विजेची बचत

अनामिक's picture
अनामिक in काथ्याकूट
13 Jan 2009 - 1:36 am
गाभा: 

गेल्या विकांताला इंटरनेटवर गायनाच्या रियालिटी शोचा फिनाले बघत होतो. शो छान वाटला, बघायला मजा आली. पण बघता बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ति म्हणजे त्या किंवा तत्सम कार्यक्रमात स्टेजवर केलेला 'झगमगाट'. प्रत्येक शो साठी वेगवेगळा स्टेज तयार करण्यात येतो आणि त्यावर गरज नसतानाही हजारो दिवे लावून स्टेज सजवले जाते. एकीकडे जिथे लोड शेडिंगमुळे सामान्य माणसाच्या घरात ८ ते १० तास वीज नसते (खेडे विभागात १२-१६ तास) तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गरजेपेक्षा जास्त वीज वापरणे किती योग्य? यावर आपल्या सरकारचे काही नियम/ काही बंधनं असायला नकोत का? बरं टी. व्ही चॅनल्सची संख्या दिवसागणिक वाढतच जातेय. आणि प्रत्येक चॅनलवर शेकडो शो... तेवढेच स्टेज... आणि तेवढाच झगमगाट/ विजेचा अपव्यय! याला कुठेतरी मर्यादा असायला हवी असे वाटते.

मागे एकदा अमिताभचा वर्ल्ड टूर (इंटरनेटवर) बघत असताना, साहेब/त्यांची पत्नी जयाबाई ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य करत होते (असंच काहीसं अक्षय कुमारपण करतो म्हणे अवॉर्ड शोज मध्ये). लोक म्हणत असतील बापरे, हा माणूस सांगतोय तर खरंच विजेची बचत करायलाच पाहिजे. कुठेतरी त्यांना विजेच्या बचतीची जाणीव होतही असेल. लोक त्यांच्या भाष्याने प्रेरित झाले तर आनंदच आहे, पण मलातरी अमिताभचं ते भाष्य म्हणजे 'लोका सांगे.... " वाटलं. दुसऱ्याला उपदेश देणाऱ्या अमिताभला विचारावंस वाटलं की "बाबारे दुसऱ्याला तू अगदी कळवळीने पटवून देतोयेस वीज बचती बद्दल, ते ठीकच. पण तुझ्या शो साठी या स्टेजवर जे हजारे-लाखो दिवे लावल्येत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?" दुसऱ्याला सांगणे किती सोपे असते नाही?

असाच दुसरा एक प्रकार म्हणजे भारतात वाढत चाललेली मॉल संस्कृती. मॉलमध्येच नव्हे तर कोणत्याही शो-रुम मध्ये गेलात तर शेकडो दिवे आपलं स्वागत करतात. आता माल विकण्यासाठी खरंच ह्या शेकडो दिव्यांची गरज असते का असं विचारलं तर "नाही" असच उत्तर येईल. भर दिवसा सुद्धा दुकानात एवढे दिवे लावून विजेचा अपव्यय करण्याला काय म्हणावे? अशा सार्वजनिक ठिकाणी विजेचा अपव्यय टाळला तर घरोघरी होणारं लोड शेडिंग थोडं तरी कमी होईल असे वाटते.

सार्वजनिक ठिकाणं सोडली तर वैयक्तिक पातळीवर विजेची बचत करायचा किती जण प्रयत्न करतात? खरे पाहता आपल्यात अजून पुरेशी जाणीवच (अवेअरनेस) नाही आहे विजेची बचत करण्यासाठी. लोड शेडिंग कमी करण्यासाठी सरकार काहीच करत नाही असे म्हणून, सरकारला दोष देऊन आपण मोकळे होतो. पण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यास असमर्थ ठरतो. जर प्रत्येकाने निश्चय केला तर साध्या साध्या गोष्टीतून विजेचा अपव्यय टाळता येतो. जसे...

१. आपण ज्या खोली मध्ये आहोत ति सोडून बाकीच्या खोलीतले दिवे/पंखे बंद असण्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास फ्लुरोसंट दिवे वापरावे.

२. ऑफिसमधून घरी जाताना किंवा घरातून ऑफिसात जाताना संगणक बंद करावा.

३. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त घराबाहेर राहणार असाल तर मायक्रोवेव्ह, फ्रीज, टिवी, संगणक, आणि इतर मशीन्स बंद करून 'अनप्लग' कराव्यात. ह्या मशीन्स स्टँड बाय वर असल्याने देखील वीज खर्च करतात.

४. ए. सी. वापरताना सर्व दरवाजे, खिडक्या बंद आहेत की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यावे. शक्यतो पंख्याचाच जास्त उपयोग करावा.

५. घरात वॉशिंग मशीन असेल तर तिचा उपयोग योग्य प्रमाणात कपडे गोळा झाल्यावरच करावा.

६. मुख्य म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग करावा. खिडक्या उघड्या ठेवल्या तर घरात प्रकाश येतोच, आणि हवा खेळती राहते (ज्यांचे घर जादा वाहतुकीच्या ठिकाणी आहे त्यांनी स्वतःला हवे तसे उपाय अमलात आणावेत). उगाच गरज नसताना दिवे/पंखे वापरू नये.

अशा छोट्या छोटया गोष्टीतूनसुद्धा बऱ्याच प्रमाणात वीज वाचवता येते. मी जे काय म्हणतोय त्याच्याशी तुम्ही सहमत असालच आणि आपापल्या परीने विजेची बचत करतही असाल. शेवटी आपल्यापासून सुरवात केली तर लोक सुद्धा हळू हळू प्रेरित होतील. मी माझ्यापुरतं केलंय म्हणून चालणार नाही आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न फक्त वैयक्तिक पातळीवरचा नाहीये. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतोय, आणि आपण ह्या विजेच्या अपव्ययावर आळा घालण्यासाठी काहीच करत नाही आहोत याची खंत वाटते.

अनामिक

(कदाचित हा चावून चोथा झालेला विषय असेलही, पण प्रत्येकाला विजेच्या बचतीची जाणीव व्हावी म्हणून अजून एक प्रयत्न समजा)

प्रतिक्रिया

धनंजय's picture

13 Jan 2009 - 1:38 am | धनंजय

चालू ठेवावा.

बाकी कल्पना चांगल्या आहेत.

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 9:14 am | विसोबा खेचर

हेच बोल्तो..!

अवलिया's picture

13 Jan 2009 - 10:05 am | अवलिया

मी पण हेच बोलतो

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मैत्र's picture

13 Jan 2009 - 11:06 am | मैत्र

चांगल्या सूचना. अजून लिहा...

नितिन थत्ते's picture

13 Jan 2009 - 11:48 am | नितिन थत्ते

फ्रीजसुद्धा (आत आइसक्रीम ठेवलेले नसेल तर) मिनिमम सेटिंगवर चालवावा. आइसक्रीम आणून फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

सहज's picture

13 Jan 2009 - 7:37 am | सहज

धन्यु!

ह्या विषयावर वेळोवेळी बोलणे उत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2009 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वीजेची बचत केली पाहिजे , हे मात्र पटायला लागलं आहे !

*शेतकर्‍यांनी दांड्यांनी पिकांना पाणी भरतांना मोटर चालू करुन इतर कामासाठी निघून जाऊ नये ! त्यामुळे पाणी तर वाया जातेच पण वीजेचाही अपव्यय होतो.

-दिलीप बिरुटे

संजय अभ्यंकर's picture

13 Jan 2009 - 9:28 am | संजय अभ्यंकर

खालील उपाय करून पहावेत. त्या आधी आपल्या विजेच्या बिलावरचे खर्चलेले युनिटस पाहून नंतरच्या बिलाबरोबर तुलना करावी.

१) वॉशिंग मशीन चालवताना, फ्रिझ, ए.सी., झुंबराचे दिवे, गिझर, टि.व्ही. इ. उपकरणे बंद करावित. म्हणजे एकावेळेस एकच (किंवा कमितकमी) खार्चीक उपकरण चालवावे.

२) रात्री झोपताना फ्रिझ बंद करावा. रात्रिच्या वेळेस आपण फ्रिझचे दार उघडत नसल्यामुळे, रात्री ११वा. ते सकाळी ५वा. पर्यंत फ्रिझ बंद ठेवू शकतो (आतील पदार्थ नाशिवंत नसतील तर हे करून पहावे).

३) काँप्युटरचा मॉनीटर नको असेल तेव्हा बंद ठेवावा.

प्रत्येकजण अभ्यासाने, आपापल्या घरात अशा प्रकारचे उपाय नियोजनाने अमलात आणू शकतो.

४) अलिकडेच काहि तंत्रज्ञांशी चर्चा करताना CVT (Constant Voltage Transformer) चा उल्लेख झाला. ह्या उपकरणाने, घरातील विद्युत उपकरणांचे जळण्या पासुन संरक्षण तसेच विजेची बचत होते असे त्या तंत्रज्ञां कडून कळले.

CVT (Constant Voltage Transformer) वर मि.पा.कर अधिक प्रकाश टाकू शकतील काय?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

जृंभणश्वान's picture

13 Jan 2009 - 10:30 am | जृंभणश्वान

ब्लॅकल - गुगलचे उर्जा वाचवणारे सर्च पेज...
अधे मधे वापरतो मी [सलग वापरल्यास डोळ्यांना त्रास होतो बुवा]

http://www.blackle.com/about/

पर्नल नेने मराठे's picture

13 Jan 2009 - 10:58 am | पर्नल नेने मराठे

सेल फोन चार्ज १० मिनीतात होतो.. पन मी बटण बन्द करायला विसरुन जाते. कन्झरशम होत का?
चुचु

शेखर's picture

13 Jan 2009 - 11:35 am | शेखर

अजुन एक उपाय म्हणजे बल्ब च्या ऐवजी शक्य त्या ठिकाणी CFL दिवे वापरावे. त्यामुळे विजबचत खुप प्रमाणात होते.

शेखर

नितिन थत्ते's picture

13 Jan 2009 - 11:52 am | नितिन थत्ते

दुर्दैवाने आपल्याकडे विजेचे दर इतके कमी आहेत की सी एफ एल च्या गुन्तवणूकीचा पे बॅक पीरीयड फार लांब होतो. त्यामुळे ते वापरण्यास उत्तेजन मिळत नाही.