श्रीविठ्ठल : मला उमगलेला

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Jul 2013 - 7:04 am

श्रीविठ्ठल :मला समजलेला

१९७८-७९ साल असावं. डॉ.रा.चिं.ढेरे यांचे "महाराष्ट्राचा देव्हारा" हे पुस्तक हातात पडलं. त्या आधी ५-६ वर्षे त्यांचे "लोकसंस्कृतीची क्षितिजे" हे पुस्तकही घेतले होते. शहरात वाढलो, शिक्षण झाले त्यामुळे लोकसंस्कृतीशी ओळख
तोंडदेखलीच. पण मी या पुस्तकाने प्रभावित झालो. त्यांची विद्वत्ता हा काही माझ्या तोकड्या ज्ञानाच्या कक्षेतला भाग नव्हता पण त्यांची शैली, भाषाप्रभुत्व, माहिती गोळा करण्याकरिता घेतलेले श्रम, नित्कर्षाला येईपर्यंत केलेली मांडणी यांनी मी प्रभावित झालो. त्यामुळे "श्रीविठ्ठल:एक महासमन्वय" या लेखाने मी भारावलोच. परत आम्हा दोघांमधला एक धागा, संत साहित्य यावरील श्रद्धा, हाही एक भाग होताच. या लेखात त्यांनी विठ्ठलाचा विचार त्याचे लोकधर्मी रूप, पांडुरंग शब्द कसा आला, बौद्ध अवताराचा परिणाम, कानडा विठ्ठलु इ. गोष्टींचा उहापोह करीत
केला आहे. आजचे माझे लिखाण मात्र थोड्या निराळ्या मार्गाचे आहे. पुढील माहिती नवीन नक्कीच नाही पण एकत्रित सापडेल एवढेच.
.

प्रथम विठ्ठल आणि इतर देव विष्णु, शंकर, देवी, गणपती, राम, कृष्ण इ. यांच्यामधील प्रमुख फरक पाहू.
(१) इतर देवांसारखा विठ्ठलाचा उल्लेख कोणत्याही श्रुति-स्मृति-पुराणात नाही. तसा हा नवा कोरा देव आहे.
(२) कोणी संकटात सापडला म्हणून याचा अवतार झालेला नाही. रावणाचा त्रास त्रिलोकाला झाला, राम आला. कंस-कौरावादी दुष्टांच्या संहाराला कृष्ण अवतारला. कोणताही भक्त संकटात आहे म्हणून विठ्ठल एखाद्या दैत्याचा संहार करत नाही. फार काय, याच्या हातात हत्यारच नाही !
(३) पुडलिकाने धावा केला म्हणून हा आलेलाच नाही. इतर वेळी भक्ताला देवाला भेटावयाची आंस असते, येथे देवालाच भक्ताला भेटावयाची ओढ लागलेली दिसते. बर हा भक्तही great, देव आला तर याने त्याच्याकडे ढुंकुनही पाहिले नाही, मागे एक वीट भिरकावली व "रहा उभा" म्हणाला. देव बिचारा अजून त्या विटेवरच "युगे अठ्ठाविस" उभाच आहे.
(४) पूर्वीची प्रथा पाहिली तर याचे भक्त याला सखाच समजत. "प्रथम भेटीं आलिंगन ! मग वंदावे चरण" !! आता ही प्रथा नाही पण पूर्वी होती. (भृगूने विष्णूला मारलेली लाथ हा आक्रस्थळेपणा सोडला तर) इतर देवांना हे चालेल असे वाटत नाही.
(५) भक्तावर संकट आले की तो देवाची आराधना करतो. काही लाच देतो, फार झालं तर देवालाच पाण्यात घालतो. विठ्ठलाकडे असे काही नाही. क्लेश झाले तर तो आपल्या पूर्वसंचिताचा भाग आहे, मुकाट्याने सोसावयाचे. वाटले तर विठ्ठालाने आपल्याला सहन करावयाची ताकद द्यावी एवढीच प्रार्थना करावयाची. आपला त्रास देवाने आपल्या डोक्यावर घ्यावा हे अमान्य. एकदा चुकून तुकारामबोवांनी "आपले अभंग इंद्रायणीत बुडवले" म्हणून नदीकाठी धरणे धरले. देवाने १३ दिवस पाण्यात राहून ते संभाळले. नंतर बोवांना इतका पश्चात्ताप झाला की त्यांनी जाहीर केले की "एकदा चूक झाली पण आता कोणी मान कापायला आला तरी तुला त्रास देणार नाही."
(६) वारी एकमेकाद्वितीय. काशीयात्रा एकदाच करावयाची, तीही आयुष्याचे शेवटी. इतरही तश्याच. नवस फेडावयाला वा करावयाला. एकट्यने वा फार फार तर कुटुंबाबरोबर. पण दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करवयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत, आपल्या गावातून निघणार्‍या दिंडीबरोबर. जातांना बरोबर काय असते ? न येऊ शकणार्‍यांचे मन व ज्ञानेश्वर-तुकारामादी संत संगत आहेत हा विश्वास ! परत येतांना ? जीवनातले कष्ट उचलावयाची उभारी व पुढच्या वर्षीही येण्याचा निश्चय. दिसते असे कोठे इतर ठिकाणी ?
(७) आणखीही सांगता येतील पण तूर्तास इतकेच पुरे.

आता हा विठ्ठल असा निराळा कां याचा विचार करू. प्रथम कोणत्याही पुराणोक्त देवाबद्दल काही बोलतांना, लिहतांना ते पूर्वासूरींच्या लिखाणाविरुद्ध नाही याची काळजी घ्यावी लागते. पण विठ्ठल हा कोरा देव असल्याने तुम्हाला त्याच्या कोणत्याही कथा लिहण्यास वाव मिळतो. संतांनी याचा पुरेपुर फायदा घेतला. आज तुम्हाला विठ्ठलाबद्दल जे वाचावयास मिळते ते या संतांनी लिहलेले. जर नामदेवाला वाटले हा विठ्ठल माझा सखा आहे तर मग त्याने खुशाल लिहावे की देव माझी खीर पितो. आणि मग जनीने तरी का मागे रहावे ? तिने या विठाईला वेणीफणी करावयास लावले, पाणी भरावयास लावले व शेण्याही गोळा करण्याचे काम सोपावले. जर एखाद्या न्हाव्याला वाटले की आज हजामत करण्याऐवजी विठुनामाचा गजर करावा तर त्याचे रूप घेऊन बादशहाची हजामत करणे हे विठोबाचेच काम झाले. आता चोख्या महाराला मंदीरात जाऊन दर्शन घेण्याचे कारणच उरले नाही. देवच त्याचे घरी जेवावयास येऊ लागला. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात विठ्ठलाला कामाला जुंपले. तुमच्या घरांत पाच पंचवीस वर्षे काम करणारी मोलकरीण तुमच्या घराचीच एक व्यक्ती होते. तिला घराचा लळा लागतो. तसे विठ्ठल-भक्त यांचे झाले. विठ्ठलाला भक्तांवाचून चैन पडेना. जेव्हा ज्ञानेश्वर नामदेवाला घेऊन तीर्थयात्रेला जातो म्हणाले तेव्हा नामदेवासारखेच विठ्ठलाला विरहाचे दु:ख सहन होईना ! चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव कीर्तन करे तेव्हा भक्तांबरोबर विठ्ठलही नाचत असे. म्हणजे भक्त विठ्ठलनामात रमलेले तर प्रत्यक्ष विठ्ठल नामदेवाच्या दर्शनात रमलेले. संतांनी त्याला आई म्हणून बोधिले असले तरी प्रमुख भाव सख्य. या भावनेमुळे संत देवाशी खच्चुन भांडतात. नामदेवांच्या आईचे देवाशी भांडण नळावरच्या भांडणांची आवृत्ती आहे. या संतांनी स्वत:करिता देवाकडे काही मागितले नाही व मग ती प्रथाच पडली.
विठ्ठलभक्तांची एक खासियत. त्यांना मोक्षाची आंस नाही. त्यांनी एकमुखाने त्याची गरज नाही असे सांगितले. आपल्या धर्मातील अंतिम पायरीला ठुकरावले आहे. पंढरीपुढे वैकुंठ दुय्यम आहे. त्यांना भक्तीसुखापुढे, नामसंकिर्तनापुढे मुक्ती त्याज्यच वाटते. नामदेवांपासून तुकारामांपर्यंत सगळ्यंचे अभंग याला साक्ष आहेत. म्हणजे ते द्वैतवादी आहेत कां ? विठ्ठल निराळा व आपण त्याचे भक्त असे ते समजतात कां? अजिबात नाही. तुकारामांच्या प्रसिद्ध अभंगात ते सांगतात
आहे ऐसा देव वदवावी वाणी ! नाही ऐसा मनी अनुभवावा !!
हा अद्वैत, इतक्या रोखठोक शब्दांत बोवांनीच सांगावा. हे कोडे उलगडावयाची ही जागा नाही. (मिपावर अनेक व्यासंगी मंडळी आहेत,ते मार्गदर्शन करतीलच.) आपण आज एवढेच बघणार की या महान चळवळीचे उद्गाते नामदेव महाराज, विठ्ठलाला खीर पाजणारे,
प्रस्तराचा देव ! बोलत भक्तांते !
सांगते, ऐकते ! मूर्ख दोघे !!
या पायरीला कसे पोचले?
"केशवं प्रतिगच्छति" या न्यायाने आपण पोचतो "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव" ज्ञानदेवांपाशी. या नाथपंथीय बालयोग्याच्या ध्यानात आले की या अथांग,अजाण जनसमुदायाला वाचवावयाचे असेल तर वारकरी समुदाय हाच एकमेव वर्ग आपण लक्षित केला पाहिजे तेव्हा त्यांनी प्रथम नामदेवांना त्यांच्या भक्तीतील त्रुटी ध्यानात आणून दिल्या व सर्व जातींतील संतांना आपले तत्वज्ञान प्रेमाने समजावून दिले. सर्वांच्या सोबत वेळ काढावयाचा म्हणून तीर्थावळीत वेळ घालविला. अल्प काळांत सर्वांना हा "महाविष्णुचा अवतार" आपला सखा, आई वाटू लागला. त्यांनी ज्ञानेश्वरी एखादेवेळी कळण्यास अवघड जाईल म्हणून अभंग रचले. सर्वांभूती परमेश्वर हे पटवून देऊन जातींमधील उच्चनीचपणाचा फोलपणा उघड केला. आपण त्या ईश्वराचेच अंश आहोत हे कळल्यावर मुक्ती ही मागण्याची गोष्ट नाही. सांसरिक क्लेश मला होत नाहीत, माझ्या शरीराला होतात हे कळल्यावर त्यांचे त्रास होणे कमी झाले. थोडक्यात वारकरी पंथाच्या भक्तीला ज्ञानाची जोड दिली. या भक्तीला एका उंचीवर नेऊन ठेवले. आपले चित्विलासवादी अद्वैत बेमालुमपणे त्यांच्या भक्तीत मिसळून टाकले. इतक्या हळुवारपणाने, माउलीच म्हणतात तसे
का कमलावरी भवरं ! पाये ठेवति हलुवार !
कुचुंबेल केसर ! इया शंका !!
ज्ञानेश्वरीत हे ओवीओवीत सांगितले म्हणून नामदेव म्हणतात ’ एक तरी ओवी अनुभवावी " थोडक्यात विठ्ठलाची भक्ती कशी करावी याचाच धडा घालून दिला. विठ्ठल, त्याची भक्ती व भक्त यांना एकरूप केले.
हाच मला उमजलेला विठ्ठल.
( या व मागील सोयराबाईवरील लेखांत प्रत्येक संबंधित जागी अभंग नाही तरी त्याचा भाग द्यावा असे वाटत होते. पण लेख वाढवणार तरी किती? क्षमस्व.)

शरद

संस्कृतीमत

प्रतिक्रिया

हिंदु धर्मात वेळोवेळी एक नवी आवृत्ती येत असल्याचा हा एक दाखला मानता येइल.
जेंव्हा जेंव्हा या धर्मात कर्मठपणा वाढीस लागतो तेंव्हा एक नवी आवृत्ती जन्माला येउन लोक त्या नव्या आवृत्तीच्या मार्गे आराधना करुन आपली श्रद्धा अन विश्वास अढळ राखायचा प्रय्त्न करतात. वारकरी समाज हा ही एक नवी आवृत्तीच हिंदुत्वाची. मुळात देवाने, सर्व वर्ण हे एकाच घरात जन्मले असल्याचा दाखला दिल्याने उगाचच वाढणारा कर्मठपणा नाकारण्यासाठी नव्या मार्गाने देवाला आराधने हाच एक उपाय उरतो.
वारकरी पंथ ध्यानादी उपासनांच्या ऐवजी नित्यकर्मे उरकत असताना देवाचा साक्षात्कार घडल्याचे दाखवितो. मी देवाला भेटण्याऐवजी देवाला मला भेटावेसे वाटते हा सुद्धा एक नवाच दृष्टीकोण या पंथाने आणला.
शरदसर फार छान झालाय लेख अन तुम्ही तरी निदान विस्तारभय पाळु नये अशी विनंती.

कवितानागेश's picture

19 Jul 2013 - 12:00 am | कवितानागेश

वारकरी पंथ ध्यानादी उपासनांच्या ऐवजी नित्यकर्मे उरकत असताना देवाचा साक्षात्कार घडल्याचे दाखवितो.>
आणि अश्या नित्यकर्मातच देव पाहणार्‍या पुंडलिकासाठी विठोबादेखिल मूर्तरूप घेउन ताटकळत उभा राहायला तयार असतो!
:)

अग्निकोल्हा's picture

19 Jul 2013 - 2:48 am | अग्निकोल्हा

जेंव्हा जेंव्हा या धर्मात कर्मठपणा वाढीस लागतो तेंव्हा एक नवी आवृत्ती जन्माला येउन लोक त्या नव्या आवृत्तीच्या मार्गे आराधना करुन आपली श्रद्धा अन विश्वास अढळ राखायचा प्रय्त्न करतात.

मर्मावर बोट ठेवलं :)

प्रचेतस's picture

18 Jul 2013 - 8:48 am | प्रचेतस

अतिशय उत्तम लेख.

सुधीर's picture

18 Jul 2013 - 9:06 am | सुधीर

पुन्हा एकदा सुंदर लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2013 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर लेख. एका नविन दृष्टिकोनातून केलेले विवेचन खूप भावले.

खरं तर हिंदु धर्म यासाठीच इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळा आहे. त्याच्यात प्रत्येकाला आपला वेगळा विचार मांडण्याची संधी मिळालेली आहे. अर्थात याला प्रस्थापितांचा विरोध होत नव्हता/नाही असे नाही... किंबहुना अश्या बदलात प्रस्थापितांच्या हितसंबधांना धोका पोहोचत असल्याने असा विरोध झाला नसता तर तेच जगावेगळे आणि आश्चर्यकारक झाले असते. पण हितसंबंधांना धोका पोहोचतो म्हणून (अ) जाळणे / ठार करणे किंवा (ब) आपला विचार जबरदस्तीने अथवा युद्धाने पसरवणे असे उपाय "संघटीत रित्या" तरी प्रस्थापितांकडून झाले नाहीत. आणि याचे कारण त्यांना तसे करावे वाटलेच नसेल असे आजिबात वाटत नाही, तर समाजाच्या मनात अश्या करणीने अपेक्षित परिणामाच्या विरुद्ध विचार उत्पन्न होतील आणि आपलेच आसन डळमळीत होईल ही भिती होती असेच वाटते. त्यामुळे "वाळीत टाकणे" अथवा "धर्मभ्रष्ट करणे" याच्या पलिकडे या उपायांची मजल जावून "मारून टा़कणे" इथपर्यंत गेली नाही. थोडक्यात धर्माकरताही अधर्मी वागणे हिंदू समाजाच्या पचनी पडत नाही (कृपया हे विधान हजारो वर्षांच्या इतिहासाच्या कॅनव्हासवर बघावे... खाप पंचायत, इ. च्या विशिष्टा उदाहरणावर नाही).

याचा परिणाम असा की एकाच धर्मात भिन्न किंवा अगदी परस्पर विरोधी वाटणार्‍याही अनेक शाखा एकाच वेळेला बर्‍याचश्या समजूतीने नांदल्या. रामाच्या काळातही (जेव्हा हिंदु धर्म सर्वमान्य असावा) चार्वाकाचे अनुयाई होते आणि रामाला त्यांची काळजी होती असे म्हणतात !

(अ) नास्तीक, (आ) एकाच देवाला मानणारा (आणि तरिसुद्धा दुसर्‍या देवापुढे... कधी कधी तर दुसर्‍या धर्माच्या देवापुढेही... हात जोडण्या काही गैर आहे असे न वाटणारा), (इ) असंख्य देव आहेत यावर विश्वास ठेवणारा आणि (ई) स्वतःला अज्ञेय समजणारा, असे सर्व घटक एकाच काळात किंबहुना एकाच कुटुंबातही बर्‍यापैकी सुखाने नांदू शकणार्‍या धर्माचे एकुलते एक उदाहरण म्हणजे हिंदू धर्म. "अनेकतेत एकता" (Unity in Diversity) चे किंवा "विचार स्वातंत्र्याचे" एवढे ढळढळीत दुसरे उदाहरण मिळाणे कठीण आहे !

धन्या's picture

18 Jul 2013 - 11:36 am | धन्या

सुंदर लेख.

डॉ. ढेरेंचं "श्री विठठल एक महासमन्वय" हे पुस्तक ज्याला ज्याला महाराष्ट्राचं दैवत समजून घ्यायचं त्याने आवर्जून वाचावं असं आहे. आपल्या श्रद्धांना वास्तवाची जाणिव करुन देणारं आणि तरीही सश्रद्धाच्या श्रद्धेला धक्का न पोहोचवणारं पुस्तक आहे हे.

मदनबाण's picture

18 Jul 2013 - 11:44 am | मदनबाण

सुरेख लेखन !

चावटमेला's picture

18 Jul 2013 - 12:20 pm | चावटमेला

शरद सरांचा नेहमीप्रमाणेच आणखीन एक सुंदर लेख.

राघव's picture

18 Jul 2013 - 4:17 pm | राघव

खूप भरून आल्यासारखे झाले. असो.
बुवा, तुम्ही तरी कमीतकमी असे म्हणू नये की लेख लांबतो. आमच्या सारख्यांना हेच धन. लुटवावे.

मी_आहे_ना's picture

19 Jul 2013 - 3:17 pm | मी_आहे_ना

असेच म्हणतो

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2013 - 4:23 pm | प्रसाद गोडबोले

खुपच अप्रतिम लेख !!

रमेश आठवले's picture

18 Jul 2013 - 6:21 pm | रमेश आठवले

विठ्ठलावर मराठीमध्ये संत लिखाण जेवढे आहे तेवढे इतर भाषातून असेल असे वाटत नाही.असे असताना आद्य संत कवि ज्ञानेश्वर त्याला 'कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू' असे म्हणतात त्यावरून त्यांच्या काळात पंढरपूर हे कर्नाटकात होते असे समजते पण उमगत नाही. तसे सध्य्याही पंढरपूर, कर्नाटक व आंध्र प्रदेश यांच्याशी सीमा असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आहे.

.कर्नाटकातहि या देवाला खूप मानतात आणि आंध्र प्रदेशातही त्याचे भक्तजन आहेत.

.कॉंग्रेस चे प्रवक्ते दिग्विजयसिंग यांची हिंदुत्व विरोधात बोलणारे म्हणून प्रसिद्धी आहे. पण हाच माणूस गेले कैक वर्षे दर आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास जातो हे बर्याच लोकांना माहित नसावे.

'कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू ‘ याचा बोध मागे एकदा हम्पीला गेल्यावेळी झाला होता. तिथे वूठ्ठलाचे अतिशय सुरेख मंदिर आहे. कर्नाटकात अगर महाराष्ट्रात इतर कुठेही असे जुन्या काळातले विठ्ठलाचे मंदिर पाहिल्याचे आठवत नाही. तिथे अशी कथा ऐकायला मिळाली की विठ्ठलाचे मूळ मंदिर हम्पीचे. पुंडलिकाच्या भेटीसाठी तो पंढरपुरी आला अन तिथेच राहिला. म्हणून ‘कर्नाटकू’.

बॅटमॅन's picture

19 Jul 2013 - 3:39 pm | बॅटमॅन

नै, ती कथा अंमळ वेगळी आहे. विजयनगरचा राजा पंढरपुरातली विठ्ठलमूर्ती घेऊन हंपीला आला. खत्तरनाक मोठे देऊळ, पूजाअर्चा, सगळं अगदी राजेशाही थाटात चाल्लेलं.पण विठ्ठलाला तिथे सच्चे भक्त नसल्याने करमेना. मग त्याने एकनाथांचे पणजे भानुदासांना स्वप्नात दृष्टांत दिला की मला परत पंढरपुरात घेऊन चल म्हणून. मग ते गुपचूप तिकडे गेले अन सुमडीत मूर्ती घेऊन पंढरीला परत आले.

अन कानडा वो विठ्ठलू हे ज्ञानेश्वरांच्या अभंगात असेल तर ते विजयनगर साम्राज्याच्या आधीचे होते. तस्मात त्याला कर्नाटकू म्हणण्यामागे विजयनगरचा संबंध नसावा. मूळ दैवत कर्नाटकी होते असे त्यातून समजता यावे, पण त्यापलीकडे कुणाकडे काही माहिती असल्यास अवश्य शेअर करावी. रा.चिं.ढेरे यांची पुस्तके कुणी वाचली असल्यास त्यातून बरीच माहिती मिळू शकेल. मी ती वाचली नाहीत.

विजयनगरचा राजा पंढरपुरातली विठ्ठलमूर्ती घेऊन हंपीला आला

ही दंतकथाच वाटते.
हंपीच्या विठ्ठल मंदिरात स्वतंत्र विठ्ठ्ल मूर्ती असावी पण विजयनगरच्या पराजयानंतर तिथली मूर्ती भग्न होऊन गायब झालेली असावी. खुद्द महाराष्ट्रातील काही प्राचीन मंदिरांमध्येही आज रिकामे गाभारे आहेत.
बाकी पंढरपूर विठ्ठ्ल मंदिरात रामदेवराय यादवाचा एक शिलालेख आहे. विठ्ठ्ल मंदिराच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त तो कोरवून घेतला असल्यामुळे त्याला '८४ चा शिलालेख' असेही म्हणतात. (इ.स.१२७३ ते १२७७) म्हणजे साधारण ५ व्या भिल्लमाच्या वेळी हे मंदिर अस्तित्वात होते. तसाही मंदिरस्थापनेबद्दलचा पाचव्या भिल्लमाचा ११९२ मधला शिलालेख सापडलेला आहेच. त्यामुळे ह्या मंदिराचा कर्ता भिल्लम (पाचवा) असावा याला बळकटी मिळते.

पंढरपूर कर्णाटक प्रांतातील असे तेव्हा समजले जात असे की नाही ह्याची कल्पना नाही. पण तिकडील बहुतांशी अभिलेख हे कन्नड भाषेत आहेत.

बाकी मूर्तीविषयी अधिक माहिती धन्या देऊ शकेल. तसेच मूळची मूर्ती माढ्याला आहे अशी काहीशी एक थियरी आहे. कॉलिंग धन्या.

बॅटमॅन's picture

19 Jul 2013 - 6:41 pm | बॅटमॅन

अर्थातच. कथेचे एकूण नेचर पाहता दंतकथाच वाटते.

अन पंढरपूरचे मंदिर ८०० वर्षे जुने आहे ही नवीन माहिती कळाली. माहितीकरिता धन्यवाद.

त्या अनुषंगाने विचारतो, पंढरपूरच्या मंदिरापेक्षा जुने विठ्ठल मंदिर कुठे आहे का?

प्रचेतस's picture

19 Jul 2013 - 6:49 pm | प्रचेतस

माझ्या माहितीत तरी नाही.
विकीवर पाहता कटेवर हात असलेल्या विष्णूची मध्य प्रदेशातील ५ व्या शतकातील मूर्ती मिळाली बघ.

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 1:20 pm | बॅटमॅन

रोचक आहे!

बिरुटेसरांनी दिलेली माहितीही रोचक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2013 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रा.चि.ढेरे म्हणतात- (काढा श्री विठ्ठल : एक महासमन्वय आणि पाहा. पृ.क्र. १३३)

" संत भानुदासाच्या काळात कोणा विजयनगरच्या हिंदू राजाने मूर्ती स्वत:च्या राजधानीत नेल्याची आणि भानुदासाने ती परत आणल्याची कथा मराठी संतचरित्रपर ग्रंथात अनेक ठिकाणी रंगवून सांगितलेली आहे. परंतु त्या कथेच्या सत्यतेचा आणि ती सत्य असेल तर तीच्या काळाचा निर्णय करण्याची विश्वसनीय साधने उपलब्ध नाहीत. भानुदासाच्या घराण्याच्या वास्तूत म्हणजे पैठण येथील संत एकनाथांच्या वाड्यातील देवघरात जी विठ्ठल मूर्ती आहे, तिचे 'विजय विठ्ठल' हे नाव विजयनगरच्या विठ्ठलाशी संबद्ध आहे; तिचे ध्यानही विजयनगरकालीन द्क्षिणी विठ्ठलमूर्तीसारखे आहे. आणि ती आकाराने लहान असल्यामुळे विजयनगरहून महाराष्ट्रात परत येताना 'देव भानुदासाच्या पडशीत मावण्याइतका लहान झाला, या कथा संदर्भाशी जुळणारी आहे. दक्षिणी परंपरेत मात्र विजयनगर येथे विठ्ठल पंढरपुराहुन न्व्हे, तर वेंगटगिरीहून आला, असे मानले जाते "

वरील उतारा पुरेसा स्पष्ट असल्यामुळे अधिक बोलण्याची काही गरज नाही.

बाकी, माझे माढ्याच्या विठ्ठलाचे दर्शन रा.चि. ढेरे यांच्या श्री विठ्ठल: एक महासमन्वयामुळेच झाले होते ती आठवण झाली. मला पडलेला प्रश्न. कोणता मानू मी विठ्ठल. :)

-दिलीप बिरुटे

रमेश आठवले's picture

23 Jul 2013 - 5:56 pm | रमेश आठवले

"पंढरपूर कर्णाटक प्रांतातील असे तेव्हा समजले जात असे की नाही ह्याची कल्पना नाही. पण तिकडील बहुतांशी अभिलेख हे कन्नड भाषेत आहेत."
पंढरपुरला विठोबाच्या देवळातले शिलालेख कन्नड भाषेतले आहेत, या माहितीच्या अनुषंगाने ---
भाषावार प्रांत रचना झाली तेंव्हा तेलुगु भाषी आंध्र प्रदेश ने मद्रास (चेन्नई) व तिरुपती या दोन्हीवर आपला हक्क आहे असे सांगितले. या उलट तामिळनाडू ने तिरुपती वर आपला अधिकार आहे असे सांगितले. दोन्ही बाजूंनी आप आपले पुरावे सादर केल्यानंतर त्यावेळचे जेष्ठ कॉंग्रेसचे नेते राजगोपालाचारी यांनी तिरुपती आंध्रात असावे व त्या बदल्यात आंध्र प्रदेशने मद्रास वरचा आपला हक्क सोडावा असा तोडगा सुचविला आणि तो दोन्ही राज्यांनी मान्य केला.
या निर्णया प्रमाणे तिरुपती हे दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या चित्तूर या आंध्र प्रदेश च्या जिल्ह्यात आले व मद्रास हे तमिळनाडूची राजधानी झाले.
असे झाले असले तरी तिरुपती देवळातले शिलालेख तामिळ भाषेतलेच आहेत.

अहो हे बहुतेक लोकाना माहित आहे.आणि ते दरश्नाला सह कुटुम्ब जातात (जेव्हा पासुन मध्यप्रदेश्च्या मुख्यमन्त्रि पदावरुन पायउतार झाल्या पासुन्,तेव्हा पासुन या अतिमहत्वाच्या व्यक्ति मुळे सर्कारि यान्त्रणेवर होणारा ताण लोकाना दिसुन येत नाही.)

विकास's picture

18 Jul 2013 - 8:04 pm | विकास

लेख खूपच आवडला, भावला आणि पटला देखील. विठ्ठलाचे नाव मोठे करण्यात संतमंडळींचा मोठा वाटा आहे हे सांगण्याची गरज नाही. पण या विठ्ठलाला मोठे करत निव्वळ तत्कालीन गरज म्हणून जो भक्तीसंप्रदाय तयार केला गेला त्याचा कार्यकारणभाव सांगताना, कवी बींनी त्याचे "शांतीमय उत्क्रांती" असे वर्णन केले आहे.

कुठल्याशा एका धाग्यात मी त्यांच्या या "डंका" कवितेतील काही ओळी लिहील्या होत्या. आत्ता खाली संपूर्ण कविता, प्रतिसाद मोठा होत असला तरी धाग्यासंदर्भात असल्याने लिहीत आहे. त्यातील पहीली चार कडवी वाचताना, आजही तेच चालू असल्याची खंत वाटते इतकेच...

तेजाचे तारे तुटले मग मळेची सगळे पिकले !
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला;
अति महामूर पूर येते ढोंग्याच्या पावित्र्याला;
खडबडात उडवी जेव्हा कोरडया विधीचा मेळा;
चरकात मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती ,
लटक्याला मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे ! तेजाचे तारे तुटले !!

अचारविचारौघाचा नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी घट कसले बंध अपार
कोंडिले स्वार्थकोंड्यात,
जल सडले ते निभ्रांत
तरी धूर्त त्यांस तीर्थत्व
देऊनी नाडती भोळे ! तेजाचे तारे तुटले !!

कर्तव्य आणि श्रेयाची हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे फुंकिती विवेकेज्योती;
मग जुन्या अप्तावाक्याते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे ! तेजाचे तारे तुटले !!

घन तिमिरी घोर अघोरी विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
ही दंगल जेंव्हा होते
ना कळेची कोठून की ते
येतात बंडवाले ते,
जग हाले स्वागत बोले! तेजाचे तारे तुटले !!

या बड्या बंडवाल्यात, ज्ञानेश्वर माने पहीला
मोठ्यांच्या सिद्धांतांचा घेतला पुरा पडताळा
डांगोरा फोलकटांचा, पिटविला अलम दुनियेला
झुंजोनी देवादैत्या,
अमृता मधे न्हाली जनता
उजळला मराठी माथा
सत्तेचे प्रत्यय आले! तेजाचे तारे तुटले !!

हिमतीने अपुल्या प्रांती उत्क्रांती शांतीमय केली
प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली
अंगची करामत ज्यांनी, खल्विदा समर्पण केली
आम्ही त्या दिल्जानांचे
साथी ना मेलेल्यांचे
हे डंके झडती त्यांचे
ऐकोत कान असलेले! तेजाचे तारे तुटले !!

अभ्या..'s picture

19 Jul 2013 - 2:51 am | अभ्या..

सुरेख लेखन शरदसर.

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 4:17 pm | बाळ सप्रे

पण विठ्ठल हा कोरा देव असल्याने तुम्हाला त्याच्या कोणत्याही कथा लिहण्यास वाव मिळतो. संतांनी याचा पुरेपुर फायदा घेतला. आज तुम्हाला विठ्ठलाबद्दल जे वाचावयास मिळते ते या संतांनी लिहलेले. जर नामदेवाला वाटले हा विठ्ठल माझा सखा आहे तर मग त्याने खुशाल लिहावे की देव माझी खीर पितो. आणि मग जनीने तरी का मागे रहावे ? तिने या विठाईला वेणीफणी करावयास लावले, पाणी भरावयास लावले व शेण्याही गोळा करण्याचे काम सोपावले.

म्हणजे या सगळ्या कथा आहेत.. खर्‍या गोष्टी नव्हेत.. असे असुनही एवढ्या विठ्ठलभक्तीचे आश्चर्य वाटते एवढेच!!

Gawade Jawaharlal Ramchandra's picture

19 Jul 2013 - 4:19 pm | Gawade Jawaharl...

लेख खूपच आवडला ………… जवाहरलाल रामचंद्र गावडे

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 4:32 pm | बाळ सप्रे

विठ्ठल आणि इतर देव , वारी आणि काशीयात्रा यांची तुलना फारच बालिश वाटली..
आपला भक्तिमार्ग श्रेष्ठ सांगताना इतरांची हेटाळणी ते देखिल एकाच धर्मात.. सगळ्या धर्म/पंथ/भक्तीमार्गातला (किंबहुना ते मानणार्‍यांचा) हाच एक मुद्दा खटकतो..

शरद's picture

20 Jul 2013 - 7:29 am | शरद

वारी दरवर्षी, दिंडीबरोबर करावयाची व काशीयात्रा उत्तरवयांत, वैयक्तिक्,फार तर कुटुंबाबरोबर करावयाची एवढाच फरक मी दाखवला आहे.मोजून दोन वाक्यांत. यात कोठे हेटाळणी आली ? आपला भक्तिमार्ग श्रेष्ठ असे मी लेखांत कुठेही म्हटलेले नाही. "बालिश" हा शेरा आपल्या अभ्यासावर अवलंबून असल्याने स्विकार करावयासच पाहिजे. मी तर पहिल्यांदीच कबूल केले आहे की ही माहिती नवीन नाही. असो. आपला गैरसमज झाला असावा असे वाटते. तरीही आपल्याला काही आक्षेपार्ह वाटले असेल तर मी आपली माफी मागतो.
शरद

बाळ सप्रे's picture

20 Jul 2013 - 10:13 am | बाळ सप्रे

भक्तावर संकट आले की तो देवाची आराधना करतो. काही लाच देतो, फार झालं तर देवालाच पाण्यात घालतो. विठ्ठलाकडे असे काही नाही.

हा स्वर हेटाळणीचा नाही का?

शरद's picture

20 Jul 2013 - 12:27 pm | शरद

भक्तावर संकट आले की तो देवाची आराधना करतो. काही लाच देतो, फार झालं तर देवालाच पाण्यात घालतो. विठ्ठलाकडे असे काही नाही.
यात मी कोणाची हेटाळणी केली ? (१) सर्वसामान्य माणुस सकट आले की आराधना करतो. सगळ्या स्तोत्रांमध्ये-आरत्यांमध्ये हे आढळते. उदा. (मराठी आरत्या) संकटी पावावे".,"संकट निवारी", (हिंदी भजने) अपने हात उठाओ, दार पडो तेरे, ब्रह्मानंद कहि कर जोरी,भक्ति दान दिजै प्रभु तोरी! जनन-मरण-दुख संकट हरिया !! (संस्कृत स्तोत्रे) इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाही मुरारे !;
स्मरेद्यस्त्वां तस्य ज्वरजनित पीडापसरति इ. सगळ्यांत प्रार्थना कशाकरिता करावयाची किंवा फल काय हे स्पष्ट केले आहे. नवस बोलतात तेव्हा "माझे हे काम झाले कीं बोकड कापीन" ही लाचच आहे. महासंकट प्राप्त झाले कीं गणपति पाण्यात घालून ठेवावयाचा हीही प्रथा आहे. संतांना हे पसंत नाही. म्हणून त्यांची विठ्ठल भक्तीत हे सर्व दूर ठेवले. त्यांनी यावर झॊड उठवली. मी फक्त तुलने करिता उल्लेख केला आहे.
मी मिपावरील एका लेखात (२२००४) माझे मत मांडले होते की देव ही माणसाची "गरज" आहे. तो त्याच्या कुवतीप्रमाणे देव निवडतो. तो आराधना पद्धती रुढीप्रमाणे स्विकारत असेल तर त्याला मी दुषणे देत नाही. बाळासाहेब, विठ्ठल भक्ति इतरांपेक्षा निराळी आहे असे सांगितले म्हणजे दुसर्‍यांची हेटाळणी केली असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही.
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2013 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, लेख आवडला. नेहमीप्रमाणेच वाचनीय.

-दिलीप बिरुटे

अनिरुद्ध प's picture

19 Jul 2013 - 7:51 pm | अनिरुद्ध प

वाचुन विट्ठ्लाची नविन ओळ्ख झाली.

अनिल तापकीर's picture

20 Jul 2013 - 12:53 pm | अनिल तापकीर

छान लेखन

पैसा's picture

20 Jul 2013 - 3:50 pm | पैसा

वेगळ्या दृष्टीकोनातून विठोबा आवडला. अन्य काही प्रतिक्रियाही उत्तम आहेत. "संन्याशाच्या पोराचे" कर्तृत्व पाहिले की दर वेळी नव्याने नतमस्तक व्हावे असे वाटते.

इन्दुसुता's picture

22 Jul 2013 - 8:02 am | इन्दुसुता

उत्तम लेख आणि सप्रे यांना दिलेला दुसरा प्रतिसाद (यात तुमचे मत स्पष्ट केले आहे म्हणून).

"संन्याशाच्या पोराचे" कर्तृत्व पाहिले की दर वेळी नव्याने नतमस्तक व्हावे असे वाटते.

अगदी असेच.

विटेकर's picture

24 Jul 2013 - 5:08 pm | विटेकर

आवडला..