बारामती येथे कोसळलेल्या 'व्हीटी-एसएसके' (VT-SSK) या लियरजेट ४५ बिझनेस विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रभर दुःख, आवेग आणि शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दादांविषयी व सहप्रवाशांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.
विमान रनवेवरून घसरले असेल, अपघात होता होता टळला, अशा बातम्यांची अपेक्षा होती; पण हळूहळू वास्तव स्वीकारावे लागले. मन तयार नसले तरी, जे घडू नये ते घडले. आठ आसनी विमानाच्या दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान ही घटना घडली, असे बोलले जात आहे.
अपघात कसा घडला असेल याबाबत विविध शक्यता आणि कुशंका व्यक्त होत असताना, प्रथमदर्शनी पायलटचा निर्णय चुकला असे वाटत आहे. मानवी चूक कोणाकडूनही होऊ शकते, हा काही कोणावर 'ब्लेम' करायचा विषय नाही. पण भविष्यात अशा चुका टाळता येऊ शकतात का? या विमान अपघातावेळी नेमकं काय काय घडलं? ब्लॅक बॉक्समधून काही हाती येतं का? तपशील नंतर येतीलच.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी (२८ जानेवारी) एक निवेदन जारी करून, बारामती येथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला आहे. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी ८:४४ वाजता, एटीसीला (ATC) रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) कडे सोपवण्यात आला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
एटीसीची (ATC) जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे:
२८ जानेवारी २०२६ रोजी विमान 'VI-SSK' ने सकाळी ८:१८ वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला. यानंतर विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं. या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की, सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारण ३००० मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर विमानाने 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली; मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी 'गो-अराउंड' केला. गो-अराउंडनंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता, क्रूने पुन्हा 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेत असल्याची माहिती दिली. रनवे दिसल्यास कळवण्यास सांगितले असता, क्रूने "सध्या रनवे दिसत नाही, दिसताच कळवू," असं सांगितलं. काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली. यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, क्रूकडून लँडिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पायलटला रनवे दिसला नाही, हीच अधिक शक्यता वाटत आहे. चुकीच्या ठिकाणी उतरत आहे असे वाटत असताना, विमान तंत्र भाषेत 'स्टॉल' (Stall) होणे, त्यामुळे काही फुटेजमध्ये एक पंखा वर झाल्याचे दिसते; यामुळेच हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पहिला राऊंड मारून झाल्यानंतर, दुसऱ्या वेळीही तीच परिस्थिती होती असे वाटते. त्यामुळे पुन्हा दुसराही राऊंड घेतला असता आणि 'विमान उतरवणे शक्य नाही', असा स्पष्ट स्टँड पायलटने घेतला असता आणि विमानाने घिरट्या घेऊन अन्य कोणत्या विमानतळावर विमान उतरवले असते, तर ही घटना टळली असती असे वाटून जाते. अर्थात, निर्णय प्रक्रियेत 'जर-तर'ला काही अर्थ नसतो.
विमानतळावर आधुनिक तंत्रज्ञान सोयी-सुविधांचा अभाव. पायलटवर विमान उतरवण्याचे एक आंतरिक दडपण आणि अशा असंख्य गोष्टी या घटनेमागे असू शकतील. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
डीजीसीए दुवा
प्रतिक्रिया
30 Jan 2026 - 11:58 am | गवि
आतापर्यंत जाहीर झालेला किंवा समोर आलेला घटनाक्रम तुम्ही चांगल्या रीतीने मांडून चर्चेला सुरुवात केलीत याबद्दल धन्यवाद.
प्रसंग खूपच वाईट आणि भीषण आहे.
पण राहून राहून तो टाळता आला असता असं वाटतं. फायनल अप्रोचवर स्टॉल हे एक क्लासिक आहे. या प्रकारचे असंख्य अपघात आधी घडून गेले आहेत.
30 Jan 2026 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण या विषयातील जाणकार आहात, आपला काही या विषयावर धागा दिसेना म्हणून धागा काढला. तपशीलवार लिहा.
-दिलीप बिरुटे
30 Jan 2026 - 12:05 pm | मनो
गवि यांनी सांगितलेला दुसरा अपघात वाचताना हा अत्यंत महत्त्वाचा परिच्छेद सापडला. यातील नवीन गोष्ट म्हणजे circling approach stall. बारामती अपघातात दुसऱ्यांदा विमान उतरवताना वैमानिकाचे लक्ष धावपट्टी शोधण्याकडे असावे आणि ती दिसल्यावर पटकन विमान वळवून उतरवताना म्हणजेच circling approach करताना airspeed हा कमी पडणार हे लक्षात न आल्याने विमान स्टॉल झाले आणि पुरेशी उंची नसल्याने काही सेकंदात कोसळले असे मला सध्या वाटते आहे.
दुसऱ्या २०१७ सालच्या अपघाताचा मूळ इंग्रजी लेख
https://admiralcloudberg.medium.com/how-not-to-fly-a-plane-the-2017-tete...
As for the immediate cause, pilots and controllers who witnessed the crash were largely in agreement that this was a classic case of a circling approach stall. Will Ramsey and Jeffrey Alino were hardly the first pilots to attempt a circle-to-land maneuver from too close to the runway, banking too steeply and stalling the airplane — in fact, such accidents happen relatively frequently in general aviation and small charter operations. For example, in 2021, another business jet crashed at Tahoe Truckee Airport in California, killing all 6 people on board, after stalling during maneuvers for a circling approach. In these types of accidents, pilots become fixated on the runway and attempt to maneuver toward it without ensuring that they have sufficient airspeed to accomplish a steep turn without stalling. These crashes are simple and preventable, but they continue to happen for a variety of reasons, including insufficient training, hubris, and lack of knowledge of previous accidents.
30 Jan 2026 - 1:15 pm | कंजूस
वैमानिकाचा आत्मविश्वास नडला आणि चूक लक्षात आल्यावर "oh s**t" उद्गार बाहेर पडले ते रेकॉर्ड झाले. अन्यथा "संकटात आहे"चा संदेश त्याने पाठवलाच असता.
-----------------------------
{तिकडे कोलकात्याहून आलेली एक राजकीय टिप्पणी* लक्षात घेऊन } शरद पवार बोलले की यावर राजकारण नको, अपघातच होता.
#* - अजितदादा पवार एनडिए सोडून परत मविआकडे वळत आहेत म्हणून .....
30 Jan 2026 - 1:34 pm | हणमंतअण्णा शंकर...
>> वैमानिकाचा आत्मविश्वास नडला <<
हा आत्मविश्वास नसून प्रेशर असावे असा माझा अंदाज आहे. अजित पवार यांच्या स्वभावाकडे पाहता ही रिस्क घ्यायला त्यांनी लावली असावी का? हे देवालाच ठाऊक.
परंतु अशा स्ट्रिप न दिसण्याची रिस्क असताना देखील केवळ अंदाज घेऊन लँडिंग करणे प्रचंड धाडसाचे म्हणावे लागेल.
30 Jan 2026 - 2:27 pm | कंजूस
लॅंडिगचे दोन तीन प्रयत्न वैमानिक करू शकतो... पण आपण हे करून टाकू...https://youtu.be/O9-k8TV1K3c?si=kwLhWgSbnBT5FpVo
31 Jan 2026 - 7:57 am | प्रचेतस
ज्येष्ठ विमानतज्ज्ञ आणि माजी वैमानिक गवि ह्यांच्या तपशीलवार प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.