रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या.
रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही?