क्रोशायार्न

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in विशेष
8 Mar 2015 - 1:50 am
महिला दिन

.

अगदी लहानपणापासून ह्या कलेचं अप्रुप वाटे मला. एका हुकाने / सूईने कशी काय लोकर विणून छान-छान वस्तू बनवता येते असा प्रश्न पडे. माझी आई कला-निपूण .शिवणकाम, भरतकाम, टॅटिंग, क्रोशा, मण्यांपासून तोरणं, प्राणी-पक्षीबनवणे, अगदी पॅचवर्क करुन तिने एयर इंडियाचा महाराजा तयार केला व ते वर्क कापडावर शिवून त्याचा पडदा तयार केला होता __/\__ .

ती शिक्षिका होती त्यामुळे दुपारी शाळेतून घरी आल्यावर सवड असेल तर काही ना काही सुरु असायचं विणकाम, क्रोशावगैरे. मला हे सगळं बघण्यातच रस असायचा, आपली उडी फार-फार तर चित्रकलेपर्यंतच. सुट्टीत गावी गेल्यावरसुद्धा आजी, आई, मावश्या त्यांच्या फावल्या वेळात काही ना काही वीणत असायच्या . आजी माझी सुरेख क्रोशा काम करत असे, छोटेछोटे रुमाल, तोरण, टोप्या, बाळांसाठी मोजे अगदी सफाईने करत असे. ती तर क्रोशासाठी वापरला जाणार्‍या दोर्‍यचे विणकाम करे, अगदी नाजूक, नक्षीदार, सुंदर!!

मला सुद्धा हे शिकायचे असे मनात खुपदा विचार येई पण त्यातले अजिबातच काही येत नाही, माहिती नाही, अगदीच तिसरीत वगैरे असेन मी. त्या रंगीत दोर्याचे, लोकरीचे गुंडे बघून खूप छान वाटायचं, त्या लोकरीचा मऊ-मऊ स्पर्श, कसं त्या एका हुकाने विणून त्या लोकरीपासून कमालीच्या मस्तं वस्तु तयार होत ह्याचे नवल वाटे.

मला आठवतंय माझी आई ताटावर ठेवायचा रुमाल बनवत होती. ती ते करायला बसली की मी तिच्यापुढ्यात जाऊन नुसती ते बघत बसे. भरभर तिची बोटं चालत, सरसर लोकर गुंफली जाई आणि उठवदार नक्षी तयार होई, जाम मौज वाटे. एकदा झालं काय आई दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेली होती, मी लगेच संधीचा सदुपयोग करायचे ठरवले. आज आपण क्रोशा करुन बघायचेच्, हातात लोकर व हुक घेऊन काहीबाही करण्याचा प्रयत्न केला, अर्थात ते चुकत गेलं , कुठल्या लूपमधून लोकर घ्यायची व कुठे विणायची मला काही समजेना त्यामुळे मी सगळी विण सोडून पुन्हा विणायचा प्रयत्न करत होते. शेवटी काही होईना पुढ्यात लोकरीचा पसारा आणि विणलेला रुमाल अगदी उलगडून पडला होता. खूप रडू आलं, भितीही वाटली आता आपले काही खरं नाही, आईचा ओरडा नक्की आता, तसेच झाले आई आल्यावर पाठीत एक जोराचा धपाटा मिळाला मग काय पुन्हा क्रोशाच्या हुकला आणि लोकरीला हात लावायची हिम्मत झाली नाही.

पुढे शाळेत हस्तकलेच्या तासाला कुत्र्याचे चित्र असलेल्या मॅटवर क्रॉस स्टिच करायचे शिकवले होते. ते कसेबसे, कंटाळत केले कारण त्यात इंटरेस्ट अजिबातच नव्हता, थोडे ताईकडून, थोडं आईकडून (ओरडा खात) करून ते पूर्ण केले. अजूनही मनात क्रोशा यायला पाहिजे असेच होते. एकदा उत्सुकता, सराव म्हणून मी चक्क खराट्याची काडी मोडून त्याला दोरा गुंडाळून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता! , अर्थातच एन्डरिझल्ट शुन्य. काहीच तयार होत नव्हतं गुंताशिवाय :(

मे महिन्याच्या सुट्टीत आईला शिकवायला सांगितले . तिने बेसिक साखळी कशी करायची शिकवली , मग मला ते जमतच नाही म्हणून मी नाराज झाले आणि मग मात्र माझे पेशंस संपले व थयथयाट करून, चिडून मी ते फेकून दिले. पुढेशाळा, कॉलेज, नोकरीमुळे पुन्हा कधी क्रोशा शिकू असे वाटलेच नाही.

एकदा मैत्रीणी सोबत बोलता-बोलता समजले की तिने क्रोशा शिकायला सुरुवात केली आहे , झालं इतकी वर्ष मनात दडलेली क्रोशा शिकण्याची इच्छा उफाळून वर आली आणि हिलाही येतं आणि मला नाही असे विचार डोक्यात भुणभुणू लागले, आता क्रोशा यायलाच पाहिजे म्हणून माझं अतंर्मन जोर-जोरात ओरडू लागले. मी थेट तिलाच विचारले बाई गं मलाही शिकवना प्लिज, मैत्रीणीने होकार दिला व आमच्या क्रोशा शिकवणीचा तास सुरु झाला. तिने आधी स्लिप नॉटपासून सुरुवात केली, अर्र्र्र्ररर!! तिथेच घोडं अडलं माझं, आता ते लोकर त्या गाठीसाठी कुठल्या लूपमधून काढायची हेच मी चार वेळा बघितले तरीही येईना, मग तिने बोटावर लोकर ठेवून अगदी हळुवार हुक त्यात घालून , समजावून सांगितले, मी तसेच हळू-हळू केले तर मला ती स्लिपनॉट आली चक्क (सुपरएक्सायटेड). हुश्श्श्श् ! हे तर जमलं कसंबसं !!

पुढे आली साखळी , ह्या साखळीमुळे लहानपणी घातलेला गोंधळ आठवला व कसे आपण ती येत नाही म्हणून हुक फेकून दिला तेही आठवले. पुन्हा तेच झाले अनेक वेळा साखळी समजून घेतली पण जमेना, मैत्रीणीच्या पेशंसला मानले बुवा, एकतर लाजही वाटत होती छे! हेच जमत नाही तर पुढे काय कप्पाळ येणार. अनेक प्रयत्न केल्यावर एकदाची साखळी जमली बाबा , मग मैत्रीणीने लगेच रोज चेनस्टिचचा (साखळी) सराव कर असा दमही दिला तेव्हाच समजले हे क्रोशा करणे म्हणजे संयम हवे, सोपे काम नव्हे पण मी करणारच असे पक्के ठरवले. मी घरी रोज स्लिपनॉट व चेनस्टिचचा सराव करत असे ,निदान मला बेसची कल्पना आली होती आणि जमतही होते, माझा आत्मविश्वासही वाढत होता, मी करु शकेन , मला जमू शकेल असे वाटत आहे. पुढे मी युकेला आले आणि क्रोशा मागेच राहिले.

इथे फिरत असताना मला मार्केटला मोठाले आर्ट-क्राफ्टचे दुकान दिसले आणि माझे लक्ष वेधून घेतले त्या रंगीबेरंगी लोकरीच्या गुंड्यांनी. माझी पावले आपोआपच त्या दुकानाकडे वळली आणि विविध प्रकारच्या रिबीनी, रंगीत लोकर, सुया, दोरे, हुक्स, बटणं आणि बरेच काही सगळे बघून आनंद झाला. मी लगेच त्या दुकानात काम करणार्या बाईला क्रोशाहुक आहे का विचारले , तिने मला कुठल्या नंबरचा हवा असे विचारले? मला खरंतर त्यातले काहिच माहित नव्हते , झाली का पंचाईत आता. ति लाम्हटले "आय अॅम अ बडिंग क्रोशेयर, यु सजेस्ट प्लिज" त्यावर ती हसून म्हणाली तू आधी बेसिक सुरुवात कर त्यासाठी तिने मला २.५०मिमिचा हुक दिला आणि दोरा दिला. मग मी घरी येऊन आधी मला स्लिपनॉट व चेनस्टीच अजूनही आपल्याला येतंय का ते पाहिले! . ते तर जमलं पण दोरा असल्यामुळे ते पॅटर्न अगदी लहान दिसत होतं. मग मी आंजावर क्रोशापॅटर्न्स शोधायला सुरुवात केली. स्लिपनॉट व चेनस्टिच पक्के येऊ लागल्यावर मी बाजारतून लोकर आणली व त्यावरही हे दोन प्रकार करुन पाहिले.

क्रोशाचे मुख्य काही स्टिच आहेत ते म्हणजेस्लिपनॉट, चेन, सिंगलक्रोशेस्टिच,हाफडबलक्रोशेस्टिच,डबलक्रोशेस्टिच, ट्रेबलक्रोशेस्टिच, मॅजिकरिंगआणिस्लिपस्टिच. क्रोशाचे बेसिक स्टिचेसखाली फोटोत देत आहे.

स्लिपनॉट आणि चेनस्टिच

.

*छायाचित्र आंजावरून साभार

सिंगलक्रोशेस्टिच

.

*छायाचित्र आंजावरून साभार

हाफडबलक्रोशे

.

*छायाचित्र आंजावरून साभार

डबलक्रोशे

.

*छायाचित्र आंजावरून साभार

ट्रिपलक्रोशे

.

*छायाचित्र आंजावरून साभार

मॅजिकरिंग

.

*छायाचित्र आंजावरून साभार

स्लिपस्टिच

.

*छायाचित्रआंजावरूनसाभार

मी आधी हे सगळे रोज न चुकता सराव करु लागले. अगदी एक-एक आठवडा जोपर्यंत पूर्णपणे येत नाही तोपर्यंत मी एकच स्टिचचा सराव करत असे. हळूहळू हात बसू लागला. मग मी आंजावर अनेक व्हिडियो प्ले-पॉज करत बघीतले, वेबसाइट्स वर जाऊन वेगवेगळे पॅटर्न्स समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला हळू-हळू हे जाणवू लागले जी गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकायची होती ती आपण आपलेच शिकतोय आणि मुख्य म्हणजे ते येतेय ;) . मग कुठल्या नंबरचे हुक्स असतात, कुठल्या साईजची लोकर घ्यायची हे सगळं कळू लागले. आता मोठं काही बनवायची इच्छा होऊ लागली, मार्केटला जाऊन हुक व लोकर आणली अणि आंजावर व्हिडियोत बघितलेला स्कार्फ बनवण्याचे ठरवले. सुरुवात तर केली, हळू-हळू विणत आधी रोज ( Rows) पुर्ण केले मग वेगवेगळे स्टिचेस करून आकार देण्याचा प्रयत्न केला आणि हळू-हळू माझा पहिला विणलेला स्कार्फ तयार होऊ लागला, कोण आनंद झाला म्हणून सांगू :) येस्स! आय डिड इट.

मग आत्मविशवास वाढू लागला आणि वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय करायला सुरुवात केली, पिनट्रेस्टवर अनेक पॅटर्न्स बघितले. दोन मैत्रीणींना स्कार्फ भेट म्हणून दिले, त्यांनाही ते आवडले व त्यांनीसुद्धा तू तुझ्या ह्या छंदाला जरुर सुरु ठेव असे प्रोत्साहन दिले.

मला जेव्हाजेव्हा सवड मिळते तेव्हातेव्हा वाचन आणि क्रोशा हे मी अगदी आवडीने करते. क्रोशाचे जणु व्यसनच लागलयं ;) माझ्यासाठी मोठा स्ट्रेसबस्टर आहे क्रोशा. मला माझेच असे नवल वाटते , इतका पेशंस आधी आपल्यात कधीच नव्हता त्या पेशंसपायी मी ही कला शिकण्याचे विचारही मध्ये सोडून दिला होता आणि आज मी ते करताना मला किती आनंद होतोय, एखादी छान कलात्मक वस्तू तयार होतेय. वेगवेगळ्याआकाराची, निरनिराळ्यारंगाची, मजा येते. अजूनही क्रोशात शिकण्यासारखे खूप आहे , मीही शिकतच आहेबट नाऊ आय कॅन प्राऊडली से दॅट आय अॅम अ सेल्फटॉट क्रोशेयर :)

मी केलेल्या क्रोशेकामाचे फोटो देत आहे.

बटवा / ड्रॉस्टींगबॅग

.

क्रोशेडॉयली

.

.

इन्फिनीटीस्कार्फ

.

इन्फिनीटीस्कार्फआणिहेड-बँड

.

.

फॉल / पम्पकिनगारलँड

.

.

क्रोशेडॉयली

.

.

रेडहार्टटीकोस्टर्सआणिरेडरोझ

.

क्रॉकोडाईलस्टिचबॅग

.

.

बुकमार्क्स

.

क्लस्टरस्टिचबॅग

.

.

बुककव्हरवुईथबुकमार्क

.

.

विंटेजबेरेटहॅट

.

.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

8 Mar 2015 - 2:38 pm | पियुशा

बा प रे.... कसल निगुतिन केलेयस न लिहिलय ही किती मस्त
निरनिराळ्यारंगाच्या कलाक्रेती पाहुन डोळे सूखावले :)

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 3:33 pm | मधुरा देशपांडे

खूप आवड्ला लेख. माहितीपुर्ण आणि तुझ्या अप्रतिम कलाकृतींनी चार चांद लागलेत. पर्स, बास्केट आणि बुककव्हर विशेष आवडले.
माझी आई, मामी, आजी या सगळ्या पण क्रोशाचे विविध प्रकार करतात. माझ्या लग्नाच्या रुखवतात या सगळ्यांनी फार सुरेख प्रकार केले होते. मी एकदाच फक्त साखळी शिकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे जी गाडी अडली ती अडलीच. आईकडुन फार कमी गोष्टी शिकले मी ही खंत आहेच एक.
तुझा हा लेख आई, मामी यांना नक्की दाखवेन.

मस्त ग !! क्रोशाच्या सगळ्याच कलाकृती फारच आवडल्या ...खास करून पुस्तकाचे कवर ! हि मस्त कल्पना आहे .

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 4:36 pm | सविता००१

अप्रतिमच.
अत्यंत नयनरम्य कलाकृती.

इशा१२३'s picture

8 Mar 2015 - 5:30 pm | इशा१२३

एकाहुन एक सुरेख कलाकृती आहेत.रंगसंगती सुंदर जमलीये.त्यामुळे उठावदार झाल्यात वस्तु.

साती's picture

8 Mar 2015 - 7:06 pm | साती

कव्हर आणि डॉईल्या फारच छान.
मी करून बघणार.

क्रोशा शिकायचं खूप मनात आहे. तुझं कौशल्य आणि तुझ्या चिकाटीचं नेहेमीच कौतुक वाटतं मला. हा लेख पण खूप छान. सोप्या भाषेत तू मस्त समजावलयेस. मी हाच लेख वापरेन क्रोश १०१ म्हणून :)

किलमाऊस्की's picture

8 Mar 2015 - 10:39 pm | किलमाऊस्की

क्रोशा म्हणजे वीक पाँइंट! मी नेहमीच नवीन पॅर्टनच्या शोधात असते. :-) बुक कव्हर आवाडलंय. करून बघेन आता.

जुइ's picture

9 Mar 2015 - 3:51 am | जुइ

आई थोडे फार करायची त्याची आठवण झाली. तु दाखवलेली चिकाटी आणि पेशन्स वाखन्याजोगे आहे!!

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 6:12 am | स्पंदना

आई ग!!
मला फार हेवा वाटतो क्रोशा करणार्‍यांच्या पेशन्सचा!!
सानिका फार सुंदर झाले आहेत तुझे एकूण एक प्रकार. त्यांना जोड आहे तुझ्यातल्या मूळ कलाकाराची!!

कलेची देवता प्रसन्न आहे तुझ्यावर.सुंदर रंगसंगती,सुबक काम,कल्पकता,चिकाटी,संयम सगळं एकाच लेखात अनुभवलं.
तुझ्या पुस्तकांना तिथल्या थंडीत मस्त उब मिळत असेल!

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 4:01 pm | सस्नेह

कसलं भारी काम ! आपल्या बाच्याने होणार नाय !

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 5:01 pm | सामान्य वाचक

फरक येवढा च कि मी सोडून दिले, ते परत कधी त्या वाटेला गेलेच नाही

तुला मात्र सलाम. काय सुंदर विणकाम करतेस

मला ते बूक कव्हर पाहिजे … आत्ता …. काय सुंदर दिसतंय सगळंच !!

गिरकीताई म्हण्ते तसं ,मला ते बूक कव्हर पाहिजे … आत्ता ,,
अग, हे तर माझ्या आईच वर्णन अगदि, नोकरी सोडता, मि ही शिकले होते पण आता सारे रहिले दुर घर माझे अस झालय माझं

क्रोशाच्या वस्तु खुप छान झालाय आहेत सानि. मला पण ह्या कलेचे खुप आप्रुप वाटते, स्वतः करावे असे कधी वाटले नाही, पण अता ट्राय करावेसे वाटत आहे. बघु तो दिवस कधी उगवतोय. :P

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 10:04 pm | स्वाती दिनेश

कित्ती सुंदर विणकाम आहे, फार छान!
स्वाती

आनन्दिता's picture

9 Mar 2015 - 11:08 pm | आनन्दिता

बुककव्हर अफाट देखणं झालंय. :)

मला पण त्या क्रोशासाठी लागणार्या पेशन्स चा हेवा वाटतो.

बुककव्हर ढापण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी :)

प्लीझ युरोपात जाऊन ढापण्याचं सत्कर्म करावं. मला इथल्या इथे तुझ्याकडून ढापणं सोप्पं जाईल ;)

मी राहु दिलं तर ढापाल ना ढापर्यानो!

पिशी अबोली's picture

10 Mar 2015 - 12:11 pm | पिशी अबोली

बॅग्ज आणि बुककव्हर अफाट आहेत!!!

सुप्रिया's picture

10 Mar 2015 - 2:07 pm | सुप्रिया

पाककलेबरोबर ही सुध्धा कला अंगात आहे. हॅट्स ऑफ.

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2015 - 3:22 pm | दिपक.कुवेत

हॅटस ऑफ. सगळ्या कला़कृती फारच सुंदर आहेत. स्पेशली बुककव्हर आणि ती बॅग फारच आवडली.

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 10:50 am | प्राची अश्विनी

ये हाथ मुझे दे दे स्वाती !:)

मितान's picture

11 Mar 2015 - 1:28 pm | मितान

खूपच सुंदर आहेत सगळे प्रकार.
मला यातलं काही म्हणता काही येत नाही ! :(
तूच मला बापडीला सगळे एकेक प्रकार दे झालं.... ;)
कारण या गोष्टी शिकणं मी पुढच्या जन्मासाठी राखून ठेवलंय. :)

उमा @ मिपा's picture

11 Mar 2015 - 2:29 pm | उमा @ मिपा

खूप सुंदर!
काल नुसते फोटो बघितले होते, परत परत बघत राहिले होते. आज वाचलं. करणं तर छान आहेच, लिहिणंही किती सुरेख!
माझी आई अतिशय छान क्रोशाकाम करते. आता वयोमानानुसार नाही जमत तिला. बरीच वर्ष तिला पाहिलंय हे करताना पण कधीच ते हातात घ्यावं वाटलं नाही.
पण तुझा लेख वाचून मात्र वाटलं, करून पाहावं एकदातरी.
हे सगळे फोटो आईला दाखवणार आहे. कसली खुश होईल ती!
book cover the best.

स्नेहल महेश's picture

11 Mar 2015 - 2:29 pm | स्नेहल महेश

काय सुंदर विणकाम
मी सुद्धा लग्नापूर्वी खूप आवडीने करायचे तोरण ,रुमाल …………

mbhosle's picture

11 Mar 2015 - 3:17 pm | mbhosle

खूपच सुंदर

कौशी's picture

13 Mar 2015 - 5:14 am | कौशी

मला जमेल का गं सानिका? कारण मला सुई कशी पकडावी इथुन सुरुवात करावी लागेल.

सानिका, आता एकेका वस्तूची वेगवेगळी माहिती दे. म्हणजे बनवून पाहता येईल!

अगदी सुरेख प्रकार आहेत. मलाही आता क्रोशाकाम शिकावेसे वाटू लागले आहे. काहीनाही तर निदान इन्फिनिटी स्कार्फ जरी बनवता आला तरी खूप झाले. शाळेत असताना साखळी आणि खांब शिकून त्याची लेस तयार करण्याचा प्रकार होता. मला काहीकेल्या ते जमेना, मग आईने करून दिला. पूर्वी तर्‍हेतर्‍हेच्या लेसेस बनवून ब्लाऊजच्या बाह्यांना, साडीच्या पदराला, अगदी साडी पेटीकोटलाही लावल्या जात असे ऐकले आहे.

सुंदर!!! रंगांची निवड मस्त. ' बुक कव्हर ' ह्या सर्व सुंदर वस्तुंचा जणु काही मुकुटमणीच.

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:00 pm | मनुराणी

खरंच हॅटस् अाॅफ. सानी एक लेखमालिका लिही ना यावर.

विशाखा पाटील's picture

16 Mar 2015 - 11:48 am | विशाखा पाटील

सुं द र ! मला ते बुकमार्क तेवढे पाठवून दे. :)

त्रिवेणी's picture

16 Mar 2015 - 1:08 pm | त्रिवेणी

प्रचंड सुंदर ग सानिका.
ते बुक कव्हर मलाच दे ग.

पैसा's picture

18 Mar 2015 - 11:42 am | पैसा

तुला साष्टांग नमस्कार! बाकी सगळ्या प्रकारात भरपूर काहीकाही करून झालं. पण क्रोशामधे खांब साखळ्या याच्यापुढे जायची हिंमत झाली नाही. अजूनही अख्खे स्वेटर्स वगैरे विणलेले पाहिले की "हे कसं काय ब्वा जमतं याना!" असं वाटल्याशिवाय रहात नाही!

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:53 pm | कविता१९७८

सुंदर विणकाम, मला या जन्मात जमेल अस वाटत नाही

मलाही शिकावेसे वाटू लागलंय क्रोशाकाम . खूप सुंदर दिसतेय . रंगसंगती पण छान आहे .

अजो's picture

6 Oct 2015 - 8:23 pm | अजो

खूप सुंदर..

रातराणी's picture

6 Oct 2015 - 8:29 pm | रातराणी

मस्त ग !

पद्मावति's picture

7 Oct 2015 - 12:24 am | पद्मावति

अप्रतिम क्रोशाकाम, सानिका!
जबरदस्त finesse.

सानिकास्वप्निल's picture

7 Oct 2015 - 3:39 am | सानिकास्वप्निल

धन्यवाद अजो, रातराणी आणि पद्मावति :)

नक्शत्त्रा's picture

22 Feb 2016 - 2:33 pm | नक्शत्त्रा

मस्त कलाकृती