यंदाचे वर्ष सुरू होताहोताच न भूतो न भविष्यती अशी कोविडची महासाथ संपूर्ण जगावर धडकली. त्यातून आपल्या अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या. कित्येक वर्षे आपण कल्पनाही केली नव्हती असे काही बदल वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर घडले.
संपूर्ण देशातील रेल्वे आणि अन्य सरकारी वाहतूक व्यवस्था काही काळासाठी पूर्ण बंद होती. यासारख्या अन्य काही अभूतपूर्व घटना देखील घडल्या. त्यापैकी एक ताजी म्हणजे नुकताच अत्यंत शांततेत संपलेला सार्वजनिक गणेशोत्सव. आपणा सर्वांच्या आयुष्यात कदाचित एकदाच पाहायला मिळालेली ही यावर्षीची अपवादात्मक घटना असावी. अगदी 1975 च्या आणीबाणीत देखील आवाज करणारी विसर्जन मिरवणूक अल्प काळासाठी का होईना रस्त्यावर होती.
तर मंडळी, असे अनेक धक्के गेल्या नऊ महिन्यात आपल्याला बसलेले आहेत. आता मी तुमच्यासमोर शैक्षणिक क्षेत्रातील अजून एक हलकासा धक्का मांडतोय. नुकतीच मी ही बातमी इथे वाचली आहे :
विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेचा कट ऑफ जास्त, कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पसंती
(https://marathi.abplive.com/news/pune/arts-cut-off-list-is-higher-than-s...).
इयत्ता अकरावीच्या महाविद्यालय प्रवेशासंबंधीची ही बातमी आहे. त्यात पुण्यातील काही नामवंत महाविद्यालयांचा उल्लेख आहे. तसेच त्यावर प्राचार्यांचीही मते दिलेली आहेत. त्यावरून बातमी खरी असण्याची दाट शक्यता वाटते. अन्यत्र अजून संदर्भ मला सापडला नाही. तूर्त ती खरी आहे असे धरून काही चर्चा करूया.
अकरावी प्रवेशाच्या बाबतीत आपण जर गेल्या पन्नास वर्षांवर नजर टाकली, तर एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दिसायची. ती म्हणजे अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी काही अपवाद वगळता आधी विज्ञान शाखेची निवड करतात. मग तिथली यादी संपल्यावर पुढे वाणिज्य आणि कला यांना पसंती दिली जाते. आपल्या समाजात काही समीकरणे जरी बरोबर नसली तरी रूढ होऊन बसली होती. ती म्हणजे उत्तम गुण( ८५ - १०० टक्के हा टप्पा ) म्हणजे हुशार विद्यार्थी आणि अशा विद्यार्थ्यांनी प्रथम विज्ञान शाखेला जायचे. विशेषतः १९७०-२००० या काळात तर ते खूप दिसायचे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थी विज्ञान शाखा डावलून कला शाखेला गेल्याची उदाहरणे अल्प असायची. वरील बातमीने या पारंपरिक दीर्घकालीन समीकरणांना जोरदार छेद दिलेला दिसतो. उत्तम गुण असणारे विद्यार्थी यंदा चक्क कला शाखेला पसंती देत आहेत. बातमीतील हा भाग पाहा:
फर्ग्युसन महाविद्यालय - ( सायन्स कट ऑफ) 484 , (आर्ट्स कट ऑफ) 487
एस . पी . महाविद्यालय - (सायन्स कट ऑफ) 476 , (आर्ट्स कट ऑफ ) 479
मॉडर्न महाविद्यालय - ( सायन्स कट ऑफ) 474 , (आर्ट्स कट ऑफ)- 475
सेंट मीराज ज्युनियर कॉलेज - (सायन्स कट ऑफ) -459 , (आर्ट्स कट ऑफ) 460
हा आपल्या सर्वांनाच बसलेला सुखद धक्का आहे. माझ्या आठवणींत तरी हे अभूतपूर्व आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये काय परिस्थिती आहे याची अद्याप मला कल्पना नाही. कोणी कुठे वाचले असल्यास जरूर लिहा.
आता हा बदल या वर्षापुरता दिसतोय की भविष्यातही कल त्या दिशेने जाईल, हे पाहणे रंजक ठरेल. संबंधित बातमीत काही प्राचार्यांनी असे मत व्यक्त केले आहे, की जर हा कल असाच इथून पुढे राहिला तर मग कला शाखेच्या तुकड्या देखील वाढवाव्या लागतील.
हे सर्व वाचल्यावर माझ्या मनात काही विचार आले ते असे :
१. निव्वळ एका शहरातील काही मोजक्या महाविद्यालयांच्या यादीवरून संपूर्ण विद्यार्थी जगताचा हा कल मानता येईल का ?
२. सध्या सर्वत्र विज्ञान शाखेच्या तुकड्या जास्त असतात आणि कला शाखेच्या कमी. त्यामुळे हे जे चित्र दिसते आहे ते आभासी आहे की खरे ?
३. विज्ञान शाखेला जाऊन पुढे ज्या व्यावसायिक शाखांमध्ये शिक्षण मिळते, त्यांना असणारी तथाकथित प्रतिष्ठा आता पुढची पिढी झुगारुन देउ इच्छिते का ? ?
४. कला शाखेतून पुढे अर्थार्जनाच्या उत्तम संधी मिळणार असतील तर ते स्वागतार्हच आहे. सनदी अधिकारी व्हायचे स्वप्न असल्यास अलीकडे कला शाखा घेण्याचा कल दिसतो.
विषय तसा गुंतागुंतीचा आहे. इतक्यात कुठलाही दूरगामी निष्कर्ष काढणे योग्य नाही. तरी पण आपल्या सर्वांच्या समोर चर्चेसाठी ठेवत आहे.
………………………………………………….
प्रतिक्रिया
3 Sep 2020 - 12:58 pm | सोत्रि
धक्का बसणं हा चाकोरीतल्या आणि साचेबद्ध विचारसरणीचा पगडा असल्यामुळे होत असावं.
जस्ट एक उदाहरण म्हणून, माझ्या एका अमेरिकन कंपनीतला VP, Software Developmenmt, केंट वोगल हा प्रोफेशनल गिटारीस्ट होता. कॉन्सर्टमधे जगभर गीटार वाजवायचा. पण शाळेत असताना गणित चांगले होते. एकदा सणक आली आणि संगणकाचा एक कोर्स करून प्रोग्रामर झाला, अतिशय यशस्वी झाला करीयर मधे. एक ट्रेडींग प्लॅट्फोर्म बनवायची स्टार्ट-अप सुरू करण्याइतका यशस्वी. ह्याचा कंटाळा आला की दुसरं काहीतरी करायचा विचार होता त्याचा.
- (चाकोरीत रगडला गेलेला) सोकाजी
3 Sep 2020 - 1:06 pm | गवि
बरेच factors बघावे लागतील.
दोन्ही प्रकारच्या कॉलेजेसची संख्या, सीट्सची उपलब्धता,..
शिवाय
"सेफर साईड" ऊर्फ फॉलब्याक उर्फ "प्लान बी" टाईप अर्ज.. जे नंतर मागे घेतले जातात.. ज्यामुळे एकूणच कधीकधी दुय्यम पण सहजसाध्य भासणारया ऑप्शनला प्राथमिक लोंढा जास्त येऊ शकतो.
एक शक्यता केवळ.
3 Sep 2020 - 1:17 pm | चौथा कोनाडा
गुणवान मंडळींना विज्ञान शाखेमुळे शिक्षणात होणारा भरपूर खर्च, मिळणार्या करियरच्या संधी आणि त्यातून होणारी कमाई याच्या मर्यादा लक्षात आल्यात, त्यामूळे हॉस्पिटॅलीटी, संगीत, पत्रकारीता, करमणुक उद्योग सारख्या इतर करियरच्या संधी या आताच्या घडीला जास्त आकर्षक वाटताहेत, त्यामुळे तरुणाई तिकडे वळत आहे.
3 Sep 2020 - 1:25 pm | कंजूस
कला शाखेचा खर्च कमी आहे. वेळेचा अपव्यय कमी आहे. पुढे एमबिए करता येतं किंवा एन्टायर म्याथ किंवा स्ट्याट्स + इको घेता येतं. तिथूनही आइटी करू शकतो. गणित हाच पाया आहे. मार्केटिंग क्षेत्र आहेच.
विज्ञान शाखेत जाणे म्हणजे कोचिंग क्लासेसच्या उत्पन्नात भर.
पुढे एंजिनिअरिंग किंवा वैद्यकी म्हणजे कितीही गुण मिळो वर्षाला पाच लाख भरून कुणीही पेमेंट शिटा भरतो. पुढे दवाखाना काढायचा खर्च आहेच.
3 Sep 2020 - 2:14 pm | चौकस२१२
कला शाखेचा खर्च कमी आहे. वेळेचा अपव्यय कमी आहे. पुढे एमबिए करता येतं
हो बरोबर शेवटी जर एमबी ए च करायचे असेल तर एखादा असावं विचार निश्चित करू शकतो कि मग उगाच इंजिनीरिंग ची चार वर्षे का ? ( असे गृहीत धरून कि अश्या विद्यार्थ्याला इंजिनीरिंग ला सहज प्रवेश मिळतोय)
पण याचं उलटे हि हे खरे कि तुम्ही इंजिनेर + चांगले एमबीए असाल तर मागणी जास्त ! कष्ट आणि वेळ पण जास्त !
पण असे हि म्हणेन कि आर्ट + एमबीए पेक्षा कॉमर्स + एमबीए करणे जास्त उत्तम ( हा अगदी तुम्हाला आर्ट / भाषा, इतिहास वैरे मध्ये पौधे काम करायचे असेल तर गोष्ट वेगळी म्हणजे लायब्ररी शास्त्र , संग्रहालय , प्रकाशन इत्यादी )
पण "डॅमजमेण्ट" मध्ये लवकर जायचे तर " बिन कौंटर " अकाउंटंट हाच राजा
एम आय डीसी मध्ये जा तिथे कोणी यंत्र बनवते तर कोणी कापड तर कोणी बिस्केट प्रतेय्क उद्योगाला इंजिनेर लागेलच असे नाही... पण अकाउंटंट तर लागतोच!
3 Sep 2020 - 2:02 pm | चौकस२१२
भारतापुरते बोलायचे तर अनेक क्षेत्रांना मागणी वाढतीय हे चांगलेच आहे
अर्थात त्या प्रदेशाची ( राज्य, देश) नसर्गिक साधन संपत्ती आणि मानवनिर्मित उद्योग यावर हे सगळं अवलंबून असते साधारण पणे
भारत फक्त फियाट / प्रीमियर पद्मिनी आणि हिंदुस्थान मोटर्स अशी उपलब्दह्ता पासून ते आत २० एक मोटार कंपन्या या परिस्थिती आलं हे उदाहरण पहिले तर नुसत्याच इंजिनेररी नाही तर विपणन, ग्रापंफिक आर्टिस्ट , जाहिरातदार ( मग त्यात जाहिरात लिहिणारे लेखन कवी , फोटोग्राफर ) या सगळ्यान्ची मागणी आपोपाप वाढली
आय टी ने तर आमूलाग्र बदल केला .. टीव्ही चॅनल वाढली तसे आर्किटेक्ट लोकांना फक्त इमारती नाही तर सेट डिझाईन ची पण कामे मिळू लागली ..
त्यामुळे जरी इंजिनीरिंग आणि व्यद्यकीय क्षेत्र पेक्षा इतर क्षेत्रातील संध्या वाढल्या तरी "आर्ट याचं पुढे वैद्यकीय पेक्षा वर राहील" असे वाटत नाही.. (लांब पाल्याचे बघितले तर)
तसं बघायचं तर स्वयंपाकी हे क्षेत्र जगभर मागणी असणारे आहे आणि राहील...
आणि देश तसा वेष .. जर्मनी , जपान मध्ये इंजिनेर ला जेवढी मागणी आहे तेवढी मागणी ऑस्ट्रेलिया किंवा न्यू झीलंड मध्ये नाही इकडे अकाउंटंट आणि वकील यानं जास्त भाव
पण अकाउंटंट आणि वकील एकदम उठून स्थलांतरित होऊ शकत नाही तेच इंजिनेर ला जास्त सोपे असते .. म्हणजे त्यादृष्टीने बघतले तर मागणी कोणाला या प्रश्नाचे उत्तर वेगळे येईल
असो
१. निव्वळ एका शहरातील काही मोजक्या महाविद्यालयांच्या यादीवरून संपूर्ण विद्यार्थी जगताचा हा कल मानता येईल का ? निश्चितच नाही
२. सध्या सर्वत्र विज्ञान शाखेच्या तुकड्या जास्त असतात आणि कला शाखेच्या कमी. त्यामुळे हे जे चित्र दिसते आहे ते आभासी आहे की खरे ? थोडेसे आभासी, स्थानिक वाटते शिवाय हि महाविद्यालये चांगल्या दर्जाची असल्यामुळे तिथे प्रवेशाला सगळ्याच शाखांमध्ये उत्तम गन लागत असणार
३. विज्ञान शाखेला जाऊन पुढे ज्या व्यावसायिक शाखांमध्ये शिक्षण मिळते, त्यांना असणारी तथाकथित प्रतिष्ठा आता पुढची पिढी झुगारुन देउ इच्छिते का ? ? झुगारून असे वाटत नाही.. इतर गोष्टीतून अर्थर्जन करता येते हे कळले म्हणून
४. कला शाखेतून पुढे अर्थार्जनाच्या उत्तम संधी मिळणार असतील तर ते स्वागतार्हच आहे. हो आहे ना नक्कीच
3 Sep 2020 - 2:13 pm | कुमार१
वरील सर्वांना धन्यवाद आणि सहमती.
हे सर्व मुद्दे रोचक आणि पटेश !
3 Sep 2020 - 5:00 pm | Gk
छान
3 Sep 2020 - 7:58 pm | भीमराव
विज्ञान शिकुन आपण कुठे मोठा तीर मारलाय? ८.४० ते ५.४० शिक्षणाशी क्ष संबंध नसणाऱ्या नोकरीला गोड मानून बसलोय ना? फंडामेंटल रिसर्च, स्टार्टप असली स्वप्नं फक्त कॉलेजात पडायची. आता मात्र महिनाभर घासून शेवटी मिळणारा पगार हेच अंतिम सत्य आहे. आणि हे कला शाखेत निघालेत ना, ते सुद्धा मोठा तीर मारत नाहीत बघा. मुळात चुक कुठे आहे ते कोण शोधायला तयार नाही. प्रत्येकाला बिन ढासळता यश हवं आहे ही आपली चुक आहे.
3 Sep 2020 - 9:17 pm | सुबोध खरे
परखड सत्य
आजकाल लुंग्या सुंग्याला 95 टक्के गुण मिळतात.
विज्ञान शाखेत 500 जागा असतील तर कला शाखेत 200 च्या आसपास असतात.
हे 200 विदयार्थी 97 टक्के वाले आले तर विज्ञान शाखेत 500 ची यादी 96 टक्क्यांपर्यंत खाली येते यामुळे हे असे आभासी चित्र निर्माण झालेले दिसते.
3 Sep 2020 - 9:36 pm | गणेशा
जसा side business असतो, तसे आपले शिक्षण हे side education म्हणुन बघितले पाहिजे..
आपल्याला फक्त, analytical skills, team skills तत्सम गरजेचे skills develop करून, नंतर योग्य आपल्या निवडलेल्या क्षेत्रात ते योग्य पद्धतीने वापरता आले पाहिजे हे पाहिले पाहिजे..
एखाद्याला, कुक व्हायचे असेल तर त्याने विज्ञानाचे घोंगडे अंगावर घेऊन का जगायचे.. त्याने मस्त त्याचे skill develop करायचे, फिरायचे, नविन नविन ठिकाणी जाऊन तेथील मसाले, पद्धती आत्मसात करायाच्या..
शिक्षण ही माणसाला समृद्ध करण्याची पद्धत आहे, पण 1990 च्या पुढे पैसे आणि नाव कश्यात मिळते यावरून विज्ञान शाखेचे अवडंबर माजले..
पण आपली कुवत जर क्रिकेट खेळण्यात असेल तर त्याने chemistry चे फॉर्मुले सोडवण्यात वेळ आणि बुद्धी गहाण टाकू नये..
कदाचीत, या वर्षी पासून लोकांना शिक्षण आणि अवगत कला यांचा फरक आणि गरज प्रकर्षाने जाणवला आहे का? असे प्रकर्षाने जाणवू लागले आहे..
या पुढे शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होतीलच.. पण ते शिक्षण का आणि कश्यासाठी घ्यायचे हे विचार हि तितकेच प्रबळ होतीलच होतील..
बदल हि काळाची गरज आहे... आणि विचारांचा बदल हि त्याची मुख्य step आहे असे मला वाटते...
4 Sep 2020 - 6:01 am | चौकस२१२
एखाद्याला, कुक व्हायचे असेल तर त्याने विज्ञानाचे घोंगडे अंगावर घेऊन का जगायचे...
पण त्यात सुद्धा जर व्यावसायिक रित्या पुढे यायचे असेल तर शिक्षण केलेले फायद्याचे ठरतेच कि
आणि जेवण बनवण्यात रसायन शास्त्र हि थोडे शिकावे लागते/ जाते
मुळात जरी हे खरे असले कि अगदी "जुजबी शिक्षण घेतलेली व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकते" तरी अधिकृत शिक्षणाचा फायदा होतोच कि.. आणि त्याने दरवाजे हि उघडतात
"शिक्षण झुगारून द्या पाहिजे ते करा" असे काही चित्र होईल असे सुतराम वाटत नाही ..ती कविकल्पनाच ठरेल
हा हे खरे कि भारतात फक्त हा फरक झालाय कि "पारंपरिक क्षेत्रातच शिक्षण आणि संधी मिळते" हे कमी झालाय .. आणि एकाच दिशेने ना जात १-२ दिशांना एकावेळी जात येत असावे! पाश्चिमात्य देशात जश्या दुहेरी पदव्या असतात किंवा विविधता असते तसे भारतात हि वाढेल ( बिझिनेस + इंजिनीरिंग, मेडिकल + हॉस्पिटल मानजमेंट इत्यादी )
पण असे "पारंपरिक क्षेत्र" का निर्माण झाली? कारणे नैसर्गिक होती ,'प्रचंड लोकसंख्यमुळे ताण , देशाची उभारणी होता असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात वाढेल.. आत जशी वाढ आणि सुभटा आली तशी मागणी वाढली मग फक्त तांत्रिक किंवा व्यद्यकीय यापेक्षा इतर गोष्टीना भाव वाढला... हे झाले भारताचे .. अहो आमचं इकडे उलटी गंगा .. उत्पादन कमी कमी कमी होत असल्यामुळे आज या देशात संपूर्ण गाडी बनवण्याचे तंत्र नामशेष झाले आहे .. तेच भारतात टाटा, बजाज, मारुती, महिंद्रा, हिरो, रॉयल एनफिल्ड, इत्यादी स्वदेशी ब्रँड तरी आहेत ! हे तुमचे भाग्य आणि कष्टाचे फळ समजा ...
5 Sep 2020 - 11:39 am | सुबोध खरे
आपली कुवत जर क्रिकेट खेळण्यात असेल तर त्याने chemistry चे फॉर्मुले सोडवण्यात वेळ आणि बुद्धी गहाण टाकू नये..
EASIER SAID THAN DONE
सचिन तेंडुलकर कोटी मध्ये एखादा असतो
क्रिकेट ( बाकी खेळ तर सोडूनच द्या) खेळून आयुष्यभर पोट भरता येईल अशी कोणतीही शाश्वती आपल्या देशात कुणालाही देता येणार नाही.
हीच स्थिती बहुसंख्य कला शाखांची आहे.
जोवर आपला देश त्यास्थितीत पोचत नाही तोवर अधिकृत शिक्षणास पर्याय नाही. मग स्टीव्ह जॉब्सचे उदाहरण द्या किंवा बिल,गेट्स चे.
5 Sep 2020 - 12:21 pm | गणेशा
चौकस जी आणि सुबोध जी,
_________________________
मला जे म्हण्याच आहे, ते मीच स्पष्ट लिहिले नसल्याने थोडासा गैरसमज झालेला दिसतोय.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. शिक्षण हे गरजेचेच आहे.
माझ्या वरच्या प्रतिसादात ही ओळ आहेच.
शिक्षण ही माणसाला समृद्ध करण्याची पद्धत आहे,
मला हे म्हणायचे होते, जर क्रीडा, कुकिंग किंवा इतर गोष्टी करायच्या असल्यावर त्याचा अभ्यास करताना पर्यायाने विज्ञानाच्या प्रॅक्टिकल शी संबंधित अवघड गोष्टी न शिकता, प्रॅक्टिकल शिवाय आर्ट घेऊन आपल्या कला, खेळ आणि त्याबद्दलचे ज्ञान ग्रहण करता येऊ शकेल..
हे मत कला का विज्ञान या विषयामुळे लिहिले आहे.
शिक्षण किंवा आपली आवड असा मुद्दा नक्कीच मला लिहायचा नव्हता.
शिक्षण हे संपूर्ण विकासासाठी गरजेचे आहेच.. आणि विचार प्रगल्भ होण्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही..
पण आपल्याला जे करायचे आहे, त्याचे ज्ञान, शिक्षण घेत राहून main शिक्षण म्हणजे आर्ट जे प्रॅक्टिकल विरहित असते ते side education म्हणुन घेणाकडे कल वाढण्यास सुरुवात झाली आहे म्हणुन आर्ट ला लोक वाढत असतील असे माझे मत आहे..
धन्यवाद.
5 Sep 2020 - 2:59 pm | कुमार१
गणेशा,
तुमचा मुद्दा लक्षात आला.
कला शाखेला गेल्याने सर्वांगीण विकासासाठी जास्त वेळ देता येतो हे खरे.
असे मत संबंधित बातमीत त्या कॉलेजच्या प्राचार्यांनीही व्यक्त केले आहे.
5 Sep 2020 - 3:52 pm | गणेशा
कला शाखेला गेल्याने सर्वांगीण विकासासाठी जास्त वेळ देता येतो हे खरे.
__^__
हे असे एव्हडे बरोबर एका लाईनीत मला का नाही सांगता येत.. अवघड आहे माझे..
5 Sep 2020 - 6:30 pm | सुबोध खरे
गणेशा साहेब
मला मराठी साहित्याची अतिशय आवड होती. माझ्या आईची एम ए पर्यंतची सर्वच्या सर्व पुस्तके मी फार आवडीने वाचली होती.
परंतु मराठी साहित्यात पी एच डी केलं तर प्राध्यापकी सोडून दुसरं काही चरितार्थासाठी मिळणार नाही हे माहिती होतं.
ज्याला शिक्षक होणे आणि आवडीने शिकवणे ( या दोन वेगळ्या गोष्टी आहेत) आवडत नाही त्याने प्राध्यापकी करणे हे पाट्या टाकणे होते.
(अर्थात मराठी साहित्य हि एकमेव आवड आहे असे नव्हे.)
यामुळेच चरितार्थासाठी काही तरी करणं आणि उरलेल्या वेळात आवडीचे करणे हेच बहुतांश लोकांना करावे लागते या अर्थाने माझा प्रतिसाद होता.
5 Sep 2020 - 6:44 pm | सतिश गावडे
>> मला मराठी साहित्याची अतिशय आवड होती.
माझंही असंच होतं. अकरावीला मला मराठीत वर्गात सर्वात जास्त गुण मिळायचे. (बाकीची पोरं फक्त पीसीएम किंवा पीसीबीचा अभ्यास करत असल्यामुळे असावं बहुतेक) गंमत अशी की बारावीला मलाही मराठीत इतरांसारखे यथा तथा गुण मिळू लागले विज्ञान विषयांच्या अभ्यासावर भर दिल्याने. तेव्हा आमच्या मराठीच्या प्राध्यापकांनी आपली खंत भर वर्गात बोलून दाखवली होती, "मराठीचा अभ्यास करुन सायन्सच्या विद्यार्थ्यांचं थोडंच भलं होणार आहे? तुम्ही काय बाबा इंजिनीयर होणार, डॉक्टर होणार"
काळाचा महीमा असा की माझा भाच्याने या वर्षी त्याच कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अर्ज भरला आहे. त्यांना मराठी वैकल्पिक विषय असल्याने मराठीऐवजी माहिती तंत्रज्ञान या विषयाचा विकल्प दिला आहे.
6 Sep 2020 - 10:24 am | चौकस२१२
माझंही असंच होतं.
आता असा वाटत कि भारतात राहून कदाचित नाटय निर्मिती क्षेत्रात काही तरी करता येईल किंवा आर्किटेक्त्त क्षेत्रात जावे कि काय असे आता वाटते पण गेलो उत्पादन निगडित डिझाईन क्षेत्रात... कारण त्यावेळी तरी फार लांबचा विचार केला नव्हतं आणि सिविल पेक्षा मेकॅनिकल ला भाव हेच चित्र होते बरं आर्किटेक्त्त क्षेत्रात पदविका नवहती ,,,
6 Sep 2020 - 10:20 am | चौकस२१२
कुकिंग किंवा इतर गोष्टी करायच्या असल्यावर त्याचा अभ्यास करताना पर्यायाने विज्ञानाच्या प्रॅक्टिकल शी संबंधित अवघड गोष्टी न शिकता, प्रॅक्टिकल शिवाय आर्ट घेऊन आपल्या कला, खेळ आणि त्याबद्दलचे ज्ञान ग्रहण करता येऊ शकेल..
आर्ट मध्ये प्रॅक्टिकल नसते त्यामुळे वेळ वाचतो हे खरे आहे गणेश, पण याचा उपयोग सरसकट सगळ्यांनाच होईल असे नाही असे माझे म्हणे होते एवढेच
शेवटचा उद्देदेश काय, तुमची परिस्थिती काय यावर हा आपण सुचवलेले मार्ग उपयोगी आहे कि नाही हे ठरेल
- घराच्या उद्योगात तरबेज असले मुलगा/ मुलगी मग केवळ शिक्का म्हणून पदवी घायवाचीच तर वेळ कमी लागणारी आर्ट घ्या ( अर्थात परत हे कोणता उद्योग आहे त्यावर , जर उद्योग असेल फार्मसी चा तर मग?)
दुसरे असे कि कोणत्याही उद्योगाला पूरक अशी "लघुत्तम साधारण विभाजक" क्षेत्रातील पदवी म्हणाल तर बिझिनेस पदवी ( भारतातही कॉमर्स ) मग आर्ट तरी कशाला?
- एम्बिएइ हे ध्येय असेल तर मी आधी उदाहरण दिले आहेच, पण त्यात सुद्धा धोका आहेच , ३ वर्षांनी एम्बिएइ नाही प्रवेश मिळाला आणि मुळात :भाव असलेल्या क्षेत्रात " पदवी करता येत असताना सुद्धा ते धुडकावून हा मार्ग स्वीकारला तर पदरात आर्ट ची पदवी कि जिला नोकरी क्षेत्रात तरी तेवढा वाव नाही .. मग काय "प्रॅक्टिकल नको म्हणून " घेतलेला हा मार्ग फसला असे म्हणावे लागेल
कुकिंग चेच उद्धरण घ्या .. त्यात जर पुढे जायचे तर आर्ट करण्यात तरी का वेळ घालवावा?
सरळ शेफ होण्यासाठी जी काही पदवी असेल ती करावी आणि त्यात तर प्रॅक्टिकल हे भरपूर...
असो, कोणतेच क्षेत्र चांगले किंवा वाईट असे नव्हे तर मार्ग कोणते सोप्पे याबद्दल हे सर्व
आणि शेवटी इतरांनी म्हणल्याप्रमाणे मागणी तशी पुरवठा बघून + देश देश त्याची काय उद्योग आहेत त्यावर हे सगळे
मागणीचे उदाहरण देतो गम्मत वाटेल
- एक काळ असा आला होता कि तांत्रिक क्षेत्रात मास्टर ( पद्युत्तर ) करून सुद्धा ऑस्ट्रेलियन पी आर व्हिसा मिळायला वेळ लागत होता त्यापेक्षा ज्यांनी ऑटो मेलानिक चे आय टी आय कोर्स किंवा डिम्प्लोमा + २-३ वर्ष अनुभव असे असल्यानं सुद्धा पटकन पी आर मिळत होते!
- १ वर्षाचा इंडियन कुकरी चा ऑस्ट्रेलियन कोर्से करून पी आर व्हिसा ला जास्त गुण मिळायचे ( म्हणजे भारतीय माणूस ऑस्ट्रेलियात येऊन भारतीय स्वयंपाक शिकणार आणि त्याला मग जास्त गुण! आहे कि नाही गम्मत !
अर्थात ति तात्कालिक परिस्थिती ..
आणि एक खुलासा येथे "आर्ट पदवी" म्हणजे फाईन आर्ट किंवा कमर्शिअल आर्ट किंवा परफॉर्मिंग आर्ट asa अर्थ नव्हे तर जे काही जनरल आर्ट मध्ये शिकवले जाते ते )
4 Sep 2020 - 7:48 am | कुमार१
सर्व नवीन प्रतिसादाकांचे आभार !
>>>>>
वरील सर्व मुद्दे रोचक !
………………………..
मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना एका वर्षी आमच्या महाविद्यालयीन नियतकालिकात एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यात आमच्या महाविद्यालयातील साठ टक्के विद्यार्थी हे केवळ पालकांची इच्छा म्हणून वैद्यकीय शाखेकडे आले होते. प्रत्येकाच्या मनातील अन्य शिक्षणाची सुप्त इच्छा या सर्वेक्षणातून बाहेर आली होती.
गेल्या पंधरा वर्षात मला यात नक्कीच फरक झालेला जाणवला. डॉक्टरांची मुले ठरवून बिगर वैद्यकीय क्षेत्रांकडे गेल्याची अनेक उदाहरणे माझ्या घरात आणि आसपास आहेत.
4 Sep 2020 - 8:57 am | Gk
वैद्यकीय करियर वेळखाऊ , कष्टप्रद आणि तरीही तितके रिटर्न्स न देणारे बनले आहे
4 Sep 2020 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही वर्षांच्या अनुभवानंतर असे एक ढोबळ मत आहे की, काही वर्षानंतर असे लाटेसारखे बदल होतांना पाहिले आहे. याचा काही विदा नाही. पण महाविद्यालयात एखाद्या वर्षी कला शाखेच्या प्रवेशासाठी गर्दी होते, असे सलग दोन पाच वर्ष होते. मग कधी तरी तसे वाणिज्य शाखेचे होते. एक वर्ग आता पक्का विज्ञान शाखेवालाच झालेला असतो, तो फार कमी कला आणि वाणिज्य शाखेकडे वळतो. यालाही काधी आधार नाही.
पालकांचा कल भविष्यातल्या नौकरीच्या संधी, या दृष्टीने हे 'पाल्यांवर' सर्व प्रयोगच चालूच असतात. खरं तर इतक्या नौक-या निर्माण होत असतात पण एक सामायिक अशी व्यवस्थाच नाही की त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी. एकीकडे प्रचंड बेकारी, खासगी नौक-या सतत डोक्यावर टांगती तलवार आणि भविष्यात सरकारची सार्वजनिक क्षेत्रे विकायची घाई पाहता, सरकारी नौक-या भविष्यात कठीण दिसते, तेव्हा अशा सर्वांचा परिणामही असावा, वेगवेगळे प्रयोगही होतांना दिसत असावेत. याबाबतीत काही अधिकचे अधिकृत माहितीपूर्ण सोर्स नाही.
-दिलीप बिरुटे
5 Sep 2020 - 11:01 am | कुमार१
* वैद्यकीय करियर वेळखाऊ , कष्टप्रद आणि तरीही तितके रिटर्न्स न देणारे
* तेव्हा अशा सर्वांचा परिणामही असावा, वेगवेगळे प्रयोगही होतांना दिसत असावेत.
>>> +१११
5 Sep 2020 - 6:57 pm | कुमार१
दहावीनंतर पुढे कुठली शाखा, हा एकंदरीत मध्यम वर्गाच्या दृष्टीने कळीचा प्रश्न असतो. परंतु व्यापारी वर्गात मात्र वेगळी विचारसरणी दिसून येते. याचा एक अनुभव सांगतो.
खूप वर्षांपूर्वी एक दुकानदार असलेले गृहस्थ माझ्याकडे रुग्ण म्हणून आले होते. बरोबर त्यांचा शालेय वयातील मुलगा होता. मग कामाचे झाल्यावर आम्ही थोड्या गप्पा मारल्या. म्हटलं, “छान आहे तुमचा मुलगा”. त्यावर ते हसले आणि म्हणाले, “अजून बरोबर वीस वर्षांनी दुकानात माझ्या जागी हा तुम्हाला उभा असलेला दिसेल !”
एकूण समाजात अशा मनोवृत्तीचे लोकही खूप आहेत आणि ते एका परीने चांगलेच आहे.
समाजाला सर्व क्षेत्रातल्या लोकांची गरज आहे हे महत्त्वाचे.
5 Sep 2020 - 9:43 pm | अनिंद्य
माझे दोन पैसे :-
सायन्स शाखेतील रॅट रेस चा कंटाळा आणि मुलांनी स्वतःच्या मनाच्या कलाप्रमाणे शिक्षण निवडणे हे गेली ८-१० वर्ष प्रकर्षाने बघतो आहे. यावर्षी त्याची 'बातमी' झाली एवढेच.
शाखेनुसार अभ्यासक्रमांची काटेकोर आखणी भविष्यात सैल होईल असे वाटते, किंबहुना तसे होऊ लागले आहे. कोणत्याही शाखेत स्नातक आणि मॅनेजमेंट तर आधीपासून आहेच. भारतात काही वर्ल्ड-युनिव्हर्सिटी टाईप संस्था आर्किटेकचर + फायनान्स, मेडिकल + इंजिनियरिंग असे अभ्यासक्रम आणत आहेत. IITs आता humanities आणि वैद्यकशास्त्र शिकवायचे म्हणताहेत.
एकूण बरेच बदल पुढच्या १० वर्षात होतील असे वाटते. जॉब मार्केटच्या गरजेनुसार अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची पसंती बदलत राहील.
6 Sep 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा
या धाग्याच्या अनुषंगाने "नविन शैक्षणिक धोरण-२०२०" विचार केल्यास विद्यार्थ्यांचा कल आणि व्यावसायिक संधी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसुन येतोय.
बर्याच लवचिक बाबींची तरतुद त्यात दिसून येतेय. एक अभ्यासक्रम / प्रवाह सोडुन दुसरी कडे जाता येईल अश्या अनेक आशादायक तरतुदी आहेत.
प्रत्यक्ष काय होईल हे आगामी ४-५ वर्षांनंतरच समजून येईल !