१००.४ FM (full to majja)

Primary tabs

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
8 Jul 2019 - 12:38 pm

आजच्या राईड चे वर्णन लिहायची कामगिरी माझ्या तरुण मित्र मंडळीनी माझ्यावर सोपवली म्हणून हा लेखन प्रपंच.
आमचे तरुण साथिदार आता सायकल सह लेखणी ही जोरदार चालवतात अगदी आजच्या पावसासारखी धुंवाधार.
तर मंडळी काल रात्री उशीरा गृप वर संदेश सोडला ,उद्या खेड दापोली कोळथरे दापोली खेड राईड ला निघतोय. पटापट दोन साथिदारानी आम्ही आहोत असा जवाब दिला.
चौथा सकाळी वेळेत हजर झाला, वाकवली पर्यंत येतो मग फिरतो परत या बोलीवर.
1
वाकवली गेली आता दापोली पर्यंत येतो असे सांगत हा आमच्याबरोबर. आणी आजच्या राईड चा कप्तान मात्र एका बाजूने जोरदार बॅटिंग करत होता एक एक सर अशी यायची कि सायकल चालवणे मुश्किल व्हायचे, मात्र त्याच वेळी चौघानाही आनंदाच्या उकळ्या फूटायच्या,पाउस जरा कमी झाला कि आमचा वेग वाढायचा, पाउस थांबला कि वारा सुरु व्हायचा , षोडशोपचारपूजा का काय म्हणतात तशी जणू द्वीउपचारी पूजाच सुरु होती, पावसाचा अभिषेक थांबला कि वारा ,मग पुन्हा अभिषेक. कालच्या संदेशात एक अट टाकली होती, खेड दापोली नॉन स्टॉप जायचे आहे अशी. कारण अशा पावसाळ्यात सायकलिंग चे श्रम जाणवत नाहीत असा पुर्वानुभव होता, तसे मी फक्त चारच पावसाळे पाहीलेत सायकलिंग मधले, पण भन्नाट पाउस असेल त्या दिवशी जर राईड करण्याची संधी मिळाली तर काय बहार येते ते मात्र अनेक वेळा अनुभवलय गेल्या चार वर्षात.
9
दापोली गाठली व आता नेहमीचेच ठरलेले हॉटेल ॐ साई येथे सायकली विसावल्या, जो पदार्थ तयार असेल तो द्या असे सांगितले, मिसळ पाव होइल तयार दहा मिनिटात असे चविष्ट उत्तर आले, मग गप्पा सुरु झाल्या.
आवडीच्या पदार्थाच्या नावाने जसे तोंडाला पाणी सुटते तशीच अवस्था आमच्या चौथ्या भीडूची झाली होती मात्र ती मिसळी साठी नव्हे तर राईड साठी, अशा भन्नाट पावसात फक्त ५०/५५ किमी करायचे या कल्पनेने तो व्याकूळ होत होता, घरी फोनाफोनी करुन त्याने कामांचे सेटिंग लावले व "सेंचुरीसाठी उपलब्ध आहे मी" असे जाहीर केले.
2
मग काय एकच जल्लोष केला चौघांनीही .
मिसळीवर ताव मारुन पूढच्या प्रवासाला निघणार इतक्यात हवाकम ची जाणीव तीघानाही झाली, मग मोर्चा सायकल दुकानाकडे निघाला. हवा टकाटक करुन निघेपर्यंत साडे नउ वाजले .
सलग दापोली गाठून वाचवलेला वेळ हॉटेल वाल्याने व हवाकम ने असा फुकट घालवला पण, पाचवा साथिदार पाउस भक्कम बरसात करत होता त्यामुळे टार्गेट गाठणार याची खात्री होती.
बुरोंडी रस्त्याला लागलो, अत्यंत आवडता रस्ता कारण मस्त समुद्र दर्शन होते इथुन.
3

4
पाउस ही असा आज्ञाधारक असल्यासारखा कि नेमका समुद्र दिसु लागल्यावर थांबला थोडावेळ. मग खवळलेल्या तामसतिर्थाचे छान दर्शन व फोटो झाले. आता चढायची होती एक भली मोठी चढण व मग दिसणार होते भगवान पर्शुराम.
चढाई पार करताना पावसाने अशी भन्नाट साथ दिली कि अजाबात न थकता चौघेही परशुरामाच्या मुर्तीसमोर पोहोचलो,मुसळधार म्हणतात असा पाउस सुरु होता यावेळी, त्यामुळे फोटू वगैरे काढायचा प्रश्णच नव्हता.
थोड्या गप्पा मारुन पूढे निघालो. आता एखादा किरकोळ चढ, उतार व मग कोळथरे चा सुप्रसिद्ध जिवघेणा उतार सुरु होणार होता .
त्या उताराआधी सर्वाना सावध केले तरीही एका भीडूने थोडी गडबड केलीच व उर्वरीत प्रवासात ब्रेक न लागण्याच्या त्रासाला सामोरा गेला.
कोळथरेत पोहोचलो, नातेवाईक मंडळींना बाहेरील पडवीतच खूर्च्या द्या अशी विनंती केली व फक्त चहा घेणार असे ही सांगीतले.
तरीही गरम पाणी ,मस्त कुरकुरीत तळलेले गरे व त्यावर गवतीचहा युक्त अमृत अशी मेजवानी मिळाली .
5
जेवणाचा आग्रह मोडुन काढला व पूढील प्रवासाला लागलो,पावसाने आता तर रुद्रावतार धारण केला होता,त्यात वारा ही होता. पंचनदी चा भलामोठा चढ चढताना रस्त्याकडेच्या पोफळी अशा झेपावत होत्या कि क्षणभर भीतीच वाटली,शिरस्त्राण चाचपले हाताने व उगाच समजूत घातली मनाची.
चढ संपला, तीठ्यावर थांबलो.
सर्वजण पोहोचताच जेवायला पुन्हा ॐ साई हे ठरवले व निघालो.
पाउस होताच सोबतीला.
एका भीडूची सायकल पंचरली, मला पत्ताच नाही पूढे असल्याने. मात्र त्याला एक दयाळू स्कुटरवाला मिळाला व सायकल सकट दापोलीत घेउन आला. आता पाउस थोडा कमी होता मात्र ढगांची गर्दी तशीच होती.
आमच्या दोन साथिदारांना तीनचार मोर दिसले ,एका झुडुपावर बसलेले.
एक खाउ ब्रेक घेउन दापोली गाठली. इथे ही जालगांव ते दापोली या अंतरात पावसाने जोरदार झोडपले.
नेत्रधौती नावाची एक योगक्रिया आहे, तोंडात भरपूर पाणी घेउन खळखळवायचे म्हणजे डोळे ताणले जातात व त्याच वेळी डोळ्यांवर पाण्याचे हबके मारायचे, डोळ्यांना जोरदार रक्त पुरवठा होतो या क्रियेत व त्यांचे आरोग्य सुधारते, आज राईड करताना वरुनच जोरदार हबके बसत होते पावसाचे व सायकलिंग साठी डोळे ताणावे लागत होते थोडक्यात ऑनलाईन नेत्रधौती झाली आज. थ्यांक्यु पाउस ,तू सी ग्रेट हो.
दापोली गाठली ,चौथा भीडू भेटला, पण त्याचा उपवास असल्याने तीन शाकाहारी विथ भाकरी अशी ऑर्डर गेली, पण भगवान विष्णूंचा पहीला अवतार आपले अस्तित्व परिमळाच्या स्वरूपात जाणीव करुन देत होता, मग दोन भीडूनी त्याला ही पोटात जागा द्यायची असे ठरवले. जेवणाची लज्जत अजुनच वाढली त्यामुळे.
आता फक्त २७ किमी उरले होते .
पाउस ही विसावला होता, आम्ही चौघे व पाचवा कप्तान पाउस आता निश्चिंत झालो होतो.
दापोली ते खेड एखादा थेंब पडत होता अंगावर. चिंचघर च्या आसपास चक्क सावली ही दिसली प्रथमच.
तोपर्यंत सावली दिसलीच नव्हती आज, सावली सोडा, निघाल्यापासुन पोहोचेपर्यंत, प्रकाशाची तीव्रता ही जवळपास तेव्हढीच कायम होती .
"धूप मे निकलो,घटाओंमे नहाकर देखो
जिंदगी क्या है किताबोंको हटाकर देखो"
निदा फाजलींची ही अप्रतिम रचना व त्यात जगजीतचा जादुई आवाज, पावसाळी राईड करताना कायम मला कायम आठवते ही गजल.
तीनही नव्या भीडूंची ही पहीलीच भन्नाट पावसाळी राईड.
त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मला आज खूप सुखाउन गेला. त्या आनंदात मी मनोसक्त न्हालो. घटाओंमे नहाकर देखो पेक्षा ही दुसरोंकि खूशी मे नहाकर देखा आज. १०४ KM ची राईड होती पण १०४FM (फुल्ल टू मजा ) ची राईड झाली .
67
भटक्या खेडवाला ०६ जुलै२०१९

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 Jul 2019 - 3:58 pm | कंजूस

104 fm आवडले.
धावते वर्णनासाठी शंभर चार.

कंजूस's picture

8 Jul 2019 - 4:00 pm | कंजूस

फोटोंना वायपर लावा.

पैलवान's picture

8 Jul 2019 - 6:08 pm | पैलवान

गॅस चालू करा.

Nitin Palkar's picture

8 Jul 2019 - 6:47 pm | Nitin Palkar

चित्रदर्शी वर्णन. चित्र (फोटो) फक्त दिसत नाहीत.

प्रसाद_१९८२'s picture

8 Jul 2019 - 7:47 pm | प्रसाद_१९८२

सायकल वृतांत आवडला.
फोटो देखील छान आहेत.
--
गुगलवर लॉगिन केल्यावरच फोटो दिसतायत, अन्यथा दिसत नाहीत.

लॉगिनच आहे तरी नाही दिसत.

भन्नाट दहा चार... वाचायला देखील मज्जा आली
पूर्वी वर्षा आणि लीला सह वर्षा सहलीला जायचो ते आठवले. :))

प्रचि किंवा वचि (वर्षा चित्रे) देखील मस्तच..

प्रचि किंवा वचि (वर्षा चित्रे) दिसण्यासाठी कोणते व्रत करावे?

नाखु's picture

9 Jul 2019 - 6:55 am | नाखु

दिसताच वाचले तरीही भन्नाट आणि फोटो सकट दिसले असते तर सुपर भन्नाट.

घरकोंबडा पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

इरामयी's picture

9 Jul 2019 - 11:00 am | इरामयी

खूप सुंदर वर्णन!

डोंगराळ प्रदेशात आणि त्यातही पावसात सायकलिंग -- Hats off to you!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 11:15 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी सायकलवारी !

फोटो दिसत नाहीत. बहुतेक पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही.

उगा काहितरीच's picture

9 Jul 2019 - 1:33 pm | उगा काहितरीच

१) फोटो दिसत नाहीएत.
२) एक प्रश्न आहे. पावसात दिसतं कसं हो ? पावसात दुचाकी चालवताना माझी खूप परेशानी होते. चष्यावर पाणी पडलं की दिसणं जवळजवळ बंद होते. चष्मा काढला तरी दिसत नाही. चष्मा लावला तरी दिसत नाही.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Jul 2019 - 9:20 pm | भ ट क्या खे ड वा ला

चष्मा वापरतच नाही सायकलिंग करताना .
सुदैवाने अजुन चष्म्याशिवाय बऱ्यापैकी दिसते आहे .
नजर थोडी खालीच ठेवतो, पाउस सुरु असताना वेग जास्त ठेवता येत नाही.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Jul 2019 - 9:21 pm | भ ट क्या खे ड वा ला

चष्मा वापरतच नाही सायकलिंग करताना .
सुदैवाने अजुन चष्म्याशिवाय बऱ्यापैकी दिसते आहे .
नजर थोडी खालीच ठेवतो, पाउस सुरु असताना वेग जास्त ठेवता येत नाही.

जेम्स वांड's picture

11 Jul 2019 - 4:17 pm | जेम्स वांड

दिसत नाहीयेत.