संपादकीय - सानिकास्वप्निल - अजया

अजया's picture
अजया in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:07 pm

नमस्कार मिपाकरांनो!

अनाहिताच्या पहिल्या अंकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आजच्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हा रुची अंक घेऊन आपल्यासमोर येत आहोत. अनाहिताचा या वर्षातला हा दुसरा अंक! या अंकाबाबत काही सांगण्याआधी अनाहिता अंक वेगळा का काढतो आपण हे मिपाकरांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! तर याचे मुख्य कारण आहे अनाहितांना लिहिण्याचा आत्मविश्वास येऊन त्यांना या निमित्ताने मिसळपावच्या मुख्य प्रवाहात सामिल होता येते. एरवी घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जवाबदार्‍या एकटीने खांद्यावर झेलत असताना अनाहितांचा मिपावर सहभाग बर्‍याचदा वाचनमात्र असतो. अंकासाठी लिहिताना मात्र भरपूर वेळ घेऊन आवडत्या विषयावर लिहिता येते. त्यामुळे सर्वच अनाहितांना अंकात सहभागी होता येतं. काही जणांना प्रश्न आहे की मग अंक मिपाचा सर्वसमावेशक का नाही? तर अनाहितांचा अंकासाठीचा लेखनाचा उत्साह पाहता ते लवकरच शक्य होईल असं वाटतं. आत्ताच्या अनाहिता अंकाच्या निमित्ताने आम्ही स्वतंत्रपणे काय करू शकतो हे अनाहितांना अजमावता येतंय. याचे परिणाम नजिकच्या भविष्यात मिपावरच्या सर्वसमावेशक अंकातल्या अनाहितांच्या जास्तीतजास्त सहभागाने दिसायला लागेल अशी आशा, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नक्कीच या अंकांच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करू पाहतोय.

आता बोलू रुची विशेषांकाबद्दल! मागच्या महिला दिन विशेष अंकानंतर अनाहितात पुढचा अंक कसा असावा, या अंकातल्या त्रुटी या सर्वांचा आढावा घेण्यात आला. त्यादरम्यान सानिकाने ही रुची विशेषांकाची कल्पना सुचवली आणि अनाहिता उत्साहाने भारल्या गेल्या. विशेष म्हणजे नव्याने अनाहितात सामिल झालेल्या मैत्रिणीही तितक्याच आनंदाने सामील झाल्या. वेगवेगळे विषय सुचवले गेले. या अंकाचं स्वरूप नुसता पाककृती असणारा अंक असा नको होता तर अन्न हे पूर्णब्रम्ह हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य दाखवणारा हवा होता. अन्न ही माणसाची मूलभूत गरज. त्या गरजेचे आपण विविध रुचींमध्ये रुपांतर केले. अगदी आपल्या देशात, राज्यातदेखील विविध प्रांताच्या रुची वेगवेगळ्या आहेत. अशा या पारंपारिक ते आधुनिक असा रुचीचा वैविध्यपूर्ण पट या अंकाच्या निमित्ताने उलगडलाय.

आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात आपण जगाच्या निरनिराळ्या भागात रहाणारी माणसं, आपोआपच राहत्या ठिकाणाच्या खाद्यसंस्कृतीशी परिचित होतो. अशा विविध देशात राहणार्‍या आपल्या अनाहिता तिथली खाद्यसंस्कृती या अंकाच्या निमित्ताने पेश करत आहेत. तसंच कोकणापासून ते विदर्भ, मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीतल्या अनवट पाककृती खास तिथली चव घेऊन हजर आहेत! आपल्याकडे सणावाराला, लग्नाला पंगतीतल्या जेवणाचे विशेष महत्व! अगदी संत एकनाथांनाही रुक्मिणी स्वयंवरात पंगतीतल्या विविध खाद्यपदार्थांची वर्णने करायचा मोह सुटलेला नाही! या अंकात आपण त्या काळातल्या पंगतीचे सुरेख वर्णन वाचू शकाल. ग्लोबल सरमिसळीमुळे विविध देशांचे पदार्थ आपल्या खाण्यात महत्वाचे स्थान पकडून बसायला लगले आहेत. त्या पदार्थांमागचा रोचक इतिहास काही लेखात जाणून घेता येईल. अजुन एक विभाग आहे तो आपले मराठी पध्दतीच्या मेजवानीचे भरलेले ताट! यात ताटाभोवतीच्या महिरपीपासून ते डावी, उजवी बाजू सांभाळणारे पदार्थ, भात, सार, कढ्या, पोळ्या, गोडाचे पदार्थ ते मुखवास असे सर्व काही वाढून ठेवलेले आहे. सोबत गदिमांचे ताटावरचे सुरेख काव्यदेखील आहे! उन्हाळ्यातली वाळवणं आपल्या मराठमोळ्या ताटातले मानाचे स्थान. बर्‍याच वाळवणाच्या पदार्थांच्या पारंपारिक पाककृती अंकातल्या लेखात मिळतील. आंतरजालाच्या वापरामुळे अनेक सुगरणी आपापले रेसिपी ब्लॉग लिहू लागल्या. त्या वाचून स्वयंपाकातल्या टिप्स मिळवणे सोपे जाते. त्यामुळे हल्ली बरेच हौशी पाककलाकार हे ब्लॉग वापरतात. त्यांचा एक संग्रह अंकात वाचायला मिळेल. लहान बाळ ते वाढत्या वयाचे मूल सर्वांच्या भूकेच्या गरजा वेगवेगळ्या. या विषयावर अनाहितामध्ये धागा काढून चर्चा झालेल्या. अंकाच्या निमित्ताने अनाहितावरचा," आई मला भूक लागली" हा धागा संकलित करून खुला करत आहोत. मास्टर शेफप्रमाणे मिस्टरी बॉक्स, केक आर्टिस्टची मुलाखत ते कँपिंगला जातानाचे खाणे असे अजून बरेच काही रोचक या अंकात वाचायला आहेच! आहार आणि वाढते वजन यासंबधी माहिती देणारा लेख आणि आहारतज्ञांची मुलाखत हे सर्व पाककृती वाचून वाढलेल्या वजनाला दिलासा म्हणून आहेतच! या सर्वांबरोबर तोंडीलावणं म्हणून काही छानसे ललित लेख आहेत. अनाहितांनी केलेल्या खाद्यपदार्थांच्या फोटोंचा कोलाजदेखील आहे!

अंकासाठी इतक्या लोकांचा हातभार लागलाय की आभारप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही हे खरं! या अंकाची कल्पना सुचवल्याबरोबर नीलकांतनी अनुमोदन देऊन उत्साह वाढवला. अभ्याने या अंकासाठी सुरेख बॅनर करुन दिले आहे. त्याचे आणि आपल्या तंत्रज्ञ प्रशांत आणि नीलकांतचे विशेष आभार. या अंकासाठी काही फोटोशॉपचे काम अमिपाकरांनी करून दिले आहे त्यांचेही आभार. आपापली करीअर, संसार, लहान बाळं सगळं सांभाळून अनेक जुन्या-नव्या अनाहितांनी या अंकासाठी साहित्य दिलंय. त्यांचे आभार नाही मानत, आमचा सगळ्यांचाच हा अंक आहे म्हणून!

तर मिपाकरांनो आमचा हा अंक जरूर वाचा, सुधारणा सुचवा, प्रोत्साहनपण द्याच!
कळावे, लोभ आहेच, वाढावा ही विनंती.

_____/\______
सानिकास्वप्निल अजया

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

16 Oct 2015 - 9:14 am | त्रिवेणी

अजया ताई आणि सानिका तुमचे ही अभिनंदन आणि या अंकासाठी तुम्ही घेतलेल्या कष्टासाठी खुप खुप आभार.

संपादकीय सुंदर, सगळ्या मुद्द्याना स्पर्श करणारे झाले आहे. सानिका, अजया आणि अंकाला सजवणाय्रा सर्वांचे आभार.

नूतन सावंत's picture

16 Oct 2015 - 9:17 am | नूतन सावंत

अजया, सानिका सगळ्याच्या प्रयत्नांना सुरेख रूप रंग दिल्याबद्दल आभार.तुम्हा दोघींनी इतर अनाहीतांच्या मदतीने शेवटी अंक पूर्णत्वाला नेलात. मी जर कुठली राणी असते तर म्हटलं असत,"तुम्हाला दोघींना पाचशे पाचशे गावं इनाम."

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 9:18 am | प्रीत-मोहर

मस्त संपादकीय. आता हळु हळु लेख वाचते!!!

संपादकीय अगदी छान...अजयाताई सानिका तुमचे खूप अभिनंदन!!

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:26 am | कविता१९७८

मस्त , अजया , सानिका तुमच्या मेहनतीचे फळ गोग्गोड आहे

के.पी.'s picture

16 Oct 2015 - 9:30 am | के.पी.

बहारदार अंकासाठी अजयाताई आणि सानिताई तुमचे खुप खुप अभिनंदन!!!

चला प्रतिक्षा सम्पली एकदाची , मस्त मेज्वानी वाढुन ठॅवलियसमोर हे खाउ की ते खाउ अस होणारे आता :)

अजयाताई,सानिका तुमचे खूप,खूप अभिनंदन..

गिरकी's picture

16 Oct 2015 - 10:16 am | गिरकी

मस्त झालाय अंक :) आता सावकाशीने वाचते.

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 10:45 am | पिलीयन रायडर

अंक चाळत आहे. एकेक करुन सावकाशीने प्रतिक्रिया पण देणारच आहे. पण खरं सांगायचं तर माझ्या अपेक्षेपेक्षा फारच भरगच्च अंक आहे हा!

ह्या अंकासाठी तुम्ही फार कष्ट घेतले आहेत. त्यासाठी तुम्हा दोघींचे खास आभार! आणि ज्या ज्या सर्वांनी उत्तम लेख देऊन अंक घडवण्यात मदत केली आहे त्या सगळ्यांचेही अभिनंदन!

अंक उत्तम झाला आहे!!!

अमृत's picture

16 Oct 2015 - 10:46 am | अमृत

सर्व अनाहितांचे अभिनंदन. काही लेख नुकतेच वाचून काढलेत सगळेच चविष्ट, वाचनीय आणि एकसे एक आहेत.मुखपृष्ठ मांडणीपासून तो संपादकीय, लेख सगळेच वाचनीय.सगळ्यांचे पुन्हा अभिनंदन. मस्त स्तुत्य उपक्रम.

तटी - असाच एक बागकामाविशयी विशेषांक काढता येईल काय?

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:25 am | पैसा

काढूयात असे खास अंक सर्वांसाठी.

मितान's picture

16 Oct 2015 - 11:58 am | मितान

फार छान कल्पना ! बागकाम विशेषांक!!

स्मिता श्रीपाद's picture

16 Oct 2015 - 10:48 am | स्मिता श्रीपाद

अजया ताई आणि सानिका तुमचे खरच खुप खुप कौतुक...खुप सुरेख झाला आहे अंक...
आता सावकाश एक एक लेख वाचते....

पिशी अबोली's picture

16 Oct 2015 - 10:55 am | पिशी अबोली

आला आला..अंक आला.. :)
संपादकीय छानच. भूमिका खूप सुंदर समजावून सांगितली आहे. आता लेख वाचते हळूहळू

रुची अंक अगदी मस्त झालायं. आत्ताच अनुक्रमणिका पाहून आले.हा अंक अगदी बहुविध विषयांनी नटलेला दिसतो आहे.
गदिमांची कविता वाचून आणि केळीच्या पानाची उत्कॄष्ट योजना पाहून झकास वाटतंय. अजया, सानिका आणि सगळ्या सहभागी अनाहितांना शाब्बासकी. तुमचे सगळ्यांचे कष्ट खूप सुंदर रूप घेऊन आलेत या विशेषांकात. अनेक शुभेच्छा !!! :)

मुक्ती's picture

16 Oct 2015 - 11:04 am | मुक्ती

चांगला उपक्रम!

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 11:15 am | पद्मावति

ग्रेट जॉब.
सानिका, अजया-- अप्रतिम दिसतोय अंक. आता निवांत वाचीन. इतकी मेहेनत घेऊन हा सर्वांगसुंदर अंक आमच्यासमोर ठेवल्याबद्दल तुमचे आणि अंकाला हातभार लावणार्या सगळयांचे मन:पूर्वक आभार.

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 11:23 am | वेल्लाभट

संपादकीय लेख उत्तमच झालाय!

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 11:33 am | स्वाती दिनेश

संपादकीय उत्तम!
अंकही देखणा झालेला दिसतो आहे. आता वाचते निवांतपणे..
स्वाती

जिन्गल बेल's picture

16 Oct 2015 - 11:40 am | जिन्गल बेल

सुंदर !!!! :)

पदम's picture

16 Oct 2015 - 11:42 am | पदम

तुमचे अभिनंदन. अप्रतीम झालाय अंक. खुप मेहनत घेतलिय तुम्ही. आता वाचेन निवांतपणे.

तुम्हा दोघींचेही अभिनंदन! खूप मेहनत घेतलीय तुम्ही, तुमच्या प्रोत्साहनामुळे सर्वच अनाहितांनी आणि इतका सुंदर अंक तयार झालाय.

छान दिसतोय अंक.मिसळपावची मेजवानीचा दिसते आहे ही सदस्यांसाठी.

स्नेहल महेश's picture

16 Oct 2015 - 12:20 pm | स्नेहल महेश

खुप सुरेख झाला आहे अंक...
आता सावकाश एक एक लेख वाचते....

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 1:06 pm | मधुरा देशपांडे

अंकात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्वांचेच अभिनंदन. सानिका आणि अजयाताई - ग्रेट जॉब. संपादकीय आवडले, आता सावकाशीने लेख वाचते.

वैदेहिश्री's picture

16 Oct 2015 - 1:12 pm | वैदेहिश्री

अंक आला. आता निवांतपणे वाचुन प्रतिक्रिया देईन.

कौशिकी०२५'s picture

16 Oct 2015 - 1:14 pm | कौशिकी०२५

अजया ताई- सानिका खुपच सुन्दर झालाय हा अंक.ह्या अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचेच हार्दिक अभिनंदन!! आणि खुप धन्यवाद ह्या मेजवानीबद्दल...

प्रश्नलंका's picture

16 Oct 2015 - 2:07 pm | प्रश्नलंका

वाह मस्तच!! संपादकीय लेख खूप छान लिहिलाय . या अंकासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी झालेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन . अंक भराभरा पाहून घेतला आता सावकाश वाचून प्रतिसाद देते . सुरेख जमलंय सगळं .

१-२ लेख वाचले. मस्त झाले आहेत.

अभिनंदन!!

भावना कल्लोळ's picture

16 Oct 2015 - 5:00 pm | भावना कल्लोळ

संपादकीय खूप छान झाले अहे. दोघींचे अभिनंदन.

अंकामागची भूमिका सविस्तरपणे विषद करुन सांगितल्याने एक वेगळाच आपलेपणा आलाय लेखात.
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

अगदी मुद्देसूद संपादकीय आहे.
अंकासाठीची तळमळ त्यातून जाणवते.

विशाखा पाटील's picture

16 Oct 2015 - 6:23 pm | विशाखा पाटील

संपादकीय अगदी नेमके आणि मुद्देसूद. अशा उपक्रमांच्या निमित्ताने अनेक अनाहिता लिहू लागल्या आहेत, हे सर्वात महत्त्वाचे. खरे तर, अशा प्रकारचा अंक काढण्याचे काम मोठे असते, परंतु इतका उत्तम अंक अजया आणि सानिका या दोघींनी प्रचंड मेहनत घेऊन तयार केलाये. त्यांचे विशेष अभिनंदन!

या अंकासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद!

टक्कू's picture

16 Oct 2015 - 7:10 pm | टक्कू

अजयाताई सानिका तुमचे खूप अभिनंदन!!
अंक खूप छान आणि वैविध्यपूर्ण झालाय.
-टक्कू

जुइ's picture

16 Oct 2015 - 9:11 pm | जुइ

अंकासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार! निवांत वाचून प्रतिसाद देईन.

इडली डोसा's picture

16 Oct 2015 - 10:34 pm | इडली डोसा

जोरदार अंक आणि तितकेच छान संपादकीय. अंकात लेख लिहिण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल अजयाताई आणि सानिका या दोघींचे आभार.

सुधांशुनूलकर's picture

17 Oct 2015 - 10:27 am | सुधांशुनूलकर

इतकी मस्त कल्पना इतक्या वेधक पद्धतीने प्रत्यक्षात आणल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
संपादकीय अतिशय 'रुचकर', त्यावरूनच सगळा अंक 'चारी ठाव जेवणासारखा सकस' झाला असणार. याचा अंदाज येतो.
'खाणं' या गोष्टीचा विविध अंगांनी चौफेर वेध घेतला आहे.

नीलकांत's picture

17 Oct 2015 - 2:05 pm | नीलकांत

रूची अंकामध्ये खुप छान लेख आले आहेत. एका विषयाशी संबंधीत अश्या नानाविध लेखांचा हा विशेषांक अतिशय उत्तम झाला आहे. या अंकासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार. विशेषांकाची जवाबदारी घेणार्‍या अजया आणि सानिकास्वप्निल यांचे विशेष अभिनंदन.

- नीलकांत

वाचनीय अंक ,सतत मार्गदर्शक ठरतील असे एकसे बढकर लेख , अंकाला घेतलेली मेहनत पदोपदी जाणवतेय. सर्व सहभागी अनहितांचे मनापासून अभिनंदन !!

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 3:37 pm | इशा१२३

संपादकिय लेख मस्तच.विषय ठरल्यावर कोण कशावर लिहिणार याची यादि तत्परतेने करण्यापासुन ते बारिकसारिक अडचणी सोडवुन मदत करणे,प्रोत्साहन देणे सगळ शिस्तित,वेळेवर करणार्या सानिका अन अजया दोघिंचे मनापासुन कौतुक आणि अभिनंदन.

सस्नेह's picture

17 Oct 2015 - 4:10 pm | सस्नेह

खरोखर अत्यंत वैविध्यपूर्ण रुचियुक्त झाला आहे.
अभिनंदन !

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2015 - 6:18 pm | बोका-ए-आझम

यांचे हार्दिक अभिनंदन! अप्रतिम अंक! अन्नदात्री सुखी भव! _/\_

किसन शिंदे's picture

17 Oct 2015 - 9:56 pm | किसन शिंदे

मिपासाठी इतका वैविध्यपूर्ण अंक बनवल्याबद्दल अनाहिता टिमचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्रचेतस's picture

18 Oct 2015 - 10:01 am | प्रचेतस

संपादकीय सुरेख.
अंक उत्कृष्ठ आणि चांगलाच जळवणारा झालाय.

सर्व अनाहिता सुग्रणींचे या सुंदर अंका बद्धल अभिनंदन ! अतिशय सुरेख अपक्रम आखणार्‍या आणि त्यात भाग घेणार्‍या व त्याला सर्वार्थाने मदत करणार्‍या मंडळीचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)
अंक अतिशय रूचकर दिसत आहे... काही पाकॄ चाळुन झाल्या आहेत, तर काही चाळायच्या बाकी आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे मला सर्व पाकृतींना / लेखांना प्रतिसाद देता येणे शक्य नसल्याने हा प्रतिसादच या सर्व अंकासाठी पोच म्हणून देत आहे. :)
परत एकदा या रुचकर उपक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन करतो... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!

उत्तम संपादकिय! माझी एक सूचना अशी आहे की, हा संपूर्ण अंक एकगठ्ठा पीडीएफ फाईल म्हणुन सेव्ह करता यावा. ते खूप बरं पडेल.

विशाखा राऊत's picture

18 Oct 2015 - 4:13 pm | विशाखा राऊत

उत्तम संपादकीय. दोघींनी खरच खुप मेहनत घेतली आहात. वेल डन :)