तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
9 Dec 2025 - 9:38 am

दोडक्याचे सूप

आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. माझ्या सुपीक डोक्यात विचार आला, आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविणार होती. कोथिंबिर कापल्या नंतरच्या काड्या उरलेल्या होत्या. मी कड्यांसोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला. एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पाणी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोह्या सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. दोडक्याची भाजी न खाणारे छोटे बच्चे ही, हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो.

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता).

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

9 Dec 2025 - 11:38 am | युयुत्सु

नक्की करून बघेन!

एकदम भारी दिसतय! भूक लागली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

कॉमी's picture

27 Dec 2025 - 11:39 am | कॉमी

छान.

दोडका ही आवडती भाजी. याच्या शिरांची चटणी हा तर त्याहून आवडीचा पदार्थ.

दोडक्याचे सूप, तेही कोथिंबीर घालून, ही कल्पना छान आहे. मधेच त्यात टोमॅटो घालून मात्र तुम्ही आपल्याच पाककृतीवर अविश्वास दाखवलात. ;-)

सुपाचा रंग काय झकास आला आहे. तुरईची चव किंचित तुरट असते . मी कच्चेच दोडके खातो. चणा डाळ घालून केलेली भाजी अविट चवीची लागते.
( बाकी दोडके किंवा घोसाळे मेले तरी आतली जाळी अंग घासण्यासाठी वापरली जातात. )

दोडका शिरांची चटणी शोध कुणी लावला त्यास बक्षीस द्यायला हवे.

सोत्रि's picture

28 Dec 2025 - 4:02 am | सोत्रि

चणा डाळ घालून केलेली भाजी अविट चवीची लागते.

दोडका शिरांची चटणी शोध कुणी लावला त्यास बक्षीस द्यायला हवे.

१०००+
कंजुसजी, आपले सुत जुळणार असं दिसतंय!!

- (द्वाड-का) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Dec 2025 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

करुन बघायला पाहीजे.
बाकी सध्या थंडीमुळे बाजारात गाजरे, हरभरे, मटार,घेवडा आणि उंधियु च्या सर्व भाज्या आल्या असल्याने चंगळ आहे. त्यामुळे दोडके, पडवळ, वांगी,भेंडी, दुधी वगैरे नावडत्या भाज्या जरा बाजुला पडल्या आहेत.