हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.
पुस्तकाची – म्हणजे कथानायिकेच्या जीवनाची – सुरूवात तरी चांगली होती. तिचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि देशात त्यांना खूप मान होता. अवघं ३२ वय असताना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असणा-या तिच्या वडिलांची हत्त्या झाली- ते वर्ष होतं १९४७ आणि तेंव्हा आपली कथानायिका होती अवघी दोन वर्षांची. वडिलांचा फारसा न आठवणारा सहवास तिला मिळाला तो अगदी थोडासाच, पण त्यांचा वारसा मात्र तिने चालवला – अर्थात त्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर चाळीस वर्ष मध्ये जावी लागणार होती.
जानेवारी १९४८ मध्ये देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला. नव्या सत्ताधीशांनी राष्ट्रपित्याच्या कुटुंबाला योग्य तो सन्मान दिला. चरित्रनायिकेची आई १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून आली त्यामुळे दोन वर्ष आपल्या कथानायिकेचं शालेय शिक्षण दिल्लीत झालं, तिने पदवीपर्यंतचं शिक्षणही दिल्लीत घेतलं. महात्मा गांधींच्या विचारांची ओळख या वास्तव्यात तिला झाली. पुढचं शिक्षण घेण्यासाठी ती ऑक्सफर्डमध्ये गेली. परक्या देशात वावरताना, तिथली संस्कृती समजून घेताना तिची स्व-विषयक जाणीव अधिक स्पष्ट होत गेली. इतरांना अभिनिवेशाविना मदत करण्याचा तिचा सहजस्वभावही तिथं प्रकट होत राहिला.
कथानायिका ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. पण रोजचा बसचा प्रवास झेपेना म्हणून तिने ‘संयुक्त राष्ट्रसंघ’मध्ये एका विभागात साहाय्यक सचिवाची नोकरी स्वीकारली. दरम्यान आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेल कथानायिकेच्या प्रेमात पडला. पण कथानायिकेच्या नकाराचं होकारात रूपांतर होण्यात काही काळ गेला. एका ब्रिटीश माणसाशी लग्न करायचं यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं तर कदाचित तिचे स्वदेशी परतण्याचे दरवाजे कायमचे बंद झाले असते. पण देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्ष या विचारांच्या आंदोलनात गेल्यावर आईच्या विरोधाला न जुमानता १९७२ मध्ये तिने मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. दोन मुलांचं संगोपन करता करता तिने स्वत:च्या वडिलांचं संक्षिप्त चरित्र १९८४ मध्ये लिहिलं. हे चरित्रलेखन तिच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरलं असं मागे वळून पाहताना दिसतं. कारण या संक्षिप्त चरित्रातून वडिलांचं जगणं पुरेसं व्यक्त झालं नाही असं वाटून सविस्तर चरित्र लिहिण्यासाठी मायदेशाबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करायला लागली.
चरित्र लिहिताने तिने जे वाचन केलं त्यातून देशाचा इतिहास, इंग्रजी राजवट आणि देशवासीयांचा स्वातंत्र्यलढा, देशातले विविध वांशिक समूह याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तिला मिळाली. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ नीतिचे परिणाम तिचा देश स्वातंत्र्यानंतरही भोगत होता. स्वातंत्र्य मिळतानाच तिच्या मायदेशाला यादवीने ग्रासलं होतं. लष्कराकडून ही यादवी मोडून काढण्याचे प्रयत्न झाले होते. सप्टेंबर १९५८ मध्ये देशातली पहिली लष्करी राजवट सुरू झाली. एप्रिल १९६० ते मार्च १९६२ या काळात लोकनियुक्त सरकार देशात होतं, पण पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्र हाती घेतली. देशात लष्कराची सत्ता पुढं थेट २०११ पर्यंत होती.
या लष्करी राजवटीने आपण कल्पना करू शकणार नाही इतके अत्त्याचार केले – तेही स्वकीयांवर. ते वाचताना कथानायिका उदास झाली. आपल्या वडिलांनी देश स्वतंत्र होण्यासाठी जे कष्ट सोसले होते त्यावर लष्करी राजवटीने पाणी फिरवलं आहे हे पाहून कथानायिका उद्विग्न झाली.
१९८८ मध्ये आईच्या आजारपणामुळे कथानायिका मायदेशात परतली. लष्कराच्या विरोधात चालू असलेल्या जनतेच्या लढ्यात ती सामील होईल अशी लोकांची अपेक्षा होती. तिने त्या अपेक्षांना स्वत:चं कर्तव्य मानलं. देश सोडून जाण्याचं स्वातंत्र्य लष्करशाहीने तिला नेहमी दिलं. एकदा का ती देशाबाहेर पडली की तिला देशात परत प्रवेश न देणं - हा लष्करशाहीच्या मते सगळ्यात सोपा उपाय होता. पण तिला देशात लोकशाही आणायची होती – तीही पूर्णपणे अहिंसक मार्गाने. देशाची हालहवाल वाचताना ती उद्विग्न झाली होती खरी, पण देशाचा नवा इतिहास निर्माण करण्याची जबाबदारी जणू नियती तिच्यावर टाकत होती. ती न घेण्याचा पर्याय तिच्या मनातही कधी आला नाही, त्यातून सुरू झालं एक नवं संघर्षपर्व.
ती मायदेशात राहिली. ती मायदेशातून बाहेर पडली नाही. मायकेल – तिचा पती – मरणशय्येवर होता तरी त्याला भेटण्यासाठीही तिने देश सोडला नाही. ज्वालामुखीच्या तोंडावर उभ्या असलेल्या देशाचा विध्वंस फार सहज होऊ शकला असता – ते तिला टाळायचं होतं. लोक तिच्या भोवती जमत गेले. एका राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९९० मधल्या निवडणुकीत तिच्या पक्षाला ८० टक्के मतं मिळाली खरी, पण हुकुमशाही सत्तेवरून पायउतार झालीच नाही.
हिंसेच्या वातावरणात अहिंसेचं पालन करणा-यांचा कस लागतो, तसा तो तिचाही लागला. १९८८ ते २००९ या २१ वर्षांच्या कालावधीतली १५ वर्ष तिने ‘गृहकैदेत’ काढली.
या काळात जागतिक समुदायाने वेळोवेळी लष्करशाहीला ‘लोकशाहीची पुनर्प्रस्थापना करा’ असं आवाहन केलं. पण लष्करशाहीने या आवाहनांकडे साफ दुर्लक्ष केलं. १९९१चा ‘शांतता नोबेल पुरस्कार’ मिळाल्यावर जगाला तिच्या देशातल्या जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. त्यानंतर तिला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले – पण ती होती स्थानबद्धतेतच.
(चीनने सत्ताधारी हुकुमशाहीला मदत केली म्हणून (चीनला लांब ठेवण्यासाठी) भारतानेही या लष्करशाहीला आर्थिक मदत दिली हे वाचताना हळहळ वाटली.)
तिचा मायदेश आहे म्यानमार (ब्रह्मदेश).
आणि कथानायिका आहे ऑंग सान स्यू ची.
खरं तर हे पुस्तक वाचताना आपल्या शेजारी देशाबद्दल मला किती कमी माहिती आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं हे चरित्र ‘राजहंस प्रकाशन, पुणे’ यांनी २०११ मध्ये प्रसिद्ध केलं आहे – २०१० नंतरच्या घटनांचा त्यात स्वाभाविकच उल्लेख नाही. सद्यस्थितीवर पुस्तक लिहिणं हे नेहमी अवघड असतं. कारण पुस्तकाचा पहिला मसुदा तयार होईपर्यंत त्या देशात अनेक नवीन महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग घडून गेलेले असतात.
या पुस्तकामुळे मराठीत शेजारी देशाचा इतिहास उपलब्ध झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. या चरित्रात सुमारे साठ वर्षांचा इतिहास असल्याने बरीच नावं आणि प्रसंग आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या अखेरीस घटनाक्रम दिला असता तर वाचकांची अधिक सोय झाली असती. शिवाय पुस्तक वाचून ऑंग सान स्यू ची यांच्या तात्त्विक भूमिकेचं पुरेसं आकलन मला झालं नाही. म्हणचे चरित्र लिहिताना फक्त त्यांच्या गुणांची ओळख होते परंतु मर्यादांचा उल्लेख येत नाही.
ऑंग सान स्यू ची यांच्या विचारांचा आढावा या पुस्तकात नाही. म्यानमारमध्ये २०१३च्या बौद्ध-मुस्लिम संघर्षात, २०१५ च्या रोहिंग्या (Rohingya) यांच्यावरच्या अत्त्याचारांमध्ये राजकीय फायद्यांसाठी ऑंग सान स्यू ची यांनी मौन पाळल्याची टीका झाली आहे. या घटना पुस्तक लिहून झाल्यानंतर घडल्या आहेत, त्यामुळे त्यांचा उल्लेख पुस्तकात नसणार हे समजतं. पण वांशिक वैविध्य, धर्म, शिक्षण, प्रशासनव्यवस्था, अर्थविचार, स्त्रियांची स्थिती .. अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर ऑंग सान स्यू ची यांची नेमकी काय भूमिका आहे याबद्दल पुस्तक वाचून काही कळत नाही. प्रभा नवांगुळ यांनी पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत अशी भर घालावी अशी अपेक्षा आहे.
पुस्तक अवश्य वाचावं असं सुचवेन.

लेखिका – प्रभा नवांगुळ
प्रकाशक – राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत – रूपये २५०/ -
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 10:14 pm | प्रचेतस
उत्कृष्ट परिचय.
बहुधा लवकरच ऑंग सान स्यू ची ह्या म्यानमारच्या अध्यक्षा होतील.
11 Feb 2016 - 11:24 am | आतिवास
कारण २००८च्या राज्यघटनेनुसार
१. According to chapter 3, no 59(f) of the constitution, the president must be someone who "he himself, one of the parents, the spouse, one of the legitimate children or their spouses not owe allegiance to a foreign power".
"[They shall] not be subject of a foreign power or citizen of a foreign country ... [or] be persons entitled to enjoy the rights and privileges of a subject of a foreign government or citizen of a foreign country," it states.
That means Aung San Suu Kyi cannot become president because her two sons are both British citizens.
२. दोन्ही सभागृहांमध्ये लष्करासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत.
३. राज्यघटनेत बदल करायचा तर ७५ टक्के नियुक्त सभासदांनी त्याला मान्यता दिली पाहिजे.
माझं मत विचाराल तर (ते कोण विचारत नाही, हा भाग वेगळा) स्यु ची यांनी राष्ट्राध्यक्ष होण्याचा अट्टहास करू नये. राज्यघटनेत बदल स्वत:साठी करू नयेत, सावकाश करता येतील. She has proved her point.
11 Feb 2016 - 6:29 pm | प्रचेतस
ते माहीत आहेच. पण स्यु ची आणि लष्कर यांच्यामधे ह्या कलमाबाबत तडजोड होण्याचे प्रयत्न चालू आहेत असे वाचले होते.
10 Feb 2016 - 10:16 pm | एस
आजच तुमची आठवण आली होती आणि आज तुमचा धागा आला
उत्तम पुस्तकओळख.
10 Feb 2016 - 10:18 pm | मुक्त विहारि
पुस्तक पण नक्कीच वाचल्या जाईल.
स्वगत : राजहंसाची बरीच पुस्तके वाचनीय आहेत.
11 Feb 2016 - 12:00 am | एस
ह्या वाक्यातून वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट होत नाही. खरेतर भारताने स्यू ची (की) यांना नेहमीच पाठिंबा दिला. चीनचा म्यानमारवरील वाढता प्रभाव रोखण्यासाठी, पूर्वोत्तर राज्यांतील अतिरेकी संघटनांना आळा घालता यावा म्हणून आणि अनेक कारणांसाठी भारताने म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला आंजारणे-गोंजारणे चालू केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात असे शह-प्रतिशह द्यावेच लागतात. पण भारताने म्यानमार लष्करशहांना हळूहळू राजी केल्याने स्यू की यांची मुक्तता होऊ शकली. अजून त्या देशाला खरीखुरी लोकशाही लाभायला बराच अवधी आहे. स्यू की भारतावर नाराज आहेत पण ते चुकीचे आहे.
11 Feb 2016 - 9:12 am | विशाखा पाटील
स्यू ची यांना मुक्त करून तिथे निवडणुका घेण्यासाठी लष्करशहांना तयार करण्याचे काम अमेरिकेने केले. भारत त्यात फारसा सामील नव्हता. अमेरिकेने म्यानमारवरची बंधने कमी करून त्याला लोकशाहीकडे वळण्यासाठी प्रवृत्त केले. अर्थात त्याला चीनचे वाढते वर्चस्व रोखणे, हे मुख्य कारण आहे.
मुख्य विषय- पुस्तक परिचय आवडला. पुस्तक चाळले आहे. त्रुटींबाबत सहमत.
11 Feb 2016 - 11:32 am | आतिवास
माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार.
पण 'जगातली सर्वात मोठी लोकशाही' असं बिरूद मिरवणा-या देशाने लोकशाहीचा गळा घोटणा-या सत्तेला मदत केली याची नोंद इतिहासाने घेतली आहे.
त्यातं आपलं हित होतं हे मान्य करूनही. मग असेरिकेत आणि आपल्यात काय फरक राहिला?
भारताची परराष्ट्रनीति हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
11 Feb 2016 - 6:48 pm | एस
ठीक आहे. विशाखाताईंच्या व तुमच्या प्रतिसादांशी सहमत नाही हे नमूद करून धाग्यावरून रजा घेतो.
11 Feb 2016 - 8:35 pm | आतिवास
ओके.
पुन्हा कधीतरी सवडीने या विषयावर बोलू.
दरम्यान भारत-म्यानमार संबंधांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते.
11 Feb 2016 - 8:36 pm | यशोधरा
ह्या विषयावर लिखाण वाचायची उत्सुकता आहे.
12 Feb 2016 - 10:32 am | बोका-ए-आझम
मला वाटतं आपल्या Reactive, not proactive अशा परराष्ट्रीय धोरणाचं हे एक उदाहरण आहे. आणि म्यानमारमधल्या लष्करी हुकूमशाहीला पाठिंबा देण्यामागे एक विचार हाही असावा की या देशात लष्कर कधीही लोकनियुक्त सरकारच्या आदेशांना झुगारून पुन्हा वर्चस्व स्थापन करु शकतं. दुस-या शब्दांत सांगायचं तर भारतासारखी लोकशाही म्यानमारमध्ये कठीण आहे.
15 Feb 2016 - 10:05 am | आतिवास
भारताची ही नीति बुचकळ्यात टाकणारी आहे खरी.
असो. आधी लिहिल्याप्रमाणे भारताची परराष्ट्रनीति यावर वेगळी चर्चा गरजेची आहे.
11 Feb 2016 - 12:17 am | यशोधरा
पुस्तक परिचय आवडला.
11 Feb 2016 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तक परिचय आवडला.
-दिलीप बिरुटे
11 Feb 2016 - 11:44 am | अजया
परिचय आवडला.पुस्तक मागवते.
11 Feb 2016 - 4:19 pm | प्राची अश्विनी
आवडला परिचय.
11 Feb 2016 - 8:39 pm | स्वाती दिनेश
पुस्तक परिचय आवडला, नक्की वाचेन हे पुस्तक.
स्वाती
15 Feb 2016 - 10:06 am | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
15 Feb 2016 - 10:36 am | पैसा
उत्तम पुस्तक परिचय. वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली नक्कीच.