विवेकवादी दृष्टिकोनातून नाताळचा सण

ताजे प्रेत's picture
ताजे प्रेत in काथ्याकूट
24 Dec 2025 - 4:22 pm
गाभा: 

उद्या आहे नाताळचा सण. नाताळ उर्फ ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा साजरा केला जातो. तसे पाहता येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंम्बर ला झाला याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. परंतु भोळ्या भाबड्या ख्रिस्ती समाजाची श्रद्धा म्हणून हा सण साजरा करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. पण सण साजरा करण्याची सुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे.

आपण काय करतो तर साखरेचा मारा असलेले केक, चॉकलेट यासारखे पदार्थ खरेदी करतो. साखर आरोग्यासाठी विषासमान आहे हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहे. शिवाय आपली मुले केक, चॉकलेट खात टीव्हीसमोर बसून छोटा भीम पाहणार पण ज्यांच्या भरवशावर तो केक खायला मिळतो आहे त्या ऊसतोड कामगारांच्या वाट्याला मात्र शिळी भाकरी. ही विषमता पाहून अक्षरशः मन तुटते. हे कमी म्हणून की काय नाताळच्या आणि नववर्षाच्या स्वागताला उडवले जाणारे ते प्रदूषणकारी फटाके आणि प्रार्थनास्थळांवर पेटवल्या जाणाऱ्या त्या प्रदूषणकारी मेणबत्त्या.

हे सगळे टाळणे आपल्याच हातात आहे.

नाताळच्या दिवशी केक, मेणबत्त्या अशा व्यर्थ गोष्टींवर जो खर्च केला जातो त्याऐवजी गरीब मुलांना कपडे वाटणे, शिधावाटप करणे सहज शक्य आहे. फुगे,फटाके,लाऊडस्पीकर लावण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या परिसरात झाडे लावावीत.

याशिवाय आणखीन एक चिंतेचा मुद्दा म्हणजे नाताळच्या मार्फत होणारा अंधश्रद्धेचा प्रसार.

हरणांच्या गाडीत बसून दाढीचे खुंट खाजवत एक माणूस येतो आणि साखरयुक्त चॉकलेट वाटतो ही संकल्पनाच किती विचित्र आहे. हरणासारख्या नाजूक प्राण्याला एका जाड्या माणसाचे वजन ओढायला लावायचे ह्यात काही अर्थ आहे का?

अशा भाकड कथांवर आणखीन किती दिवस आपण विश्वास ठेवणार. विवेकवादाचे संस्कार बालवयातच व्हायला हवेत. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या समाजाचा पाया भुसभूशीत करतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊ.
नको सांता आणि नको केक,
येशूला हवे वातावरण नेक,
नको ते फुगे आणि नको तो फटाक्यांचा जाळ,
साजरा करू प्रदूषणमुक्त नाताळ.

( माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या माझ्या एक विवेकी , विचारी , विजिगिषु वृत्तीच्या मित्रवर्यांनी अफाट चिंतनानंतर हे लिहिले )

प्रतिक्रिया

एकदा सण मुलांच्या, महिलांच्या ताब्यात गेला की कोणाचंच काही चालत नाही. बाकी पुढचं वाढवायचं काम दुकानदार सांभाळतात. कशाला वाईट वाटून घेता? थंडीचे दिवस असतात( उत्तर गोलार्धात), नोकरदारांना सुट्ट्या घ्यायच्याच असतात. करू दे मजा.

एकदा सण मुलांच्या, महिलांच्या ताब्यात गेला की कोणाचंच काही चालत नाही.

ऑ ?

म्हणजे पुरुष गोडधोड खात नाहीत की काय? आणि सण साजरे करत नाहीत की काय?

महिला आणि मुलेच काय ती सण बेजबाबदारपणे साजरा करतात?

आणि मूळ धाग्यात जो विषय आहे त्यावर असे वाटते की, सण म्हटला की तो कोणत्यातरी समजुतीवर आणि तारखेवर / तिथीवर आधारित असणे आलेच. त्या दिवशी एरवीपेक्षा जास्त गोडधोड आणि कर्बयुक्त किंवा चरबीयुक्त पक्वान्ने खाणे आलेच. सर्वच धर्मांत सण म्हटला की हे होतच असते.

सण कसा साजरा करायचा याची सूत्रे याच गटाकडे असतात.

मूकवाचक's picture

24 Dec 2025 - 5:59 pm | मूकवाचक

विज्ञानवादी, विवेकवादी, बुद्धीवादी, चिकीत्सक वगैरे वगैरे बिरुदे मिरवणारे तथाकथित विचारवंत ठराविक एकाच धर्मावर टीका करत असल्याने उपरोधाने हा लेख लिहीला असावा असे वाटले. बाकी चू. भू. दे. घे.

अभ्या..'s picture

24 Dec 2025 - 9:01 pm | अभ्या..

नको सांता आणि नको केक,
येशूला हवे वातावरण नेक,
नको ते फुगे आणि नको तो फटाक्यांचा जाळ,
साजरा करू प्रदूषणमुक्त नाताळ

.
मला ह्या "गप्पी मासे पाळा हिवताप टाळा " स्टाईल घोषणा फार आवडल्या.
अशाच काही स्लोगन वेगवेगळ्या सणांच्या करायला पाहिजेत.
.
नको तो सुरकुंबा नको तो खजूर.
मिळून सारे म्हणू "जी हुजूर जी हुजुर".
.
नको ते फटाके नको त्या पणत्या
पैशाचा चुराडा पाहून ईडी लावल खणत्या .
.
अजून टाकेन सुचल्या तर....

फार उपरोधिक लेख लिहिण्यामागे राग खूप आलेला आहे असे जाणवतेय.

कॉमी's picture

25 Dec 2025 - 12:49 am | कॉमी

ख्रिस्तविरोधी कुठले.
तुम्ही हा लेख लिहिला म्हणून मी माझ्या डायबेटिक आज्याला अख्खा प्लम केक जबरदस्तीने खायला लावणार आहे. मी दम्याने त्रस्त असलो तरी फटाक्यांची अख्खी फॅक्टरी उडवणार आहे.

तुम्ही ख्रिस्तविरोधी लिखाण करून मला हे सगळे करायला भाग पाडले आहे...