सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


श्रीगणेश लेखमाला – मिशन ई-अ‍ॅडमिशन... मुलाखत - श्री. राजेंद्र निंबाळकर

Primary tabs

सस्नेह's picture
सस्नेह in लेखमाला
8 Sep 2016 - 7:48 am

12

34

नमस्कार रसिक मिपाकरहो !

आज श्रीगणेश लेखमालेत 'व्यवसाय आणि छंद' या थीमद्वारे आपण एक जबरदस्त छंद असलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेणार आहोत. बुद्धिदैवत गणेशाच्या उत्सवाच्या निमित्ताने, साक्षात बुद्धिमत्तेला यशस्वितेचा मार्ग दाखवणार्‍या या व्यक्तीचे कार्य या आगळ्यावेगळ्या छंदातून कसे बहरून आले आणि त्यातून एका अनोख्या मिशनने कसा आकार घेतला – मिशन ई-अ‍ॅडमिशन, ..याच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत.

त्यांचे नाव श्री. राजेंद्र निंबाळकर. त्यांचा व्यवसाय आहे यंत्रमाग. आणि त्यांचा छंद आहे मेडिकल व इंजीनिअरिंग अ‍ॅडमिशन काउन्सेलिंग. बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी श्री. निंबाळकर २००३पासून गेली तेरा वर्षे फ्री काउन्सेलिंग करत आहेत. इचलकरंजीसारख्या छोट्या गावात त्यांचे कार्य चालत आहे, तरीही पुणे, मुंबई, नागपूर... अगदी दुबईतूनही फोनवरून मेडिकल व इंजीनिअरिंग अ‍ॅडमिशन्सबाबत त्यांचा सल्ला घेतला जातो. मार्गदर्शन घेऊ पाहणारे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी त्यांचा मोबाइल सदैव उपलब्ध असतो.

श्री. राजेंद्र निंबाळकर हे इचलकरंजीत निंबाळकर सर म्हणून ओळखले जातात. सरांनी वैयक्तिक पातळीवर सुरुवातीस गरज म्हणून केलेल्या काउन्सेलिंगच्या कामाचे आवडीत रूपांतर झाले आणि बघता बघता या छंदाचा विस्तार इतका फोफावला की यात इतर पालक आणि शिक्षकच नव्हे, तर शैक्षणिक संस्थाही समाविष्ट झाल्या आणि हा छंद केवळ छंद न राहता एक लोकहितोपयोगी व्यापक उपक्रम बनून गेला. यातूनच २००७ साली इचलकरंजी येथे पालक-शिक्षक संघ स्थापन झाला, ज्यामध्ये अनेक उच्चशिक्षित मान्यवर स्थानिक व्यक्ती सहभागी झाल्या. यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसाठी, करिअरिस्ट मुलांसाठी Aptitude test, CET/JEE MOC test, मानसिक समुपदेशन कार्यक्रम, पालक-विद्यार्थांसाठी प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारी सेमिनार असे विविध उपक्रम दर वर्षी राबवणे सुरू झाले. यामध्ये आजूबाजूच्या कॉलेजेसचे प्राचार्यसुद्धा उत्साहाने सहभागी होतात. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या इंजीनिअरिंग कॉलेजेसच्या दर वर्षीच्या इंजीनिअरिंग अ‍ॅडमिशन cut-offsचे आकडे देणारी पुस्तिका या पालक-शिक्षक संघातर्फे प्रकशित केली जाते, ज्यावरून मुलांना गुणवत्तेनुसार कोणत्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळू शकेल हे स्पष्ट होण्यास मदत होते. गरजू, गुणी, हुशार, सामान्य, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ही सेमिनार म्हणजे वैद्यकीय व अभियांत्रिकी करिअरविकासाच्या पर्यायांचा खजिनाच!

आजमितीस मेडिकलला व इंजीनिअरिंगला - त्यातल्या त्यात इंजीनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. पण इंजीनिअरिंग म्हणजे काय, इथपासून ते कॉलेजेसचे प्रकार - ऑटोनॉमस, गव्हर्न्मेंट, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आणि प्रायव्हेट, मायनॉरिटी इ.विषयी, तसेच खुद्द अ‍ॅडमिशन प्रोसेसविषयी मुलांना व त्यांच्या पालकांना फारच कमी माहिती असते. असते तीही बरेचदा चुकीची. अमुक एक शाखेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरच चांगले, अन्यथा संकट, अशी विचारसरणी सररास आढळते.. अगदी सुशिक्षित पालकांमध्येसुद्धा!

यामध्ये त्या त्या मुलाचा कल व क्षमता पाहून अचूक निर्णय घेणे आणि त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्यासाठी अशा काउन्सेलिंगची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेनुसार व पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये त्याला योग्य स्कोप सर्व वेळी मिळावा हेही आवश्यक आहे. कित्येकदा गुणवत्ता व पात्रता असूनही आर्थिक अडचणींमुळे मुले योग्य संधी घेऊ शकत नाहीत. अशा वेळी आर्थिक मदतीच्या विविध शासकीय योजना, विविध कॉलेजेसची फी-स्ट्रक्चर्स यांची विद्यार्थ्यांना माहिती नसते, ती दिली जाते. यासाठी श्री. निंबाळकर सरांनी वैयक्तिकरित्या संपूर्ण अ‍ॅडमिशन प्रोसेसचा सांगोपांग अभ्यास केला; इतकेच नव्हे, तर या प्रक्रियेतील त्रुटींबाबत Director of Technical Education, Maharashtra State यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून विद्यार्थांना या प्रक्रियेत येणार्‍या अनेक अडचणी दूर करण्यात यश मिळवले.

या पाठपुराव्यातून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही हितकर व श्रेयस्कर गोष्टी साध्य झाल्या आहेत. उदा., त्यांच्या सूचनेवरून CETची फी कमी झाली, JEEच्या व बारावीच्या गुणांना २०१४ या वर्षीपासून समान वेटेज मिळाले. तसेच CETच्या प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे वाढीव वेळ मिळाला, हा एक खूप मोठा फायदा झाला.

या अभ्यासाची व पाठपुराव्याची भरीव फलश्रुती म्हणजे २०१३मध्ये JEE Mains या परीक्षेसाठी नेमलेल्या संजयकुमार कमिटीवर Director of Technical Education, Maharashtra State यांच्याकडून पालक प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे. या कमिटीमध्ये सर्वसाधारणपणे दहा प्रतिनिधी असतात. काही विद्यापीठांचे उपकुलगुरू, पाठ्यपुस्तक महामंडळाचे अध्यक्ष व इतर. या कमिटीमध्ये निवड हा मोठाच सन्मान समजला जातो. त्यानंतर काही स्थानिक सार्वजनिक संस्थांनीसुद्धा त्यांना मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

असा व्यापक व जनकल्याणकारी छंद जोपासणार्‍या व्यक्तीची मुलाखत मिसळपावला सुदैवाने मिळाली आहे.

1
प्रश्न : नमस्कार ! मिसळपावच्या मुक्त व्यासपीठावर आपले स्वागत आहे.. आपला थोडक्यात परिचय?
निंबाळकर सर : मी राजेंद्र शंकरराव निंबाळकर. इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे राहतो.

प्रश्न : निंबाळकर सर, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी व व्यवसाय कोणता आहे?
सर : मी १९८० साली मुंबईमध्ये VJTI या तांत्रिक शैक्षणिक संस्थेतून LTM (टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंग पदविका) हा अभ्यासक्रम पूर्ण करून घरच्या वस्त्रोद्योग व्यवसायात काम सुरू केले. तेच टेक्स्टाईल युनिट आजही चालवतो. यातही नवनवीन प्रयोग करणे मला आवडते.

प्रश्न : आपला छंद आहे मेडिकल व इंजीनिअरींग अ‍ॅडमिशन काउन्सेलिंग. म्हणजे काय करता आपण?
सर : असे दिसून आले आहे की मेडिकलला व इंजीनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांचे पालक अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व इतर प्रभाव पाडणारे घटक यांच्याबद्दल अनभिज्ञ असतात. जनरली मुले-मुली कोणती ब्रँच किंवा कॉलेज निवडावे ही गोष्ट त्या त्या वर्षीची क्रेझ किंवा मित्र-मैत्रिणी कुठे जाणार यावर ठरवतात. उदा., या वर्षी कॉम्प्युटर/ आयटीची क्रेझ आहे. गेल्या वर्षी सिव्हिल इंजीनिअरिंगची आणि त्याच्या गेल्या वर्षी मेकॅनिकलची होती. अशा वेळी विद्यार्थी/पालक इतर करिअर ऑप्शन्सची माहिती घेण्याचा किंवा स्वत:चा कल पाहण्याचा प्रयत्नही करत नाहीत.
...कहर म्हणजे "PICTला कॉम्प्युटर, नाहीतर MITला मेकॅनिकल, नाहीच मिळाले तर सिंहगडला सिव्हिल करतो" असेही म्हणणारे महाभाग भेटतात. त्या सर्वांचे प्रबोधन करताना वेगळाच अनुभव, आनंद मिळतो.
यात मुख्यत्वेकरून विद्यार्थ्यांना State Merit Listमध्ये जो SML नंबर मिळतो, त्यानुसार जास्तीत जास्त चांगले कोणते कॉलेज व ब्रँच मिळेल याचा सल्ला देणे महत्त्वाचे. मी व माझे सहकारी त्यांना अशा सर्व पर्यायांचा क्रम सांगतो व त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरण्यास मदत करतो. तसेच अ‍ॅडमिशनचे राउंडस होतील तसतसे मिळालेल्या allotments योग्य आहेत का, हे तपासून सांगतो. हीच पद्धत MBBS, BDS/BAMS या कोर्सेससाठीही चालते.

प्रश्न : सर, हा छंद आपल्याला कधीपासून लागला आणि कसा ? कशी सुरुवात झाली या सगळ्याची ?
सर : २००३ साली माझा मुलगा मिहीर बारावी उत्तीर्ण झाला आणि त्याला अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क मिळाले. कॉम्प्युटरमध्ये करिअर करायची, हे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न. माहीतगार लोकांचे मत पडले की या मार्कांवर पुण्यात चांगल्या इंजीनिअरिंग कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळणे शक्य नाही, तेव्हा मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन घ्यावी. पण मिहीरला असा प्रवेश नको होता आणि माझीही आर्थिक पोहोच तेवढी नव्हती.
म्हणून मग मी सर्व अ‍ॅडमिशन प्रोसेसचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा समजले की कॉम्प्युटरसारखीच Information Technology ही नवीन ब्रँच आहे. आम्ही आयटी घ्यायचा निर्णय घेतला. पुण्यात जाऊन सर्व इंजीनिअरिंग कॉलेजेसची माहिती घेतली. त्या वर्षी खाजगी कॉलेजेसमधील ५० टक्के जागा त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन भरायच्या होत्या. त्याप्रमाणे MIT, VIT, PICT, PVG, VIIT सिंहगड इ. सर्व कॉलेजेसचे प्रवेश फॉर्म्स भरले. सर्वच्या सर्व - म्हणजे त्या वेळी उपलब्ध असलेले ४५ ऑप्शन फॉर्म्स आम्ही भरले. या सगळ्यात एकच खातरी मनात ठाम होत गेली की माझ्या मुलाला पुण्यातील एका चांगल्या कॉलेजमध्ये नक्की प्रवेश मिळणार आहे.
पहिल्या राउंडमध्ये मिहीरला सिंहगड कॉलेजला कॉम्प्युटर मिळाले. नंतरच्या राउंड्समध्ये VIT आणि MIT. इथे कॉम्प्युटर मिळू शकले नाही. इतक्यात PICTची सेकंड राउंड सुरू झाल्याचे समजले. तिथे आयटीची जागा शिल्लक होती. आम्ही आदल्या दिवशी प्रवेश शुल्काचा डीडी काढून दुसर्‍या दिवशी पहाटेच निघून पुण्यात पोहोचलो. पण कोर्टाच्या काही आदेशानुसार प्रवेश थांबवण्यात आले होते. आम्ही Admission counselor श्री. बापट सर यांना भेटलो. त्यांनी दुपारी ४ वाजता येण्यास सांगितले. ४ वाजता आलो. मोठ्ठी रांग होती. काय करावे कळेना. श्री. बापट सरांनी आम्हाला पाहिले व सांगितले की वकिलांनी अ‍ॅडमिशन प्रोसेस सुरू ठेवायला हरकत नसल्याचे सांगितले आहे. मग काय, लगेच अर्ज भरून प्रवेश घेतला. खूप आनंद झाला.
याच कालावधीमध्ये मुलाचे १०-१५ मित्र घरी यायचे. त्या सर्वांनाही आमच्या अभ्यासाचा खूप उपयोग झाला. त्या सर्वांना माझ्या माहितीचा अतिशय चांगला उपयोग झाला आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांना best available option कसे मिळेल हे एक पॅशनच बनून गेले!
...आज मिहीर गूगल या जगप्रसिद्ध कंपनीत सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे!!

प्रश्न : यंत्रमागाचा व्यवसाय हा मोठाच कटकटीचा. व्यवसाय सांभाळून हे काउन्सेलिंग कसे मॅनेज करता?
सर : माझा व्यवसाय काही फार मोठा नाही, प्रथमपासूनच. वेल, मी हे कबूल करतो की प्रसंगी व्यवसायाकडे थोडे दुर्लक्ष करूनही मी हा वसा घेतला आहे.

प्रश्न : आपल्या व्यवसायात या छंदाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोग होतो का?
सर : व्यवसायात नाही, पण व्यवसायाचे दुसरे साधन मिळण्यात या छंदाची मदत झाली आहे. माझा या विषयातील व्यासंग पाहून आमच्या येथील श्रद्धा अ‍ॅकॅडमीमध्ये मला काउन्सेलर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

प्रश्न : आणि व्यवसायाचा काउन्सेलिंगसाठी काही उपयोग होतो का?
सर : नक्कीच होतो. टेक्स्टाइल इंजीनिअरिंग / फॅशन टेक्नॉलॉजी इ. शाखांमध्ये प्रवेश घेण्याबाबत चांगले मार्गदर्शन करू शकतो.

प्रश्न : मेडिकलच्या आणि इंजीनिअरिंगच्या अ‍ॅडमिशन प्रोसेसबद्दल पालकांना व विद्यार्थ्यांना तपशीलवार माहिती मिळावी म्हणून आपण दर वर्षी काही उपक्रम आयोजित करता ना सर ?. ते कोणते ?
सर : व्यापक स्तरावर कार्य करता यावे, म्हणून आम्ही २००७मध्ये काउन्सेलिंगसाठी पालक-शिक्षक संघ स्थापन केला. या माध्यमातून दर वर्षी जूनमध्ये सार्वजनिक नाट्यगृहात पालक व विद्यार्थांसाठी प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारी सेमिनार आयोजित करतो. तसेच वर्षभर Aptitude test, CET/JEE MOC test, मानसिक समुपदेशन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम काउन्सेलिंगसोबतच राबवत असतो. सेमिनारला चार जिल्ह्यांतील सुमारे ८०० विद्यार्थी, ५०० पालक उपस्थिती लावतात. इंजीनिअरिंग करिअर व प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी सांगलीचे डॉ. अनिल गुप्ता सर, कोल्हापूरचे प्रा. अजित पाटील सर आणि परिसरातील इतर नामवंत कॉलेजेसचे प्राध्यापक-प्रतिनिधी येतात. तसेच डॉ. मनीषा शेट्टी, डॉ. जयश्री पाटील, डॉ. आरती कोळी या वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू व मान्यवर व्यक्ती मेडिकलच्या विविध शाखांविषयक मार्गदर्शन करतात.
केवळ सेमिनार घेऊन हा उपक्रम थांबत नाही, तर ४ ते ५ राउंड्सची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत वैयक्तिक स्तरावर काउन्सेलिंग सुरू राहते.

2

प्रश्न : निंबाळकर सर, आपल्या या छंदातून खूप होतकरू विद्यार्थ्यांना दिशा मिळत असेल, नाही का? याबद्दल विस्ताराने सांगाल का?
सर : हो तर! गुणानुसार अचूक शाखा निवडण्यास मदत केली जाते, तसेच सुयोग्य कॉलेज मिळवण्यास. विशेषत: AICTEने सुरू केलेली ट्युशन फी वेव्हर स्कीम (TFWS) याबद्दल गरजू होतकरू विद्यार्थ्यांपैकी कुणालाच नीटशी माहिती नसते. खाजगी कॉलेजेसच्या अवाढव्य फीज सर्वसामान्यांना परवडत नाहीत, अशा वेळी पुष्कळ गुणी विद्यार्थ्यांना प्रक्रियेतून या स्कीमचा फायदा करून दिला आहे. यात विद्यार्थ्याला दर वर्षी नाममात्र ५ ते १० हजार रुपये फी भरावी लागते. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इंजीनिअरिंगच्या विषय परिचयासाठी ब्रिज टेस्ट इ. उपक्रम संस्थेच्या माध्यमातून करतो.
याशिवाय गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना पालक संघातर्फे काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने दर वर्षी ५००० ते १०००० रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते. आतापर्यंत ५०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे.

प्रश्न : आपल्याला या छंदात किंवा आता झालेल्या उपक्रमात आपल्याला आणखी कोणाकोणाची साथ, मदत मिळाली आहे?
सर : पालक-शिक्षक संघातील माझे सहकारी डॉ. आनंद व डॉ. आरती कोळी, प्रा. एस.जे. पाटील, प्रा. एस.एस. तेली, डॉ. नारायण पुजारी व सौ. पुजारी मॅडम, श्री. प्रवीण कुरडे, प्रा. एच.ए. पाटील, लायन श्री. अशोक बुगड, श्री. महावीर रूगे, प्रा. आर.एन. पाटील, श्री. डी.एम. कस्तुरे, सुनील स्वामी, उमेश राठी, पूजा रुईकर, डॉ. मनीषा शेट्टी, डॉ. जयश्री पाटील, प्रमोद कावरे, उदय भगत, मिलिंद जगदाळे, श्री. व्यंकटेश व सौ. मयुरी बडवे, श्री. रवी नेगलूर, विनोद बागेवाडी व श्री. ए.आर. तांबे सर या सर्वांची यात नेहमीच साथ मिळाली आहे.

प्रश्न : बारावी CET व अ‍ॅडमिशन प्रोसिजर, त्यातल्या त्रुटी याबाबत आपण महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण महामंडळाकडे पाठपुरावा केला आहे असे समजते. यातून काय निष्पन्न झाले?
सर : अनेक वर्षांपासून Director of Technical Education यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यातून २००८ साली मुंबई येथे मंत्रालयात मा. तंत्रशिक्षण मंत्री यांची पालक-शिक्षक संघासोबत मिटिंग आयोजित केली. त्या वेळी विविध दहा मागण्या सविस्तर मांडल्या. यातून CET परीक्षेची फी ७००/-ऐवजी ५००/- करण्यात आली, तर पेपर फेरतपासणी फी १०००/-वरून ५००/- इतकी कमी करण्यात आली. परिणामी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा किमान २.५० कोटी रुपयांचा फायदा झाला. याशिवाय इतर राज्यांतील प्रवेशाबाबतच्या काही चांगल्या पद्धती महाराष्ट्रात स्वीकारल्या गेल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे CET परीक्षेच्या प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे वाढीव वेळ मिळाला, जो अमूल्य आहे.
पुन्हा एकदा याच प्रकारे २०१२ साली मंत्रालयात अशीच मिटिंग घेऊन विद्यार्थी व पालकांना CET परीक्षेची प्रश्नपत्रिका घरी नेण्यास मिळावी ही व इतर काही मागण्या केल्या. यामुळे CET परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता राहिली असती. याबरोबरच उत्तरांची फोटोकॉपी मिळावी ही मागणी मंत्रीमहोदयांनी तत्त्वत: स्वीकारली. तथापि अजूनही तिची अंमलबजावणी झालेली नाही.

प्रश्न : आता एक अनौपचारिक प्रश्न. हा छंद आणि तुमचे व्यक्तिगत जीवन यात समन्वय कसा साधता?
सर : खरे सांगायचे, तर अ‍ॅडमिशन काउन्सेलिंग हेच माझे पॅशन होऊन गेले आहे. इट इज पार्ट ऑफ माय लाईफ नाऊ. थोडा डिस्टर्बन्स झाला तरी पत्नी सहन करते. व्यक्तिगत जीवन असे कमीच राहिले आहे...

प्रश्न : हे सगळे कधीपासून करावेसे वाटते ? या छंदाची प्रेरणा मिळालेली असल्यास ती कुणाकडून मिळाली?
सर : २००६ साली बारामतीचे इंजी. हेमचंद्र शिंदे यांचा इचलकरंजी येथे अ‍ॅडमिशन काउन्सेलिंगचा कार्यक्रम झाला. तेव्हा हे किती मोठे काम आहे, हे समजले. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली व इतर काही पालकांच्या व शिक्षकांच्या सहकार्याने हे व्रत सुरू केले.

प्रश्न : अनेकदा एखाद्या गोष्टीची सुरुवात खूप अंडरस्टेटेड असते. आपण आपल्याच इन्स्टिंक्ट्सकडे दुर्लक्ष करतो. तुमचे असे कोणते इन्स्टिंक्ट्स कदाचित तुमच्याही नकळत अ‍ॅग्रेसिव्ह झाले आणि आज त्याला हे स्वरूप आले? आज मागे वळून पाहताना एखादी अशी छोटी सुरुवात आठवते का, ज्याने तुमच्या या छंदाला मूर्त स्वरूप आले?
सर : होय. माझा मुलगा मिहीर याच्या अ‍ॅडमिशन प्रोसेसमधील अडचणींनी यासाठी मला प्रवृत्त केले असे वाटते.

प्रश्न : छंदाबाबत काही विशेष उल्लेखनीय किंवा रोचक, स्मरणात राहिलेले प्रसंग सांगू शकाल का?
सर : …हो, एक प्रसंग मनात घर करून राहिला आहे. २००९ साली माझी मुलगी सुरभी बारावी उत्तीर्ण झाली, तेव्हा तिच्या तीन वर्गमैत्रिणी इंजीनिअरिंग अ‍ॅडमिशनबाबत माझा सल्ला घेण्यास आल्या. त्यातली एक बॅकवर्ड कॅटॅगरीपैकी, दुसरी मारवाडी समाजातील व तिसरी NT कॅटॅगरीतील होती. त्या तिघींना एकाच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन हवी होती.
..त्या तिघींची फॅमिली बॅकग्राउंड व गुणानुक्रम लक्षात घेऊन मी बॅकवर्ड कॅटॅगरीतील मुलगी, जिचे काका मुंबई येथे राहत होते, तिला मुंबईतील कॉलेज, मारवाडी मुलीला पुण्यातील कमिन्स कॉलेज व तिसरीला स्थानिक कॉलेज जॉईन करण्याचा सल्ला दिला. पण त्या तिघींनी ते न ऐकता मुंबईतील एका कॉलेजचा ऑप्शन दिला. त्याप्रमाणे त्या तिघींनाही मुंबईतील फादर रॉड्रिग्ज इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली व त्या पालकांसोबत तिथे हजर होण्यासाठी गेल्या. पण मारवाडी मुलगी, जी बाहेर कुणाच्या घरी पाणीही पीत नसे, तिथल्या अन्नाशी जुळवून घेऊ शकली नाही. एकीच्या पालकांना कॉलेजमधील ख्रिश्चन कम्युनिटीचे वातावरण पसंत पडले नाही. मुलींना सोडून पालक परत आल्यानंतर मुलींचे फोनवर फोन. 'इथे असं आहे, तसं आहे, जमत नाही...' मधूनच कॉलेजमधून पळून घरी येत.
हा सल्ला मी दिलेला नाही, हे मी परोपरीने त्यांच्या पालकांना सांगितले, तेव्हा त्यांना पटले.
अखेर तीनपैकी एकच मुलगी, जिला मी मुंबईतील कॉलेज घेण्याचा सल्ला दिला होता, ती फक्त तिथे राहिली व दुसर्‍या दोघी कॉलेज सोडून आल्या. नंतर त्या दोघींनी स्थानिक कॉलेजमधून B.E. पूर्ण केले, पण तेव्हा सर्वांनाच खूप त्रास, मनस्ताप झाला.

प्रश्न : या छंदातून आपल्याला मिळालेले सन्मान/ पुरस्कार याबद्दल थोडक्यात सांगा.
सर : २०१२-१३मध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांनी या कार्याबद्दल पुरस्कार दिला आहे. तसेच आणखी काही संस्थांनीही देऊ केले, पण ते नाकारले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २०१३ साली JEE Mainसाठी नेमलेल्या संजयकुमार कमिटीवर पालक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातून माझी निवड झाली आहे. हा विशेष गौरव आहे असे वाटते.

                                         3

प्रश्न : या छंदातील आजवरच्या वाटचालीबाबत समाधानी आहात का? त्याबद्दल काही विशेष सांगू शकता का?
सर : समाधान नक्कीच आहे. पण काही मर्यादांचीही जाणीव आहे.
भारतातून दर वर्षी सरासरी सव्वा लाख मुले अमेरिकेत शिकायला जातात. प्रत्येक मुलावर सरासरी पन्नास हजार डॉलर्स खर्च होतात. म्हणजे भारतातून तीस हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी अमेरिकेत जातात. हेच तीस हजार कोटी भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी खर्च केले, तर इथेच वर्ल्ड क्लास शिक्षण देता येईल.. !
तसेच बरेचदा विद्यार्थी व त्याहीपेक्षा पालक अवास्तव अपेक्षा घेऊन येतात व आम्हीही तसेच सांगावे अशी अपेक्षा ठेवतात. अशा वेळी आश्चर्य आणि वाईट वाटते. आज पुणे, मुंबई, नागपूर येथून, कधी दुबईतूनही काउन्सेलिंगसाठी फोन येतात. गडहिंग्लज, जयसिंगपूर, इस्लामपूर, निपाणी अशा गावांमधून प्रवेश मार्गदर्शनासाठी बोलावणी येतात. पण वेळेअभावी ते होत नाही याची खंत आहे. आता प्रत्येक शहरात असा एक पालक-शिक्षक संघ स्थापन व्हावा अशी इच्छा आहे! आणि त्यामधून गावोगावच्या गुणी व गरजू विद्यार्थ्यांना सदैव दिशा मिळत राहावी, हीच गणेशचरणी प्रार्थना!!
प्रश्न : धन्यवाद, निंबाळकर सर. मिसळपाव श्रीगणेश लेखमालेसाठी आपण आपला बहुमूल्य वेळ आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मिपाच्या वतीने अनेक आभार! मला वाटतं, मिपाकरांनी आपल्याला कधी काउन्सेलिंगसाठी विचारणा केल्यास आपण नक्कीच अनुभवाचा सल्ला द्याल, हो ना?
सर : कधीही, अगदी अवश्य देईन माझे मत. स्वागत आहे.. !
[राजेंद्र निंबाळकर. मो. 9823227218]

                                         4

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Sep 2016 - 7:51 am | पैसा

ग्रेट! _/\_

पिलीयन रायडर's picture

8 Sep 2016 - 7:55 am | पिलीयन रायडर

+११

खरंच!

आनंदराव's picture

8 Sep 2016 - 8:04 am | आनंदराव

काय काय काम करतात लोक!

बोका-ए-आझम's picture

8 Sep 2016 - 8:06 am | बोका-ए-आझम

धन्यवाद स्नेहांकितातै. जसं Noble Profession असतं तशी ही Noble Hobby आहे! _/\_

अजया's picture

8 Sep 2016 - 8:09 am | अजया

_/\_

अभिजीत अवलिया's picture

8 Sep 2016 - 8:18 am | अभिजीत अवलिया

_/\__/\__/\_

वा! समाजोपयोगी छंद!

एक छोटीशी सूचना - 'प्रश्न' आणि 'उत्तर' (येथे 'सर') ही हेडिंग्ज ठळक असावीत आणि दोन प्रश्नोत्तरांमध्ये एक ओळ सोडल्यास वाचायला सोपे जाईल.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 9:37 am | टवाळ कार्टा

अप्रतिम

नि३सोलपुरकर's picture

8 Sep 2016 - 10:25 am | नि३सोलपुरकर

___/\___.

मृत्युन्जय's picture

8 Sep 2016 - 11:06 am | मृत्युन्जय

वा. सरांच्या व्यासंगाला सलाम

सतिश गावडे's picture

8 Sep 2016 - 11:10 am | सतिश गावडे

निंबाळकर सरांच्या या कार्याला सलाम !!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

8 Sep 2016 - 11:28 am | खालीमुंडी पाताळधुंडी

छानच

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2016 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय समाजोपयोगी व्यासंग !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2016 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय समाजोपयोगी व्यासंग !

खेडूत's picture

8 Sep 2016 - 12:52 pm | खेडूत

छान ओळख.
अशी सुविधा विभागवार अन्य लहान शहरात असायला हवी.
मीही गेली १६ वर्षे अत्यंत् अल्प प्रमाणात हे काम (अर्थातच मोफत) करत आहे. सुरुवात झाली ती सरकरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना- त्या काळी संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर प्रवेश होत आणि त्यासाठी सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला समुपदेशन करावे लागे. पुणे विभागातून सहा जिल्ह्यातली मुले येत. पुढे ती नोकरी बदलली तरी बालक-पालक येत राहिले आणि दरसाल वीसेक मुले यासाठी संपर्कात असतात. दिखाव्यावर भुलून चुकीच्या कॉलेजात मुलांनी जाऊ नये यासाठी सगळा आटापिटा असतो.
कित्येक मुलांना स्वतःची आवड कळत नाही. मुलगा/ मुलगी/ आरक्षण/ नोकरीचे बदलते ट्रेंडस, पदव्युत्तर करण्याची क्षमता, आणि अन्य पार्श्वभूमी लक्षात घेऊन सल्ला द्यावा लागतो.
आवड म्हणून अजूनही या प्रवेश प्रक्रियेवर जवळून लक्ष ठेवून असतो.

अवांतरः सुर्वातीला ताज हॉटेलाचा फोटू का टाकलाय बरे?

साहित्य संपादक's picture

8 Sep 2016 - 1:19 pm | साहित्य संपादक

विद्यापीठाऐवजी चुकून चित्र दुसरे लागले होते. दुरुस्त केलंय.
धन्यवाद !

सस्नेह's picture

12 Sep 2016 - 10:55 am | सस्नेह

तुमच्याही अनुभवांबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

गिरिजा देशपांडे's picture

8 Sep 2016 - 12:57 pm | गिरिजा देशपांडे

निंबाळकर सरांच्या कार्याला सलाम _/\_. मो. नंबर दिल्याबद्दल धन्यवाद!!!!

स्वाती दिनेश's picture

8 Sep 2016 - 1:43 pm | स्वाती दिनेश

मुलाखतीबद्दल धन्यवाद,
स्वाती

रातराणी's picture

8 Sep 2016 - 3:45 pm | रातराणी

हॅट्स ऑफ!! _/\_

संत घोडेकर's picture

8 Sep 2016 - 4:22 pm | संत घोडेकर

__/\__

स्मिता_१३'s picture

8 Sep 2016 - 7:18 pm | स्मिता_१३

सलाम !!

राजाभाउ's picture

8 Sep 2016 - 7:56 pm | राजाभाउ

__/\___

वेल्लाभट's picture

9 Sep 2016 - 5:36 pm | वेल्लाभट

फॅन्टास्टिक ! ! !! अतिशय मोलाचं काम करतात सर.

यशोधरा's picture

9 Sep 2016 - 9:11 pm | यशोधरा

मुलाखत आवडली.

नाखु's picture

10 Sep 2016 - 9:32 am | नाखु

स्नेहांकितातै शतशः धन्यवाद..

संपादक ंमंडळ लेखमालीतील लेखांना वाचनखूण देण्यात यावी ही आग्रही मागणी.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2016 - 12:04 pm | मुक्त विहारि

+ १

वाचनखुणेसाठी प्रयत्न करत आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2016 - 12:04 pm | मुक्त विहारि

एका उत्तुंग व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल, मनापासून धन्यवाद.

पद्मावति's picture

12 Sep 2016 - 4:11 pm | पद्मावति

+१