मिल्क एण्ड कुकिज! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

इडली डोसा's picture
इडली डोसा in लेखमाला
25 Apr 2016 - 9:05 am

Header

मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे. बस आपण एवढंच करायचं, मग पुढच्या सगळ्या गोष्टी वाचानालयातल्या आज्जीबाई आणि त्यांच्या सहकारी मैत्रीणी बघतात.

तुम्ही ठरवून दिलेल्या हॉलच्या बाहेर पोचला कि तुमच्या मुलाच्या नावाने त्या दिवशीच्या थीम प्रमाणे मुलाच्या नावाचा एक सुंदर बिल्ला तयार असतो. इथे पोरं पुढे होऊन आपापल्या नावाचा बिल्ला स्वत:ला लाऊन घेतात. ज्या पिटुकल्यांना अजून वाचता येत नाही त्यांना त्यांच्या बरोबरचे मदत करतात. एकदा का कार्यक्रमाची ठरलेली वेळ झाली कि आजीबाई त्यांच्या जागेवर आणि ठरलेल्या बास्केट मधून रंगीत मऊ-मऊ उश्या घेऊन पोरं हॉलभर आवडेल तिथे जाऊन बसतात.

नावाचा बिल्ला -
.. .. .

सुरवातीला हात पाय हलवून थोडी ओळखीची गाणी म्हणुन होतात. ती झाली की आजी आपल्या पोतडीतून एक एक बोलक्या बाहुल्या किंवा बोलके प्राणी काढायला लागते . हे प्राणी कधी पुस्तकांना घट्ट बिलगून बसतात आणि त्यांच्याकडून पुस्तक सोडवून घेता घेता आजीबाईंच्या नाकी नऊ आणतात. ह्या सगळ्या लुटुपुटुच्या झटापटीमध्ये पोरांची जाम करमणूक होते. कधी कुठल्या प्राण्याचा डोळाच उडून मुलांच्यात पडतो आणि मग मुलं त्याला त्याचा डोळा परत द्यायला धावपळ करतात. तर कधी माकडासारखा एखादा उद्योगी प्राणी आजीबाईंच्या हातातून उडी मारून मुलांच्यात जाऊन लपतो. मग त्याला शोधून परत जागेवर नेऊन ठेवण्यासाठी पोरांची पुन्हा पळापळ होते.

अशी या सगळ्या बोलक्या प्राणीमित्रांबरोबर (पपेटसबरोबर) धमाल करून झाली कि सगळे जरा दमून जातात मग सगळ्यांना थोडं दुध आणि दोन बिस्किटं घेऊन आजी जरा एका जागी बसायला सांगते. दुध पीत आणि बिस्किट खात सगळे त्यांच्या जागांवर स्थिर स्थावर झाले कि आजी तिच्या पेटाऱ्यातून हळुच एक- एक पुस्तक काढते. छोट्याश्याच पण छान गोष्टी एक एक करून मुलांना वाचून दाखवते प्रत्येक वेळी एका प्राण्याभोवती किंवा पक्षाभोवती कथा गुंफलेल्या असतात.

सुरवातीला जो नावाचा बिल्ला मिळालेला असतो तोही याच कथांना पूरक असतो . म्हणजे माकडाच्या गोष्टी वाचणार असतील तर माकडाच्या आकारात कापलेला बिल्ला आणि त्यावर मुलाचं नाव. किंवा फुलपाखरावर मुलाचं नाव असं दरवेळी काहितरी नवीन आणि सुरेख पहायला मिळतं. मुलांनाही हा बिल्ला मिरवायला हौस वाटते.गोष्टी असताना आजी पुस्तक वाचताना आवाजात चढ- उतार आणुन मुलांचे लक्ष वेधून घेते त्यामुळे बर्यापैकी पुर्ण गोष्ट मुलांकडून एका जागी बसून ऐकली जाते.

गोष्ट वाचून झाली कि मग पुढे करायचं असतं एक आर्ट! त्या दिवसाचं आर्ट हे त्या दिवसाच्या थीमवरच बेतलेलं असतं. शेजारीच असलेल्या मोठ्या हॉल मध्ये मुलांच्या हाताशी येईल एवढ्या टेबलांची रांग मांडलेली असते. त्यावर त्या दिवशी जी कलाकुसर करायची त्याच्या सामानाची मांडणी करून ठेवलेली असते. आपण आपल्या मुलासोबत जाऊन कुठल्याही एका जागेवर उभे राहून मुलासोबत ते आर्ट करायला लागयचं. आर्ट पुर्ण झालं कि पोरं लगबगीने आजीला नेऊन दाखवतात कारण ते दाखवल्यावर त्याना हातावर मिळतो एक छानसा टॅटू. मग तो टॅटू बच्चे कंपनी बक्षीसासारखा मिरवत आपापल्या आई बाबांना दाखवतात.

आर्ट करताना आणि तयार झालेले आर्ट -

.. .

खरतरं हे सगळं झाल्यावर त्यादिवशीच्या वर्गाची सांगता होते. मग तिथून पुढे सुरु होतो माझा आणि माझ्या मुलीचा पुस्तकांच्या दुनियेत मनसोक्त विहार. ती मला एका रॅककडून दुसऱ्याकडे नेते. हे पुस्तक काढ ते काढ असं करूत हॉलभर फिरते. मला त्यात आनंदच वाटतो कारण माझ्या बाळाची हळु हळु पुस्तकांशी गट्टी जमत असलेली मला बघायला मिळत असते. मग थोडा विचार करून हे घेऊया कि ते घेऊया असं करत आम्ही एक दोनच पुस्तकं घरी आणतो. तेवढी तिला आठवडाभरासाठी पुरेशी असतात कारण तिला त्याच त्याच गोष्टी परत परत वाचायला मजा येते.


मुलांच्या हाताला येणारी पुस्तकांची मांडणी, बसायला आरामदायक जागा, पझल्सच्या माध्यमातून शिक्षण आणि मनोरंजन -

.... .

तसं बघायला गेलं तर आजकाल अगदी तान्हुल्या बाळांसाठी सुद्धा पुस्तकं आहेत. फक्त मुलांना पुस्तकांची गोडी लावण्यासाठी आपल्याला थोडे जास्त कष्ट घ्यायची गरज आहे. शिवाय आजकाल टॅब्लेट्स आणि ऑडिओ बुक्सच्या जमान्यात खरचं छापील पुस्तकं मुलांना वाचायला लावण्याची गरज आहे का? असा प्रश्नही कधी कधी मनात येतो. पण ते काहिहि असलं तरी मला माझ्या मुलीला या वेगवेगळे रंग, रूप, आकार असलेल्या पुस्तकांच्या दुनियेची ओळख करून द्यायची आहे आणि ते सुद्धा ती त्याचा आनंद घेऊ शकेल या पद्धतीने, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता. यातुन पुढे तिला पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली तर छानंच नाहीतर मी माझ्याकडुन प्रयत्न केला याचे समाधान तरी मला असेलच!
आजीबाईंच्या कथाकथनाची झलक -
https://www.youtube.com/watch?v=BGb08j5vYuM

Footer

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Apr 2016 - 9:06 am | पैसा

किती छान कल्पना!

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2016 - 9:16 am | पिलीयन रायडर

अमेरिका ग अमेरिका!! काही काही फार मस्त गोष्टी पाहिल्या मी तिथे लहान मुलांसाठी.. पण तरीही त्यातली बेस्ट म्हणजे हा लेख! तुझा न तुझ्या मुलीचा जामच हेवा वाटला...

आणि हो.. टॅब वगैरे काहीही आलं तरी पुस्तकं ती पुस्तकं.. मला तर तीच जास्त जवळची वाटतात. शिवाय आजकाल पोरांना इतर १०० गोष्टी स्क्रीन वर कराव्या लागतात किंवा पोरंच मागे लागुन करत असतात (टिव्ही, कंप्युटर, मोबाईल गेम्स ई...) किमान पुस्तक तरी स्क्रिन वर वाचु नये असे माझे मत.. शिवाय तुझ्या पोरीला अशी आज्यांकडुन गोष्ट ऐकायला मिळतेय.. अजुन काय हवं ग!!

बादवे.. तसला एक बिल्ला आम्हाला पण आणशील का इकडे येताना ;)

इडली डोसा's picture

26 Apr 2016 - 9:23 am | इडली डोसा

पण तोपर्यंत थांबु नको.

तु पण घरच्या घरी लेकाला अश्या गोष्टी सांग मला असं वाटतयं कि तु चांगल्या प्रकारे सांगु शकशील. आजु बाजुच्या बाकिच्या चिल्ल्या पिल्ल्यांनापण गोळा कर.

सानिकास्वप्निल's picture

25 Apr 2016 - 9:32 am | सानिकास्वप्निल

किती मस्तं गं. आजीबाईंचा व्हिडिओ पण मस्तं.
मला स्वत:ला पुस्तकं कुठल्याही स्वरुपात वाचायला आवडतात पण हातात घेऊन एक एक पान पलटणे, त्या पुस्तकाचा सुवास घेणे हे वेगळेच सुख. माझ्या बाळांनाही मी अशीच चित्र,रंग आकार दाखवणारी छापिल पुस्तकं देणार वाचायला.

फोटो आणि लेख खूप आवडला.

प्रीत-मोहर's picture

25 Apr 2016 - 9:33 am | प्रीत-मोहर

वाह!!!!
कल्पना आवडली. मी पण असच एक वाचनालय उघडेन आजीबाई झाल्यावर :)

क्रेझी's picture

25 Apr 2016 - 10:44 am | क्रेझी

+१

लेख आवडला आणि तुमच्या मुलीला आजीकडून गोष्ट
ऐकायला मिळते हे बघून आनंद वाटला :)
आमच्या ऑफिसने एक शाळा दत्तक घेतली आहे, तिथे नुकताच लायब्ररी सेट-अप पूर्ण केला आम्ही, आता जुन मधे शाळा सुरू झाली की दर विकांताला असाच कार्यक्रम करणार :) बिल्ल्याची कल्पना मी नक्कीच करून बघेन :)

आणि तुमच्या लायब्ररीत हा उपक्रम करायला काही मदत / अजुन माहिती हवी असेल तर सांग.

अजया's picture

25 Apr 2016 - 11:23 am | अजया

मस्त लेख इडो! आजीबाई _/\_

सस्नेह's picture

25 Apr 2016 - 11:55 am | सस्नेह

मुलांना पुस्तकाची गोडी लावणे अवघड आहे. असं काहीतरी केलं तर सोपे होईल.

किती छान आहे लायब्ररी !! इकडे भारतात कधी इतके सुंदर उपक्रम सुरु होतिल बर!
छान लेख इडो !

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 12:44 pm | विजय पुरोहित

छान आहे उपक्रम...

मधुरा देशपांडे's picture

25 Apr 2016 - 2:27 pm | मधुरा देशपांडे

परदेशातल्या विशेष अनुकरणीय अशा ज्या गोष्टी वाटतात त्यात हे असे उपक्रम अग्रेसर आहेत. लेख खूप आवडला.

Maharani's picture

25 Apr 2016 - 3:21 pm | Maharani

Lekh khup Chan...upakram khupach mast..

नूतन सावंत's picture

25 Apr 2016 - 3:41 pm | नूतन सावंत

अतिशय सुरेख उपक्रम नि अतिशय सुरेख माहिती देणारा लेख.आजीबाईंसकट आवडला.

कविता१९७८'s picture

25 Apr 2016 - 3:50 pm | कविता१९७८

छान लेख

भन्नाट आयडिया आहे ही ! ढापत आहे. आमची शाळा सहज परवानगी देईल !
अनेक आभार :)

इडली डोसा's picture

26 Apr 2016 - 9:26 am | इडली डोसा

प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार!

पद्मावति's picture

26 Apr 2016 - 3:15 pm | पद्मावति

लेख आवडला.

वा.. किती सुंदर आयडिया...आजीचा व्हिडीओ पण मस्त आहे.

किती सुंदर कल्पना ! तुझ लेख नेहमी वेगळ्या विषयावर असतो, याहीवेळचा विषय कल्पक आणि तू मांडला देखील छान ..

जुइ's picture

5 May 2016 - 12:15 am | जुइ

खूप आवडला हा लेख. इथल्या ग्रंथालयात असे खूप छान आणि कल्पक उपक्रम केले जातात लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायला. फोटोही आवडले.

पिशी अबोली's picture

8 May 2016 - 9:52 pm | पिशी अबोली

आई ग्गं..परत लहान होऊन तुझ्याकडे यावंसं वाटलं.. किती गोड उपक्रम! बघू असं काही पुढे कधी जमलं तर..आत्ता खूप भाचेकंपनी घरी होती..एरवी मला चिकटून, पण माझी लहानपणीची पुस्तकं काढली की तोंडं वाकडी..तेव्हाच वाटत होतं की काही नवीन असावं मुलांसाठी..

उपक्रम झकास आहे. वाचनालय ओळखीचं वाटतंय :), पुढच्या वेळी गेले कि नक्की चौकशी करेन.