ऑफीस स्पेस

व्यंकट's picture
व्यंकट in जनातलं, मनातलं
13 Mar 2008 - 3:50 am

ऑफीस स्पेस हा माझ्या असंख्य आवडत्या हॉलिवूडपटांपैकी एक.
सिलिकॉन व्हॅलीत घडणारी कथा वाय. टू. के. चा फुगा जेव्हा फुगला होता त्या काळातली आहे. पिटर गिब्बन्स (रॉन लिव्हींग्स्टन) हा एक गाय-नेक्स्ट-क्युब वाटावा असा सॉफ्टवेअर इंजिनीअर इनिटेक नावाच्या कंपनीत चाकरी करत असतो. सकाळी ऑफीसला जातांना वाहतूकीच्या गुंत्यात अडकणे, ऑफीसचं दार उघडतांना लागणारा स्टॅटीक करंट, रिसेप्शनीस्टचं फोनवर तेच तेच रेकॉर्ड केल्यासारखं बोलणं, ऑफीसात गेल्या गेल्या काहीतरी तुच्छ कारणांवरून खुस्पट काढून बॉस ने डिचवणं, बिघडलेल्या प्रिंटर जवळ घडणारी आणि कॅफेटेरियातली संभाषणे ह्या नित्याच्या छोट्या छोट्या गोष्टीतून ह्या चित्रपटातील प्रसंग साकारले आहेत. मायकल बोल्टन आणि समीर हे पिटरचे वर्कप्लेस बडीज् आहेत. समीरचं 'नाइनानजाद' हे अमेरिकनांना उच्चारायला अवघड आडनाव आणि मायकलचं गायक मायकल बोल्टनशी जुळणारं नाव आणि त्यावरून त्यांची होणारी चिडचीड ही अगदी नेहेमीच नामोच्चारा वरून घडणार्‍या घटनांपैकी आहे. समीर आणि मायकलचा कधीच धड न चालणार्‍या प्रिंटरवर राग आहे. पहिल्या दृश्यापासून हा चित्रपट वास्तवदर्शी आहे. चित्रपट पहातांना कुठल्याही चाकरमान्यास, कुठला ना कुठला प्रसंग, स्वतःच्या ऑफीसातून कट-पेस्ट करून चिकटवल्यासारखा वाटल्यास त्यात नवल नाही. बिल ल्युंबर्ग हा पिटरचा एक अत्यंत स्टेरिओटाईप्ड बॉस गॅरी कोल ने उत्तम रंगवला आहे. 'terrific', 'great', 'yeah', 'whats happening?', 'I am going to go ahead and..' हे पुन्हा पुन्हा म्ह्टले जाणारे संवाद त्याच्या तोंडी घालून लेखक -दिग्दर्शक माईक जज ने ल्युंबर्ग च पात्र एकदम झक्कास लिहीलय.

पिटर आपल्या यंत्रवत दैनंदीन जिवनाला कंटाळला आहे. त्याला काहीच करायची इच्छा उरलेली नाही. एखाद्-मिलियन डॉलर्स मिळवून काहीच न करत पडून रहाण्याची पिटर स्वप्ने बघत असतो. अमेरिकेतील घरे अक्षरशः कार्डबोर्डची असतात, थोडं मोठ्याने बोललं तर पलिकडच्या खोलीतल्याला ऐकू जातं. पिटरचा रंगेल शेजारी लॉरेन्सला पिटरच्या घरात घडणारी संभाषणे ऐकून त्यावर पलिकडूनच ओरडून प्रतिक्रिया द्यायची सवय आहे. लॉरेन्स माथाडी कामगार आहे, तो रस्त्यावरची बांधकामे वैगेरे ठिकाणी काम करत असतो. पिटरला कायम लॉरेन्सच्या स्वच्छंदी आयुष्याचा आणि नोकरीचा हेवा वाटत असतो. आयुष्याची पुढील सगळी वर्षे शनीवार रवीवार सकट स्वतःची पिळवणूक करत एका क्युब मध्ये बसून काम करण्याचा पिटरला जाम तिटकारा आलेला असतो, आणि तो त्यामुळे कायम वैतागल्यासारखा वागत असतो. मनासारखं आयुष्य जगायला न मिळल्यामुळे, आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सर्वात वाईट दिवस आहे असं त्याला वाटत असतं.

पिटरला ऑफीसच्या जवळच्या चॉट्च्कीज् रेस्तरां मधे काम करणारी जोआन्ना (जेनिफर ऍनिस्टन) आवडत असते. पण त्याला आधीच एक मैत्रीण असते आणि ती पिटरच्या वैतागलेपणाला वैतागलेली असते. म्हणून पिटरला ती एकदा एका शुक्रवारी हिप्नोथेअरपिस्टकडे घेऊन जाते. हिप्नोथेअरपिस्ट पिटरला रिलॅक्स वाटवं म्हणून त्याला हिप्नोटाईज् करतो. पिटर ला हिप्नोसिस मध्ये चिंतामुक्त करत असतानांच हिप्नोथेअरपिस्टला ह्रदय विकाराचा झटका येऊन तो मरतो. तो मरणोन्मुख असतांनाच चिंतामुक्त पिटर आपल्या खुर्चीतून उठतो, आपली मैत्रीण, मरणारा डॉक्टर ह्यांकडे आजीबात लक्ष न देता सरळ घरी जातो आणि मस्तपैकी ताणून देतो. दुसर्‍या दिवशी शनीवारी ल्युंबर्गनी पिटरला ऑफीसला बोलवलेलं असतं. सकाळी गजर वाजतो, पिटर आता पूर्णपणे बदललेला असतो, गजर, मैत्रीणीचे आणि ल्युंबर्गचे येणारे फोन ह्या कडे तो साफ दूर्लक्ष करून सुट्टीच्या दिवशी सकाळी अंथरूणातच सगळे जण करतात तशी लोळीबोळी करत पडून रहातो. आरामात दुपारी उठतो, धडाधड व्हॉईसमेल वरचे मेसेजेस डिलीट करतो, तेव्हड्यात त्याचा फोन पुन्हा वाजतो. ह्यावेळी पिटरची मैत्रीण असते. ती फोन आधी उचलला नाही म्हणून आरडा ओरडा करायला लागते, उत्तरादाखल पिटरचा थंडपणा पाहून अजूनच चिडते आणि आपले संबंध संपले अशी घोषणा करते. पिटर शांतपणे फोन ठेऊन देतो आणि पुन्हा पलंगावर जाऊन पसरतो.

पुढच्या सोमवारी सकाळी पिटर ऑफीसला जायच्या ऐवजी सरळ चॉट्च्कीज् मधे जातो आणि जोआन्नाला लंचला येणार का असं विचारतो. ती उडतेच, पण फार आढेवढे न घेता लंचला जायला तयार होते. लंचच्या टेबलावर होणारं जोआन्न आणि पिटरच संभाषण फार विनोदी आहे. त्यातला एक भाग..

जोआन्ना: तर पिटर, तू काय करतोस?
पिटरः मी इनिटेक मधे काम करतो.
जोआन्ना: काय काम करतोस?
पिटरः वाय. टू. के. चे बदल करतो.
जोआन्ना: ते काय असतं?
पिटरः ह्या लोकांनी एक सॉफ्टवेअर लिहून ठेवलं आहे त्यात १९९८ च्या ऐवजी ९८, १९९९ च्या ऐवजी ९९ वैगेरे असं लिहिलयं. तर त्या तसल्या हजारो ओळी एका क्यूबमधे बसून बदलत असतो. पण ते सोड, मला माझं काम आवडतं नाही आणि मला नाही वाटत आता मी पुन्हा तेथे जाईन.
जोआन्ना: काय? तू पुन्हा तेथे जाणार नाहीस?
पिटरः नाही.
जोआन्ना: मग तुझी नोकरी जाईल?
पिटरः माहिती नाही. पण मी जाणार नाही.
जोआन्ना: मग तू राजीनामा देणार का?
पिटरः नाही. मी फक्त तेथे जाणं थांबवणार.
जोआन्ना: मग दूसरी नोकरी करणार का?
पिटरः नाही, मला नाही वाटत मी दुसरी नोकरी करू शकेन.
जोआन्ना: मग पैसे कसे मिळवणार, बिलं कशी भरणार?
पिटरः माहिती नाही. बिलं भरायला मला कधीच आवडलं नाही. मी ते पण करणार नाही.
जोआन्ना: मग काय करणार?
पिटरः मी तुला आज डिनरला घेऊन जाणार आणि मग तुला माझ्या घरी घेऊन जाऊन कुंग-फू बघणार, तुला कुंग्-फू आवडतं का?
जोआन्ना (स्वतः ला सावरत ) : अर्थातच. मला कुंगफू फार आवडतं.

तिकडे ऑफीस मधे कामगार छाटणी साठी म्हणून कंपनी दोन कन्सल्टंट्सना बोलावते, दोघांची नावं बॉब असतात. बॉब कामगारांच्या मुलाखती सुरू करतात आणि कोणाला काढायचं, कोणाला ठेवायचं ह्याची यादी करायला लागतात. सगळ्या स्टाफ मधे हडकंप पसरतो. समीर आणि मायकल, पिटर कुठे गेला? त्याची नोकरी आता नक्की जाणार म्हणून चिंतीत असतात.

काही दिवस ऑफीस बुडवल्यानंतर हा बदललेला पिटर पायात स्लीपर आणि अंगात ट्रॅकसूट घालून एके दिवशी ऑफीसला जातो. बिनधास्त ल्युंबर्ग साठी आरक्षीत असलेल्या जागी गाडी लावतो. ऑफीसच दार उघडतांना स्टॅटीक शॉक बसतो म्हणून दाराच हँडल उचकटून टाकतो. कॉम्प्यूटर वर गेम्स खेळत बसतो. ल्यूंबर्ग पिटरशी बोलायचा प्रयत्न करतो पण पिटर त्याला 'नंतर ये आता मी बिझी आहे' अस सांगतो. मायकल त्याला दोन बॉब्स बद्दल सांगतो. पिटर हा कामगार छाटणीचा प्रकार अर्थातच शांतपणे घेतो. थंडपणे बॉब च्या खोलीत जाऊन त्यांना सांगतो की काम फार बोअर आहे आणि त्याला मोटीव्हेशन आजीबात नाही. एवढंच नाही तर कोणीच काम करतं नाही, ल्युंबर्ग सकट सगळे टाईमपास करतात.
मिल्टन आणि टॉम म्हणून अजून २ धमाल पात्रं आहेत आणि त्यांची स्वतंत्र २ अगदी त्रोटक पण विनोदी उपकथानकं आहेत.

पुढे अर्थातच, त्याची नोकरी जाते का? जोआन्ना आणि त्याचं प्रकरण पुढे सरकतं का? बॉब्ज कोणाकोणाला उडवतात? वैगेरे मजा मजा आहे. ती रसिकांनी आपापल्या ऑफीस बडीज् बरोबर प्रत्यक्षच पहावी. विशेषतः जर तुम्ही वर्कोहोलीक नसाल आणि तुम्हाला खूप काम पडत असेल, रात्री उशीरापर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी तुमचा बॉस तुम्हाला ऑफीसात बोलवून पिडत असेल तर हा चित्रपट नक्की बघा.
मी ग्रूप, प्रोजेक्ट किंवा कंपनी बदलली की नव्या सहकार्‍यांबरोबर हा चित्रपट बघतो. त्यामुळे नंतर ऑफीसातलं वातावरण खेळीमेळीचं होऊन जातं. कोणालाही दुसर्‍याकोणाकडुन काम करून घ्यायचं असेल तर तो दुसर्‍यास ल्युंबर्ग सारखं 'I am going to go ahead and ask you to ...' असं म्हणून सुरवात करतो.
मोठ्ठाले स्टार्स, अंगप्रदर्शन, महागड्या गाड्या, आलिशान, भव्य-दिव्य असं काही न दाखवता ह्या चित्रपटाचं चित्रिकरण झालेलं आहे. एक धमाल, लो बजेट, आपल्या-तुपल्या आयुष्यातील प्रसंग घेऊन तयार केलेला, खुसखुशीत संवाद असलेला हा चित्रपट माईक जज ची सर्वोत्तम कलाकृती म्हटली तर वावगं ठरणार नाही.

चित्रफीती
बेस्ट ऑफ ऑफीस स्पेस १
बेस्ट ऑफ ऑफीस स्पेस २
बेस्ट ऑफ ल्यूंबर्ग

व्यंकट

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Mar 2008 - 4:31 am | llपुण्याचे पेशवेll

मला चित्रपट बघायला आवडेल.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 6:35 am | विसोबा खेचर

वा व्यंकटराव!

सुंदर परिक्षण. वाचतानाच इतकी मौज वाटली की चित्रपटही निश्चित पाहण्याजोगा असेल...

तात्या.

सुमीत's picture

13 Mar 2008 - 10:30 am | सुमीत

स्टार मूव्हीस वर हा सिनेमा दाखिवला जातो, वेगळा पण छान.

स्वाती राजेश's picture

13 Mar 2008 - 7:40 pm | स्वाती राजेश

तुही लिहिलेल्या परीक्षणावरून हा मुव्ही पाहायची खूप इच्छा आहे.
पाहुया इथे डिव्हीडी मिळाली तर निश्चित पाहीन..
परीक्षण फार मस्त आहे...तुम्हाला माहीत असलेल्या आणखी काही मुव्हीज ची परीक्षण येऊ देत.
मजा येते वाचायला...:)

वरदा's picture

13 Mar 2008 - 9:09 pm | वरदा

एवढं छान समजावल्याबद्दल धन्यवाद. मस्तच दिसतोय हा पिक्चर्..पाहिलाच पाहिजे...

सर्किट's picture

13 Mar 2008 - 10:55 pm | सर्किट (not verified)

ऑफिस स्पेस हा माझ्या मोजक्या आवडत्याअ चित्रपटांपैकी एक.

मी हा चित्रपट कमीत कमी दहा वेळातरी निश्चितच पाहिला आहे.

आय टी क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाने पहावा असा आहे.

सर्व म्यानेजर्स नी देखील पहाणे आवश्यक, म्हणजे काय करू नये, ते कळते.

- (म्यानेजर) सर्किट

भडकमकर मास्तर's picture

14 Mar 2008 - 1:14 am | भडकमकर मास्तर

मजाच आली वाचून... हा टी व्ही वर अर्धवट पाहिला होता, पण आता नीट पाहीन....

बॉस तुम्हाला पिडत असेल तर हा चित्रपट नक्की बघा.
मी ग्रूप, प्रोजेक्ट किंवा कंपनी बदलली की नव्या सहकार्‍यांबरोबर हा चित्रपट बघतो. त्यामुळे नंतर ऑफीसातलं वातावरण खेळीमेळीचं होऊन जातं.

हे तर फारच आवडलं... :)

प्राजु's picture

14 Mar 2008 - 7:54 am | प्राजु

आपले परिक्षण वाचून आता हा सिनेमा पहायची उत्सुकता लागून राहिली आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

कोलबेर's picture

17 Mar 2008 - 11:34 am | कोलबेर

व्यकंटराव तुमच्या शिफारसीवरुन आजच हा चित्रपत बघीतला. दिड दोन तास मस्त हसत खिदळत गेले. बर्‍याच दिवसांनी इतका सुंदर विनोदी हलका फुलका चित्रपट पहायला मिळाला. मजा आली. अशीच तुमची आवड कळवत राहा...धन्यवाद!

नंदन's picture

17 Mar 2008 - 2:25 pm | नंदन

परीक्षण. हे वाचून हा सिनेमा पाहिलाच पाहिजे या यादीत टाकला आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

व्यंकट's picture

17 Mar 2008 - 6:24 pm | व्यंकट

धन्यवाद मित्रहो !

व्यंकट

चतुरंग's picture

17 Mar 2008 - 7:17 pm | चतुरंग

आजच वाचनालयात तबकडीसाठी मागणी नोंदवतो.

चतुरंग