`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Nov 2009 - 9:28 am

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले. वातावरणात कुठेतरी निर्माण झालेल्या मोठ्ठ्या `पोकळी'मुळे सगळे चित्रच पालटून गेले. पुन्हा ढगांची गर्दी झाली. हवा कोंडल्यासारखी झाली आणि वादळाची चिन्हे उमटू लागली. कुठल्यातरी पोकळीमुळे कुठेतरी वादळे माजतात, हा निसर्गाचा नियमच आहे. तोच नियम महाराष्ट्रातही अनुभवायला लागणार, असे संकेत त्या चिन्हांमधून मिळू लागले.
आणि अखेर, ते वादळ राज्यात येऊन थडकले. `पोकळी'चा नियम खरा ठरला.
महाराष्ट्राचा सरता आठवडा अक्षरश: वादळी ठरला. वर्षानुवर्षे भक्कमपणे घट्ट उभे राहिलेले अनेक जुने वृक्ष त्या झंझावाती वादळात कोलमडून जमीनदोस्त झाले, तर अनेकांच्या फांद्या कोसळून पडल्या. जुना पालापाचोळा तर त्या वादळी वाऱ्यांसोबत कुठल्या कुठे उडून गेला. काहींना या वादळाचीच जणू प्रतीक्षा होती. असे वादळ यायलाच हवे होते, असे म्हणत अनेकांनी वादळी वारे आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटा अनुभवण्यासाठी समुद्रकिनारे गाठले आणि वादळासोबतच कोसळणाऱ्या पावसाच्या थंड शिडकाव्यात स्वत:ला भिजवून घेतले... वादळामुळे कोणते वृक्ष कोसळले, कुणाचे किती नुकसान झाले, कोणाला किती हानी सोसावी लगली, याचा हिशेब त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. वादळ आले, याचा आनंदही कुठेकुठे साजरा होत होता... पोकळी निर्माण झाली, की वादळ येणारच, मग त्याला सामोरे गेलेच पाहिजे, असा साधा सरळ हिशेब अनेकांनी माडला, तर आता हे वादळ कसे थोपवायचे, या चिंतेने अनेकांची झोप उडाली. आपल्या बापजाद्यांनी मजबूत बांधलेले आपले `घर' या वादळापुढे टिकाव धरेल का, या काळजीने कुणाचे मन थरकापून गेले...
बरोब्बर त्रेचाळीस वर्षांपूर्वी, १९६६ मध्ये असेच एक वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घोंघावले होते... त्या वेळी वादळांना `ग्लोबल' नावे नसत. तरीदेखील, ते वादळ कित्येक वर्षे मराठमोळ्या मनामनात घोंघावत राहिले. (भगवे वादळ?) त्या वादळानेदेखील, त्या वेळी मोठी पडझड झाली होती. भलेभले, मजबूत आणि घट्ट मुळांचे अनेक वृक्ष त्या वादळात साफ आडवे झाले आणि अनेकांनी वादळापुढे मान झुकवून शरणागती पत्करली. `महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती' असे एक वचन आहे. त्या वादळात जेव्हा मोठमोठ्या वृक्षांची वाताहात होत होती, तेव्हा लहानशी, कुठे अस्तित्वही नसलेली लव्हाळी मात्र तरारून उठली आणि त्या वादळानं त्यांना जणू संजीवनी दिली. अनेक लव्हाळी हा वादळवारा पिऊन तरारून उठली, आणि बघताबघता फोफावली... मोठी झाली. ज्या जमिनीतून जुनी खोडे जमीनदोस्त झाली होती, तिथेच ही लव्हाळी मूळ धरू लागली... त्या वादळानं नवे वृक्ष जन्माला घातले, आणि तब्बल त्रेचाळीस वर्षे हे वृक्ष अनेकांना सावली देत राहिले... १९६६च्या `त्या' वादळातही, अनेकांची, त्यांच्या पूर्वजांनी `भक्कम' बांधलेली मजबूत घरे मोडकळीस आली होती... म्हणूनच त्या वादळाच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात रुतलेल्या आहेत.
... महाराष्ट्रात नुकतेच थैमान माजविणाऱ्या या नव्या वादळाने त्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. `त्या' वादळात आणि `या' वादळात बरेचसे साम्य आहे, हे `अनुभवी' जाणकारांनी नेमके ओळखले आणि हे नवे वादळदेखील `पडझडी'च्या असंख्य खाणाखुणा उमटविणार, हे स्पष्ट झाले. `त्या' वादळाच्या वेळी तरारलेली लव्हाळी आता मोठी झाडे झाली आहेत. त्यांच्या सावलीतच, त्यांचीच बीजे पुन्हा रुजली आहेत. आजवर ती लहानगी रोपे, या सावलीतूनच वाऱ्यांच्या लहानश्या झुळुकांसोबत नुसती झुलायची. वादळाची चाहूलदेखील त्यांना शिवली नव्हती... पण अचानक आलेल्या या नव्या वादळात, ती जुनी खोडे भयाने झुकली, आणि जीव मुठीत धरून बचावासाठी आसरा शोहू लागली. त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला. पण या नव्या वादळापुढे ते जुने वादळही फिके पडले, तेव्हा त्या खोडांनी पायाशी झुलणाऱ्या रोपांना वादळात सोडून दिले, आणि अनेक रोपे हा नवा `वादळवारा' पिऊन तरारली. नव्या वादळाने त्यांना झपाटून टाकले. आणि जुनी झाडे, `वादळग्रस्ता' सारखी केविलवाणी झाली. आता केव्हाही आपण कोलमडणार, या भयाची सावली आता त्यातल्या अनेकांच्या फांदीफांदीवर दिसते आहे.
त्रेचाळीस वर्षांपूर्वी आलेले ते वादळ अगोदर मुंबईवरच घोंघावले, आणि किनारपट्टीचा वेध घेतघेत ते कोकणात सरकले. बघता बघता त्याने कोकणाचा कब्जा घेतला. आणि अवघे कोकण काबीज करून ते वादळ तेथेच स्थिरावले. नंतर अनेक वर्षे कोणतीच पोकळी कुठेच निर्माण झाली नव्हती. पण निसर्ग मोठा लहरी असतो. उभे आयुष्य हवामानाच्या संशोधनात घालविणाऱ्या अभ्यासकांचे अंदाजही तो चुकवितो. कधीतरी कुठल्यातरी पोकळीची चाहूल लागली म्हणून वादळाचा अंदाज वर्तवावा, तर अचानक ती पोकळीच नष्ट व्हावी आणि वादळाची सगळी चिन्हेच पुसली जावीत, तर कधी पोकळीचा अंदाजच न आल्याने वादळाचा वेग किती असेल याचेच आडाखे विस्कटून जावेत, असा अनुभव अशा अभ्यासकांनाही अनेकदा आलेला असतो. या नव्या वादळाचे नेमके तेच झाले... `अशी अनेक वादळे आम्ही पाहिली आणि पचविली आहेत', अशा भ्रमात असलेल्यांनाच या वादळाचा मोठा तडाखा बसलाय. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कशी करायची, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर चक्रीवादळासारखा घोंघावत असेल.
... आता ‘पंचनाम्या’ला सुरुवात होईल, तेव्हा नुकसानीचा नेमका अंदाज येईल... मग, घरे पूर्णपणे कोसळलेल्यांना किती `नुकसानभरपाई' द्यायची, नुसती पडझड झालेल्यांना कसे `सावरायचे', आणि कुणाला `तात्काळ मदती'ची गरज आहे, हे त्या पंचनाम्यानंतरच निश्चित होणार आहे.
सध्या तरी, `वादळग्रस्तां'ची नुसती मोजदाद करण्याचे काम सुरू आहे.
(http://zulelal.blogspot.com)
(http://72.78.249.107/Sakal/14Nov2009/Normal/PuneCity/page6.htm?CurrentSu...)

मुक्तकसमाजलेखमाध्यमवेध

प्रतिक्रिया

सुनील's picture

14 Nov 2009 - 3:52 pm | सुनील

रूपक आवडले - फारसे पटले नसले तरी!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

14 Nov 2009 - 3:53 pm | सुनील

रूपक आवडले - फारसे पटले नसले तरी!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.