आज नवर्याच्या प्लँट मधे लॅब च्या लोकांना येता जाता तोंडात टाकायला ग्रॅनोला केला. त्याचा नमुना मिपाकरांसाठी.
साहित्य
३ कप ओट (इंस्टंट नको)
१/२ कप आक्रोडाचे तुकडे
१/२ कप बदामाचे तुकडे
१/३ कप मध
१ टे. स्पून ब्राऊन शुगर ( नसल्यास साधी चालेल)
१ टे. स्पून तेल
१ टी स्पून वॅनिला
१ कप सुकवलेल्या बेरीज किंवा मनुका
कृती
ओवन ३००F तापत ठेवा. एका १३x९ च्या बेकिंग पॅन मधे ३ कप ओट पसरुन तापलेल्या ओवन मधे ठेवा. १० मिनिटांनी बाहेर काढून त्यात आक्रोड आणि बदामाचे तुकडे नीट मिसळून परत अजुन २० मिनिटे ओवन मधे भाजा. मधल्या वेळात एका छोट्या भांडयात मध, तेल आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर साखर वितळेपर्यंत (१-२ मिनिटे) गरम करा. आचेवरुन खाली उतरुन त्यात वॅनिला घाला.
भाजलेले ओट्चे मिश्रण ओवन मधून बाहेर काढुन ओवनचे तापमान ३२५F पर्यंत वाढवा. पॅन मधील ओटवर मधाचे मिश्रण घालून नीट ढवळून घ्या. पुन्हा तापलेल्या ओवन मधे १० मिनिटे भाजा. भाजताना २-३ दा मिश्रण ढवळा. बाहेर काढून त्यात बेरीज किंवा मनुका घाला. गार झाले की डब्यात भरा.
सिरीअल सारखा दुधात घालून किंवा दह्यावर घालून न्याहारीला छान लागतो. पण आमच्या कडे सगळे येता जाता नुसताच खातात.
टीप
कपाला तेलाचा हात लावून नंतर त्यात मध घातल्यास कपाला चिकटत नाही
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 1:17 am | रेवती
वा!!
बदाम बर्फीनंतर अजून एक पौष्टिक पाकृ!
ग्रॅनोला दुधात घालून खाणे ही माझी आवडती न्याहरी आहे.
कुठल्याश्या पुस्तकात या पदार्थाच्या पौष्टिक गुणांबद्दल वाचले होते.:)
येताजाता हातावर म्हणून चांगला खाऊ आहे. नाहीतरी चिवडा, चकली आवडत असली तरी खाऊ कि नको असा विचार मनात येतोच, त्यावर छान उपाय!
रेवती
11 Nov 2009 - 7:33 am | सहज
सोपा व पौष्टीक. क्रंची ग्रॅनोला एकदम हीट आहे. लहान मुलांसाठी. बाहेरगावच्या प्रवासात फार उपयुक्त.
थोडा फरक करुन ब्रेकफास्ट बार बनवता येतील.
11 Nov 2009 - 8:46 am | स्वाती२
मी ब्रेकफास्ट बारही बनवते पण लॅब मधल्या लोकांना ट्रेल मिक्स सारख येता जाता खायला हे बरे पडते.
11 Nov 2009 - 8:15 am | मदनबाण
ह्म्म... पौष्टिक आहार. :)
मदनबाण.....
11 Nov 2009 - 9:52 am | शाहरुख
ओट म्हणजे नक्की काय असते आणि ते पौष्टिक का समजले जाते ?
11 Nov 2009 - 5:10 pm | स्वाती२
ओट हे एक प्रकारचे धान्य आहे. पूर्वी गुरांना खायला वापरायचे. पण आता वाईट कोलेस्टोरॉल कमी करते म्हणून माणसेही खातात. अधिक माहिती साठी http://health.learninginfo.org/oats.htm
11 Nov 2009 - 5:35 pm | गणपा
तरीच हृदयरोगी गुरं पाहिली नाहीत कधी ;)
हा आपल्या चमचमीत चिवड्याला पर्याय का :?
ओट्सचे लाडू आठवले.
13 Nov 2009 - 1:25 am | दिपाली पाटिल
अर्रे व्वा...ग्रनोला...माझ्याकडे कॉस्टकोमध्ले भरपूर ओट्स आहेत...मस्त आहेत, मी नक्की बनवेन....नुसते ओट्स घशाखाली उतरत नाहीत...
दिपाली :)