दिवाळी अंक २०२२ - विष्णू, मारुती, जोगेश्वरी इ.

Primary tabs

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 8:39 pm

'पुणे तेथे काय उणे' असा एक वाक्प्रचार आहे. हे अर्थातच अनेक क्षेत्रांत सिद्ध झाले आहे. यातील एक क्षेत्र फारसे चर्चेत नाही, ते म्हणजे पुण्यातील विनोदी किंवा काहीशी विचित्र नावे असलेली अनेक लहान-मोठी मंदिरे. मंदिराला मिळालेल्या अशा नावांमागे इतिहास, स्थानिक परंपरा, काही रूढी अशा गोष्टी आहेत. यातील अनेक मंदिरे आता अनेकांना माहीत नसण्याची शक्यता आहे. काही मंदिरे कालौघात विस्मृतीत गेली आहेत. रस्तारुंदी किंवा काही आवश्यक कारणांमुळे काही मंदिरे मूळ जागेवरून हलविलेली आहेत.

पाहू या यातील काही मंदिरांची माहिती. -


मारुती मंदिरे

पुण्यात सर्वाधिक मंदिरे मारुतीची असावीत. यातील कोणतेही मंदिर खूप मोठे, अवाढव्य नाही, तर अगदी लहान आकाराची आहेत.

बटाट्या मारुती - हे लहानसे मंदिर शनिवारवाडा मैदानात, साधारणपणे थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा किंवा नवा पूल सुरू होतो त्या बाजूला आहे. या मैदानात पूर्वी या मांदिराच्या आसपास बटाटे विकायला भाजी विक्रेते बसायचे. त्यामुळे ते नाव प्रचलित झाले. याच मैदानात अगदी १९९०-९१ पर्यंत मोठमोठ्या सभा व्हायच्या. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात या मैदानात पु.ल. देशपांडे यांची प्रचंड मोठी सभा झाली होती. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंची अशीच प्रचंड सभा झाली होती. भाषण ऐकण्यासाठी लोक पार अगदी नव्या पुलावरसुद्धा उभे होते. लालकृष्ण अडवाणी १९९० मध्ये भारतभर रथयात्रा करीत असताना पुण्यात आले होते व तेव्हा याच मैदानावर त्यांनी सभा घेतली होती. १९६० च्या दशकात पुण्यातील विक्षिप्तांच्या परंपरेतील एक प्र.बा. जोग (अभिनेता पुष्कर जोगचे आजोबा) यांनी तर शनिवारवाड्याच्या नगारखान्यात उभे राहून सभा घेतली होती, जो जवळपास ७०-८० फूट उंचावर आहे. १९९१-९२ नंतर या मैदानात सभा घेणे बंद झाले व या मैदानीचे महत्त्व लयाला गेले. अलीकडे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी भीमा-कोरेगाव स्तंभ अभिवादन या निमित्ताने प्रकाश आंबेडकर, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज अशांनी एक अत्यंत वादग्रस्त सभा घेतली होती व दुसर्‍याच दिवशी भीमा-कोरेगाव परिसरात दंगल झाल्याने या सभेतील बर्‍याच वक्त्यांना अटक झाली होती.

कसबा पेठेत एक ‘गावकोस मारुती मंदिर’आहे. बाजीराव रस्त्यावर नूमविकडून लोखंडे तालमीकडे जाणार्‍या गल्लीत ‘शकुनी मारुती मंदिर’ आहे. आणखी एका ‘गवत्या’ मारुती मंदिरासंबधी ऐकले आहे. आप्पा बळवंत चौकाचे नाव पूर्वी गवत्या मारुती चौक होते म्हणे. लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्टाकडून सोन्या मारुती चौकाकडे निघाले की तांबोळी मशिदीसमोर ‘पोटसुळ्या’ मारुती आहे. बुधवार पेठेत पासोड्या विठोबाच्या आसपास एक ‘धक्क्या’ मारुती आहे. बुधवार पेठेत तपकीर गल्लीत ‘उंबर्‍या’ मारुती आहे. नाना पेठेत पारशी अग्यारीजवळ एक ‘लकेरी’ मारुती आहे.

भांग्या मारुती - बुधवार चौकातून वसंत चित्रपटगृहाकडे जाताना लगेच ५० मीटर अंतरावर एक छोटा रस्ता डाव्या हाताला जातो, जो कुप्रसिद्ध शालूकरांचा बोळ (जुनी वेश्यावस्ती) व पुढे दैनिक सकाळ्च्या मुख्य कार्यालयाकडे जातो. हा रस्ता लागण्यापूर्वी दोन दुकानांमध्ये मारुतीचे एक मंदिर आहे. या मंदिराला कळस, गाभारा वगैरे काही नाही. हाच तो ‘भांग्या मारुती’. अगदी या मंदिरासमोरून पदपथावरून जातानाही येथे मंदिर आहे हे लक्षात येत नाही. येथे पूर्वी लग्नात पंगतीत वाढणारे वाढपी बसलेले असायचे. एखाद्या लग्न-मुंजीत वाढपी कमी पडत असले, तर लगेच कोणतरी येथून वाढपी घेऊन जायचे. त्यांच्यातील काही जण येथे भांग वाटायचे, म्हणून मंदिराचे नाव पडले भांग्या मारुती.

‘पत्र्या’ मारुती नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळातून (प्रसिद्ध बेडेकर मिसळ या बोळात आहे) हुजूरपागेकडे जाताना लागणार्‍या गल्लीत सुरुवातीला हे मंदिर आहे. पूर्वी पत्र्याच्या भिंती असल्याने पत्र्या मारुती हे नाव पडले.

‘उंटाड्या मारुती' - सोमवार पेठेतील आजच्या केईएम रुग्णालयासमोर पेशवाईच्या काळात पेशव्यांचा ऊंटांचा कळप थांबायचा. त्यामुळे हा उंटाड्या मारुती. या मंदिराला व्याधिहर मारुती आणि मद्रासी मारुती अशीसुद्धा नावे आहे.

‘विसावा मारुती' - पूर्वी ॐकारेश्वरावर मृतदेहाचे दहन करायचे. मृतदेह तिरडीवर बांधून खांद्यावरून न्यायचे. त्या अंत्ययात्रेत तिरडी उचलून नेणारी माणसे काही वेळानंतर दमायची, तेव्हा तिरडी नवीन माणासंच्या खांद्यावर दिली जायची. खांदे बदलण्यासाठी अंत्ययात्रा जेथे थांबायची, तेथील मारुतीला नाव पडले विसावा मारुती. मंत्रीमंडळात खात्यांची अदलाबदल करणे याला खांदेपालट हा शब्द रूढ झाला तो यातूनच. हे मंदिर पूना रुग्णालयाच्या समोर आहे.

‘सोन्या मारुती' - लक्ष्मी रस्ता रविवार पेठेतील ज्या भागातून जातो, तेथे सराफांची अनेक लहान दुकाने आहेत. त्यामुळे या भागातील मारुतीला नाव मिळले सोन्या मारुती.

‘डुल्या मारुती’ - नाना पेठेतील हा मारुती पानिपत युद्ध सुरू असताना थरथर कापत डुलत होता, अशी आख्यायिका आहे. हा तत्कालीन लोकांना अपशकुन वाटून काहीतरी अशुभ घडले असे वाटले होते, म्हणून नाव पडले डुल्या मारुती. आणखी एक आख्यायिका म्हणजे पुणे सोडावे का? हा निर्णय घेण्यापूर्वी रावबाजी पेशव्यांनी या मारुतीला कौल लावला होता व तेव्हा या मारुतीने मान डोलावून होकार दिला होता.

‘जिलब्या मारुती' - तुळशीबाग श्रीराम मंदिरासमोर हा मारुती आहे. पूर्वी मंदिराच्या आजूबाजूला हलवायांची बरीच दुकाने होती व या मारुतीच्या गळ्यात कोणीतरी रोज जिलब्यांची एक माळ घालायचे. तेव्हापासून नाव झाले जिलब्या मारुती.

‘गोफण्या मारुती’ - बुधवार चौकात आजच्या फरासखान्याच्या जागेत एक मंदिर होते. हुतात्मा चापेकर बंधूंनी मारुतीसमोर गोफणीचा सराव करण्यासाठी व शिकविण्यासाठी एक गोफण क्लब सुरू केला होता. त्यामुळे या मारुतीचा उल्लेख गोफण्या मारुती असा सुरू झाला.

‘रड्या’ मारुती - गुरुवार पेठेत एका मारुतीसमोर मृतदेह ठेवून रडण्याची परंपरा होती, म्हणून हा रड्या मारुती.

‘पावन’ मारुती - भरत नाट्य मंदिराच्या अगदी जवळ रस्त्यात दोन लहान मंदिरे होती. त्यातील एक पावन मारुती व दुसरे मंदिर उपाशी विठोबाचे. आता ही मंदिरे रस्त्यातून काढून जवळच्या एका इमारतीत आत नेली आहेत.

वीर मारुती - लक्ष्मी रस्त्यावरून अहिल्यादेवी शाळेकडून बालगंधर्व पुलाकडे जाताना पुलाच्या अंदाजे २०० मीटर अलीकडे शनिवार पेठेत वीर मारुती मंदिर आहे. पुण्यातील जी घराणी पानिपताच्या युद्धात लढून धारातीर्थी पडली होती, त्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्र वीरासारखा वेष परिधान करून हातात तलवार घेऊन नाचत नाचत वाजत गाजत मारुतीच्या भेटीला येतो. येथे येऊन मारुतीला मिठी मारली की त्या घराण्यातील वीर देवापर्यंत पोहोचतो, अशी परंपरा आहे. ही भेट धुळवडीच्या दिवशी असते. या मंदिरातील मारुतीला मिशा आहेत. मिशा असणारी ही भारतातील कदाचित एकमेव मूर्ती असावी. वीराचे प्रतीक म्हणूनही मिशा असाव्यात. ही परंपरा अजूनही सुरू आहे.

इतर - याशिवाय भिकारदास मारुती, गवत्या मारुती, लेंड्या मारुती, बंदिवान मारुती, तल्लीन मारुती, झेंड्या मारुती, अचानक मारुती, दक्षिणमुखी मारुती, गावकोस मारुती अशी अनेक मारुती मंदिरे पुण्यात आहेत. यातील बर्‍याच मदिरांचा संदर्भ पानिपत युद्धाशी आहे. पानिपत युद्ध आणि महाराष्ट्र - विशेषतः पुणे यांचा कधीही न तुटणारा संबंध आहे, हे लक्षात येते.


गणपती मंदिरे -

मारुतीनंतर पुण्यात दुसर्‍या क्रमांकावर आहेत गणपती मंदिरे. काहीतरी वेगळे नाव असलेली मारुती मंदिरे सर्वाधिक असली, तरी काही गणपती मंदिरांची नावेदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

लक्ष्मी रस्त्यावर पूर्वी शगुन चौकात उंबराच्या वृक्षाखाली एक लहान गणपती मंदिर होते. रस्तारुंदीमुळे ते शेजारच्या इमारतीत हलविले. हा ‘उंबर्‍या गणपती’.

ज्ञानप्रबोधिनी विद्यालयासमोर हत्तीवर आरूढ झालेल्या गणपतीस नाव आहे ‘हत्ती गणपती’. नारायण पेठेत मातीची मूर्ती असलेला ‘माती गणपती’. तेथून जवळच न.चिं. केळकर रस्त्यावर ‘मोदी गणपती’ मंदिर आहे. मोदीबागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत. ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळे भटांच्या गणपतीची भक्त होती. या मासेबाजाराचा कलकलाट म्हणा किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा, या गणपतीचे नाव ‘बोंबल्या गणपती’ पडले होते. कालांतराने हे नाव मागे पडून मोदी गणपती हे नाव प्रचलित झाले.

त्रिशुंड गणपती - सोमवार पेठेत तीन सोंडा असलेल्या गणपतीचे एक मंदिर आहे. हे मंदिर वर्षातील काही ठरावीक दिवसच नागरिकांना दर्शनासाठी उघडे असते. ती मूर्ती तांत्रिकांसाठी महत्त्वाची आहे, असे म्हणतात.


1


पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याने कसबा पेठेत एक गणपती मंदिर स्थापले. तो झाला ‘गुंडाचा गणपती’. स्थापनेनंतर सुमारे २०० वर्षांनंतर १९८०च्या दशकात या मंदिरातील गणेश मूर्तीवरील जाडजूड शेंदराचे कवच निघून आले व मूळ मूर्तीचे दर्शन झाले. हे कवच नंतर राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे.

सदाशिव पेठेत सुजाता मस्तानीजवळ ‘चिमण्या गणपती’ आहे. शनिवार पेठेत ‘गुपचुप गणपती’ आहे.


विठ्ठल मंदिरे -

पुण्यात अनेक विठ्ठल मंदिरे आहेत. संत तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात नाना पेठेतील ‘निवडुंग्या विठोबा’ मंदिरात असतो. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाल्याने नाव मिळाले निवडुंग्या विठोबा.

बुधवार पेठेत एक ‘पासोड्या विठोबा’ आहे. या भागात पूर्वी रस्त्यात घोंगड्या म्हणजे पासोड्या विकत असत.

शनिवारवाड्यावरून जिजामाता उद्यानाकडे - म्हणजे आता जेथे लाल महाल बांधला आहे, त्या रस्त्यावर जिजामाता उद्यानाला अगदी लागून एक विठ्ठल मंदिर आहे. याचे नाव ‘प्रेमळ विठोबा’.

आणखी एक विठ्ठल मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. भरत नाट्य मंदिराजवळ रस्त्याच्या मध्यभागी पावन मारुती व उपाशी विठोबा ही मंदिरे अगदी शेजारी होती. एक आख्यायिका अशी आहे की या मंदिराचे मूळ नाव उपासनी विठोबा मंदिर असे होते. परंतु त्याचा अपभ्रंश होऊन उपाशी विठोबा असे नाव रूढ झाले. आणखी एक कथा म्हणजे पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठ्या विठोबा’असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांच्याकडे सुपुर्द केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगीकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपुर्द केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगीकारले. सध्या साठे कुटुंबीयांकडे या मंदिराची व्यवस्था आहे. तीन पिढ्यांनी अंगीकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’म्हणून प्रसिद्धीस पावला. रस्त्यात अडथळा होत असल्याने ही दोन्ही मंदिरे आता जवळच्या एका वाड्यात हलविली आहेत.


जोगेश्वरी मंदिरे -

पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर बुधवार पेठेत आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक याच्या बरोबर मध्यभागी आहे. शिवाजी महाराजांच्या काळात एका लहान झऱ्याच्या काठावर या देवीचे अगदी लहान मंदिर होते. आताचे मंदिर फार मोठे नाही. परंतु कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही मानाची ग्रामदैवते आहेत.

काळी जोगेश्वरी - काळ्या पाषाणातील मूर्ती असलेले हे मंदिर दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरापासून रविवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे.

पिवळी जोगेश्वरी - शिवाजी रस्त्याला लागून असलेल्या एका लहान रस्त्यावर मामलेदार कचेरी जवळ हे मंदिर आहे. या देवीचे नियमित दर्शन घेतल्यास उपवर मुलींचा विवाह लगेच ठरतो (म्हणजे हात पिवळे होतात) अशी श्रद्धा असल्याने नाव पडले पिवळी जोगेश्वरी.

मंडईच्या मागून स्वारगेटकडे जाणार्‍या रस्त्यावर एक ‘गुडघेमोडी माता मंदिर’ आहे म्हणे. हे मंदिर पाहण्यात नाही.


दत्त मंदिरे -

पुण्यात नावाजलेली दत्त मंदिरे अगदी मोजकी आहेत.

सर्वात प्रसिद्ध आहे ते दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर.

‘दाढीवाला दत्त मंदिर’ नावाने ओळखले जाणारे मंदिर लोखंडे तालमीकडून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुजूरपागा प्राथमिक शाळेसमोर एका इमारतीच्या तळमजल्यावर आहे. १९११मध्ये दत्तात्रय घाणेकर यांनी हे मंदिर स्थापन केले. त्यांना पोटापर्यंत लांबलचक पांढरी दाढी असल्याने दाढीवाला दत्त मंदिर असे नाव मिळाले.

जिजामाता उद्यानाच्या दारात एक लहान दत्त मंदिर आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातील असल्याने ‘काळा दत्त मंदिर’ असे नाव पडले.


विष्णू मंदिरे -

पुण्यातील प्रसिद्ध विष्णू मंदिरा़पैकी एक आहे ‘बायक्या विष्णू मंदिर’. १८६८मध्ये समाजसुधारक सार्वजनिक काका उपाख्य गणेश वासुदेव जोशी यांनी बाजीराव रस्त्यावर नातूबागेजवळ हे मंदिर स्थापन केले. प्रारंभीच्या काळात त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई या मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकवाचे समारंभ आयोजित करीत असत. त्यामुळे या मंदिरात सुवासिनी महिलांची सतत ये-जा असायची व म्हणून नाव मिळाले बायक्या विष्णू. कालांतराने हे नाव मागे पडले व आता हे मंदिर ‘नवा विष्णू मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

बिजवर विष्णू मंदिर - शनिवार पेठेत वीर मारुतीजवळ हे मंदिर आहे. रावबाजींच्या काळात विठ्ठल लक्ष्मण लिमये यांना ही मंदिराची जागा १८०७मध्ये मिळाली. बऱ्याच वर्षांनंतर १८३८मध्ये लिमये कुटुंबीयांनी हे मंदिर उभारले. काही काळानंतर लक्ष्मीची मूर्ती भंगल्याने नवीन मूर्ती राजस्थानहून मागविली. पण उंची नीट सांगितली गेली नाही. त्यामुळे आता विष्णू खूप उंच आणि लक्ष्मी तुलनेने खूप बुटकी अशी जोडी आहे. मूळ मूर्ती विसर्जन करून लक्ष्मीची नवीन मूर्ती स्थापन केल्याने नाव पडले ‘बिजवर विष्णू मंदिर’.2खुन्या मुरलीधर मंदिर - सदाशिव पेठेतील हे मंदिर पेशवाईच्या अखेरच्या काळात १७९७ मध्य सदाशिव रघुनाथ उपाख्य दादा गद्रे यांनी स्थापले. काही काळानंतर त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी बॉईड हा सैनिकांसह मंदिरावरून जाऊ लागला असता गद्रे यांनी नेमलेल्या अरबांनी त्याना अटकाव केला तेव्हा लढाई होऊन दोन्ही बाजूंची अनेक माणसे ठार झाली म्हणून याला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असा इतिहास आहे. या मंदिराच्या स्थापनेनंतर १०० वर्षांनी इथल्याच चौकात, रँडचे वधकर्ते चापेकर बंधूंची माहिती द्रविड बंधूंनी पोलिसांना दिल्याने, १८९९ मध्ये या मंदिराच्या गल्लीतच द्रविड बंधूंचा खून करण्यात आला. याचाही संबंध मंदिराच्या नावाशी जोडला जातो.

सोट्या म्हसोबा - लक्ष्मी रस्त्यावर आयुर्विमा इमारतीशेजारी हे मंदिर आहे. या मंदिराबाहेर तालमीत व्यायामासाठी वापरले जाणारे सोटे विकत असल्याने हे नाव मिळाले. नवस पूर्ण झाल्यास म्हसोबाला लाकडी सोटा वाहण्याची पद्धत होती.

तर हा आहे पुण्यातील विचित्र नाव असलेल्या मंदिरांचा इतिहास. भाजीराम मंदिर, दगडी नागोबा मंदिर, चोळखण आळीतील खणाळ्या म्हसोबा मंदिर, बुधवार पेठेतील छिनाल बालाजी मंदिर अशीही मंदिरे पुण्यात आहेत.


संदर्भ - लहानपणापासून ऐकलेला इतिहास, वेगवेगळ्या वृत्तपत्रांतील लेख, आंतरजालावर मिळालेली माहिती यावर आधारित हे संकलन केले आहे. ही सर्व माहिती अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Nov 2022 - 12:18 pm | ॲबसेंट माइंडेड ...

माहितीपुर्ण लेख. आवडला.

Bhakti's picture

7 Nov 2022 - 12:45 pm | Bhakti

छान!

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 12:57 pm | कर्नलतपस्वी

सर्वात जुने ग्राम दैवत कसबा गणपती, छत्रपतींच्या मातोश्रींनी हे मंदिर बांधले.
दशभुजा गणपती एक खुप प्राचीन मंदिर आहे. तळ्यातला गणपती सुद्धा प्राचीन मंदिरे आहेत.

अमृतेश्वर, ओकांरेश्वर ,अरण्येश्वर, अशी अनेक शंकराची प्राचीन मंदिरे आहेत. पुणेश्वर आणि नारायणेश्वर ही मंदीरे तर तेराव्या शतकाच्या आगोदरची आहेत.

रास्तापेठ कधी शिवपुरी म्हणून ओळखली जात असे,सरदार रास्ते यांनी प्रथम शंकराचे देउळ बांधून मगच आपला वाडा बांधण्यास सुरवात केली.

दत्त मंदिर,
सरदार रास्ते यांनी बांधलेले १४० वर्षापूर्वीचे सुदंर राम मंदिर व दत्त मंदिर आहे. एक आठवण,
गानकोकीळा हिराबाई बडोदेकर, उस्ताद अब्दूल करीम खान व ताराबाई माने यांची कन्या, किराणा घराण्यातील नामवंत गायिका दत्त जयंतीनिमित्त आपली सेवा प्रभू चरणी अपर्ण करण्यास जरूर हजेरी लावत.यांना ऐकण्या साठी दुरवरून लोक आवर्जून येत. साठी ओलांडून गेली असली तरी गानकोकीळेचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करायचा.

प्र बा जोग यांचे भाषण ऐकले आहे. अत्यंत हुशार पण भाषा मात्र अश्लील होती.

एक पुणेकरी.

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 12:57 pm | कर्नलतपस्वी

सर्वात जुने ग्राम दैवत कसबा गणपती, छत्रपतींच्या मातोश्रींनी हे मंदिर बांधले.
दशभुजा गणपती एक खुप प्राचीन मंदिर आहे. तळ्यातला गणपती सुद्धा प्राचीन मंदिरे आहेत.

अमृतेश्वर, ओकांरेश्वर ,अरण्येश्वर, अशी अनेक शंकराची प्राचीन मंदिरे आहेत. पुणेश्वर आणि नारायणेश्वर ही मंदीरे तर तेराव्या शतकाच्या आगोदरची आहेत.

रास्तापेठ कधी शिवपुरी म्हणून ओळखली जात असे,सरदार रास्ते यांनी प्रथम शंकराचे देउळ बांधून मगच आपला वाडा बांधण्यास सुरवात केली.

दत्त मंदिर,
सरदार रास्ते यांनी बांधलेले १४० वर्षापूर्वीचे सुदंर राम मंदिर व दत्त मंदिर आहे. एक आठवण,
गानकोकीळा हिराबाई बडोदेकर, उस्ताद अब्दूल करीम खान व ताराबाई माने यांची कन्या, किराणा घराण्यातील नामवंत गायिका दत्त जयंतीनिमित्त आपली सेवा प्रभू चरणी अपर्ण करण्यास जरूर हजेरी लावत.यांना ऐकण्या साठी दुरवरून लोक आवर्जून येत. साठी ओलांडून गेली असली तरी गानकोकीळेचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करायचा.

प्र बा जोग यांचे भाषण ऐकले आहे. अत्यंत हुशार पण भाषा मात्र अश्लील होती.

एक पुणेकरी.

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2022 - 1:24 pm | श्रीगुरुजी

पुण्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. परंतु काहिसे विचित्र नाव असलेल्या मंदिरांसंबंधी हा लेख असल्याने फक्त तशाच मंदिरांची माहिती या लेखात दिली आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरात/गावात सुद्धा अशी मंदिरे असणार. उदाहरणार्थ - वाई गावातील ढोल्या गणपती मंदिर.

दाढी वाले घाणेकर शास्त्री यांच्याकडे भृगुसंहिता ग्रंथ होता. त्यातून वाचून सांगितलेल्या भृगु फळातून अनेकांना अदभूत अनुभव येऊन गेले याची आठवण काढणारे अनेक भेटतात.
माहितीसाठी - १० वर्षांपूर्वी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेस होशियारपुरला, मला भृगुसंहिता अक्षय्य पत्रातून वाचनातून अदभूत फल मिळाले होते. त्यात माझे आणि अन्य उपस्थित लोकांची नावे लिहून आली होती ते पहायला मिळाले होते.
ऊद्या पुन्हा कार्तिक पौर्णिमा आहे. आणि मी होशियारपुरला जात आहे. भृगु महर्षींचा आशीर्वाद मिळवायला.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 8:29 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

मिशा असलेला मारुती आमच्या गावात सुद्धा आहे, हा मारुती शेंदुर लावलेल्या अवस्थेत नसुन काळा आहे,

श्रीगुरुजी's picture

8 Nov 2022 - 8:08 am | श्रीगुरुजी

कोणते गाव? जमल्यास प्रकाशचित्र दाखवा.

कानडाऊ योगेशु's picture

8 Nov 2022 - 5:22 pm | कानडाऊ योगेशु

त्यामुळे आता विष्णू खूप उंच आणि लक्ष्मी तुलनेने खूप बुटकी अशी जोडी आहे. मूळ मूर्ती विसर्जन करून लक्ष्मीची नवीन मूर्ती स्थापन केल्याने नाव पडले ‘बिजवर विष्णू मंदिर’.

फार हसु आले हे वाचुन.ज्याच्या कुणाच्या डोक्यातुन अशी नावे आली असतील त्या अनाम व्यक्तिंना प्रणाम.

तर्कवादी's picture

9 Nov 2022 - 11:51 am | तर्कवादी

न पाहिलेल्या काळात घेवून जाणारा आणि नॉस्टेल्जिक करणारा लेख .. आवडला.

प्रसाद_१९८२'s picture

9 Nov 2022 - 12:27 pm | प्रसाद_१९८२

पुण्यात इतक्या विचित्र नावाच्या देवतांची मंदिरे आहेत, हे हा लेख वाचून समजले.
छान लेख !

माहितीपूर्ण आणि मजेदार लेख.

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 1:41 pm | श्वेता२४

पुण्यात असताना मला नेहमी याबद्दल प्रश्न पडायचा. आज तुमच्या लेखामुळे त्याची उत्तरे मिळाली.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2022 - 2:10 pm | श्रीगुरुजी

सर्व प्रतिसादकांचे आभार!

सौंदाळा's picture

10 Nov 2022 - 8:05 am | सौंदाळा

बहुतेक नावे माहिती होती पण बऱ्याच नावांमागचा ईतिहास माहिती नव्हता.
लोकांच्या गुण वैशिष्ट्यांमुळे देव ओळखणे ह्यात पुणेकर कमी नव्हते. पेशवाईच्या काळाच्या मागेपुढे ह्यातील बरीच मंदिरे आहेत. पेशव्यांमुळे प्रामुख्याने कोकणातून पुण्यात आलेल्या लोकांचा कोकणी हिसका अशी नावे ठेवण्यात दिसतो.
माझ्या आजोबांच्या वयाचे कितीतरी लोक अशी नावे एकमेकांना ठेवताना पाहिले आहेत. २, ३ जोशी गावात होते. एक जोशी खूप देव देव करणारा होता तो झाला भक्त्या जोशी, एक सारखा हम्म, हम्म म्हणायचा तो झाला हं हं जोशी, एक जण रोज वर्तमानपत्र विकणाऱ्या जवळ जाऊन फुकट पेपर वाचायचा तो पेपऱ्या जोशी. अशी बरीच उदाहरणे आणि हे सर्व तोंडावर चाले. पण कोकणात अशा विचित्र नावाची देवळे माझ्यातरी ऐकण्या पाहण्यात नाहीत. तो गुण कदाचित मुळा मुठेच्या पाण्यातच असावा.
लेख आवडला.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 10:57 am | श्रीगुरुजी

वाचून हसायला आले. पुण्यातील मंदिरांप्रमाणे काही गल्ल्यांची नावे सुद्धा मजेशीर आहेत. उदाहरणार्थ लोणीविके दामले आळी, तांबट आळा, दाणे आळी, रेवडीवाल्यांची गल्ली, फणी आळी, भाऊ महाराज बोळ इ. नावांमागे सुद्धा इतिहास आहे.

असो. प्रतिसादासाठी आभार!

गोरगावलेकर's picture

10 Nov 2022 - 12:48 pm | गोरगावलेकर

खूप नवीन नावे समजली

नावामागचा इतिहास कळला, लेख आवडला

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 4:08 pm | श्वेता व्यास

लेख आवडला.
विचित्र नावे असलेली यातली बरीचशी मंदिरे माहिती आहेत.
पण बहुतेकांचा इतिहास माहिती नव्हता तो या लेखामुळे समजला.
धन्यवाद.

''ती पानपताची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठंशी झाली हो?''
"तुम्हाला कोण व्हायचंय, पुणेकर मुंबईकर की नागपूरकर" मधल्या पुलंच्या ह्या प्रश्नाच्या लेव्हलचे पुणे विषयक ज्ञान असलेल्या आमच्या सारख्या वाचकांसाठी मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा हा लेख खूप आवडला! काय ती एक एक नावे आणि काय तो त्यांचा इतिहास... सगळंच भारी 👍
धन्यवाद आणि पुढिल लेखनास शुभेच्छा!

स्मिताके's picture

14 Nov 2022 - 10:45 pm | स्मिताके

ही नावं ऐकली होती, पण तुमचा लेख वाचून त्यामागचा इतिहास प्रथमच समजला.
बिजवर विष्णू मंदिर >> मजेशीर

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2022 - 11:37 pm | श्रीगुरुजी

गोरगावलेकर, सुखी, श्वेता व्यास, टर्मीनेटर, स्मिताके - धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2022 - 12:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

बरीच नावे माहित होती पण त्या मागचा इतिहास माहित नव्हता
पैजारबुवा,