संपादकीय

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
10 Nov 2012 - 10:24 am

मिसळपावचा हा पहिला दिवाळी अंक हजारो सदस्यांना आणि लाखो वाचकांना देताना मला जो आनंद होतोय तो आनंद अगदी मिसळपाव संपादक मंडळापासून ते अंक डाऊनलोड करणार्‍या मूषकालाही होत असणार.

पाच वर्षांच्या वाढत्या वयात आजपर्यंत मिपाने कधी दिवाळी अंक काढला नाही याचं कारण शोधण्यापेक्षा, आता का काढला हे बघणं जास्त महत्वाचं आहे. मिपाकरांना लेखनातून व्यक्त व्हायला मनापासून आवडतं, आणि रोजच्या लिखाणातून ते मनसोक्त व्यक्त होतच असतात (मग.. घाबरतात की काय?!). तरीही वेगळा अंक काढण्याचा खटाटोप कशासाठी?

तर, बर्‍याच काळाच्या निरीक्षणाने असं दिसलं होतं की एखादा "प्रोजेक्ट" हाती घेतला तर मिपाकर नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने त्यात भाग घेतात. आधी घोषित करुन घेतल्या गेलेल्या कानसेन स्पर्धेत सर्वांनी एकत्र येऊन जी धमाल केली ती पाहता हे लक्षात येईलच. हा सहभाग लेखक म्हणूनच असेल असं नव्हे, किंवा लेखक म्हणूनच असावा असंही नव्हे. निव्वळ वाचक किंवा प्रतिसादकर्ता म्हणूनसुद्धा मिसळपाव हा एक खूप मोठा परिवार एकत्र येतो असं दिसतं.

तस्मात्, हा अंक काढण्यामधे सर्वांना एकत्र आणणं हाच विचार आहे. आणि त्या निमित्ताने एक संकेतस्थळ म्हणून मिसळपाव परिवार हा नव्या कल्पना स्वीकारणं आणि काळानुसार कल्पना बदलणं यासाठी नेहमीच तयार आहे हे ही पुन्हा अधोरेखित होतं.

दिवाळी अंक काढताना ज्या चर्चा घडल्या त्यामधे अंक पीडीएफ स्वरुपात बनवावा, ऑनलाईन स्वरुपात बनवावा की दोन्ही, यावर चर्चेने सुरुवात झाली. शेवटी "दोन्ही प्रकारे बनवावा" हा पर्याय जिंकला, कारण हे सर्वच चर्चाकर्ते (संपादक असले तरी) आधी पक्के मिपाकर आहेत. "काथ्याकूट" हा अस्सल मिपाकराचा धर्म उत्तमरित्या पार पाडल्यानंतर हे एकमत झालं.

त्याचं असं आहे, की आपण सगळे प्रतिसादाची वाट पाहतो. इथे, मिपावर लिखाण करुनच नव्हे.. रोजच्या जगण्यातही आपण समोरच्याच्या प्रतिसादाची वाट पाहातच असतो. आपण जिवंत आहोत याच्या खात्रीसाठी समोरचा जिवंत आहे याची खात्री आपल्याला आधी हवी असते. ...रोजच्या जगण्यात तो प्रतिसाद क्वचितच मिळतो.

पण इथे मिपावर त्याची कमतरता नाही. अक्षरशः कामधाम सोडून घरा-हपीसातून लोक प्रतिक्रिया देतात. आपल्या लेखनाला येणार्‍या प्रत्येक नव्या प्रतिसादासोबत मूळ लेखकाची कॉलर आणखी टाईट होते. मिसळपाव वेबसाईटच्या इतिहासात सर्वकाळ आपल्या मुखपृष्ठापेक्षाही "नवे लेखन" या पानाला प्रचंड जास्त संख्येने हिट्स असतात ते यामुळेच.

मग अशावेळी दिवाळी अंक लिहीणार्‍या लेखकांना जर प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत तर मिसळपावचा अंतरात्माच हरवेल.
...म्हणून मग ऑनलाईन अंक हा प्रतिसादकांसाठी म्हणून आणि पीडीएफ स्वरुपातला अंक हा डाऊनलोड करुन आंतरजालाशी संपर्क नसतानाही निवांत वाचण्याची केवळ एक सोय म्हणून, अशी रचना केली आहे.

या अंकाची कल्पना नीलकांतने मांडली त्या क्षणापासूनच संपादक मंडळात उत्साह संचारला. रामदासकाका अंकाचे मुख्य सल्लागार असल्याने अंकाच्या भविष्याची काळजी नाहीशी झाली. वेळ कमी उरला होता म्हणून मग लेखन जमवण्याची जोरदार तयारी सुरु झाली. या अंकाला तेव्हापासून आजपर्यंत इतक्या सुहृदांचा हातभार लागला आहे की त्यांच्या नावाची यादी बनवणं हा या अंकाच्या निर्मितीतला सर्वात कठीण भाग असावा.

नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळ या सर्वांनी अंकाची कल्पना मांडून, उचलून धरुन तिला प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं. यात प्रत्येक संपादकाने आपले रोजचे व्याप सांभाळून जास्तीतजास्त लेखकांना लिहीतं केलं. संपादक मंडळातल्या प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलला. अंकाचा काही भाग सर्वानुमते निवडलेल्या लेखकांकडून निमंत्रित लेखन म्हणून मागवला गेला. बाकीचा भाग मिपाकरांनी नीलकांतच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाने भरेल की नाही असा विचार कितीही दाबला तरी मनात येतच होता.

पण या आवाहनाचा प्रतिसाद पाहता आमची झोळी दुबळी पडली हे आता आनंदाने मान्य करतो. एक जाडजूड ग्रंथ बनेल इतकं साहित्य आमच्याकडे आलं. अक्षरशः पाऊस पडला. अंकाची एकूण जबाबदारी आणि त्यातही साहित्य निवडीची जबाबदारी नीलकांतने माझ्याकडे दिलेली असल्याने मी जरा तरंगत होतो.. पण इनकमिंग साहित्याचा हा गिरसप्पा धबधबा पाहून मात्र सुरुवातीला माझी साफ तंतरली.. जसंजसं वाचत गेलो तसंतसं मात्र इतका आनंद मिळत गेला की ही जबाबदारी न वाटता अभूतपूर्व संधी वाटायला लागली. आपलं नशीब चांगलं असं वाटायला लागलं.
मिसळपाव ही "क्लासेस"ची स्टडीरूम नव्हे. ते "मासेस"चं अंगण आहे. इथे लिहीताना थेट "माणसं" व्यक्त होताहेत, "लेखक" नव्हे. त्यामुळे मिसळपावच्या अंकाचा लौकिक "सर्वांचा" अंक असा राहिला पाहिजे. उच्चभ्रूंचा, सॉरी, "हुच्चभ्रूंचा" अंक असा नव्हे..त्यात साहित्यमूल्य ज्यांना शोधायचंय त्यांनी शोधावं..पण प्रत्यक्षात हा जनांचा प्रवाह आहे..त्यात आंबटगोडतुरट सर्व आहे..आणि त्यामुळेच इथे इतका आनंद आहे.

या भावनेतून आणखी एक ठरवलं, की एथ्निक, बोजड, अतिअभिजात कलाकृती असलेलं, क्लासिक पेंटिंग असावं तशा स्वरुपाचं, निसर्गसौंदर्य दाखवणारं, यापैकी रुळलेलंच एखादं मुखपृष्ठ किंवा डिझाईन करण्याऐवजी रंगीबेरंगी आणि लोकांच्या रोजच्या आयुष्यातली दिवाळीची प्रतीकं दाखवणारं डिझाईन कोलाज करुन या अंकात वापरलं.

मिसळीचा स्थायीभाव मिश्रतेतच असतो. वेगळ्या वाटीत फरसाण, वेगळ्या वाटीत उसळ, वेगळ्या वाटीत कांदा.. आणि तुमचं तुम्ही मिक्स करुन खा.. ही खरी मिसळच नव्हे. त्यामुळे कवितेचा वेगळा विभाग, रेसिप्यांचा वेगळा सेक्शन.. अशी नेहमीची मांडणी टाळली आणि खरोखर सर्व प्रकारचं लेखन मिसळीच्याच रुपात समोर यावं म्हणून कोणतेही विभाग करण्याचं टाळून सर्व लेख अधेमधे मिसळून त्यांचा क्रम लावला. मिसळ "लावली" म्हणा ना.. हे दोन्हीही पहिल्या प्रयत्नातले प्रयोगच..

या विचाराने एक झालं की जरी मला साहित्यावर कात्री वापरावी लागली,प्रत्येक शब्द प्रकाशित करता आला नाही, तरीही स्वतःचा व्यक्तिगत ढुढ्ढाचार्यपणा करुन फार अभिरुची वगैरे वगैरेच्या फाजील नशेत लोकांचं मनापासून आलेलं लिखाण घाऊकपणे नाकारत राहणं हेही घडलं नाही.

त्यामुळे माझा स्वतःचा सुरुवातीचा "चेकर"चा अभिनिवेष गळून गेला आणि मी जास्तीतजास्त साहित्याला अंकात स्थान कसं देता येईल याचा मनापासून प्रयत्न केला. जे साहित्य घेता आलं नाही त्याबद्दलही मला हळहळच जास्त आहे. पण निखालस निकृष्ट अशा कारणाने कोणतंही साहित्य नाकारावं लागण्याची वेळ लेखकमित्रांनी माझ्यावर आणली नाही. जे साहित्य नाकारलं त्यामागे मुख्यतः सर्वानुमते स्वीकारलेली काही बंधनं होती. संपादक या पदावर व्यक्तिगत मतांपेक्षाही सर्वसामान्य संकेतांना धरुन राहणं उचित होतं. त्यानुसार उदाहरणार्थ, मांसाहारी पाककृती.. मृत्यू किंवा रोग यांसारख्या विषयांवरचं दु:खांत लेखन.. सणाच्या उत्सवी वातावरणात समाजमान्यतेनुसार अभद्र किंवा बीभत्स ठरतील असे विषय यांना नाईलाजाने कात्री लावली गेली. त्यातलं बरंच लिखाण एरवीच्या संदर्भात उत्कृष्ट दर्जाचं असूनही..

आभार हा तर एक उपचार झाला. मिसळपावचा पिंड हा कृत्रिम "पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ.." छापाच्या औपचारिकतेपासून दूर आहे. तरीही केवळ मिसळपावशी कितीजण आणि कसे स्नेहाच्या धाग्याने जोडले गेले आहेत हे जाणवण्यासाठी अनेकजणांचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. चाळीत गणपती बसवायचा आहे असं ठरलं की सारे घरनंबर आपल्या घरचं कार्य असल्यासारखे झटून कामाला लागतात तसं इथेही झालं.

धडाधड येऊन पडलेल्या लेखांना एकत्र आणणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यांना अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एकत्र आणण्याचं काम किसन शिंदे यांनी केलं.. नाही नाही..आपल्या किस्नाने केलं.

त्यानंतर समोर उभा ठाकलेला एवरेस्ट पर्वत होता तो मुद्रितशोधनाचा. इथे सुधांशुनूलकर यांनी उत्स्फूर्तपणे, अगदी न मागता मदतीचा हात पुढे केला. या हाताचं बोट धरता धरता मग मी तो हात ताब्यातच घेऊन टाकला आणि त्यांनीही जवळजवळ एकहाती हा पर्वत निस्तरला. सुधांशुनूलकर हे व्यावसायिक मुद्रितशोधक आहेत आणि त्यामुळेच मिपाला आपोआप उत्कृष्ट दर्जाच्या प्रूफ करेक्शनचा लाभ झाला. सुधांशुनूलकरांना अधिकाधिक साहित्य देत असताना कधीतरी मलाच मनाची लाज वाटली आणि त्यांचा भार कमी करण्यासाठी मी प्रासलाही यामधे ओढलं. "प्रास द जीनी" आपलं आयुर्वेदिक संशोधन बाजूला ठेवून मुद्रितशोधनाला बसला आणि त्यानेही रातोरात काम पूर्ण करुन दिलं.

काही लेखन हे पीडीएफ स्वरुपात मिळालं होतं. त्याचं रुपांतर युनिकोडमधे करणं, आणि तेही चुका न होऊ देता, हे काम करण्याचा चांगला मार्ग म्हणजे ते पुन्हा एकदा टाईप करणं. हे काम निश्चित कंटाळवाणं आहे. पण आवश्यकही. अशा काही लेखांबाबत लीलाधर आणि अन्य मेंबर्सना विनंती करताच हेही काम त्यांनी तडीला नेलं.

अभिजीत, मी नाही, असं म्हणत असला तरी त्याने डिझाईनची पूर्ण जबाबदारी घेतली. स्पा आणि सौरभ यांनी त्याला तज्ञ सल्ले देऊन डिझाईनसाठी खूप कल्पना सुचवल्या.
ज्यांनी अंकासाठी लेखन दिलं ते या अंकाचे सर्वात मोठे आधारस्तंभ. मुळात लेखन येतानाच धबधब्याऐवजी करंगळीधार आली असती, तर कसलं मुद्रितशोधन आणि कसलं सिलेक्शन..

ज्या हातांनी या अंकाचा भार उचलला पण त्यांची नावं माझ्यापर्यंतही पोचली नाहीत त्या सर्वांचंही ऋण मी इथे नोंदवतो. कोणताही ऋणनिर्देश राहिला असेल तर मी त्याबद्दल सपशेल माफी मागतो आहे. असा उल्लेख राहण्यामागे बाकी काहीही नसून माझा अंगभूत गबाळेपणा आणि विस्कळीतपणा हेच कारण आहे.

हा दिवाळी अंक बनवताना आम्ही अनेकजण रात्री जागत होतो. मध्यरात्री "व्यनि चेकवत" होतो. आलेल्या लेखनातला भरपूर मजकूर इकडून तिकडे "चोप्य पस्ते" करत होतो.. फार थोडा मजकूर "फाट्यावर मारत" होतो. हे सर्व करताना मी एका जाणिवेने कमालीचा भारावून गेलो. ती जाणीव अशी, की जे सर्व मिपाकर लोक्स मिळून हे काम करत होते ते सर्व वेगवेगळ्या गावांत, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या देशांत बसले होते.. कोणी अमेरिकेतून जर्मनीतल्या मिपाकराशी फॉलोअप करत होता, कोणी ऑस्ट्रेलियातून ठाण्याशी संपर्क ठेवून होते , कोणी नायजेरियातून रात्रीअपरात्री जागून महाडमधल्या लेखकमित्राला लिहीतं करण्यासाठी संवाद करत होते तर कोणी सोलापुरात बसून अमेरिकेतल्या वर्किंग टाईमात डिझाईन बनवत होता.. या सर्व कामात कोणीही एका छदामाची प्राप्ती होणार नसूनही समरसून भाग घेतला.. इतकंच नव्हे तर आपला पैसा कमावून देणारा रोजगारही काही क्षणच का होईना पण बाजूला ठेवून त्याच्याही वरची जागा या मिपा दिवाळी अंकाला दिली. यातल्या कित्येक लोकांची पूर्ण नावंही मला माहीत नाहीत. अगदी या घडीलाही माहीत नाहीत. अविश्वासाने भरलेल्या या जमान्यात चार देशांतल्या चार अनाम लोकांवर मी भिस्त ठेवून होतो, आणि एकदाही अशी सूक्ष्म शंकाही आली नाही की हे काम पूर्ण होणार नाही.. हा एक अद्भुतरम्य प्रकार आहे बुवा.

नीलकांतने मला अंकाची जबाबदारी घ्यायला सांगितलं. आणि पुढचं सगळं तर इतरांनीच केलं..अंक तर बनलासुद्धा..

पण मग या सर्वात मी नेमकं काय केलं..?

समुद्रात मोती बनताना शिंपल्याच्या आत वाळूचा एक कण शिरतो. तो शिंपल्यातल्या ऑयस्टरला बोचत राहतो. मग एरवी शांत असलेला ऑयस्टर त्या वाळूच्या कणाभोवती थरावर थर देऊन सुंदर मोती बनवतो.

मोती किती सुंदर बनला आहे ते तुम्ही ठरवा. पण तो मी बनवला नाही. मी त्यातला वाळूचा बोचरा कण फक्त.

- गवि
footer

प्रतिक्रिया

मिपाचे पहिल्या दिवाळी अंक प्रकाशनाबद्दल अभिनंदन.
संपादकीय छानच लिहिले आहे हो गवि.

संपादकिय वाचताना भरुन याव तर मुळ अंक वाचताना काय अवस्था होइल माहित नाही. गवी अस संपादकिय आजवर नव्हत वाचल. सल्युट!!

सोत्रि's picture

12 Nov 2012 - 7:15 am | सोत्रि

गवि, धन्यवाद!

एका जबरदस्त संपादकिय ह्यासाठी अभिनंदन _/\_

-(मिपाकर) सोकाजी

किसन शिंदे's picture

12 Nov 2012 - 7:30 am | किसन शिंदे

मिपाचा पहिलाच दिवाळी अंक आहे म्हटल्यावर संपादकिय तेवढ्याच तोलामोलाचं हवं होतं, पण हे तर त्याही पेक्षा लाखमोलाचं झालंय.

मनःपूर्वक अभिनंदन!

मदनबाण's picture

12 Nov 2012 - 8:21 am | मदनबाण

मिपाच्या पहिल्या अंकाला हार्दिक शुभेच्छा ! :)
ज्या मंडळींनी या दिवाळी अंकासाठी मेहनत घेतली आहे, त्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन करतो. :)

यशोधरा's picture

12 Nov 2012 - 8:32 am | यशोधरा

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकाबद्दल नीलकांत, तुझे, संपादक टीमचे आणि ज्या सर्वांचा ह्या अंकासाठी हातभार लागला आहे, त्यांचे सर्वांचे अभिनंदन. संपादकीय आवडले.

संपादकीय अतिशय सुरेख झालेय.
हॅट्स ऑफ टू गवि आणि टीम.

लाल टोपी's picture

12 Nov 2012 - 10:30 am | लाल टोपी

फक्त अनुक्रमणिका पाहुनच अंक सर्वांगसुंदर असल्याचे जाणवते आहे. संपादक मंड्ळ आणि मिपा प्रशासकांचे अभिनंदन आणि दिवाळी चे अभिष्ट्चिंतन... सर्व मिपा परिवराचे.

नाखु's picture

12 Nov 2012 - 10:38 am | नाखु

आणि संपादकिय खास ग.वि. ट्च....... मनपुर्वक आभार..

चौकटराजा's picture

12 Nov 2012 - 11:15 am | चौकटराजा

दिवाळी अंकाचे संपादकीय एवढे साहित्यिक मुल्य असलेले असते ? बर्‍याच वेळा मुद्रक, प्रकाशक, वाचक जाहिरातदार, प्रूफ रीडर यांचे आभार प्रदर्शनाचा तो " गोड" कार्यक्रम असतो. एक अतिशय उत्तम लेखच वाचल्याचे समाधान मिळाले. पावती देतो आहे !

बहुगुणी's picture

12 Nov 2012 - 11:24 am | बहुगुणी

हा तर एक सुंदर लेखच झाला आहे, शेवट तर खास गवि-स्टाईलचा!

दिवाळीअंकासाठी झटणार्‍या सर्व कष्टकर्‍यांचे हार्दिक आभार, आणि सर्व वाचकांना दीपावलीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

५० फक्त's picture

12 Nov 2012 - 11:53 am | ५० फक्त

लई भारी ओ गवि, पोराला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लवंगी फटाक्यांच्या ऐवजी लक्ष्मी तोट्याचा बॉक्स मिळावा असं झालंय संपादकीय.

या दिवाळी अंकासाठी कष्ट केलेल्या सर्वांचे अतिशय आभार. माझ्या सारख्यांना मिपानं एक व्यासपीठ तर दिलेलेच आहे, आणि आता ह्या झगमगत्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

सुहास झेले's picture

12 Nov 2012 - 12:21 pm | सुहास झेले

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकाला गविंचे संपादकीय...सोने पें सुहागा :)

अंक निश्चित चांगला असणार, पण तूर्तास संपादकीय वाचून प्रचंड खुश झालोय. आता अंक वाचायला घेतो. सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि हा अंक आम्हा वाचकापर्यंत पोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार :) :)

नितिन थत्ते's picture

12 Nov 2012 - 1:07 pm | नितिन थत्ते

अभिनंदन.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2012 - 1:14 pm | सानिकास्वप्निल

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकबद्दल अभिनंदन!!!

संपादकीय वाचून अतिशय आनंद झाला आहे, हॅट्स ऑफ :)
ह्या अंकासाठी ज्यांनी कष्ट घेतले आहे त्यांचे मनापासून आभार. मिपाची अशीच प्रगती होवो, मिपाला लाभलेल्या सगळ्या गुणी संपादक मंडळींचे मी एक मिपाकर म्ह्णून आभार मानते :)

दीपावलीच्या शुभेच्छा!!

धन्यवाद _/\_

क्रान्ति's picture

12 Nov 2012 - 2:15 pm | क्रान्ति

मिपा दिवाळी अंकानिमित्त मालक, चालक, संपादक मंडळ, आणि अंकाला या न त्या प्रकारे हातभार लावणाऱ्या समस्त मिपाकारांचे हार्दिक अभिनंदन! काय जबरदस्त अंक काढला आहे! खरोखरीच या अंकामागच्या प्रेरणा, कष्ट, धडपड, तळमळ, आपुलकी यांनी झपाटलेल्या मंडळींचं कौतुक करावं तेवढं कमीच!

गवि, अतिशय उत्कट आणि उत्कृष्ट संपादकीय!

एक अत्यंत दर्जेदार, संपन्न अंक दिल्याबद्दल मिपा संचालक मंडळाला मन:पूर्वक धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Nov 2012 - 2:17 pm | निनाद मुक्काम प...

पैलतीरावर असलेल्या समस्त अनिवासी मिपाकरांसाठी मिसळपाव हे मायमराठी शी
नाळ जोडण्याचे मोलाचे काम करते.
शाळा सुटल्यावर मराठीशी सुटलेला संपर्क मिसळपाव वर आल्यावर पुन्हा जोडल्या गेला.
येथे वावरताना मला एक माहेरी आल्याची जाणीव होत असते.
प्रत्यक्ष भारतात येणे झाले नाही तरी ती कसर मिसळपाव वर वावरताना नेहमी भरून निघते.
मिसळपाव चा पहिला अंक अत्यंत गोजिरा झाला आहे.

हा दिवाळी अंक व्हावा , ही तर श्रींची इच्छा असे समजून त्याच्या निर्मितीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्व मिपाकर ह्यांचे मन पूर्वक आभार

अतिशय साध्या आणि ओघवत्या संपादकियाने मिपाच्या दिवाळी अंकाला चार चाँद लावले आहेत.

चतुरंग's picture

12 Nov 2012 - 4:45 pm | चतुरंग

मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकासाठीचे संपादकीय अतिशय ओघवते, नेटके आणि सर्वसमावेशक झाले आहे. किती उत्कटतेने लिहिले आहेत गवि, तुमचे खास अभिनंदन.
ह्या अंकासाठी कष्ट घेणार्‍या नीलकांतचे, सर्व संपादक मंडळींचे आणि इतर मिपासदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अंकाचे मुखपृष्ठ आणि इतर सजावट देखणी आहे. आता हळूहळू लेखांचा फराळ सुरु करावा म्हणतो! :)

(फराळोत्सुक्)चतुरंग

फारच सुंदर, नेटकी मांडणी, खंमग आणि चुरचुरीत लेख. फराळावर ताव मारता मारता दिवाळी अंकही फराळासारखा पुरवून पुरवून वाचणार! पीडीएफ साठी विशेष आभार!!

विसोबा खेचर's picture

12 Nov 2012 - 6:11 pm | विसोबा खेचर

खूप आनंद वाटला.. मनापासून अभिनंदन..

तात्या.

तुषार काळभोर's picture

12 Nov 2012 - 7:04 pm | तुषार काळभोर

हाबिनंदन!!

तिमा's picture

12 Nov 2012 - 7:26 pm | तिमा

इतकं चांगलं आणि अकृत्रिम संपादकीय यापूर्वी कधी वाचलं नव्हतं. संपूर्ण टीमचे अभिनंदन. 'जे करु ते उत्कृष्टच करु', ही जिगर मिपावासीयांनी दाखवली आहे.

स्मिता.'s picture

12 Nov 2012 - 7:49 pm | स्मिता.

मिपाचा दिवाळी अंक बघून खूप आनंद झाला. केवळ अनुक्रमणिका बघून आणि संपादकीय वाचूनच त्यावर घेतल्या गेलेल्या कष्टांची जाणीव होतेय. त्याकरता सर्व सहभागी मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन!
तसेच सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

जयवी's picture

12 Nov 2012 - 7:50 pm | जयवी

मिसळपावच्या पहिल्या वहिल्या साजिर्‍या गोजिर्‍या दिवाळी अंकाचं खूप खूप स्वागत :)
अंकासाठी ज्या ज्या लोकांनी हातभार लावला त्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन :)
संपादकीय जबरदस्त झालंय.

अस्मी's picture

12 Nov 2012 - 8:22 pm | अस्मी

व्वाह!! अप्रतिम!!
मिपाच्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला साजेसं संपादकीय!!
एकदम झक्कास :)

शर्वरी नेने's picture

12 Nov 2012 - 8:43 pm | शर्वरी नेने

इतक दर्जेदार संपादकीय आजतागायत दिवाळी अंकासाठी वाचण्यात आलेला नव्हत.
दिवाळी अंकाला अनेकानेक शुभेच्छा.

पैसा's picture

12 Nov 2012 - 9:08 pm | पैसा

धन्यवाद हो गवि!

राघवेंद्र's picture

12 Nov 2012 - 10:21 pm | राघवेंद्र

धन्यवाद मित्रा !!! पहिल्याच चेन्डुवर सिक्सर !!!
अजुन बाकिचा अन्क वाचायचा आहे. सुन्दर सुरुवात.
दिवाळीच्या सर्वाना शुभेच्छा !!! : राघवेन्द्र

अभिनंदन..

विरोचन's picture

12 Nov 2012 - 11:53 pm | विरोचन

मिपाच्या पहिल्या अंकाला हार्दिक शुभेच्छा !!! मिपा टीमचे खरंच कौतुक!!! आता पीडीएफची वाट बघतोय

अर्धवटराव's picture

13 Nov 2012 - 1:28 am | अर्धवटराव

यंदा दिवाळी दोनदा आली आहे.
हे संपादकीय संपूर्ण दीवाळी यथासांग पार पाडल्याचा आनंद देऊन गेली. आता उरलेले ५ दिवस परत दिवाळी अनुभवणार.
सर्वांना डबल दिवाळीच्या डबल हार्दीक शुभेच्छा.

अर्धवटराव

मिपा दिवाळी अंकासाठी राबणार्‍या सगळ्यांना सलाम! सर्व मिपाकरांना दीपावलीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

ऋषिकेश's picture

13 Nov 2012 - 7:46 am | ऋषिकेश

अत्यंत बोलके संपादकीय आहे. नेटक्या आणि भरगच्च अंकाबद्दल अभिनंदन! आता फराळासोबत वाचायला सुरवात करतो :)

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Nov 2012 - 8:58 am | श्री गावसेना प्रमुख

मिपा च्या पहील्या दीवाळी अंकाला माझ्याकडुन फराळी शुभेच्छा.

चिगो's picture

13 Nov 2012 - 2:43 pm | चिगो

अत्यंत सुंदर आणि बोलके संपादकीय.. नुसत्या संपादकीयावरुनच अंकाच्या उच्च दर्जाची कल्पना येतेय. निवांत वाचून प्रतिक्रीया देईल.. सगळ्या मिपापरीवाराला आणि मुख्यत्वः दिवाळी अंक टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

चाणक्य's picture

13 Nov 2012 - 4:22 pm | चाणक्य

नितांत सुंदर संपादकीय.

सूड's picture

13 Nov 2012 - 4:59 pm | सूड

पहिल्यावहिल्या दिवाळीअंकाबद्दल अभिनंदन!!
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली दैनंदिन कामं सांभाळून ह्या अंकासाठी वेळ काढणार्‍या सर्वांचे आभार.

सर्व वाचकांचे प्रतिसादांकरिता आभार. कौतुकाने संपूर्ण टीमला आनंद झाला आहे.

काही मुख्यतः तांत्रिक कारणाने, त्यातही मुख्यत: वेळेच्या कारणाने मागे राहिलेले पण दर्जेदार असे काही लेख आता ऑनलाईन अंकात उपलब्ध करुन देत आहे.

यामधे झालेल्या उशीरासाठी क्षमस्व.

हे लेख अंकात असण्याच्या योग्यतेचे असल्याने नंतर अ‍ॅड / अपडेट करण्यात आले आहेत.

विकास's picture

13 Nov 2012 - 9:44 pm | विकास

गवि, समस्त संपादकमंडळ, दिवाळीअंकाच्या संपादनात सहभागी असलेले सदस्य आणि लेखक/लेखिकांचे विशेषतः अभिनंदन! मिपाचा पहीलाच अंक मस्त झालेला आहे!

तसेच सर्व मिपासमुदायास दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!

सोत्रि's picture

14 Nov 2012 - 12:21 am | सोत्रि

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी झटणार्‍या सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन!

- (मिपाकर) सोकाजी

दादा कोंडके's picture

14 Nov 2012 - 12:25 am | दादा कोंडके

काही ऑनलाईन आंजावरचे दिवाळीअंक चाळले. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये मिपाचा दिवाळीअंक सरस वाटला. :)
सर्व संबंधीत मंडळीचं मनापासून अभिनंदन!

नगरीनिरंजन's picture

14 Nov 2012 - 7:34 am | नगरीनिरंजन

पहिल्यावहिल्या दिवाळीअंकाबद्दल मिपाचे हार्दिक अभिनंदन.
या अंकासाठी कष्ट घेणार्‍या सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांचे आणि संपादक मंडळाचे अनेक आभार!

तुषार काळभोर's picture

14 Nov 2012 - 7:41 am | तुषार काळभोर

हे संपादकीय म्हणजे मिपाच्या प्रथम दिवाळी अंकाचा शिरोमणी आहे...

चावटमेला's picture

14 Nov 2012 - 9:34 am | चावटमेला

संपादकीय म्हणजे फक्त एक साचेबध्द, भावनाविरहित शब्दांची अहवालात्मक मांडणी न राहता, एक भावस्पर्शी, तरल , सुंदर लेखच जमून आलाय :)

मी-सौरभ's picture

14 Nov 2012 - 4:19 pm | मी-सौरभ

वरील अनेक प्रतिसादांना +१

अपूर्व कात्रे's picture

14 Nov 2012 - 5:14 pm | अपूर्व कात्रे

गविंचे आणि बाकी सर्व team चे मनापासून अभिनंदन आणि आभार.....

"मिसळपाव" अशीच रुचकर मेजवानी सदैव मिळत राहो हीच इच्छा....
आणि दिवाळीच्या शुभेच्छा...

सुधांशुनूलकर's picture

14 Nov 2012 - 7:40 pm | सुधांशुनूलकर

अगदी आतुरतेने ज्याची वाट पाहत होतो, तो मिपाचा पहिलाच दिवाळी अंक फारच अप्रतिम. संपादकीय तर सर्वोत्कृष्ट. संपादक मंडळाचं, गाविंचं आणि सर्व लेखकांचं मन:पूर्वक अभिनंदन.
किती विविध विषयांवरचे लेख आहेत यात! अनेक पदार्थ योग्य प्रमाणात एकत्र करून चविष्ट मिसळ तयार होते, त्याचप्रमाणे विविध विषयांवरचे लेख एकत्र करून मिपाचा हा अप्रतिम दिवाळी अंक तयार झाला. त्यामुळे ‘मिसळपाव’ हे नाव सार्थ झालंय. मिपाच्या सदस्यांना किती विविध विषयामध्ये माहिती आहे, हेसुद्धा या अंकात दिसतं. हा अंक या वर्षीच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करेल, यात शंकाच नाही.

सुधांशुनूलकर

पाषाणभेद's picture

14 Nov 2012 - 10:32 pm | पाषाणभेद

सर्वांची मेहनत जाणवतेय. अंक सुंदर झाला त्यात वादच नाही. हळूहळू वाचतोय.
सर्वांचे अभिनंदन.