मिठाचे काय आहे!

शशिधर केळकर's picture
शशिधर केळकर in काथ्याकूट
19 Jan 2009 - 11:23 pm
गाभा: 

आमच्याकडे घरात एक वाक् प्रचार मोठ्या गमतीदार रीतीने रूढ झाला होता - मिठाचे काय आहे!

त्याचे असे झाले, की एक दिवस वडील दौर्‍यावरून रात्री उशीरा परतले. त्याना आम्ही मुले काका म्हणत असू. जेवायला रात्री खूप उशीर झाला. साधाच बेत जेवायला - मुगाची खिचडी आणि कढी!

पहिला घास काकानी घेतला, आणि चेहर्‍यावरची घडीही न बदलता आईला म्हणाले, "जरा मिठाचे पाहू!"

आईला काय प्रकार झाला आहे ते लगेच लक्षात आले, नि ती म्हणाली,
"अय्या, मीठ घालायचेच राहिले!"

काका म्हणाले, "असू दे, वरून घेऊ, तसे काहीच बिघडले नाही; घाईघाईत होते असे कधीकधी!"

पण लक्षात असे आले, की वरून घेतले, तरी 'ती' मजा काही खिचडीला येईना! कढी असूनही!

आणि मग जेवणभर, एक मजेशीर विषय गप्पाना मिळाला. काकानीच सुरुवात केली, "बरं का शशिधर, मिठाचे काय आहे, की कमी पडले, तर अगदी मजा जाते. काही पदार्थात ते वरून घेतले की पुरते, पण काही पदार्थ मात्र काही केल्या सुधारत नाहीत. तेव्हा योग्य प्रमाणात मीठ पडणे फारच आवश्यक!

मग आईची पाळी! ती म्हणाली, "हो पण गम्मत म्हणजे, जास्त झाले, तरी मिठामुळे पदार्थ पार बिघडतो. "आणि मग," लगेच मोठा भाऊ उद्गारला "त्यात पाणी घालावे लागते - आमटी, पिठले वगैरे असले तर!"

"हो, पण खिचडीत पाणी कसे घालणार?" मी भावाला रास्त सवाल केला, पण त्याची नजर पाहून माझ्या पोटात गोळा उठला! ते काकाना बरोबर लक्षात आले. त्यानी माझी बाजू घेत म्हटले, "ते खरे आहे, पण खिचडीत मीठ जास्त झाले, तर त्याला काही तोंडी लावणे घेता येऊ शकते. सर्व पदार्थांत पाणी घालू शकत नाहीच आपण!"

आणि असे करत करत चर्चा जी रंगली त्याला काही तोडच नाही! जेवण होऊन हात वाळल्यावर खिचडीत आज मीठ कमी झाले की जास्त याचाही आम्हाला विसर पडला होता, आणि फार मौलिक चर्चा केल्याचे समाधान गाठीशी आले होते!

एकूण ठरले असे, की सर्वसाधारणपणे, मीठ कमी पडले, तर वरून घेता येते. मीठ जास्त झाले तर अडचण जास्त होते. सर्वच पदर्थांत मात्र वरून मीठ घेऊन खरी मजा येत नाही. ओल्या पदार्थांत मीठ कमी पडले, अगदी किंवा विसरले तरी कमी अडचण होते. कोरड्या पदार्थांत मात्र कठीण प्रसंग असतो. कारण मीठ आता नीट मिसळत नाही. काही कोरड्या पदर्थांत, थोडे मिठाचे पाणी करून चांगले ढवळले, तर जुजबी सुधारणा होऊ शकते. पण काही कोरड्या पदार्थांत हे जमत नाही, कारण मग त्या पदर्थाचा पार लगदा होतो, आणि मूळ पदार्थाचे अस्तित्वच धोक्यात येते.

आमटी वगैरे केवळ ओल्या पदार्थात मीठ कमी जास्त झाले, तर कधी साखर वगैरे घालून, पाणी घालून, दाण्याचे कूट आदी घालून जणू काही काहीच बिघडले नव्हते इतपत सुधारणा होऊ शकते. पण एक मात्र खरे की मीठ जर फारच जास्त - दुप्पट चौपट - झाले तर मात्र सरळ फ्रिज मधे ठेवून पुन्हा केव्हातरी तसलाच पदार्थ मिठाशिवाय बनवून, त्यात आधीचा घालणे याला पर्याय नसतो.

विशेषतः जर पै पाहुणा जेवायला असेल, तर मग तर आपली होणारी धांदल फारच रमणीय असते! त्यात जर कोणी दुर्वास मुनी जेवायला पानावर बसला असेल, तर द्रौपदीचा धावा करणे हेच इष्ट! तिथे श्रीकृष्णाचेही काही काम नाही! तिच्याकडून निदान तिची थाळीतरी मिळू शकेल, तशीच आपली योग्यता असेल तर! पहा प्रयत्न करून!

आणखी एक मौज म्हणजे, मिठाचे सर्वसाधारणपणे योग्य असे काही प्रमाण असते हे जरी खरे, तरी काही लोकाना फार मीठ लागते. तर काहीना फार कमी मीठ पुरते.

गोनीदांच्या भ्रमणगाथेमधे त्यानी म्हटले आहे, की नर्मदा परिक्रमेच्या वेळी त्यानी मीठ तिखट तेल आदी सर्व वर्ज्य केले. मिळणारी माधुकरी नर्मदेवर जाऊन पाण्यात धुवून घेऊन मग सेवन करीत. असे जे जे कोणी योगी वगैरे असतील त्यांची गोष्ट सोडा, पण आपले बुवा मिठावाचून - योग्य प्रमाणात मिठावाचून - अडते हे नक्की.

तर मंडळी, मिठाचे काय आहे, .....! की हे कधीही न संपणारे आख्यान आहे. आणि त्याची मजाही काही और आहे.

तुमचे मिठाबाबत काही अनुभव आहेत का? सुखदु:खदायक? अंतर्मुख / बहिर्मुख / सुमुख / दुर्मुख बनवणारे किंवा इतर कोणाचे असे मुख झालेले पाहावे लागणारे - अयोग्य मिठाच्या प्रमाणामुळे? किंवा मुद्दाम खोडी म्हणून काही कोणावर प्रयोग केलेल्याचे? किंवा कसलेही? या तत्वज्ञानात भर घालणारे?

हे सर्व लिहून झाल्यावर मला वाटू लागले आहे, की हे पाकृ मधे लिहिले असते तर अधिक योग्य झाले असते की काय?

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Jan 2009 - 12:10 am | प्राजु

एकदा श्रीकृष्णाला सगळ्या त्याच्या (१०८) बायका विचारतात की , " आम्ही तुम्हाला जशा वाटतो ते सांगा."
श्रीकृष्ण सांगत जातो.. "अमुक.. बुंदिच्या लाडवासारखी गोड, अमुक.. बासुंदीसारखी.. अमुक.. केशराच्या रंगासारखी.." असं तो सगळ्यांविषयी काहीबाही सांगतो. रूक्मिणीची वेळ येते तेव्हा तिला म्हणतो ,"तू मला मिठासारखी आहेस". ती रूसते. "सगळ्यांबद्दल छान छान सांगितलं आणि मी मिठासारखी .." असं म्हणून निघून जाते.
दुसरे दिवशी श्रीकृष्ण भटार खान्यातल्या स्वयंपाक्याला सांगतो की, कोणत्याही पदार्थात मीठ नको घालू. आणि ते जेवण तयार झालं की रूक्मिणीला चव बघण्यासाठी दे..
स्वयंपाकी तसं करतो. रूक्मिणी चिडते, "एकाही पदार्थात मीठ नाहिये.. कसला हा स्वयंपाक केलाय? " असं म्हणत त्याला शिक्षा देऊ लागतो इतक्यात कृष्ण येतो आणि म्हणतो.."आता तू माझ्यासाठी मिठासारखी आहेस.. या वाक्याचा अर्थ तुला समजला असेल." रूक्मिणी वरमते.
अशी ही साताजन्माची कहाणी आठव्या जन्मी सुफळ संपूर्ण..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सोनम's picture

20 Jan 2009 - 12:21 am | सोनम

मिठाचे सर्वसाधारणपणे योग्य असे काही प्रमाण असते हे जरी खरे, तरी काही लोकाना फार मीठ लागते. तर काहीना फार कमी मीठ पुरते.
तसे मला मीठ कमीच लागते.जेवताना कधी ही वरुन मीठ टाकत नाही. अपवाद जर एखाद्या पदार्थात अजिबात मीठ टाकले नसेल तर मीठ घेणे जरुरीचे असते.काही जण तर तसेच मीठ खातात्.काय प्रत्येकाची आवड निराळी.

मऊमाऊ's picture

20 Jan 2009 - 9:37 am | मऊमाऊ

छान लिहिले आहेस, मीठ योग्य पाहिजे हे तर खरेच. यावरून आठवले, माझ्या एका मैत्रीणीने एकदा काहीतरी मटणाचा पदार्थ बनवला होता , आम्ही कॉलेजमधे असताना, त्यात मीठ जास्त झाले होते. तिच्या आईने मला सांगितले, आज हिने " मीठ ए मीट" बनवले आहे म्हणून.
पण बाकी वर्णनावरून, तुमच्या कुटुंबात तुमच्यातल्या मीठाचे प्रमाण किती सुयोग्य होते ते दिसते आहे, नाही का ?

सहज's picture

20 Jan 2009 - 9:48 am | सहज

मिठाचे काय आहे तर एक कथा होउ शकते किंवा लेख किंवा पाकृ......किंवा सर्वकाही

मस्त....

सुनील's picture

20 Jan 2009 - 11:14 am | सुनील

एक छोटासाच विषय पण मस्त फुलवला आहे!

एकाद्या पदार्थात मीट जास्त झाले असेल तर त्यात एक शिजवलेला बटाटा घालावा. बटाटा मीठ शोषून घेतो. काही हॉटेलात पदार्थात मीठ घालतच नाहीत किंवा अगदीच कमी घालतात. वरून मीठ घालण्याची सोय ग्राहकांना असतेच!

महाराष्ट्रातील काही भागात मीठाला "गोड" असा शब्द आहे, तो किती सार्थ आहे, हे अळणी प्रदार्थ खाल्यावरच समजते!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रम्या's picture

20 Jan 2009 - 2:30 pm | रम्या

माझी कोल्हापूरची म्हातारी आत्ती मीठ पाहिजे हे विचारताना "साखर पाहिजे का" असंच विचारते !
आम्ही येथे पडीक असतो!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jan 2009 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते

केळकर साहेब, एक साधा छोटासा विषय घेऊन तो मस्त फुलवला आहे. लेखनात सहजता आहे, बोजडपणा अजिबात नाहिये.

माझ्याबद्दल बोलायचं तर, मला मीठ जरा जास्तच लागतं. आपण 'मीठ भाकरी' असा शब्दप्रयोग वापरतो. पण माझ्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. जेवणात नुसती गरम भाकरी / पोळी फक्त मीठाबरोबर खाऊ शकतो आणि आवडतं पण. लहानपणी तर मी येताजाता चिमूटभर मीठ खात असे. घरी मिठाच्या बाबतीत नेहमी मारामारी असते कारण बाबांना मीठ अगदी कमी लागते. आणि मी, माझी आई वगैरे म्हणजे निव्वळ लवणासुर, त्या मुळे जेवतानाचा हा एक चिरंतन वाद विषय आहे. आपल्याकडे 'नावडतीचे मीठ सुद्धा अळणी' अशी एक म्हण पण आहेच.

असेच नियमितपणे लिहित जा.

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

20 Jan 2009 - 7:14 pm | लिखाळ

केळकर साहेब, एक साधा छोटासा विषय घेऊन तो मस्त फुलवला आहे. लेखनात सहजता आहे, बोजडपणा अजिबात नाहिये.

असेच नियमितपणे लिहित जा.

सहमत. लेख छान आहे.

-- लिखाळ.
माझी अनुदिनी
खरेतर मला दर्जेदार लेखक व्हायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो :).

विटेकर's picture

20 Jan 2009 - 4:14 pm | विटेकर

वा!
छोट्याश्या बाबींवर अतिशय सुंदर आणि वेधक लेख लिहला आहे.
हे कमी -अधिक 'कळणे'म्हणजेच विवेक!
ते स्वयंपाकातच नव्हे तर आयुष्यालाही लागू होते!

- विटेकर.

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

महेंद्र's picture

20 Jan 2009 - 4:19 pm | महेंद्र

मस्त जमलाय लेख.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Jan 2009 - 7:06 pm | अविनाशकुलकर्णी

मिठा बद्दल .....
मिठ समुद्राच्या पाण्या पासुन बनते.
जिथे बनते तिथे त्याला मिठागर असे म्हणतात
मिठात काळे मिठ व पांढरे मीठ असा भेद भाव आहे.
गांधिंना मिठ तयार करायला आवडत असे..
त्या साठि त्यांनि सत्याग्रह केला.
आम्हि टाटा नमक खातो..
व हमने इस देशका नमक खाया है..असे गर्वाने म्हणतो.
माझि आत्या "अन्नपुर्णा नमक" वापरते.
त्या मुळे तिच्या २ हि मुलि कलेक्टर झाल्या आहेत.
जय हिंद

अविनाश

शशिधर केळकर's picture

20 Jan 2009 - 7:50 pm | शशिधर केळकर

अतिशय आवडले!

महेंद्र's picture

24 Jan 2009 - 3:56 pm | महेंद्र

अरे काय मस्त लेख जमलाय.. अभिनंदन केळकर तुमचं... कि "तुझं " म्हणायचंरे?

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2009 - 12:44 am | प्रभाकर पेठकर

'मीठ चवीपुरतं', 'नमक स्वादानुसार', 'सॉल्ट टू टेस्ट'

म्हणजेच 'मीठाचे' नाते 'चवीशी' घट्ट आहे.

खिचडीत मीठ जास्त झाले तर खिचडीत किंचित आंबट दही घालावे. कमी झाले असेल तर तेलाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला लसूण तांबूस रंगावर तळून त्यात तिखट आणि पुरेसे मीठ घालून ते खिचडीवर घ्यावे. मीठाची उणीव तर दूर होतेच लज्जतही वाढते.
फारच कोरड्या (विशेषतः तळलेल्या. उदा. भजी, कटलेट) पदार्थांवर चाट मसाला भुरभुरावा. (असे पदार्थ तळण्याआधी किंचित चाखून मीठ जुळवून घेणे जास्त सोयिस्कर.)

रसदार पदार्थात मीठ कमी झाले तर नंतर वाढवता येते. जास्त झाले तर त्यात 'कच्चा' बटाटा घालून शिजवून, पदार्थ जरा थंड करून खावा. शक्य असेल तर उकडलेल्या बटाट्याची पेस्ट करून मिसळावी. माशाच्या आमटीत नारळाचे दाट दूध वापरता येते. चिकन, मटण रस्सा खारट झाला तर त्यातही दही फेटून मिसळावे.

मीठ चुकून जास्त पडले तर पदार्थ शिजताना त्यात कोळसा टाकावा. पदार्थ शिजला की थोड्यावेळाने तो कोळसा काढून टाकावा. कोळसा मीठ शोषून घेतो असं ऐकले आहे. कधी प्रयोग करून बघितला नाही.

रश्यात मीठ किंचीत जास्त झाले असेल तर बिन मिठाच्या भाताबरोबर तो पदार्थ खावा.

काही करता येण्यासारखे नसेल, तरीही पदार्थ फेकू नये. भिकार्‍याला वाढावा. त्याच्या जवळच्या इतर अन्नात मिसळून तो खाऊ शकतो. उन्हातान्हात फिरल्याने त्याला मिठाची गरजही जास्त असते.

अन्न हे पूर्ण ब्रह्म ! उदर भरण नोहे जाणीजे 'यज्ञकर्म'.

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 10:37 pm | लिखाळ

उत्तम..
या मिठावरच्या लेखातला चव वाढवणारा प्रतिसाद :)
-- लिखाळ.

शशिधर केळकर's picture

27 Jan 2009 - 9:20 pm | शशिधर केळकर

की अरे म्हणायचं? - हा काय प्रश्न आहे? अर्थात अरे म्हणायचं!