तिकोना हा विसापूर-लोहगडच्या अगदी मागच्या बाजूला पवना धरणाच्या बाजूला वसलेला गड आहे. समोर तुंग उभा असून मध्ये पवनेचे अथांग पाणी व हिरवेगार खोरं असे मनोहरी रूप दिसतं. गडावरून पुर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेच्या टप्पात येतो. तिकोना जरी अवघड श्रेणीतील गड नसला व चढाई सोपी जरी असली तरी थोडी फार काळजी घेत गड चढणे आवश्यक आहे. तुम्ही लोहगड सारखे निर्धास्तपणे येथे वावरू शकत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाच्या मार्यामुळे गडाची झालेली हानी. गडावर जाणारे रस्ते हे निसरडे आहेतच, पण पुढे जाणार्याच्या निष्काळजीपणामुळे व ठिसुळ दगडामुळे अपघात घडू शकतात त्यामुळे दोन व्यक्तीच्यामध्ये पुरेसे अंतर ठेवणे आवश्यक आहे.
गडावर पाहण्यासारखं खूप काही आज देखील आहे, पाण्याचे टाके, गुहा, बांधलेला तलाव, अवाढव्य असा पसारा नसला तरी नेटका व रक्षणाच्या दृष्टीने बुलंद असे दगडी दरवाजे व बुरुजे अजून ही आपली शान राखून आहेत. अनेकजागी तटबंदी अभेद अशी उभी आहे व गडाच्या गतवैभवाच्या साक्षी देत असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात फक्त पाहण्याची नजर हवी.
मुंबई मार्गे येणार्यांसाठी लोणावळा-लोहगड-पवना धरण हा रस्ता आहे व पुण्यामार्गे येणार्यांनी पौंड मार्गे जावे, रस्ता व्यवस्थित व चांगला आहे. गडावर खाण्यापिण्याची सोय नाही, पण बालेकिल्लाजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य व रुचकर आहे. गडावर दिवसा एक चौ़कीदार आहे व गडाची साफसफाई व डागडुजी करण्यार्या एका संस्थेने त्या व्यक्तीची नेमणूक तेथे केली आहे, व गडावरील त्या संस्थेचे काम पाहून तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसेल.












समाप्त!
प्रतिक्रिया
15 Jun 2012 - 5:24 pm | ऐक शुन्य शुन्य
सदर किल्ला शिवाजी ट्रेल नामक संस्थेने संवर्धीत केला आहे. खरोखर सुंदर काम करून किल्ला स्वच्छ ठेवला आहे.
http://shivajitrail.com/
एका रम्य सायंकाळी मी अन माझे मित्र तिकोनाला पोहोचलो होतो, त्याबद्द्ल लिहिनच पण काही फोटो
तिकोनावरून तुंगी
तिकोनाचा मारूती
15 Jun 2012 - 7:03 pm | पैसा
मस्त फोटो! लोहगड आणि विसापूरच्या पाठोपाठ तिकोन्याचे फोटो आले हे फारच छान! तुंगावर कोणी नव्हता गेला का रे हल्ली? या चारही किल्ल्यांवरची बांधकामं बरीच शिल्लक दिसतायत. आणि पाण्याची टाकी वगैरे पाहता हे बहुधा एकाच काळातले असावेत का?
16 Jun 2012 - 8:38 am | प्रचेतस
हो.
हे सगळे खूप जुने किल्ले. सातवाहनकालीन.
तुंग, तिकोना हे चौकीवजा टेहळणीचे दुर्ग तर लोहगड, विसापूर ही मुख्य ठाणी.
हे चारही किल्ले कोकणातून घाटावर येणार्या आंबेनळी घाट, उंबरखिंड, बोरघाट ई. प्राचीन सार्थवाहपथांचे संरक्षक दुर्ग आहेत.
16 Jun 2012 - 10:54 am | दशानन
उद्या असेन तुंगवर :)
16 Jun 2012 - 8:38 am | प्रचेतस
फोटो खूपच सुरेख. पण सविस्तर लिखाणाने वाचनाची खुमारी अजून वाढली असती.
16 Jun 2012 - 10:40 am | दशानन
भले मोठे पल्लेदार लिहून कोणी लेखमाला वाचणार नसेल तर लिहण्यात आपली शक्ती का व्यर्थ घालवा.
16 Jun 2012 - 10:44 am | प्रचेतस
१६४७ वाचने झालीत की.
प्रतिसाद संख्येवर जाऊ नका हो.
वाचनमात्रही बरेच असतात.
16 Jun 2012 - 9:04 am | चौकटराजा
फोटो अगदी मस्त वातावरण निर्मिती झालेले दिसतायत. मला दोन गोष्टींची माहिती हवी.
१. कामशेट मार्गे पवनानगरात आल्यास तिथून तिकोनास जायची वाट काय ?
२. हे फोटो कोणत्या कॅमेर्याने काढले आहेत. विचारायचे कारण असे की असे निळे आकाश
ultra violet photofilter वापरला तरच बहुदा येते. या फोटोतील ढगांचे पांढरेपण व आकाश
निळा यांचे वेगळेपण (contrast ) तोड आला आहे !
16 Jun 2012 - 11:10 am | दशानन
>>१. कामशेट मार्गे पवनानगरात आल्यास तिथून तिकोनास जायची वाट काय ?
पवना धरणाच्या बाजूने जो पवना नगर ला जातो, तेथेच उजव्या बाजूचे वळण आहे, तिकोनापेठ कडे जाणार्या रस्ताचा मार्गदर्शक पण तेथे लावलेला तुम्हाला दिसेल.
>>२. हे फोटो कोणत्या कॅमेर्याने काढले आहेत. विचारायचे कारण असे की असे निळे आकाश
हे एकदम बेसिक सोनी सायबर शॉट (किंमत फक्त ४५०० ;) ) कॅमेराने फोटो काढले आहेत.
>>ultra violet photofilter
नाही कुठले ही फिल्टर न वापरता, फक्त कॅमेराचा अँगल बदलून काढलेले फोटो आहेत ते.
उदा. लुटा लुफ्त सज्जनगड (सातारा) सफरीची.... आणि राजापुर गुंफा (पाचगणी) हे फोटो तर मी सॅमसंग स्टार (३.० मेगापिक्सल) मोबाईलने काढलेले आहेत, तुम्ही म्हणता तो इफेक्क्ट तुम्हाला या फोटो मध्ये देखील पहावयास मिळतील.