जन्मोजन्मी

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
13 Dec 2009 - 11:43 am

प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,' बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?" त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला. त्याचे काही भाग बघितल्यावर यावर विश्वास ठेवायचा की नाही हे नक्की ठरवता येईना. मग वाटले की स्वतःच जाऊन अनुभव का घेऊ नये? पण त्यासाठी तुम्हाला कशाची तरी भीति वाटायला पाहिजे किंवा एखादे सात जन्म पुरणारे व्यंग वा दु:ख असायला पाहिजे. अचानक मला आठवले की आपल्याला लहानपणापासून पालींची प्रचंड भीति वाटते. झाले! मी माझी एक कथा तयार केली आणि दिली त्यांना पाठवून! बरेच दिवस झाले म्हणून फोन केला तेंव्हा मोठ्ठी प्रतीक्षा यादी आहे असे कळले.
एके दिवशी बोलावणे आले. माझी कथा माझ्यासमोरच वाचून ती खरी आहे याचे एक प्रतिज्ञापत्र करुन त्यावर माझी सही घेण्यात आली. त्यानंतर त्यावर आधारित माझ्या गेल्या दोन जन्मांच्या कथा माझ्यासमोर ठेवण्यात आल्या. मी बुचकळ्यात पडलो. अजून संमोहनावस्थेत जाण्यापूर्वीच यांना माझे आधीचे जन्म कसे कळले ?
मला सांगण्यात आले , कथा नीट वाचून घ्या म्हणजे संमोहनावस्थेत तुम्हाला तीच आठवेल. मग तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची! बाकी सर्व आमच्यावर सोपवा.
एकूण असा प्रकार होता तर! मीही काहीही न बोलता मान डोलावली. मला लगेच एका गूढ वातावरणातल्या खोलीत झोपवण्यात आले. डोळे बंद करुन पडून रहायला सांगितले. प्रश्न सुरू झाले.
डॉ.: - आठवा, तुम्ही काय दिसताय? कुठे उभे आहात?
मी: - मी एका गल्लीत उभा आहे. समोर एक लोभस कुत्री उभी आहे.
डॉ: - कुत्री ? आणखी काय दिसताय ?
मी: - तिच्याभोवती तीन चार लुत लागलेले कुत्रे घोटाळताहेत. मला तिचा वास सुध्दा घेऊ देत नाहीयेत.
डॉ: - काय बोलताय? नीट आठवा.
मी: - हो, मी जवळ पोचलो. तिची मूक संमती घेतली. अरे देवा, त्यांनी माझ्यावर हल्ला चढवलाय. माझे लचके तोडताहेत.
डॉ:- तुम्ही हे काय बोलताय ?
मी: - मी जखमी झालोय, मी मरतोय!!! ओह, मी मेलो!
डॉ: - तुम्ही नक्की कोण आहात ?
मी: - मी एक कुत्रा आहे.
झाले! खोलीतले दिवे पटापट लागले. कोणीतरी कट कट असे ओरडले. मला डोळे उघडायला सांगितले.
डॉ: - हा काय चावटपणा चालला आहे ? तुम्हाला काय सांगितलं होतं ?
मी: - मी कुठे आहे ? मला का ओरडताय? मला मी काय बोलत होतो ते काहीच आठवत नाही.
डॉ: - खोटं! ऐका काय बरळत होता ते! (टेप लावला जातो. वरील संभाषण मला ऐकू येते.)
मी: - अरे बापरे! म्हणजे मला खरंच पहिल्या जन्माचे आठवत होते ?
डॉ: - तुम्ही खोटं बोलताय. तुमच्यावर संमोहनाचा काही परिणाम होत नाहीये. आमचा अमुल्य वेळ तुम्ही वाया घालवलाय. त्यासाठी तुम्हाला दंड करू.
मी: - त्याआधी तुम्ही लोकांना फसवून अंधश्रध्देकडे वळायला लावता आहेत अशी मीच पोलिसांत तक्रार करीन.
माझा नूर पहाताच ते सगळे नरमले. मी व माझ्या मित्रांना एकेक भेटवस्तु घेऊन घरी जाण्याचा आग्रह करु लागले.
आम्ही मात्र काहीही न घेता विजयी मुद्रेने , ताठ मानेने बाहेर पडलो.
बाहेर आल्यावर माझा मित्र पोट धरधरुन हंसायला लागला. म्हणाला, लेका तुझ्या अचाट् कल्पनाशक्तीला सलाम!
मी: अरे विश्वास ठेव, खरंच मला मागच्या जन्मातले आठवत होते. आणि कायरे, मागचा जन्म मनुष्याचाच असेल असे कोणी सांगितले???

(ही कथा असून पूर्णपणे काल्पनिक आहे आणि असे कधी घडलेले नाही कारण माझ्यावर संमोहनाचा काहीही परिणाम होत नाही हे मला चांगले ठाऊक आहे.)

इतिहासमाध्यमवेध

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

13 Dec 2009 - 11:53 am | विनायक प्रभू

जगदंब

प्रमोद देव's picture

13 Dec 2009 - 1:26 pm | प्रमोद देव

कल्पनाशक्ती विलक्षण आहे तुमची.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Dec 2009 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम कथा
अंनिस वार्तापत्र ला पाठवुन द्या
पत्ता- संपादक, अंनिस वार्तापत्र
"चार्वाक" शिंदेमळा २६० / १-६, जुना कुपवाड रोड सांगली ४१६४१६
फोन / फॆक्स नं :- ०२३३-२६७२५१२

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सहज's picture

13 Dec 2009 - 2:02 pm | सहज

>नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम

अरेरे हा कार्यक्रम कुठल्या चॅनेलवर आहे? अर्थात झी, स्टारप्लस, सोनीवर देखील काही कार्यक्रमात बरेच अंधश्रद्धा पोसणारे प्रकार दिसतात. :-(

मला कधी वाटले नव्हते मुंबई दूरदर्शन व राष्ट्रीय दूरदर्शन ज्याला मी लहानपणी बोरींग बेक्कार म्हणून नावे ठेवायचो त्याच दोन वाहीन्यांचा आज मला अभिमान व आदर वाटेल.

मदनबाण's picture

13 Dec 2009 - 5:33 pm | मदनबाण

च्यामारी... हल्लीच एक न्यूज चॅनलवर पाहिले होते...(हल्ली कुठल्या सिरीयल्स मधे काय काय घडतं ते न्यूज चॅनलवर दाखवण्याची प्रथा आहे... ;) )
शेखर सुमन त्याच्या मागच्या जन्माबद्धल बोलत होता !!! (http://video.aol.co.uk/video-detail/raaz-pichhle-janam-ka-shekhar-suman/...) शेखर आणि शेखरचा अनुभव... ;)

हे चॅनलवाले कसला कार्यक्रम चालु करतील याचा काय बी भरवसा नाय बघा !!!

(पैसे मिळाले तर मी माझ्या पुढच्या जन्माबद्धल सुद्धा इन-डिटेल सांगायला आत्ताच तयार आहे... ;) )
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

स्वाती२'s picture

13 Dec 2009 - 5:49 pm | स्वाती२

कथा आवडली.

पैसे मिळाले तर मी माझ्या पुढच्या जन्माबद्धल सुद्धा इन-डिटेल सांगायला आत्ताच तयार आहे... ;)
मी पण!

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Dec 2009 - 2:59 pm | फ्रॅक्चर बंड्या

लय भारी...

binarybandya™

विजुभाऊ's picture

14 Dec 2009 - 5:55 pm | विजुभाऊ

माझ्यावर संमोहनाचा काहीही परिणाम होत नाही हे मला चांगले ठाऊक आहे
तुमच्यावर सम्मोहनाचा परीणाम्होउ शकत नाही हे तुम्ही ठामपणे कशावरून सांगता?
संमोहनाबद्दल अवास्तव समज पसरवु नका.
सम्मोहन हे केवळ आणि केवळ जर सम्मोहीत होणाराची इच्छा असेल तर होउ शकते. जर मनातून विरोध असेल तर संमोहीत अवस्थेत सुद्धा सम्मोहीत व्यक्ती सम्मोहनकर्त्याचा आदेश मानत नाही.
बाकी कथा बरी आहे.
काही शंका :
१)मागचा जन्म ज्याला आठवतो तो त्या मागच्या जन्मी माणूसच कसा असतो.? ( हिंदू मान्यतेप्रमाणे एक जन्म पुन्हा मिळत नाही. माणसाचा जन्म ८४लक्ष योनींच्या फेर्‍यातून गेल्यानन्तर एकदा मिळतो .
२)मागच्या जन्मी स्त्री असलेली व्यक्ती या जन्मीही स्त्रीच असते. हे लॉजीक काय आहे?
३) कोणाचा मागचा जन्म सापाचा / बॅक्टीरीया / देवीचा व्हायरस /आतड्यातील कृमींचा असल्यास त्या जन्माची स्मृती कशी प्राप्त करणार ? )

निवेदनः हे अवांतर धाग्याची खील्ली उडवण्यासाठी लिहिलेले नाही.

हेरंब's picture

15 Dec 2009 - 11:25 am | हेरंब

मी मागे एकदा संमोहित करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. पण झालो नाही म्हणून तसे लिहिले आहे.
मागचा जन्म माणसाचाच कशावरुन असेल ही शंका माझीही आहे. म्हणून तर कुत्र्याचा जन्म कथेत दाखवला आहे.
दर्जेदार कथा लिहिणं हा उद्देश नव्हताच. हा प्रकार सगळ्यांसमोर यावा आणि त्यावर त्वरेने चर्चा घडावी असे वाटले म्हणून जसे सुचेल तसे लिहिले.
हा कार्यक्रम एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीवर चालू आहे.
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद.