(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )
ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले. पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच. म्हणूनच म्हंटले आहे, 'शरीर माध्यम खलु धर्म साधनं'. भगवान बुद्धाचे शिष्य प्रज्ञावान होते, तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा बहिष्कार नाही केला,अपितु गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरविला. असो.
राजू गाईडच्या अंगावर भगवे वस्त्र पाहून, भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांनी त्याला महात्मा समजून त्याचे स्वागत केले. शहरी जीवनातले छक्के-पंजे जाणणारा राजू , ग्रामस्थांच्या नजरेत एक ज्ञानी महात्मा ठरला. दूर पर्यंत त्याची प्रसिद्धी पोहचली. राजू मुफ्तचा माल उडवीत मजेत जगत होता. पण 'जगात काहीच मुफ्तमध्ये मिळत नाही, एक दिवस त्याची किंमत मोजावीच लागते'. गावात दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ. गावात पूर्वी हि एकदा असा असा भयंकर दुष्काळ पडला होता, तेंव्हा एका महात्म्याने इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तपस्या केली होती. आपले महात्मापण टिकविण्यासाठी राजूला हि तपस्येला बसावे लागले. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला, पळून जाण्याची इच्छा झाली. पण ज्या प्रमाणे कोळीच्या जाळ्यात अटकलेला कीटक तडफडून मरतो, तसेच आपल्याच महात्म्या रुपी प्रभामंडळात अटकलेला राजू हि उपासमार होऊन मरतो. सिनेमाच्या शेवटी पाऊस पडतो. पण प्रत्यक्षात असे होत नाही. कित्येक बळीराजांनी आत्महत्या केली तरी इंद्र्देवाचे हृदय पाझरताना कधी बघितले नाही. कुणी तपस्या केली कि इंद्रदेव प्रसन्न होत नाही, त्या साठी गोवर्धन पर्वतच उचलावे लागते.
आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते. या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले. ती त्या प्रभामंडळात अटकली.
आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते. तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला. तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला हि कळत असेलच. पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते . तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते.
भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता. ईरोम शर्मिला हि या १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती. कदाचित तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते. १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले. पण म्हणतात ना 'देर आये दुरुस्त आये'. भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.
प्रतिक्रिया
15 Aug 2016 - 2:16 pm | अमितदादा
ह्या वाक्याबद्दल तीव्र असहमती. ईरोम शर्मिला ने भारतीय व्यवस्थेवर विश्वास ठेवून निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे पण याचा अर्थ तिची 16 वर्ष व्यर्थ गेली असा नवे. आज ह्या देशात ASFPA कायद्याविरुद्ध झालेली जागृती हि तिच्यासारख्या कार्यकार्तिच यश आहे. माझ्यासारख्या भारतीय सैन्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं मत बदलण्यात सुद्धा तिचा मोलाचा वाटा आहे, भारतीय सैन्यावर प्रेम करणारा माणूस सुद्धा ASFPA विरोधी असू शकतो हे फक्त तिच्यामुळे. सर्वोच न्यायालयाने जुलै 2016 ला मणिपूर मधील 1500 पेक्षा जास्त फेक चकमकी ची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अर्थात त्यातील काही चकमकी गरजेच्या असतील पण काही चकमकी मध्ये फक्त निरपराध लोक मारली गेली आहेत, हि वस्थूस्थिती आहे. ईरोम शर्मिला चा लढा ह्या प्रवृत्ती विरुद्ध होता. तिने अक्षरश 16 वर्ष आयुष्याचा यद्न्य करून असंतोषाचा अग्नी पेटवत ठेवला हे काही थोडके नव्हे. लेखक साहेब तुमि खालील लेख वाचावा हि विनंती, सगळे विचार नाहीत पटणार तुम्हाला पण ईरोम शर्मिला बद्दलचे मत नक्की बदलेल.
http://www.loksatta.com/vishesh-news/letter-communication-with-irom-chan...
बाकी तिच्या जवळच्या लोकांचा ह्या निर्णयाला विरोध होता कारण, एक ब्रिटिश व्यक्ती तिच्या आयुष्यात येते कशी, तिच्यावर प्रेम करते कशी, लग्नाचा निर्णय कसा होतो आणि उपोषण कसं सोडती हे त्यांना अनाकलनीय वाटत. त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय गुप्तचर संस्थेचा डाव वाटतो. बाकी तिच्या वैयक्तिय निर्णय आणि उपोषण सोडण्याचा निर्णयाचा पूर्ण आदर आहे.
15 Aug 2016 - 2:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी).
नाकात घातलेल्या ट्यूब मधून हे सगळे देतात का सलाइन , सॉल्ट्स, मिनरल्स वगैरे देतात?? त्याला अन्न म्हणतात का? काका इरोम शर्मिलाच्या आंदोलनाचा अन उपवासाचा रोख सरळ सरळ माझ्या किंवा माझ्यासारख्या इतर लोकांना दिलेले हक्क होते, तरीही तिच्या विरुद्ध मी इतके लेव्हल पाडून अन विद्वेषपूर्ण बोलू शकत नाही, इरोम शर्मिलाची मागणी रास्त होती का?? माहिती नाही, इरोम शर्मिलाला विदेशी पैसा पुरवला गेला का?? अजिबातच माहिती नाही, पण तिच्याबद्दल असले बोलायला मी का धजत नाही?? हे सांगणे गरजेचे समजतो मी.
कधी नॉर्थ ईस्ट मध्ये ड्युटी केली आहेत का काका?? नसल्यास तुम्हाला तिथल्या ट्रायबल (कबीलाई) रीती माहिती करून घ्यायची गरज आहे, थोड्या थोड्या गोष्टीवर रक्त सांडले आहे तिकडे, अगदी अमुक ट्राईबच्या लोकांनी तमुक ट्राईबला हायवेवर टेकओव्हर केले म्हणूनही सहज 3 मॅगझिन गोळ्या चालतात तिथे, कधी मार्केट मध्ये नुसती एखादी नागा शॉल पांघरून फिरून दाखवावे बाहेरच्याने, ती शाल ज्याने तुम्हाला दिली असेल त्याचे तर दिवसच भरले समजा, अश्या वातावरणात इरोम शर्मिला शांतता हे एक हत्यार म्हणून पॉप्युलर करू शकली, हे तिचे श्रेय आहे, डोग्रा रेजिमेंटसोबत तिथे काय झाले होते हे माहिती असल्यास ह्या शांतीची किंमत तुम्हाला कळेल नक्कीच, अहिंसात्मक लढा, हे हत्यार असू शकते हे शर्मिलाने तिथल्या लोकांना समजवले, हेच काय ते तिचे मोठेपण, लोकांनां ते १०% जरी समजले तरी माझ्याच १० जवानांचे प्राण हकनाक जाण्यापासून वाचतील, उलट मी ह्या सरकारचे अभिनंदन करतो ज्यांनी नागा समझौता केला, इरोम प्रश्न सॉल्व करून तिला चक्क मुख्यधारेत आणले, ह्यात मुत्सद्देगिरी आहेच, पण म्हणून इरोम शर्मिला देशद्रोही ठरत नाही, तेव्हा दिल्लीच्या सुरक्षित वातावरणात आयुष्य घालवून कृपया वानप्रस्थ समयी असली घाण सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर ओकून आपला विद्वेशी स्वभाव दाखवू नयेत ही विनंती, आज तुमच्याबद्दल आदर १०% कमी झाला काका !!
15 Aug 2016 - 5:07 pm | अनुप ढेरे
तिला देशद्रोही म्हटलेलं दिसलं नाही पटाइत काकांनी. त्यांच्या मुद्दा उपोषण सोडून कायदेशीर/ राजकीय लढा द्यायला हवा होता हा आहे.
मला लेख आवडला.
15 Aug 2016 - 7:01 pm | कैलासवासी सोन्याबापु
देशद्रोही म्हणले आहे म्हणून मी त्यांना क्रिटीसाईज करतोय असे तुम्हाला का वाटावे? वाटल्यास आमचा ही असोच!
15 Aug 2016 - 2:47 pm | आतिवास
लेख किंवा लेखातत्सम जे काही लिहिलं आहे ते वाचून उद्विग्न वाटलं.
ज्यांनी मणीपूर पाहिलं आहे त्यांना शर्मिलाचा लढा आणि तिचा आताचा निर्णय कदाचित समजू शकतो.
असो.
15 Aug 2016 - 5:14 pm | विवेकपटाईत
सोन्या बापू आणि अमित दादा, माझा हा लेख पुन्हा वाचा. हा कुणाच्याही विरुद्ध नाही. लेखात बुद्धाचे उदाहरण आधी दिले आहे. कृष्णाचे हि. आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्याकरीता शरीर हे आवश्यक आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे वातानुकुलीत कार्यालयांमध्ये कामकरणार्या माझ्या सारख्या लोकांना काही कल्पना नाहि. तुम्ही हि मुंबईत १० शिकलेल्या लोकांना विचारले तरी किमान ९०% टक्के लोकांना ASFPA हे माहित नसेल. (माझ्या बाबतीत म्हणाल तर सहा वर्षे प्रधानमंत्री कार्यालयात सुरक्षा व्यवस्थे संबंधी सर्वोच्च स्तराच्या अधिकाऱ्यांच्या खाली काम केले आहे, त्या मुळे घटना का घडतात, कोण घडवतो, कशी घडवतो, त्या मागचा उद्देश्य सर्वच कळते. असो). आपला देश एक प्रजातान्त्रिक देश आहे, इथे हट्टाने नाही तर आपले हित साध्य करणारी लोक निवडणूकीत जिंकून आणावी लागतात. १६ वर्षांत देश्याच्या कान्याकोपऱ्यात आपले विचार तिला पोहचविता आले असते. लोकांचा कौल घेता आला असता. पण त्या साठी लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे.
एक नुकतेच उदाहरण घ्या. बाबा रामदेवांचा दिल्लीत अपमान झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सरकार उलटविण्याचे ठरविले. हरिद्वारला जाऊन उपोषणावर नाही बसले. त्यांना माहित होते, सरकार बदलण्यासाठी जनतेला सरकारच्या विरुद्ध कौल देण्यासाठी तैयार करणे गरजेचे. त्यासाठी देश्यातील जनतेशी संवाद साध्य करावाच लागतो. त्यांनी हरिद्वार न जाण्याचा निश्चय केला. बहुतेक नमोपेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या असतील. उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, सारख्या राज्यात एक मोठा वोट बँक भाजपला मिळवून दिला. आपल्या उदेश्यात ते सफल झाले. त्या नंतर ते हरिद्वारला परतले.
१६ वर्षांचा उपोषणानंतर ईरोमला हि उपवासाचा फोलपणा समजला. तिच्या या निर्णयाचा विरोध करणार्यांचे पितळ निश्चितच उघडे पडले आहे. कायदा बदलायचा असेल तर निवडणूक जिंकून मुख्यमंत्री बनणे किंवा आपला हेतू साध्य करणारा गादीवर येणे गरजेचे. तेंव्हाच उद्दिष्ट साध्य होते. या बाबत मी तिच्या हिम्मतीला दाद दिली आहे. पण ज्या लोकांचा उद्देश्य काही वेगळा होता, ते विरोध करतीलच.
बाकी: दिल्लीच्या जवळ NOIDAत. रात्रीच्या वेळी स्थानीय गावातील चौधरींची कार overtake करून दाखवा. असो.
15 Aug 2016 - 7:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
बोलण्यालायक बरेच काही आहे पण मिपावर कुठे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते, मी इथेच थांबतो
_________/\__________
15 Aug 2016 - 10:20 pm | आरोह
ईथेच थांबलात म्हणुन बरे झाले नाहीतर सगळ्यांचे 5%,10% कमी करून शेवटी स्वतःचा आदर स्वतः करत बसावे लागले असते.
15 Aug 2016 - 11:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
असं म्हणता! बरं!!
15 Aug 2016 - 8:19 pm | अमितदादा
हे मी बोलो नाही. कारण मी सुद्धा शेकडो मैल दूर एका रूम मध्ये बसून प्रतिवाद करतो आहे आणि तुमची credential बघता तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी आणि माहितीगार आहेत हे मान्य तरी एका विषयावर लोकात मतभेद असू शकतात हे हि तितकंच सत्य. मी तुमच्या लेखावर टीका नाही केलीय तर फक्त एका वाक्याचा प्रतिवाद केलाय. कारण कोणत्याही लढ्याच यश हे binary कसं असू शकेल, मणिपूर मधील अंतर्गत संघर्षाकडं देशाचं मत वेधून घेण, ASFPA बाबतीत लोकांच्या झालेली जनजागृती हे ईरोम च यश नाही का? कोणत्याही हिंसेचा वापर किंवा समर्थन न करता केलेलं आंदोलन हे यश नाही का? मला असं वाटत ईरोम च उपोषण सोडून सक्रिय राजकारणात येन हे चांगलंच आहे आणि याशी मी तुमच्याशी सहमत आहेच, फक्त तिची 16 वर्षाची लढाई व्यर्थ गेली अस अजिबात वाटत नाही। बदल एका दिवसात घडत नाही त्याला वेळ लागतो अस माझं मत.
15 Aug 2016 - 5:48 pm | ज्योति अळवणी
अतिवास यांच्या मताशी सहमत... अर्थात इरोमचा आताचा निर्णय देखील योग्य वाटतो....
15 Aug 2016 - 6:27 pm | बोका-ए-आझम
AFSPA हा विधिमंडळात पारित झालेला, तत्कालीन राष्ट्रपतींनी सही केलेला कायदा आहे, मग त्याच्याविरूध्द आवाज उठवणारे लोक नक्की कशाला विरोध करताहेत? कायद्याला की कायद्याच्या गैरवापराला? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
15 Aug 2016 - 7:03 pm | कैलासवासी सोन्याबापु
रास्त प्रश्न!
15 Aug 2016 - 9:07 pm | अमितदादा
बोका भाऊ एकदम रास्त प्रश्न माझ्या कुवतीनुसार माझं मत व्यक्त करतो. पहिली गोष्ट AFSPA हा विधिमंडळात पारित झालेला, तत्कालीन राष्ट्रपतींनी सही केलेला कायदा आहे म्हणून तो परफेक्ट होत नाही. हजारो कायदे विधिमंडळाने केले आणि काळानुसार बदलले. मला वाटत घटनेतील तरतुदी सुद्धा 125 कि 126 वेळा बदलल्या आहेत. तेंव्हा AFSPA हि त्यावेळच्या काळाची गरज आहे आजची नाही. मुळात AFSPA कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांबद्दल खूप गैरसमज आहेत, महत्वाचा म्हणजे कि AFPSA कायदा कडला कि सुरक्षा दल यांना कायदेशीर कवच राहणार नाही. हे पूर्ण चूक आहे हा कायदा काडून त्याऐवजी थोडासा सॉफ्ट कायदा आना आस बहुतांश AFSPA विरोधी लोकांचं मत आहे जे माझं हि आहे. ह्याबाबतीत चितांबराम गृहमंत्री (चितांबरम च्या बद्दल लोकांची मते काही असोत ते देशद्रोही नक्कीच नाहीत) असताना ह्या कायद्याला रिप्लेस करणाऱ्या कायद्याचा मसूदा त्यांनी बनवलेला. पण त्या सरकारची इच्याशक्ती नसल्यामुळे तो बेत गुंडाळावा लागला.
माझ्या ह्या कायद्यातील खालील तरतुदींना विरोध आहे
1) दाहशदवादी, संशयित व्यक्ती याचा मृत्यू तसेच धोकादायक परिस्थिती केलेल्या कारवाई बद्दल जवानांना पूर्ण सूट मिळाय हवी हे माझे मत आहे. परंतु स्त्री वरील अत्याचार, आतंकवादी च्या कुटुंबियांना होणारी मारहाण व छळवणूक, संशयावरून सामान्य माणसाला होणारी अटक, निर्दोष व्यक्तींची हत्या हया सगळ्यांना ह्या कायद्यांनी मिळणारी सूट काढून घ्यायला हवी. आता केलेली कारवाई योग्य कि अयोग्य याची त्या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून case by case शहानिशा झाली पाहिजे.
2) कायदा व्यवस्था हि राज्याची जबाबदारी असताना सुद्धा हा कायदा लावण्याबाबत किंवा काढण्याबाबत राज्यास शिफारस कारण्याव्यतिरिक्त नसलेले अधिकार धोकादायक आहेत.
3) प्रथमदर्शनी चूक दिसत असताना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यास किंवा मुख्यमंत्र्यास साधा कारवाईचा सुद्धा नसलेले अधिकार चुकीचे वाटतात.
4) एखादं तालुका किंवा जिल्हा शांत झाला असताना सुद्धा त्यातून हा कायदा न काढता वर्षनुवर्ष चालू ठेवणे चुकीचं वाटत.
आता ह्या कायद्याबाबत जुलै 2016 साली निकाल देताना सर्वोच न्यायालय काय म्हणत पाहूया,
1)indefinite deployment of armed forces in the name of restoring normalcy under AFSPA “would mock at our democratic process”, apart from symbolising a failure of the civil administration and the armed forces.
2)every person carrying a weapon in a disturbed area cannot be labelled a militant or terrorist or insurgent” and be killed without any inquiry.
3)It also said that “no absolute immunity” would be given to armed forces personnel if any death was found to be “unjustified”.
बरं आता ही सर्वोच न्यायालयाची मते आहेत, सर्वोच न्यायालय ला अक्कल नाही किंवा ते देशद्रोही आहेत असे आपण म्हणणार असू तर धन्य आहे. माझी मते सर्वोच न्यायालय इतकी कठोर नाही आहेत.
बरं संतोष हेगडे ( माजी न्यायमूर्ती, कर्नाटक माजी लोकायुक्त, अत्यंत प्रामाणिक व्यक्ती) ह्यांनी मणिपूर मधल्या 6 केसेस एक example म्हणून तपासल्या तर त्यांना काय आढळलं माहित आहे 6 केसेस ह्या पूर्णपणे बनावट होत्या. ह्या केसेस मध्ये एका 12 वर्षीय मुलाचा हि बनावट चकमक केली होती. बरं संतोष हेगडे हे कॅपेबल नाहीत किंवा त्यांना भारतीय सेनेबद्दल प्रेम नाही असं म्हणून चालेल का.
बरं मी भारतीय जवानांची बाजू समजून घेत नाही असं नाहीये. त्यांच्याबद्दल मला अत्यंत अभिमान आहे ते आहेत म्हणून मी सूरक्षित आहे याची मला जाणीव आहे, परंतु जनिवपूर्वक केलेल्या चुकांना कठोर शासन झाले पाहिजे हे माझे मत आहे आणि त्यांची असले गुन्हे करायची हिम्मत फक्त ह्या कायद्यामुळे झाली असं माझं मत आहे. हे हि मला माहित आहे आरोप केलेले भरपूर गुन्हे हे खोटे असतात, पण हा कायदा खरे गुन्हे सुद्धा झाकून ठेवतो हा प्रॉब्लेम आहे. ज्या राज्यात हा कायदा आहे ती लोक सुद्धा तुमच्या आमच्या सारखी भारतीय आहेत असं वाटतं.
तसेच मी व्यक्त केलेली मते हि तज्ञ लोकांचे अनुभव, त्यांचे लेख वाचून केले आहेत ते चुकीचे असू शकतात। पण हा न्याय मग हा कायदा हवा अस बोलणाऱ्या लोकबाबत हि लागू होतो, काही अपवाद सोडला कुणालाही युद्ध प्रवण क्षेत्राचा अनुभव नाहीये. माझ्या मतामधील चुका दाखवून दिल्यास मला आनंदच आहे. बाकी ह्या विषयावर जास्त प्रतिवाद करत बसत नाही कारण वैचारिक चर्चा होण्यापेक्षा मी देशद्रोही ठरवण्याची शक्यता जास्त आहे. तसेच माझी सर्व मते मी मांडलीच आहेत.
15 Aug 2016 - 9:10 pm | अमितदादा
ह्या कायद्याच्या गैरवापराला माझा प्रमुख विरोध आहे. आत्ताच सर्वोच न्यायालयाने मणिपूर मधल्या 1500 चकमकीच्या inquiry चे आदेश दिले आहेत, सर्वच चकमकी बनावट नसतील हि परंतु संशयास भरपूर जागा आहे. हे आहे ह्या कायद्याच्या गैर वापराचे परिणाम.
17 Aug 2016 - 2:49 am | बोका-ए-आझम
असं म्हटलेलंच नाही. माणूस perfect नसतो त्यामुळे त्याने बनवलेले कायदे perfect असूच शकत नाहीत.
मुद्दा हा आहे की AFSPA लागू करण्यासारखी परिस्थिती आणली कोणी? जर ज्या परिस्थितीमुळे हा कायदा लागू करण्यात आला ती परिस्थिती अजूनही सुधारलेली नसेल तर हा कायदा justified होतो. त्याचा गैरवापर हा सैन्यदलांनाही लांच्छनास्पद आहे हे १००% मान्य आहे. पण ज्या परिस्थितीत सैन्य काम करतंय तिथे त्यांच्या कारवायांना कायदेशीर संरक्षण देणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे.
एक साधा प्रश्न आहे - राजस्थान, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार ही सगळी सीमावर्ती राज्यं आहेत. का या सगळ्या राज्यांमध्ये AFSPA लागू नाही? का तो काही राज्यांतच लागू आहे? Extraordinary situations need extraordinary solutions हेच त्याच्यामागचं उत्तर आहे. ज्या परिस्थितीत हा कायदा लागू झाला ती परिस्थिती जर अजूनही बदलली नसेल तर हा कायदा असायला हवा. किंवा परिस्थिती बदलायला हवी. माझे पूर्वोत्तर भागातील मित्र (पुणे विद्यापीठात भरपूर आहेत) India असा सर्रास उल्लेख करायचे. ते स्वतःला भारतीय समजत नाहीत. आपणही त्यांना भारतीय समजत नाही. तुम्ही चिनी आहात का असा प्रश्न काही मणिपुरी विद्यार्थ्यांना माझ्यासमोर विचारलेला आहे पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी. तिथला दहशतवाद हा एक प्रकारे या प्रवृत्तीचंही उत्तर आहे. हा अविश्वास किंवा hostility दूर करणं ही फार लांब पल्ल्याची प्रक्रिया आहे. पण दहशतवाद हे वास्तव आहे. साधी सरळ गोष्ट आहे. If state's existence or its writ is threatened, it has the right to defend itself.
17 Aug 2016 - 8:20 am | झेन
जेंव्हा मणिपूर नागालँडचे विद्यार्थी यू इंडीयन्स असे आपल्याशी बोलतात किंवा अलिकडेच सूरू झालेली फँशन ईशान्य भारतीय मुलींना चींकी संबोधणे खरच डोक्याला शाँट आहे
17 Aug 2016 - 12:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाकी एकंदरीत सहमत, फक्त ते स्वतःला भारतीय समजत नाहीत हे मान्य नाही, अन अनुभव सुद्धा तसा नाही. असो.
17 Aug 2016 - 12:33 pm | अमितदादा
जेंव्हा हि लोक पुण्यात येतात तेंव्हा येथील कायदा सुव्यवस्था पाहतात, आणि त्यांच्या राज्यात असलेल्या परिस्थितीशी तुलना करतात तेंव्हाच त्यांच्या मनात अविश्वास आणि hostility तयार होते. हा अविश्वास असले कायदे घालवून आपण घालवू शकतो. बाकी सुरक्षा दलांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही आहोत फक्त AFSPA सारखा कठोर कायदा काडून त्याच्या पेक्षा सॉफ्ट कायदा आणावा अस माझं मत आहे ज्यात सामान्य लोक, स्त्रिया, संशयित लोकांचे कुटुंबीय याना कायदेशीर संरक्षण हवं. आणि नवीन कायद्यानुसार राज्य सरकार किंवा राज्यपाल याना पुरेसे अधिकार मिळावेत, कारण दिल्लीत बसून बाबूशाही आजपर्यंत घोळच घालत आलीय.
हे फक्त ठराविक राज्याबाबत आहे. मी फेसबुक वर किरेन रिज्जू ,mos home, याना follow करतो आणि त्यांच्या पोस्ट वर नॉर्थ ईस्ट लोकांच्या कंमेन्ट वाचतो त्यावरून असं समजत they are no less patriot than us. बाकी मी एका ठिकाणी शिक्षण घेत असताना नॉर्थ ईस्ट चे भरपूर विध्यार्थी होते. तेथील लोक मुलींना त्रास द्यायची त्यामुळं त्यांना ग्रुप करूनच बाहेर पडाय लागायचं, लोकच काय पण त्यांच्ये वर्गमित्र सुद्धा चिंकी बोलायची, त्यांना राहायला घर मिळायचे नाही. मग अशी वागणूक जेंव्हा ते त्यांच्या कुटुंबियांना किंवा मित्रानं सांगतील तेंव्हा त्यांना कसे भारतीय वाटेल.
15 Aug 2016 - 7:06 pm | झेन
यांच्या सारखा फर्स्टहँन्ड अनुभव नाही पण एवढी ओळख आहे की ईशान्य भारतातील प्रश्न सोडा पण तिथल्या लोकजिवनाचे रंग, पदर यांचा गुंता महाराष्ट्रात राहून भले नेटवर किंवा पुस्तकात वाचून समजण्यासारखा नाही. त्यामुळे आपल्याला इथून वाटतो तोच हत्ती समजणे हे आपल्याच भ्रमात राहण्यासारखे असेल असे वाटते.
15 Aug 2016 - 10:24 pm | आरोह
लेखात गांधीजींचे केलेले विश्लेषण आवडले.
15 Aug 2016 - 11:24 pm | अर्धवटराव
काहि कन्क्लुजन्स नाहि पटले. पण विषयाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन म्हणुन लेख आवडला.
16 Aug 2016 - 8:36 pm | तेजस आठवले
मला असे वाटते, की लेखाचा साधारण आशय असा आहे : मनाशी ठरवलेले ध्येय मिळवण्यासाठी आपण एखादा मार्ग ठरवतो. काही कारणाने तो भरकटत जातो.कधी कधी इतका भरकटतो की आपल्याला त्यातील फोलपणा कळून सुद्धा मागे फिरत येत नाही. कित्येकदा आपण ,आपल्याभोवतालची परिस्थिती आणि माणसे(सहकारी/विरोधक/कुटुंब/मित्र इत्यादी) ह्यांचा अप्रत्यक्ष दबाव असू शकतो. तसेच ज्या मार्गाने आपण इतका काळ प्रयत्न केले त्याने फारसे यश मिळाले नाहीच, पण भ्रमनिरास मात्र झाला असे वाटते. ह्याचे दडपण असह्य असणार नक्कीच.
उपोषणामुळे शर्मिला यांचे काही बरेवाईट झाले असते तर प्रचंड खळबळ उडाली असती त्यामुळे कुठलेही सरकार असे होऊ देणार नाही.त्यामुळे नाकावाटे द्रवरूप अन्नपदार्थ दिले जात असावेत.
उपोषणाचा मार्ग हा आत्मक्लेशाचा आहे.त्या ऐवजी दुसरा एखादा मार्ग(देशात सर्वत्र फिरून ह्या कायद्याचे दुष्परिणाम आणि गैरवापर ह्यावर सभा/चर्चा करून जनमत आणि काही प्रमाणात पाठिंबा मिळवणे) वापरला असता तर कदाचित त्याचा काही सकारात्मक परिणाम झाला असता.कदाचित अपेक्षित यश मिळाले असते किंवा नसतेही.
भगवान बुद्धांनी योग्य प्रकारचे तप करून ज्ञान मिळवले आणि त्याचा प्रसार केला.आत्मक्लेश न करता शरीराचा वापर करून --जसे -- (पाय)भ्रमंती, (मुख-वाणी)व्याख्याने, (पंचेंद्रिये)चर्चा, (मन आणि वाणी)उपदेश इत्यादी साधने वापरून धर्म आणि ज्ञान प्रसार केला.
राजू चे उदाहरण हे मार्गावरून मागे फिरता न आल्याने झालेल्या आत्मनाशाचे असावे.एखादी गोष्ट आपल्याला मनापासून जमत नाहीये, पण आजूबाजूची लोक आणि परिस्थितीच अशी असते की माघार घेऊ शकत नाही, तुम्ही घ्यायची म्हणालात तरी लोक तुम्हाला घेऊ देणार नाहीत.परिस्थितीच तशी असते.
माझ्या मते पटाईत काकांना साधारण असेच काहीसे सांगावयाचे असावे.
17 Aug 2016 - 7:08 am | झपाटलेला फिलॉसॉफर
पटाईत काका आगे बढो
हम तुम्हारे साथ हैं
AFSPA चांगला कायदा आहे . काश्मिरात सुद्धा या कायद्याचा चांगला उपयोग होतो
17 Aug 2016 - 8:32 am | चंपाबाई
एखादा मार्ग उपयोगी ठरला नाही की तो मार्ग कधीतरी बदलावासा वाटतो, यात गैर काहीच नाही.
पण लगेच त्या व्यक्तीबद्दस्ल किंवा त्या मार्गाबद्दल हेटाळणीपुर्वक बोलणे योग्य नव्हे.
17 Aug 2016 - 8:07 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद वाचले. माझा लेख व्यवस्थित वाचला असता तर कळले माझ्या लेखात ईरोम शर्मिलाच्या हिम्मातीची तारीफ केली आहे. जे लोक तिचा विरोध करत आहे, त्यांच्या विरोधात हा लेख आहे. बुद्धाचे उदाहरण देण्याचे कारण एकच. आपला हेतू जनतेला कळला पाहिजे तर आपल्या हेतूचा जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य करणे जास्त रास्त. त्या साठी मानसिक सोबत शारीरिक क्षमतेची हि गरज असते. हडताल, आंदोलन इत्यादी करण्यात देशाचे आणि जनतेचेच नुकसान होते. फळ काही मिळत नाही. आत्ताच हरियानाचे उदाहरण घ्या. शेकडो कोटींचे नुकसान झाले. जाटांना आरक्षण काही मिळाले नाही. न्यायिक युद्ध न्यायिक स्तरावर लढावे लागते. रस्त्यावर उतरून नाही.