(वृत्तांत) कात्रज ते सिंहगड - (K2S) - नाईट ट्रेक

मोदक's picture
मोदक in भटकंती
14 May 2012 - 2:31 am

कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे...
संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...
वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...
पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली...
काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्‍या तार्‍यांनी भरलेले आकाश..
क्षणात चमकून लुप्त होणार्‍या उल्का..
दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड...

K2S च्या या आठवणी जाग्या करत वेळेवर स्वारगेट ला सगळे जण जमलो व PMT बस शोधून कात्रज जुन्या बोगद्याकडे प्रस्थान केले.

सूर्यपुत्र, सागर, सूड, पिंगू, मी आणि Trekism चे सहा मित्र मिळून ११ जण होते.

या ट्रेकची सुरूवात होते कात्रज जुन्या बोगद्यावरच्या डोंगरावरून, आम्ही तिथे पोहोचलो तर आधीच दोन ग्रूप आलेले होते, त्यांच्याबरोबर किरकोळ बोलून लगेचच डोंगर चढायला सुरूवात केली.

नुकताच पाऊस पडून गेल्याने थंडगार हवेत आणि मऊ व भुसभुशीत मातीवरून चालायला मजा येत होती.. पण थोडावेळच. माती बुटांना चिकटायला लागली व पाय घसरू लागले. ढगाळ हवेमुळे चंद्र चांदणे काही दिसत नव्हते. काळाशार अंधार होता सगळीकडे.

पहिला डोंगर चढल्यानंतर आपण अशा ठिकाणी असतो जिथून कात्रज जुन्या बोगद्याकडे येणारा रस्ता, कात्रज नव्या बोगद्याकडे येणारा रस्ता व कात्रज तलाव एकाच वेळी दिसतो. यांच्या पार्श्वभूमीवर पसरलेले पुण्याचे दिवे या चित्रात एक वेगळाच परिणाम साधतात.
दुसर्‍या दिशेला दोन्ही बोगद्यांनंतर एकत्र येवून थेट खेड शिवापूरपर्यंतचा रस्ता व सिंहगडाकडे बघितले तर टॉवरचा लुकलुकणारा दिवा.

रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचे लाईट्स रस्त्याला वेगळीच गती प्राप्त करून देत होते... वळणावळणाचा रस्ता दिव्यांमुळे अक्राळ विक्राळ पसरलेल्या सापासारखा भासत होता

.

तिथे अचानक हा पहुडलेला दिसला.

.

मण्यार - "Big Four" ग्रूप मधला एक अत्यंत विषारी. (इंग्रजी नाव - Common Krait)

डोंगर चढताना दम लागत होता. अंधारात टॉर्चच्या मदतीने दिसेल तितकेच दिसत होते. त्यात पहिल्याच डोंगरावर साप दिसल्याने सगळीकडे जास्त काळजीपूर्वक बघितले जात होते.

Wolf Spider - तळहाताएवढा होता हा कोळी.

.

अचानक काहीतरी चमकले आणि गायब झाले. टॉर्च फिरवल्यावर एक बेडूक दिसला.
अंगावर दोन तीन रंगाचे पट्टे असलेला आणि पायावर विलक्षण सुंदर सोनेरी ठिपके असलेला हा सोन्याबेडूक (Fungoid Frog) याची काही भावंडे अतीजहाल विषारी असल्याने दुरूनच याचे निरीक्षण केले.

.

पुढे वाटेवर काही वेगळेच पक्षी बसलेले होते.. आम्ही चालताना जवळ गेल्यावर नाईलाज झाल्यासारखे उडून बाजूलाच बसत होते. नक्की काय प्रकार होता आम्हाला कळाले नाही.

तास दीड तासात टंगळ मंगळ करत पाच डोंगरटेकड्या पार झाल्या.

.

नंतर जेवणासाठी एका रिकाम्या जागेवर गोल करुन बसलो.

जेवणाचा मेनू.. आ हा हा.
चटणी पराठे
ठेपले
चटणी सँडवीच
ब्रेड बटर जॅम
ब्रेड पॅटीस
खजूर
टोमॅटो केचप
कारळ्याची चटणी
जेवणा नंतर सोनपापडी व चिक्की. अधुनमधून तोंडात टाकायला क्रीम बिस्कीटे होतीच.

न ठरवता अचानक पणे जमून आलेला मेनू. सगळ्यांनीच आडवा हात मारला. :-)

आमचे जेवण सुरू असताना बाकीचे ग्रूप येत होते, पुढे जात होते. त्यांचे टॉर्चलाईट लांबून काजव्यांसारखे दिसत, मध्येच लुप्त होत; परत दिसत. अंधारात तो खेळ बघायला वेगळीच मजा येत होती.

जेवणानंतर थंडी जाणवू लागली होती.. हळूहळू चालायला सुरूवात केली.
वाटेत योग्य अंतरावर दिशादर्शक बाण आहेत त्यांच्या व सिंहगडाच्या लाईट्सच्या मदतीने टेकड्या पार करणे सुरू होते. पहिल्या ७ की ८ टेकड्या मोजल्या.. नंतर मोजणे सोडून दिले. :-)

.

थंड हवेमुळे फारसा दम लागत नव्हता.. वातावरणातल्या गारव्यामुळे घाम येत नव्हता.. टेकड्या व डोंगर चढताना लागलेला दम, वरती पोहोचल्याबरोबर भर्राट वार्‍याबरोबर उडून जात होता.

शेवटी एकदाचे चंद्रदर्शन झाले, वेळ रात्रीचे ०२:४०.

चंद्रप्रकाश आणि अंधाराला सरावलेले डोळे यामुळे थोडावेळ बॅटरी बंद करून चालण्याचा आनंद लुटला. सगळीकडे एक मंद दुधाळ प्रकाश पाझरत होता...
चंद्राकडे बघितले तर चंद्राभोवती खळे तयार झाले होते. फारसे ढगही नव्हते आकाशात. सुंदर दृश्य होते ते.

कांही वेळाने आणखी एक स्नॅक्स ब्रेक घेवून सोनपापडी व क्रीम बिस्कीटांचा फडशा पाडला गेला. (मित्र डिवचत असताना आणि बोलून बोलून हैराण करत असताना सगळीकडे दुर्लक्ष करून डुलकी काढण्याचा आनंद मी १० - १५ मिनीटे अनुभवला. ;-))

दवामुळे गवत ओले व निसरडे झाले होते... बॅगा व बूट सुध्दा भिजले होते. शेवटचे तीन डोंगर बघूनच कस लागणार याची जाणीव झाली होती. नेमके दुसर्‍या डोंगरावर रस्ता चुकलो. तारे आणि सिंहगडचा लाईट यांचा रेफरन्स बघायचे विसरल्याची जाणीव झाली, पण लगेचच रस्ता सापडला.

दवात भिजलेले पान.

.

ते डोंगर पार करून दोन ट्रॅव्हर्स मारले, अचानक डांबरी रस्ता लागला. आता इथून सिंहगडापर्यंत डांबरी सडकेवरून चालायचे होते. ६ / ७ तास मऊ माती व गवतावरून चालल्यानंतर घट्ट डांबरावरून चालणे एकदम त्रासदायक होते. एखादा किलोमीटर अंतर चालल्यानंतर कंटाळा आला म्हणून एका ठिकाणी टेकलो, अचानक त्या विचित्र वेळी (पहाटे ०४:३०) गडावर जाणारी एक सुमो मिळाली. आम्ही शेवटचे ४ किमी अंतर सुमोने आणि कांही जणांनी चालत पार केले.

पार्कींगजवळ एका झोपडीत गार वार्‍यात तिथल्याच चटईवर अंग टाकले, थोडा वेळ झोप काढली सगळ्यांनीच.

सुर्योदय..

.

कांदाभजी, बटाटा भजी, पोहे व चहा यांसोबत खुसखुशीत गप्पा, आठवणी, किस्से आणि स्फोटक हसणे यांमुळे थकवा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता.

तिथून अतकरवाडी व नंतर घरी.. पुढच्या ट्रेक चे प्लॅन बनवत. :-)

प्रतिक्रिया

वाह.. काय विलक्षण अनुभव असेल तो रात्रीच्या अंधारात हे सर्व पाहण्याचा अन पहाटे गडावर पोचण्याचा. आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

स्पा's picture

14 May 2012 - 11:50 am | स्पा

मस्तच मजा केलित लेको :)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2012 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

यकु's picture

14 May 2012 - 9:12 pm | यकु

मस्त रे मोदका.
सापबिप तर लै भारी .. नीट फिरत जा रे बाबा हो.

वृत्तांत आवडला.
पहाटे अचानक आलेली सुमो खरी होती की भुताटकी? ;)

हॅ हॅ हॅ.. तो सुमोवालाच घाबरला असेल आम्हाला..

आधी दोन मिनिटे आला असता तर रस्त्यावरच आडवारलेले तीन चारजण दिसले असते त्याला. :-)

पैसा's picture

14 May 2012 - 7:54 am | पैसा

लिहिलंस पण सुरेख आणि सगळेच फोटो अप्रतिम आलेत. थंड हवेत चालायचा अनुभव मस्तच असणार! फक्त साप विंचू धुळीत लपून बसलेत की काय यावर लक्ष ठेवायला हवं एकसारखं.

पुष्कर जोशी's picture

14 May 2013 - 7:24 am | पुष्कर जोशी

फोटो कुठे गेले दिसत नाहीयेत ...

अतिशय सुंदर अनुभव हा ट्रेक म्हणजे. कात्रजपासून चालायला सुरु केलं तेव्हा आधी पाऊस पडून गेल्याने मस्त गार वारा सुटला होता. मग गप्पा, किस्से, हास्याचा खळखळाट यात अर्ध अंतर कधी पार झालं कळलं नाही. मध्येच एखाद्या डोंगरामुळे झालेली दमछाक माथ्यावर पोचलो की कुठल्या कुठे निघून जायची. काही उतारही असे की तिथून निसटलं की सरळ 'धरित्रीले दंडवत'! ! पण गप्पाटप्पा करत तेही पार झाले. चंद्राभोवतीचं खळं, चंद्रप्रकाशात पडणा-या सावल्या, काजवे, शेवटच्या टप्प्यात डांबरी रस्त्यावरुन चालताना दिसलेला तुटता तारा.....सारं काही छानच! !

(बादवे, तो वाटेत पहुडलेला बालगंधर्व ते कात्रज अंतर पार करुन आला असावा का रे मोदक? )

५० फक्त's picture

14 May 2012 - 8:28 am | ५० फक्त

मस्त रे , मागच्या वर्षी सुपरमुनच्या रात्री १४ मार्चला रात्री सिंहगड चढुन गेलो होतो तिघं जण त्याची आठवण झाली, जवळ काही सामान सुमान नसताना थंडगार वा-यात रात्र गडावर काढली होती.

सुहास झेले's picture

14 May 2012 - 9:10 am | सुहास झेले

ज्ये बात... मजा केलीत :) :)

किसन शिंदे's picture

14 May 2012 - 1:53 pm | किसन शिंदे

:O

म्हणजे तु गेला नव्हतास??

छान लिहिलंस रे.
या ट्रेकला मी मिसलो. पण लवकरच राजमाचीचा रात्रीचा ट्रेक करून याची भरपाई करण्यात येईल.

वल्लीशेठ, तेव्हा आमंत्रण द्यायला विसरु नका म्हणजे आम्हांला पण तेवढेच राजमाचीवर जाण्याचे पुण्य लाभेल.. :)

- पिंगू

मोदका, मस्तच वृत्तांत!

भन्नाट ट्रेक केलात रे!
मला नाही जमलं. :(
नेक्स्ट टाईम नक्की. (काही डेन्जार असलं तर तुम्ही प्वारं हातच ;) )

मृत्युन्जय's picture

14 May 2012 - 10:42 am | मृत्युन्जय

सुंदर अनुभव. खुपच सुंदर. पुट्रेशु :)

अभिनंदन मोदकराव!
रात्रीचा ट्रेक, त्या वेळचं वातावरण, तुमचा अनुभव आणि रात्रीतली वाटेवरच्या स्थानिकांची छायाचित्रे, माहौल जबरदस्त जमून आला आहे. एकदम झकास! :-)
वल्लीशेठांच्या राजमाची नाईट ट्रेकला शुभेच्छा! वृत्तांत हवाच हे वे. सां. न. ;-)

सुकामेवा's picture

14 May 2012 - 10:50 am | सुकामेवा

चांगला अनुभव व उत्तम वृतांत

चौकटराजा's picture

14 May 2012 - 11:09 am | चौकटराजा

एकाच ट्रेकमधे आकाशीच्या अमृतापासून ( पाणी व दंव ) डेजरस फोर च्या ग्रूप मधील विषार्‍यापर्यंत येकजात सर्व भेटले म्हणायचे. ट्रेक इंडियाना जोन्स नसताना त्याच्या सारखा झालेला दिसतोय ! वाचताना मजा आली. पण अतकरवाडीला गेल्यावर सामोसे, मिसळ, असे तसेच बाकरवडी, असे काही झालेले असेलच त्याचा काही उल्लेख झालेला दिसत नाही. (( -)

बा द वे - K2S म्हणजे K2 summit तर नव्हे ??

भारी ट्रे़क झालाय खरा, पण ते आडवे पडलेले मण्यार बुवा पाहुन अंमळ भीती वाटली ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 May 2012 - 3:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मण्यार ला नागाचा उतारा म्हणून पुढील वेळेस स्पा-द कोब्रा यांना बरोबर घेऊन जायचा प्लान आहे, असे आतल्या गोटातून कळले आहे ;-)

चिगो's picture

14 May 2012 - 12:05 pm | चिगो

लैच भारी.. वृत्तांत आवडेश..

गणपा's picture

14 May 2012 - 1:34 pm | गणपा

मस्तच झाली म्हणायची चढाई मोहिम . :)

मुक्त विहारि's picture

14 May 2012 - 1:52 pm | मुक्त विहारि

जून्या आठवणी जाग्या झाल्या.

किसन शिंदे's picture

14 May 2012 - 2:01 pm | किसन शिंदे

लय भारी वृत्तांत रे मोदका, खुप मजा केलीत लेको.

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2012 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा

जबर्‍या ट्रेक आणी त्याहुन झ्याक वृत्तांत रे मोदका...

जाता जाता- चला,एक गडकरी आहेतच..अता एक,फड जमवुन त्याला घुमवणारे फडकरीही मिळाले.. ;-)

पार्कींगजवळ एका झोपडीत गार वार्‍यात तिथल्याच चटईवर अंग टाकले, थोडा वेळ झोप काढली सगळ्यांनीच.

सगळ्यांनीच ? खरं का ?

मायला मी जागा होतो ना.. बादवे गड उतरताना तू कुठे होतास?

- पिंगू

मै बऱ्यापैकी धावतच खाली आलो आणि तुम्ही येईपर्यंत २ बस सोडल्या

बोलला रे !! चक्क एक वाक्य बोलला. ;)

sagarpdy's picture

14 May 2012 - 4:44 pm | sagarpdy

मोदक's picture

15 May 2012 - 12:18 am | मोदक

नाही झोपले का सगळेजण..? मग काय करत होतात इतका वेळ. :-p

सगळ्यात पहिले झोपून, शेवटी (नाईलाजाने) उठणारा मीच होतो, त्यामुळे मला वाटले तुम्ही पण झोपला असाल.

वपाडाव's picture

14 May 2012 - 5:38 pm | वपाडाव

:o

प्यारे१'s picture

15 May 2012 - 10:02 am | प्यारे१

http://www.misalpav.com/node/21580#comment-394666

किसी ने कहा था - बस जगह और वक्त बता दो, बंदा हाजिर हो जायेगा !!!

ह्यावेळी काय झालं वपुली? ;)

समजून घ्या हो प्यारेकाका. काय तुम्ही पण !!आणि 'वपुली' वैगरे म्हणायला तो काय हा* आहे.

*हा म्हणजे कॉण ते ऐकायला व्यनि करणे. हल्ली बोलून वाईट न होण्याचे ठरविले आहे. तरी जाणकारांनी ओळखले असेलच.

मोदक's picture

15 May 2012 - 10:27 am | मोदक

सूड.. जरा सांभाळून रे..

सूड.. जरा सांभाळून रे..

हेच बोल्तो कारण न बोलताही वाईट होण्याच्या दिशेने वाटचाल होत असल्याचं लक्षात येतंय... ;-)

सानिकास्वप्निल's picture

14 May 2012 - 9:08 pm | सानिकास्वप्निल

वृतांत आवडला र मोदका :)
भारी मजा केलेली दिसतेय
नाईट-ट्रेकचा अनुभव खूपचं थ्रीलींग वाटला असेल नं :)
फोटो पण छान आले आहेत :)

मोदक's picture

15 May 2012 - 1:47 am | मोदक

खूप मजा येते..

किर्रर्र अंधार आणि भयाण शांतता असते सगळीकडे, मातीतले दवाने भिजलेले पान तितक्या प्रकाशातही चमकत असते व वेगळेच भासत असते, हातातला टॉर्च आणि चंद्रप्रकाश झाडांना चित्रविचीत्र आकार देतात. शांत वातावरणात अचानक होणारी पानांची सळसळ, गवतातली खुसफूस ठोका चुकवते. बेडूक / सरड्यापासून सापापर्यंत काहीही असू शकते याची जाणीव असतेच. भुताटकीचे किस्से आठवतात.. प्रत्येक ट्रेकच्या दरम्यान एकदातरी ठरवले जाते.. की आता बास. इतके त्रासदायक ट्रेक करायचे नाहीत.

पण,

निरभ्र आकाश, पौर्णीमेच्या दिवशी झरणारा चंद्राचा दुधाळ प्रकाश, खळ्यातला चंद्र, चांदणे, प्रकाशाची रेघ सोडत क्षणार्धात दिसेनासा होणारा तुटलेला तारा आणि तो दिसल्याचा आनंद, अचानकपणे दिसलेला एखादा प्राणी आणि त्याला मनसोक्त न्याहाळण्यात घालवलेला वेळ, गार वार्‍यात गायब झालेला थकवा, ट्रेक पूर्णकेल्यानंतरची धुंदी.
अशा अनेक गोष्टी आठवतात.. पाऊले परत सह्याद्रीकडे वळतात.

नाईट ट्रेकचा विषय सुरू आहे म्हणून थोडे अवांतर -

"सावली-सिंहगड" हा आमच्या ग्रूपमधला फेमस प्रकार आहे.
ज्या वीकांताला ट्रेकसाठी पुण्याबाहेर जाणे शक्य होत नाही त्या शनिवारी रात्री खडकवासल्याच्या सावली रेसॉर्ट मध्ये जमायचे, यथेच्छ खादाडी करायची. रात्री ११ / ११:३० वाजता सिंहगड पायथा गाठायचा व गड चढायला सुरूवात करायची...

बर्‍यापैकी गड चढून झाल्यावर एखादी झोपडी बघायची, डेरा जमवायचा. आणखी रात्र झाली की मक्याचे कणीस भाजून खायचे (पुण्यातून निघताना कणीस आणि गड चढताना काटक्या / वाळक्या फांद्या गोळा करतच जायचे) व गप्पा हाणत दोन तीन वाजता झोपायचे. (दिवसा सरबत आणि जेवण विकणार्‍या झोपड्या रात्री रिकाम्याच असतात.)

सकाळी ६ / ७ वाजता गड चढणार्‍या पब्लीक मुळे जाग येते.. गड उतरून घरी परत.

रविवारचे शेड्यूल फारसे बिघडत नाही.. व बाहेर गेल्याचेही समाधान मिळते. :-)

तु एक नंबरचा दुष्‍ट माणूस आहेस!

वपाडाव's picture

15 May 2012 - 1:58 pm | वपाडाव

दुष्ट ऐवजी फुकट असे वाचले गेले आहे...

सूर्यपुत्र's picture

15 May 2012 - 12:12 pm | सूर्यपुत्र

हा प्रतिसाद भारी.. ;)
मस्त ट्रेक झाला.

-सूर्यपुत्र.

स्वच्छंदी_मनोज's picture

14 May 2012 - 10:15 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच रे मोदक,

माझ्या टु डू लिस्ट मध्ये आहे हा ट्रेक.. बघू कधी योग येतो ते..

पुढच्याच महिन्यात पुन्हा योग जुळवायचा विचार आहे. तेव्हा कळवेनच..

- पिंगू

झकासराव's picture

15 May 2012 - 9:32 am | झकासराव

उत्तम ट्रेक झाला की. :)
मण्यार बघुन घाबरलो.

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2012 - 6:58 pm | प्रभाकर पेठकर

रोमँटिक वातावरणातील, मण्यार-कोळी-बेडकाने थरारक बनविलेला ट्रेक वाचून प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा भास झाला. मस्त वर्णन केले आहे. अभिनंदन.

मितभाषी's picture

19 May 2012 - 3:57 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

sagarpdy's picture

13 May 2013 - 4:53 pm | sagarpdy

शनिवार २५ मे २०१३ ला पौर्णिमा आहे. तेव्हा मागील वर्षीप्रमाणेच K२S नाईट ट्रेक चा बेत आखला जात आहे. ट्रेकेच्छुक व हौशी लोकांनी माझ्याशी अथवा मोदाकाशी संपर्क साधावा.

सूड's picture

13 May 2013 - 5:06 pm | सूड

हजर !!

आजानुकर्ण's picture

13 May 2013 - 5:15 pm | आजानुकर्ण

कात्रज ते सिंहगड हा ट्रेक प्रत्येकानेच करावा. निदान पुण्यातील लोकांनी तरी. आयुष्यात नेहमी स्मरणात ठेवण्यासारख्या ज्या काही गोष्टी असतात त्यात हा ट्रेक फार वरच्या क्रमांकावर आहे. फक्त सिंहगडावर जाऊ नये, मनस्ताप होतो.. एकदा सिंहगडावर आल्यासारखे वाटले की खाली यावे व मिसळ खावी.

कृपया कुणीतरी फोटो नीट करेल का..?

पुष्कर जोशी's picture

14 May 2013 - 7:34 am | पुष्कर जोशी

भारी ट्रेक रे आवड्या .. जम्या तो फोटो पिकासा फ्लिकर कोठेतरी अपलोड करा कि आणि दुवा द्या ..

पुष्कर जोशी's picture

14 May 2013 - 7:23 am | पुष्कर जोशी

फोटो कुठे गेले दिसत नाहीयेत ...

मोदक's picture

16 May 2013 - 3:58 pm | मोदक

फोटो अपडेटवले आहेत.