निकालाचा शोध...

अभिषेक९'s picture
अभिषेक९ in जनातलं, मनातलं
24 Mar 2010 - 12:37 am

सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.

अभ्यासाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल बरेच 'शोध' लागतात असे आढळून येतं. तो निकाल 'result ' असेन तर बऱ्याच जणांना अमानवी शोध लागल्याचे बोलले जातं. त्यातील बऱ्याच जणांना असा शोध लागतो की त्यांनी दररोज १६ ते १८ तास अभ्यास केला होता. आता हा असला अभ्यास अमानवीच म्हणावा लागेन, नाही का? अहो मानव म्हटला तर त्याला ६-८ तास झोप पाहिजे, एखादा तास जेवणास लागेल, बरं विद्यार्थीदशा म्हटली म्हणजे फिरणे (हुंदडणे) आलेच. आता एवढे सगळे करून १६-१८ तास कोणी मानव कसा अभ्यास करेल. तो किंवा ती अमानवीचं म्हणायला पाहिजे. काहींना आठवते की, त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. काहींनी विसरलेल्या तहान-भुकेची आठवण होते. बरं अशा शोधात ह्या बहाद्दरांचे आई-बाप ही सामील असतात. नव्हे तर ह्या शोधांची घोषणाच आई-बापच करतात. मग माझ्यासमोर हिंदी चित्रपटाचा एक scene उभा राहतो. शक्यतो नायक हातात पुस्तक घेऊन अभ्यास(?) करत असतो आणि त्याची आई त्याला 'गाजर का हलवा' नाही तर 'मुलीं(मराठीतील मुळे, नाहीतर वेगळेच समजाल) के पराठे' खाऊ घालत असते. काय एकेकाच्या आया, नाही? नाहीतर आम्ही अभ्यासासाठी कायम आईच्या हातचे 'धपाटे' खाल्ले, आणि वर 'तोंडातून आवाज काढायचा नाही' असा दम पण खाल्ला. आता 'धपाटे' खाल्ल्यावर धड स्तुती सुद्धा करू देत नाहीत! काय एकेकाच्या आया, नाही?

काही शोध विलक्षण धक्कादायक असतात. आता हेच बघा ना, एक मित्र एक मोठी परीक्षा पास झाला. आता ह्याला वरीलपैकी एकही शोध लागला नाही. त्याला तिसराच शोध लागला की, "त्याने म्हणे अभ्यासच केला नव्हता", आता बोला!! आता हा अभ्यास न करताच पास होतो तर मग आम्ही काय झक मारली होती. ह्याच्या अशा विलक्षण शोधामुळे आमची मात्र पुरती भंबेरी उडाली कारण ह्याने आपली अभ्यास चिकित्सा आमच्या आउसाहेबांनाही सांगितली. मग काय ह्याला लाचरुपी बक्षीस देऊन विनंती करावी लागली "सांग न लेका अभ्यास केला म्हणून, आमची कायले गोची करून राहिला!"

आता या उलट अभ्यासाचा 'निकाल' लागणाऱ्यांची तर कथाच निराळी! काय आणि कसे सांगू हो तुम्हाला? तुम्हाला म्हणून सांगतो, फार अवघड असतो हो... पण अशा हलाखीच्या परिस्थितीत पण शोध लावण्याचे स्पिरिट कायम असतं बरं का!! परीक्षेच्या दिवशी एका धीरगंभीर झालेल्या मित्राला विचारले, "काय राजे कसा गेला पेपर?" तर एकदमच कोल्हापुरी शिवी हासडून ओरडला, "रांडीच्या पेपर काढणाऱ्याचे बायकोशी भांडण झालेलं दिसतंय. बायकोनं काढला असेन ह्याला घराबाहेर आणि त्यो राग आपल्यावर निघाला!" त्याचा निकाल बहुतेक त्याच दिवशी कळला होता बहुदा. बघा म्हणजे विद्यार्थीदशेतच शोधाचे तर्कशास्त्र किती विकसित होते ते. केवळ प्रश्न वाचून अगदी उत्तरे येत नसताना हा राजा direct परीक्षकाच्या घरात घुसला. विलक्षण आहे!

असे बरेच विलक्षण शोध लागत असतात. काहींना पेपर 'out of syllabus ' असल्याचा शोध लागतो तर काहींना आपली जोडलेली पुरवणीच हरवल्याचा! बरीच जण तर एकदम TRANS मध्ये जाऊन आत्म्याचा शोध लावतात. अशाच शोधसत्रामध्ये एका मैत्रिणीला पण(!) शोध लागला. "निकाल काही पण असो, आपण परीक्षा देतो म्हणजे आपण लै 'भारी' आहोत." आता निकालावरून वजन कळणं हा शोधच म्हणा की! असले शोध मला फक्त वजनकाट्याचा काटा ९९ च्या पुढे गेला की लागतात.

असे भारी भारी शोध लावण्याची माझी फार इच्छा आहे. 'मी १६ तास अभ्यास करतो', 'पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करतो', 'रोज एक तास ध्यान लावतो' इत्यादी इत्यादी. पण आमचे शोध बघणार कोण? त्यासाठी 'निकाल' लागलेला चालत नाही, चांगला 'result ' लागतो! आता त्यासाठी आधी पुस्तकांचा शोध घेतो...

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

24 Mar 2010 - 1:18 am | शानबा५१२

शेवट्च्या उता-यात एक add करतो,.."मी ५ तासांपेक्षा जास्त झोपत नाही"...........
ह्याला शोध म्हणा नाहीतर आजुन काही.......
आपण विद्यार्थी दशेत आहत का ते माहीती नाही पण..............एकदा खर,एकदम खर प्रेम करुन बघ आभ्यासावर,एखाद्या विषयावर हे सर्व आपोआप होत आपल्याकडुन....
------------Chemistry(especially Organic) Lover

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

शानबा५१२'s picture

24 Mar 2010 - 1:15 am | शानबा५१२

त्याला शोध नको बोलु यार......ती श्रध्दा आहे...........देवावर आपली असते श्रद्धा म्हणुन आपण त्या श्रद्धेतुन काय काय बोलतो ना!! तसच हे...जो जेव्हा हे बोलतो तेव्हा ती त्याची श्रद्धा बोलत असते............(applicable to a genuine student)

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

शुचि's picture

24 Mar 2010 - 7:35 am | शुचि

लै भारी हाय लेख. ह. ह. पु. वा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

पक्या's picture

24 Mar 2010 - 7:40 am | पक्या

निकालाचा शोध्...लय भारी. मजा आली वाचून.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

अमोल केळकर's picture

24 Mar 2010 - 9:24 am | अमोल केळकर

असेच म्हणतो --

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नीधप's picture

24 Mar 2010 - 10:38 am | नीधप

भारी..
आम्ही कॉलेजमधे असताना एक महान कंटाळवाणे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. आमच्याच बॅचची एक मुलगी आणि तिचा धाकटा भाऊ दोघेही १० आणि १२वी दोन्ही वर्षी बोर्डात आले होते. त्यावर त्या मुलांच्या आईबाबांनी मुलांना बोर्डात कसे 'आणले', त्यासाठी प्रयत्न इयत्ता ८ वी पासूनच कसे सुरू केले इत्यादी इत्यादी यावर एक पुस्तक लिहिले होते.
ते पुस्तक वाचून मला दोन्ही भावंडांची कमाल दया आली होती आणि रागही. काय पावटी पोरं आहेत. ८ वी पासून १२ वीपर्यंत बोर्डात यायचं म्हणून चरकात पिळल्याप्रमाणे पिळले जातायत, खेळायला वेळ नाही, भंकस करायला वेळ नाही, प्रेमात पडायला वेळ नाही... नुसता आपला अभ्यास म्हणजे पाठांतर आणि आखून दिलेल्या दिनचर्येप्रमाणेच वागायचं. हे ऐकणारी इतकी आज्ञाधारक पोरं पावटी नाहीतर काय...
बर त्या दोन्ही पोरांनी असं नेत्रदिपक, दैदिप्यमान इत्यादी काही आयुष्यात केल्याचं ऐकीवात नाही . अर्थात तो विषय वेगळा...

ते पुस्तक वाचून मी माझ्या आईवडिलांचे, मला न मिळणार्‍या मार्कांचे, मला असलेल्या पुस्तकी अभ्यासाच्या कंटाळ्याचे अतिप्रचंड आभार मानले होते.. :)

एकदम आठवलं म्हणून सांगितल........

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

उग्रसेन's picture

24 Mar 2010 - 12:22 pm | उग्रसेन

चरकात पिळल्याप्रमाणे पिळले जातायत, खेळायला वेळ नाही, भंकस करायला वेळ नाही, प्रेमात पडायला वेळ नाही... नुसता आपला अभ्यास म्हणजे पाठांतर आणि आखून दिलेल्या दिनचर्येप्रमाणेच वागायचं. हे ऐकणारी इतकी आज्ञाधारक पोरं पावटी नाहीतर काय...

एकदम बराबर.
आपून कधी अभ्यासाचं टेंशन घेतलं नाय.
माय म्हणाची. जेवढं व्हईन तेवढं अभ्यास करीत जा.
परीक्षा आली म्ह्णून लाजेकाजे अभ्यास कराचो.
खोट बोलत नाय पर पंचावन टक्क्यापेक्षा कधी कमी मार्क नाय घेतले.
आन जास्तबी कधी पडले नाय.

बाकी निकालाचे शोध लय भारी.

बाबुराव :)

आपला आभि's picture

24 Mar 2010 - 11:06 am | आपला आभि

हे वाचून आम्हाला आमचे Engineering चे दिवस आठवले. प्रत्येक वेळी परीक्षा देताना आम्ही नापास होतोय अस वाटायचं. पण दैव (university ??) कृपेने आम्ही पास होत गेलो.
त्यावेळी निकालाच्या आधी नापास झाल्याची, परीक्षेला उशिरा गेल्याची, वेगळाच अभ्यास करून गेल्याची स्वप्ने पडायची. (लोकांच्या स्वप्नात माधुऱ्या , बिपाशा ,दीपिका, येतात. काय हो नशीब!!! असो ).
नोकरीला लागल्या नंतरही बरेच दिवस अशा स्वप्नांनी आमची पाठ सोडली नाही . .....

आपलाच
(अजूनही??) विद्यार्थी(च) आआआभी

समंजस's picture

24 Mar 2010 - 1:48 pm | समंजस

नोकरीला लागल्या नंतरही बरेच दिवस अशा स्वप्नांनी आमची पाठ सोडली नाही . .....

नशीबवान म्हणायचं तुम्हाला :)

शिक्षण संपवून १५ वर्ष होउन गेलीत मला, तरी अजूनही ती भयानक स्वप्ने पडतात :SS (परिक्षेचे वेळापत्रक व्यवस्थीत न पाहील्यामुळे, चुकीच्या दिवशी परिक्षा केन्द्रावर पोहोचणे आणि आपला पेपर कालच होता ही चुक लक्षात येणे आणि त्यामुळे घाबरून जागी होणे, आणि मग हे स्वप्न होते हे लक्ष्यात आल्यावर सुटकेचा निश्वास टाकणे #:S )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2010 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परिक्षेचे वेळापत्रक व्यवस्थीत न पाहील्यामुळे, चुकीच्या दिवशी परिक्षा केन्द्रावर पोहोचणे आणि आपला पेपर कालच होता ही चुक लक्षात येणे आणि त्यामुळे घाबरून जागी होणे, आणि मग हे स्वप्न होते हे लक्ष्यात आल्यावर सुटकेचा निश्वास टाकणे

हा हा हा

मला गणिताचा पेपर स्वप्नात आला की मीही जरा कासावीसच होत होतो. :)

-दिलीप बिरुटे

Dhananjay Borgaonkar's picture

24 Mar 2010 - 12:10 pm | Dhananjay Borgaonkar

लैई भारी लिवलाय लेख.
लहानपणापासुनच रॅट रेस ची प्रॅक्टीस.

राजेश घासकडवी's picture

24 Mar 2010 - 1:35 pm | राजेश घासकडवी

लेख छान झालाय. मला त्यावरून माझे परीक्षेआधीचे शोध आठवले. परीक्षा जवळ आली की रूम अस्वच्छ आहे, व ती आवरलीच पाहिजे असा शोध लागायचा. मग मन लावून ती लख्ख झाल्याशिवाय अभ्यासाला मूड कसा लागणार? ती तशी झाली, की बऱ्याच दिवसात आपण काही चित्र काढली नाही, आणि त्या नव्या पोस्टरमध्ये रेखा काय दिसलीय माहित्येय! बस्स तिचं चित्र काढायलाच पायजेलाय, असं माझी प्रतिभा सांगते आहे, डिमांडते आहे असा शोध लागायचा...

राजेश

समंजस's picture

24 Mar 2010 - 1:36 pm | समंजस

मस्त झालाय लेख!!
अति अभ्यास करणे किंवा फक्त शालेय अभ्यास आणि परिक्षा(म्हणजेच बोर्डात गुणवत्ता यादीत येणे) ह्यांनाच अवास्तव महत्त्व देणे यावर थोडा(की बराच :> ) उपहासात्मक लिहीलेला लेख आवडला.
लेखातील बर्‍याच मुद्यांशी सहमत :)
१६-१८ तास अभ्यास करून बोर्डात गुणवत्ता यादीत येणार्‍यांनी कृपया ती मनाची एकाग्रता, ढोर मेहनतीची सवय पुढील आयुष्यात सुद्धा कायम ठेवावी. यामुळे समाजाचा काही फायदा झाला तर फारच छान :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2010 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख छान झाला आहे...!

-दिलीप बिरुटे

अभिषेक९'s picture

25 Mar 2010 - 9:19 am | अभिषेक९

आणि बरेच नवीन शोध पण कळाले...