
की मळक्या कागदांसाठी निर्दयतेने मारून खड्ड्यात फ़ेकलेले एक शरीर?

मग ह्या घुसमटलेल्या अचेतन शरीराच्या वेदनाही न जाणवणारा हा मी कोण?
आणि मोडलेल्या हाडामांसाच्या बाहुल्याच्या आसपास घोटाळणारा मी कोण?
हे सगळे विचार माझ्या क्षणाक्षणाने कुजणाऱ्या मेंदूत कसे काय येत आहेत?
ह्या ढिगाऱ्यातून निघून मी माझ्या कुटुंबाकडे जात का नाही?

तो जो कोणी होता, त्य़ाला ह्या एकाही प्रश्नांचे उत्तर मिळालेच नाही. एक टळटळीत सत्य मात्र त्याच्या एकदम लक्षात आले. ओला मातकट लोळागोळा होऊन पडलेले ते मोडके शरीर, त्यापासून मात्र दूर तो होऊच शकत नव्हता. त्याने खूप तडफ़ड करून पाहिली. पण कुठलासा बंध त्याला मोकळे होऊ देत नव्हता. तो कुजलेला रक्तामासाचा गोळा म्हणजे त्याचा तुरुंग होता. पहाता पहाता किड्या मुंग्यांनी त्य़ा तुरुंगाच्या भिंतीही खाऊन टाकल्या. त्याला ना कुजलेला वास जाणवला ना कसला आवाज. हाडांच्या पिंजऱ्याभोवती तो अजुनही लपेटलेला होता. नंतर केव्हातरी एकत्र बांधलेली हाडे देखील सुटी झाली. काहींची पांढरी माती बनली, काही चिवट तुकडे जुना आकार धरून राहिले. त्याच्यासारखेच जागच्या जागी.

आपले आयुष्य आठवणीत पुन्हा पुन्हा जगत त्याने हा सगळा काळ घालवला. त्याची हत्या करणारे ते खुनी. त्यांच्या विषयी वाटणारा तीव्र द्वेष. पत्नी, मुले, त्यांचे प्रेम, रुसवे फ़ुगवे. जगण्यासाठी केलेली धडपड, मिळा्लेले छोटे मोठे यश-अपयश. सगळ्या संवेदना आधी तीव्र होत्या, त्या हळुहळु बोथट झाल्या. केव्हातरी त्या संवेदनाही झिजून गेल्या. उरले फ़क्त विचार. नंतर हळुहळु विचार देखील येईनासे झाले. केवळ काही शब्द उरले. पत्नी, मुले, रान, मारेकरी...........
त्या शब्दांचे नाद देखील मग ऐकु येईनासे झाले. तो मात्र तिथेच कुठेतरी उरला असावा. निराकार, निर्विकार, निरापाश.
निरामय जिवनात वावरायला निर्बंध झालेला तो मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर झिरपला...........
पुढच्या प्रवासासाठी .........................

वाङ्मयविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

29 Mar 2010 - 3:19 pm | दिपाली पाटिल

बापरे... माझं डोकंच दुखायला लागलं हे वाचून... @)

दिपाली @)

दिपाली पाटिल's picture

29 Mar 2010 - 3:23 pm | दिपाली पाटिल

प्रकाटाआ..

पर्नल नेने मराठे's picture

29 Mar 2010 - 3:54 pm | पर्नल नेने मराठे

मेंदूच्या आत नुसते करडे पांढरे लिबलिबीत गोळे उरलेले
एकेकाळी मनसोक्त विहरणारे विचारांचे दूत थिजून विरलेले
8| I)
चुचु

शुचि's picture

29 Mar 2010 - 7:21 pm | शुचि

कल्पनाविलास फारच भन्नाट.

को-ह-म

असं म्हणतात मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी फार रडारड, शोक करू नये कारण त्यामुळे जी आत्मिक, भावनिक स्पंदनं निर्माण होतात ती मृतात्म्याच्या प्रगतीत अडथळा आणतात.

कवितेतील हा नवा प्रयोग फारच आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे