कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
17 Aug 2022 - 6:35 pm

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

"कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... "
-----

दुपारी दोन वाजता बहिणीने जेवणासाठी उठवले. अंघोळी-पांघोळी उरकल्यावर छोले-पुरी, गुलाबजाम आणि सांबार भात असे जेवण झाल्यावर तयार होऊन बहिणीच्या घरापासून ५५ - ५६ की. मी. अंतरावरच्या, सव्वा-दीड तासाचा प्रवास असलेल्या प्राचीन 'तांबडी सुरला महादेव मंदिरात' जायचा विचार केला होता पण त्यावेळी करोना निर्बंधांमुळे मंदिर दुपारी तीन वाजताच बंद होत असल्याचे समजल्यावर तो बेत रद्द केला.

पोर्तुगीज राजवटीत त्यांच्या आधीपत्या खालील प्रदेशातल्या हिंदू, मुसलमान धर्मियांवर बळजबरीने कर्मठ ख्रिस्ती धर्म लादण्यासाठी १५६०-१५६१ मध्ये सुरु झालेल्या 'द गोवा इन्क्वीजीशन' (The Goa Inquisition) अंतर्गत जे अनन्वित अत्याचार केले गेले त्यात १५६६ ते १५६८ ह्या काळात गोव्यातली जवळपास सर्व (७५० पेक्षा जास्त) प्राचीन मंदिरे उध्वस्त केली गेली.

'पोर्तुगीज अर्काईव्हज' (Portuguese Archives) मधल्या १५६९ सालच्या एका राजपत्रात भारतातल्या पोर्तुगीज वसाहतीतली सर्व हिंदू मंदिरे जाळली अथवा जमीनदोस्त करण्यात आली असल्याची नोंद आहे.

पण मुख्य वस्ती पासून दूर जंगलात (मोलेम अभयारण्याच्या परिसरात / Mollem National Park) असल्याने १२ व्या शतकात यादव राजा रामचंद्र ह्यांच्या मंत्र्याने बेसॉल्ट दगडांत बांधलेले आणि उत्तम शिल्पकलेने सजलेले हे प्राचीन मंदिर धर्मांध ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आणि प्रशासकांच्या अत्याचारांपासून बचावले. आजघडीला हे मंदिर गोव्यातले सर्वात प्राचीन मंदिर म्हणुन ओळखले जाते.

अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले हे प्राचीन महादेव मंदिर 6-7 वर्षांपूर्वीच्या एका गोवा भेटीत पाहिले आहे, ते ह्या भेटीत पुन्हा पाहता नाही आले. त्यामुळे त्याविषयी इथे जास्ती लिहीत नाही, पण गेल्यावर्षी फेसबुक वर प्राचीन वास्तुकला/स्थापत्य/संस्कृती विषयक एका ग्रुपवर ह्या मंदिराचा परिचय करून देण्यासाठी एक सचित्र लघुलेख लिहिला होता त्याची लिंक इच्छुकांसाठी देतो.
Tambdi Surla Mahadev Temple - Goa

तांबडी सुरलाचा बेत रद्द झाल्यावर मग साडे तीनच्या सुमारास मी आणि भाऊ दक्षिण गोव्यातील सालसेत (साष्टी) तालुक्यातील 'कुडतरी' (कुर्तरीम / Curtorim) इथे असलेल्या माझ्या बायकोच्या आजोळी जायला निघालो आणि तासाभरात ३७ की. मी. चा प्रवास पार पाडून तिच्या आजोबांच्या (आईच्या वडिलांच्या) पोर्तुगीज कालीन घरी पोचलो.

house 1
.
house 2
.
house 3
.
प्रत्येक वेळी गोव्याला आलो की आम्ही आजोबांची सदिच्छा भेट घ्यायला अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण आवर्जून ह्या ठिकाणी येऊन जातो.
पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा यायची. अनेक जुन्या गोष्टी समजायच्या, माहिती मिळायची. पण आता आजोबा बरेच थकले आहेत. यंदा त्यांनी एक्याण्णवव्या वर्षात पदार्पण केले आहे, तब्येतही नरम-गरम असते आणि गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांची श्रवणशक्ती कमी कमी होत त्यांना अजिबात ऐकू येईनासे झाल्याने आता त्यांच्याशी संवाद असां होत नाही, पण तिथे गेलं की त्यांना बरं वाटतं.

गोव्यातली जुनी घरं चांगली मोठी असतात त्याला हे रघुनाथरावांचं (आजोबांचं) पोर्तुगीज कालीन घरही अपवाद नाही. जुने वाडे / घरांची आवड असलेले अनेक मिपाकर आहेत, कितीतरी गोवेकरही मिपावर आहेत त्यांना माहिती असेलच पण ज्यांना त्याविषयी कुतूहल किंवाआवड असेल त्यांच्यासाठी घरातील अंतर्भागाचे/काही खोल्यांचे फोटोज खाली देत आहे.
.
house 4
.
house 5
.
house 6
.
house 7
.
house 8
.
house 9
.
house 10
.
house 11
स्वयंपाकघर.
.
house 12
स्वयंपाकघर.
.
house 13
अडगाळीची खोली.
.
पोर्तुगीज राजवटीत ही मोठाली घरे रंगावायला सरकार पैसे देत असे!

बायकोच्या आजोबांची आणि मामा, मामीची भेट झाली. मामाचा मोठा मुलगा नोकरी निमित्ताने तर धाकटा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
चहा-पाणी झाले. मग घराच्या मागे असलेल्या त्यांच्या बागेत फेरफटका मारून परतल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू असताना मामीने बनवलेले गरमा गरम ब्रेड रोल्स आणि कोक असा अल्पोपहार झाला.

सगळ्यांचा निरोप घेऊन सव्वा सात वाजता आम्ही तिथून जायला निघालो त्यावेळी मामाही आम्हाला मेन रोड पर्यंत सोडण्याच्या बहाण्याने निघाला तेव्हा मामीने हसत हसत मामाला "जावई आलाय म्हणुन जास्ती रंगात येऊ नका... लिमिट सांभाळा आणि लवकर घरी या..." अशी इशारेवजा सूचना देऊन पत्नीधर्माचे काटेकोरपणे पालन केले 😀

घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुडतरी बस स्टॅंड जवळच्या एका बारमध्ये आम्ही तिघे प्रवेशकर्ते झालो.
गोव्याची 'उराक' मला प्रचंड आवडते, पण अजून तिचा सिझन सुरु व्हायला दीड-दोन महिने अवकाश होता म्हणुन माझ्यासाठी दुसऱ्या पसंतीची 'कोकोनट फेणी', मामासाठी 'बिअर' आणि आता जाताना भावाला बाईक चालवावी लागणार असल्याने त्याच्यासाठी 'मिरिंडा' ची ऑर्डर दिली!

सव्वा आठ पर्यंत तिथला कार्यक्रम आटपून मामाचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि पावणे दहा वाजता मुक्कामी पोचलो. आम्हाला विशेष भूक नसल्याने आमचे जेवण बनवू नकोस असे बहिणीला आधीच कळवले होते तरी तीने 'इडली फ्राय' करून ठेवला होता तो खाल्ला.

काल रात्रीची झोप पूर्ण झाली नव्हती आणि उद्या पासून दक्षिण गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची होती त्यामुळे फार वेळ गप्पा वगैरे मारत न बसता साडे दहाच्या सुमारास निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
----------

सकाळी उठायला साडे नऊ वाजले, म्हणजे तसा उशीरच झाला होता. संकष्टी चतुर्थी असल्याने बहिणीचा उपास होता म्हणुन तीने साबुदाण्याची थालीपीठे करण्याचा घाट घातला होता. थालीपीठे बनण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने मी आणि भावाने चहा बिस्किटे खाऊन अंघोळी उरकून घेतल्या.

साजूक तुपावर भाजलेल्या साबुदाण्याच्या खमंग थालीपीठांच्या जोडीला दही, लिंबाचे (उपासाचे) लोणचे आणि केळी असा दणदणीत नाश्ता (नाश्ता कसला Brunch) झाल्याने दुपारी जेवायची गरजच उरली नव्हती 😀

कंपनीच्या कामासाठी आठवडाभर मुंबई हेड ऑफिसला गेलेले बहिणीचे मिस्टर आज संध्याकाळी परतणार होते आणि त्यांना आणायला तिला गाडी घेउन एअरपोर्टला जायचे असल्याने आजच्या दक्षिण गोव्यातल्या किल्ले दर्शनासाठी मी आणि भाऊ दोघेच जाणार होतो. पण अकराच्या सुमारास आम्ही निघण्याच्या तयारीत असताना भाऊजींनी त्या कामासाठी ड्रायव्हर अरेंज केला असल्याचे कळवणारा फोन तिला आला तसा आमचा प्लॅन बदलला!

मग बहिणीची किचनमधली जुजबी आवरा आवरी आणि तयारी झाल्यावर आम्ही तिघेजण निघेपर्यंत साडे अकरा वाजले. ड्रायव्हरला द्यायला कारची चावी समोरच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या दक्षिणात्य कुटुंबाकडे ठेऊन माझी बाईक आणि बहिणीची ऍक्टिवा घेऊन आम्ही निघालो.

साईट सिइंगची सुरुवात शेवटच्या टोकापासून करण्याची सवय माझ्या अंगावळणी पडली असल्याने दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या'काणकोण' (कॅनाकोना / Canacona) तालुक्यातील 'काबो-डी-रामा' (Cabo de Rama) ह्या संपूर्ण गोव्यातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन किल्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोव्यातील शेवटच्या किल्ल्याच्या दिशेनी प्रवास सुरु झाला.
.
map
.
वास्तविक 'काबो-डी-रामा' हा भौगोलिकदृष्ट्या गोव्याच्या दक्षिणेकडचा शेवटचा किल्ला नाही. त्यापुढेही 'अंजेदिवा' नावाचा एक फार प्राचीन (अवशेषरुपी) किल्ला 'अंजदीप' नावाच्या बेटावर आहे पण आता त्या बेटावर भारतीय नौदलाचा तळ असल्याने तिथे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही.

'अंजदीप' हे बेट गोव्याच्या मुख्यभूमीपासून लांबवर, कर्नाटकातील कारवारच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ असले तरी त्यावर प्रशासन गोवा सरकारचे आहे. अशी गंमत गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही टोकांना बघायला मिळते. उत्तरेकडे 'तेरेखोल' (Terekhol / Tiracol) किल्ल्याच्या बाबतीत तर दक्षिणेकडे अंजदीप बेट आणि त्यावरच्या 'अंजेदिवा' किल्ल्याच्या बाबतीत.

तेरेखोल हे गाव भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यात असले तरी तिथला 'तेरेखोल किल्ला' आणि त्याच्या आसपासचा थोडा प्रदेश मात्र गोवा सरकारच्या अखत्यारीत येतो. तर 1961 साली भारतीय सेनेने 'ऑपरेशन विजय' सुरु करून गोवा, दिव-दमण आणि अंजदीप (अंजेदिवा) बेट पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केल्यावर ते गोवा राज्याचा भाग बनले.

विशेष गोष्ट म्हणजे 1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते आणि 1961 साली 'ऑपरेशन विजय' नंतर भारत सोडून जाणारे सर्वात शेवटचे युरोपीयन शासकही पोर्तुगीजच होते!

असो, करमळी पासून 57 किमीचा प्रवास रमत गमत दोन तासात पार करून आम्ही दुपारी दीड वाजता 'काबो-डी-रामा' किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.

cabo 1
.
तीन बाजूने पाणी आणि एका बाजूला जमीन अशी भौगोलिक स्थिती असणाऱ्या समुद्रात शिरलेल्या जमिनीच्या टोकाला आपण भुशीर म्हणतो त्यालाच पोर्तुगीज भाषेत 'काबो' (Cabo) म्हणतात. साडे-चार ते पाच एकर क्षेत्रफळ व्यापणारा हा किल्ला अशाच एका भुशीरावर बांधलेला आहे.

प्रभु श्री रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात सीतामाई आणि लक्षमाणसह कर्नाटकातून ह्याठिकाणी येऊन काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे ह्या भुशीराला 'राम भुशीर' किंवा 'रामाचे भुशीर' असे नाव पडल्याची दंतकथा आहे. पुढे ह्या रामाच्या भुशीराचे पोर्तुगीज राजवटीत 'काबो-डी-रामा' असे भाषांतर झाले.

अतिशय निसर्गरम्य परिसरात चिऱ्यांनी (जांभा दगडात) बांधलेल्या आणि पूर्वी खोलगड म्हणुन ओळखला जाणाऱ्या ह्या किल्ल्याचा ताबा इतिहासात अनेकवेळा मराठे, मुस्लिम राज्यकर्ते, आणि पोर्तुगीजांकडे फिरता राहिला. सोंधे संस्थानाकडून हैदरअली कडे मग पुन्हा सोंधे संस्थानाकडे जात शेवटी 1791 मध्ये ह्या किल्ल्याचा ताबा पूर्णपणे पोर्तुगीजांकडे आला तो थेट 1961 पर्यंत.

किल्ल्याच्या मध्यभागी आजही वापरात असलेला एक चर्च सोडला तर बाकी सर्व भाग्नावशेष उरले आहेत, पण अजूनही सुस्थितीत असलेल्या मजबूत तटबंदीवरून आपण बऱ्यापैकी लांब फेरफटका मारत आसपासचा नयनरम्य परिसर पाहू शकतो.

'काबो-डी-रामा' किल्ल्याचे आणि परिसराचे काही फोटोज -
.
cabo 2
प्रवेशद्वार ओलांडल्यावर समोर ठेवलेली तोफ.
.
cabo 3
किल्ल्याला जमिनिपासुन वेगळे करणारा खंदक.
.
cabo 4
बुरुजावरची तोफ.
.
cabo 5
दुसर्‍या बुरुजावरच्या दोन तोफा.
.
cabo 6
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 7
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 8
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 9
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा १
.
cabo 10
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा २
.
cabo 11
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ३
.
cabo 12
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ४
.
cabo 13
.
फारच प्रेक्षणीय परिसर असलेल्या ह्या किल्ल्यात सुमारे दीड तास व्यतीत करून आम्ही परतीच्या वाटेवरील पुढचे किल्ले बघायला निघालो.

किल्ल्यापासून दीड किलोमीटर पुढे गेल्यावर 'काबो-डी-रामा व्हयू पॉईंट' (Cabo De Rama Viewpoint) असे ठिकाण आहे तिथून लांब पर्यंत पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याचे खूप सुंदर दृष्य बघायला मिळते. त्या ठिकाणी टिपलेले दोन फोटोज -

cabo 14
.
cabo 15
.
.
ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला...

क्रमश:

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

17 Aug 2022 - 9:14 pm | जेम्स वांड

प्रतिसाद देतोय,

लेख पण आवडला मजबूत, गोवा ट्रीप ऑफ बीट होणार आहे ही नक्कीच !

तुफान आवडला तुमचा व्हिजन स्कोप एकीकडे कॅसिनो दुसरीकडे मंदिरे अन् गडकोट ! सहसा ज्याला दोहोंपैकी एकही मिळत नाही तो दुसऱ्याला शिव्या घालताना दिसतात जगात LoL.

रघुनाथराव आजोबांचे घर तर फारच सुंदर, पोर्तुगीज आमदानीत घरे रंगवायला सरकारी भत्ता ही कन्सेप्टच आवडलेली आहे फुल !

काबो दा रामा पण आवडला, व्युज मस्त आहेत.

बाकी गोवा आणि फ्लोरल हुला शर्ट हे एक अद्वैत आहे च्यामारी ! तुमचे हुला शर्ट कलेक्शन पाहून तुम्ही पुढील ट्रीप हवाई, मालदीव, बाली, Polynesia, अशी कुठंतरी काढून ते शर्ट अन् आमचे वाचन सफल करावे अशी नम्र विनंती.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2022 - 3:32 pm | टर्मीनेटर

बाकी गोवा आणि फ्लोरल हुला शर्ट हे एक अद्वैत आहे च्यामारी ! तुमचे हुला शर्ट कलेक्शन पाहून

+१
मला फ्लोरल प्रिंटचे शर्ट्स आणि थ्री फोर्थ दोन्ही आवडतात 🙂 पहिला ह्या प्रिंटचा शर्ट १९९७ मध्ये घेतल्याचे चांगले आठवतंय! बाकी कलेक्शनचं म्हणाल तर आजघडीला फक्त ३ असे शर्ट्स आहेत, एक हा लाल, दुसरा केशरी-पिवळा आणि तिसरा निळा.

पुढील ट्रीप हवाई, मालदीव, बाली, Polynesia, अशी कुठंतरी काढून

ह्यातले 'बाली' झाले आहे.
मालदीव आणि लक्षद्विप अशा दोन्ही ठिकाणी जाऊन आलेल्या मित्राच्या मते मालदीव पेक्षा लक्षद्विप जास्ती सुंदर आहे, पण दोन्ही ठिकाणी अल्कोहोलिक ड्रिंक्स वर बंधने असल्याने तिथे जायला अजून तरी मनाची तयारी होत नाही 😀 (अर्थात मालदीव मध्ये फक्त रिसॉर्ट्स मध्ये उपलब्धता असली तरी इतर ठिकाणी निर्बंध आहेत, तर लक्षद्विपमध्ये मात्र १ बेट सोडून अन्य सर्वठिकाणी मद्यपानास बंदी आहे अशी बंधने असलेल्या कोणत्याही ठिकाणी जायला आवडत नाही )
तरी समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मालदीव बेटांना जलसमाधी मिळणार असल्याच्या बातम्या वाचनात आल्या कि तसे होण्यापूर्वी तिथे जाऊन यावे असे कधी कधी वाटते; बघू, नजीकच्या भविष्यात 'Teetotaler' वगैरे झालो तर ह्या दोन्ही ठिकाणी जाण्याचा विचार करता येईल 😀

बाकी हवाई आणि polynesia पेक्षा 'क्यूबा' इथे जाणे अधिक चांगले असे पूर्वी माझ्या शेजारी राहणाऱ्या मित्राचे मत आहे. नोकरी निमित्ताने त्याचे भरपूर देश फिरून झाले आहेत, क्यूबामध्ये तर त्याचे २-३ वर्षे वास्तव्य होते. आमच्या बहुतांश आवडी-निवडी जुळत असल्याने आणि त्याच्याकडून ऐकलेल्या किस्स्यांवरून मी क्यूबा माझ्या बकेट लिस्टीत ऍडवले आहे! कधी योग येतो ते बघुयात.

दिलखुलास प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 3:38 pm | जेम्स वांड

पण दोन्ही ठिकाणी अल्कोहोलिक ड्रिंक्स वर बंधने असल्याने तिथे जायला अजून तरी मनाची तयारी होत नाही

वाईट आहे हे, जाऊ पण नका अश्या ठिकाणी

मग काय तर, आपली एन्जॉयमेंटची संकल्पना जर 'त्या' गोष्टीशिवाय पूर्णच होऊ शकत नसेल तर अशी ठिकाणे 'बॉयकॉट' करण्याचा आपला मूलभूत अधिकार भक्त, गुलाम, सेक्युलर, लिबरल, डावे, उजवे, पुरोगामी, प्रतिगामी असे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही 😀

जेम्स वांड's picture

19 Aug 2022 - 4:03 pm | जेम्स वांड

कुठलेही लेबल लावले तरी आपण काही त्या पापी आचरणाचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही

ज्याला संतुलन जमले तो जिंकला

- (जायरोस्कोप calibrated तळीराम) वांडो

टर्मीनेटर's picture

19 Aug 2022 - 4:14 pm | टर्मीनेटर

कुठलेही लेबल लावले तरी आपण काही त्या पापी आचरणाचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही

+१०००
जायरोस्कोप calibrated 👍
Same here... 🙏

साजूक तुपावर भाजलेल्या साबुदाण्याच्या खमंग थालीपीठांच्या जोडीला दही, लिंबाचे (उपासाचे) लोणचे

हे स्वर्गसूख असते!
वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणे सुरेख!!
तुमच्या आजे सासऱ्यांचे घर, किल्ला, देखावे, तोफा सगळेच आवडले!!! पुभाप्र.
x

टर्मीनेटर's picture

19 Aug 2022 - 3:58 pm | टर्मीनेटर

हे स्वर्गसूख असते!

अगदी अगदी.

सचित्र प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कंजूस's picture

18 Aug 2022 - 6:05 am | कंजूस

माझ्या डोक्यात एक चित्र तयार झालं -// तुम्ही आजोबा होऊन तुमच्या फार्म हाउसातल्या अशाच एका मोठ्या घरात आरामखुर्चीत सुपारी कातरत गोष्टी सांगत आहात आणि आम्ही लहान मुलं होऊन तोंडाचा आ वासून ऐकत आहोत.//

पण पुढचे भाग भराभर टाकू नका. वाट पाहायला मज्जा येते .

टर्मीनेटर's picture

19 Aug 2022 - 4:31 pm | टर्मीनेटर

मानसचित्र भारी आहे कंकाका 😀
फक्त सुपारी, पान, गुटखा ह्या तीन गोष्टी सोडून दुसरे काय वाट्टेल ते माझ्या हातात आहे असा बदल त्या चित्रात केलात तर फार बरं वाटेल, आणि मानसचित्र असल्याने ते सहजशक्य होईल अशी अपेक्षा करतो 😀

पण पुढचे भाग भराभर टाकू नका. वाट पाहायला मज्जा येते .

ओक्के 👍

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

सौंदाळा's picture

18 Aug 2022 - 10:19 am | सौंदाळा

खूप सुंदर भाग.
अशा छान छान ठिकाणे तुमचे नातेवाईक आहेत याचा हेवा वाटतो.
गोव्याची ऑफबीट भटकंती पण मस्तच

सुंदर वर्णन आणि भटकंती!
काबो-डी-रामा व्हयू पॉईंट' हून‌ दिसणारे दृश्य मस्तच आहे.
पोर्तुगीज काळातील घर फारच भव्य आहे आवडले.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Aug 2022 - 11:55 am | ॲबसेंट माइंडेड ...

अप्रतिम भाग आहे. खुप आवडला.
फोटोतुन परदेशातले काहीतरी बघतोय असे वाटले. नव्या भागाची वाट पहातोय.

सौंदाळा | भक्ती | ॲबसेंट माइंडेड ...
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2022 - 12:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

अप्रतिम
पुभाप्र,
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2022 - 6:04 pm | कर्नलतपस्वी

वर्णन आवडले

रंगीला रतन's picture

18 Aug 2022 - 6:51 pm | रंगीला रतन

ज ब र द स्त
मजा आली वाचताना! पुभाप्र

पैजारबुवा | कर्नलतपस्वी | रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

प्रचेतस's picture

18 Aug 2022 - 8:14 pm | प्रचेतस

काय जबरदस्त झालाय हा भाग. ओघवत्या लेखनशैलीमुळे विलक्षण वाचनीय.

तांबडी सुरला मंदिराबाबत-
हे मंदिर यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री पंडिताने बांधले असा सर्वसाधारण समज असला तरी हे मंदिर कदंब शैलीत आहे जी कर्नाटक-द्रविड अशा मिश्र शैलीतून निर्माण झालीय, मंदिराचे अधिष्ठान आणि शिखर फांसना शैलीत आहेत तर स्तंभ द्रविड शैलीत आहेत.

हे हेमाद्रीने बांधले असा समज केवळ कुण्या कदंब वंशीय शिवचित हेमाडीमुळे झाले असावे. ह्या शिवचित हेमाडीचे एक नाणे उपलब्ध आहे, त्यावरील लेख पुढीलप्रमाणे-

श्रीसप्तकोटीश्वरलब्धवरशिवचित वीरहेमाडिवर मलवर मारि

ह्याच्या नावावरूनच गोव्यातील एका प्रांताला हेमाड बारशे असे नाव पडले होते.

वास्को द गामा बाबत-
युरोपातून समुद्रमार्गे येणारा पहिला युरोपीय प्रवासी म्हणजे वास्को द गामा हे रूढार्थाने जरी मानत असले तरी त्याआधीही ग्रीक, अरब इकडे येतच होते. सातवाहनांच्या आधीपासूनच जमिनीवरून आणि समुद्रमार्गेही ग्रीकांशी व्यापार चालूच असे, हे ग्रीक काही प्रांतांचे शासकही होते. वास्को द गामा हा आफ्रिका खंडाला वळसा घालून येणारा पहिला युरोपीय प्रवासी असे म्हणता यावे.

बाकी पोर्तुगीजकालीन प्रशस्त घर फार आवडले. तुम्ही खूप भाग्यवान आहात.

काबो द रामाचा किनारा पाहिला असल्याने त्याच्याशी झटकन रिलेट होता आले, अत्यंत स्वच्छ, नितळ किनारा, मात्र तितकाच धोकादायक. पाण्यात मोठमोठे खड्डे आहेत त्यामुळे येथे अजिबात पाण्यात डुंबण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

@ प्रचेतस,
तांबडी सुरला मंदिराबाबतच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी अतीव आभार!

हे मंदिर यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री पंडिताने बांधले असा सर्वसाधारण समज असला तरी हे मंदिर कदंब शैलीत आहे

कदंब राजवंशाचा शासनकाळ हा इ. स. ३४० ते ६१० च्या दरम्यान होता. हे मंदिर १२-१३ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. मंदिराची काहीशी बांधकाम शैली कदंब शैलीची/तिच्याशी मिळती जुळती असल्या सारखा त्रोटक/संदीग्ध उल्लेख मंदिराबाहेर लावलेल्या पुरातत्व विभागाच्या बोर्डवरसुद्धा आहे. पण मग असा प्रश्न पडतो कि कदंबांचा काळ सातव्या शतकाच्या सुरुवातीला संपला होता मग १२-१३व्या शतकात हे मंदिर त्या शैलीत नक्की बांधले तरी कोणी?

हे हेमाद्रीने बांधले असा समज केवळ कुण्या कदंब वंशीय शिवचित हेमाडीमुळे झाले असावे.

मला वाटतं हे असे चुकीचे समज / गैरसमज दूर करण्यात आपले पुरातत्व खाते कुठेतरी कमी पडत असावे किंवा लिखित इतिहास/शिलालेख उपलब्ध नसल्याने त्यांच्या संशोधनास मर्यादा येत असाव्यात.
इतिहासाची मोडतोड करण्याची कुप्रवृत्ती आपल्याकडे आजही दिसते आहेच पण ते असो...

वास्को द गामा बाबत-

ग्रीकांचा भारतात प्रवेश पंजाब प्रांतातून जमिनीवरून/खुश्किच्या मार्गाने झाला झाला होता. तसेच त्यांचा समुद्रमार्गे होणारा व्यापार हा (आताच्या) इराण/इराक पर्यंतच समुद्रमार्गे होत होता असे वाचनात आले होते आणि अलेक्झांडरच्या तत्कालीन सम्राज्याचा नकाशा बघता तेच खरे असावे असे वाटते. (माझा तुमच्याएवढा इतिहासाचा अभ्यास नक्कीच नाही, त्यामुळे कुठे चुकत असेन तर निःसंकोचपणे अवश्य दुरुस्त करा)
त्यामुळे मी लेखात लिहिलेल्या

"1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते"

ह्या वाक्यात
"1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने युरोप मधून आफ्रिकेला वळसा घालून समुद्रमार्गे थेट भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते"
असा बदल करणे योग्य ठरेल, आणि ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याबददल धन्यवाद 🙏

प्रचेतस's picture

19 Aug 2022 - 7:13 pm | प्रचेतस

इसवी सन ८०० ते १२०० हा कदंबांचा वैभवशाली कालखंड मानला जातो. त्या काळातले कित्येक शिलालेख उपलब्ध आहेत. गोपकपट्टण हे त्यांचे महत्वाचे बंदर होते. शिलाहार आणि कदंबांमध्ये राज्यावरून कायम युद्धे होत. कदंब हे चालुक्यांचे मांडलिक होते. द्वितीय जयकेशी हा त्यांचा पराक्रमी राजा. सन ११२५ च्या एका शिलालेखात चालुक्य सम्राट त्रिभुवनमल्ल यांच्याकाळी जयकेशी हा सवालाख कवडीद्विपावर राज्य करत असे म्हटले आहे. ११३८ मध्ये ह्या जयकेशीने चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून दिले आणि स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून राज्य करू लागला, हे पाहून चालुक्य सोमेश्वराने आपले सैन्य पाठवून गोपकपट्टण उद्धस्त केले मात्र जयकेशीने ते परत उभारून कोल्हापूर आणि बेळगाव सुद्धा आपल्या ताब्यात घेतले. ह्याचा मुलगा शिवचित परमादेव ह्यानेच सप्तकोटीश्वराचे मंदिर उभारले. कदंबाचे तेव्हाचे कित्येक शिलालेख उपलब्ध आहेत. साहजिकच तांबडी सुरला त्यांच्या कारकिर्दीतले असणार यात संशय नाही.

त्यांचा समुद्रमार्गे होणारा व्यापार हा (आताच्या) इराण/इराक पर्यंतच समुद्रमार्गे होत होता असे वाचनात आले होते

अर्थातच. तांबडा समुद्र, पर्शियाचे आखात इथून ग्रीक, रोमनांचा भडोच, कल्याण, सोपारा ह्यांच्याशी समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराचा उल्लेख पेरिप्लस ऑफ एरीथ्रियन सी या ग्रंथात उल्लेख आहे.

बापरे... म्हणजे 'मराठी विश्वकोश' ह्या सरकारी संकेतस्थळावर देखील चुकीची/अर्धवट माहिती दिली जाते. कठीण आहे मग 🤦‍♂️

वर लिंक दिलेल्या लेखात सुरुवातीला,

कदंब वंश : दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा (कॅनरा) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजांनी उत्तर कानडा,हानगल, गोवा व त्याच्या जवळपासच्या प्रदेशांवर ३४० ते ६१० च्या दरम्यान, जवळजवळ अडीचशे वर्षे राज्य केले. त्यांच्या लेखांवरून त्यांच्या वंशाची काहीशी कल्पना येते, मात्र त्यांच्या काळाविषयी निश्चित माहिती मिळत नाही.

असे लिहिले आहे तर शेवटी,

ऐहोळे येथील शिलालेखात कीर्तिवर्म्याला कदंब राजवंशाची काळरात्र असे म्हटले आहे. अजवर्म्याचा पुत्र भोगिवर्मा (सु. ६०६ – ६१०) ह्याने आपल्या वंशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा बदामीच्या दुसऱ्या पुलकेशीने पराजय करून वनवासी ही राजधानी उद्ध्वस्त केली व कदंबांचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट केले. ह्या घटनेचा ऐहोळे येथील कोरीव लेखात उल्लेख आहे.

अशी माहिती दिली आहे.

म्हणजे अर्धवटच माहिती दिली आहे म्हणायची!

असो,
प्रचेतसराव तुम्ही तुमच्या अभ्यासावर आधारित एक ग्रंथ लिहून काढाच अचूक संदर्भ देण्यासाठी आम्हाला खूप उपयोगी पडेल तो!

आणखीन एका अभ्यासपूर्ण प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

प्रचेतस's picture

19 Aug 2022 - 8:35 pm | प्रचेतस

बापरे... म्हणजे 'मराठी विश्वकोश' ह्या सरकारी संकेतस्थळावर देखील चुकीची/अर्धवट माहिती दिली जाते.

ही माहिती चुकीची नसून अर्धवट आहे असे म्हणता येईल. विश्वकोषातील उल्लेख हा उत्तर कर्नाटकातील बनवासीच्या कदंबाबद्दल आहे. शिलाहारांप्रमाणेच हेही चालुक्य/राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. जी सत्ता प्रबळ त्यांचे हे मांडलिक असत. प्रबळ राजसत्ता कमजोर झाली हे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित करत. चालुक्यांनी बनवासी कदंबांचा पराभव केल्यानंतर कालांतराने १० व्या शतकात ह्यांची एक शाखा गोव्याची राज्यकर्ता झाली. शिलाहारांचे गोव्यातून उच्चाटन करून हे गोव्याचे सार्वभौम झाले मात्र मांडलिकत्व कायम राहीले ते द्वितीय जयकेशीपर्यन्त. दुर्दैवाने पोर्तुगीजांनी कदंबाचा समृद्धशाली वारसा समूळ नष्ट केला.

प्रचेतसराव तुम्ही तुमच्या अभ्यासावर आधारित एक ग्रंथ लिहून काढाच अचूक संदर्भ देण्यासाठी आम्हाला खूप उपयोगी पडेल तो!

इतकाही अभ्यास नाही हो, आवड म्हणून थोडी माहिती होते इतकेच.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2022 - 8:43 pm | टर्मीनेटर

इतकाही अभ्यास नाही हो, आवड म्हणून थोडी माहिती होते इतकेच.

हा तुमचा विनय झाला! पण खरंच ग्रंथ लिहायचे मनावर घ्याच, मेहनतीने मिळवलेल्या ह्या सर्व माहितीचे डॉक्यूमेंटेशन होणे गरजेचे आहे 🙏

सहमत. मिपावरील मला आवडणार्या लेखकांमधे प्रचेतस साहेबही आहेत. त्यांचे लेख वाचताना इतिहासाचा अभ्यास आणी माहीती गोळा करण्यासाठी केलेली मेहनत लक्षात येते. इथल्या लेखांचा संग्रह असलेले पुस्तक त्यांनी प्रकाशीत करावे असे मला पण वाटते.

कुमार१'s picture

20 Aug 2022 - 10:10 am | कुमार१

वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणे सुरेख!!

तुषार काळभोर's picture

21 Aug 2022 - 11:43 am | तुषार काळभोर

घराचे फोटो, किल्ल्यावरून दिसणारे नजारे.. भारी!
घर पाहून तिथे राहणार्‍यांचा अन त्यांच्या पाहुणचाराचा आनंद घेणार्‍यांचा प्रचंड हेवा वाटला!
मंदीरात जाता आले असते, तर तिथलेही सुंदर फोटो पाहायला मिळाले असते.

किल्ल्यावरील शेवटच्या फोटोत चेहरा शेकडो किलोमीटरच्या दुचाकीवरील प्रवासाने रापलाय की वय जाणवतंय? :D :P

टर्मीनेटर's picture

23 Aug 2022 - 2:24 pm | टर्मीनेटर

कुमार१ | तुषार काळभोर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

घर पाहून तिथे राहणार्‍यांचा अन त्यांच्या पाहुणचाराचा आनंद घेणार्‍यांचा प्रचंड हेवा वाटला!

घर खूपच प्रशस्त आणि छान आहे, तरी सर्व खोल्यांचे फोटोज टाकले नाहीयेत. पण दुपार आणि रात्रीच्या दोन्ही जेवणात मासे खाल्ले जाणाऱ्या त्या घरात मी शक्यतो जेवायला थांबत नसल्याने त्यांना जावयाचा पाहुणचार पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही 😀

मंदीरात जाता आले असते, तर तिथलेही सुंदर फोटो पाहायला मिळाले असते.

हम्म्म! पण पुढच्या एखाद्या भेटीत होईल परत जाणे. गोवा आपलंच आहे!

किल्ल्यावरील शेवटच्या फोटोत चेहरा शेकडो किलोमीटरच्या दुचाकीवरील प्रवासाने रापलाय की वय जाणवतंय? :D :P

शेकडो किलोमीटरच्या प्रवासामुळे रापणे,सततच्या हेल्मेट वापरामुळे झालेला अवतार, थेट चेहऱ्यावर येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे मिचमीचे झालेले डोळे अशा सर्वांचा एकत्रित परिणाम असावा बहुतेक 😜

नचिकेत जवखेडकर's picture

24 Aug 2022 - 2:44 pm | नचिकेत जवखेडकर

जबरी प्रवासवर्णन !!

धन्यवाद नचिकेतजी, आत्ताच पुढचा भाग प्रकाशित केलाय .

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

एक_वात्रट's picture

24 Aug 2022 - 7:14 pm | एक_वात्रट

ते जुने पोर्तुगीजकालीन घर कमालीचे सुंदर आहे. ही जुनी घरे जेव्हा मी पाहतो तेव्हा असं वाटतं की ह्यांना एक व्यक्तिमत्व होतं, स्वभाव होता. आजकालची घरं छान असतात, पण त्यांना व्यक्तिमत्वच नसतं. सगळी एकजात सारखी, बिनचेह-याची!

तो शर्टही फारच आवडलेला आहे हे सांगायलाच पाहिजे का?

असेच अनेक प्रवास करण्यासाठी वेळ आणि पैसा आपल्याला सदैव उपलब्ध होवो एवढेच देवाकडे मागणे आहे!

टर्मीनेटर's picture

25 Aug 2022 - 5:19 pm | टर्मीनेटर

आजकालची घरं छान असतात, पण त्यांना व्यक्तिमत्वच नसतं. सगळी एकजात सारखी, बिनचेह-याची!

+१०००

तो शर्टही फारच आवडलेला आहे हे सांगायलाच पाहिजे का?

नाही... 🤣

असेच अनेक प्रवास करण्यासाठी वेळ आणि पैसा आपल्याला सदैव उपलब्ध होवो एवढेच देवाकडे मागणे आहे!

🙏

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Aug 2022 - 7:16 pm | लॉरी टांगटूंगकर

झक्कास

टर्मीनेटर's picture

25 Aug 2022 - 5:21 pm | टर्मीनेटर

धन्यवाद लॉरी टांगटूंगकर 🙏

नेहमी प्रमाणेच वर्णन आणि प्रची सुंदर आहेतच. आजोबांच्या घराचे फोटोज बघून भव्यतेची कल्पना येते. एवढे मोठे घर रोज स्वच्छ करायला किती सायास पडत असतील हा मुंबईकर विचार मनात आला.
आणि एक, मात्स्याहाराचा प्रयत्न करून बघा.... कदाचित आवडेलही... मद्य आणि मासे हा मेळ ही छान होतो...

एवढे मोठे घर रोज स्वच्छ करायला किती सायास पडत असतील हा मुंबईकर विचार मनात आला.

असा विचार मनात येणे अगदी सहाजीक आहे 🙂
सध्या घरात आजोब, मामा, मामी आणि मामीचे वडील असे चार जेष्ठ नागरीक रहात आहेत त्यामुळे एक दिवस जरी मोलकरीण आली नाही तरी खुप अडचण होते त्यांची.

मात्स्याहाराचा प्रयत्न करून बघा.... कदाचित आवडेलही...

असंख्य वेळा प्रयत्न करुन झाला आहे, पण ते काही जमले नाही 😀 हा अमुक मासा खाउन बघ... ह्याला वास नाही येत, हा तमुक मासा खाउन बघ... ह्याला अजिबात वास नाही येत... असे सांगणाऱ्यांचे ऐकून प्रयत्न करता करता बहुतेक एक माशाचा प्रकार टेस्ट करायचा बाकी नसेल राहिला; पण प्रत्येक वेळी उलटी होण्याशिवाय वेगळे काही झाले नाही 😂
मला माशाचा अंगभूत वासच सहन होत नाही ; ऍलर्जीच आहे म्हणाना एक प्रकारची. हा पण मासे पाळायला मात्र खूप आवडते!

धर्मराजमुटके's picture

26 Aug 2022 - 10:37 pm | धर्मराजमुटके

छान चाललीय सहल !
आजोबांचे घर आवडले पण घरातील वस्तूंची संख्या पाहून जीव घाबरला. मला स्वत:ला मिनिमलास्टीक लाईफस्टाईल आवडते त्यामुळे असू शकते कदाचित.

प्रतिसासासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

मला स्वत:ला मिनिमलास्टीक लाईफस्टाईल आवडते त्यामुळे असू शकते कदाचित.

हो, त्यामुळेच असु शकेल. माझी विचारसरणी विरुद्ध टोकाची असली तरी मला 'मिनिमलास्टीक लाईफस्टाईल' अंगीकारणाऱ्या लोकांबद्दल कौतुकमिश्रित आदर आहे आणि क्रयशक्ती असूनही स्वेच्छेने कित्येक वस्तू आणि सेवांचा उपभोग न घेणाऱ्या अशा मंडळींची संख्या खूपच कमी असल्याचे समाधानही!
जगातल्या बहुसंख्य लोकांनी अशी जीवनशैली स्वीकारल्यास जे अभूतपूर्व जागतिक मंदीचे अर्थशास्त्रीय संकट येऊ शकेल त्याची कल्पनाच करवत नाही 😀

मुक्त विहारि's picture

30 Aug 2022 - 10:02 am | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

टर्मीनेटर's picture

2 Sep 2022 - 8:29 am | टर्मीनेटर

धन्यवाद मुविकाका 🙏

गोरगावलेकर's picture

2 Sep 2022 - 12:28 pm | गोरगावलेकर

लेख,आजोबांचे घर, किल्ला सर्वच सुरेख.
तांबडी सुर्ला मंदिराबद्दलचा प्रचेतस यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण.
माझ्या ५-६ वर्षांपूर्वीच्या सहलीतील मंदिराचा एक फोटो