रस्त्यावरून चालताना लहान मुलाला रस्त्याच्या बाजूने का ठेवतात?

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
6 Jan 2009 - 9:25 pm
गाभा: 

आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका माझ्या स्कूटरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्याने अशी हालचाल केली की मला त्या कमी वेगातही कचकन ब्रेक दाबावा लागला. अर्थात दोघांनीही एकमेकांना काही न बोलता आमची वाटचाल सुरू झाली. पण कित्येक दिवस मनात असलेला प्रश्न पुन्हा उफाळून आला.

रस्त्यावरून चालताना लोक लहान मुलांना हात पकडून रस्त्याच्या बाजूने ठेवून आपण आत राहत का चालतात?

फूटपाथ सोडून रस्त्यावरून लोक जात असतात हे काहीवेळा ग्राह्य आहे. पदपथावर लोक दुकाने मांडून ठेवतात, किंवा गर्दीही असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लोक येतात तेव्हा वाहन चालक व पादचारी ह्यांच्यात थोडीशी खुन्नस असतेच. तरीही त्यात थोडी समंजसताही असते हो. लोक स्वत: रस्त्यावरील वाहनांपासून सांभाळत चालत असतात (काही नसतात तो भाग वेगळा). पण लहान मुले रस्त्याच्या बाजूला असताना ते स्वत:ला किती सांभाळणार हो? ते तर स्वत:च्याच मस्तीत असतात. त्यात मग धक्का लागला तर मुलगा कसा प्रतिसाद देईल तेही माहित नाही. पण त्याचे पालक लगेच वाहनचालकावर डाफरणार.

गेल्या वर्षी कार्यालयातील एका सहकार्‍याशी ह्याच बाबतीत बोलणे चालू होते. तो म्हणाला की बहुधा लहान मुलांना आपला चळवळ्या हात धरून ठेवलेला आवडत नाही. तसे केले तर ते उगाच आणखी चळवळ करतात. म्हणून डावा हात पकडून ठेवतात. उजवा हात मोकळा असतो.
अरे हो, ह्यात डावा/उजवा हाही प्रकार येतो का? माझ्या नेमके लक्षात नाही पण बहुतेक वेळा मुलगा उजव्या बाजूला असतो व त्याला नेणारा त्याचा डावा हात पकडून असतो (आणि जाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने) , असेही आहे का?

लहान मुलांना रस्त्यावरून चालत नेणे हा प्रकार मी स्वत: जास्त अनुभवला नाही आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही.
आणि बहुधा त्यामुळेच लहान मुलांची आकलनशक्ती ह्यात मी हे टाकू शकलो नाही. ;)

तुमचा ह्या बाबतीत काय अनुभव आहे किंवा काय मत आहे?

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

6 Jan 2009 - 9:41 pm | चतुरंग

त्यातही एक शक्यता अशी वाटते की मुलांना रस्त्यावरुन जाणारी वहाने ही फारच कुतुहलाचा विषय वाटतात त्यामुळे त्यांना रस्त्याकडच्या (वहानांकडच्या) बाजूला रहायचे असते. पदपथाच्या बाजूला राहिली तर त्यांच्या नजरेला हात धरलेल्या व्यक्तीचा अडथळा येतो आणि ती सारखी पुढे किंवा मागे अशी त्या व्यक्तीच्या पायात येतात. सहाजिकच रस्त्याच्या डावीकडून जात असली तर त्यांचा डावा हात धरुन मोठी माणसे चालतात. (किंवा दुसर्‍या बाजूला उलटे).
दुसरे असे की मोठ्यांना पदपथावरुन कायकाय (आणि कोणकोण ;)) चालले आहे ह्यात रस असतो! त्यामुळे त्यांचे लक्ष पदपथावर आणि मुलांचे रस्त्यावर अशी ही वरात चाललेली असते.
देवदत्त तू म्हणतोस ते बरोबर आहे. असा अनुभव मलाही स्कूटर चालवताना बर्‍याच वेळा आलाय.
मी स्वतः खूप गर्दीतून माझ्या लहान मुलाला घेऊन जायचो त्यावेळी त्याला (३-४ वर्षाचा असे पर्यंत) चक्क खांद्यावर बसवून जायचो.

चतुरंग

चंबा मुतनाळ's picture

7 Jan 2009 - 1:50 am | चंबा मुतनाळ

मी देखील हा अनुभव पदोपदी घेतला आहे. नॉर्मली मी बायकाना मुलाना रस्त्याच्या बाजूने नेताना पाहिले आहे. कदाचित जास्त करुन बायकाच मुलाना बाहेर घेउन जातात हे देखिल कारण असू शकते. मात्र जेंव्हा मी हे बघतो तेंव्हा मी आवर्जून थांबतो आणी त्या तायामायांना सांगतो मुलाना आतल्या बाजूला चालवायला. ह्या तायामाया पण तोंडाने पुटपुटत आपली नाराजी व्यक्त करतात, पण पोराना खस् कन आतल्या बाजूला घेऊन हात पलटी करतात!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jan 2009 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडं वेगळं आहे. बरेचसे लोकं तुम्ही जेवढा या गोष्टीचा विचार करताय तेवढा करतच नाहीत. आम्ही जिथे रहातो तिथे अनेक लोकं पाहिले आहेत, पार्किंग लॉटमधून चालताना प्रॅम ढकलणारे, लहान मुलांबरोबर असणारे लोकं हे आपण बागेत चालल्याच्या थाटात चालतात. गाड्या, स्कूटर्स आल्या, त्यांनी आरडाओरडा केला की मग वाकडं तोंड करुन बाजूला होतात आणि नंतर मुलांना बाजूला व्हायला सांगतात. मुलं चार फूट लांबच असतात, ती कधी ऐकतात कधी ऐकत नाहीत. मग आपणच चूक केली आहे अशा थाटात, पार्किंग लॉटमधल्या छोट्या आईलमधून गाडी सांभाळत आणि इतरांचे जीव वाचवत गाडी उभी करायची. रस्त्यावर हे लोकं फार काही वेगळं वागत असतील अशी अपेक्षा नाही.
माझं निरीक्षण: या सवयीच्या विपरीत वागणारे लोक म्हणजे एकच जमात, एकटे चालणारे लोकं. ते कायम रस्त्याच्या कडेने, जबाबदारीने चालताना दिसतात.

अर्थात हे निरीक्षण बहुसंख्य लोकांसाठीचं आहे. गर्दीच्या रस्त्यातून जाताना मला माझ्या आई-बाबांनी आतल्या बाजूलाच ठेवलं. अधूनमधून याच पार्कींग लॉटमधे एखादे आई-वडील दिसतातही जे मुलांचा हात धरून घेऊन जातात, रस्त्याच्या कडेने चालायचं असं सांगत असतात.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आपसूकच काय घडत असेल ह्याबद्दलचा तर्क आहे. बर्‍याच गोष्टी नकळत घडत जाऊन अंगवळणी पडत असाव्यात.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jan 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपसूकच काय घडत असेल ह्याबद्दलचा तर्क आहे. बर्‍याच गोष्टी नकळत घडत जाऊन अंगवळणी पडत असाव्यात.
आपसूक घडणारी ही गोष्ट कधी ना कधी शिकलेली असते. उदा. ही लहान मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांचे पालक जे करायचे तेच करतील. आपल्या रस्त्यांवर एवढी वाहनं आणि तोबा गर्दी फारशी काही जुनी नाही, फारफारतर चार पिढ्या मागची गोष्ट असेल. (जसं समोरच्याला पाय लागला तर स्वतःच्या नकळतच नमस्कार केल्याची कृती होते, याचं मूळ खूप जुनं असावं.)
माझा रोख असा होता की वाहनं आली, पण त्याबरोबर चालक आणि पादचार्‍यांना जी शिस्त लागायला हवी त्यात आपण मागे पडलो.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jan 2009 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार

अगदि मनातला विषय मांडला आहेत, त्याबद्दल धन्यावाद !!
आमच्या येथे शिवाजी रोड सारख्या हमरस्त्यावर हे हमखास दिसणारे दृष्य ! कधी कधी तर मतोश्रींच्या उजव्या हातात मोबाईल, डाव्या हातने लहान मुलाचा हात धरलेला आणी पु.लं. च्या भाषेत सांगायचे म्हणजे तो कार्टा नाहितर कार्टी येणारी जाणारी प्रत्येक गाडी हि आपल्या अंगावरुनच जायला पाहिजे ह्या थाटात रस्त्यावर चालत असते.
हा आमचा एका मातोश्रींशी झालेला संवाद :-
आम्ही :- ताई, त्याला त्या हाताला धराना, आत्ता सायकलचा धक्का लागला असता त्याला. त्याला पलिकडच्या हाताला धराना.
ताई :- मुर्ख आहे तो, त्या हाताला धरले कि मुद्दाम शेण वगैरे दिसले कि त्यात जोरात पाय आपटतो !

संवाद (२)
आम्ही :- अरे ए बाळा , ओ काकु त्याला पलिकडच्या हाताला धराना, कसला वाकडा चालतोय तो.
काकु :- तो लहान आहे, त्याला नहि कळत. पण देवानी तुम्हाला अक्कल दिलियेना? आणी डोळेपण ? (मग आमच्याकडे निरखुन बघत) डोळे, ते पण चारचार. तुम्हाला नाहि दिसत निट चालवायला ?
आम्ही :- भवतेक देवानी आम्हाला ४ डोळे दिलेत तशेच तुम्हाला ही चार चिरंजिव दिलेत का हो ? का कालच विमा काढलाय ह्याचा ?

आमचा एक निच मित्र तर अशा पालकांना "सांभाळा पोराला, का नको असताना झालाय ?" असा भर गर्दित प्रश्न विचारतो !
=))

कायम रस्त्याच्या डाव्या बाजुनी सायकल चालवणारा निसर्गप्रेमी
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

तिमा's picture

7 Jan 2009 - 5:43 pm | तिमा

यालाच इंग्रजीमधे 'सिव्हिक सेन्स् ' नसणे असे म्हणतात. रेल्वे फलाटावर कुटुंब उभे असताना लहान पोर फलाटाच्या कडेला जाऊन डोकावत असते. आईबापांचे अजिबात लक्ष नसते. हा प्रकार गुजराथी कुटुंबात हमखास बघायला मिळतो.