बैदा रोटी

गणपा's picture
गणपा in पाककृती
3 Jul 2016 - 6:52 pm

गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल.
काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?'
गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना. :)

साहित्यः

रोटीसाठी

१ कप मैदा.
१ लहान चमचा मीठ.
१ अंडे
२-३ चमचे तेल.

सारणासाठी

२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ लहान चमचे जीरं पुड, धणे पुड, लाल तिखट, मसाला, तेल, आलं-लसुण वाटण प्रत्येकी.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आवडी नुसार.
१/२ किलो खिमा.
२ अंडी.

पातीचा कांदा आणि टॉमेटो. (आवडत आसल्यास.)

कृती :


एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालून, एक अंडे फेटुन घालावे. थोडे थोडे पाणी घालत मैदा मळून घ्यावा.
(मी अंड घालायला विसरलोय हे लेकीने नजरेस आणून दिले. )
मैदा ओल्या कापडाखाली झाकून, सारणाच्या तयारीला लागावे.

कढईत तेलावर कांदा मिरची परतून घ्यावी. आलं-लसणाचं वाटण टाकून त्याचा कच्चट वास जाई पर्यंत परतावं.

कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात सर्व मसाले टाकून बाजून तेल सुटेपर्यंत परतावं. चवीनुसार मीठ घालावं.
नंतर त्यात खिमा टाकून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं ढवळावं. खिमा अन मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आच लहान करावी. भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.

झणझणीतपणा वाढवण्यासाठी मी २ चमचे कोल्हापुरी मसाला टाकला. झाकण काढल्यावर जर आत पाणी सुटलं असेल तर आच वाढवून पाणी आटवावं. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करावा.

दोन अंडी फेटून बाजूला ठेवावी. आवडीनुसार पाती कांदा, टॉमेटो बारीक चिरुन ठेवावा.

ओट्यावर थोडं तेल लावून त्यावर मैद्याचा एक लहान गोळा ठेवून हाताने त्याची पातळ रोटी करावी.
त्यावर डाव-दोन डाव(मोठा चमचा) खिमा पसरवावा. टॉमेटो, पातीच कांदा टाकावा. त्यावर २-४ चमचे फेटलेलं अंडं घालावं.
रोटीच्या कडा आत मुडपून हवा तो आकार द्यावा.

ही रोटी अलगद उचलून तापलेया तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी.

गरमागरम बैदा रोटी, आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

4 Aug 2016 - 8:52 pm | आनंदी गोपाळ

ताई, तुम्ही कणिक भिजवताना त्यात अंडे फेटून घातले नव्हते का? पोळी लाटून केलेली दिसते आहे म्हणून विचारलं.

यशोधरा's picture

5 Aug 2016 - 7:50 am | यशोधरा

नाही. नव्हते घातले.

नरेश माने's picture

4 Aug 2016 - 11:58 am | नरेश माने

फोटो पण एकदम कातिल. पण आमच्यानी जमणार नाही एव्हढा खटाटोप आम्ही बडेमियाँला भेट देऊ.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Dec 2019 - 9:18 am | अनिरुद्ध.वैद्य

दिसेनासे झालेत?