भाई...

हर्षद खुस्पे's picture
हर्षद खुस्पे in जनातलं, मनातलं
12 Jan 2019 - 8:24 pm

आज “भाई एक व्यक्ती कि वल्ली” हा चित्रपट पाहायला जायचा योग्य आला. खरे तर जरा साशंक मनानेच गेलो कारण शिव धनुष्य पेलणे जसे अवघड तसे आभाळाएवढी उंची असलेली व्यक्ती शब्दामध्ये अथवा कलाकृतीमध्ये बंदिस्त करणे अवघडच. चित्रपट पाहायला सुरवात केल्यानंतर मात्र उगाच आलो असे वाटायला लागली कारण काही आठवणी नकोश्या च वाटतात. आज एवढी वर्षे झाली पु. ल. आपल्यात नसण्याला पण अगदी काल-परवाची गोष्ट असल्यासारखी वाटते. नाही नाही मला सिनेमाचे परीक्षण लिहायचे नाही , तशी माझी कुवत ही नाही. परंतु पु. ल. च्याच हरितात्यासारखे काही व्यक्ती आपल्या बरोबर कायम आहेत अश्या वाटतात त्यापैकी एक पु. ल. आहेत आणि ते नाहीत ही कल्पनादेखील नकोशी वाटते म्हणून.
प्फुल देशपांडे (माझा नाही हं हा शब्द तर आपल्या गदिमा (ग.दी .माडगूळकरांचा लाडका शब्द आहे)ची ओळख आम्हाला शाळेत अवांतर वाचनाच्या तासाला झाली आणि ते माझेच झाले जणू. आमचे मामा मोठे वल्ली माणूस होते. डायरेक्टर ऑफ फिल्म्स ह्या पदावरून निवृत्त झाले होते पण मित्र परिवार मोठा मग त्यात पु. लं ., बाबुराव पेंटर,माडगूळकर, राम गबाले इत्यादी माणसांचा कायम राबता असायचा. एकदा आमच्या मिरजेच्या आजोबांच्या घरी ते पु. लं . ना मुक्कामाला घेऊन आले होते, बहुतेक जवळच काही कार्यक्रम होता . संध्याकाळी कपडे बदलायला बॅग उघडताच म्हणाले अरे दिलीप पायजमा विसरलो की , असे म्हणताच मामाने आमच्या आजोबांची स्वच्छ धुतलेली लुंगी दाखवली आणि विचारले ही चालेल? अरे चालेल की. तो जमाना कशाला उगाच तुम्हाला त्रास . मी आपलं हॉटेल मध्ये राहतो वगैरे म्हणायचा नव्हता हेच बर होतं. रात्री आजीच्या हातच्या गरम गरम भाकरी खाऊन झोपताना मामाने डासांसाठी मच्छरदाणी लावल्यानंतर, अरे तू तर मला कडेकोट किल्यात बंदिस्त करून टाकलंस की हा हा हा. , असे म्हणून मामांची विकेट काढली.
वास्तविक माझा आणि पुलंचा संबंध केवळ आणि केवळ पुस्तकांमधूनच झालेला मग ते माझे पौष्टीक जीवन असो कि बटाटयाची चाळ. माझी अनेक वर्षे या अवलियाने केवळ समृद्ध केली नाहीत तर मला जगायला शिकवलं.
काही वर्षांपूर्वी आमचे मामा मुंबईतून कोथरूड ला शिफ्ट झाले. त्यानिमित्ताने कायम मामांकडे जाणे व्हायला लागले. ऐके दिवशी गेलो तर एक गृहस्थ बसले होते, मामांना नमस्कार करताना ते मला म्हणाले अरे ह्यांच्या पण पाया पड, हे आहेत जेष्ठ दिग्दर्शक राम गबाले. पुढे मामाकडेच एक दोनदा त्यांची भेट झाली, त्यांना त्यांच्या डहाणूकर कॉलनी मधील चंद्रलोक सोसायटीमध्ये सोडायला जायची संधी मिळाली. पु. लं.. चा किस्सा सांगताना म्हणाले एकदा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने कोथरुडच्याच स्मृती वनामध्ये पु. लं आणि त्यांनी शेजारी शेजारी झाडे लावली , काही कालावधीनंतर पुन्हा तिथे जायचा योग आला पु. लं नि पहिले की तेव्हा राम गबालेंनी लावलेले झाड तिरके वाढले होते आणि पु. लं च्या झाडावर येत होते , ते पाहून तिकडे बोट दाखवत पु. लं म्हणाले अरे राम तू अगदी माझ्या मुळावर आला आहेस बघ समोर असे म्हणून मिश्किल हसायला लागले.
चित्रपट पाहताना सुरुवातच प्रयागमधील त्यांना दाखल केलेल्या दृश्यानी झाली आणि नकळत डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी जमा झाले.
मला आठवतंय इंटरनेट एवढा बोकाळले नव्हते आणि पुण्यामध्ये नवीनच आलो होतो . पु. लं बद्दल केवळ वर्तमानपत्रामधून कळत होते. चित्रविचित्र बातम्या वाचून अस्वस्थता वाटत होती. घाबरत घाबरत डिरेक्टरी मधून त्यांचा मालती माधव मधला फोन नंबर शोधून काढला आणि लावला. बऱ्याच रिंग वाजल्या, कोणी उचलत नाही असे वाटत असताना फोन उचलला गेला , पलीकडील व्यक्ती ला विचारले कसे आहेत पु. लं ? उत्तर आले आता ठीक आहेत. बरे वाटले , दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्सुकतेने वर्तमानपत्र उघडले तर पुन्हा तीच बातमी "पु. लं अस्वस्थ" , संध्याकाळी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये फोन केला तर तर ज्याला घाबरत होतो तीच बातमी आली . आज पुन्हा ती खपली निघाली . . . जखम वाहती झाली .

कला

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

15 Jan 2019 - 9:55 am | बाजीप्रभू

हा सिनेमा पाहून मलाही उगाचच आलो असं वाटावं इतका रटाळ सिनेमा बनवलाय मांजरेकराने.
माझ्या मुलीला बायोपिक सिनेमे मी मुद्दामहुन दाखवायला घेऊन जातो. "आणि काशिनाथ घाणेकर"सारखा हाही सिनेमा तिला खूप आवडेल असं वाटलं पण निराशा झाली. सिनेमा पाहून तिचं मत असं बनलं कि पुल स्मोकिंगच्या खूप आहारी गेले होते, सिगरेटसाठी ते एका रात्रीत नाटकही लिहून काढायचे, त्यांचे मित्र एक नंबर दारुडे होते आणि पूल त्यांना मदत करायचे, बाटल्या पुरवायचे. सिनेमातल्या एकही शाब्दिक कोट्या तिला कळल्या नाहीत कि पुलंना भेटलेल्या व्यक्ती. ती म्हणाली कि बाबा तुम्ही म्हणालात कि हा सिनेमा पाहतांना मला खूप हसायला येईल बट टु बी ऑनेस्ट आय कुडंट. सिनेमातले पुलंबरोबरचे इतर कॅरॅकेटर्सच खूप हसायचे तेव्हा मी पब्लिककडे बघायचे त्यातले मला कोणीही हसतांना दिसत नव्हते, इट वॉज बोरिंग इन्डीड.

मुलीचा हा रिव्ह्यू ऐकून झक मारली आणि या सिनेमाला तिला नेलं असं वाटायला लागलं. पुल खरं तर माझं दैवत, मी आतापर्यंत पुलंची तिच्या मनात बनवलेल्या प्रतिमेला कुठेतरी तडा गेल्यासारखं वाटलं. मलाही सिनेमाची बाळबोध मांडणी बिलकुल आवडली नाही.

हॉस्पिटलमध्ये ऍडमीड झाल्यावर जसं जसे वल्ली भेटायला येताहेत तस तशी त्यांची स्टोरी चालू असा एकूण वातड प्लॉट आहे सिनेमाचा. सिनेमात पुलंबद्दल दाखवायचं कि त्यांना भेटलेल्या वल्ली विस्ताराने दाखवायचे यात मांजरेकरांची गल्लत झालेली दिसते. घासून गुळगुळीत झालेल्या वल्लींच्या शाब्दिक कोट्यांवर हश्या मिळवायचा प्रयत्न सपशेल फसल्यासारखा वाटला. बरेच प्रसंग गंडल्यासारखे वाटले.

प्रेक्षकाला गृहीत धरल्यासारखे प्रसंग इतके घाई घाईत उरकलेत कि त्यात पुलंची भूमिका, त्यांना झालेले दुःख यात प्रेक्षक अजिबात समरस होत नाही.
वानगी दाखल एक-दोन प्रसंग,
पुलंचं पाहिलं लग्न दाखवतांना गळ्यात वरमाला घालतांना दाखवलंय तर दुसऱ्या सेकंदाला पत्नीच्या फोटोला हार घालतांना दाखवलंय. पुलंची पहिली बायको एकाच आठवड्यात गेली हे नंतर कधीतरी कळतं.
एका प्रसंगात पुल बेळगावला प्रोफेसरची नोकरी लागल्याचं सांगतात आणि दुसऱ्या सिनमध्ये संध्याकाळी घरी आल्यावर बेळगावमध्ये कंटाळा आलाय परत जाऊयात. असे एक ना अनेक सिन घाईघाईत उरकल्या सारखे झालेत.

इथे मला "आणि काशिनाथ काशिनाथ घाणेकर" सिनेमाच्या एका सिनबरोबर तुलना करावीशी वाटते, डायरेक्टरच कसब कसं असतं याचं उत्तम उधाहरण म्हणून पाहता येईल. त्या प्रसंगाची थीम भाई सिनेमासारखीच आहे,

घाणेकरांच्या घरची वीज कापलेली असते आणि घाणेकरांची बायको ते घाणेकरांना सांगण्याचा प्रसंग आणि स्वतःच्या अवॉर्डच्या धुंदीत असलेले घाणेकर, सुबोध भावेने अप्रतिम रंगवले आहे.. त्यात घाणेकरांच्या बेफिकीर वृत्ती, त्यांच्या पत्नीची कुचंबणा आपल्यापर्यंत तंतोतंत पोहोचते. काहीसा असाच प्रसंग भाई सिनेमात आहे. सुनीता देशपांडेंना मी प्रेग्नेंट आहे हे सांगायचं आहे पण पूल स्वतःला मिळणाऱ्या सिनेमाच्या भूमिकेचच कौतुक रेटत असतात. यात पुल स्वतःत इतके गुंतले होतं हे दाखवणारा प्रसंग अतिशय बालिश आणि सपाट वाटला. तो कमी काय म्हणून लगेचचच्या फ्रेममध्ये सुनीताताई ऍबॉर्शन करून येतात. त्यात झालेलं पुलंना झालेलं दुःख, माईंनी घेतलेल्या निर्णयाचं पटेल असं कारण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही.

सिनेमाच्या शेवटी येणारी हिराबाई बडोदेकर यांच्या घरची कुमार गंधर्व, भीमसेनजी आणि वसंतराव यांची मैफल श्रवणीय झालीय. पण त्यातही कानडा राजा पंढरी ऐवजी नवीन रचना केली असती तर जास्त आवडली असती जसा प्रयत्न स्वानंद किरकिरेने केलाय तसा. इरावती हर्षेने सुनिताबाईंची केली भूमिका फार आवडली नाही. कायम रागावलेल्या मूडमध्ये आणि सपेन्स सिनेमासारखी प्रश्नार्थक नजर पाहून कंटाळा येतो. अख्खा सिनेमाचाच कंटाळवाणा झालाय.

बाकी पुलंसारखा मोठा कलाकार प्रत्यक्षात किती साधा होता, किती आम होता, किती निर्विष,अश्राप होता, सगळ्या गोष्टीत आनंद बघण्याची त्यांची दृष्टी किती निरागस होती हे दाखवण्याचा महेश मांजरेकरांचा प्रयत्न होता खरा पण एका शाळकरी डॉक्युमेंट्री पलीकडे काही हाती लागत नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे डायरेक्टरच कसब पहिल्या पार्टमधेच दिसतं त्यामुळे पैसे देऊन उत्तरार्ध पहाण्याचा इराद्यावर थेटरमधून बाहेर येता येताच फुली मारली.

अमित मुंबईचा's picture

15 Jan 2019 - 12:21 pm | अमित मुंबईचा

रविवारी जायचा विचार होता पण हा लेख वाचला आणि वाचलो.

https://epaper.loksatta.com/1978868/loksatta-mumbai/13-01-2018#page/21/2

ज्या उत्तुंग कलाकारावर महाराष्ट्राने निस्सीम प्रेम केलं, आजही करतोय, त्याचा जीवनपट आपण दाखवतोय याची चाडही न ठेवता, पूर्ण लक्ष फक्त पात्र कशी दिसतात याकडे दिलेले दिसते.
ज्यांना पु.ल फारसे माहीत नाहीत, त्यांचा समज पु.ल अत्यंत बेजबाबदार, मुर्दाड, आणि स्वभावत:च अत्यंत irritating होते, असा होणं अगदी स्वाभाविक आहे. बाबासाहेब पुरंदरे ज्या पद्धतीने चित्रपटात "उरकले" आहेत, बालपणीच्या बाळासाहेबांना जसे कथेत उगाच घुसवले आहे, याचे प्रयोजन केवळ अनाकलनीय आहे. शुभांगी दामलेंचा अभिनय वगळता उल्लेखनीय असं काहीच नाही. सागर देशमुख यांनी रंगवलेले पु.ल प्रसन्न व्यक्तिमत्वाचे अजिबात वाटत नाहीत. उलट त्याचं ते नाटकी बोलणं, इरावती हर्षेचा चेहऱ्यावर सतत एकच त्रासलेला भाव, अक्षरशः वात आणतात.
अनेक ठिकाणी टीकेचा धनी झालेला शेवटचा प्रसंग तर कळस आहे. "हमखास दारू मिळण्याचे ठिकाण" असा हिराबाई बडोदेकरांच्या घराचा उल्लेख पु.ल, भीमसेन जोशी, आणि वसंतराव यांनी केलेला बघून लोटांगणच घालावेसे वाटले. (लहानपणापासून गुजरातमध्ये राहिलेली, पु.ल फारसे माहीत नसलेली एक मराठी मुलगी आमच्याबरोबर होती. तिने "ही चम्पूताई कोण आहे? कोठेवाली आहे का?" असे विचारले. मेलो!)
एकूणच, पूर्वार्ध तरी सर्व आघाड्यांवर फसलाय.

चांदणे संदीप's picture

17 Jan 2019 - 12:20 pm | चांदणे संदीप

चित्रपटाविषयी अपेक्षा होत्या पण इथले प्रतिसाद आणि लोकसत्ताचा लेख वाचून आताच अस्वस्थ व्हायला होतंय. प्रत्यक्ष पाहिल्यावर उगाच बीपी हाय नाय तर लो काहीतरी व्हायचा.

Sandy

अहो बघा तुम्ही, तुम्हाला हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काही रहाणार नाही!
अतिशय भिकार पिक्चर आहे!
.

मारवा's picture

17 Jan 2019 - 8:25 pm | मारवा

या सिनेमाची काही ठिकाणी परीक्षणे वाचुन प्रश्न पडले की
१- बहुतांश प्रेक्षकांना दारु वाला प्रसंग अजिबात आवडलेला नाही असे अनेकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. यात पुल, भीमसेन आणि वसंतराव हे आयुष्यात दारुच्या वाटेला कधीही न गेलेले असे वास्तव जीवनात होते म्हणजे teetotaller निर्व्यसनी असतांना असे दाखवले म्हणुन राग आलेला आहे का ? तसे नसेल व ते वास्तविक जीवनात आनंदाने पिणारे होते तर असे असले तरी सिनेमात दाखवणे अनावश्यक होते असे वाटुन राग आलेला आहे का?
२- हिराबाई बडोदेकर या वास्तविक जीवनात स्वतः कधीच पीत नव्हत्या वा मित्रांसोबत बसुन मैफल जमवुन पाजण्याचा आनंद ही त्या घेत नव्हत्या असे होते का ? व असे असुनही दिग्दर्शक खोटारडेपणाने निव्वळ काल्पनिक असे चित्रण करतोय म्हणुन प्रेक्षकांना राग आलाय का ? व असे नसेल व त्यांना पिण्या वा पाजण्यात आनंद वाटत होता तर तो दाखवल्याने इतके रागवायला काय झाले ? एखादा प्रेमळ मित्र मैत्रीण आपल्या दिलदार स्वभावानुसार मित्रमंडळाला आपल्या घरी नेहमी हमखास मदीरा उपलब्ध करुन देत असेल तर त्याच्या या उदार दिलदार मित्रप्रेमाच कौतुकच वाटायला नको का ? जसे मैत्र मध्ये अनेक मित्रांच्या चांगल्या गुणांच स्वतः पुलं कौतुक करतात तसं
३-शिवाय पुलं भीमसेन जोशी वा बडोदेकर ही मंडळी साधु संत कॅटेगरीतली दुरान्वयानेही वाटत नाही. ती जीवनावर निस्सीम प्रेम करणारी माणसं होती यावर तरी बहुधा दुमत नसावे मग या आनंद यात्रींच्या जीवनातला एक आनंदाचा भाग हा मित्र मैत्रिणीं सोबत बसुन एक पिण्याची मैफल जमवणे हा असेल तर

भाई के उपर इतना हंगामा क्यु बरपा है भाई ?

फेरफटका's picture

17 Jan 2019 - 9:23 pm | फेरफटका

'मैत्र', 'गणगोत', 'व्यक्ती आणी वल्ली', 'आहे मनोहर तरी', 'कोट्याधीश पु. ल. आणी पु. लं.ची काही भाषणं वाचलेली असतील, तर कथेत नवीन काही नाही. महेश मांजरेकर चा सिनेमा असल्यामुळे सचिन खेडकर हा कंपल्सरी आहेच. सादरीकरण तुटक वाटलं. पु. ल. हे मराठी माणसासाठी एकीकडे 'लार्जर दॅन लाईफ' आणी त्याच वेळी अगदी घरातले वाटावेत अशी आपुलकी असणारं व्यक्तीमत्व आहे. ते समोर नाही आलं. धांदरटपणा दाखवायच्या नादात पु. लं.च्या स्वभावातल्या स्नेहभावनेकडे, ऋजुतेकडे अगदीच दुर्लक्ष झालं. त्यांच्यातल्या कलाकाराची सर्जनशीलता न दिसता, पाचकळ विनोद करत, दारू-सिगरेट (कन्सिस्टंसी चा अभाव. पहिल्या भागात 'सिगरेट' म्हणणारे पु. ल., मध्यांतरानंतर 'सिगारेट' का म्हणायला लागले?) च्या मागे जात, जाता जाता एखादं नाटक लिहून टाकणारे (ते सुद्धा बायकोनं सिगरेट चं पाकीट लपवलं म्हणून) पु. ल. सिनेमात दिसले. शेवटचा १०-१५ मिनीटाचा भाग, जिथे पु. ल., भीमसेन आणी वसंतराव देशपांडे, दारू प्यायला मिळेल म्हणून हिराबाई बडोदेकरांकडे जातात (ह्यांचा स्टॉक कमी असतो म्हणून), आणी तिथे ते तिघं, आणी कुमार गंधर्व गाणं म्हणतात, तो भाग वेगवान झालाय (गाण्याचा, पिण्याचा नव्हे). पण तोपर्यंत सिनेमाचा वेग संथ आणी तुटक वाटला. दुसर्या भागात, हा वेग कायम ठेवला असेल अशी आशा आहे. नाहीतर एखाद्या बेन किंग्जले ला बोलावून पु. लं.चा बायोपिक परत करून घ्यावा असं वाटतं.