पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
3 Apr 2009 - 10:27 pm
गाभा: 

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

जसाजसा मानवी संस्कृतीचा विकास होत गेला तशातशा माणसाच्या गरजाही वाढत गेल्या.अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांबरोबरच त्याला दागदागिने,चपला, लोहारकाम,मनोरंजना यासारख्या सेवांच्या गरजा वाढीस लागल्या.कोणीही व्यक्ती आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची/सेवांची पूर्तता करू शकत नाही हे त्याबरोबरच सर्वांच्या लक्षात आले.तेव्हा प्रत्येकाने आपल्याला जी गोष्ट चांगली बनवता येते ती बनवावी आणि त्या गोष्टींची देवाणघेवाण करून सर्वांच्या गरजा पूर्ण कराव्यात ही पध्दत रूढ झाली.

उदाहरण सोपे करायला माणसाच्या गरजा दोनच आहेत असे समजू. समजा या गरजा संत्री आणि कलिंगड या आहेत.म्हणजे काही लोक संत्र्याचे उत्पादन करतात आणि काही लोक कलिंगडाचे उत्पादन करतात आणि या दोन फळांची देवाणघेवाण करून सर्वांच्या गरजा पूर्ण केल्या जातात.एका कलिंगडाने जेवढी भूक भागेल तेवढी भूक भागवायला अनेक संत्री लागतील.तेव्हा देवाणघेवाण करताना कलिंगडाची निर्मिती करणारे एका संत्र्याबदल्यात एक कलिंगड हा व्यवहार नक्कीच मान्य करणार नाहीत.तेव्हा एका कलिंगडामागे किती संत्री हा व्यवहार दोघांनाही मान्य होईल अशा पध्दतीने ठरविणे गरजेचे झाले.अशा पध्दतीने एक माप तांदळामागे किती माप दूध,एका आंब्यामागे किती लिंबे यासारखे व्यवहार दोघांनाही मान्य अशा पध्दतीने ठरविले जाऊ लागले आणि त्यातून वस्तूविनिमय पध्दती वापरली जाऊ लागली.वस्तू विनिमय पध्दतीत समाजात उप्तादन केलेल्या सगळ्या गोष्टी बाजारात चलन म्हणून वापरात येऊ लागल्या.

गावातील व्यवहार थोडक्यात आटोपले जात होते आणि गरजा थोडया होत्या तेव्हा वस्तूविनिमय पध्दती ठिक होती.तरीही त्यात काही अडचणी होत्याच.समजा अ आणि ब या दोन व्यक्तींकडे अनुक्रमे दूध आणि तांदूळ आहेत. अ ला ब कडे असलेल्या तांदळाची गरज आहे तेव्हा समजा त्याने ब ला आपल्याकडील दूध तांदळाची किंमत म्हणून देऊ केले. पण जर ब ला काही कारणाने दूध नको असेल तर ब आपल्याकडचे तांदूळ अ ला द्यायला तयार होणार नाही.तेव्हा त्या दोघांमध्ये व्यवहार होणार कसा?म्हणजेच अ ला त्याच्याकडील दूध देऊन त्याला त्या बदल्यात तांदूळ देईल असा माणूस शोधून काढायला हवा. म्हणजेच विक्रेता आणि ग्राहक यांच्या गरजा एकसारख्याच हव्यात.नाहीतर व्यवहार होऊ शकणार नाही.

दुसरे म्हणजे काही वस्तू या अविभाजनीय असतात आणि त्यामुळे त्या व्यवहारात आणताना अडचणी येऊ शकतात. समजा एका कलिंगडाला चार संत्री असा व्यवहार ठरला आहे आणि ग्राहकाला दोनच संत्र्यांची गरज असेल तर तो आपल्याकडील कलिंगड अर्धे कापून तो व्यवहारात आणू शकेल.पण समजा एका शेळीस ५० संत्री असा व्यवहार ठरला आहे.आणि ग्राहकाला गरज २० संत्र्यांचीच आहे.मग त्याने काय करावे? ५० पेक्षा कमी संत्री आली तर तो व्यवहार त्याच्यासाठी महागाचा ठरेल.आणि विकताना शेळी पूर्णच विकायला हवी.तेव्हा अशा परिस्थितीतही व्यवहार होणे कठिण होते.

तिसरे म्हणजे व्यवहारासाठी वापरात असलेल्या बहुतांश गोष्टी नाशवंत होत्या.समजा एखाद्याकडे पिकलेले दहा आंबे आहेत.ते आंबे फारतर आठवडाभर राहतील.त्यानंतर ते खराब होणार आहेत.समजा एका व्यवहारात अशा आंब्यांची देवाणघेवाण झाली आहे.आणि आपल्याकडे आलेले आंबे त्या व्यक्तीस आठवडयात संपवता आले नाहीत तर त्या व्यक्तीचे काही कारण नसताना नुकसान होणार हे नक्कीच.

चौथे म्हणजे व्यवहारासाठी वस्तू वापरल्या जात असल्यामुळे एक ठराविक विनिमय दर अंमलात आणणे शक्य नव्हते आणि त्यात व्यक्तिगत आवडीनिवडी आणि गरजांचाही अंतर्भाव झाला.उदाहरणार्थ दोन व्यक्तींना आपल्या घरी १० माप तांदूळाची गरज आहे.त्यापैकी एकाकडे आधीच ९ मापे तांदूळ आहे आणि दुसर्‍याकडे १ मापच तांदूळ आहे.ज्याच्याकडे तांदूळ कमी आहे त्याला तांदळाची गरज जास्त आहे त्यामुळे तो आपल्याकडील वस्तू (समजा दूध) स्वस्तात विकायला तयार होईल.पण ज्याच्याकडे आधीच बराच तांदूळ आहे आणि ज्याला अजून १ माप तांदूळच हवा आहे तो आपल्याकडील दूध तेवढ्या स्वस्तात विकायला तयार होणार नाही.अशा परिस्थितीत या दोन विक्रेत्यांकडील दुधाच्या किंमतीत मोठी तफावत असेल.तसेच वैयक्तिक आवडीनिवडींचाही प्रभाव दरावर पडेल.एखाद्याला सोन्याच्या दागिन्यांची अतोनात आवड असेल तो आपल्याकडील दूध (किंवा इतर वस्तू) इतरांपेक्षा जास्त प्रमाणात मोजून सोने विकत घ्यायला तयार होईल. तेव्हा अशा परिस्थितीत प्रत्येक विक्रेत्याकडील किंमत वेगळी असेल. तेव्हा आपल्याला परवडत असलेल्या भावात विकणारा विक्रेता शोधायला ग्राहकांना बरीच पायपीट पडेल.

या सर्व कारणांमुळे वस्तूविनिमय पध्दती किचकट आणि त्रासदायक ठरली.तेव्हा ग्राहक आणि विक्रेता या दोघांनाही मान्य होईल असे माध्यम शोधून काढणे गरजेचे झाले.याच माध्यमाला आपण पैसा म्हणतो.या पैशाचा इतिहासही खूपच रोचक आहे.त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमश:

संदर्भ

एक नक्की संदर्भ सांगता येणार नाही.आतापर्यंत केलेले assorted reading हाच संदर्भ आहे.

प्रतिक्रिया

सोनम's picture

3 Apr 2009 - 10:52 pm | सोनम

तुम्ही लिहिलेला लेख छान आहे. ही माहिती अर्थशास्त्रातील पुस्तकात सुद्धा थोड्या फार फरकाने अशीच आहे. पुढचा लेख लवकर डकवा.

प्राजु's picture

3 Apr 2009 - 10:56 pm | प्राजु

शाळेत असताना बरंचंस वाचलं होतं यातलं. सगळं पुन्हा ब्रशप झालं.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नाटक्या's picture

3 Apr 2009 - 11:13 pm | नाटक्या

छान विवेचन केले आहे. पुढच्या भागाची वाट पहातो आहे..

- नाटक्या

मदनबाण's picture

4 Apr 2009 - 5:10 am | मदनबाण

मस्त... पुढच्या भागाची वाट पाहतोय.

(मनी प्लान्ट मधुन मनी मिळत नाही तरी त्याचे नाव मनी प्लान्ट का बरं? :? )
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विद्याधर३१'s picture

4 Apr 2009 - 5:23 am | विद्याधर३१

लेख आवडला....
अश्याच प्रकारचा लेखस्तंभ अच्युत गोडबोले मागील वर्षी लोकसत्तामध्ये लिहीत होते.

विद्याधर

मीनल's picture

4 Apr 2009 - 5:29 am | मीनल

Evolution of Money वर छान लिहिले आहे.
मीनल.

क्लिंटन's picture

4 Apr 2009 - 7:07 am | क्लिंटन

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.अशा प्रोत्साहनातूनच मिपावर अधिकाधिक आणि चांगल्या दर्जाचे लिखाण करायची प्रेरणा मिळते. लेखमालेचा दुसरा भाग तयार आहे. तो परत एकदा तपासून गरज असल्यास काही बदल करून आजच्या दिवसात नक्कीच प्रकाशित करतो.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

आनंद घारे's picture

4 Apr 2009 - 7:13 am | आनंद घारे

वस्तुविनिमय पूर्वीपासून होत होताच, पण वस्तूंइतकेच किंवा जास्तच महत्व सेवांना होते. बारा बलुतेदार गावकर्‍यांच्या आवश्यकतेच्या सर्व वस्तू तसेच सेवा पुरवीत आणि त्यांच्या आवश्यकता बाकीचे बलुतेदार आणि इतर नागरिक पुरवीत असत. त्याचा हिशोब रुपये, आणे, पैसे यात होत नसे. ते कदाचित पुढील भागात येणार असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

अजय भागवत's picture

4 Apr 2009 - 7:31 am | अजय भागवत

क्लिंटन साहेबांनी वस्तुंचा विनिमय कसा व का करण्यास सुरुवात झाली ह्याचे मोजक्या शब्दांत उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. अशा विनिमयांच्या काळात आणखी एका विनिमयाबद्दल बोलणे आवश्यक ठरते. ज्याकाळी फ्युडल ईकॉनॉमी उदयास आली त्यावेळेस वस्तू ह्या गुलामांच्या बदल्यात देण्याची प्रथा अस्तित्वात आली. क्लिंटन साहेब हे त्यांच्या पुढील भागात घेणार असतीलच ह्याची खात्री वाटते.

खरे म्हणजे मानवाचा हा प्रवास खूपच रोचक आहे व त्यामुळे पृथ्वीवर सोशल सायन्स हे मानवाभोवती फिरत राहते कारण ही प्रगती त्याने अत्यंत कमी कालावधीत घडवून आणली. [आता ती विनाशाकडे चालली आहे असे काही जणांचे म्हणणे असेलही व ते बर्याच अंशी खरेही आहे]

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 11:19 am | मराठमोळा

आनंद घारे आणी अजय भागवत यांच्याशी सहमत.
बारा बलुतेदार पद्धती अजुन सुद्धा काही प्रमाणात खेड्यापाड्यात पहावयास मिळते.(विशेषतः खान्देशात) जसे शेतकरी चांभार आणी न्हावी यांना पैसे न देता दरवर्षी ठराविक वजनाचे धान्य देतो.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

नरेश_'s picture

4 Apr 2009 - 10:08 am | नरेश_

छान, विवेचन आहे. मौलिक माहितीबद्दल आभार.
बाकी अर्थशास्त्राची नि माझी कधीच गाठभेट झाली नाही !

या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय.
समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..

बारा बलुतेदार सेवा पुरवत असत आणि त्यातही वस्तूविनिमय पध्दती एका परिने वापरात होती.उदाहरणार्थ लोहाराला लाकडी वस्तू विकत घ्यायच्या असतील तर तो स्वत: बनविलेल्या लोखंडी वस्तू सुताराला देऊन त्या बदल्यात लाकडी वस्तू घेत असे.एका अर्थी याला सेवाविनिमय पध्दती म्हणा पण त्याचे नियम वस्तूविनिमय पध्दतीसारखेच होते.

गुलामांचा व्यापार मात्र मी विचारात घेतला नाही.पण गुलाम म्हणजे व्यापार करण्याजोगी वस्तू असे मानल्यास वस्तूविनिमय पध्दतीचे नियम त्याही व्यवहाराला लागू होतील.

सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

आनंद घारे's picture

5 Apr 2009 - 6:47 am | आनंद घारे

वस्तूविनिमयामध्ये त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा यावरून तिची किंमत ठरते. बलुतेदारी पद्धतीत साम्यवादाप्रमाणे गरजेनुसार पुरवठा आणि उपलब्धतेनुसार वाटप (उदा. पिकांची आणेवारी) होत असे. एकाद्या वर्षी लोहाराची गरज पडली नाही तरी त्याला धान्य दिले जातच असे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Apr 2009 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटन, पुढच्या लेखाची वाट पहात आहे.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

अवलिया's picture

4 Apr 2009 - 2:44 pm | अवलिया

छान माहिती.
आता सर्व भाग आल्यावरच प्रतिक्रिया देईन. पण वाचत आहे याची खात्री असु द्या !

--अवलिया

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

अनामिक's picture

4 Apr 2009 - 5:27 pm | अनामिक

चांगला लेख... वस्तूविनिमयाबद्दल थोडी माहिती होती... पण आता आपल्या लेखातून सविस्तर वाचायला नक्की आवडेल. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

-अनामिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2009 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

-दिलीप बिरुटे

क्लिंटन's picture

4 Apr 2009 - 7:02 pm | क्लिंटन

सर्वांच्या अनुकूल प्रतिसादांबद्दल आभारी आहे.थोड्या वेळापूर्वीच तिसरा भाग प्रकाशित केला आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 4:22 pm | सुधीर कांदळकर

तांदूळ देऊन सुके मासे, सोलें, काजू वगैरे वस्तु मिळतात. खास करून छोट्या, दुर्गम गांवांत. त्यांना तांदळाचा दर ठाऊक असतो आणि छोट्या दुर्गम गांवात त्यांना गिर्‍हाईक मिळणें विकणें तसें कठीणच असतें. खासकरून कोळी, गाबीत वगैरे लोकांची शेती वगैरे नसल्यामुळें डाळ, तांदूळ वगैरे विकत घ्यायला व स्वतःचे पदार्थ विकायला दूर जावें लागत नाहीं. बार्टर सिस्टीम की जय.

छान, शिस्तबद्ध, नीटनेटका लेख. आतां २रा व ३राहि भाग वाचतों.

सुधीर कांदळकर.