महाराष्ट्राचे खजुराहो: देवळाणेचे जोगेश्वर महादेव मंदिर (Devlane Tample)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
8 Dec 2018 - 5:39 pm

बागलाण !! बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा (पाण्याच्या चारी) हा प्रदेश म्हणजे बागलाण. नाशिक जिल्ह्यातील खानदेशची पारंपरिक मूल्ये जपून ठेवणारा हा तालुका. या बागलाण भमंतीमधे सकाळी बिष्टा, कर्‍हा असे अपरिचित गड पाहून आम्ही दुंधा गडाच्या पायथ्याच्या आश्रमामधे मुक्कामासाठी निघालो. वाटेमधे देवाळाणे गावात एक पाषाणकमल म्हणावे असे मंदिर पहाण्याचे नियोजन होते. थोडेफार या मंदिराविषयी वाचले होते, पण प्रत्यक्ष अनुभुतीने मी अक्षरशः थक्क झालो. आज या मंदिराचा मी तुम्हाला परिचय करुन देणार आहे.
Devlane 1
( देवळाणे परिसराचा नकाशा )
कर्‍हा पाहून गाडी चक्रव्युह शोभावे अशा रस्त्याने तळवडेकडे निघाली. एकटादुकटा नवखा माणूस असेल तर तो या रस्त्यावर चुकलाच म्हणून समजावा. विचारत विचारत आम्ही देवळाण्यात पोहोचलो. एखाद्या गाववाल्याला विचारावे तर तो अहिराणीत सांगे, "तो दखा कळस, तेच शे ते मंदिर." दगडी कलाकुसर, बरेचसे भग्न झालेले, काळेशार प्रचंड दगड, सुरेख कातलेले. किती कालावधी लागला असेल बांधायला?
Devlane 2
देवळाणे हे गाव सटाण्यापासून १६ कि.मी. अंतरावर दोध्याड नदीच्या तिरावर निसर्गाच्या सात्रिध्यात गावतळयाच्या किना-यावर प्राचीन जोगेश्वरी शिवमंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत आहे. खानदेशच्या या गावात बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे. इ.स. ७८५ ते ८१० या काळात देवळाणे येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले. खजुराहोच्या मैथुनशिल्पांप्रमाणेच इथे मैथुनशिल्पे आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे पुर्वाभिमुख मंदिर शंकराचे असुन या मंदिराला "जोगेश्वर कामदेव मंदिर" म्हणून ओळखले जाते. दोधेश्वरहून येणारी दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्पमंदिर साकारले आहे. १३ व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली. त्याच मंदिरांपैकी देवळाणे येथील ब्रिटिश गॅजेटनुसार जोगेश्वरी शिवमंदिर (हेमाडपंथ) बांधले. या मंदिराच्या परिसरात चांदीची नाणी ब्रिटिशकाळात संशोधकांना सापडली. या नाण्यांच्या पुराव्यानुसार ही नाणी कलचूरी घराण्यातील इ.स. ६२५ ते इ.स. ६३० या काळातील कृष्णराज राजाचे चांदीचे नाणे सापडलेले आहेत. हे नाणे गुप्त काळतील नाण्यांशी मिळतेजुळते आहेत. यानुसार असा अंदाज काढता येतो. की,पूर्वी या परीसरात कलचूरी घराण्यांतील राजवट असावी. इ.स.१४९८ च्या काळता सोनज (ता. मालेगाव) ही पेठ लुटण्याची राजपुत घराण्यांतील पवार जमातीतील देवसिंग व रामसिंग हे पराक्रमी दोन्ही बंधू जात असतांना ते या मंदिरात मुक्कामाला थाबलेले होते. यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला. यावेळी रामसिंग हा रागाने निघून गेला. व देवसिंगला हा परिसर आवडल्यामुळे त्याने या ठिकाणचे जंगल तोडून या परिसरात गाव वसवले. त्याच्या नावानुसार व मंदिराच्या नावामुळे या गावाचे देवळाणे हे नाव पडले.
प्रथम दर्शनातच दर्शनी मंडपावरील शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा मात्र खटकतो. कोणी म्हणतो नवसपूर्तीसाठी कुणी गावक-याने देवाला ‘कळस’ चढवला आहे, तर जाणकारांच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली केलेला हा उद्योग आहे. पण या सा-या प्रकारामुळे मूळचे शिल्पसौंदर्य हरवले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आत गेले की, मग मात्र पुन्हा चित्रवृत्ती उल्हसित होते. आश्चर्याच्या धक्क्यांना येथूनच प्रारंभ होतो. आतील बाजूने कोरीव कामाची लयलूट केलेली आहे. या शिल्पमंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे. चांदणीच्या आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथ-यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे.
मुखमंडपापुढील मूळच्या विशाल नंदीचे शीर तुटलेले आहे. त्याच्या घाटदार शरीरावरील अलंकार व वस्त्रे सुंदरपणे कोरलेली आहेत; पण शीर जागेवर नसल्यामुळे निराशा होते.
Devlane 3
मुखमंडप नक्षीदार अशा चार शिल्पजडित स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांची एकावर एक अशा दोन स्तरांत रचना असून दोहोंमध्ये शिल्पाशिलांची वेगळी जोड दिलेली आहे. या छोटेखानी मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर दोन आडव्या शिळा बसवलेल्या आहेत.
Devlane 4
त्यानंतर सहजच छताकडे लक्ष गेले, तेव्हा तेथील शिल्पकामाच्या ‘अदाकारी’ने मती गुंग करून टाकली. वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरीवादनात दंग झालेल्या गोपालकृष्णाची प्रमाणबद्ध मूर्ती आणि छताच्या परिघावर छोट्या आकाराच्या आठ गोपिका आठ दिशांना फेर धरून वाद्ये वाजवणा-या या शिल्पकृतीची प्रमाणबद्धता, लयबद्धता काही औरच.
Devlane 5

Devlane 6

Devlane 7

Devlane 8
मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप बारा अर्धस्तंभांनी तोलुन धरलेला असुन सभामंडपाच्या खांबावर नाजुक नक्षीकाम केलेले आहे.
Devlane 9
धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची रचना केलेली असावी. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असुन डाव्या कक्षात महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे तर उजव्या कक्षात गणपती व रिध्दी-सिध्दी मूर्ती आहेत.
Devlane 10

Devlane 11
गौरी-शंकंराचा आवडता खेळ म्हणून बहुधा सारीपाट कोरला असावा. सभामंडपाच्या मध्यभागी मोठय़ा वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असुन छताकडे मोठय़ा संख्येने शिल्पाकृती कोरल्या आहेत. सभामंडपातील छतावर मध्यभागी कमळशिल्प आहे. सभामंडपाच्या छताकडे लक्ष जाताच विविध शिल्पाकृतींची तेथे झुंबड उडालेली दिसते.
Devlane 12

Devlane 13

Devlane 14

Devlane 15
छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे पुष्ट शरीराचे हसरे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या शिरोभागी गटागटाने शिल्पित केले आहेत. त्यांना प्रत्येकाला चार हात दाखवलेले असून ते दोन हातांनी छताला आधार देत आहेत, तर उरलेल्या दोन हातांनी वाद्ये वाजवत आहेत. त्यातील काही जण शंखनाद करत आहेत. कष्टकरीही त्या काळात वृत्तीने आनंदी होते हेच त्या यक्षांच्या हस-या चेह-यावरून शिल्पकाराला सांगायचे असेल.
Devlane 16
छताकडील काही भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असुन उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागेपुढे हत्ती व घोडय़ावरून आवेशात लढणारे स्वारही तेथे दाखवले आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे तर कुठे नागबंध, पानेफुले व काही भौमितिक रचना आहेत. प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. छताकडील काही शिल्पशिळात युद्धाचे प्रसंग मोठ्या कौशल्याने कोरलेले आहेत. छताच्या दक्षिणेकडील गरुडारूढ विष्णू व त्याभोवतीची सर्पाची गोलाकार जाळी विशेष लक्षवेधी आहे. अर्धस्तंभावरील हंस, मिथुन, मौक्तिकमाळा व इतर कलाकुसरही बारकाईने पाहण्यासारखी आहे.
Devlane 17

Devlane 18

Devlane 19

Devlane 20

Devlane 21

Devlane 22

Devlane 23

Devlane 24

Devlane 25

Devlane 26

Devlane 27

Devlane 28

Devlane 29

Devlane 29

Devlane 30

Devlane 31

Devlane 32

Devlane 33

Devlane 34
मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशव्दाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्यप्रवेशव्दाराजवळ वरच्या भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळया पध्दतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात प्रवेश करताना दगडी उंबरठय़ावर सुरेख चंद्रशिळा आहे.
Devlane 35
सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते.
Devlane 36
आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असुन गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वतीमातेला मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. पाठीमागे पुर्वाभिमुख मुख्य कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची चार भुजा असलेली मीटरभर उंचीची मुर्ती असुन तिचे चारही हात कोपरापासून खंडित झालेले आहेत. छताच्या मध्यभागी उमलत्या कमळपुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे प्राचीन शिल्प आहेत. पूजा साहित्य ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतीत लांबरुंद कोनाडे ठेवलेले आहेत.
बहुतेक शिल्पमंदिरांच्या प्रदक्षिणा मार्गावर बाहेरील बाजूने शिल्पकार पुन्हा आपले कसब पणाला लावून बेहतरीन शिल्पकला पेश करतात. इथे तर मंदिराला चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी चौथरा ठेवल्यामुळे शिल्पकलेस अधिक जागा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे इथली प्रदक्षिणा अधिक आलंकारिक, मनोरंजक झालेली आहे.
विविध प्रकारची छोटी-मोठी शिल्पे या मार्गावर मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली आहेत.
Devlane 37

Devlane 38

Devlane 39

Devlane 40

Devlane 41

Devlane 42

Devlane 43

Devlane 44

Devlane 45

Devlane 46

Devlane 47

Devlane 48
देवळाणे शिल्पमंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन पध्दतीचे शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. येथे पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो!
Devlane 49
छोट्या आकारातील ही शिल्पे लांबलांब शिलांवर पट्टिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली दिसतात.
Devlane 50
त्यातील नागमिथुनशिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. ही दोन्ही शिल्पे प्रथमदर्शनी श्रीगणेश असल्याचा भास होतो. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर दिसते की, एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे. मिथुनशिल्पातील सौंदर्य, सौष्ठव उच्च प्रतीचे आहे.
Devlane 51
गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर दोन उत्कृष्ट मकरशिल्पे साकारली आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते. अशी मोठ्या आकाराची व सफाईदार मकरशिल्पे क्वचितच आढळतात.
Devlane 52
त्या मकरांचा भेदक जबडा, अणकुचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली जीभ लहान मुलांना तर दचकून सोडते. शिवाय त्याचा प्रत्येक अवयव, शरीराची चपळता त्याच्या अंगप्रत्यंगातून प्रकट होताना दिसते. अगदी जिवंत असे हे शिल्प आहे. वेरूळच्या लेणी कोरल्यानंतर सर्व शिल्पकार वनविहारासाठी या भागात आले होते आणि अगदी सहज वेळ घालवण्यासाठी एका रात्रीत त्यांनी हे मंदिर उभारले, असा एक समज आहे. पितळखोरा येथील ‘शृंगार चावडी’, ‘नागार्जुन’ या लेणींवर असलेल्या शिल्पकामात व या मंदिरात असलेल्या शिल्पातील साधर्म्यामुळे या समजाला बळकटी मिळते.
Devlane 53

Devlane 54
मात्र मुखमंडपाच्या तुलनेत मंदिराच्या बाकीच्या बाह्यांगावर कमी प्रमाणात कोरीवकाम दिसते.
Devlane 55
येथे पूर्वी कळस कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत मात्र तज्ज्ञांच्या मते येथील कळस झोडगे येथील मंदिराच्या कळसासारखाच असावा. मंदिराचा पाषाण जवळच असलेल्या दुंधे या ठिकाणाच्या पाषाणाशी मिळताजुळता आहे.
केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने अलीकडे डागडुजीचे काम हाती घेतले आहे. कुणीतरी रखवालदारही नेमला आहे म्हणे. ग्रामस्थांनी त्याला अद्यापही पाहिलेले नाही! कदाचित त्याला नियमित पगारही सुरू असेल. गावातील काही टवाळखोर विरंगुळा किंवा ‘विकृती’ म्हणून शिल्पांची नासधूस करत असतात. हजारो वर्षांपूर्वीचा हा सुंदर ठेवा भग्न अवस्थेत का होईना, बघायला मिळतो; पण येणा-या पिढीला आपण आपले असे कोणते सौंदर्यशिल्प राखून ठेवणार आहोत कि नाही ? असो.
सुर्य झपाट्याने पश्चिमेकडे निघाला होता आणि दुंध्याचे आमंत्रण सतत वेळेची जाणीव करुन देत होते. पण महाराष्ट्राच्या खजुराहो अशी पदवी सार्थ करणार्‍या या मंदिरातून पाय निघत नव्ह्ते. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. कॅमेर्‍याच्या बटनावरुन बोट खाली यायला तयार नव्हते , तरी अखेरीस ग्रुपलिडरच्या धमकीपुढे नाईलाज झाला आणि शुज बांधून गाडीत बसलो. ईतक्या आडगावात शिल्पसमृध्द असा खजिना लपलेला असेल याची आधी जरासुध्दा कल्पना नव्हती. सातवाहनांचा प्राचीन ठेवा जपणार्‍या या मरहट्ट भुमीत अजूनही छोट्या छोट्या गावातून असा किती खजिना लपलेला आहे कोण जाणे? त्याला हवी ती शोधक दृष्टी आणि यथार्थ शब्दात सामान्यापर्यंत पोहचवण्याची ताकद. माझ्याकडे दोन्हीही नाही, पण तरीही हा मंदिर परिचय वाचून या अनवट गावाकडे कोणा जाणकार पर्यटकाची पावले वळाली तर या धाग्यासाठी घेतलेल्या कष्टाचे सार्थक होईल.

लेखन आवडले !

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ ) दै. दिव्यमराठीमधील श्री. रणजित रजपुत यांचा लेख
४ ) "माझा बागलाण" हा ब्लॉग
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Dec 2018 - 6:05 pm | तुषार काळभोर

अतिशय सुंदर शिल्पकला.

कंजूस's picture

8 Dec 2018 - 6:26 pm | कंजूस

सुंदर!
ते मकरशिल्प - कल्याण चालुक्यांच्या लखुंडी इथल्या शुभ प्राण्यासारखा आहे. पाच प्राण्यांपासून केला आहे.

यशोधरा's picture

8 Dec 2018 - 7:24 pm | यशोधरा

सुरेखच आहेत शिल्पे.

झेन's picture

8 Dec 2018 - 7:30 pm | झेन

इतका समृद्ध शिल्पकलेचा वारसा पण आपल्याला किंमत नाही.
मनापासून लिहीलेल्या लेखामागचा हेतू नक्कीच साध्य होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2018 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरेख शिल्पकला ! आणि तिची सुंदर ओळख !

वरुण मोहिते's picture

8 Dec 2018 - 8:59 pm | वरुण मोहिते

तुमच्या डिटेलिंग ला सलाम!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2018 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वन. आणि लेखन फोटो ह्याला __/\__

शिल्पे खूप सुंदर आहेत. लेख आवडला.

कपिलमुनी's picture

9 Dec 2018 - 11:30 am | कपिलमुनी

लेख आवडला आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2018 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या महाराष्ट्रात अशी काही शिल्प असतील यावर विश्वास बसत नाही.
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.....!

प्रतिसाद आवडल्यास...! (स्टाईल आवडली)

उगा काहितरीच's picture

9 Dec 2018 - 8:42 pm | उगा काहितरीच

छान ओळख करून दिलीत. फोटोही छानच आलेत.

प्रचेतस's picture

10 Dec 2018 - 10:23 am | प्रचेतस

अनवट मंदिराची माहिती देणारा उत्कृष्ट लेख

९ व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली.

रामदेवराय यादव आणि त्याचा श्रीकरणाधिप हेमाद्री पंडित हे १३ व्या शतकात होऊन गेले. १२७५ च्या आसपास तो सत्तेवर आला.

या नाण्यांच्या पुराव्यानुसार ही नाणी कलचूरी घराण्यातील इ.स. ४२५ ते इ.स.४३० या काळातील

कलचुरींचा काळ साधारण ६/७ व्या शतकातला आहे.

मंदिरातील मूर्तीकाम देखणे आहे. पुत्रवल्लभा, अभिसारिका आदी सुरसुंदरी सहजच ओळखता येतात. ह्याच बरोबर येथे दशवतारांचेही चित्रण दिसतेय. वामन आणि नृसिंह तर आहेतच. भारवाहक यक्ष तर अतिशय सुंदर.

श्रीशंकराच्या मंदिरावर अन्यत्र कोठेही कामशिल्पे कोरलेली आढळत नाहीत.

महाराष्ट्रातील बर्‍याच शिवमंदिरात मैथुनशिल्पे आढळतात. ती तर अगदी वेरुळच्या कैलास लेणीतील सभामंडपातील स्तंभांवर देखील दिसतात. रतनवाडी, पिंपरी दुमाला, लोणी भापकर, गोंदेश्वर, परळी येथील शिवमंदिरातही मैथुनशिल्पे आहेत.

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 9:58 am | दुर्गविहारी

सर्वच मुद्दे मान्य. खरेतर हल्ली लिखाणाला वेळ नाही. हा धागा दिवाळी अंकासाठी होता. माझ्या तांत्रिक चु़कीमुळे दिवाळी अंकात जाउ शकला नाही. पण घाईमुळे न तपासताच टाकला. तरी सुधारणा केल्या आहेत.
आपल्या प्रतिसादाबध्दल आणि सुधारणा सुचविल्याबध्दल धन्यवाद.

अनिंद्य's picture

10 Dec 2018 - 1:59 pm | अनिंद्य

आडवाटेच्या दुर्लक्षित शिल्पवैभवाची ओळख आवडली.

.......श्रीशंकराच्या मंदिरावर अन्यत्र कोठेही कामशिल्पे कोरलेली आढळत नाहीत.
.....

शिवमंदिरात मैथुनशिल्पे असणे लॉजिकल वाटते.

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 10:02 am | दुर्गविहारी

बरोबर, मी घाईत थोडे चुकीचे लिहीले, यातील बरीच मंदिरे मी पाहिलेली आहेत, पण धाग्यात सुधारणा केलेली आहे. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.

नंदन's picture

10 Dec 2018 - 4:52 pm | नंदन

लेख अतिशय आवडला. बव्हंशी अपरिचित अशा ह्या शिल्पसमृद्ध जागेची नेटकी ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार!

चौथा कोनाडा's picture

10 Dec 2018 - 5:03 pm | चौथा कोनाडा

सुंदर वृतांत. फोटो ही क्लासिक !
मकरशिल्पे जबरदस्त आहेत.
महाराष्ट्रातील शृंगारशिल्पा विषयीचे असे तपशिल प्रथमच वाचले.
बाकीच्या ठिकाणची शिल्पे प्रचेतस यांनी नमुद केलीत. काही वर्षांपुर्वी रतनवाडी पाहिले होते.
डोळसपणे पहायला हवीत या पुढे
दुर्गविहारी रॉक्स.....!

ट्रम्प's picture

10 Dec 2018 - 9:23 pm | ट्रम्प

उत्तम माहितिपूर्ण लेख !!! उत्तम छायाचित्रे .

बाकी ते गावातील टवाळखोरानीं नासधुस केलेली वाचून अफ़ग़ानिस्तान मधील इसीस च्या अतेरिक्यानीं बामियान मूर्ति तोफा लावून फोडल्याचे आठवले .

खूप छान माहिती दिली आहे. फोटो खूपच छान आहेत.

टर्मीनेटर's picture

10 Dec 2018 - 10:26 pm | टर्मीनेटर

शिल्पे फार आवडली. एका अनोळखी पुरातन मंदिराची छान ओळख करून दिलीत.
धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

11 Dec 2018 - 10:01 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून धन्यवाद ! दिवाळी अंकात हा धागा जाउ शकला नाही, त्यामुळे थोडी सवड मिळाल्यावर आता टाकला, त्याचे स्वागत झाल्याचा आनंद आहे. हल्ली लिखाणाला वेळ मिळत नाही, पण अनवट किल्ले मालिकेत पुढचा धागा टाकायचा प्रयत्न करेन.

इतरत्र अगोदर प्रकाशित झालेले लेखन दिवाळी अंकात सहसा घेत नाहीत. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर हे लिखाण आधी टाकले होते का?

दुर्गविहारी's picture

15 Dec 2018 - 11:26 am | दुर्गविहारी

होय. लिखाणाचा कच्चा खर्डा ब्लॉगवर होता. पण आता त्यावर आता मार्ग काढला आहे. :-)

केवढी कलाकुसर आहे. छानच.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Dec 2018 - 8:35 pm | भाग्यश्री कुलकर्णी

नुकतेच वेरूळ ला जाऊन आलो.त्यामुळे काही शिल्पे ओळखीची वाटली. या ठिकाणाला नक्कीच भेट देईन... नाशिक हून जवळच आहे की.. तसेच प्रचेतस यांनी वर उल्लेखलेली काही मंदिरेही पाहिली आहेत.राहिलेली बघण्याचा मानस आहे.