'रुची' म्हटलं की खास मिपासंदर्भात पाकृ दालनात आलेल्या असंख्य तोंपासु आणि डोनि (डोळे निववणार्या) रेशिप्या आठवणं साहजिक आहे. पण काही मिपाकर सुगृ असले म्हणून काय झालं, अनेक मिपाकर तर नुसते गृ सुद्धा झालेले नाहीत अजून. (सं.-द्यायला पाहिजे का? एक ४-५ खव उघडा रँडम. सापडतील अनेक सारे ;)) किचन नावाच्या रणभूमीवर पदार्पण करताना अनेक लोकांच्या थेट पोटावर वार होत असतात. तरीही पोटात भूक कोकलत असताना हे 'सुरीधाराव्रत' सांभाळणं येरागबाळ्याचे काम नोहे. रुची विशेषांकात या पहिल्या लढायांच्या 'रम्या कथा' आल्याच पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटलं. तर हा आमचा लेख खास बॅचलर/पूर्व बॅचलर मिपाकरांना त्यांच्या रुचिवैचित्र्यपूर्ण आयुष्याची आठवण करून द्यायला. हम भी कुछ कम नहीं.. ;)
कहाणी-१-प्रीतमोहर
आटपाट गाव होतं. त्या गावात सगळंच छान होतं. अतिशय समृद्ध गाव. कुठेच कशाचीही कमी नव्हती. अश्या या गावात प्रीतमोहर तिच्या कुटुंबासोबत रहायची. स्वयंपाकघर सोडुन बाकी सगळीकडे वावरायची ती मुलगी. खेळ म्हणु नका, अभ्यास म्हणु नका, तर्हातर्हांच्या स्पर्धांतही जिंकत असे ती. शिवाय घरात आई, २ काकु , ३ आज्या इतक्या सगळ्याजणींमुळे तिथे धडपडायचीच नाही ती. पण त्यामुळे काय झाले, किचनदेवाचा कोप झाला.
एकदा काय झाले प्रीतमोहर नुकतीच दहावी पास होउन अकरावीत गेली होती आणि ती तिच्या आईबाबांसोबत शिक्षणासाठी दुसर्या गावी रहायला गेली. आई बाबा तिला एकटीला सोडुन काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आणि प्रीमोच्या बेस्ट फ्रेंड च्या भावाने फोन केला की मी जेवायला येतोय काहीच नाही तर वरण भात कर!!!! आता आली का पंचाईत आता पर्यंत चहा, भात वगैरे जळवुन करपवुन साधारण जमत होते पण वरण???. वरणासाठी डाळ लागते हे तिला माहित होते पण ती कोणती डाळ याचा काही पत्ताच नव्हता. मग तिने तिच्या नेहमीच्या परीराणीला म्हंजे आज्जीला फोन केला, पण हाय रे दुर्दैवा फोन बंद होता.(किचनदेवाचा कोप!!!). आता काय करावे बरे? खिंड तर लढावीच लागणार. मग तिने किचनदेवाची प्रार्थना केली. पण किचनदेवाचा कोप म्हणजे कोप!!! तिला डाळ कोणती घ्यावी हे कळेचना. मग १०-२०-३०-४० असे करुन कोणती तरी एक पिवळ्या रंगाची डाळ निवडली व ती शिजत ठेवली.
दुसर्या बाजुने खोबरं किसलं, थोडस जिरं, एवढुस्सा हिंग,एखादी हिरवी मिरची असं मिक्सरमधुन बारीक वाटुन घेतलं. लगेच डाळ शिजते मग त्यात हे वाटण घालायचं अस आईने सांगितल्याचं तिला बरोब्बर आठवलं. पण डाळ शिजतच नाहीये, तब्बल अर्धा-पाउण तास डाळ शिजेचना. मग काय होईल ते होईल म्हणुन प्रीमोने त्या तश्याच डाळीत वाटण घातले, मीठ गूळ घातला आणि चांगली उकळी काढली. आणि मग डाळ बोटचेपी झाल्यावर गॅस बंद केला. मित्र आल्यावर त्याला वाढले. पहिलाच घास मुखात सेवन करताच तो उत्तरला" हे मुली तु डाळ कोणती घेतलीस?" ह्यावर त्या सालस मुलीने एक गोड स्माईल दिली फक्त . नंतर पुर्ण जेवण तो "चणाडाळ - वरण" अस काहीस असंबद्ध बडबडत, खो खो हसत जेवला, मुलीच्या वरणाचा भयानक पंचनामा पूर्ण गँग जमल्यावर करण्यात आला ते वेगळंच..
या कहाणीतुन काय बोध घ्यावा? डाळी ओळखायला येणे अगदी गरजेचे असते!!! प्रीमोने हा बोध घेतला व तिने किचनदेवाची आराधना केली. त्यामुळे तिला वरण, मसूर-आमटी, तूर डाळीची आमटी, एखाद दुसरी भाजी असे बेसिक पदार्थ शिकता आले. ह्या पदार्थांनी ती किमान उपाशी पडणार नाही ह्याची सोय झाली तर होती. पण पुढील ४-५ वर्षे हे ज्ञान तिला पुरलं.
पण मुलीनी व्रताची हेळसांड केली. किचनदेवाच व्रत असं अर्धवट सोडु नये. ते कायम करायच असतं.
५ वर्षांनी मुलगी संगणक अभियंता झाली.नंतर नोकरीनिमित्त मॅडमना पुण्यपत्तनास जावे लागले. तिथली कीर्ती ऐकुन तिने व तिच्या रुमीने रात्री पोळीभाजीचा डब्बा लावला. आधीच भातावर पोसलेल्या कोकणस्थी जीवाचे फक्त पोळीने समाधान होत नव्हते, त्यात निमित्त झाले ते तिच्या रुमीला शिळी पोळी सापडली. तशीच ती शिळी पोळी डब्बेवालीच्या तोंडावर मारुन "उद्यापासुन डब्बा नको" असे तीस बजावुन स्वारी रुमवर परतली. पण उद्यापासुन काय हा प्रश्न होता. इथे दोन्ही मुलींच्या घरचे धावत आले. लगेच येत्या वीकांताला स्वैपाकाच समग्र सामान त्यांच्या १रु.कि. मधे डेरेदाखल झाल. तिथे तिने पुन्हा किचनदेवाची आराधना केली. प्रयोग**करत करत मुलीने बरेच ज्ञानार्जन केले.
**प्रयोगाचे फळ भोगलेले मित्रमंडळ अजुनही जिवंत आहेत. त्याबद्दल टेंशन करु नये.
आता बरेच दिवस झाले होते पुण्यनगरीत. तर तिच्या रुमीने गोवन डिशेस खाऊ घाल असा आग्रह केला. मग लगेच मुलगी फुलली. काय खाऊ घालु हा विचार करताना तिला सुचले उडीदमेथी करावी अंबाड्याची, पण अंबाडे कुठले इथे मिळायला तर अंबाड्यांच कैरीवर भागवु आणि मणगणं करु. असा बेत तिनी फायनल केला. व तिच्या दुसर्या परीला म्हणजे आईला फोन केला. आईकडुन मणगण्याची स्टेपबाय स्टेप रेसीपी घेउन मुलगी दुसर्या दिवशीचे प्लान करत झोपी गेली.
उडीदमेथीसाठी लागतंच काय? १ मोठी कैरी, बचकभर ओलं खोबरं, चमचाभर मेथीदाणे,चमचाभर उडीद दाळ,चमचाभर धणे, चमचाभर तांदूळ, २-३ लाल सुख्या मिरच्या, फोडणीसाठी हळद, मोहरी,मेथीदाणे, चिमुटभर हिंग, आणि कढीपत्ता. तिने खोबर थोडस्स भाजुन घेतलं, बाजुला ठेवलं. मग एकेक अर्धा चमचा तेलात उडीद, मेथीदाणे, तांदूळ, धणे, आणि सुक्या मिरच्या एकेक करुन भाजल्या. हे भाजलेलं साहित्य आणि खोबर बारीक वाटुन घेतलं.मग चमचाभर तेलात फोडणी केली त्यात मोहरी, मेथी ,हळद आणि कढीपत्ता टाकला, कैरीचे तुकडे टाकले आणि मस्त परतुन घेतले. मग त्यात पाणी टाकलं, मीठ गुळ घातलं आणि झाकण मारुन ठेवलं ३-४ मिनिटं. मग त्यात वाटण टाकलं. थोडंसं पाणी हवं होत ते टाकलं. मस्त शिजवुन घेतलं आणि उडदामेथी तय्यार झाली. टेस्टीही झाली कधी नव्हे ते. पण काहीतरी बिघडल्याशिवाय हे इथे कहाणीत कसं आल असत? आमच मणगणं बिघडलं.. कस?उडीदमेथी शिजत असताना मुलीने चणाडाळ शिजवुन घेतली, नारळाच दाट दूध काढुन घेतलं, थोडे साबुदाणे भिजवुन ठेवले होते ते निथळत ठेवलेन. मग चणाडाळीत गूळ मिसळवत शिजत ठेवली. त्यात काजु वगैरे सुका मेवा आणि साबुदाणे टाकले. ह्याला उकळी आल्यावर नारळाच दुध घालावं लागतं . आणि सतत ढवळावं लागतं. नाही तर चोथापाणी होतं मणगणं. तर मॅडमनी ही स्टेपही केली. सर्वात शेवटी वेलची पूड(हळदीच पान असल तर तेच प्रिफर्ड, पण ते डाळीत गुळ घालताना टाकावं) आणि थोडस्स ढवळुन मग गॅस बंद. चला आता पानं वाढुया म्हणुन बसल्याच दोघीजणी, तर मणगणं आंबट.!!! आमच्या ह्या गोव्याच्या मुलीनी नारळाच्या दुधाऐवजी ताक मिसळलं होत मणगण्यात!! हाय रे कर्मा. मग फटाफट थोड्या भाताच पायसटाईप रांधुन जेवल्या पोरी.
किचनदेवाचा जसा कोप प्रीमोवर झाला तसा तुम्हां-आम्हांवर होऊ नये. म्हणुन किचनदेवाची आराधना करावी. सर्वांच्या अडी अडचणी नष्ट होवो आणि किचनदेव तुम्हांवर अखंड कृपा होवो. तर अशी ही उतराची साठां कहाणी पाचां उतरी सुफळ संपुर्ण .
कहाणी-२-पिशी अबोली
आटपाट गाव होतं. गावात एक पिशीबाय होती. पिशीला बाहेर शिकण्याची हौस. आई-बाबा म्हणू लागले, बाय गो, पुणे नगरीत जा. तिथे हॉस्टेल ची सोय होईल. ती होईपर्यंत काय करशील? तर तिथे मामेभाऊ राहतो, त्याच्या घरी रहा बापडी. तशी ही निघाली. भावाच्या घरी राहिली. वहिनीला खूप काम पडू लागलं. पिशीबायने किचनदेवाची आराधना केली नव्हती. तरी ती लुडबुड करू जायची. तसा किचनदेवाचा तिच्यावर कोप झाला.
एकदा संकष्टी आली. संकष्टीच्या दिवशी वहिनीचा उपास. ऑफिसमधून परत येऊन ती म्हणाली, 'वन्संबाई वन्संबाई, मोदक करुया का? पिशीबाय म्हणे हो करू. वहिनी म्हणाली, वन्संबाई वन्संबाई, खोबरं खवाल? किचनदेव मुळात दयाळू. त्यामुळे हे काम तिला नीट जमलं. पुढे काय झालं, वहिनी म्हणाली, 'मी उकड काढलीये, बाहेरून फुलं घेऊन येते. तंवर गूळ-खोबरं शिजवाल का? पिशीबाय म्हणाली हो. ते तर सोपं असतं.
वहिनी गेली तशी पिशीबायने काय केलं, सारणात भरपूर पाणी ओतलं. चांगलं शिजवायचं म्हणून जास्त पाणी. भावाला म्हणाली, 'दादा, दादा, एवढं पाणी पुरेल ना?' भाऊ म्हणाला, बहिणाबाई, थोडं कमीच घाल. तसं तिने पाणी कमी केलं आणि शिजवू लागली. वहिनी आली तसं तिला गॅसवरचं पाण्यात तरंगणारं गूळ-खोबरं दिसलं. म्हणू लागली, हे काय वन्संबाई? पिशीबायने म्हटलं हे शिजणारं सारण.वहिनीने कपाळाला हात लावला. पुढे त्या रात्री उकडीच्या भाकर्या कराव्या लागल्या. दुसर्या दिवशी पिशी आपली कॉलेजला चालती झाली, तशी वहिनीने दिवसभर आटवून आटवून सारणाला सारणाच्या कन्सिस्टन्सीला आणलं. पण पुढे मोदक करण्यात पिशीला मदत करू दिली नाही.
पुढे ही कथा ऐकून पिशीच्या आईने दर वेळी मोदक करताना 'किचन-कंपल्शन-व्रत' केलं. सर्व नातेवाईकांनी या कथेची अनेक वर्षं अनेक ठिकाणी पारायणं केली. आणि अशा सर्व पुण्याईमुळे पिशीबायला किचनदेवाची कधीकधी आराधना करायची सुबुद्धी झाली. ४-५ वर्षे याची फळं भोगल्यावर हळू हळू किचनदेवाचा कोप शांत झाला आणि यथावकाश पिशीने प्रवेश केलेलं किचन सुरक्षित मानलं जाऊ लागलं.
तर किचनदेवाचा कोप होऊ नये, म्हणून प्रत्येकाने सठी सहामाशी का होईना, किचनमधे प्रवेश करावा. कढईत तेल-मोहरी वहावी, आणि नंतर कोणतेही उपचार करावे लागू नयेत, अशा उपचारांनी किचन देवाची पूजा करावी. सर्वांना किचनदेव पावो, आणि पिशीला जसा त्रास झाला तसा कुणाला न होवो. अशी ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 9:47 am | कविता१९७८
हा हा हा ,माझ्यावरही कीचनदेवाचा कोप होत असतो अधेमधे
16 Oct 2015 - 10:59 am | पियुशा
हा हा हा भारी किस्से
दिल दोस्ती दुनियादारी मध्ये ह्या "मणगणं " वर एक अक्खा एपिसोड झाला होता बिचारिने कुठुन कुठुन शोधुन बन्वले होते :)
17 Oct 2015 - 3:50 pm | प्रश्नलंका
बघं तरी अजून तुझे किस्से नाही लिवले यात ;)
बाकी प्रिमो आणि पिशे दंडवत _/\_ बाई तुम्हाला. =))
16 Oct 2015 - 11:31 am | गिरकी
खिक्क … खूप भारी लिहिलंय … :)
16 Oct 2015 - 11:37 am | अजया
तुमची कहाणी वाचून परत व्रत वसा घेईन म्हणते.उतणार नाही मातणार नाही.घेतला वसा टाकणार नाही!
16 Oct 2015 - 11:48 am | पैसा
=)) =)) =)) किचन कट्टा केन्ना करतां गो? =)) =)) =))
16 Oct 2015 - 12:13 pm | मीता
हसून हसून गाल दुखायला लागले आता. भारी लिहिलंय..
16 Oct 2015 - 12:15 pm | जातवेद
मला आम्ही मुलांनी मिळून केलेलं वरण आठवलं. समोर राहणार्या मुलींना जेवायला बोलावलं होतं. आम्ही पण हरभरा डाळ वापरली होती. आमच्यानं काय होत नाही हे पाहून मुलींनीच वरणाचं आपल्या हातात घेतलं तेव्हा कुठ आमची जेवणं झाली :)
:)
16 Oct 2015 - 12:38 pm | जिन्गल बेल
लय भारी :)
16 Oct 2015 - 1:07 pm | के.पी.
गमतीशीर कहाण्या :))))
16 Oct 2015 - 1:11 pm | प्राची अश्विनी
:):):):)
16 Oct 2015 - 2:03 pm | स्नेहल महेश
:):):):)
16 Oct 2015 - 3:38 pm | पलाश
कहाण्या अगदी सुफळ संपूर्ण झाल्यात. लेखनविषय सुद्धा आवडला.
16 Oct 2015 - 3:42 pm | सानिकास्वप्निल
खि खि खि !! कहाण्या मजेशीर आहेत :)) :))
लिखाणाची स्टाईल आवडली गं पोरींनो
__/\__
16 Oct 2015 - 6:07 pm | मधुरा देशपांडे
हहपुवा. लिहिलंय एक नंबर.
बाकी आटपाट नगरात अनेक जण असतात असे, जमतं व्रत करायला सवयीने. तरीही तुम्हा दोघींना भेटायचं असेल तर बाहेर जाणे जास्त सुरक्षित. ;)
16 Oct 2015 - 10:08 pm | रेवती
खुसखुशीत लिहिलय.
त्या अन्नपूर्णेच्या मनात कित्ती विचार येऊन गेले असतील याची कल्पना केलेली बरी. ;)
17 Oct 2015 - 12:47 am | स्रुजा
ह्या ह्या ह्या , काय ईष्टाईल निवडलीये. किचन देव म्हणे , लोल .. मज्जा आली वाचताना खुप :)
17 Oct 2015 - 3:11 am | रातराणी
हीही मस्त आहेत गोष्टी.
17 Oct 2015 - 9:03 am | नूतन सावंत
प्रिमो,पिशी,भन्नाट अनुभव,हसतेय ,आणि मुलींनीच काय पण मुलांनीही किचान्देवाची आराधना करणे किती आवश्यक आहे हे सगळ्यांना समजावून दिल्याबद्दल आभार.
अगदी खरंय.
17 Oct 2015 - 9:06 am | नूतन सावंत
किचन देवच व्रत मधेच सोडू नाय,ते चारपाच वर्ष कराव लागतं,यासाठी अगदी खरंय असंलिहिलंय.
17 Oct 2015 - 10:54 am | एस
चला, अस्मादिक एकटेच नाहीत या जगात असे हे समजल्याने अत्यानंद झालेला आहे. आणि मुलीच काय, मुलांनीही स्वयंपाकाची कला शिकून घेणे आवश्यक आहे याच्याशी बाडिस.
18 Oct 2015 - 3:41 am | आदूबाळ
लोल!
18 Oct 2015 - 3:13 pm | इशा१२३
भन्नाट किस्से आहेत.मस्त लिहिलय अगदि.
18 Oct 2015 - 6:22 pm | प्यारे१
बाळगोपाळांचे किस्से आवडले.
तेव्हा आमच्या घरात कशानं कुणास ठाऊक मुंग्या लागायच्या पदार्थाला. माझ्या मधल्या बहिणीने (तिचंही नाव स्मिता आहे) सातवी आठवीयला असताना भाकरीला मुंग्या लागू नयेत म्हणून आईच्या सूचनेनुसार भाकरी (भाकरीचं अनेकवचन भाकरी असंच आहे याची संबंधितांनी णोंद घ्यावी) चाळणीत ठेवून चाळण पाण्यावर ठेव म्हणून सांगितलं. तायडीनं कढईभर पाणी घेतलं. त्यात भाकरी असलेली चाळण ठेवली. भाकरी मस्त मऊसूद पिठूळ झाल्या.
संध्याकाळी आम्ही मस्ताड पैकी शक्य त्या थोड्याफार सुक्या भाकरीचे तुकडे/ चिवडा खाल्ला.
अर्थात यानंतरचा किस्सा आठवण्यासारखा आहे. तिचीच यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा होती. आई नेमकी कोणी तरी आजारी म्हणून त्यांना भेटायला म्हणून जवळ असलेल्या गावी गेली होती नि उशीरा येणार होती. मामेबहीण तिची फॅमिली आणि तिच्या नवर्याच्या फॅमिली बरोबर अगंतुक आली. आणि बॅगा ठेवून मला गाईड घेऊन आम्ही सगळे फिरायला. हिनं अभ्यास सांभाळून १० माणसांचा स्वैपाक एकटीनं केला. व्यवस्थित. नंतर परीक्षा झाल्या. ८२ टक्के मार्क नो ट्युशन नथिंग.
चलो अच्छा है!
18 Oct 2015 - 6:33 pm | प्यारे१
>>> मामेबहीण तिची फॅमिली आणि तिच्या नवर्याच्या मित्राची फॅमिली बरोबर अगंतुक आली.
उगाच गैरसमज नको. :)
18 Oct 2015 - 7:37 pm | मांत्रिक
वा! मस्तच! चातुर्मास स्टाईल कथा आवडल्या!
19 Oct 2015 - 12:01 pm | पद्मावति
ही ही ही...हसून हसून पुरेवाट झालीय. दोन्हीही कहाण्या मजेदार.
20 Oct 2015 - 8:08 am | मितान
फिदीफिदी हसले ;)
आजकालच्या पोरींना सैपाकातला कॉमन सेन्सच नै ;) ;)
20 Oct 2015 - 4:08 pm | पिलीयन रायडर
वा वा वा!!!
मला आलेलं फ्रस्त्रेशन ह्या लेखाने दुर झाले हो!!
22 Oct 2015 - 2:32 pm | Mrunalini
हीहीहीही... सहीच झालाय लेख. माझे सुद्धा बरेच आहेत असे अनुभव.
एकदा पुरणपोळी करायची म्हणुन आईने चणाडाळ शिजायला घातली होती. तिने सांगितले होते कि डाळ शिजली कि वेळुन ठेव. डाळ मस्त शिजली आणि मी वेळुनही ठेवली. फक्त एक चुक केली, डाळीचे पाणी बेसिन मधे ओतले. आल्यावर आईने मस्त खरडपट्टी काढली होती, आमटी करायला कटच नाही.
22 Oct 2015 - 4:30 pm | अनन्न्या
प्रत्येकीचेच असे मजेशीर अनुभव असतात, पण लिहिण्याचे सुचणे शक्यच नाही.
23 Oct 2015 - 9:10 pm | स्वाती दिनेश
सुरीधाराव्रताची गोष्ट मस्त!
स्वाती
25 Oct 2015 - 12:25 pm | आरोही
मस्त लिहिलेयेस पिशे ..अगदी डोळ्यासमोर दृश्य दिसत होते ...
26 Oct 2015 - 11:09 am | स्नेहल महेश
खूप भारी लिहिलंय
27 Oct 2015 - 2:56 am | श्रीरंग_जोशी
दोघींचेही किस्से भन्नाट आहेत.
जवळच्या मंडळींचे असे काही किस्से आठवले.
मी स्वतः सुटसुटीत पदार्थच बनवतो म्हणजे उत्तप्पे बनवतो पण दोसे बनवायचं दु:साहस करत नाही. गाजराचा हलवा बनवतो पण गुलाब जामून वगैरेच्या नादी लागत नाही. त्यामुळे किचनदेव शक्यतो कोपत नाही.
27 Oct 2015 - 10:05 pm | अदि
किस्से!!
28 Oct 2015 - 3:49 am | विशाखा राऊत
धमाल लिहिले आहेत दोघींनी