कातळ माळ

चाफा's picture
चाफा in दिवाळी अंक
28 Oct 2013 - 5:13 am

कसल्यातरी जाणिवेने `ते' जागं झालं. ही जाणीव कसली, ते `त्या'ला कळत नव्हतं. पण ती कशाने शमते, हे चांगलंच माहीत होतं. कुणीतरी त्याला ‘भूक’ अशी संज्ञा दिल्याचं `त्या'ला आठवत होतं.
`ते'.... `ते' कधी इथे आलं ते `त्या'लाही आठवत नव्हतं. गेला कित्येक काळ `ते' इथेच पडून होतं. काळ ही आपली संज्ञा झाली. `त्या'च्यासाठी तो अस्तित्वातच नव्हता. आता जाग आल्यावर त्याने पुन्हा अंगावरचं ओझं ढकलून द्यायचा प्रयत्न केला, पण शक्ती क्षीण झालेली.. हेही `त्या'ला नवीन नव्हतं. जाग आली की शक्तिसाठा पूर्णं करून सुप्तावस्थेत जायचं, हेच त्याचं गेल्या कित्येक काळाचं कार्य होतं. कधीतरी एकेकाळी `त्या'ला ऊर्जेचा पुरवठा करण्याचं काम आपोआप होत असायचं. पण हल्ली ते `त्या'लाच करावं लागत होतं. `त्या'ला बाह्याकार नव्हताच. जे काही होतं, ती केवळ ऊर्जा, प्रकांड ऊर्जा. `त्या'ने आपल्या जाणिवांचं क्षेत्र विस्तारलं आणि आजूबाजूचा शोध घेतला. कुठल्याही ऊर्जेचं प्रसारण आता त्याच्या जाणिवेच्या क्षेत्रात आलं होतं आणि `त्या'ला जे हवं ते सापडलं. बस्स, आता काही प्रक्षेप आणि त्याचं काम होणार होतं. कधी? त्याची त्याला फिकीर नव्हती. काळ त्याच्यासाठी अस्तित्वातच नव्हता.
*******
“हॅट साला, हा काय ट्रेक झाला? दिवसभर नुसत्या चुकलेल्या वाटांवरून फिरतोय.” दुपारपासूनची वणवण सहन न होऊन शशी म्हणाला.
“पेशन्स, पेशन्स, शश्या! ट्रेकला आलायस, कुणाच्या लग्नाला नाही. पायवाटा आहेत या, चुकायचोच!” महेश धीर देत म्हणाला खरा, पण एव्हाना अंधार पडायला लागला होता. जवळपास मानवी वस्तीची पुसटही खूण नव्हती. नाही म्हटलं तरी थोडं धास्तावायला होत होतंच.
“सम्या आणि वल्ल्या अजून रेंगाळतायत. झक मारली आणि तुमच्यासोबत आलो.” शशी वैतागून करवादला.
खरं तर या ट्रेकमध्ये सगळंच चुकत आलं होतं, सुरुवातीपासूनच. मुद्दाम कुणी येत-जात नसलेला कडा चक्क गूगल मॅपवरून शोधून ते इथे आले होते. कालच्या प्लॅनिंगप्रमाणे म्हणायचं तर आज ते सात जण असायला हवे होते. पण तिघांनी ऐनवेळी कारणं सांगून टांगा दिल्याने चौघेच आले होते. संध्याकाळपर्यंत समोरचा कडा चढून पलीकडच्या वामणे गावात पोहोचायचा प्लॅन होता. काही चुकलंच, तर सोबत गूगल मॅप होताच. पण इथून चुकायला सुरुवात झाली. गूगल मॅप गाव दाखवतोय, दिशा दाखवतोय, पण रस्ता? गूगलबाबाला फक्त हायवेच माहीत. यांच्या पायवाटा त्याला दिसेनातच!
`लहानसा कडा आहे सहज पार करू' या त्यांच्या समजाला गैर असल्याचं सर्टिफिकेट द्यायला समोर दुसरा समांतर कडा उभा! हा का नाही दिसला मॅपवर? इन फॅक्ट, हे असले प्रश्न विचारात न घेण्याइतके ते वर चढून आले होते. त्यातच दुसर्याय कड्यावर जायची वाट सोपी दिसत असतानाही जागोजाग फसव्या वाटा कुठून ना कुठून डेड एन्डपाशी संपत होत्या. आता भर म्हणजे अंधार. ट्रेकर्स अंधाराला सहसा इतके घाबरत नाहीत. पण ते किमान ऐकिवातल्या परिसरात! हे असल्या कानात शिट्ट्या फुंकत असलेल्या आणि हजारो छुपे कडे असलेल्या ठिकाणी? हो, ते एक नवीनच प्रकरण होतं. दोन कड्यांना जोडणारी वाट होती खरी, पण त्यात गुडघ्यापर्यंत वाढलेल्या गवतात लपलेल्या अनेक भेगा होत्या. कधीतरी भूकंप वगैरेने झाल्या असतील, पण प्रत्येक भेग म्हणजे सरळसरळ मोक्ष देणारी दरीच. क्षणोक्षणी पावलासमोरचं दिसेनासं होत असताना हा असला भुलभुलैया पार करणं म्हणजे खरंच जिवावरचं काम होतं.
"हे, हो SSSS इकडे, इकडे" वल्लभ ऊर्फ वल्ल्याच्या आवाजाने तिघेही दचकले. हा कधी पुढे निघून गेला? खरं म्हणजे आश्चर्य करण्यासारखं काही नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या पायाखालची जमीन शोधण्यात इतका गर्क होता की मागे असलेला वल्लभच काय, पण बाजूला आवाज करणारा आपला मित्र आहे की एखादं जंगली जनावर, हेही कळलं नसतं.
"तिकडून, तिकडून, डावीकडे दरी आहे, गवत शक्यतो टाळूनच या." वल्ल्या वरून खाणाखुणा समजावत होता. त्याच्या आवाजातला उत्साह काही दडत नव्हता.
पलटण कशीबशी त्याच्यापर्यंत एकदाची पोहोचली.
"समोर बघा, निवार्यांची सोय झाली तात्पुरती." वल्ल्या जिकडे हात दाखवत होता, तिथे आधी तर काहीच दिसलं नाही. इतकं कळत होतं की हा त्या कड्याचा माथा आहे. डोळे अंधाराला सरावल्यावर नंतर अंगावरच्या दगडांची घट्ट सावली पाडणारा आकार दिसला. ते एखादं देऊळ आहे हे एका नजरेत समजत होतं. फार मोठं नसेल, पण वल्ल्याच्या म्हणण्याप्रमाणे आजची रात्र काढता येऊ शकत होती. चौघांनीही झपाझप पावलं उचलली.
मघाशी लांबून लहान वाटत असलेलं मंदिर, जवळून पाहतानाही इतकं काही मोठं वगैरे नव्हतंच. सभामंडप, गाभारा असल्या सीमारेषा नसलेलं आणि आतमध्ये कुठल्या देवाची आहे, हे न कळण्याइतके तडे गेलेली आणि विच्छिन्न मूर्ती असलेलं ते मंदिर. त्याला मंदिर म्हणायचं कारण एकच - त्याच्या घुमटाची रचना आणि दाराशी असलेला आणि अंगभर उदबत्त्यांच्या जळलेल्या काड्यांनी काटेरी झालेला एक भेगाळ दगड.
“सम्या, काडेपेटी दे.” हातातल्या मेणबत्त्या नाचवत शशी केकाटला.
सम्याने मुकाट्याने खिशातली काडेपेटी काढून त्याच्या हातावर ठेवली आणि परत मोजे काढण्यात गुंतला.
“सम्या, हलकटा, काड्यांचं भुस्काट करून टाकलंयस, काय कुस्ती करत होतास काय तिच्यासोबत?” शश्याच्या सूर अभद्र वाटेल इतका टिपेला गेलेला. साहजिकच आहे, अंधार घट्ट घट्ट होत गुदमरवायला लागला होता, त्यात दगडांच्या पोकळीतून वारा वाहताना ऐकू येणार्याध काळजाचं पाणी करून टाकणार्याा किंकाळ्या आणि आजूबाजूला मंदिरातल्या दगडांची अंगावर येणारी काळीभोर चिरेबंदी बांधणी! कोंडल्याची भावना सर्वोच्च पातळीला पोहोचायचीच.
“लेका, रस्ता एकातरी ठिकाणी धड होता काय? सारखा पाय उचलून उचलून चुरगाळली असेल, बघ एखाददुसरी काडी नक्की पेटेल.” सम्या समजूत घालत म्हणाला.
“तुझ्या नानाची टांग! हात दिसतायत का माझे? एकूण एक काडी तपासलीय मी. एकतर साला टॉर्च एकच, त्याचीही बॅटरी डाउन...” चिडचिड होत होती शश्याची.
“मोबाइलला टॉर्च आहे ना तुझ्या? खिक्क..!!” वल्ल्या खिदळला. शश्या ट्रेकला येताना नोकियाचा जुना टॉर्चवाला फोन आणायचा. कधी कुठे डाकूबिकूंशी गाठ पडलीच, तर मौल्यवान वस्तू जायला नको म्हणून. यावर ते `खिक्क' होतं.
“वल्ल्या, हजारदा सांगितलंय..” मह्याच्या तिथल्या एंट्रीमुळे पुढचे शब्द गिळले त्याने. नाही म्हटलं तरी प्रत्येक टोळक्यात एक अघोषित म्होरक्या असतोच. बाकीचे त्याला जरा वचकतात. इथे महेशकडे ती भूमिका होती.
“काय बोंबलताय रे?” मह्याला कसलाच पत्ता नव्हता. हा प्राणी इतक्या अंधारात आवाजाच्या टप्प्यापलीकडे कशाला गेला होता? प्रश्न उठला, पण विचारला कुणीच नाही.
“काडेपेटीची काशी केली या सम्याने. आता मेणबत्त्या कशा पेटवू?” शश्या कुरकुरत राहिला.
“अबे, काडेपेटी काय एकमात्र गोष्ट आहे का मेणबत्ती पेटवायची?” मह्या काय म्हणून म्हणाला कुणास ठाऊक.
“मग आता आदिमानवासारख्या गारगोट्या घासू का? गारगोट्या?”
“आहेत तुझ्याकडे?”
“तो गारगोट्या म्हणतोय रे! एकच शब्द आहे तो, उगीच गैरसमज नको नंतर” सम्याला तोंड खुपसायची काहीच गरज नव्हती. पण समोर नॉनव्हेज कोटी करायची संधी दिसल्यावर कोण सोडेल?
“सम्या, तू गप रे! तुझ्यामुळे घोळ झालाय! आता गारगोट्या नसल्या तर लाकडावर लाकूड घासून आग पेटव.” शश्या पारच खवळला.
“गप्प बसा रे, शश्या. हा घे लायटर. सकाळीच सॅकमध्ये टाकला होता मी. तू मेणबत्त्या पेटव आणि सम्या आणि वल्ल्या लाकडं आणतील.” मह्याने ऑर्डर सोडली.
“कुणाला जाळायला?” काहीच न समजून वल्ल्या बडबडला.
“मूर्खा, देवळाला दरवाजा नाहीये. इथे चुकून एखादं जंगली जनावर असलंच तर डिनर व्ह्यायचंय का त्याचं?” मह्याने खुलासा केला.
महेशच्या शब्दातली गर्भित भीती जाणवल्याने असेल, पण तो विझायला आलेला टॉर्च घेऊन दोघं सटकले. इथे तिन्हीसांजेला मनोभावे घरात पणत्या लावाव्या, अशा तन्मयतेने शशी मेणबत्त्या लावत फिरत होता. भीती अजूनही कमी झाली नव्हती. भीती ही अशी भावना आहे की ती वाटते, पण वाटता येत नाही. आनंद जसा इतरांच्यात वाटला तर पटीत वाढतो, तशी भीती इतरांच्यात राहून कमी होते, नाही असं नाही. पण ती तात्पुरती. त्यामुळेच बाहेर धपाधप येणारे आवाज ऐकून शशीच्या हातातून पेटती मेणबत्ती खाली पडली.
“तिथे.. तिकडे एक आय मीन चार..” धापा टाकत असल्याने सम्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
वल्ल्याने हळूच एका दिशेला बोट दाखवलं. प्रकाशाचे अंधुक असले तरी जाणवण्याइतके स्रोत इकडेच येत होते.
“अबे, देऊळ आहे ना! दिवाबत्ती करायला कुणीतरी येत असणार.” मह्या समजूत काढत म्हणाला, पण त्याच्याही काळजाचा ठोका चुकलाच.
“पण माणूस नसेल तर?” तंतरलेला आवाज हा शश्याचाच.
“अरे, देवळात आहोत ना आपण? मग भूत का असेना, आपण सुरक्षित आहोत.” नकळत सगळ्यांना देवळाच्या उंबरठ्याआत सरकवत मह्या म्हणाला.
“देऊळ, देऊळ काय म्हणून राहिला रे? लोक कसलंही देऊळ उभारतात. हे.. हे वेताळाबिताळाचं देऊळ असलं म्हणजे? तो थोडीच वाचवणार आपल्याला?” भीतीत भर घालायचं काम चालूच होतं.
विचार करा. आजूबाजूच्या परिसरात नक्की काय आहे हे ठाऊक नाही. एकांतात हे असं मंदिर! ना दिवा, ना पणती. त्यात बाहेर येणारा आवाज हा नक्की वार्यालचाच म्हणावा का? अशी शंका घेण्याइतपत भयावह आणि त्या तसल्या प्रकारात गर्द अंधारातून या अचानक प्रकटलेल्या प्रकाशाने नाही म्हटलं तरी थोडंफार घाबरणारच ना?
प्रकाश जवळ येत गेला, आधी कंदील आणि मग त्यांना घेऊन येणारा माणूस असं चित्र स्पष्ट होत गेलं आणि सगळ्यांनी नकळत नि:श्वास टाकला.
हातातले चारही कंदील खाली ठेवत म्हातार्यालने त्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली. सहज ऐंशीच्या पार असेल तो. वाढून खुरटलेली दाढी पिकली होती एव्हाना. कंबरेत आलेला बाक आणि चेहर्या वरच्या सुरकुत्या त्याने खूप पावसाळे पाहिलेयत याची जाणीव करून देत होत्या. कधी काळी धुतली असेल अशी, भोकं पडलेली बनियन आणि लुंगी त्याच्या राहणीमानाचा अंदाज देत होत्या. डोळ्यात काहीसं आश्चर्य आणि थोडी भीती आणि बराचसा वेडगळपणा साकळलेला.
“आजोबा, हे कुठलं गाव आहे?” शांतताभंग करण्यासाठी वल्ली म्हणाला.
“पोरांनो, हितं कशापायी आला? निघून जा. निघून जा, नायतर त्यो तुमचाबी घास घ्येईल.” म्हातारा का कुणास ठाऊक, पण बिथरलेला.
“आम्ही ट्रेकर्स आहोत आजोबा. असं डोंगरकपारीतून फिरणं आमचा छंद आहे.” महेशने सूत्रं हातात घेतली.
“त्ये कायबी ठाव न्हाई. हितं थांबू नगा!”
“तुम्ही आधी आत या, जरा बसा आणि मग बोलू.” म्हातारा बाहेरच तिष्ठत उभा असलेला पाहून महेशने त्याला यायला वाट करून दिली. हातातले कंदील उंचावत त्यांच्या उजेडात चौघांचे चेहरे न्याहाळत म्हातारा आत आला, आणि मंदिराच्या चार कोपर्याउत चार कंदील अडकवून जरा विसावला.
“त्यो यील, मग तुमची सुटका न्हाई! द्येवा, कवळी पोरं ही. वाचीव यांना...” तोंडातल्या तोंडात बडबड अजूनही चालूच होती.
एकंदरीत म्हातारा ‘सरकलेला’ आहे, असा निर्णय देत मह्याने जेवण उरकून घ्यायचा सल्ला दिला. वल्लीने आणि सम्याने सॅक उघडून खायचे पदार्थ बाहेर काढून त्यांचा ढीग रचायला सुरुवात केली. तिकडे आशाळभूतपणे पाहत म्हातारा पायांची चाळवाचाळव करत बसून राहिला.
“या आजोबा, दोन घास खा आमच्यासोबत.” मह्याने आमंत्रण दिलं.
जणू याचीच वाट पाहत असल्यासारखा म्हातारा पुढे सरसावला. मग कित्येक वेळ तिथे फक्त तोंडाची मचमच आणि पिशव्यांचे आवाजच येत राहिले. मध्येच स्वतःशीच चाललेली म्हातार्या ची असंबद्ध बडबड.
“निघून जा असं का सांगताय आजोबा?” पोटातली आग थंडावल्याबरोबर शशीने प्रश्न विचारला. त्याच्या मते तरी चेष्टेवारी नेण्याचं हे प्रकरण नव्हतं.
“वंगाळ! लई वंगाळ जागा हाय ही पोरांनो!” म्हातार्याहने कंप आलेल्या आवाजात पहिल्यांदाच सुसंगत वाक्य उच्चारलं आणि हातातली बाकरवडीची पिशवी फेकून दिली.
“हो, जागा वाईट आहे हे दुपारीच कळलं. कसला तो डोंगर? आणि कसल्या त्या भेगा? पुढच्या पावलाखाली काय आहे हे कळतच नाही.” वल्लीने तक्रार नोंदवली.
“या असल्या जागी येणारे आम्ही पहिलेच असू ना? काय नाव काय आहे या डोंगराचं?” एका दमात दोन प्रश्न विचारून घेतले सम्याने.
“काताळमाळ.. काताळमाळ! लई वंगाळ!” म्हातारा पुन्हा सरकला..
“माळ? आजोबा? माळ म्हणजे सपाट असतो असा टेबलासारखा. हा तर चक्क डोंगरकडा आहे!”
“त्यो आला की हितं डोंगर उभा राहतोय! तुमी थांबू नगा..” म्हातार्यााचे शब्द डोक्यावरून गेले.
“काय आजोबा? काय मस्करी करता का आमची? एरव्ही इथे माळ असतो आणि त्यातून अचानक असा डोंगर उभा राहतो की काय?” इतरांकडे पाहत ‘म्हातारा सरकलाय’ अशी खूण करत वल्ली म्हणाला.
“आणि हा ‘तो’ कोण?” सम्याने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
“या परकाराला किती वर्ष झाली असतील म्हाईत नाय, पण हितं येक गाव व्हतं..”
यानंतर बराच वेळ म्हातारा एकटाच बडबडत राहिला. कधी असंबद्ध, तर कधी शहाण्याला लाजवेल असा सुसंगत! सगळेच आपापल्या परीने त्याचा अर्थ लावण्यात गुंग होऊन गेले.
सगळ्याचा थोडक्यात अर्थ इतकाच होता की, कधीतरी पूर्वी या ठिकाणी एक अघोरी तांत्रिक राहायचा. त्याची अमरत्वप्राप्तीची साधना इथे चालायची. काही अनिश्चित काळाने इथे नरबळी द्यायची त्याची पद्धत होती. अनिश्चित काळच का? तर त्यामागचं खरं कारण कुणालाच कळलं नव्हतं. कधी वर्षातून एकदा, कधी सहा, कधी दहा अशी वर्षांची संख्या बदलत असायची. मात्र ज्या वर्षी तो बळी द्यायचा, ते मात्र चार ही एकच संख्या शेवटपर्यंत सारखी होती. जावळीवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या मावळ्यांच्या एका तुकडीच्या हातून त्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी तिथेच त्याला भडाग्नी देऊन त्या माळावरच एक खड्डा खणून त्याच्या अस्थी पुरून टाकल्या. जावळी जिंकून आल्यावर उरलेल्या प्रकाराचा छडा लावायचा, असं ठरवून ते पुढे निघून गेले.
पुढे काय झालं कुणालाच माहीत नाही. ती तुकडीच लढाईत मारली गेली की विजयाच्या आनंदात हा लहानसा प्रसंग ते विसरले, ते तेच जाणोत. पण इथे कुणी परतून आलं नाही. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर बाकी कुणाच्याही ते लक्षात राहिलं नाही. पण..
त्यानंतर कधीतरी अचानक हा प्रकार सुरू झाला. इथल्या सपाट माळावर अचानक एक उंचवटा येतो आणि तो वाढत जाऊन त्याचा डोंगर तयार होतो. तसं इथे काहीच घडत नाही. पण असं म्हणतात की त्या वर्षभरात चार जिवांचा बळी घेतल्याशिवाय हा डोंगर खाली बसत नाही. या प्रकारावर आळा घालण्यासाठी इथे एक मंदिरही बांधून झालं, पण उपयोग शून्य.. लोकांनी इथला वावर टाकला. मात्र मंदिरातल्या पुजार्यांदच्या पिढ्या जीव धोक्यात घालून इथे येत होत्या. कधीकाळी कुणी इकडे फिरकलंच, तर त्याला सूचना देण्यासाठी. आणि आत्ता तेच तो कडा चढून वर आलेले...
म्हटलं तर नेहमीचाच, म्हटलं तर भयानक असा प्रकार अनुभवत होते ते. नेहमीचंच एवढ्यासाठी की असल्या दंतकथा शेकड्यांनी सापडतात, आणि भयानक एवढ्यासाठी, की खरंच आजूबाजूला खोल खोल दर्याा असलेल्या भेगा बाळगत उभ्या असलेल्या त्या विचित्र कड्याच्या माथ्यावर ते आत्ता होते.
“च्यायला, मह्या खरं असेल का रे हे?” कुजबुजत शशी म्हणाला.
“गावगप्पा रे, दुसरं काय? असे डोंगर अचानक तयार होतात का कधी? फोड आल्यासारखे?”
“जीव वाचवा पोरांनो! हितून निगा. त्याची नजर पडायच्या आत निगा!!” म्हातारा परत सटकला.
एकतर अशा रात्री अशी भयानक कहाणी सांगून हा म्हातारा त्यांना निघायला सांगत होता. मनात भीती आणि हे असले भेगाळ रस्ते.. कुणाचा जीव वर आला होता इथे? एकमत करून चौघांनी समजूत काढत म्हातार्याेला वाटेला लावला. अगदी मह्या आणि सम्या त्याला बाहेर सोडूनही आले. जाताजाताही म्हातारं बडबड करतच गेलं...
त्यांच्या मनातल्या भीतीची जाणीव`त्या'ला होत होती. भीती या विकाराचा 'त्या'ला आपल्या अंतरंगात प्रवेश नको होता. आजवर कधीच असं घडलं नव्हतं. सगळं सहज घडून येत होतं, पण आता मात्र `त्या'ला थोडे कष्ट पडणार होते. `ते' अस्वस्थ झालं...
“तू पण ना सम्या! इतकं बोलत होता, तर गेलो असतो त्याच्यासोबतच, तर काय वाईट होतं? त्याला इथला सेफ रस्ता माहीत असेल कदाचित, आणि रात्र काढली असती त्याच्याच घरी.” शश्या काळजीच्या सुरात म्हणाला.
“मूर्ख आहेस. आणि समजा, हाच तो तांत्रिकबाबा असला तर मग?” वल्लीचा सूर दबका होता, पण अंगावर सरसरून काटा उभा करून गेला.
“पण तसं असेल तर आताही आपण सुरक्षित नाही आहोत.” सम्याने नवीन भर घातली.
“माझातरी अजूनही या प्रकारावर विश्वास बसलेला नाहीये.”
“तुझ्या विश्वास न बसण्याने धोका कमी होत नाही, मह्या!” वल्ली अजूनही काळजीतच...
“ओके! समजा, तो म्हणाला ते खरं होतं, तर आपण आतापर्यंत सेफ कसे?”
“कदाचित मंदिरात असल्यानं असेल..”
“तसं असेल तर आपण इथेच रात्र काढू की! वाटल्यास दरवाज्याजवळ शेकोटी पेटवू, म्हणजे त्या भुताला की तांत्रिकाला की तांत्रिकाच्या भुताला आत येता येणार नाही.”
यापलीकडचा उपाय आतातरी कुणाला सुचत नसल्याने तोच अमलात आणायचं ठरलं. जवळपासचाच लाकूडफाटा आणि जे काही जळण्यासारखं असेल ते एकत्र करून मंदिराच्या दरवाज्यालगतच शेकोटी पेटवली गेली. आता झोपेचे ‘बारा वाजणार’, हे गृहीत धरूनच चौघांनी अंग टाकलं. पण शारीरिक थकव्याने भीतीवर मात केली आणि चौघेही शांतपणे झोपी गेले. बाहेरच्या शेकोटीची आग मंदावत होती.
“आयला, वल्ल्या कुठाय?” शशीच्या आवाजाने मह्या आणि सम्या दचकून जागे झाले.
“इथे आहे रे मी. जिवंतच आहे अजून!” वल्ल्याच्या मिश्कील आवाजाकडे तिघांचंही लक्ष गेलं. नुकताच बाहेरून आत येत होता.
“भल्या पहाटे कुठे उलथलेलास?” चिडून मह्यानं विचारलं.
“अरे, काही नाही. जरा इकडे जाऊन आलो.” करंगळी दाखवत वल्ल्या उत्तरला. त्याला पाहून उरलेल्या तिघांचा जीव भांड्यात पडला.
पटापट आवरून सगळेच निघायच्या तयारीला लागले.
“आता पुढे जायचं की मागे रे?” सम्याने योग्य शंका काढली.
“पुढेच जाऊ. इतकं आलोयच तर मागे का वळायचं? तसंही पुढे वामणे लागेलच की! कालच्या प्रकाराला घाबरलास काय?” मह्याने टर उडवली.
शेवटी एकमत होऊन सगळे पलीकडच्या उताराला लागले. हा प्रकारही काही कमी धोकादायक नव्हता. तेच वाढलेलं गवत आणि त्याच त्या पाताळयंत्री भेगा. सगळं चुकवत चुकवत उतरायला सुरुवात केली. मोजून दहा मिनिटं झाली नसतील, पुढे असलेला वल्ल्या धडपडत मागे आला.
“तुझं काय बिनसलं बे?”
“तिथे.. पलीकडे..” श्वास फुललेल्या वल्ल्याच्या तोंडून शब्द फुटेनात.
त्याच्या बोटाच्या खुणेच्या दिशेने सगळे धावले. पहिल्या नजरेत दिसेल असं दृश्य नव्हतंच ते. पायाखाली कंदिलाची काच आल्यावर कुणाच्यातरी ते लक्षात आलं.
समोर आऽ वासून पसरलेली लांबच लांब अंधारी पोकळी आणि त्यातूनच बाहेर डोकावणार्या् झाडाच्या मुळाला अडकलेली ती कालच्या म्हातार्यााची लुंगी! चित्र स्पष्ट होतं. रात्री अंदाज चुकून म्हातारा या भेगेत पडला असावा.. जीव वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीच्या, थोड्या खुणा आजूबाजूच्या ओरबाडलेल्या गवतावरून जाणवत होत्या. पण तो दुबळा प्रयत्न होता. आतापर्यंत म्हातार्याचच्या बोलण्याला चेष्टेवारी नेणारे वल्ल्या, सम्या पार हादरलेले दिसत होते. शशी तर आत्ता पळेल की नंतर याची खातरी देता येत नव्हती. त्यातल्यात्यात मह्या शांत होता. त्याच्या डोक्यात काहीतरी विचारचक्र चालू असल्याचं चेहर्यानवरून तरी दिसत होतं. नक्की काय घडलं असेल इथे? म्हातारा तोल जाऊन पडला? की आणखी काही झालं असेल? प्रश्न अनेक होते, पण उत्तरं शोधायला वेळ नव्हता.
`त्या'च्या ऊर्जासाठ्यात भर पडायला सुरुवात तर झाली होती...
“सम्या, वल्ल्या, ताबडतोब परत फिरू! आल्या वाटेनेच कडा उतरायचा आत्ताच्या आत्ता!” मह्या ठाम स्वरात म्हणाला.
“अरे, पण तूच म्हणालेलास..”
“तो भूतकाळ झाला. आलेला रस्ता आपल्याला थोडाफार का होईना लक्षात आहे, पण पुढे रस्त्यात काय आहे याचा अंदाजही लावता येणार नाही.”
“खरंय! परत पुढे गेल्यावर गाव लागलं आणि तिथले लोक म्हातार्याकचा शोध घेत असले तर आपण अडकणार.” सम्या थोडाफार सावरला होता.
“पण आपण थोडीच मारलंय त्याला? अंदाज चुकून पडला असेल.” शशीने रास्तच शंका काढली.
“पण सध्या बेपत्ताच ना? समजा पोलिसांपर्यंत प्रकरण गेलंच तर? याला शेवटचा जिवंत पाहिलेले आपणच चौघे आहोत.” मह्या अजूनही ऐकायला तयार नव्हता.
“आपला याच्याशी काडीचा संबंध नाही.... की आहे?” वल्ल्याने प्रकरण आणखी बिघडवलं.
“तुला नक्की काय म्हणायचंय?” मह्या भडकलेला.
“शेवटचे आम्ही नाही रे! शेवटी त्याला सोडायला तू आणि सम्या गेला होतात. म्हातारा तसा सटकच दिसत होता. मध्येच काही वेडंवाकडं...???”
“मूर्खा! बडबडीला वैतागून आम्ही त्याचा खून वगैरे केला असं सुचवतोयस का तू?”
“तसं नाही. पण चौकशीत हे असले प्रश्न येणार ना!” वल्ल्याने आपली बाजू सेफ करून घेतली.
“म्हणून म्हणतोय, आल्या रस्त्याने परत जाऊ. एक मिनिट इथे थांबायला नको.” सम्याने सरळ ऑर्डर सोडली आणि तो वळून चालायलाही लागला.
बाकीचे मुकाट्याने त्याच्यामागून निघाले. झाल्या प्रकाराने मूड तर गेलाच होता, पण चौघांचे दोन ग्रूपही पडले होते आता. सम्या मह्याच्या सोबत पुढे चालत होता आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत शशी आणि वल्ल्या निघाले होते.
“सावकाश! काल काळोखात दिसलं नाही, पण इथले दगड सैल आहेत. मागून येताना पाय वगैरे देऊ नका.” सम्या थांबून सांगत होता. एव्हाना देऊळ मागे टाकून त्या भुलभुलैयात शिरण्याच्या तयारीत असलेले चौघेही एकाच जागी थबकले. आधीच असा विचित्र परिस्थितीतला अपघात पाहिल्यावर पुढे कोण सरकणार?
“मी पुढे जातो. माझ्या मागोमाग या, पण सांभाळून.” मह्या विश्वासाने म्हणाला आणि उतरायलाही लागला.
`काल येताना काळोख असूनही सुट्या दगडांपैकी एकही पडू नये?’ हा प्रश्नही कुणाला पडला नाही. जीव महत्त्वाचा! बाकी विचार करायला बराच वेळ मिळणार होता. खाली उतरून पाच-दहा पावलं चालले असतील नसतील, सम्याच्या मागच्या खिशात कोंबलेला चार सेलचा स्टीलचा दणकट पोलीस टॉर्च खाली पडला आणि कसलीही कल्पना न देता सम्या तो उचलायला खाली वाकला. मागोमाग येणारा शशी अजूनही बावरलेलाच होता. त्याचे डोळे सतत मागे वळून पाहत होते. समोर अचानक थांबलेल्या सम्या दिसायच्या आत शशी त्याच्यावर आदळला आणि धडपडला.
“शश्या सांभाळ..” मह्या खच्चून ओरडला. पण तोवर शशीने दोन-चार पलट्या मारल्या होत्या. लक, केवळ लक म्हणून शशीने हाताला लागलेला दगडी उंचवटा पकडला आणि त्याचे पाय थेट अधांतरी...
समोरच्या गवतात लपलेली फट सहजासहजी दिसली नसतीच. मह्या आणि वल्ल्या शशीच्या घसरण्याने दबलेल्या गवतावर पाय टाकत धावत पुढे सरकले आणि शश्याला वर खेचला. मोजकी दोन-तीन फूट रुंदीची, पण नजर ठरणार नाही अशा खोलीची ती फट अंगावर काटा उभा करत होती.
“बेअक्कल! तुला आवाज देता येत नाही?” मागून येणार्याट सम्याचं बकोट धरत मह्या किंचाळला.
“सॉरी, माझा टॉर्च पडला.”
“खड्ड्यात गेला तुझा टॉर्च.” असं म्हणत सम्याकडून हिसकावून घेतलेला टॉर्च सम्याने जीव खाऊन दूर भिरकावला. ही मोठी चूक ठरली.
रागाच्या भरात दिशा लक्षात न आल्याने फेकलेला टॉर्च त्या सुट्या दगडांच्यात जाऊन पडला. त्याने फरक पडला असेलच असं नाही, पण गडगडत चार-पाच दगडांची चळतच खाली कोसळली आणि उतारावरून गडगडत त्यांच्याच दिशेला आली.
“ सांभाळा..” तिकडे लक्ष वेधत मह्या ओरडला. क्षणात सगळे समोरच्या दगडी संकटाच्या रस्त्यातून बाजूला झाले. या वेळी परत कुठेतरी चुकलं.
वेगात गडगडणार्या. दगडांमधल्या एकाच्या वाटेत काहीतरी अडथळा आल्याने असेल, पण तो उसळला. वेडावाकडा उसळला आणि मूळ दिशा सोडून दुसरीकडेच भिरभिरला. दुर्दैव.. त्याच्या टप्प्यात शशी उभा होता! अक्षरशः सेकंदाचा अवधी मिळाला नसेल त्याला. दगड त्याच्या पोटावर धाडकन आदळला. आकार जरी मोठा नसला तरी बॅलन्स घालवण्याइतका वेग नक्की होता. मागे धडपडलेला शशी पाऊल चुकून थेट खालच्या भेगेत.
त्याने जिवाच्या आकांताने मारलेली किंकाळी कमी कमी होत विरत गेली.
कमी होणार्या् वेदनेसोबतच `त्या'ला तृप्ती येत चालली होती...
समोर काय घडतंय याचा अंदाज लागायच्या आत सगळं घडून गेलं. शशी त्या भेगेत नाहीसा झाला. धडपडत तिघांनी तिथलं गवत बाजूला करून पाहण्याचा प्रयत्न केला. एकच वेडी आशा होती. चुकून कशालातरी अडला असेल. पण खाली अंधाराखेरीज काहीच दिसेना.
हताश होऊन तिघेही खाली बसले. वातावरणात शांतता पसरली. वार्याशच्या शिळेखेरीज काहीही ऐकू येत नव्हतं.
“शिट, काहीच्या काहीच होऊन बसलं रे..” शांतता भंग केली ती वल्ल्याने.
“पुढे काय करायचं?” सम्याचा श्वास अजून फुललेलाच.
“उतरायला सुरुवात करायची. दुसरा पर्याय आहे का?” मह्याचा निश्चयी स्वर.
“शश्याला असंच टाकून?” दाटून येत असलेला हुंदका दाबत सम्याने विचारलं.
“त्याला परत आणता येणार आहे का? विचार करा. एव्हाना सूर्य माथ्यावर आलाय. संध्याकाळच्या आत आपण कडा उतरून गेलो नाही तर?”
“अरे, पण काही मदत बोलावता आली तर?”
“कशी बोलावणार? मोबाइलला नेटवर्क नाही. आजूबाजूला माणसाचं नामोनिशाण नाही. आपणच उतरून गेलो तर काही करता येईल.”
“मलाही मह्याचं थोडंफार पटतंय.. या वेळी इथून उतरून जाणंच योग्य. न जाणो, म्हातार्याळने सांगितलेली कहाणी खरी असली तर?” वल्ल्याचं वाक्यच काळजाचा ठोका चुकवायला पुरेसं होतं.
“वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. उठा!” मह्याने खडसावलंच.
उरलेले तिघं आता कसाबसा मार्ग काढत वाटेतल्या भेगा चुकवत खाली निघाले.
पुढचा तासभर कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. हातातल्या काठीने समोरचं गवत आडवं करत, त्याखालच्या जमिनीचा अंदाज घेत एकटा मह्या पुढे, आणि थोडं अंतर सोडून वल्ल्या आणि सर्वात मागे सम्या.
“ए, बोला काहीतरी..” ताण सहन न होऊन मह्या चिडला.
“मला तहान लागलीय.” क्षीण आवाजात सम्या म्हणाला आणि सगळे पुन्हा एकत्र जमले.
“ते सगळं खरं असेल का रे?” वल्ल्या अजूनही कालचाच विचार करत होता.
“काय? तो म्हातारा सांगत होता ते?”
“हं...”
“असेल नसेल याची चर्चा आपण खाली गेल्यावर करू. आत्ता तो विषय नको.” मह्या का कुणास ठाऊक पण चिडचिडेपणे वागत होता.
“अरे, पण ते खरं असेल तर..”
“एकदा सांगितलं ना? तो विषय नको!” पाण्याची बाटली सॅकमध्ये ठेवत मह्या म्हणाला.
“शिट! तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही.” आपली सॅक उचलत सम्या पुढे निघाला.
“सम्या, थांब!” त्याला थांबवायला वल्ल्याने हाक मारली.
“थांबून काय करू? काहीही करून उतरायचं तर आहेच! साला, बोलण्यातही काही अर्थ राहिलेला नाहीये आता.” हातातल्या काठीने समोरचं गवत झोडपत पुढे सरकत सम्याने उत्तर दिलं.
“अरे, आम्हीही निघालोयच. आमच्यासाठी थांब.”
यावर क्षणभर सम्या थांबला. त्याने सावकाश मागे पाहिलं आणि उगीच झटका आल्यासारखा पुढे सरकला. या वेळी पुढच्या पावलासमोरचं गवत आडवं करायचं राहून गेलं आणि सम्याचं पुढचं पाऊल अधांतरी पडलं...
“सम्या..” सम्याला डोळ्यादेखत जमिनीत गायब होताना पाहून दोघेही ओरडले.
“मला बाहेर काढा पटकन” कुठूनतरी सम्याचा आवाज आला. थँक गॉड, सम्या होता अजून तिथे.
दोघेही धावले गवत बाजूला सारून आत पाहिलं. इथेही तशीच भेग होती, पण सम्या नशीबवान होता. ती मोजून पाच-सहा फूटच खोल होती.
“अरे, हात द्या पटकन” अडकलेल्या सम्याने आवाज दिला.
हातातल्या सॅक खाली टाकत दोघांनीही हात पुढे केले..
“देवाची कृपा! इथे खाली जमीन होती. मी तर जिवाची आशाच सोडली होती.” दोघांच्या हाताचा आधार घेत सम्या म्हणाला. जिवावरच्या संकटातून सुटल्याचे भाव चेहर्यालवर सहज वाचता येत होते. वाचला तो. अंहं, वर येताना छातीत काहीतरी टोचल्याची वेदना मस्तकात भिडली. काही कळायच्या आतच दोघांनी त्याला खेचून वर घेतलं.
समोर आलेली संधी का वाया गेली, हे `त्या'ला कळलं नसलं तरी आवडलं नाही. ताकद पणाला लावून त्याने भूपृष्ठाखाली काही मिलिसेकंदात शोधाशोध केली, आणि जे हवं होतं ते मिळवून त्याची जागा बदलली...
“हळू, यार! काहीतरी टोचलं माझ्या...” छातीवरचा रक्ताचा डाग दाखवत सम्या म्हणाला. सहजवृत्तीने त्याने शर्ट बाजूला करून जखमेकडं पाहिलं.
दाभण खुपसावं तशा आकाराची दोन छिद्र बरगडीच्या खाली दिसत होती. रक्ताचं उगमस्थानही तेच होतं.
“साप..!!!” मह्या किंचाळला. सम्याला बाजूला ढकलून त्याने हातातल्या काठीने गवत बाजूला सारून पाहिलं, आणि फूत्कार टाकत आतल्या नागाने फणा काढला.
“डॅम, नाग आहे हा.”
“काय?” अविश्वासाने मह्याकडे आणि स्वतःच्या छातीकडे पाहत सम्या किंचाळला.
“व्हॉट? नाग? मह्या, काहीतरी उपाय कर ताबडतोब!!” आतल्या नागाकडे पाहत वल्ल्या कळवळला.
“काय करू?” मह्या गोंधळला.
“अरे, तू सर्पमित्र ना! तुला प्रथमोपचार माहीत असतील. खाली गेल्यावर मदत घेऊ कुणाचीतरी.”
“छातीवर झालेल्या दंशावर काय प्रथमोपचार करू? कुठे आवळपट्टी बांधू?” मह्याने शक्यताच नाकारली.
“अरे! मग काय मरू देणार आहेस का यालाही?” वल्ल्या खरंच भडकला.
“नाही, याला उचलून न्यायचं. खाली काहीतरी मदत मिळवू. पण घाई करायला हवी.”
मागचापुढचा विचार न करता मह्याने सम्याला सॅकसकट उचलून खांद्यावर टाकलं आणि पुढे निघाला. त्याचं असं जाणं बरोबर नाही, हे कळण्याइतका वल्ल्या भानावर होता. त्यानं खाली पडलेल्या सॅक उचलल्या. घाईघाईत सॅक उचलताना मह्याच्या सॅकमधल्या वस्तू खाली पडल्या. बहुतेक मघाशी पाण्याची बाटली ठेवल्यावर सॅकची चेन लावायची विसरला होता तो.. पडलेल्या वस्तू उचलेपर्यंत मह्याने हाक दिली.
“आता तू का मागे राहतोयस?”
“अरे, तुझी सॅक उघडी राहिली होती, आतलं सामान पडलंय खाली.”
“खड्ड्यात घाल ती सॅक! वेळ नाहीये आपल्याकडे. चल.”
सॅक तशीच टाकून वल्ल्या निघाला. आता मार्गदर्शनाची सूत्रं त्याच्या हातात होती. दोघेही न थांबता रस्त्यातले त्या पाताळयंत्री भेगांचं मायाजाल चुकवत चालत होते. नाही म्हटलं तरी त्यामुळे वेळ जास्त लागत होता.
अर्धा तास गेला असेल. अचानक मह्या थांबला. तो थांबल्याची जाणीव होऊन वल्ल्याही थांबला..
“काय झालं?”
“एक सेकंद. पाहू दे...” सम्याला खाली ठेवत, त्याचा हात हातात घेत मह्या म्हणाला.
“नाडी लागत नाहीये याची.”
“काय?”
“मानेजवळच्या शिरेचेही ठोके बंद पडलेयत. सम्या इज नो मोअर, वल्ल्या!!” हताशपणे मह्या म्हणाला.
“इंपॉसिबल! तूच म्हणालेलास, खाली पोहोचल्यावर मदत घेऊन याला वाचवू म्हणून..”
"तो प्रयत्न करणंच आपल्या हातात होतं. एकतर नाग! त्यात तो छातीवर चावला हार्टच्या जवळ. चान्सेस कमीच होते.”
“अरे पण म्हणून..” सम्याच्या चेहर्याकवरून हात फिरवत वल्ल्या म्हणाला. जिवंतपणाची कुठलीच लक्षणं सम्यामध्ये दिसत नव्हती.
ओझं सोबत घेऊन जाण्यापेक्षा इथल्याच एखाद्या दरीत सम्याचा मृतदेह सोडून द्यायची मह्याची कल्पना त्यानेच अमलात आणली.
वल्ल्या मात्र एकाच ठिकाणी हताशपणे बसून राहिला.
“तू.. तू मारलंयस सम्याला!!!” तारस्वरात किंचाळत वल्ल्याने मह्यावर आरोपच केला.
“वल्ल्या, शुद्धीवर आहेस का? सम्याला साप चावलेला तूही पाहिलायस.”
“यालाच नाही, आतापर्यंतच्या सगळ्यांनाच तूच मारलंयस!” भीतीने की संतापाने वल्ल्या थरथरत होता.
“सगळे अपघात होते. तू डोळ्यांनी पाहिलेयस.”
“नाही! ते अपघात नव्हते. आता माझ्या लक्षात यायला लागलंय. ते अपघात वाटतील असे खूनच होते. खुनी आहेस तू!!”
“कशावरून म्हणतोयस हे सगळं?”
“आधी तो म्हातारा! तूच त्याला सोडायला त्याच्यासोबत गेलेलास...”
“सम्याही माझ्यासोबत होता, हे विसरतोयस तू!”
“हो, पण तू सम्याला पुढे पाठवलेलंसं. म्हातार्यासचं तोंड आवळून त्याला त्या दरीत फेकायला तुला तेवढा वेळ पुरेसा होता.”
“अरे पण...”
“थांब. अजून माझं बोलणं संपलेलं नाहीये. शश्या पडला तेव्हा सम्याचा टॉर्च तूच फेकलेलास. तोही बरोबर त्या सुटलेल्या दगडांच्या मध्येच.”
“मी रागाच्या भरात फेकला तो, मला दिशेचं भान नव्हतं तेव्हा.”
“सम्या मेला तो साप चावल्याने!”
“इथे माझा काय संबंध?”
“तू ट्रेंन्ड सर्पमित्र आहेस. सॅकमधून एखादा साप आणणं तुला काय जड होतं? मीच तुझी सॅक उचलली. चेन उघडी होती म्हणून वस्तूही सांडल्या. तेव्हा लक्षात नाही आलं, पण आता येतंय. तू मुद्दामच उघडी ठेवली असणार ती.”
“अरे पण मी कशाला जीव घेऊ माझ्याच मित्रांचे?”
“कारण तू कितीही बेडरपणा दाखवलास तरी तुला या कातळमाळाच्या हकीकतीची खातरी पटलेली होती.”
“हे मात्र अती होतंय वल्ल्या! खातरी पटली असती तर रात्रीच म्हातार्या सोबत सगळेच निघू असं नसतं का म्हणालो?”
“नाही. मुद्दाम म्हणाला नव्हतास. तुला पूर्णं खातरी होती की आपण चौघे आहोत आणि बळीही चारच लागतात! म्हातारा इथलाच होता. कसाही वाचला असता, पण आपण चौघे मात्र बळी जाणारच होतो.”
“म्हणजे मीही त्यातच आलो ना!”
“आता येत नाहीस.. म्हातारा, शशी, सम्या आणि उरलेला शेवटचा मी! माझी खातरी आहे आता माझा नंबर आहे.”
“पण मी कशाला हे सगळं करेन?”
“जिवंत राहण्यासाठी. चौघे गेले की या कातळमाळाची भूक शांत होईल आणि तू सुखरूप निघून जाऊ शकशील.”
`त्या'ची भूक अजून भागली नव्हती, आणि हातातोंडाशी आलेला घास सावध झालेला पाहून `ते' गडबडलं. पण आता हालचाल करण्यात अर्थ नव्हता. आपल्या ऊर्जेची ताकद `त्या'ला माहीत होती. सगळंच बिनसण्याऐवजी वाट पाहणं योग्य होतं. `ते' शांतच राहिलं.
“बरं, हे सगळं खरं असेल असं गृहीत धरलं, तरी सम्याचं काय? इथे येईपर्यंत कातळमाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं आपल्याला. मग मी सॅकमध्ये साप भरून कशाला आणेन?”
“माहीत नाही. कदाचित इथेच सापडला असेल, किंवा.. किंवा.. हे सगळं तुला आधीच माहीत होतं.” भयाण आवाजात वल्ल्या म्हणाला.
“वल्ल्या! भानावर ये. अरे, मी तुमच्यासोबतच इथे आलोय.”
“तू आधीही कधी आला असशील. तुला हा सगळा प्रकारही माहीत असेल. जाणूनबुजून तू इथला ट्रेक ठरवलास.”
“जाणूनबुजून? अरे, मीच माझा जीव कशाला धोक्यात घालेन?”
“काही सेटलमेंट असल्या तर? इथे बळी पोहोचवण्याबद्दल तुला काही मिळणार असेल तर? गुप्तधन वगैरे..”
“वल्ल्या! नॉन्सेन्ससारखा बोलू नकोस. आजच्या काळात या असल्या गोष्टींवर विश्वास तरी ठेवेन का मी?”
“मग सांग ना! का? का केलंस हे सगळं?”
“माझा यात काही संबंध नाहीये. किती वेळा सांगू तुला? हे सगळे अपघात होते.”
“पण एकूण तीनच ना? पुढचा नंबर माझा, हे नक्की.”
“वल्ल्या, शांत हो. भलतेच निष्कर्ष काढण्याऐवजी इथून बाहेर पडायचं बघू आधी.”
“सॉरी मह्या! मी आता तुझ्यासोबत येणार नाहीये. इन फॅक्ट, तू माझ्यापुढे निघून जा. नको, तू मागेच थांब. मी पुढे जातो. नको श्या.. एकही ऑप्शन बरोबर नाहीये. पुढे गेलास तरी धोकाच. मागे राहिलास तरी धोकाच. माझा शेवट पक्का आज..” वल्ल्या थेट रडायलाच लागला. आधीच्या वातावरणात त्याच्या हुंदक्यांची भर पडली.
“वल्ल्या, तू सुखरूप घरी पोहोचशील.” त्याच्यापासून दूर जात मह्या म्हणाला.
“शक्यच नाही. तीन बळी गेलेले आहेत म्हटल्यावर, चौथा बळी गेल्याशिवाय हा कातळमाळ शांत होणार नाही. मी घरी जाणं शक्य नाही.”
“कातळमाळाला त्याचा चौथा बळी मिळेल वल्ल्या! तू पुढे नीघ.” मागे सरकत मह्या म्हणाला.
“मह्या..”
“तू तर मला दोषी मानलंच आहेस. यदाकदाचित हे सगळं खरं असेल तर दोघांमधला एक बळी पडणार. चान्स फिफ्टी पर्सेंट.. समजा, आपण दोघेही सुखरूप उतरलो, तरी तुझ्या मनातला संशय कायम राहणार कदाचित आयुष्यभर.. झाल्या प्रकाराची चौकशी झाली की पहिला संशयित मलाच धरलं जाणार! दुर्दैवाने प्रत्येक अपघातात माझी काही ना काही भूमिका होतीच. तसंही घरी वाट पाहायला कुणी नाहीये माझं. तू मात्र एकुलता एक.. शंभर टक्के चान्स तूच घे. आता मात्र एकटाच सांभाळून उतर. ताबडतोब चालू पड इथून.” मह्या मागे सरकत एव्हाना दरीच्या टोकाशी पोहोचला होता.
तो नक्की काय करतोय हे वल्ल्याला जाणवलं, पण तो त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आतच मह्याने आपलं शरीर दरीत झोकून दिलं.
‘डॅम! सालं चुकलंच आपलं! मह्या स्वभावाने रफ असला तरी खुनी वगैरे असेल असं डोक्यातच यायला नको होतं आपल्या.’ आता उपरती होऊन काही फायदा नव्हता. एका अर्थी मह्याच्या कृत्यामुळे वल्ल्याला फार दुःख नाही झालं. थोडा पाशवी आनंद मिळाला म्हटलं तरी चालेल. आता तो सेफ होता. कातळमाळाला त्याचे चारही बळी मिळालेले होते, म्हणजेच आता तो सुरक्षित होता.
थोड्या उत्साहातच चालता चालता वल्ल्याच्या मनात विचार चालले होते. मघाचं दडपण नाहीसं झालं होतं. खाली उतरल्यावर या अपघाताची खबर कशी द्यायची, याची तयारी मनाशी करतच त्याने झपाझप पावलं उचलायला सुरुवात केली, आणि अचानक पुढे पडलेल्या पायाखाली जमीन नाही याची जाणीव त्याला झाली. समोर काय आहे याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचून त्याचा प्रतिसाद यायच्या आतच वल्ल्या त्या अंतहीन पोकळीत होता.
तोंडातून किंकाळी निघाली, पण मनात अजूनही प्रश्न होता. ‘चारांचीच गरज असताना पाचवा का?’ वल्ल्याची शेवटची किंकाळी ऐकायलाही तिथे कुणीच नव्हतं.
`त्या'ची भूक भागली होती आणि ते पुन्हा सुप्तनिद्रेत जायच्या मार्गावर होतं...

‘आपण डायल केलेला नंबर सध्या बंद आहे.’ पलीकडून यांत्रिक आवाजात सत्ताविसाव्या वेळी ती बाई सांगत होती. वैतागून त्याने मोबाईल आपटला. दोष मोबाइलचाच होता. रात्री कधीतरी बाजूच्या टेबलावर ठेवलेला फोन खाली पडून बॅटरी वेगळी झाली होती. त्यामुळे अलार्मच झाला नाही.
“साला, मला टाकून तिघेच गेले वाटतं...” उरलेल्यांना मनातल्या मनात परत एकदा शिव्या घालायला मह्याने सुरुवात केली.

प्रक्षेप उभा करण्याची आपली युक्ती सफल झाल्याची नोंद घेत `ते' समाधानाने सुप्तनिद्रेत निघालं.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

1 Nov 2013 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर

रमेश पवारांच्या 'हाईक' ह्या, पारितोषिक विजेत्या, एकांकिकेला अशक्य फाटे फोडून कथानक बनविल्यासारखे वाटत आहे. कथा अमानवी असल्याने अतिरंजकता स्वाभाविक असावी. असो.

कपिलमुनी's picture

11 Nov 2013 - 3:28 pm | कपिलमुनी

अगदी अगदी..

'हाईक'ची आठवण झालीच..

कवितानागेश's picture

3 Nov 2013 - 12:56 am | कवितानागेश

भिती वाटली. :(

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 6:49 am | स्पंदना

ही गोष्ट वाचल्यावर अंगावर अक्षरशः काटा आला.
वातावरण र्निर्मिती, ठळक शब्दातले "त्या"चे विचार, सारच भारी!

जॅक डनियल्स's picture

16 Nov 2013 - 10:59 pm | जॅक डनियल्स

कातळमाळ वाचून, नवेगावबांध (चंद्रपू)) च्या पोखरडोंगरी ची आठवण झाली. "चकवा चांदण" या पुस्तकात त्याचे सुंदर वर्णन आहे.