साहित्य: दोन मोठ्या वाट्या हरभरा डाळीचे पीठ (बेसन), दोन टीस्पून मोहनासाठी गार तेल, दोन वाट्या साखर, कक्ष तापमानाचे पाणी, तेल अथवा तूप, वेलदोड्यांची पूड भरडसर, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे, असल्यास बुंदी पाडायचा झारा, नसल्यास नेहमीचा झारा, डाव.
कृती: एका पातेल्यात डाळीचे पीठ पाणी घालून कालवून ठेवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात दोन चमचे तेल घालून पीठ घोटत रहावे. दोन वाट्या बेसनाला साधारण दीड वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी लागले. पाण्याचे प्रमाण थोडेफार वेगळे असू शकेल. पिठाची चांगली धार पडू लागली व पीठ चकचकीत झाले की थांबावे. तळणी तापत घालावी. तेल/तूप तापल्यावर आच मध्यम ठेवावी. डाव्या हातात झारा पकडून उजव्या हाताने डावभर पीठ त्यावर ओतत रहावे. त्याचवेळी झारा तळणीवर फिरवत रहावा. फार उंच किंवा अगदी तेलाजवळ झारा नेऊ नये. कढईच्या काठावर ठेवावा. जमल्यास झारा कढईच्या काठावर हलकेच आपटावा म्हणजे बुंदी हलकी होते. न जमल्यास पीठ नुसते ओतावे. या बुंदीच्या कळ्या खमंग तळाव्यात. हे बराच वेळ चालणारे काम असल्याने घाई न करता एकेक घाणा काढावा. सर्व बुंदी तळून झाल्यावर दुसर्या पातेल्यात साखर व पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. आपल्याला अगदी एकतारी पाक करावयाचा आहे. पाक होत असताना त्यात बेदाणे, काजू, वेलदोड्याची भरड पूड घालावी. आता आच बंद करून बुंदीच्या कळ्या घालून नीट हलवावे. साधारण अर्ध्यातासाने लाडू वळता येईल इतपत मिश्रण तयार होते. ते परातीत काढून घेऊन जरा फेसावे. मिश्रण फार कोरडे वाटल्यास किंवा लाडूची गोडी कमी वाटल्यास आणखी अर्धी वाटी किंवा आवडत असल्यास एक वाटी साखरेचा पाक करून वरून ओतावा. आता मिश्रण बरोबर वाटल्यास पाण्याच्या हाताने लाडू वळावेत. मला दोन वाटी बेसनाला तीन वाटी साखरेच्या पाकाची गोडी जास्त आवडली.
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 2:27 pm | मदनबाण
आज्जे लाडू आवडला बरं का... ;)
1 Nov 2013 - 2:53 pm | बहुगुणी
सगळंच लई भारी!
1 Nov 2013 - 2:54 pm | ऋषिकेश
छान .. एक शंका:
अर्ध्यातासाने हे मिश्रण आपोआप तयार होते की अर्धा तास हे मिश्रण हलवत रहायचे आहे?
बाकी कडक बुंदींच्या कडकड्या लाडूंसाठी काही वेगळे करावे लागते का?
बेसनात पाणी पुरेसे झाले हे कसे ओळखावे?
(गेल्यावेळी एकदा हा प्रयोग फसला आहे. ही क्रुती वाचून पुन्हा प्रयत्न करावासा वाटतो आहे)
1 Nov 2013 - 6:01 pm | रेवती
ऋ, मिश्रण नुसतेच ठेवून द्यायचे. दर पाचेक मिनिटांनी हलवायचे तेवढेच! पाक थोडा घट्ट झाला (म्हणजे पाणी कमी झाले) तर पाचेक मिनिटातच ते लक्षात येते. बुंदीचे मिश्रण खळखळीत होते. आमच्या इथल्या साखरेस गोडी थोडी कमी असल्याने साखर जास्त घ्यावी लागली. समजा, दोन वाट्या बेसनास तू दोन वाट्या साखरेचा पाक केलास तर त्यातील वाटीभर वेगळा काढून ठेव. पाच मिनिटांनी पाक मुरेल, मग हा बाजूला ठेवलेला मिसळायचा, किंवा जास्तीचा वेगळा करून मिसळायचा. लाडू वळतेवेळी मिश्रण हाताने थोडे फेसायचे आहे त्यावेळी थोडे ओलसर हवे इतपत पाक हवा.
1 Nov 2013 - 4:25 pm | अनन्न्या
सुंदर झालेत लाडू! घरी करायचा प्रयत्न नाही केला कधी!
1 Nov 2013 - 4:29 pm | पैसा
बुंदी घरी करण्यापासून सगळे इतके निगुतीने केले आहे की बस! उचलून खावेसे वाटत आहेत लाडू!
1 Nov 2013 - 4:33 pm | प्रभाकर पेठकर
बुंदिचे लाडू म्हणजे, खरं पाहता, लग्नघराचीच आठवण होते. खुप आवडणारा पदार्थ आहे हा.
1 Nov 2013 - 4:49 pm | प्यारे१
वाह! रेवती आज्ज्जी मस्तच झालेच लाडू.
1 Nov 2013 - 9:58 pm | मुक्त विहारि
तुपातलेच लाडू उत्तम
तेल किंवा डालडा वापररलेत तर चव मार खाते..
(खाईन तर तूपाशी नाहीतर उपाशी) मुवि
1 Nov 2013 - 10:31 pm | अजया
अवघड काम आहे हे! तुझ्या फोटोतुन उचलुन आयते खाता येतील का?
2 Nov 2013 - 1:35 pm | दिपक.कुवेत
लगेच उचलुन खावसा वाटतोय.
2 Nov 2013 - 3:56 pm | सानिकास्वप्निल
लाडू खूप सुंदर दिसतायेत :)
पाकृ आवडली गं
3 Nov 2013 - 7:32 am | सुहास झेले
मस्तच :)
3 Nov 2013 - 9:37 pm | सुधीर मुतालीक
बुंदिचे लाडु हा माझा अगदी वीक प्वाईंट ! त्यामुळे वाचताना मजा आली.
6 Nov 2013 - 6:53 am | स्पंदना
करता येतील का ग घरात खरेच?
या वेळी झारा आणावा म्हणतेय छोटासा. तेव्हढेच करता येतील.
7 Nov 2013 - 6:32 pm | सूड
गेल्या वर्षी हौस म्हणून करुन पाह्यले होते अर्धा किलो डाळीच्या पिठाचे जेमतेम. नंतर हा आपला प्रांत नव्हे असं कळलं. वळताना सगळी बुंदी फिरुन हाताला लागत होती. शेवटी सांडगे घालतात तसं एका परातीत मोठे मोठे गोळे सोडून ठेवले आणि थंड झाल्यावर डब्यात भरले.
8 Nov 2013 - 3:20 pm | पद्मश्री चित्रे
छान आहेत लाडु.
पण करायचा प्रयत्न करावा का , जमेल का असं वाटतं ..
9 Nov 2013 - 5:26 pm | त्रिवेणी
ब्बाबो
बुंदीचे लाडू आणि घरी. मला 2 लाडू पाठवून द्याल.
(आयतोबा)त्रिवेणी
18 Nov 2013 - 9:46 am | इन्दुसुता
उत्कृष्ट पाकृ.
आजवर घरी करून बघायची हिम्मत झाली नाही. आता करून बघेन म्हणते.