सायकल वारी पुणे-पंढरपूर

प्रशांत's picture
प्रशांत in लेखमाला
9 Sep 2019 - 6:25 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:450px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:250px;
margin: auto;
}
div.chitra3 {
max-width:600px;
margin: auto;
}

सायकल वारी पुणे-पंढरपूर

अजित पाटील याचा फोन आला, "उद्या संध्याकाळी सात वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, आकुर्डी येथे IAS (Indo Athletic Society group)च्या पुणे-पंढरपूर-पुणे वारीचा उद्घाटन सोहळा आहे, नक्की या आणि येताना शक्यतो कुर्ता घालून या." कुर्ता घालून यायला का सांगितले, ते तिथे पोहोचल्यावर समजले. दिनांक ९ मे, संध्याकाळी सात वाजता मंदिरात पोहोचलो, तेव्हा फक्त ४-६ लोक जमले होते, पण नंतर अवघ्या पंधरा मिनिटांंत सर्व मंडळी जमली. या वेळी उद्घाटन सोहळा फारच हटके होता.

साक्षात विठ्ठल-रुक्मिणी सायकल घेऊन उद्घाटन सोहळ्याला आले होते. सोबत वारकरी, एवढेच काय, कीर्तनकारसुद्धा आले होते.

मस्त टाळ वाजवत रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल-विठ्ठल, ज्ञानोबा माउली तुकाराम जयघोष करत सायकलकरी दंग झाले होते.

साळुंके साहेबांनी नोंदणीचे पर्याय खुले करून उद्घाटन केले व नंतर अजितने वारीबाबत अधिक माहिती दिली.

या वेळी नोंदणीसाठी तीन पर्याय होते -

१) देहू-पंढरपूर : १००० रुपये
२) देहू-पंढरपूर-आळंदी: १२०० रुपये
३) देहू-पंढरपूर : १६०० रुपये (यात ट्रकने सायकल पुण्याला पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.)

याच्या मोबदल्यात,

१) बिब (बिल्ला नंबर), त्याबरोबर सायकलला व बॅगला लावण्यासाठी टॅग्स होते.

२) सायकलिंग जर्सी (मागे तीन खिसे असलेली)

३) पहिल्या दिवसासाठी लागणारे कूपन - नाश्ता, दुपारचे जेवण, चहा, मुक्कामाचे रात्रीचे जेवण.

४) दुसर्‍या दिवसासाठी लागणारे कूपन - नाश्ता, दुपारचे जेवण, चहा (ज्यांनी देहू-पुणे-आळंदीसाठी नोंदणी केली होती, त्यांच्यासाठी). दुसर्‍या दिवशीचा नाश्ता फार विशेष होता, सुशील मोरेने सर्वांसाठी लातूरवरून गूळ पोळ्या आणल्या होत्या.

५) चिक्की, Pawā - Hy ( हायड्रेशनसाठी गोळ्या)

६) झेंडा

मागच्या वर्षी पुणे ते पंढरपूर सायकलने गेलो होतो आणि परत टेम्पोने आलो होतो. या वर्षी पुणे-पंढरपूर-पुणे प्रवास सायकलनेच करायचा असं ठरवून नोंदणी केली. 'सायकल-सायकल' ग्रूपवर वारीबद्दल माहिती दिली. त्यानंतर ग्रूपमधील सागर (सर पाध्ये), संग्राम पाटील (आबा), उत्तेकर, अनूप, अभिजित (कॅप्टन), आनंद मोने, किरण (गुरुजी) यांनी लगेच नोंदणी केली. आनंदराव व चिंतामणी यांनीसुद्धा नोंदणी केली, हे आम्हाला काही आठवड्यांंनंतर समजले. अभिजित याने फक्त पुणे ते पंढरपूरसाठीच नोंदणी केली होती, पण त्याच्यासाठी पुणे-पंढरपूर-पुणे असा बदल करून घेतला.

मार्च व एप्रिल महिन्यात फारसे सायकलिंग झाले नव्हते, त्यामुळे मे-जून महिन्यात सराव करू या, दोन-तीन मोठ्या (१५० कि.मी.) राईड करू असे ठरवले होते, पण ते काही शक्य झाले नाही. किमान १०० कि.मी.ची एखादी राईड करू, म्हणून लोणावळ्याला जायचा प्लान केला, तर ऊन जास्त असल्याने कामशेतपासूनच परत आलो. २ जूनला 'सायकल-सायकल' ग्रूपच्या मित्रासह भंडारा डोंगराची एक राईड केली. त्यानंतर ट्रेनरवर एक-दीड तासाच्या चार राईड केल्या. थोडक्यात सांगायचे, तर पाहिजे तेवढी तयारी झाली नव्हती. या वेळी पंढरपूर वारीसाठी रोड बाइक न्यायची होती, म्हणून सराव रोड बाईकवर केला होता.

वारीच्या आदल्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी सायकल गाडीत टाकून ऑफिसला गेलो. संध्याकाळी पाच वाजता ऑफिसमधून निघालो व सायकलला मडगार्ड बसवून घेतले, (सगळी कामे कशी वेळेवरच केली पाहिजेत ;) ) कारण पावसात भिजायला आवडते, पण मडगार्ड नसेल तर पाठीवर चिखल उडतो आणि हेल्मेटमधून डोक्यातही जातो. घरी जाताना मेडिकलमधून इलेक्ट्रॉल पावडर व स्निकर्स चॉकलेट्स घेतली. लाईट्स आणि ब्लिंकर आदल्या दिवशी चार्ज करून घेतले होते. सॅडलबॅगमध्ये पंक्चर किट, एक्स्ट्रा ट्यूब, इलेक्ट्रॉल पावडर ठेवून पॅक केली, सायकलला टॅग व झेंडा लावून टायरमध्ये योग्य दाबाची हवा भरून घेतली.

IASने वारी मार्गावरील हायड्रेशन पॉइंटची ठिकाणे, त्यांंचे देहूपासून अंतर याबरोबरच, पॉईंट सुरू व बंद होण्याची वेळ आधीच जाहीर केली होती.

सकाळी ३:१५ला देहूवरून राईडला सुरुवात होणार होती. मी आणि उत्तेकर साहेबांनी नाशिक फाट्यावरून वारीत सामील होण्याचे ठरवले होते. ग्रूपमधील इतर मंडळी हडपसरला येणार होती. उत्तेकर साहेबांना फोन केला व सकाळी ४:३०ला जगताप डेअरी चौकात भेटू असे ठरवले. खरे तर हडपसरला विद्यापीठमार्गे गेलो असतो, तर थोडे अंतर कमी झाले असते; पण सोबतच्या बॅग ट्रकमध्ये टाकायच्या होत्या, म्हणून आम्ही नाशिक फाट्यावरून वारीत सामील व्हायचे ठरवले.

सकाळी गजर वाजायच्या आधी उठलो. आंघोळ करून आवरेपर्यंत बायकोने चहा बनवला होता, तो आणि पीनट बटर चपाती रोल बरोबर घेतला व बाहेर पडलो.

जगताप डेअरी चौकात उत्तेकर भेटले. सोबत सुयोग होता. न थांबता आम्ही नाशिक फाट्याकडे जायला निघालो. सकाळी मस्त प्रसन्न वातावरण होते, हे वातावरण दूषित करण्यासाठी काही टाळकी नाशिक फाट्याच्या फ्लायओव्हरवर गाडीचे दरवाजे उघडून मोठ्या आवाजात 'तडप तडप के इस दिल से....' गाणे ऐकत, धूर उडवत बसली होती. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून खाली उतरलो. चौकात येऊन बघतो तर काय! एकही सायकलस्वार नाही, आणि ट्रकही नाही. नाशिक फाट्याला ४:१०चा कटऑफ टाईम होता, आम्हांला वाटले की २० मिनिटे उशीर होईल, पण ठरल्याप्रमाणे सायकलस्वार आणि ट्रक वेळेत निघाले. पुढचा चेक पॉइंट १८ कि.मी. अंतरावर हडपसर येथे होता व या चेक पॉइंटला वेळेत नाही पोहचलो, तर बॅग पाठीवर घेऊन प्रवास करावा लागेल अशी भीती सुयोगला वाटली. तसे त्याने बोलून दाखवले. हडपसरला ५:१५पर्यंत पोहोचायचे होते, म्हणजे आम्हाला ४५ मिनिटांत साधारण १८ कि.मी. अंतर कापायचे होते. हडपसर हा पुण्यातील शेवटचा चेक पॉइंट असल्याने ट्रक १५-२० मिनिटे वाट बघत थांबेलच, अशी चर्चा करत आम्ही हडपसरकडे निघालो. दापोडीच्या अलीकडे ५-७ लोकांचा वारीमधला एक ग्रूप (इव्हेंटची जर्सी घातलेले) त्याच्या इतर सदस्यांची वाट बघत होता, त्यांना टाटा करून पुढे निघालो. सुयोगची एमटीबी असल्याने त्याला थोडा स्पीड कमी मिळत होता. हडपसरचा चेक पॉईंट साधारण पाचशे मीटर अंतरावर असताना आम्हाला सायकलचे ब्लिंकर्स टिम टिम करताना दिसले! हडपसर चेक पॉईंटला आम्ही पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचलो. समोरच अजित पाटील भेटले. त्यांनी आम्हाला बॅगा ट्रकमध्ये टाकायला सांगितल्या. बॅगा ट्रकमध्ये टाकल्या. मोदक थोड्या अंतरावर दिसला. त्याला मोदक नावाने जोरात हाक दिली. मोदकदादा लगेच धावत आले. मोदक या वेळी स्वयंसेवक होता. त्याने आम्हांला थोडक्यात माहिती दिली की सायकल-सायकल ग्रूपची सगळी मंडळी पुढे गेली होती. फक्त आबा आणि तुम्ही दोघेच मागे राहिलात, तेव्हा तुम्ही लवकर निघा व त्यांना पहिल्या हायड्रेशन पॉईंटला गाठा. आमचे संभाषण सुरू असताना, तेवढ्यात एक जण जवळ येऊन उभा राहिला व मोदकला विचारू लागला. "भाऊ, तुमचं नाव मोदक आहे, म्हणजे तुम्ही मिसळपावचे मोदक का? मी तुमचे लेख वाचत असतो." आम्ही सर्व एकमेकांकडे बघून हसायला लागलो. मी म्हटले, "हो, हाच तो मोदक." उत्तेकर तोवर थोडे पुढे निघून गेले होते, तर सुयोग त्यांच्या मित्राबरोबर होता. इतर ओळखीच्या सायकलस्वारांना भेटलो आणि मोदकचा निरोप घेत पायडल मारले व सोलापूर रोडकडे निघालो. सकाळचे सहा वाजले होते, हवेत मस्त गारवा होता. हडपसर पुलावरून उतरताना वेग पकडला व सुसाट निघालो. नजर जाईल तोवर समोर रस्त्यावर भगव्या रंगाची जर्सी घालून सायकलस्वार दिसत होते.

श्री अन्नपूर्णा व्हेज हॉटेलजवळ पोहोचलो. आतापर्यंत माझे एकूण ५५ किलोमीटर सायकलिंग झाले होते. येथे पहिला हायड्रेशन पॉइंट होता. सागर, अनूप, किरण, आनंद मोने ही मंडळी आधीच पोहोचली होती. एनेरझल मिक्स केलेल्या बॉटलमधील पाणी संपले होते, त्यात पाणी भरून घेतले, केळी खाल्ली, तोवर आनंदराव आणि उत्तेकरसुद्धा पोहोचले होते. सर्वांबरोबर फोटो काढले, तेवढ्यात गणेश कांबळे यांच्या सायकलकडे लक्ष गेले. त्यांनी सायकलच्या हँडलवर विठ्ठल-रुक्माईची मूर्ती होती, त्याला छान पांढऱ्या फुलांचा हार लावला होता व मूर्तीच्या आजूबाजूला झेंडे लावले होते.

annapurna

kambale

आठ वाजता श्री गुरुदत्त वडापाव, केडगावच्या चेक पॉईंटला पोहोचलो. येथे नाश्त्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे १००पेक्षा जास्त सायकलस्वार हजर होते.

datta

आतापर्यंत एकूण ७५ किलोमीटर सायकलिंग झाले होते. चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे लगेच नाश्त्याचे कूपन दिले व वडापावची साईज बघून, दोन पाव परत दिले. येथील वडापावचे वैशिष्ट्य म्हणजे जम्बो साईज स्वादिष्ट वडापाव. मस्त गरमागरम वडे गप्पा मारत उडवले आणि पाव चहाबरोबर खाल्ला. बाजूलाच काही सायकलस्वार व स्वयंसेवक रिंगण घालून विठ्ठलनामाचा गजर करत होते. त्यांच्यात थोडा वेळ सामील झालो. थोड्या वेळाने पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि निघालो.

९३ किलोमीटर अंतर पार करून नऊ वाजता हॉटेल फौजीच्या हायड्रेशन पॉईंटला पोहोचलो. आतापर्यंतचा रस्ता सपाट असल्याने सायकल चालवायला जास्त श्रम लागले नाहीत. यामुळे सगळे सायकलस्वार फार उत्सहात होते. या ठिकाणी मिडियासुद्धा पोहोचला होता. ते सायकलस्वारांना वारीबद्दल व त्यांच्या सायकलिंगच्या अनुभवाबद्दल विचारत होते आणि लोक मीडियासमोर आपली मते मांडत होते. पुणे-पंढरपूर सायकलवारीचे हे चौथे वर्ष होते. मागच्या वर्षी वारीमध्ये २६० सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता, तर या वर्षी एकूण ५५० सदस्यांनी नोंदणी केली होती. यात आय.टी., इंजीनियरिंग, डॉक्टर, सरकारी नोकरी अशा विविध क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांप्रमाणे विद्यार्थीसुद्धा होते. काही सायकलिंगसाठी नवखे होते, तर काही आयर्न मॅन, बी.आर.एम. यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे होते.

सायकलिंगचे प्रमाण वाढावे यासाठी कोणी सरकारकडे मदत मागत होते, तर कोणी लोकांनीच आपल्या आरोग्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मोबाईल बघत बसण्यापेक्षा सायकलिंग करा असा हेल्दी सल्ला देत होते! काही पुणेकरांनी ते सायकल का चालवतात, त्याची कारणे सांगितली.

"पुणे हे पूर्वी सायकलींचं शहर होतं. ह्या शहराची ती ओळख पुसली गेली आहे, पण ती ओळख पुणे शहराला पुन्हा मिळवून द्यावी, असा आमचा मानस आहे. म्हणून आम्ही सायकल चालवतो. तुम्हीही चालवा आणि नव्या पिढीसाठी आरोग्याचा व प्रदूषणमुक्त शहराचा आदर्श घडवू या."

"काही लोक घर-ऑफिस-घर सायकलने प्रवास करत होते. त्यांचे बघून आणि पुण्यातील ट्राफिकला कंटाळून घर-ऑफिस-घर सायकलने प्रवास करायला सुरुवात केली व आता नियमित सायकल चालवतो."

मी तिथे पोहोचलो, तेव्हा मेहेंदेळेकाका त्यांच्या सायकलिंगबाबत काय म्हणाले हे त्यांच्या शब्दात सांगतो.

"नमस्कार! माझं नाव दत्तात्रेय गोविंद मेहेंदळे. माझं वय फक्त ७९ वर्षं आहे. मी लहानपणापासून सायकलच चालवतो. सायकल चालवण्यातला उद्देश काय, तर पाव मे गर्मी, पेट मे नर्मी, भेजा ठंडा, मारो डॉक्टरको डंडा!"

सायकलस्वारांना सायकलिंग गिअरमध्ये पाहून आता नवल वाटत नाही, पण हा फोटो बघा.

priti

प्रीती यांनी मागच्या वर्षी पुणे पंढरपूर वारी केली होती. या वेळी वारीमध्ये काहीतरी वेगळे करायचे होते, सायकल वारीला संस्कारी रूप द्यायचे होते. त्यात पंढरपूर हे त्यांचे सासर आहे, म्हणून त्यांनी हा पोशाख घातला होता व तसेच वारीत सामील होण्यासाठी त्यांनी आपल्या नवऱ्यालासुद्धा प्रोत्साहित केले होते. त्यांनी वारीच्या राईडसाठी लागणारी पूर्ण तयारी नवर्‍याकडून करून घेतली होती. सुरुवातीला काहीच वेळ या पोशाखात सायकलिंग करू, असे त्यांंनी ठरवले होते. परंतु त्यांंनी पुणे-पंढरपूर सायकलिंग हाच पोशाख घालून केले.

साधारण सव्वानऊ वाजले असतील. येथे थोडा फ्रेश झालो, हात-पाय धुऊन घेतले, तोंडावर पाणी मारले, आयएएसने चिक्की आणि केळी ठेवली होती, ती खात ग्रूपमधील लोकांशी गप्पा केल्या व पुढच्या चेक पॉईंटकडे निघालो. पुढचा चेक पॉईंट ३२ किलोमीटर अंतरावर होता व त्यानंतरचा २८ किलोमीटरवर इंदापूरचा चेक पॉईंट होता. येथे जेवणाची व्यवस्था केली होती. तुलना केली, तर २३० किलोमीटरपैकी हा पन्नास किलोमीटरचा पॅच थोडा चॅलेंजिंग होता, कारण यात काही चढ होते व हेडविंडसुद्धा लागणार होता. मागच्या वर्षी याच पॅचमध्ये पळसदेवच्या चढावर माझ्या पायाला क्रँप आला होता. या वेळी थोडी सावधगिरी बाळगायची होती. उतार मिळाला की हाय गिअर रेशो ठेवून व चढ लागला की लो गिअरवर पायडलिंग करत होतो. साधारण एक तास दहा मिनिटांंत पहिले ३२ किलोमीटर अंतर कापले व हायड्रेशन पॉईंटला पोहोचलो. येथे अनूप व सागर आधीच पोहोचले होते, नंतर लगेचच इतर मंडळी पोहोचली. जास्त वेळ न घालवता आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व इंदापूरकडे निघालो. अंदाजाप्रमाणे पळसदेवच्या चढाला हेडविंड लागला, त्यामुळे सायकल चालवायला जड जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी परतीच्या राईडला काय अवस्था होणार, याची झलक दिसली!

palasdev

१-३ गिअर रेशो सेट केला व निवांत पायडल मारत, पाणी पीत सायकल चालवत राहिलो. रस्त्याच्या कडेला बसलेले सायकलस्वार बघून थांबायची इच्छा होत होती, पण मोह आवरला. थोडे पुढे आल्यावर अविनाश भेटला, निवांत गप्पा मारत बसला होता. त्याला सोबत घेतले व त्याच्याशी गप्पा मारत चढ संपवला आणि हॉटेल माउली प्रसाद, इंदापूर येथे १२:५५ वाजता पोहोचलो.

indapur

lunch

आतापर्यंत एकूण १५४ किलोमीटर अंतर पार झाले होते आणि महत्त्वाचे म्हणजे कठीण पॅच संपला होता. आता साधारण ७० कि.मी. अंतर बाकी होते. हातपाय धुऊन फ्रेश झालो व इतर मंडळी पोहोचताच आम्ही जेवणाच्या रांगेत उभे राहिलो. निवांत गप्पा मारत यथेच्छ जेवण केले व बाहेर ओसरीत येऊन पडून राहिलो.

दोन वाजून गेले होते. अनूप, सागर, किरण, आनंद पुढे निघून गेले होते. मी पाण्याच्या बाटल्या परत एकदा भरून घेतल्या आणि निघालो. पाऊस नसल्याने ऊन जरा जास्तच जाणवत होते. जेमतेम दहा-बारा किलोमीटर अंतर कापले असेल, समोर एका झाडाखाली सायकलस्वार बसलेले दिसले. त्यातच गुरुजी, चिंतामणी, अविनाश विसावा घेत होते. मीही त्यांच्यात सामील झालो. आता उन्हाचा त्रास होऊ लागला होता, त्यामुळे गुरुजींंनी व चिंतामणीने राईड येथेच संपवण्याचा निर्णय घेतला. आनंदराव व मी त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होतो, तर गुरुजी आम्हाला पंखाखाली घेण्याचा प्रयत्न करत होते. थोडा आराम केला. गुडी बॅगमध्ये आलेल्या पावा हायड्रेशनच्या गोळ्या अर्धा लीटर पाण्यात मिक्स केल्या व हळूहळू पाणी संपवले. याचा खूप फायदा झाला. आनंदराव, मी आणि उत्तेकर, आम्ही आरामात लो गिअरवर सायकल चालवत राहू, असे ठरवत सायकलिंगला सुरुवात केली. अविनाशसुद्धा आमच्यासह आला. अविनाश नियमित सायकलिंग करतो व वारीसाठी त्याने चांगली तयारी केली होती. प्रॅक्टिस राईडला तो नेहमी सरासरी २५+च्या वेगाने सायकल चालवत असतो, मात्र आज उन्हामुळे त्याचाही वेग मंदावला होता. पुढचा हायड्रेशन पॉईंट १९५ किलोमीटरला हॉटेल विजय, पंढरपूर फाटा, वेनेगाव येथे होता. हे अंतर इंदापूरपासून ३१ किलोमीटर एवढे होते. या पॅचमध्ये वाटेत जिथे कुठे मोठे झाड होते किंवा छोटीशी हॉटेलवजा टपरी लागत होती, तेथे विसावा घेत असलेले सायकलस्वार दिसत होते. चार वाजता आम्ही हॉटेल विजयला पोहोचलो. येथे चहाची व्यवस्था केली होती. कूपन देऊन चहा घेतला. बिस्किटे खाल्ली. अर्धा तास आराम करून आम्ही पंढरपूरच्या रस्त्याला लागलो. येथून पंढरपूर एकूण ४० किलोमीटर अंतर होते आणि मध्ये १७ कि.मी. अंतरावर हॉटेल माउलीला हायड्रेशन पॉईंट होता. फार चढ पण नव्हते. तसे पाहिले तर हे अंतर दोन तासांत कापायला पाहिजे. परंतु आता थोडा थकवा जाणवत होता. छोटासा चढ जरी लागला तरी लगेच गिअर रेशो कमी करावा लागत होता. येथून पुढचे अंतर आनंद आणि उत्तेकर यांच्याबरोबर पार करायचे ठरवले आणि तसेच केले.

वाटेत एका ठिकाणी थोडा चढ लागला. रवीकडे MTB असल्याने तो सरसर पुढे जाऊ लागला. त्याला म्हटले, "आयुष्य सुंदर आहे... चढ असला की MTB पाहिजे, बास!" तो हसत हसत बायकोसह पुढे निघून गेला. या दोघांनी पुणे-पंढरपूर-पुणेसाठी नोंदणी केली होती.

ravi

हॉटेल माउलीला आम्ही ६ वाजता पोहोचलो. पोहोचल्या-पोहोचल्या कपिलभाऊ भेटले. कपिल हा स्वयंसेवक म्हणून आला होता, क्रँप आलेल्या लोकांना तो मसाज करून देत होता. आनंदला आणि उत्तेकरांना विचारले, "मसाज करायचा का?" तर ते नाही म्हणाले. खरे तर उत्तेकरांना गरज होती, पण ते नाही म्हणाले. कपिल पुन्हा एकदा म्हणाला, "अरे, करून घे मसाज, फायदाच होइल!" मग काय, हेल्मेट, ग्लोव्हज, जोडे-मोजे काढले आणि समोरच्या टेबलवर झोपलो. कपिलने १० मिनिटे मस्त मसाज केला आणि सगळा थकवा निघून गेला. हे बघून उत्तेकर मसाजसाठी लगेच तयार झाले व त्यांनीही मसाज करून घेतला. कपिलने आम्हाला थंड पाणी दिले, त्याने आम्ही बाटल्या भरून घेतल्या. परत सायकलिंग सुरू करणार, तोवर आनंदची नजर टेम्पोवर गेली. तिन्ही बाजूंनी केळीची पाने लावली होती व आत केळी ठेवली होती. आनंदने फोटो काढायचा आदेश दिला. आनंदला कोण नाही म्हणणार...

anand

१९० कि.मी.नंतरची स्माईल. (आनंदराव आशीर्वाद म्हणून राईडला सायकलस्वारांना केळी देत असतात. देशपांडेमामा जेव्हा डीसी करून पुण्यात आले, त्या वेळी आनंदराव पहाटे ३ वाजता सिंहगड रोडला भेटायला आले होते. सोबत केळ्यांचा हार आणला होता. असे बरेच किस्से आहेत. मोदक लिहील कधीतरी.... )

आता फक्त २४ किलोमीटर अंतर बाकी होते. ६:३० वाजले होते. हँडलला लाईट्स बसवून घेतले आणि निघालो. ब्रेकनंतर फ्रेश झालो होतो, त्यामुळे एक छोटासा स्प्रिंट मारला आणि ४-५ कि.मी. पुढे येऊन रस्त्याच्या बाजूला आनंद आणि उत्तेकर दोघांची वाट पाहत थांबलो. स्प्रिंट मारताना रवीला मागे टाकले होते. थोड्याच वेळात तो आला व हसत हसत म्हणाला, "आयुष्य सुंदर आहे .. फक्त रोड बाईक पाहिजे!" रवीसुद्धा थोडा वेळ थांबला. आतापर्यंत माझे घरापासून २००+ कि.मी. अंतर झाले होते. आनंदचे १९६ कि.मी. अंतर झाले होते. पुढच्या पंधरा-वीस मिनिटांत आनंदचे २०० कि.मी. अंतर पूर्ण झाले, त्याचे अभिनंदन केले.

एक छोटासा ब्रेक घेऊ या, असे उत्तेकरांनी फर्मान काढले. मी म्हटले, "समोर ३ कि.मी. रस्ता खराब आहे, (अशी माहिती मिळाली होती) त्याच्या आधी ब्रेक घेऊ या का?" माझी विनंती मान्य केली. खराब रस्त्याच्या आधी आम्ही ब्रेक घेतला. उत्तेकरांनी बॅगमधून शंकरपाळी व पुर्‍या काढल्या. आम्ही त्या लगेच संपवल्या. अंधार पडत होता, त्यामुळे लाईट्स आणि ब्लिंकर लावून आम्ही सायकलिंगला सुरुवात केली. रस्ता फारच खराब होता, मधला १ कि.मी.चा पॅच एवढा खराब होता की आम्ही सायकली हातात घेऊन चाललो. परत चांगला रस्ता लागला आणि आम्ही सायकलचा स्पीड वाढवला. चंद्रभागा ओलांडून पंढरपूर शहराकडे जायलो लागलो, तेवढ्यात आम्हाला थांबवले. का थांबवले? हे विचारायच्या आत त्यांनी थंडगार कोकम सरबताचा ग्लास पुढे केला. सरबत घेतल्यानंतर विचारपूस केली तर असे समजले की प्रीती यांच्या सासरच्या मंडळींनी सायकलस्वारांसाठी ही खास व्यवस्था केली होती. परत एक ग्लास मस्त, गार कोकम घेऊन विठ्ठल-रुक्मिणी निवासस्थान विचारत तिथे पोहोचलो. आयएएसने सर्व सायकलस्वारांची राहण्याची व्यवस्था येथे केली होती. आम्हांंला पोहोचायला ८ वाजले होते. सायकली पार्किंगमध्ये लॉक केल्या. कूपन देऊन रूमची चावी घेतली व बॅग्ज घेऊन रूममध्ये गेलो.

विठ्ठल-रुक्मिणी निवासस्थान छान मेन्टेन केले आहे. उत्कृष्ट बांधकाम आणि स्वच्छता होती, गरम व गार पाण्याची व्यवस्था होती. रूममध्ये जाऊन फ्रेश झालो, तोवर मेडल वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला होता. जेवण यायला थोडा वेळ असल्याने आम्ही मेडल घ्यायचे ठरवले. मेडल वाटपाचा कार्यक्रम विठ्ठल-रुक्मिणी निवासस्थानाच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर आयोजित केला होता. व्यवस्थापनातील मंडळी बिब नंबरप्रमाणे एक-एक करून सायकलस्वाराला बोलावत होते व मेडल देत होते. आम्ही गवतावर बसून नंबर येईपर्यंत वाट बघत होतो. तोवर चिंतामणी आणि गुरुजी दर्शन घेऊन आले होते, त्यांंनी माहिती दिली की दर्शनाला खूप मोठी रांग आहे, ३-४ तास लागतील, त्यामुळे आम्ही दर्शन घेण्याचे रद्द केले, जेवण आटोपले. आनंद चिंतामणीबरोबर कारने पुण्याकडे निघाला.

medel

मी, अभिजित, सागर, अनूप, आबा, मोदक आणि उत्तेकर - आम्ही एवढे होतो. आता प्रश्न होता की उद्या कोण कोण सायकल चालवणार?

मोदक स्वयंसेवक होता आणि आबाच्या पायाला जखम होती. त्याला मोजे घासल्यामुळे ती दुखत होती, म्हणून त्याने राईड न करण्याचे ठरवले. तेवढ्यात उत्तेकर म्हणाले की मी टेम्पो बोलावला आहे, मी टेम्पोने जाणार....

मग काय, टेम्पो येणार म्हटल्यावर उद्या सायकल चालवायला कोणी तयार नव्हते! मी म्हटले, "उद्या आपण जमेल जमेल तेवढे सायकलिंग करू, नंतर टेम्पोत बसून जाऊ." सर्वांनी होकार दिला, पण रात्री फारशी झोप झाली नाही. एकतर मध्येच वीज गेलेली आणि त्यामुळे गरम होत होते. परिणामी, सकाळपर्यंत फक्त एकटा सागरच सायकल चालवण्याच्या निर्णयावर ठाम होता. पहाटे मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि निवासस्थानी परत आलो. तोवर टेम्पो आला होता. टेम्पोत सायकली टाकल्या व पुण्याच्या दिशेने निघालो....

pandharpur

शेवटचे प्रचि श्रेयनिर्देश: किसन शिंदे

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Sep 2019 - 8:38 am | यशोधरा

वेगळीच वारी!
मस्त लेख, भन्नाट लिहिलंय!
नेहमी का लिहीत नाही हो? ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Sep 2019 - 9:12 am | ज्ञानोबाचे पैजार

वारी आवडली, डिटेलवार वर्णन केले आहे. मजा आली वाचताना...
ही वारी करायचा कधी योग येतोय कोण जाणे?
पैजारबुवा,

प्रशांत's picture

9 Sep 2019 - 5:27 pm | प्रशांत

ही वारी करायचा कधी योग येतोय कोण जाणे?

चला पुढच्यावर्षी जाऊया.. पुणे-पंढरपूर-पुणे

डॉ श्रीहास's picture

9 Sep 2019 - 10:11 am | डॉ श्रीहास

सायकलवरच्या सर्वच माऊलींना वंदन
_/\_

महासंग्राम's picture

9 Sep 2019 - 10:42 am | महासंग्राम

भारीच वारी झालीये

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2019 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्त छायाचित्रे आवडली. लेखनही सुरेख झालंय.
लिहित जा भो.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

9 Sep 2019 - 11:44 am | सोत्रि

_/\_

-(सायकस्वार होण्याची ईच्छा असलेला) सोकाजी

पद्मावति's picture

9 Sep 2019 - 12:27 pm | पद्मावति

आहा मस्तंच. व्रुत्तांत आणि फोटो सुंदर.

झकास लेख आणि शेवटी किसनाने टिपलेलं अद्भुत जादुई छायाचित्र. वाह.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2019 - 6:29 pm | तुषार काळभोर

+१

तुषार काळभोर's picture

9 Sep 2019 - 6:29 pm | तुषार काळभोर

+१

कंजूस's picture

9 Sep 2019 - 1:15 pm | कंजूस

किती छान!
रुक्मिणी न रुसता आली होती.
विठोबाला इंग्रजी आवडायला लागले आहे.
सायकलचे धागे वाचायला आवडतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2019 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं झाली सायकलवारी ! भारी उपक्रम !

mayu4u's picture

9 Sep 2019 - 1:57 pm | mayu4u

आणि सुरेख लेखन!

कुमार१'s picture

9 Sep 2019 - 2:27 pm | कुमार१

मस्तं झाली सायकलवारी !

मित्रहो's picture

9 Sep 2019 - 2:47 pm | मित्रहो

सायकल वारी आवडली

आमचे संभाषण सुरू असताना, तेवढ्यात एक जण जवळ येऊन उभा राहिला व मोदकला विचारू लागला. "भाऊ, तुमचं नाव मोदक आहे, म्हणजे तुम्ही मिसळपावचे मोदक का? मी तुमचे लेख वाचत असतो." आम्ही सर्व एकमेकांकडे बघून हसायला लागलो. मी म्हटले, "हो, हाच तो मोदक."

मीच तो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2019 - 7:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! :)

हे सायकलवाले लै उच्चभ्रू असतात. त्यांचं ते सूट, ते हेल्मेट, ते ग्लोज, तो क्यामेरा, त्यांचा तो एटिट्यूड हे सर्व पाहुन आपण इमोशनल होतो आणि आपण त्यांच्याशी ओळख दाखवायला जातो. सलगी करायला जातो, सेल्फ़ी वगैरे घ्यावी वाटते, पण तसं कधीही करू नये. दुरुन फक्त गम्मत बघत राहावी. :)

-दिलीप बिरुटे

अनुप कोहळे's picture

14 Sep 2019 - 11:03 pm | अनुप कोहळे

सायकलींची किम्मत न विचारता जर कुणी जवळ आले तर आम्ही सेल्फी काढू देतो :)

जॉनविक्क's picture

9 Sep 2019 - 3:25 pm | जॉनविक्क

मस्त लिवलंय .. फोटूंनी रंगात आणलीय लेखाला .. सायकल चालवत चालवतच लेख वाचतोय असे वाटले..

प्रशांत's picture

9 Sep 2019 - 5:25 pm | प्रशांत

धन्स लोक्स

सुधीर कांदळकर's picture

9 Sep 2019 - 6:16 pm | सुधीर कांदळकर

आपला उपक्रम हा मला वाटते प्रदूषण वा उपद्रव न करणार्‍या मोजक्या उपक्रमांपैकी एक. त्याबद्दल अभिनंदन.

चित्र क्र ६ अणि शेवटची दोन आवडली. धन्यवाद

तमराज किल्विष's picture

9 Sep 2019 - 6:18 pm | तमराज किल्विष

आवडलं लिखाण. ती इतकी कच्ची केळी खातात काय? पोट दुखेल ना.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2019 - 6:28 pm | तुषार काळभोर

यावेळी श्रीगणेश लेखमालेतले लेख आपण किती किडामुंगीसारखं आयुष्य जगतोय याची टोचणी आणि जाणीव करून देणारे आहेत!

खिलजि's picture

9 Sep 2019 - 6:47 pm | खिलजि

शंभर टक्के सहमत .. एक नंबरी विवेचन .. मला तर कधीच असे वाटू लागले होते .. तुम्ही हे निर्भीडपणे व्यक्त करून माझ्या कोंडलेल्या मनाला वाट मोकळी करून दिलीत ..

असा प्रयत्न स्तुत्य आहेच तसेच निवेदन ही सुरेख ! पंढरपुराचा फोटो एकदम झ्याक ! सर्क्य्लर फिल्टर वापरला काय ?

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2019 - 7:27 pm | भ ट क्या खे ड वा ला

भन्नाट वारी,फोटू ही छान.
बघू कधी योग येतोय तुमच्या बरोबर सायकलिंगचा .
अर्थात इतका वेग व इतके अंतर नाही जमणार आम्हास्नी

फक्त मनात इच्छा आणा पांडुरंग आणि IAS टीम तुम्हाला पंढरपूर पर्यंत सायकलने जाण्यास पूर्ण मदत करेल

अनुप कोहळे's picture

14 Sep 2019 - 11:04 pm | अनुप कोहळे

भखे काका

जोक छान करता तुम्ही.

प्रशांत's picture

18 Sep 2019 - 10:50 am | प्रशांत

तुमच्या कडुन शिकतोय काका.

लवकरच खेड ला येवुन तुमच्यासोबर सायकलिंग करणार.

धडपड्या's picture

9 Sep 2019 - 7:50 pm | धडपड्या

प्रवासाचं वर्णन एकदम झक्कास झालंय मालक...
सगळी वारी एकदम डोळ्यासमोर उभी केलीत...

तुमच्यासारखे वल्ली लोक्स आजूबाजूला आहेत, म्हणून अनेकांना प्रेरणा मिळतेय...
किप पेडलिंग...
(अर्ध लो पु च्या तयारीवरही एक झक्कास लेख येउद्या...)

प्रशांत's picture

18 Sep 2019 - 10:51 am | प्रशांत

थोडा वेळ काढुन ट्रेनिंग द्या

झेन's picture

10 Sep 2019 - 9:50 am | झेन

झक्कास वारी आणि पंढरपूरचा फोटो तर अफलातून.

ऋष्या's picture

10 Sep 2019 - 10:38 am | ऋष्या

मस्त हो सरपंच !! प्रत्यक्ष वारीला जाऊन आल्याचा प्रत्यय आला. सुंदर वर्णन !!

प्रचेतस's picture

10 Sep 2019 - 1:39 pm | प्रचेतस

व्वा....!
तपशीलवार वर्णनामुळे लेख एकदम मस्त झाला आहे.
बाकी आपण पिंपरी चिंचवडचे दिसता. आपल्याकडून सायकलींचे किस्से जाणून घ्यायची इच्छा आहे. कधी भेटू शकाल?

प्रशांत's picture

18 Sep 2019 - 10:52 am | प्रशांत

बाकी आपण पिंपरी चिंचवडचे दिसता. आपल्याकडून सायकलींचे किस्से जाणून घ्यायची इच्छा आहे. कधी भेटू शकाल?

लवकरच भेटु.. सायकलवर

जालिम लोशन's picture

10 Sep 2019 - 5:26 pm | जालिम लोशन

सुरेख

स्थितप्रज्ञ's picture

10 Sep 2019 - 7:04 pm | स्थितप्रज्ञ

धिस विल बी वन ऑफ दि बेस्ट राईड्स आय एव्हर रोड.
पुढच्या वेळी आणखी जोर्दार तयारी करा आणि टू आन्ड फ्रो करुन टाका.

नक्की इच्छा पूर्ण होणार आम्ही तुमच्या सेवेस हजार राहू

अनुप कोहळे's picture

14 Sep 2019 - 11:05 pm | अनुप कोहळे

नेक्स्ट टाईम बोथ वे

सोबत करू

स्थितप्रज्ञ's picture

10 Sep 2019 - 7:04 pm | स्थितप्रज्ञ
किरण कुमार's picture

11 Sep 2019 - 12:45 pm | किरण कुमार

एकंदरीत खूपच चांगले नियोजन आणि सोबतीचे सायकलस्वार यामुळे भारी मजा आली राईडला .
लिहीत रहा ( कन्याकुमारी लिहिणे पण घ्या मनावर)
पुलेशू

अनुप कोहळे's picture

14 Sep 2019 - 11:07 pm | अनुप कोहळे

कन्याकुमारी लिहिणे पण घ्या मनावर

+१

दोन चार किस्से पुरेसे नाही हो.

सुंदर असे सायकल वारी चे वर्णन. खुप छान अशी लेखाची मांडणी , सुंदर असे फोटो आणि बारीक अवलोकन निरीक्षण
परत एकदा लेख वाचून सायकल वारी केल्याची अनुभूती मिळाली.
या वारी मध्ये खुप काही शिकायला मिळते हि सायकल वारी हि स्वतःसाठी नाही तर सर्वास बरोबर घेऊन पूर्ण करणे त्याचा जो आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो तो खुप सारे समाधान देऊन जातो. वारी मध्ये प्रत्येक व्यक्ती मध्ये माउली दिसते आणि हा जो अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घायला हवा !!
हा लेख वाचून आपणास पुढील वर्षी अजून खुप माउली सामील होतील आणि जो कोण वारीत सामील होतो तो वारी नक्की पूर्ण करतो हा आमचा अनुभव आहे
अजित पाटील

मार्गी's picture

12 Sep 2019 - 7:09 pm | मार्गी

छान राईड आणि मस्त वर्णन!! जय हो!

सिरुसेरि's picture

12 Sep 2019 - 10:29 pm | सिरुसेरि

जबरदस्त प्रवास वर्णन .

शैलेन्द्र's picture

13 Sep 2019 - 9:27 am | शैलेन्द्र
श्वेता२४'s picture

13 Sep 2019 - 1:47 pm | श्वेता२४

प्रेरणादायी प्रवास.

सायकल वारी, वर्णन आणि फोटो सगळंच छान!