कोरोना विरूध्द भारताचा लढा

आफ्रिकन सफारी

Primary tabs

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
8 Jul 2018 - 9:46 pm

आजच्या फूल टू पावसाळी राईड ला काय नाव द्यायचे तेच समजत नव्हते ..
अनेक नावे सुचत होती पण नक्की होत नव्हती.. राईड संपता संपता ट्रफिक जॅम मध्ये झालेल्या एका किश्याने तो प्रश्ण सोडवला .. तो किस्सा राईड च्या शेवटी...
२०१७ च्या पावसाळ्यात अंबरनाथच्या आसपास करत असलेल्या राईड्स च्या वेळीच,पूढील वर्षी खेड ला असणार तेव्हा कोणते रस्ते खास पावसाळी राईड साठी राखून ठेवायचे, याचा विचार सुरु असे .
आज अशा खास राखून ठेवलेल्या रस्त्यावरुन तेही अस्सल कोकणी आषाढ पागोळी पावसात राईड ची संधी लाभली.
निघालो तेव्हापासूनच धुंवाधार पाउस पडत होता.आजचा मार्ग होता, "जगबुडी" असे अजब नाव असलेल्या नदीच्या किनाऱ्याने जाणारा रस्ता. आज जगबुडी तीचे नाव सार्थ करण्याच्या पवित्र्यात होती. थोडं विषयांतर करतोय, हे अजब नाव या नदीला का मिळालं असेल याचा कायम विचार करत आलोय.
खरतर या अफाट विश्वाच्या पसाऱ्यामध्ये ही तर एक छोटीशी नदी. पण आज तीच्या किनाऱ्याने जाताना जी गावं दिसली, अनुभवली तेव्हा असे वाटू लागले कि ज्या कुणी हे नाव तीला ठेवले त्याचे जग इतकेच मर्यादित परंतू परिपूर्ण असावे.परिपूर्ण अशासाठी म्हणतोय कि दळणवळणाच्या साधनांचा सुळसुळाट होण्याच्या कित्येक वर्षे आधी इथे वस्ती होती व आजही अगदी मर्यादित संपर्क शहराशी ठेउन, इथल्या गावांत लोकं राहताहेत.
आज ही दुर्गम वाटावीत अशी गावे आहेत तीच्या कीनाऱ्याला. तालुक्याच्या गावाला यायचे तर ५५ रुपये तीकिट आहे एस टी चे ..
कोकण रेल्वे च्या पॅसेंजर चे तीकिट खेड ते ठाणे ही ५५ रुपयेच आहे ..
नावं तरी काय या गावांची ..
सुसेरी, खोंडे, कर्जी, मुंबके, बहीरवली, पन्हाळजे, भडवळे ... यातलं मुंबके अनेकाना माहीत असेल कारण ते दाउद इब्राहिम चे गाव आहे.
असो, तो आपल्या लेखाचा विषय नाही ...
कर्जी गावातल्या एका प्रवासी निवाऱ्यात थांबलो तेव्हा पाऊस फूल फॉर्म मध्ये होता . थोडी पोटपूजा करुन व प्रवासी निवाऱ्यात थांबलेल्या विद्यार्थी वर्गाशी थोडा वार्तालाप करुन पूढे निघालो .
हा रस्ता म्हणजे ,रस्ते कसे नसावेत याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे .
अचानक चढ, अचानक उतार, वळण व पून्हा चढ .. सतत कोसळणारा पाऊस व डांबरट का होइना पण डांबरी रस्ता या दोन जमेच्या बाजू व डाव्याबाजुला तुडुंब भरलेली जगबुडी यांच्या सानिध्यात आमचा सायकल प्रवास मस्त सुरु होता .
रेल्वेचा भोंगा ऐकू आला, अरे इथे कूठे आली रेल्वे असा प्रश्ण पडतोय इतक्यात लक्षात आले , रस्ता ,दरी , नदी परत दरी असे डावीकडे जात राहिलो तर नंतर कोकण रेल्वे मार्ग येतो ..
म्हणजे "तुंबाड " जवळ आलय ..
तुंबाडच्या पलिकडे "आयनी" म्हणजेच रेल्वेच्या परिभाषेत अंजणी हे स्थानक अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे ..
तुंबाड चे खोत या महा कादंबरी मूळे अवघ्या महाराष्ट्रातील साहीत्य प्रेमीना माहीत झालेले गाव म्हणजे तुंबाड.मग राहूल व मी त्या महा कांदबरीतले किस्से आठवत एक मोठी चढण पार केली ..
इथे खरतंर फोटो साठी छान जागा होती ,पण पावसामुळे फोटोचा मोह आवरला व चढाई पार केली .
आता भूक लागली होती व नाष्टा कूठे मिळेल याचा विचार राहूल व मी दोघेही करत होतो, इतक्यात तुंबाड मधील एक दुकान दीसले व वडापाव मिळेल असा फलक ही दिसला ..
एकमेकांना न विचारताच सायकली तीकडे वळल्या ..
आम्ही पोहोचलो त्याच्या एखादे मिनिट आधी ताजे पाव घेउन पाववाला आला होता ..
मस्त गरम ताजा वडापाव मिळाला, एक दोन फोन आले होते नातेवाईक मंडळींचे ,त्याना ही प्रतिसाद दिला .
पूर्ण बहरलेल्या अनंतासमोर सायकलींचे फोटो काढुन निघालो.
निर्मनुष्य रस्ता, जंगल, हिरव्या रंगाच्या अनेक छ्टा न्याहाळत चढ उतार पार करत होतो. इतक्यात लक्ष गेले एका जल प्रपाताकडे. पूर्ण मस्तीत कोसळत होता.. मग पावसाची पर्वा न करता छान फोटो सेशन केले. बहीरवली असे लांबलचक नाव असलेले गांव आले .
"खैसुन आयलात सायकल वरुन" अशा अस्सल कोकणी मुसलमानी बोलीभाषेतील प्रष्णाला खेऱ्याsहुन आयलोय खेरचेच हाउत असे उत्तर अनाहुत पणे तोंडातुन बाहेर परले. (पडले )
बोलीभाषेची चेष्टा करण्यापेक्षा तीची सौंदर्यस्थळे शोधली तर भेदाभेदाच्या अनेक समस्या सहज सुटतील असा एक विचार मनात आला ..
कैक वर्षानी ही बोलीभाषा उमटली जीभेतुन,आपोआप, म्हणून स्वतःवरच खूष झालो .
पन्हाळजे नावाचे गांव आले.
एका बंद घराच्या पडवीत दोन तीन गांवकरी उभे होते . थांबलो .
इथून परत फिरायचे कि वेगळा मार्ग बघायचा यावर चर्चा केली ...
"पूढचा रस्ता चांगला आहे, थोडा चढ पार केलात की वाकवली पर्यंत जाल सहज" असा सल्ला वजा आदेश दिला गावकऱ्यांनी.
इथपर्यंत येताना जे काही उतार लागले होते, भोगले होते, ते आता दाम दुप्पट वसुली करतील, त्यापेक्षा सरळ पूढेच जाउया असा सुज्ञ विचार करुन पूढे निघालो.पन्हाळजे च्या वेशीवर एक दुकान दिसले पडवी असलेले,थांबलो, थोडी पोटपूजा केली, दुकानदारालाही थोडा खाउ दिला. मागच्या राईड च्या अनुभवाने आज पाठपिशव्या खाउ ने भरुनच निघालो होतो व तुंबाड ला अनपेक्षितपणे मिळालेल्या वडापावामूळे बेगमी होती खाउ ची शील्लक.दुकानात वीजेची सोय नाही, कारण विचारले तर जवळ वीजेचा खांब नाही म्हणून मंडळ वीज देत नाही. इथल्या गावांच्या दुर्गमतेची कल्पना यावी या साठी हा उल्लेख केलाय.
एका भल्यामोठ्या चढावर मध्येच एका वाकणात थांबलो, डाव्याबाजुला लावणी आधीची नांगरणी सुरु होती, आवण ही तयार होते (आवण = भाताच्या रोपांच्या जूड्या )
पोटरी बुडेल इतक्या चिखलांत दोन बैलांचे ८ व नांगऱ्याचे दोन २ असे पाय जेव्हा बुडत होते व बाहेर येत होते तेव्हा एक वेगळाच ध्वनी होत होता ..
(आर. डी. ने ऐकला असता तर नक्कीच वापरला असता कूठेतरी चपखल पणे )
तो नाद कानांत साठवुन ठेवत पूढे निघालो. चढाई संपली व भडवळे गाव आले, मग दमामे, कात्रण अशी गावे आली. चढाईतच जगबुडीचे सानीध्य संपले होते. कात्रण च्या तीठ्यावर थांबुन राहूल ची वाट पहात बसलो. कारण दोन पैकी कोणता रस्ता निवडायचा हे त्यालाच ठाउक होते. राहूल आलाच दोन तीन मिनीटात. अचानक समोर येणाऱ्या चढांचा अंदाज न आल्याने त्याच्या सायकल ची चेन नीसटत होती अधुन मधून .. मला व यश ला आता सवय झाल्ये अशा प्रकारच्या खास कोकणी चढ उतारांची. मूळातले बैल गाडीचे रस्ते आहेत हे , आता डांबरी झालेत एव्हढेच, बाकी रस्ता बांधणीच्या शास्त्रापासुन हे रस्ते अजुन खूप दूर आहेत. कात्रण ला पाच सायकलस्वार विद्यार्थी भेटले. त्यानी कोणता रस्ता चांगला आहे त्याची माहीती दिली, अर्थात राहुल ला माहिती होतीच त्याला दुजोरा मिळाला .
जर सर्व सुरळीत झाले तर आता थोडेच अंतर बाकी आहे असा विश्वास वाटला, थांबलोच आहोत तर थोडी खादाडी करु असा विचार करुन थोडा खाउ संपवला,व पुन्हा सुरु झालो, मस्त रस्ता व उतारच उतार, ब्रेक मारुन ही न ऐकणारा उतार होता . कोंडे गवळवाडी आली. दुकान दिसले व दोन रस्ते ही. एका रस्त्याने काही किमी वाचणार होते तर दुसरा खात्रीचा व राहुलच्या परिचयाचा होता . एकमत होत नव्हते , कोणता निवडायचा यावर चर्चा झाली . दुकानदाराच्या मते दुसरा नीवडावा असे होते. मग छापा काटा केला, काटा आला तर शॉर्ट कट असे ठरले. काटाच आला, नीघालो ,रस्ता मस्तच होता. वाटेत एक बाईकस्वार भेटला. पूढे जाउ नका, मोरीवर पाणी आहे, मागे फिरणे भाग होते. फिरलो. व आता भलत्याच रस्त्याने वाकवली गाठणे भाग पडले. आता हा रस्ता पाहुन मात्र अंगावरच काटा आला. जीद्दीने रस्ता पार केला. त्यातही बाईकस्वाराने एक शॉर्टकट सुचवला होता, पण कोणताही फलक नसल्याने दोघेही राजी नव्हतो त्या रस्त्याने जायला.
वाकवली रस्त्याला लागलो एकदाचे .
खेड दापोली वाहतुक सुरु आहे हे पाहुन हायसे वाटले. जेवायला घरी जाउ शकत नाही व रस्ता केव्हाही बंद होउ शकेल तेव्हा इथेच थांबून काहीतरी खाउया यावर एकमत झाले. आता परिचयाचा रस्ता व उतारच उतार होता .
नारंगी नदीवरचे पूल अजुन पाण्याखाली गेले नव्हते तरीही वेळ न दवडता जुन्या दापोली नाक्याजवळ आलो तर, खेड कडे जायला आज उपलब्ध असलेल्या एकमेव मार्गावर ही मोठी रांग दिसली गाड्यांची. नेहमीचा रस्ता तर पाण्याखाली केव्हाच गेला होता. सायकली हातात घेउन, वाट काढत काढत ट्राफिक जॅम च्या कारणापर्यंत पोहोचलो. खेडचे टिपिकल वैशिष्ट्य असलेले अनेक "बघे" हजर होते. द. मा. मिरासदारांच्या कथेतील ग्रामीण पात्रांच्या वर्णनाशी मिळते जुळते "बघे". त्यातील एकाने हे बघा *आफ्रिकन सफारी* आलेत, असा खोचक इशारा केला माझ्याकडे पाहुन. हसू आले, आता याची ही थोडी गम्मत करावी म्हणून त्याला थोडी सणसणीत प्रतिक्रिया दिली. मग वरमला थोडासा. खरतर परिस्थिती धोकादायक होती, आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो, त्याच्या सहा इंच खालीच पूराचे पाणी होते, व मोठे वडाचे झाड पडल्यामुळे एकमेव सुरु असलेला रस्ता बंद होता.
झाड बाजूला करायचे काम युद्ध पातळीवर सुरु होते, यांत्रीक करवत व जेसीबी च्या सहाय्याने. खेड चे नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर, आपल्या कर्मचार्यांसह जातीने हजर होते व सुचना देत होते. झाड बाजूला झाले व बघ्यांची एकच धांदल उडाली. आफ्रिकन सफारी वाला बघ्या माझ्या शेजारीच उभा होता. रस्ता ओलांडायची संधी आम्हालाच प्रथम मिळाली. वैभजीनी त्याही गडबडीत " आज कूठे होता दौरा" असे विचारत हस्तांदोलन केले दोघांशीही. आफ्रिकन बघ्या आता मात्र पूर्ण वरमला व त्याने त्या गर्दीतही झपाट्याने काढता पाय घेतला. चला आजच्या राईड ला नाव मिळवुन दिले याबद्दल त्या बघ्याचे मनातल्या मनात आभार मानत शेवटचा टप्पा गाठायला निघालो. इथेही घरी जाण्याचा नेहमीचा मार्ग पूराच्या पाण्यामुळे बंद होता. तसे जाता आले असते, पण अस्मि ची चाके त्यात बूडू नयेत थोडीही, असे वाटले व एक छोटासा वळसा घालून घरी पोहोचलो.
*रस्त्याच्या चढ उतारांची, जंगलाची, व जगबूडीच्या सांनीध्याची कल्पना येण्याकरीता लेखासोबतची छायाचित्रे जरुर पहावीत*
*छायाचित्रे राहुल गुजराथी व भटक्या खेडवाला*
*भटक्या खेडवाला* ०८ जुलै २०१८

प्रतिक्रिया

फोटो नाहीयेत हो. बाकी तुमच्या सायकल सफरींची वर्णने वाचायला मजा येते. भारीच.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Jul 2018 - 7:40 am | भ ट क्या खे ड वा ला

किरकोळ दुरुस्ती होत्ये खेड मध्ये ..
सायकल रेसर नाहीये हायब्रीड आहे .

कंजूस's picture

9 Jul 2018 - 6:23 am | कंजूस

नाव कमावलंत!

स्ट्रावाचा म्याप टाकाच.

सुसाट चटपटीत वर्णनामुळे वाचायला मजा वाटते.

रेसर सायकलीचं दुरुस्ती ( निघु नये, इन्शाल्ला असं काही म्हणतात ना) काम खेडमध्येच होतं का?

जेम्स वांड's picture

9 Jul 2018 - 9:07 am | जेम्स वांड

कुटून निघालात अन कुठं पोचलात काय पण झेपलं नाही. बायजवार लिहिता आलं तर पहा, कंच पावसाळी भटकंती वाचायला मजा येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2018 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सफर आणि तिचे प्रत्यक्षदर्शी वर्णन करण्याची तुमची लेखणी दोन्ही भारी आहेत !

फोटो का टाकले नाहीत ? ते पाहिले असते तर अजून मजा आली असती. लेखा शक्य नसल्यास फोटो प्रतिसादात टाका... लेखात हलवता येतील.

तुमचे प्रवास नेहमीच अनवट वाटांवरून असतात... त्यांचे गुगलमॅपवरून बनवलेले नकाशे टाकले तर वर्णन समजायला मदत होईल.

उदा:

अंबरनाथ ते खेड...

लेखातल्या प्रवासाचा रस्ता...

भ ट क्या खे ड वा ला's picture

11 Jul 2018 - 8:02 pm | भ ट क्या खे ड वा ला

https://wp.me/p9Zobf-y
माझा सायकलस्वार मित्र हा ब्लॉग बनवतो .
लेखन माझे बाकी मेहनत त्याची ..

भ ट क्या खे ड वा ला's picture

11 Jul 2018 - 8:05 pm | भ ट क्या खे ड वा ला