चित्रपट: The Truman Show

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
7 Feb 2021 - 3:34 pm

आज सकाळी प्राईम वर ब्राउज करत असताना हा चित्रपट दिसला. नेहमीप्रमाणे जरा रेटिंग वर नजर टाकून बघायला घेतला.
कथेतले रहस्य पहिल्याच फ्रेम मध्ये प्रेक्षकांना कळून जाते आणि उरलेला चित्रपट, हे रहस्य मुख्य पात्राला कळते का यासंदर्भात आहे. 

जिम कॅरी ने साकारलेला ट्रुमन म्हणजे एका टीव्ही शो मधले पात्र आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला माहीतच नाही आहे की आपल्या भोवती जे जग आहे ते सर्व scripted आहे. त्याच्या भोवती एक बेट तयार केलं आहे जे खर तर एक मोठ्ठा dome आहे. त्यामध्ये शहरातील सर्व गोष्टी म्हणजे इमारती, बस, वाहने इथपासून समुद्र सुद्धा कृत्रिम आहे. आणि अख्या शहरभर जवळपास ५००० कॅमेराची नजर आहे, ट्रुमन ची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी. त्या शो मधले सहकलाकार मुलाखतीत म्हणतात त्याप्रमाणे त्याची भोवती आहे ते सगळं खरंच आहे, फक्त "नियंत्रित" आहे. त्याला या बेटाबाहेर जाण्यापासून हरतऱ्हेने रोखले जाते. अगदी त्याच्या जन्मापासूनचा प्रवास टीव्ही वर प्रसारित होतोय आणि अर्थात प्रचंड टीआरपी आहे या शोला, जो जगभरातले लोक तन्मयतेने बघत आहेत. त्याला हळू हळू काही संकेत मिळत जातात आणि मग त्यातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न कसा करतो ही मांडणी खूप प्रभावी आहे. मुख्य म्हणजे त्याचे कुटुंब, मित्र हे सुद्धा खरे नाहीत. त्यामुळे तो मानसिक धक्का प्रेक्षक म्हणून आपल्यालाच जास्त बसतो. शो चा creator कुठल्या थराला जाऊ शकतो याची चुणूक शेवटच्या एका प्रसंगात येते. कोणीतरी सांगतात की आपण खूप ताणायला नको, त्यामुळे शो चालू असतानाच(live) ट्रुमन मरू शकतो, तेव्हा तो म्हणतो, त्याचा जन्म सुद्धा टीव्ही वरच झाला होता. किंबहुना तो अशी मखलाशी करतो की मी त्याला भीती आणि अनिश्चितता नसणारे जीवन दिलंय, त्यामुळे तो कधीच या सुरक्षित जगाच्या बाहेर जायचा प्रयत्न करणार नाही. 

या प्रवासात त्याचे "पहिल्या नजरेतील खरे प्रेम" अधुरेच राहिलेले असते आणि ती प्रयत्न करत असते तो यातून बाहेर यावा म्हणून. पण शेवटी सगळे ट्रुमन च्या हातातच असते. तसा अंदाज लावण्याजोगा शेवट होतो, पण त्यादरम्यानचे प्रसंग खूप चटका लावणारे आणि विचारात टाकणारे आहेत. 
शेवटचा प्रसंग तर कहर आहे, इतके दिवस एकदम मन लावून बघणारा प्रेक्षक हा शो संपला आहे म्हटल्यावर - "टीव्ही गाईड कुठे आहे रे, अजून काय चालू आहे बघ" हे जेवढ्या सहजतेने म्हणतो ते बघून सुन्न होतो आपण.

बरेच प्रश्न पडतात, आजकाल तर  सभोवताली अशी परिस्थिती चालू आहे की कमी अधिक प्रमाणात आपण कुणाच्या तरी हातातले बाहुलेच आहोत. आपण कसं वागायचं हे कोणीतरी दुसरं ठरवतंय(किंवा आपण ठरवू देतोय) आणि आताच्या आभासी जगात तर अगदीच खरं आहे हे. अगदी शोमधल्या 'Product placement' जाहिराती पासून आयुष्यातल्या त्याच त्याच घडणाऱ्या गोष्टी आणि आपण लोकांसमोर धारण करत असलेले मुखवटे! आपण खरंच आपल्या इच्छेने वागतोय का हा विचार करायला लावणाऱ्या आहेत. ट्रुमन ला लहानपणापासून 'Explorer' व्हायचे असते, पण अर्थात त्याला कोणी explore करू देत नाहीत. आपले सुद्धा बऱ्याच वेळा तसेच होते :-) असो, स्वतःवरून जगाची परीक्षा करू नये म्हणा! 

यावरून इतर काही चित्रपट आठवले. 'Groundhog day' मध्ये एकच दिवस पुन्हा पुन्हा येत राहतो(काळ सरकतच नाही) किंवा '50 First Dates' मध्ये स्मृतिभ्रंश झाल्यामुळे एकच दिवस वारंवार जगणारी नायिका(याचा मराठी रिमेक 'गोजिरी' इतका सेंटी केला होता की विचारू नका, मूळ चित्रपट एकदम हलका फुलका केलाय). पण या दोन्ही पेक्षा ट्रुमन बद्दल जास्त  वाईट वाटते कारण इथे जाणीवपूर्वक माणसांनीच त्याला अडकवून ठेवलाय. एका प्रसंगात ट्रुमन ला जाणवते की सभोवतालच्या गोष्टींमध्ये वारंवारता आहे, त्याच गोष्टी परत परत होताहेत. त्यावरून 'डोंबिवली फास्ट' मधला रोजच्या रुटीनला त्रासलेला 'माधव आपटे' आठवला(याचा मूळ चित्रपट नाही बघितला अजून).

जिम कॅरी चा तगडा अभिनय आहेच. पण त्यासोबत मला 'Ed Harris' चा निर्दयी creator आणि 'Natascha McElhone' चे निरागस पात्र पण आवडले. Noah Emmerich ने साकारलेला मित्र बुचकळ्यात टाकतो. 

बराच वेळ रेंगाळत राहणारा आणि महत्वाचे म्हणजे वेगळा विचार करायला लावणारा सुंदर चित्रपट आहे! इतके दिवस कसा काय पाहण्यात आला नव्हता; अगदी या चित्रपटाच्या नावाची phrase वापरात असण्याइतपत प्रसिद्ध असून बघितला नव्हता याच आश्चर्य वाटलं. निश्चित बघा!

चित्रपटप्रकटनआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2021 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपटाची ओळख आवडली. आभार.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 3:58 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2021 - 5:07 pm | टवाळ कार्टा

भारी पिच्चर आहे हा...
मूळ पिच्चर लै आवडलेला म्हणून मुद्दाम "गोजिरी" बघायला घेतलेला....१५ मिनिटात बंद केला

चांदणे संदीप's picture

10 Feb 2021 - 12:20 pm | चांदणे संदीप

मूळ पिच्चर लै आवडलेला म्हणून मुद्दाम "गोजिरी" बघायला घेतलेला....१५ मिनिटात बंद केला

मी मूळ पिक्चर आवडला म्हणून गोजिरीकडे गेलोच नाही. कारण त्याआधी दोन मराठी चित्रपट पाहण्यात आले ते आवडलेले पण त्यांचे मूळ हॉलिवूड पिक्चर पाहिल्यावर मध समजून गुळाचं पाणी पिल्याचा फील आला. ते दोन चित्रपट म्हणजे...
१) कायद्याचं बोला - मूळ हॉलिवूडपट - माय कझिन विनी
२) दोघात तिसरा आता सगळं विसरा - मूळ हॉलिवूडपट - यू मी अ‍ॅन्ड डूप्री
अजून यादी मोठी आहे, पण ते एक असो.

सं - दी - प

उपयोजक's picture

7 Feb 2021 - 6:12 pm | उपयोजक

बघितलाच पाहिजे!

vcdatrange's picture

7 Feb 2021 - 6:34 pm | vcdatrange

कचकुन लिहिलंय. . . अन् लाडक्या ड्रु ची आठवण काढल्याबद्दल लब्यु

लई भारी's picture

8 Feb 2021 - 8:47 am | लई भारी

बिरुटे सर, मुवि, उपयोजक : प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
@ट का: बघवत नाहीच 'गोजिरी'! तो पिच्चर थेटरात बघितलेल्या एकूण १७४ लोकांपैकी मी एक आहे :-D (कणेकरांचे वाक्य ढापलेय)
@डॉ: Drew च्या smile चे आपण पण पंखे आहोतच :-)

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 1:22 pm | टवाळ कार्टा

ठेट्रात??? कहर

तुषार काळभोर's picture

10 Feb 2021 - 9:56 am | तुषार काळभोर

१०-१२ वर्षांपूर्वी हा पिच्चर पाहून असं कुठं असतं का असं वाटलं होतं.
असंच २००० मध्ये (शारुखचा) 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी' बघून वाटलेलं.

आता दोन्ही वास्तववादी वाटतात!

शा वि कु's picture

10 Feb 2021 - 11:04 am | शा वि कु

जिमचा सोबर अभिनय असलेला सिनेमा.

चांदणे संदीप's picture

10 Feb 2021 - 12:45 pm | चांदणे संदीप

या चित्रपटाबद्दल अजून बरच लिहिता आलं असतं किंवा तेही कमीच पडलं असतं.

सं - दी - प