जर्मन खाद्यसंस्कृती - मधुरा देशपांडे - स्वाती दिनेश

Primary tabs

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:15 pm

माह्लत्साईट!! गुटेन आपेटिट!!

आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या युरोपच्या केंद्रस्थानी असलेला जर्मनी हा देश. इतिहासातील दोन महायुद्धे, त्यानंतर झालेले पूर्व आणि पश्चिम असे विभाजन, नव्वदीच्या दरम्यान पुन्हा एकत्रितपणे संयुक्त जर्मनी म्हणून आजही स्वतंत्र ओळख असलेला हा देश. बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज अशा गाड्या, फुटबॉल, कुकू क्लॉक ही जशी यांची एक ओळख, तशीच ब्लॅक फॉरेस्ट केक, बिअर आणि बिअर फेस्टिवल, चॉकलेट्स, बेकिंग आणि त्यानुषंगाने येणारे ब्रेड आणि केकचे प्रकार हे जर्मन खाद्यासंस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप. बर्फाच्छादित आप्ल्स आणि घनदाट जंगलांपासून र्‍हाइनच्या खोर्‍यापर्यंत विविधतेने नटलेल्या परंपरांची खाद्यपेय संस्कृती जर्मन्स अगदी अभिमानाने बाळगून आहेत. जर्मनीच्या उत्तरेपासून दक्षिणेकडे जावे तसे भौगोलिक परिस्थिती बदलते तसे खाण्यापिण्यातही बदल होत जातात.

कुठल्याही भारतीय माणसाचे नुकतेच जर्मनीत आगमन झालेले असते. हॉटेल किंवा अपार्टमेंटवर कुठल्याही नळाला येणारे पाणी इथे पिण्याचे पाणी म्हणून वापरले जाते ही माहिती कुणाकडून तरी कळलेली असते किंवा नव्याने माहिती होते आणि ते पचवलेही जाते. जेव्हा बाहेर फिरायला म्हणून किंवा काही खायला म्हणून बाहेर पडतो आणि तहान लागते तेव्हा मग जवळच काहीतरी पर्याय शोधले जातात. आधी युरोचा हिशोब लावला जातो, हो नाही करता करता अखेरीस तहान पैशांवर मात करते आणि आपण फक्त पाणी सांगून मोकळे होतो किंवा सुपरमार्केट मधून पाण्याची बाटली उचलतो. अनावर होऊन बाटली तोंडाला लावतो आणि तो घोट तसाच अडकतो. कारण पाणी म्हणजेच वासर (Wasser) असे सांगितले की जर्मनीत मिळते ते कार्बोनेटेड पाणी अर्थात सोडा मिश्रित पाणी. साधं पाणी प्यायला काय जातंय या लोकांचं असे म्हणत त्रासिक चेहऱ्याने ते पाणी संपवायचे प्रयत्न केले जातात आणि जर्मन खाद्यसंस्कृतीशी पहिला परिचय होतो. जर्मनीत कुठेही आणि कधीही पाणी सांगायचे असेल तर ohne kohlensauer किंवा Stilles सांगायचे/बघून घ्यायचे हे त्यानंतर नेहमीसाठी लक्षात ठेवले जाते. जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या पाण्यातील बदलापासून मग जर्मन खाद्याविश्वाची सफर सुरु होते आणि हळूहळू त्यांची अनेक वैशिष्ट्ये उमगत जातात.

शहराच्या मध्यवर्ती भागात असू देत नाहीतर एखाद्या गल्लीबोळात, शहर असू देत अथवा अगदी काही हजारांची वस्ती असलेले खेडेगाव, सकाळी ५ पासून ते रात्री ८ पर्यंत ठिकठीकाणी दिसणाऱ्या बेकरीज आणि तिथे उपलब्ध असणारे ब्रेडचे हजारो प्रकार बघून कुठल्याही नवख्या माणसाला नवल न वाटले तर विशेष. बेकिंगसाठी जर्मनी प्रसिद्ध का आहे याची प्रचीती जागोजागी असणाऱ्या बेकरीज मधून दिसून येते. ब्रेड म्हणजे जर्मन भाषेत ब्रोट (Brot) बेकिंगचे विविध कोर्सेस करून, बरेच शिक्षण घेऊन मग या क्षेत्रात कामाची संधी मिळते. पावाचा हा ऐतिहासिक ठेवा इजिप्तकडून जरी जर्मनीला मिळाला असला तरी त्यात वैविध्य आणून गव्हाबरोबरच, नाचणी, मल्टीग्रेन ब्रोट बेक करायला जर्मनांनी सुरूवात केली. उत्तरेकडे नाचणीपासून बनवलेला डुंकेल म्हणजे डार्क आणि हेवी ब्रेड खाल्ला जातो तर दक्षिणेकडे गव्हापासून बनवलेला लाइट ब्रोट जास्त खाल्ला जातो. नाचणी, गहू, बार्ली, ओट्स अशा धान्यांबरोबरच सूर्यफूलाच्या, भोपळ्याच्या बिया, पॉपी सीड्स, तीळ ,बदाम, हेझलनट्स्, आक्रोड असे अनेक पदार्थ ब्रेड मध्ये घातले जातात. सकाळच्या वेळी बहुतेक बेकरीजमध्ये नाश्त्यासाठी लोकांची गर्दी असते तर संध्याकाळी जेवणासाठी म्हणून ब्रेड नेणाऱ्यांची गर्दी. संध्याकाळच्या जेवणालाही कित्येक ठिकाणी आबेंडब्रोट असे संबोधले जाते. भारतीयांना बरेचदा वेगळी जाणवणारी बाब म्हणजे स्लाईस ब्रेड या बेकरीत कुठेच दिसत नाही. आपल्यासारखे सँडविच ब्रेड प्रकार या बेकरीज मध्ये कुठेच नसतात. त्यासाठी सुपरमार्केट मध्येच जावे लागते. तिथे मग त्याचेही असंख्य प्रकार मिळतात. एकूणच ब्रेडचे विविध प्रकार हे जर्मन खाद्याविश्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ब्रेड एवढेच कुकीज, बिस्किटे यांचेही महत्व आहे आणि ते दुकानात, बेकरीज मध्ये सहज लक्षात येते.

ब्रेडचे असंख्य प्रकार - बेकरी, कॉफी आणि केक, मफिन्स, ब्रेड मध्ये सलामी, चीज, सलाड घातलेले प्रकार, प्रेत्झेल, टोस्ट

.

"Give us this day our daily bread" आकाशातल्या प्रभूची ही प्रार्थना जर्मनांनी मनाशी फारच जपली आहे. रोजची भाकरी म्हणजे ब्रेड (ब्रोट) हे नुसते अन्न न राहता जर्मनांच्या संस्कृतीचाच एक भाग झाला आहे. आपल्याकडे कसं 'घर म्हणून राहू दे' असं म्हणून घरात काहीतरी खायला असेलच याची तजवीज असते तसं येथेही स्वयंपाकघरामध्ये फडताळातल्या एखाद्या कोपर्‍यात ब्रेडचा तुकडा आणि मीठाची पुरचुंडी बांधून ठेवलेली असते. मीठभाकरीला कमी पडू नये अशीच अगदी आपल्यासारखीच त्यातली भावना असते.

ब्रेडच्या सोबतीने बहुतांशी जर्मन लोकांचे मुख्य अन्न म्हणजे मांस. पोर्क (डुकराचे मांस) हे यात अग्रेसर.
त्याखालोखाल मग गोमांस (बीफ) आणि चिकन. मांसाहारी पदार्थांपैकी वुर्स्ट (सॉसेजेस) आणि ब्रेड, सोबतीला करी सॉस, टोमॅटो केचप किंवा मेयोनीज हा स्ट्रीट फूड/फास्ट फूड म्हणून सर्वाधिक लोकप्रिय प्रकार. श्निट्झेल (Schnitzel) हा असाच पोर्क किंवा बीफ वापरून केलेला कटलेट्स सदृश प्रकार. बीफ किंवा पोर्क पासून बनवलेल्या सलामीच्या चकत्या या अनेक प्रकारच्या ब्रेड आणि पिझ्झासोबत खाल्ल्या जातात. नुडल्स, पास्ता, भात किंवा ब्रेड अशा कुठल्याही पदार्थासोबत देखील कुठलातरी मांसाहारी पदार्थ असतोच. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तीनही वेळच्या स्वयंपाकात कुठल्यातरी प्रकारचे मांस हे असतेच. शुक्रवारी ख्रिश्चन लोकांसाठी लाल मांस वर्ज्य असल्याने किंवा त्यांच्या भाषेत शाकाहारी दिवस असल्याने बरेच वेळा फिश केले जाते. (फिश बऱ्याच देशात शाकाहारी गणले जाते) उत्तर जर्मनीत समुद्र जवळ असल्याने इतर भागांच्या तुलनेत फिशचा प्रभाव अधिक आढळतो. कुठल्याही सुपरमार्केट मध्ये एक मोठा सेक्शन हा फ्रोझन किंवा तयार मांस आणि त्याचे विविध पदार्थ यासाठी असतो. त्यासोबतच Metzgerei म्हणजेच खाटीक दुकान देखील असते, जिथे ताजे मांस विकले जाते.

ब्राटवुर्स्ट, करीवुर्स्ट विथ फ्रेंच फ्राइज, श्निट्झेल

.

मसाले म्हणून वापरले जाणारे पदार्थ म्हणजे मिरपूड. मग यात काळीमिरी, पांढरीमिरी हे पदार्थानुसार बदलते. शिवाय लेबकुखेन म्हणजेच काही प्रकारच्या केक्स मध्ये मिश्र मसाले वापरले जातात, परंतु त्याचा मुख्य उद्देश पदार्थाला मसालेदार करणे हा नसून केवळ त्याचा स्वाद यावा हा असतो. दालचिनीचा वापर बऱ्याच गोड पदार्थांमध्ये केला जातो.

हिवाळ्यात पदार्थ साठवून ठेवण्याच्या जुन्या सवयीमुळे फ्रोझन फूड देखील जर्मनीत बऱ्याच प्रमाणात वापरले जातात. परंतु त्याचबरोबर ताजे खाद्यपदार्थ, फळं देखील आवडीने खाल्ली जातात. लहान खेड्यांपासून तर मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडे आठवड्यातून २-३ दिवस आठवडी बाजार भरतो. यात शेतकरी लोक थेट शेतातून माल पोहोचवतात. याच बाजारात मग सोबतीला विविध परकारचे चीज, घरी बनवलेले ब्रेड, केक्स, फुलं हे देखील असतात. इथली गर्दी बघून अजूनही ताज्या पदार्थांना देखील लोकांच्या आहारात महत्व आहे हे दिसून येते.

भाज्यांपासून बनवल्या जाणारया पदार्थांमध्ये विविध प्रकारची सलाड, मिश्र भाज्यांचे सुप्स, मिश्र भाज्या वापरून केलेले गुलाश असे अनेक प्रकार येतात. ब्रेड किंवा भातासोबत एखादी भाजी उकडून त्यात मीठ मिरपूड घालून देखील खाल्ली जाते. शिवाय बहुतांशी मांसाहारी पदार्थांसोबत सलाड असतंच. सिमला मिरची, फ्लॉवर, पत्ताकोबी, कांदा, कांद्याची पात, झुकीनी, वालपापडी, फरसबी अशा शेंगा, टोमाटो, मुळा अशा वेगवेगळ्या भाज्या कुठल्याही सुपरमार्केट मध्ये, आठवडी बाजारात सहज उपलब्ध असतात. कोबीपासून बनवला जाणारा एक खास प्रकार म्हणजे Sauerkraut (sour cabbage), फर्मेंट केलेला कोबीचा प्रकार. लसणाचा वापर ब्रेड, सुप्स, बटर, दह्यासोबत केला जातो. हर्ब्सचा वापरही जेवणात बऱ्याच प्रमाणात दिसतो. बटाटा हा जर्मन खाद्यपदार्थांचा अविभाज्य घटक आहे. यामागे बटाट्याची वर्षभर असणारी उपलब्धता हे प्रमुख कारण. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा पदार्थ साठवून ठेवावे लागत असत, तेव्हा बटाटा महत्वाचा ठरत असे. बटाटा म्हणजे जर्मन भाषेत कार्टोफेल (kartoffel). बटाट्याचे सूप, बटाट्याचे सलाड (ज्यात बटाट्यासोबत बेकनपण असतं आणि नाव वाचून शाकाहारी माणूस हमखास फसतो), नुसते उकडलेले छोटे बटाटे आणि दही/काकडीची कोशिंबीर किंवा फिश, ओव्हनमध्ये बेक केलेला बटाटा आणि सोबतीला भाज्या (Folienkartoffeln), बटाट्याची रोस्टी, बटाट्याची प्युरी असे असंख्य प्रकार बटाट्यापासून बनवले जातात. फ्रेंच फ्राईज म्हणजेच जर्मन भाषेत पोमेस (Pommes) तर एवढ्या दिसतात की या प्रकाराला फ्रेंच फ़्राइज हे नाव चुकून पडले की काय असे वाटेल. स्ट्रीट फूड म्हणून तर अग्रेसर आहेतच पण बऱ्याच पदार्थांसोबत हे साईड डिश म्हणून सर्व्ह केले जातात.

बटाटा - बटाट्याचे सुप, चिप्स, बटाटा रोस्टी

.

शतावरी म्हणजेच इंग्रजीत Asparagus आणि जर्मन मध्ये Spargel (श्पार्गेल) हा साधारण एप्रिल ते जून दरम्यान जर्मन लोकांचा अत्यंत आवडता प्रकार. युरोपात मिळणारी ही शतावरी पांढर्या रंगाची असते. या पदार्थांसाठी खास भांडी पण मिळतात. पिझ्झापासून तर सुपपर्यंत कुठल्याही पदार्थासोबत श्पार्गेल खाल्ले जातात. रस्त्यावर छोट्याशा झोपडीवजा दुकानातून इथे श्पार्गेल मिळेल अशा अशा पाट्या दिसू लागतात आणि रेस्टॉरंटवालेही श्पार्गेलची जाहिरात करू लागतात. Schwetzingen हे एक गाव खास श्पार्गेलसाठी ओळखले जाते, तिथे Spargel festival देखील साजरा केला जातो. इथल्या राजवाड्याच्या बाहेर या लोकांचे शतावरी प्रेम दाखवणारे हे शिल्प शहराची ओळख सार्थ ठरवते.

श्पार्गेल आणि श्वेट्झिंगेन या गावातले शिल्प

.

दुध, दही, योगर्ट, ताक, चीज हे सगळेच दुग्धजन्य पदार्थ जर्मन लोकांसाठी आवडीचे आणि भरपूर वापर असणारे पदार्थ. कुठल्याही ग्रोसरी शॉप मध्ये या सगळ्याचे एवढे प्रकार दिसतात की आपण हरखून जातो. ब्रेड मध्ये स्लाईस चीज, बेकिंगसाठी चीज, पिझ्झा, पास्ता यासाठी वापरले जाणारे चीज, गोड पदार्थांमध्ये वापरले जाणारे चीज असे हजारो प्रकार. स्वित्झर्लंड आणि हॉलंड हे दोन शेजारी देश चीज उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने तेथून बहुतेक प्रकार आयात होतात. दही, क्रीम, योगर्ट या सगळ्याचाच सढळ हस्ते वापर होताना दिसतो. चीज केक ही एक स्विस जर्मन खासियत. डेअरी प्रोडक्ट्स मधलाच अजून एक खास जर्मन प्रकार म्हणजे क्वार्क, आपला चक्का. या क्वार्कचा वापर करून काही चीज केक, पुडिंग बनवले जातात.

गोड पदार्थांमध्ये अर्थातच केक सावाधिक लोकप्रिय आहे. केक व्यतिरीक्त इतरही अनेक गोड पदार्थ जर्मन लोक आवडीने खातात. रव्यापासून बनवले जाणारे पुडिंग, फळांचे पुडिंग, मिल्कराइस, फ्रुटयोगर्ट, चॉकलेटस, आईस्क्रीम, जेली किंवा जॅम वापरून केलेले ब्रेडचे प्रकार अशी न संपणारी यादी होऊ शकते. आपले गोड पदार्थ हे जर्मन लोकांच्या मते खूप जास्त गोड असतात आणि मिल्कराइस म्हणजेच तांदळाची खीर जेव्हा लोक नुसते जेवण म्हणूनही खातात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. काजू, पिस्ते, अक्रोड, जर्दाळू, बदाम हे सुक्या मेव्याचे सगळेच प्रकार जर्मनीत आवडीने खाल्ले जातात. ब्रेड, केक मध्ये, म्युसली किंवा योगर्टसोबत, डेझर्टवर सजावट करण्यासाठी अशा अनेक प्रकारे याचा वापर होतो. बदाम म्हणजेच Mandeln हा तर जर्मन घरात नेहमी असायलाच हवा असा पदार्थ. बदामाची पूड वापरून बनवलेले विविध केक्स ही जर्मन बेकिंगची खासियत. मार्त्सिपान (Marzipan) म्हणजेच बदामपूड आणि साखरेपासून केलेला पदार्थ पण जर्मन खाद्यसंस्कृतीत आपले स्वतःची ओळख ठेवून आहे. केकवर, लहान मिठाई म्हणून, मार्त्सिपानची कल्पक सजावट केली जाते. जर्मन बेकिंग, कुकिंग, सलाड ड्रेसिंग, ब्रेडसाठी स्प्रेड अशा विविध स्वरुपात गोड म्हणून बरेचदा मध वापरले जाते. कॉफीत साखरे ऐवजी मध घेणे ही तर अनेक जर्मन लोकांची नित्याची बाब. चॉकलेट हा पण जर्मन लोकांच्या अत्यंत आवडीचा प्रकार. कुठल्याही सुपरमार्केटमध्ये हजारो पकारचे चॉकलेट्सचे प्रकार दिसतातच. शिवाय बेकिंग, चॉकलेट् पुडिंग, आइसक्रीम, चॉकलेट मुस, सजावटीसाठी अशा विविध प्रकारे चॉकलेटचा वापर होतो. चेरी रम किंवा अजुन काही प्रकारची लिकर चॉकलेट्स देखील प्रसिद्ध आहेत.

गोड पदार्थ - बेकिंग केलेले पदार्थ, Apfelstrudel (अ‍ॅपल पायचा प्रकार)

.

उन्हाळा सुरु झाला की, खरंतर वसंत ऋतूपासूनच आईस्क्रीमची दुकाने ग्राहकांनी सजू लागतात, सलग ४-६ महिन्यांच्या हिवाळ्यानंतर जेव्हा पहिल्यांदा सूर्य प्रसन्न होऊन दर्शन देतो, तेव्हा सगळे लोक अत्यंत उत्साहाने बाहेर पडतात आणि ही दुकाने त्यांचे तेवढ्याच उत्साहाने स्वागत करतात. मुख्यत्वे इटालियन आईस्क्रीम जर्मन लोकांचे आवडते असल्याने तिथे सर्वाधिक गर्दी असते. चौकाचौकात असलेल्या या दुकानात बसून किंवा आईस्क्रीम सोबत घेऊन चालताना असंख्य लोक दिसू लागतात आणि हे पुढे उन्हाळाभर अनुभवायला मिळतं.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारी विविध प्रकारची फळे खाणे हा जणू एखादा उत्सव असतो. स्ट्रॉबेरीज्, ब्लुबेरीज्, रासबेरीज्, चेरीज् (किर्शेन), कलिंगड, खरबूज अशी विविध फळे बाजारात दिसू लागतात. शेतांमधून बेरीपिकिंगच्या जाहिराती दिसू लागतात. लोक उत्साहाने, विशेषतः लहान मुलांना घेऊन या बेरीपीकिंगला जाण्यास सुरुवात होते. वसंत ऋतू सुरु झाला की हळूहळू रस्त्यांवर स्ट्रॉबेरीजची दुकाने दिसू लागतात. तेही अर्थात जर्मन पद्धतीने, सुरुवातीला फक्त दुकाने उभारली जातील, मग महिनाभराने खऱ्या अर्थाने ती उघडतील आणि. रस्त्यावर मधूनच एखादी पाटी दिसते आणि मग लगेच तिथे गाडी थांबवली जाते. फळांपासून बनवलेले केक, फळे वापरून केलेले क्रेप्स, केकवर सजावटीसाठी फळे, फ्रुट सलाड, विविध फ्रुट पुडिंग आणि डेझर्ट हे सगळे बघितले की फळांच्या पदार्थातले वैविध्य दिसून येते. फळांचा भरपूर वापर जर्मन लोकांच्या रोजच्या जीवनात दिसून येतो. विशेषतः डोंगरात भटकताना बहुतांशी लोकांकडे खायला सोपी आणि उर्जा देणारी असल्याने फळे ही असतातच. फळांपासून अनेक प्रकारचे जॅम, जेली, मार्मालाड असे प्रकार केले जातात. ब्रेडसोबत मध आणि फ्रुट जेली, जॅम हा नाश्ता म्हणून नेहमी खाल्ला जाणारा प्रकार आहे. सफरचंद, द्राक्ष, पपई, संत्री अशी फळे आणि त्यांचे ज्यूस, स्मुदी हेही वर्षभर आवडीने केले जातात.

जर्मनीत बिअर पाण्यासारखी प्यायली जाते हे बहुतेकांनी ऐकले असते. ऑक्टोबर महिन्याच्या आसपास जर्मनीत येणारा माणूस हा म्युनिकचा बिअर फेस्टिवल चुकवत नाहीच. खास त्यासाठी येणारे देशोदेशीचे लोकही आहेत. या सोहळ्यामागेही रोचक इतिहास आहे. इस.१८१० मध्ये बव्हेरियाचा राजपुत्र लुडविक आणि साक्सनची राजकन्या थेरेसा यांच्या विवाहाच्या मेजवानी प्रित्यर्थ १२ ते १७ ऑक्टोबर असा पहिल्यांदा हा सोहळा झाला. घोड्यांच्या शर्यतीने त्याची सांगता झाली तेव्हापासून आजतागायत म्युनिकचा ऑक्टोबर फेस्ट त्याचे वैशिष्ठ्य टिकवून आहे. पुढे मात्र ऑक्टोबर मधल्या थंडगार हिवाळ्यात याचा आस्वाद घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता तो सप्टेंबरच्या शेवटून दुसर्‍या शनिवारी सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो. जर १ किवा २ ऑक्टोबरला शनिवार/रविवार आला तर ३ ऑक्टोबरच्या पूर्व पश्चिम एकत्रीकरणाच्या सुट्टीची संधी साधून एक दिवस लांबवतात. ज्या पेल्यातून बिअर देतात त्याला मास म्हणतात. हा मास म्हणजे १ लिटरचा जंबो जगच असतो आणि तंबूत काम करण्यासाठी एका हातात ५ आणि दुसर्‍या हातात ५ भरलेले मास धरून नेता आले पाहिजेत अशी अटच असते. फक्त म्युनिक मधल्याच ब्रुअरीजना या जत्रेत बिअरचे स्टॉल लावता येतात. सजवलेल्या घोडागाडीतून बिअरची पिंपे वाजतगाजत मिरवणूकीतून आणली जातात. मिरवणूकी मध्ये पारंपरिक बायरीश कपडे घालून लोक नाचत, गात असतात. 'दि विसन' म्हणजे खरं तर 'थेरेसिअनविसं'! हे विस्तीर्ण पटांगण राजकन्या थेरेसाच्या नावाने ओळखले जाते, त्याचे लघुरुप 'दि विसन' असेच बायरीश (बायर्न हे राज्य, आणि या भागातले लोक म्हणजे बायरीश) मंडळीत आणि आता सर्वत्रच प्रचलित आहे. आपले सर्कसचे तंबू असतात ना, तसे भव्य १४ तंबू या विस्तीर्ण पटांगणावर उभारले जातात. एकेका तंबूत ४, ५ हजार जणांची बसण्याची, खाण्यापिण्याची, नाचण्यागाण्याची सोय असते. ह्या तंबूंमध्ये फक्त म्युनशनच्याच ब्रुअरीज बिअर विकू शकतात. लॉवेन ब्राऊ, होफ ब्राऊहाऊस, ऑगस्टीनर ब्राऊ, पॉलानर ब्राऊ, हाकर शॉर आणि स्पानटेन यांच्या छावण्या असतात इथे! आणि यांच्या आजूबाजूलाही लहानमोठी पालं ठोकलेली असतात. तिथे वाईस वुर्ष्टच्या १ फूटी जंबो नळ्या, बुढ्ढीके बाल, बर्फाचे गोळे, पाकवलेले बदाम, लेबकुकन म्हणजे बायरीश खासियतीची लवंग,दालचिनीच्या स्वादाची मसाला बिस्किटे, भिरभिर्‍यांच्या गाड्या, जत्रेतले पाळणे, डोंबार्‍यांचे खेळ.. एक ना दोन अशा अनेक गोष्टींनी ही पालं फुललेली असतात आणि सानथोर सारेच जत्रेचा आनंद लुटत असतात. पण बसायला जागा नसेल तर 'खानपानसेवेचा' लाभ मिळत नाही.

म्युनिकच्या बिअरफेस्टिवलला जरी ऐतिहासिक महत्त्व असले तरी त्या सुमाराला गावागावातून ऑक्टोबर फेस्ट साजरे केले जातातच. आपापल्या गावच्या बिअरचा अभिमानी जर्मन माणूस न सापडणं विरळा! उत्तरेकडून दक्षिणेकडे जावे तसतशी बिअरमधली गोडी वाढत जाते. ४.२ % पासून ७.२ % पर्यंत अल्कोहोलचे प्रमाण, फर्मंटेशनसाठीचे यिस्टचे प्रमाण आणि मोसमाप्रमाणे ब्रुयिंगची पध्दतही थोडी थोडी बदलते. तर अल्कोहोल नसलेली बिअरही उपलब्ध असते. फळांच्या फ्लेवर्सचे बिअर राडलरही लोकप्रिय आहे. बार्ली, गहू, मका यापासून नॉर्मल, पिल्स्, ड्राफ्ट, क्रिस्टाल, डुंकेल, हर्बज घातलेली आल्टबिअर अशा वेगवेगळ्या २००० च्या वर प्रकारच्या बिअर जर्मनीत तयार होतात. विविध हर्ब्ज घातलेली काळपट रंगाची आल्टबिअर तर चक्क ज्यूसच्या पेल्यातून देतात तर गहू आणि यिस्ट वापरून केलेली हेफवायझन बिअर फुटबॉलचषकासारख्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या पेल्यातून देतात. गव्हापासूनच्या बिअरला गमतीने ही मंडळी 'फ्लुसिग ब्रोट' म्हणजे 'लिक्विड ब्रेड' म्हणतात.

बिअरपाठोपाठ वाईन हे आवडते पेय. फ्रान्स, इटलीला लागुन असलेल्या सीमाभागातील काही राज्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या त्या भागातील वाईन मग आपापल्या प्रदेशाची ओळख मिरवत असतात. ग्लुवाईन शिवाय नाताळ साजरा झाल्यासारखे वाटत नाही हेही खरेच. अ‍ॅपलज्युस ही पण जर्मनीची एक विशेष ओळख. वेगवेगळ्या फळांपासुन बनवण्यात आलेल्या लिकर पण आवडीने प्यायल्या जातात. मद्यपान ही जर्मन लोकांसाठी अत्यावश्यक बाब असली तरीही त्यातुन समाजाला अपायकारक होईल असे न वागणे याबाबत जर्मन काटेकोर आहेत. बिअरचा वापर अतिप्रमाणात असला तरीही व्हिस्की, व्होडका यांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. ज्यूस किंवा वाईनसोबत कार्बोनेटेड पाणी मिसळून केला जाणारा खास जर्मन प्रकार म्हणजे शोर्ल. (Schorle). अ‍ॅपलशोर्लं हे या सर्वात लोकप्रिय. पाण्याचा वापर इतर पेयांच्या तुलनेत कमी आहे आणि कार्बोनेटेड पाणी विशेष आवडीचे. कोकाकोला, फँटा, आइसटी ही बाटलीबंद शीतपेये जर्मन लोक पाण्यापेक्षा जास्त पितात ही अतिशयोक्ती नाही. कुठेही रेस्टॉरंट्समध्ये गेल्यानंतर पाणी विकतच घ्यावे लागते. आणि बहुतेक जर्मन लोक ज्यांना बिअर किंवा कुठलेही अल्कोहोल नको असेल तर ते हमखास ही शीतपेयेच घेतात. या पेयांचा रोज घरात होणारा वापरही तेवढाच आहे.

बिअरचे प्रकार, वाईन, अ‍ॅपल ज्युस/शोर्ल

.

वर्षभर इतरही वेगवेगळ्या निमित्ताने लोक एकत्र येत असतात आणि यात महत्वाचे असते ते सोबत खाणे पिणे. एप्रिलमध्ये वसंत ऋतूच्या सुरुवातीला सगळीकडे Frühlings fest म्हणजेच वसंतोत्सव साजरा केला जातो. थोडक्यात आपल्या जत्रेसारखं सगळं असतं, खाद्यपदार्थांची दुकानं असतात, बिअरचे तंबू असतात. यात प्रामुख्याने वुर्स्ट म्हणजेच सॉसेजेस, ब्रेडचे प्रकार, फ्रेंच फ्राईज, मश्रुम्स, असे प्रकार असतात. याच दरम्यान काही ठिकाणी कार्निव्हल असतो, तिथेही कमीअधिक प्रमाणात हेच दिसते. खाद्यपदार्थांच्या जोडीला इथेही कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकलेचे प्रकार असे खरेदीचेही भरपूर पर्याय असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला थंड बिअर सोबतच बरीच अल्कोहोलिक कॉकटेल देखील असतात, खास करून त्या त्या भागात मिळणाऱ्या फळांपासून बनवलेल्या लिकर जास्त दिसतात. उन्हाळा सुरु झाला की नदीकिनारी (सरकारने नियोजित केलेल्या जागीच, मनाप्रमाणे कुठल्याही ठिकाणी नाही), तळ्याकाठी, घरातील गार्डनमध्ये लोक एकत्र येउन ग्रिल करतात. दुकानांमध्येही ग्रिलचे सामान दिसू लागते. घराबाहेर आणि सूर्यप्रकाशात केवळ काही महिनेच मिळत असल्याने प्रत्येक जण ग्रिलचे बेत ठरवून कोळशावर भाजलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची ही संधी कुणीच सोडत नाही. सप्टेंबर-ऑक्टोबर मधले बिअर फेस्टिवल असतातच, त्याशिवाय पानगळीचा ऋतू सुरु होतानाही बरेच ठिकाणी Herbstmarkt भरतात. या सगळ्या मार्केट्स मध्ये दिसणारया वस्तू, खाद्यपदार्थ कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरीही लोकांनी एकत्र येणे, भेटणे हे उद्देश त्यातून सध्या होत असतात.

नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते. दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात. घराघरातून वाइनाक्ट्स गेबेक (नाताळचा फराळ) करायला सुरुवात होते आणि आपल्या कडे कसे लाडवासाठीचे बेसन भाजल्याचे वास दिवाळीच्या आधी सगळीकडून येतात, तसेच केक, बिस्किटांचे परिचित गोड वास जिन्यातून्, गल्लीतून यायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे आणि ष्टोलन सारखे केक नाताळफराळ म्हणून केले जातात. नाताळचे खास बाजार मैदानात, चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात. हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते. खाद्यपेयांचे गाळे तर ठिकठिकाणी असतात. तिथली गर्दी पाहून वाटतं ह्या लोकांच्या घरी स्वयंपाकघर आहे की नाही? खाण्यात मुख्य स्टॉल असतात वुर्ष्ट (Wurst) म्हणजे सॉसेजेसचे. अशा थंडीतही आइस्क्रीमच्या स्टॉलवर गर्दी असतेच. अनेक प्रकारचे बिअर आणि वाइन चे स्टॉल्स असतात. त्यातही नाताळच्या बाजारात मुख्य उठाव असतो तो ग्लु-वाइनला. रेड वाइन उकळवून त्यात विशिष्ट मसाले घालतात आणि कपातून गरम गरम पितात. इथली खासियत आहे 'एब्बेलवाय' म्हणजे ऍपलवाइन. ती ही लोक यावेळी गरम पितात. जर्मनीत 'सँटाक्लॉज' नाताळच्या दिवशी खाऊ देत नाही तर 'निकोलाऊस मान' मुलांना खाऊ पहिल्या आडव्हेंटच्या पहाटे देतो. आणि नाताळच्या भेटवस्तू 'वाईनाक्ट्स मान' आणतो. आपण जशी दिवाळीच्या फराळाची ताटं शेजाऱ्यांना,मित्रमंडळींना देतो तसे इथेही नाताळचे फराळ एकमेकांना देतात. पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या बाजारात ग्लुवाईन पार्ट्या सुरू होतात. हा सण जर्मनीत मुख्यत्वे कुटुंबाबरोबरच साजरा करतात. आपले आईवडील आणि भावंडांबरोबरच नाताळचा दिवस साजरा करण्याकडे सर्वांचा कल असतो. म्हणून बाकी मित्रमंडळींबरोबर पहिल्या आडव्हेंटनंतर मेजवान्या सुरू होतात. ऑफिसांतूनही नाताळमेजवानी आयोजित केली जाते.

कुठल्याही देशात खाद्यपदार्थ कुठल्या गावात जन्मला, कुणामुळे प्रसिद्धीस आला त्याप्रमाणे त्या त्या पदार्थाचे नाव त्या गावाशी, शहराशी जोडले जाते. जर्मनीतही अशी प्रत्येक गावाची, भागाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. फ्रांकफुर्टची खासियत म्हणजे सात हिरव्या हर्ब पासून बनवलेलं हे हिरवं सॉस (Frankfurter Grüne Soße - Green Sauce). ग्यॉथेची ही आवडती डिश. इस्टरच्या आधीच्या दिवशी म्हणजे ग्रुन डोनर्सटागला म्हणजेच होली/माँडी थर्स्टडेला हे खाण्याची प्रथा आहे. हे सॉस करण्यासाठी सात प्रकारचे हर्ब्ज लागतात ते या प्रमाणे - 7 krauter- Petersilie, Sauerampfer, Borretsch, Kerbel, Krese, Schnittlauch,Piminelle. म्हणजेच - parsley, sorrel, borago officinalis / borage, chervil, kress/cress/gardencress, chieves, pimpenella/salad burnet. बर्लिन या राजधानीच्या शहरातला आणि संपूर्ण जर्मनीत कुठल्याही बेकरीमध्ये दिसणारा असा हा बर्लिनर. १६व्या शतकातली ही डोनटसची जुनी रेसिपी बर्लिनमध्ये उगम पावली म्हणून नाव अर्थातच बर्लिनर (Berliner). जर्मनीभर हे बर्लिनर फानकुकन, पुफेल, बर्लिनर बालन (म्हणजे बर्लिनचे चेंडू), क्रापन, क्रेपेल अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिध्द आहेत. ६३ साली ह्या बर्लिनरनी एक धमाल उडवून दिली होती. प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी बर्लिनमध्ये आले असताना भाषणाची सुरुवात आणि शेवट त्यांनी झोकात जर्मन मध्ये केला. 'इष बिन बर्लिनर ' म्हणजे 'आय अ‍ॅम अ बर्लिनर' असे त्यांना म्हणायचे होते त्याऐवजी ते 'इष बिन आइन बर्लिनर' असे म्हणाले आणि एकच हशा उसळला कारण त्याचा अर्थ होता 'आय अ‍ॅम अ जेली डोनट (बर्लिनर)'! ड्रेस्डेन या पूर्वेकडील शहराची खासियत म्हणजे ष्टोलन (Stollen) म्हणजेच एक प्रकारचा फ्रुट केक. जर्मनीत सगळीकडेच हा नाताळ दरम्यान ड्रेस्डेनर ष्टोलन म्हणून दिसतो. दक्षिणेकडे असलेल्या बाडेन राज्याची खासियत म्हणजे Spätzle. बटाटा, चीज यापासून बनवलेल्या नुडल्स आणि वरून तळलेला कांदा. ब्लॅक फॉरेस्ट केक हा जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टमधला आणि जगभरात ख्याती असलेला केक. Maultaschen हा असाच बव्हेरिया/बाडेन वुर्टेंबेर्ग या राज्यातला प्रकार. चीज आणि पालक किंवा मांसाचा प्रकार याचे सारण भरुन केलेला पास्त्याचा प्रकार.

फ्रांकफुर्ट्चा ग्रीन सॉस, ड्रेस्डेनचा ष्टोलन केक, बर्लिनर, Spätzle, Maultaschen

.

युरोपच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जर्मनीच्या सीमारेषा दहा देशांशी जोडल्या आहेत. या प्रत्येक देशाच्या खाद्यसंस्कृतीचा परिणाम त्या त्या प्रांतात आढळतो, जो आता संपूर्ण जर्मनीतही पसरला आहे आणि बरेचदा जर्मन लोकांच्या खाद्यसंस्कृतीचाच एक भाग झाला आहे. अनेक तुर्किश लोक जर्मनीत वर्षानुवर्षे स्थायिक असल्या कारणाने त्यांची खाद्यसंस्कृती इथे प्रामुख्याने आढळते. तुर्किश ड्योनर/युफका म्हणजेच पोळी किंवा ब्रेड मध्ये रोल करून सलाड, चिकन आणि सोबतीला तुर्किश योगर्टचे ड्रेसिंग असे प्रकार खूप खाल्ले जातात. यासोबतीला तुर्किश मिठाया, बकलावा हे देखील प्रसिद्ध आहेत. फ्रान्स कडून मिळालेली देणगी म्हणजे क्रेप्स आणि राकलेट, क्रोझो. इटलीतील पिझ्झा आणि पास्ता, तिरामिसु सारखे गोड पदार्थ, हंगेरियन गुलाश, ऑस्ट्रियातील वूर्स्त असे प्रकार जर्मन लोकांच्या स्वयंपाकघरात होतात आणि रेस्टॉरंटमध्ये खायला मिळतात. युरोपीय देशांशिवाय मेक्सिकन, इंडियन, मध्य पूर्वेतील देश, ग्रीक पदार्थ. थाई, चायनीज हे देखील आवडीने खाल्ले जातात,

काफे उंड कुखेन (कॉफी आणि केक) हे जर्मन खाद्यसंस्कृतीचे असेच एक वैशिष्ट्य. खरंतर जर्मनी आणि बिअर हे समीकरण जगभरात एवढे प्रसिद्ध आहे की जेव्हा कॉफी हे जर्मनीत बिअर पेक्षा जास्त खपणारे पेय आहे हे समजते तेव्हा प्रत्येकाला आश्चर्य वाटतं. मित्र मंडळी, नातेवाईक यांना दुपारी भेटायचे असेल, ऑफिसमध्ये वाढदिवसाची, कुठलाही आनंद साजरा करण्यासाठी जर पार्टी असेल तर काफे उंड कुखेनच असणार. रविवार हा बहुतेकवेळा लोकांचा चर्चमध्ये जाऊन मग नंतर आई बाबांना भेटायला जाण्याचा दिवस असतो. आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी आजी खास केक बनवते आणि मग सगळे मिळून काफे उंड कुखेन चा आस्वाद घेतात. बाहेर गेल्यानंतर मात्र कॉफी घेताना कापुचिनो किंवा लाटे हेच त्यातल्या त्यात आपल्या भारतीय चवीशी मिळतेजुळते प्रकार. कारण जर्मनीत कॉफी असे सांगितले की मिळणारी कॉफी ही प्रचंड कडू आणि बिनदुधाची असते. आपल्याला हवे त्याप्रमाणे दुध आणि साखर घेणे शक्य असले तरीही तो मुळचा कडूपणा काही जात नाही. अशी ही कडू कॉफी दिवसातून दहा ते बारा कप रिचवणारे लोक जेव्हा दिसतात, तेव्हा आपल्याला नक्कीच नवल वाटते.

कॉफीच्या खालोखाल गरम पेयांमध्ये चहा देखील आवडीने प्यायला जातो. आपला उकळता वाफाळता दुधाचा चहा नाही, फक्त ब्लॅक टी. तुर्किश लोकांमुळे चाय हे नावपण जर्मनीत सहज वापरलं जातं. फ्रुट आणि फुलांपासून केलेले चहाचे प्रकार, ग्रीन टी हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

जर्मन लोकांची दिनचर्या ही लवकर निजे लवकर उठे अशी आहे आणि ती नवीन पिढीतही कटाक्षाने पाळली जाते. सकाळी कामाची सुरुवात अगदी लवकर म्हणजे ६ वाजल्यापासून ऑफिसला जाणारे लोक आहेत. नाश्ता हा जर्मन दिनचर्येचा न चुकवला जाणारा प्रकार. त्यातही भरपेट नाश्ता करून घराबाहेर पडायचे किंवा ऑफिसमध्ये ब्रेकफास्टसाठी १५ मिनिटे दिली जातात, त्यानंतर दुपारचे जेवण १२ ते १ च्या दरम्यान केले जाते. माह्लत्साईट (Mahlzeit) म्हणजे ही जेवणाची वेळ. Mahl म्हणजे जेवण आणि zeit म्हणजे वेळ. दुपारी जेवणाची वेळ झाली की सगळे जण Mahlzeit म्हणून उठतात आणि जेवायला जातात. यादरम्यान भेटणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हेल्लो किंवा हाय ऐवजी माह्लत्साईट म्हणण्याची पद्धत आहे. यामागे पूर्वीच्या काळी जेव्हा बहुतांशी लोक काम करायचे, तेव्हा त्यांना जेवणाची वेळ झाली हे सांगण्यासाठी अशी उद्घोषणा केली जायची. प्रत्येकाला माह्लत्साईट म्हणून लोक काम बंद करून उठतात पण जेवण म्हणजे साग्रसंगीत झालेच पाहिजे असा आग्रह दिसत नाही. जमले तर सलाड, मुख्य जेवण आणि काहीतरी गोड असे स्वरूप असते तर बरेचदा फक्त बेकरीतून ब्रेडचा एखादा प्रकार एवढेही असू शकते. रात्रीचे जेवण मात्र या लोकांचे अगदीच लवकर होते. संध्याकाळी ५:३० नंतर लोक जेवायला बसू शकतात. आणि रात्री ७-८ वाजता झोपूही शकतात. बाहेर फिरत असताना संध्याकाळच्या ५ वाजताही जेवण सर्व्ह केले जात असताना दिसते.

जर्मनीत राहात असताना अगदी पहिल्या दिवसापासून जर्मन खाद्यसंस्कृतीशी जुळवून घेताना कुठल्याही परकीय माणसाला नवीन नवीन अनुभव येत असतात. कधी त्यांच्या उत्तम पदार्थांचे कौतुक होते, तर कधी काही बेचव पदार्थ वाट्याला येतात आणि ते ठिकाण, तो देश किंवा ते बनवणारी व्यक्ती शिव्यांची धनी होते. पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील असे पदार्थ कायमस्वरूपी ठसा उमटवून जातात आणि नकळतपणे आपल्याही खाण्यात येऊ लागतात. भारतीयांना येणारी मुख्य अडचण असते ती शाकाहारी पदार्थांची कमी उपलब्धता आणि बाहेर कुठेही गेलो तरी मिळणारे फक्त ब्रेड, चीज हे पदार्थ. शिवाय मांसाहारी पदार्थानाही मसाले नसल्याने ते आवडतीलच असे नाही. कडू कॉफी आणि ब्लॅक किंवा फ्लेवर्ड टी हे सुद्धा सुरुवातीला अडचणीत टाकणारे पदार्थ. पण त्यातूनही जुळवून घ्यायची सवय होत जाते. उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून मग त्याला भारतीय टच कसा देता येईल याचा विचार करून कधी नवीन प्रयोगही केले जातात, कुठल्याही पदार्थाशी मिळतेजुळते असे आपल्याकडे मिळणारे पदार्थ आठवले की मग त्या पदार्थाशी अजून नवीन नाते जुळते. आठवडी बाजार, ग्रोसरी शॉप्स, रेस्टॉरंट्स, ऑफिस किंवा युनिव्हर्सिटीतील कँटीन, जर्मन लोकांशी होणारा संवाद, या सगळ्यातून आपली त्या देशातील खाद्यसंस्कृतीशी ओळख होत जाते. ती विकसित होण्यामागे काय कारणे असू शकतात, ऋतूबदलाप्रमाणे कसे बदल होतात, भागोलिक परिस्थितीचा, इतिहासातील घटनांचा यावर झालेला परिणाम हे मग हळूहळू उमगत जाते. तसेच हे आमचे जर्मनीतील अनुभव थोडक्यात या लेखातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.
प्रोस्ट आणि गुटेन आपेटिट!! (Prost und Guten Apetit - cheers and Enjoy your meal!)

लेखिका -
स्वाती दिनेश आणि मधुरा देशपांडे

तळटीप -
१. फोटो विकिपीडिया/आंतरजालावरून साभार

२. मिसळपाववर पूर्वी प्रकाशित केलेल्या काही जर्मन पाककृती:
ग्लु वाईन
नाताळचा फराळ
फ्रांकफुर्टर ग्रुनसॉसं
आफेलकुकन अर्थात ऍप्पल केक
वाइनक्रीम
झित्रोन कुकन- लेमन केक
बेअरलाऊख पेस्टो व पास्ता
मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप
Gewürzter Honig Kuchen

प्रतिक्रिया

नंदन's picture

16 Oct 2015 - 10:59 am | नंदन

जर्मन खाद्यसंस्कृतीची ओळख आवडली. (आमच्या आवडत्या 'राकलेट'चा केवळ ओझरता उल्लेख केल्याबद्दल मात्र किंचित निषेध! :))

अमृत's picture

16 Oct 2015 - 11:16 am | अमृत

माहितीपूर्ण लेख व सुरेख शब्दांकन.

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 12:36 pm | वेल्लाभट

पहिल्या परिच्छेदातच जे वाचक म्हणून माझ विमान जर्मनीत लँड झालं, ते अजून परत उडलंच नाहीये. अमेझिंग ! सिंपली अमेझिंग. युरोप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि जर्मनीची ही ओळख वाचून जर्मनी अनुभवण्याची ओढ वाढलेली आहे.
wollen Deutschland eines Tages besuchen
(सौजन्यः गूगल ट्रान्सलेटर)

स्रुजा's picture

18 Oct 2015 - 8:07 pm | स्रुजा

अगदी अगदी ! स्पार्क्लिंग पाण्याचा अनुभव २०१० साली घेतला आहे फ्रँकफर्ट वर. बाहेर सगळीकडे हे असलंच पाणी देत असले तर काय घ्या या विचाराने पण घाम फुटला होता. जर्मनी बद्दल कुतुहल होतंच ते शमवता शमवता तुम्ही अजुन वाढवलं आहे, आता या लेखाचा जर्मनी दौर्‍यात ( जेंव्हा योग असेल तेंव्हा) नक्की उपयोग होईल. खुप अभ्यासपुर्ण लेख.

अनन्न्या's picture

16 Oct 2015 - 5:17 pm | अनन्न्या

दुसय्रा देशांच्या खाद्य संस्कृतीबद्दल खूप उत्सुकता असते, फोटोंसह असल्याने अजून रंजक वाटतेय.

स्वातीताई व मधुरा, अत्यंत माहितीपूर्ण लेख झाले आहे. भरपूर गोष्टी समजल्या. हे सगळे वाचूनही आपल्या भारतीय मनाला प्रश्न पडतोच. "एवढा ब्रेड कसा बुवा खातात?"

भन्नाट लेख आहे,आवडला बुवा :)

अस्सल जर्मन खाद्यसंस्कृतीची ओळख झाली!

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:18 pm | कविता१९७८

वाह , काय एकेक पदार्थ आहेत, जर्मन संस्र्कुतीची छान ओळख करुन दिलीस.

इडली डोसा's picture

16 Oct 2015 - 10:44 pm | इडली डोसा

एक से बढकर एक फोटो आहेत. लेख निवांत झाल्यावर नक्की वाचणार.

पैसा's picture

17 Oct 2015 - 12:06 am | पैसा

मनोरंजक आणि तेवढेच माहितीपूर्ण! मस्त लिहिलेय दोघींनी! १०- १२ कप कॉफी? झोप कशी येते मग?

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 3:27 am | सानिकास्वप्निल

स्वातीताई आणि मधुरे अप्रतिम झालाय लेख.
जर्मन खाद्यसंस्कृतीबद्दल बरीच माहिती मिळाली. पाण्याचा अनुभव आमच्या जर्मन क्विक व्हिझिट दरम्यान आला होता, सुदैवाने तेव्हा टुरमध्ये असल्यामुळे टुर गाईडने समजावून सांगितले होते कोणते पाणी घ्यायचे ते :)

बीयर फेस्टबद्दल ऐकून होते पण इथे तपशीलवार वाचायला मिळाले. ग्लुवाईनची पाकृ स्वातीताईची मागे मिपावर वाचली होती, त्यासारखी मल्ड वाईन ही अत्यंत आवडती आहे त्यामुळे ग्लुवाईन ही नक्की आवडेल याची खात्री आहे ;)

अतिशय नेटके व माहितीपूर्ण लिखाण आहे, तुम्ही घेतलेली मेहनत या उत्तम लेखात दिसून येतेय :)
धन्यवाद __/\__

प्रीत-मोहर's picture

17 Oct 2015 - 9:30 am | प्रीत-मोहर

मस्त झालाय ग. इतकी काफी काफी होत नाही का?
थंडीच्या दिवसात चालत असेल हो ना?

प्रीत-मोहर's picture

17 Oct 2015 - 9:30 am | प्रीत-मोहर

मस्त झालाय ग. इतकी काफी काफी होत नाही का?
थंडीच्या दिवसात चालत असेल हो ना?

प्रश्नलंका's picture

17 Oct 2015 - 3:43 pm | प्रश्नलंका

नुकताच जर्मनी प्रवास करून आल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अनुभवाशी प्रचंड सहमत. साधं पाणीच मिळाले नव्हते लौकर. बाकी लेख उत्तम मस्त माहिती

सस्नेह's picture

17 Oct 2015 - 4:17 pm | सस्नेह

जर्मनीत मसालेदार खाणे जवळजवळ नाहीच, असे जाणवले.

जर्मन खाद्यसंस्कृती आवडली.तुमचा अभ्यासही जाणवला लेखात.

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 9:10 pm | नूतन सावंत

ऐतिहाकिक लेख.जर्मनीत जाणाऱ्या प्रत्येकाने हा लेख वाचला पाहिजे,त्याला खूप मदत होईल.स्वाती, मधुरा, खूप अभ्यास करून तुम्ही लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख वाचून मलाही जर्मनीची झलक अनुभवता आली.प्रकाशचित्रेही सरस आहेत.

जुइ's picture

18 Oct 2015 - 8:42 am | जुइ

जर्मन खाद्यसंस्कृतीबद्दल चांगली माहिती संकलित केली आहे.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:25 pm | प्यारे१

+१

असेच म्हणतो.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 1:31 pm | मांत्रिक

उत्तम लेख! अगदी माहितीपूर्ण आहे. जर्मन शब्द, काही विशिष्ट घटनांचा इतिहास, सामाजिक सांस्कृतिक समजुती अशी सर्व माहिती दिल्याने अगदी उत्त्म झालेला आहे लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर्मन खाद्यसंस्कृतीची भन्नाट झंझावाती ओळख !

इतक्या कमी शब्दांत इतकी माहिती ठासून भरण्याच्या... आणि तेही कुठेही कुतुहल कमी न येऊ देता करण्याच्या... कौशल्याची विषेश नोंद !

आता मला भूक लागली, त्याचं काय ???????????????????

मनिमौ's picture

18 Oct 2015 - 6:46 pm | मनिमौ

तुम्हा दोघीन्चे कष्ट अभ्यासही जाणवला लेखात.

स्वातीताई आणि मधुरा, खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.
जर्मनीच्या खाद्यशैलीबद्दल संपूर्ण आणि रोचक माहिती.

ह्या लेखामगची तुमची मेहनत अगदी जाणवते आहे ☺

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2015 - 9:26 pm | प्रभाकर पेठकर

मस्त अभ्यासपूर्ण लेख. धावत पळत वाचला. आता पुन्हा एकदा निवांत वाचेन(च).

कडू कॉफीचा रंजक(?) अनुभव अमेरिकेत घेतला आहे. कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर मुंबईतल्या रेल्वेस्टेशनवरील एस्प्रेसो कॉफीची स्मृती जागवून, एस्प्रेसो मागवली तर ती अगदी एका छोट्याशा ग्लासात (ब्रँडी शॉट प्रमाणे) काळी ठिक्कर कॉफी समोर आली. मुर्खासारखं त्यावर दूध मागितल्यावर त्या बालीकेने केलेला चेहरा कॉफीपेक्षाही कडवट होता. तेंव्हा पासून कॅपुचिनो आणि लाटे ह्या पलीकडे जात नाही.

ग्लुवाईनची पाकृ स्वातीताईची मागे मिपावर वाचली होती.

मी तर इथे ती ग्ल्हू वाईन स्वातीच्या पाककृती बरहुकूम बनविली सुद्धा होती सर्वांना भारी आवडली होती. पण इटलीत जी ग्ल्हू वाईन मिळाली होती ती बरीच पाणचट होती.

निनाद बरोबर म्युनिच मध्ये बिअर आस्वादली आहे. पण जर्मनांइतका आपला स्टॅमिना नसतो. असो.

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:06 pm | सामान्य वाचक

das ist ein wunderbarer Beitrag.
Ich mag Kartoffelpuffer.

अत्यंत माहितीपूर्ण लेख

जर्मन खाद्यसंस्कृतीची रोचक ओळख!

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2015 - 12:13 pm | पिलीयन रायडर

काय सुंदर लेख झालाय ग हा!! मधुरा आणि स्वाती ताई म्हणजे काही प्रश्नच नाही.. पण खरंच अपेक्षेपेक्षा फार उच्च.. दर्जा वगैरे लेख झालाय...

जर्मनीला नक्कीच येणार.. तेव्हा हा लेख प्रिंट मारुन आणणार!

जर्मन खाद्यसंस्कृतीची तोंडओळख प्रा. अविनाश बिनिवाले यांच्या 'गरुडांच्या देशात' या पुस्तकात झाली होती. आज अजून बरीच माहिती मिळाली. बादवे, 'ससा' नावाचा एक केकसदृश्य पदार्थ असतो आणि तो वाइसवाइन सोबत मस्त लागतो असे त्यात वाचले होते. काय असतो हा पदार्थ?

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 3:21 pm | बॅटमॅन

या तोकड्या लेखाने आमच्या खाद्यभावना चाळवल्याचा निषेध!!!

अता याचे करावे काय, तेही तुम्हीच सांगा.

स्वच्छंदी_मनोज's picture

20 Oct 2015 - 7:22 pm | स्वच्छंदी_मनोज

जर्मन खाद्यसंस्कृतीची अगदी डिट्टेल्वार ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मस्तच जमला आहे हा लेख.

गेली अनेक वर्षे जर्मन्सबरोबर काम करताना आणी जर्मनीला गेलो की त्यांचाबरोबर राहताना ह्या सगळ्या खाद्यसंस्कृतीची अगदी जवळून ओळख झाली आहे. कामाच्या स्वरुपामुळे म्युनीक ते हँम्बुर्ग आणी बर्लीन ते ड्युसल्डोर्फ फिरलोय आणी सर्व प्रकारचे जर्मन क्युझीन खाल्ले आहे. कामाला पक्का असणार जर्मन जेवणाची वेळ झाली की काम सोडून जेवायचा ब्रेक घेतो हेही अनुभवले आहे.

एक दोनदा नव्हे तर अनेकदा जर्मन घरामधे अगदी टिपीकल जर्मन जेवण घ्यायचा योग आला आहे आणी जर्मन्सदेखील घरच्या जेवणाबद्दल कुटुंबवत्सल आहेत, एक जेवणतरी सगळ्या कुटुंबाने एकत्र घेतले पाहीजे ह्यावर विश्वास ठेवून आहेत हे जाणवले. अगदी आपल्यासारखेच एकत्र जेवणाच्यावेळी कुटुंबप्रमुख घरातल्या सर्वांची चौकशी करतो आणी घरातले मोठे आणी जाणते लोक सर्वजण व्यवस्थीत जेवताहेत की नाही ह्यावर नजर ठेवून आणी प्रेमाचा आग्रह करत असतात. एका जर्मन स्वीस बॉर्डर घरी (गाव: सिंगेन) कंपनी कलीगच्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याप्रसंगी मी तिथे होतो. कलीगच्या बायकोचे लहानपण ब्लॅकफॉरेस्ट भागात गेले होते. त्या वाढदिवशी तिचे आई बाबा (वय वर्ष ७५ आणी ८०) तिच्या बहीणी सोबत आले होते. ह्या आईने स्वहस्ते मुलीसाठी खास टिपीकल ब्लॅक फॉरेस्टवाल केक केला होता आणी एक तिच्यावर एक कवीता केली होती (कारण तो तिचा ५०वा वाढदिवस होता). ती कवीता म्हणताना आणी वाढदिवस साजरा करताना आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते. ह्यावरून खात्रीच पटली की जर्मन्स वरून कितिही रुक्ष वाटतात किंवा दिसतात तरी आत मुळात ते कुटंबप्रधान आहेत आणी कुठेतरी ही कुटंबव्यवस्था तुटते आहे ह्याचे त्यालाही दु:ख आहे.

पण असे असले तरी वरती नंदन ने म्हटल्याप्रमाणे आमच्या खास आवड्तीच्या राकलेट आणी चीज फोंड्यू चा नगण्य उल्लेख केल्याबद्दल किंचीत निशेध :)
राकलेट आणी फोंड्यू बद्दल विशेष आठवणी आहेत. र्‍हाईननदीकाठी आणी लेक काँस्टांन्झ काठी घर असलेल्या आमच्या काही कलीगच्या घरी बाहेर कडाकाच्या थंडीत आणी बर्फ पडत असतानाहे हे दोन्ही पदार्थ व्हाईट वाईनबरोबर घरगुती गप्पा मारत भरपूर वेळा खाल्ले आहे. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ माझ्या खास आवडीचे.

स्वाती ताई आणि मधुरा मस्तच झालय लेख.
करी वुर्स्ट आणि ब्लॅक फॉरेस्ट केक माझे फेवरेट. ह्या डिसेंबर मधे जर्मनीला यायचा प्लॅन होता, पण भारतवारी ठरवल्यामुळे आता पुढच्या वर्षी नक्की.

मस्त्त ओळख करुन दिलीत.ब्रेड ,केक, आइस्क्रिम सगळीच वर्णन आवडली.नाताळचे तर विशेष आवडले.एकदा तरी युरोपातला नाताळ अनुभवायचाय याची जाणीव झाली.

भिंगरी's picture

22 Oct 2015 - 1:04 am | भिंगरी

खाद्य संस्कृतीचा अभ्यास दांडगा आहे मधुरा तुझा.
फोटूही मस्त.

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2015 - 3:18 am | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार! हा लेख लिहिण्याच्या निमित्त्याने आम्हालाही काही गोष्टी नवीन कळल्या, त्यातुन या खाद्यसंस्कृतीची अजुन वेगळी ओळख झाली.
@स्वच्छंदी_मनोज - सविस्तर प्रतिसादाबद्दल विशेष आभार
@एस, तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही, असा पदार्थ अजुन ऐकला नाही. शोध घेऊन सांगते लवकरच.

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2015 - 11:05 am | स्वाती दिनेश

सर्वांना धन्यवाद.
जेव्हा जर्मन खाद्य संस्कृती बद्दल लेख लिहायचा ठरलं तेव्हा सर्वात आधी मला श्रामोंची आठवण झाली, त्यांनी मला ह्या विषयावर काही लिही असा आग्रह केला होता पण विषयाचा मोठा आवाका आणि माझा आळस ह्या दोन्हींमुळे ते तेवढ्यावरच राहिले. मग जेव्हा रुची अंकाची कल्पना आणि हा विषय परत एकदा समोर आला तेव्हा मात्र आता तरी ह्यावर लेख लिहायचाच असा विचार घोळायला लागला डोक्यात. जेव्हा मी आणि मधुराने एकत्रित काम करूया हे ठरवलं तेव्हा मग दोघीही पॅरलली कामाला लागलो. फोन, मेसेज, मेल्स,व्य नि आणि प्रत्यक्ष भेटीत मग एकमेकींना अपडेट्स देत गेलो आणि मग लेखाचे हे स्वरुप तयार झाले. तुम्हा सर्वांना ते आवडल्याचे पाहून छान वाटत आहे.
स्वाती

मोहनराव's picture

22 Oct 2015 - 3:21 pm | मोहनराव

लेख फारच उत्तम झालेला आहे.
प्रोस्ट आणि गुटेन आपेटिट!!

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 7:12 pm | बोका-ए-आझम

Hamburger, Frankfurter ही नावं बहुतेक त्या त्या शहरांच्या नावावरून आली असावीत.

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 7:14 pm | स्वाती दिनेश

बर्लिनर सुध्दा..

टक्कू's picture

23 Oct 2015 - 12:58 am | टक्कू

जर्मन खाद्यसंस्कृतीशी झालेली ओळख फार आवडली. लेख वाचून आता जर्मन सुद्धा विश लिस्ट वर आणले.
इतके सविस्तर लिखाण केल्यबद्दल धन्यवाद!

अनुप ढेरे's picture

23 Oct 2015 - 10:58 am | अनुप ढेरे

मस्तं!

विशाखा पाटील's picture

24 Oct 2015 - 9:17 am | विशाखा पाटील

सुरेख लेख!

मितान's picture

24 Oct 2015 - 10:06 am | मितान

अप्रतिम लेख! !!
माझ्या जर्मन मित्रांना वाचता आला तर काय बहार! !!

जियो , मस्त मस्त झालाय लेख :)

उमा @ मिपा's picture

30 Oct 2015 - 11:00 am | उमा @ मिपा

तुम्हा दोघींचं खूप खूप कौतुक, अतिशय अभ्यासपूर्ण लेख, बरीच नवीन, रोचक माहिती मिळाली. फोटो तर अमेझिंग!

पण...

ह्या लेखाला वाचनखूण का नाही?

असे म्हणून निषेध नोंदवतो.

पिशी अबोली's picture

4 Nov 2015 - 12:40 pm | पिशी अबोली

अप्रतिम आणि माहितीपूर्ण..