कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
21 Aug 2021 - 1:40 pm

कंदहार....

आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच.
नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क.
एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय. पत्र पोचायला खूप दिवस गेलेत. आणि सूर्यग्रहणाला फक्त तीन दिवस उरलेत. आणि मग सुरू होतो नफसचा बहिणीपर्यंत पोचण्याचा frantic, determined प्रवास..

नफसला अफगाणिस्तानात वैध मार्गाने प्रवेश मिळणं अशक्य. पुढे कंदहारपर्यंत एकट्या स्त्रीनं प्रवास करणं अजून कठीण. पण नफस हार मानणारी नाही.
सुरवातीच्या एका प्रसंगात एक मोडकी शाळा दिसते. ती बंद करायचा हुकूम आलेला आहे. एक साधा म्हातारा शिक्षक त्याच्याकडे शिकणा-या लहान मुलींना शाळेच्या शेवटच्या दिवशी सांगतो ,"तुमच्या बाजूला या भिंती आहेत खरंय, पण लक्षात ठेवा त्याच्याही वरती मोकळं आकाश आहे. आणि हे कधीही विसरू नका." मनात हा प्रसंग कोरला जातो.
नफसला वाटेत अनेक जण भेटतात. मदरशातून काढून टाकलेला परिस्थितीने बेरकेपण आलेला लहान मुलगा, आपली आफ्रिकन ओळख लपवून, वैद्यकीय शिक्षण नसतानाही तिथे दवाखाना चालवणारा डॉक्टर, रेडक्रॉस ची माणसं. जागोजागी landmines आहेत. त्यावर पाय पडून असंख्य जणांनी आपला जीव किंवा अवयव घालवलाय. असाच पाय गमवलेल्या आपल्या आईसाठी, खोटंनाटं बोलून रेडक्रॉस कडून artificial पाय मिळवणारा चोर...
कुणी तिला फसवतं कुणी मदत करतं. प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर ती आपले अनुभव, विचार रेकॉर्ड करत रहाते.तिच्या प्रवासाच्या backdropवर तिथलं समाजजीवन दिसत रहातं. पार्श्वसंगीतावर भारतीय लोकसंगीताची छाप आहे.

ती कंदहारला वेळेत पोचते का? तिच्या पुढे आता नवीन काय संकटं आहेत?? प्रत्यक्ष पहाणंच चांगलं.

आवर्जून पहाण्यासारखा चित्रपट.
(मी हा चित्रपट world movies वर पाहिला होता. त्याला आता अनेक वर्ष झाली. त्यामुळे तपशीलात काही चुका असू शकतील. त्याबद्दल माफी. पण चित्रपट एकदा पाहिल्यावर विसरणं अशक्य.)

चित्रपटशिफारस

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2021 - 5:15 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर ओळख. ही प्रस्तावना वाचून किती थरार अनुभवायला मिळणार हे लक्षात येतंय !
पहायचा म्हटल्यास कुठल्याही वरतून मंचावर (ओटीटी प्लॅटफॉर्मवर) दिसत नाहीय हा सिनेमा.

मागे अफगाणिस्तानातील तालीबानी पार्श्वभुमीवरचं अशाच प्रकारचं "शौझिया" हे नाटक पाहिलं होतं त्याची आठवण झाली !

प्राची अश्विनी's picture

24 Aug 2021 - 10:03 am | प्राची अश्विनी

धन्यवाद. नाटक नाही पाहिल पण ते पुस्तक मड सिटी वाचलंय.

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 7:58 pm | गॉडजिला

चित्रपट नक्की पाहिल्या जाईल...

आपण आपलं स्वातंत्र्य किती सहज गृहीत धरतो हाच भाव मनात पुन्हा पुन्हा येतोय... हे स्वातंत्र्य टिकवल पाहिजे संवेदनशीलता न गमावणे हा त्याचा पाया आहे

_/\_

प्राची अश्विनी's picture

24 Aug 2021 - 10:04 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.
खरंय. कितीतरी छोट्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात .

तुषार काळभोर's picture

21 Aug 2021 - 8:06 pm | तुषार काळभोर

दुर्दैवाने अमेझॉन वर असून भारतासाठी उपलब्ध नाही.
सध्या तरी पाहता येईल असे वाटत नाही.
पण लेखावरून आपण अती सुदैवी असल्याची खात्री पटते.

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

24 Aug 2021 - 10:05 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.

कॉमी's picture

10 Sep 2021 - 10:08 am | कॉमी

VPN ?

चित्रपटाची ओळख करुन दिल्या बद्धल धन्यवाद.
चित्रपट मिळाला तर नक्की पाहिला जाईल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Aug 2021 - 10:00 pm | चंद्रसूर्यकुमार

चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिळाला तर नक्कीच बघेन. नेटफ्लिक्स, अ‍ॅमॅझॉन प्राईम किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मिळाला नाही. युट्यूबवर पर्शिअन भाषेत आहे आणि सबटायटल्स अरबी की पर्शिअन भाषेत आहेत त्यामुळे त्याचा उपयोग नाही.

त्याबरोबरच नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट पण असाच आहे. मिशिगनमधील एक अमेरिकन स्त्री डिट्रॉईटमध्ये राहणार्‍या एका इराणी डॉक्टरशी लग्न करते. तिचे लग्नानंतरचे अडनाव महमुदी. तिचा नवरा तिला पंधरा दिवसात अमेरिकेला परत येऊ असे आश्वासन देऊन तिला आणि मुलीला इराणला घेऊन जातो आणि दोघी तिथे अडकतात. त्यांचे पुढे काय होते हे चित्रपटातच कळेल.

गॉडजिला's picture

22 Aug 2021 - 1:03 am | गॉडजिला

नाना पाटेकर, करिश्मा कपूर, शरोक खान, ऐश्वर्या रॉय, संजय कपूर अभिनित शक्ती चित्रपट..
.

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा

पण एकंदरीत बर्‍यापैकी जमून गेला होता. नाना, दिप्ती नवल यांचा अभिनय चांगला होता.
करिष्माला वाटलं आपल्या खात्यात "चांगला अभिनय" या नावावर हा सिनेमा जमा होईल, पण हात्तीच्या ..... शारुक आन ऐशच्या आयटम सॉन्गने सिनेमाची पब्लिसिटीच बदलून टाकली. बिचार्‍या करिष्माने लै शिव्या घातल्या !
(माझ्या मते करिश्माच्या जागी दुसरी कोणीतरी हवी होती)

अनिंद्य's picture

21 Aug 2021 - 10:34 pm | अनिंद्य

उत्तम परिचय. आणि तुम्ही परफ़ेक्ट जागी थांबलात. स्वातंत्र्य अनमोल आहे हेच खरे.

काबूल- तालिबान आणि अरब स्प्रिंगमधून प्रेरणा घेऊन मोहसेननी केलेला ‘द प्रेसीडेंट’ ज़रूर बघा. एका पदच्युत हुकुमशाहाची कथा !

कंजूस's picture

22 Aug 2021 - 5:16 am | कंजूस

The kite runner कादंबरी ही अशीच आहे.

अगदी आता काय चाललंय हे पाहायचे तर aljazeera dot com site किंवा aljazeera चानेलवर बऱ्याच डॉक्स येत असतात. ( इज्राएल पलेस्टिनवरही असतात.)

कुमार१'s picture

25 Aug 2021 - 3:17 pm | कुमार१

उत्तम परिचय.

अभिजीत अवलिया's picture

25 Aug 2021 - 3:38 pm | अभिजीत अवलिया

उत्तम चित्रपट ओळख.

प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर ती आपले अनुभव, विचार रेकॉर्ड करत रहाते.तिच्या प्रवासाच्या backdropवर तिथलं समाजजीवन दिसत रहातं.
असे स्वतः शोधायचे सिनेमा मला आवडतात.
मस्त ओळख!

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2021 - 10:05 am | प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद!:)

मदनबाण's picture

9 Sep 2021 - 11:44 pm | मदनबाण

आज कंदहार [२००१ ] पाहिला.
आयुष्य जगणे किती कठीण असु शकते याची जाणीव हा चित्रपट पाहताना होते.
माईन्सवर चुकुन पाय पडल्याने विकलांग झालेले अफगाणी लोक कृत्रिम पायाची जोडी जी पॅरॅशुटने खाली टाकली जाते ती मिळवण्यासाठी धाव घेतात ते दृष्य फारच परिणामकारक आहे.
मनुष्याने फार पाप केले की त्याला अफगाणिस्तान मध्ये स्त्रीचा जन्म मिळत असावा ! :(
हा चित्रपट सुचवल्या बद्धल आभारी आहे. _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ganpati Bappa Lavkar Ya | New Ganpati Song 2021| Pranjal Mandlik

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Sep 2021 - 8:16 am | चंद्रसूर्यकुमार

चित्रपट कुठे बघितला हे सांगता का? नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर कुठेही मिळाला नाही. मला पण बघायचा आहे.

चित्रपट कुठे बघितला हे सांगता का? नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर कुठेही मिळाला नाही. मला पण बघायचा आहे.
piratebay वर kandahar (2001) 720p DvDRip x264 AC3 5.1 ESub [DDR] ही प्रिंट मिळेल. साईझ :- 2.3 GiB
qBittorrent चा वापर केला. हिंदी प्रिंट आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:22 am | प्राची अश्विनी

धन्यवाद. मलाही पुन्हा पहाता येईल.:)