खुल जा सिम सिम

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
13 Jan 2026 - 3:36 pm

1
"तीळगूळ घ्या, गोड बोला" उद्या या घोषणेत आपण सर्वजण वाहून जाणार. तिळाच्या वड्यांनी ,हलव्याने,लाडवांनी तोंड तर गोड होईलच,लाहानपणीच्या आठवणीने मनही कायम गोड गोड होत.लहानपणी मी सगळ्या घरांत तीळगुळ गोळा करायला जायचो .वड्या लाडू बरोबर नेलेल्या डब्यात तर हलवा ,तीळ गुळ दिले तर डब्यात न जाता तो बकाणा तोंडात कोंबला जायचा आणि हात ते चिकट ते चिकट व्हायचे.आताशा मोबाईवरच "तीळगूळ घ्या, गोड बोला" संदेशासह तिळगुळ वाटला जातो ,तो इतका टनभर येतो की 'मोबाईल गोडाने चिकट होईल नाहीतर त्याला मुंग्या तरी लागतील' असे वाटते .
असाहा तीळ गुळाबरोबर तर गोड़ लागतो पण त्याचे स्निग्ध गुणधर्मही अनेक आहेतच ना . त्याचा जरा स्वतंत्र विचार करू लागले .
****तिळाची प्राचीनता
2

Sesamum indicum L. हे तीळ (sesame) चे वैज्ञानिक नाव आहे! हे जगातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे, ज्याची लागवड हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मूळ सेमिटिक भाषा -šamaššammu किंवा šamaššammū
हे Akkadian (प्राचीन असीरियन) भाषेतील शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ "तेलाचा रोप" (oil plant) असा आहे.
हे दोन भागांत विभागता येतं:
šaman- "तेल" किंवा "फॅट/ऑइल"
šammum- "रोपटा" किंवा "वनस्पती"
म्हणजे, "तेल देणारा रोपटा" – अगदी योग्य, कारण तीळ हे तेलबिया पीक आहे! तीळाच्या बियांमध्ये ५०-६०% तेल आणि २५% प्रथिने असतात ज्यात अँटिऑक्सिडंट लिग्नान्स असतात.
आता indicum हे स्पेसिज नाव Latin मध्ये "of India" किंवा "भारतातील" – कारण हे पीक मुख्यतः भारतातून (Indian subcontinent) मूळचे आणि प्रसिद्ध झाले.भारतात आणि हडप्पा संस्कृतीत (Indus Valley Civilization) तीळाची लागवड सुमारे ५५०० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. हडप्पा आणि मोहनजो-दारो सारख्या ठिकाणी जळालेल्या तीळाच्या बिया सापडल्या आहेत. हे जगातील सर्वात जुने पुरावे आहेत!
हडप्पा संस्कृतीत (सुमारे इ.स.पू. २७००–१९००) तीळ हे मुख्य तेलबिया पीक होते. ते तेल काढण्यासाठी आणि अन्नासाठी वापरत असत.
बलुचिस्तानमधील मिरी कलाट येथील हडप्पा ठिकाणी अशाच प्रकारची तारीख असलेली बीज सापडली. आणखी अनेक उदाहरणे ई.स.पू. दुसऱ्या सहस्राब्दीतील आहेत, जसे की पंजाबमधील हडप्पा टप्प्याच्या उत्तरार्धात. दुसऱ्या सहस्राब्दीच्या उत्तरार्धापर्यंत, भारतीय उपखंडात तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती.नंतर ते मेसोपोटेमिया,आफ्रिका,चीन इतरत्र व्यापार हस्तांतरण प्रकियेत सर्वत्र पसरले.दुसऱ्या काळ्या तिळाचा काळा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असून तो त्याच्या बाहेरील आवरणात असलेल्या पोषणमूल्यांमुळे आणि रंगद्रव्यांमुळे (मेलॅनिन आणि अँथोसायनिन्स )असतो.

****जड जड अभ्यासू माहितीनंतर रोचक तिळाच्या मनोरंजक माहितीविषयी पाहूया
3
लहानपणी "अली बाबा आणि चाळीस चोर" या अरेबियन नाइट्स कथेतील "खुल जा सिम सिम " हे वाक्य गारुडासारखं मनात बसलं आहे ना !
मूळ अरबी कथेत हे वाक्य होत ,
"Iftah ya simsim" म्हणजे "उघड, हे तीळ!" --- "खुल जा सिम सिम " :)
तीळा उघड?? हे काय गौडबंगाल आहे ??
अरबीत तीळाला "simsim" म्हणतात.तिळाचे वैज्ञानिक नाव 'सेसमे'"Sesame" (सिम सिम) आहे .त्याचा हा अपभ्रंश किंवा व्हाईसा वर्सा हे असावे .
का तीळच का ? कारण तीळाच्या शेंगा पूर्ण वाळल्यावर पिकल्यावर आपोआप फुटतात -pop, आणि आतले तीळ बाहेर पडतात. जणू जादुई दरवाजा उघडला! हे प्रतीक आहे खजिना उघडण्याचे गुफा तीळाच्या शेंगेसारखी फुटून उघडते, आणि आत खजिना (तीळासारखा मौल्यवान) दिसतो!

तीळ हे जरी एक प्रकारचे बी असले, तरी या वाक्याचा अर्थ अनेकदा "सुप्त क्षमतांना जागृत करणे" किंवा "मनाचे दरवाजे उघडणे" अशा रूपाकात्मक अर्थाने घेतला जातो.त्यातूनच जगभर "Open Sesame" किंवा "खुल जा सिम सिम" हे वाक्य प्रसिद्ध झालं.

मराठीतील ती प्रसिद्ध म्हण -एक तीळ सात जणांनी खाल्ला-अत्यंत कमी साधनसामग्री असूनही ती सर्वांमध्ये मिळून-मिसळून किंवा आनंदाने वाटून घेणे.मात्र पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत. त्याच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.म्हण सुपरसें उपर कामगिरीने खरी करून दाखवली.

*****तीळासंबंधीही अजून मजेशीर म्हणी आहेत ...

--घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ-म्हणजे दिखावा करतो .
--तिळपापड होणे- एखाद्या गोष्टीमुळे अतिशय राग येणे.
--तिळाएवढे- अतिशय लहान/ नगण्य गोष्ट दर्शवण्यासाठी .
--जिवात तीळ नसणे- खूप घाबरणे.
--जिभेवर तीळ टिकत नाही-कोणतीही गोष्ट गुप्त ठेऊ न शकणे.
हिंदी म्हणी
--तिल का ताड़ बनाना-एखाद्या अगदी शुल्लक गोष्टीचा मोठा बाऊ करणे
--इन तिलों में तेल नहीं - एखाद्या व्यक्तीकडून किंवा गोष्टीकडून कोणतीही मदत मिळण्याची आशा नसणे.
--तिल धरने की जगह न होना-प्रचंड गर्दी असणे
तमिळ म्हण
--"इलैथवन्नक्कू एल्लम कोळुथवन्नक्कू कोल्लम" - अशक्त माणसासाठी तीळ आणि लठ्ठ माणसासाठी 'हुलगा' गुणकारी असतो
इंग्रजी/इतर (English/International):
इंग्रजी म्हणी
--Pick up a sesame seed only to lose a watermelon-लहान फायद्यासाठी मोठे नुकसान.
--Before the nut is cooked, a sesame is burnt -लवकर धीर सोडणे.
--One sesame seed won't make oil- एकट्याने काहीच होत नाही, एकत्र येणे गरजेचे.

****आता पोटोबा पाहूया :)
5
फोटो-आन्तर्जालवरुन साभार

तीळ हे जगातील सर्वात जुने तेलबिया पीक असल्यामुळे, ते अनेक देशांच्या खाद्यसंस्कृतीत मुख्य भूमिका बजावतं.
--ताहिनी – तीळाची पेस्ट . हे हुमस, बाबा गणूश ,आणि फलाफेलमध्ये मुख्य घटक आहे.
लेबनॉन, इस्रायल, तुर्की, ग्रीसमध्ये खूप प्रसिद्ध.
--हलवा – ताहिनी + साखर/मध + कधी कधी नट्स. मध्य पूर्व, तुर्की, ग्रीस, इराणमध्ये सुपर पॉप्युलर. ऊर्जा देणारा, लांब काळ टिकणारा मिठाई!
--Pasteli – ग्रीसमध्ये तीळ + मधाची कॅंडी बार.
--Jian dui / Sesame Balls – चीनमध्ये तळलेले ग्लुटिनस राइस बॉल्स, बाहेर तीळ लावलेले.
--सेसमे चिकन (चीन)-तळलेल्या चिकनला तिळाच्या चटणीत घोळवून बनवलेला हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज पदार्थ आहे
--Sesame Buns – अमेरिका, युरोपमध्ये ब्रेडवर तीळ शिंपडलेले असतात
--गझक-उत्तर भारतात थंडीच्या दिवसात मिळणारी तीळ आणि गुळाची कुरकुरीत पट्टी
--तिळ पिठा (आसाम)- तांदळाच्या पिठात तिळाचे सारण भरून बनवलेला आसामातील पारंपरिक पदार्थ.
आणि आपल्या महाराष्ट्रात कोथिंबीर वड्या ,पंचामृत तर तीळाच्या कुरकुरीतपणा आणि लज्जत वाढवतात.

आज भोगीला आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची आपली संस्कृती ,जी शरीर आणि मनाची शुद्धी, नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि आरोग्य वाढवण्यासाठी केली जाते.तिचे पालन करून मी मस्त शेतात नव्याने बहरलेल्या हरभरा,वाल, घेवडा, मटार, वांगी, गाजर,शेंगदाणे, कांद्याची पात, या सगळ्या ताज्या, हंगामी भाज्या एकत्र करून भारी भोगीची (भोग-आनंद देणारी) भाजी तयार केली. बाजरीच्या भाकरीवर खूप सारे तीळ भुरभुरले आणि खमंग भाजली .आणि उद्याच्या संक्रातीसाठीचे स्पेशल तिळगुळाच्या वड्या केल्या.असा हा मकर संक्रातीचा मुख्य नायक -तीळ !!!

तीळगुळ वड्या
दोन वाटी भाजलेल्या तिळाचा जाडसर कुट,एक वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा कूट,अर्धी वाटी शेंगा दाणे कुट, इलायची पूड, ४०० ग्रॅम गूळ,साजूक तूप.
चार मोठे चमचे साजूक तूप कढईत गरम करायचे.त्यात किसलेला गूळ घालावा.१० मिनिटे उकळी फुटेपर्यंत हलवत राहावा.नंतर त्यात तिळाचा,खोबऱ्याचा,शेंगा दाण्यांचा कूट ,इलायची पावडर टाकावी.काही अख्खे तिळ यात टाकावे.मंद आचेवर परतावे.साधारण १० मिनिटे.नंतर गरम गरमच हाताला/वाटीला गार पाणी लावून वड्या थापून घ्यायच्या.गरम असतांनाच वड्या कापायच्या.गार झाल्यावर काढायच्या.
तीळगुळ घ्या गोड गोड बोला!!
6
फोटो जुनाच आहे!
-भक्ती

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

निनाद's picture

16 Jan 2026 - 8:05 am | निनाद

अगदी वेळेवर आलेले लिखाण. आवडले हे सांगायला नकोच!
पुर्वी तीळाची किंमत खूप होती. मेसोपोटेमियात तिळाच्या तेलाचा वापर देवांना अर्पण करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि व्यापारात पैसा रुपाने ही केला जात असे.
असे म्हणतात की अमेरिका खंडात अठराव्या शतकात गुलामगिरीच्या काळामध्ये आफ्रिकन गुलामांनी तिळाच्या बिया स्वतःसोबत अमेरिकेत नेल्या. आणि अमेरिकेत तीळ पसरला. अर्थातच तीळ ही भारताने जगाला दिलेली ही एक अमूल्य आणि 'आरोग्यदायी' भेट आहे.

चामुंडराय's picture

17 Jan 2026 - 1:12 am | चामुंडराय

समयोचित लेख.

भक्तीताईंनी कट्ट्याला आणलेल्या स्वादिष्ट तिळगुळ / तीळगुळ* वड्या आठवल्या. खूप आवडल्या होत्या.

* तिळगुळ / तीळगुळ - जे काही बरोबर असेल ते वाचावे. दुसऱ्या हाटेलात ह्या वर जोरदार चर्चा चालू आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.

टर्मीनेटर's picture

17 Jan 2026 - 4:37 pm | टर्मीनेटर

हा माहितीपुर्ण लेख गेल्या तीन दिवसांत वाचनातुन कसा काय सुटला ह्याचा विचार करतोय...

पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत.

कमाल आहे!