घरटे
गाडीने घाटावरून वळण घेतले आणि आता उतार सुरू झाला. आतापर्यंत दिसणारे विरळ घाटमाथे घनदाट जंगलांनी वेढल्यासारखे दिसू लागले. समोर दिसणारा नागमोडी रस्ता, बाजूला दिसणारी खोल दरी, दरीमध्ये दिसणारी गर्द झाडी आणि मधूनच कुठेतरी खळाळून वाहत जाणारा धबधबा… अभिमन्यू निसर्गाच्या त्या विलोभनीय रूपामध्ये हरवून गेला. त्याची प्रिय बायको आणि प्राणप्रिय मुलगा यांच्यापासून कायमचे दुरावल्याच्या दुःखाने व नैराश्याने त्याच्या हृदयात आग पेटली होती. परंतु खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आता त्याला कमालीची सुखावत होती. बराच वेळ गाडी चालवल्यामुळे त्याची पाठ भरून आली होती. एक चांगलेसे हॉटेल पाहून त्याने गाडी थांबवली. एक कडक चहा ऑर्डर करून अभिमन्यू फ्रेश व्हायला गेला. हॉटेलच्या बाजूलाच दरीचा सुंदर व्ह्यू दिसेल अशा पद्धतीने टेबल-खुर्च्यांची मांडणी केली होती. असेच एक टेबल पकडून अभिमन्यू समोरील दरीचा सुंदर नजारा न्याहाळत चहाचा आस्वाद घेऊ लागला. घड्याळाकडे लक्ष जाताच अजूनही गावात पोहोचायला दोन-तीन तास तरी सहज लागतील, याचा त्याला अंदाज आला. काही खायला मागवावे का? घरात ‘ती’ असेल का? काय वाटेल ‘तिला’.. मला असा इतक्या वर्षांनी अचानक बघून? काय म्हणेल ती? असे मनात पिंगा घालणारे एक ना अनेक विचार अभिमन्यूने झटकून टाकले. चहा पिऊन त्याला तरतरी आली. पुढील रस्ता त्याच्या ओळखीचा असल्यामुळे तो वेगात घराकडे निघाला.
गावात पोहोचेपर्यंत दिवेलागणीची वेळ झाली होती. अभिमन्यू गाडीतून उतरला. त्याच्या बाबांनी अतिशय कष्टाने उभे केलेले गावातले हे टुमदार घर.. बाबांचा जीव की प्राण होते. खरे तर ते तिथून जवळच असलेल्या शहरात राहत होते. बाबा राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर, तर आई आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापिका. दृष्ट लागावा असा संसार. शहरात त्यांचे शासकीय निवासस्थान होते. अभिमन्यूचे शिक्षण तिथेच झाले. परंतु गावातील या घरात आजी-आजोबा राहत. त्यामुळे शनिवारी व रविवारी, सणासुदीला तसेच दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत अभिमन्यू हमखास इथे राहायला येत असे. अभिमन्यूचे आई-बाबादेखील आवर्जून या घरात राहायला येत असत. खरे तर दृष्ट लागावा असा त्यांचा संसार चालू होता. आणि खरेच कोणाची तरी दृष्ट लागली.. अभिमन्यू ५ वर्षाचा असताना त्याच्या आईच्या नर्व्ह सिस्टिमवर काही इन्फेक्शनमुळे परिणाम झाला. हातापायाच्या संवेदना हळूहळू कमी होत गेल्या. जवळपास १० वर्षे अंथरुणात झोपून व कधीतरी व्हीलचेअरवर बसून त्या काम करायच्या. अभिमन्यूच्या बाबांनी अतिशय संयमाने त्यांचे सर्व काही केले. एके दिवशी हार्ट अटॅकने पहाटेच अभिमन्यूची आई देवाघरी गेली. अभिमन्यू त्या वेळी नुकताच दहावीला गेला होता. लहानपणीच आईच्या झालेल्या या अवस्थेमुळे लहान वयातच तो प्रौढ झाला होता. वडिलांबरोबरच आईची सेवा करणे, घरातली कामे करणे या सगळ्यांमुळे नकळतपणे एक जबाबदारीचे ओझे वाहू लागला होता. दहावीला बोर्डात येऊन त्याने नाव कमावले. बारावीची बोर्डाची परीक्षा झाली आणि पुढे कॉम्प्युटर इंजीनियरिंग करायचे, हे त्याने पक्के ठरवले होते. आणि..
‘तो’ दिवस उजाडला, जेव्हा त्याचे बाबा त्याच्यासमोर ‘ती’ला’ घेऊन आले. त्या दिवशी अभिमन्यू क्लासवरून घरी आला, तेव्हा बाबांच्या ऑफिसमधले त्याचे लाडके जाधवकाका, बाबा आणि ‘ती’ सोफ्यावर बसले होते. जाधवकाका अभिमन्यूला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि ऑफिसात असलेली ‘ती’ आणि त्याचे बाबा यांचे लग्न लावून देणे कसे योग्य आहे व त्यासाठी अभिमन्यूने कोणताही आकस मनात न ठेवता परवानगी द्यावी, हे त्यांनी पटवून दिले. अभिमन्यूसाठी हा जबरदस्त धक्का होता. कारण त्याच्या वडिलांनी त्याला वेळोवेळी सांगितले होते की त्यांचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे व तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु वास्तवात जे होत होते, ते मात्र त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. कारण कितीही झाले, तरी त्याचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होते. शिवाय तिला जो शारीरिक त्रास सहन करावा लागत होता, त्याबद्दलही त्याच्या मनात प्रचंड सहानुभूती होती. असे असताना कुठल्यातरी परक्या स्त्रीला आपल्या आईच्या जागी तो कधीही सहन करू शकत नव्हता. कुठेतरी आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये अडसर ठरत आहोत, अशी त्याची भावना झाली. जाधवकाकांचे बोलणे संपल्यानंतर तो हॉलमध्ये आला आणि वडिलांना त्याने या लग्नाला आपली काही हरकत नाही असे सांगितले. परंतु त्याचबरोबर तो वडिलांना हेदेखील म्हणाला की “तुम्ही जरी माझ्या आईची जागा दुसऱ्या कुणाला दिली असली, तरी मी माझ्या आईची जागा दुसऱ्या कुणालाही कधीही देणार नाही. याबाबत माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका.”
“अभ्या.. अभ्याच ना तू? अरे काय हे? कुठे होतास इतकी वर्ष? कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीस. कधी आलास?” शेजारच्या केशवने मारलेल्या हाकेने अभिमन्यू भूतकाळातल्या आठवणीतून भानावर आला. केशव - अभिमन्यूचा बालपणीचा मित्र. दोघे बोलू लागले. अभिमन्यू उत्तरला,
“अरे हे काय, आत्ताच येतोय.”
“तुला बघून किती बरं वाटलं म्हणून सांगू? चल ना घरी. जेवूनच जा. आईला जेवण करायला सांगतो.” - केशव
“अरे नाही. आत्ताच आलोय. खूप दमलोय मी.” – अभिमन्यू
“आलास तसा आता आहेस ना काही दिवस?” - केशव
“हो. आहे ना.” – अभिमन्यू
“मग असं कर. उद्या सकाळी नाश्त्याला माझ्याकडेच ये. नाही म्हणू नकोस. आईला तुझ्या आवडीची मिसळ करायला सांगतो.”
“ठीक आहे” असं म्हणून अभिमन्यू गाडी आत घेण्यासाठी फाटक उघडायला गेला. फाटकाची कडी काढून आत ढकलताच कुईssss असा आवाज झाला. त्या आवाजाने अंगणातल्या तुळशीत दिवा लावायला आलेली ‘ती’ एकदम थबकली. कोण आले असेल बरे या अशा वेळी? डिकीतील सामान घेऊन हळूहळू पुढे आला, तसे तिला उजेडात स्पष्ट दिसले, अभिमन्यू.. त्याला बघून तिच्या पोटात धस्स झाले. का होणार नाही? ‘ती’, जिला त्याने कधीच कुठल्याच नावाने हाक मारली नव्हती, मुळात ती त्याच्या आयुष्यात कुणीच नव्हती, ती होती चित्रा.. त्याच्या वडिलांची दुसरी बायको!
दारात अभिमन्यूला पाहून चित्रा एकदम स्तब्ध झाली. असे वाटले, दीपकच समोर आहेत की काय! अभिमन्यू अगदी त्याच्या वडिलांवरतीच गेला होता. सरळ नाक, बोलके डोळे, रुबाबदार, देखण्या अभिमन्यूला पाहताच क्षणात तिचे मन भूतकाळात गेले, जेव्हा तिची भेट पहिल्यांदा दीपकबरोबर झाली. एका ट्रेनिंगमध्ये ते दोघे बरोबर होते. खरे तर एकाच बँकेत काम करत असले, तरी चित्रा वेगळ्या गावाहून तिथे आलेली आणि दीपक वेगळ्या गावाहून. परंतु दोघांनीही बँकेत कर्ज प्रकरणे उत्तम रितीने हाताळली असल्यामुळे त्या प्रशिक्षणामध्ये सगळ्यात जास्त अनुभव या दोघांनी मांडले. साहजिकच प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील त्यांच्या आपापसात चर्चा होत राहिल्या. प्रशिक्षण चांगले बारा दिवस होते. या काळात त्यांची आपापसात अतिशय चांगली ओळख झाली. प्रशिक्षणानंतरही कामानिमित्त एकमेकांच्या संपर्कात राहिले. खरे तर चित्रा ४५ वर्षाची झाली, तरी अविवाहित होती. काही विशिष्ट शारीरिक दोषांमुळे ती मूल जन्माला घालण्यास सक्षम नव्हती. चित्राला दोन मोठे भाऊ होते, तर आई शिक्षिका आणि वडीलदेखील प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांनी चित्राला लग्न कर म्हणून खूप समुपदेशन केले. परंतु सुखवस्तू कुटुंबात असलेल्या, भरल्या घरात चित्राला अजिबात एकटेपणा जाणवला नाही व लग्नाची गरजही भासली नाही. परंतु अचानक हार्ट अटॅकचे निमित्त झाले आणि चित्राचे वडील गेले. पाठोपाठ एक-दोन वर्षात आईदेखील गेली. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात मग्न असल्यामुळे चित्राला आता मात्र प्रचंड एकटेपणा व पोरकेपणा जाणवू लागला. आणि तेव्हाच तिची बदली दीपकच्या शाखेत झाली. तसे दीपक आणि तिच्यात जवळजवळ आठ वर्षाचे अंतर होते. नुकतेच त्याच्या पत्नीचे निधन झाले होते, हे तिच्या कानावर आले होते. ऑफिसमधल्या स्टाफने दोघांनाही एकमेकांबद्दल सुचवले व लग्नाचा विचार करण्याबाबत सूचित केले. खरे तर दोघांसाठीही हा निर्णय घेणे खूप अवघड होते. विशेषतः दीपकसाठी. परंतु चित्राचा सहवास त्याला हवाहवासा वाटे. त्याला तिचा सहवास असाच कायमस्वरूपी असावा, असे वाटू लागले होते. शेवटी त्या दिवशी दीपकचे अतिशय जवळचे मित्र व अभिमन्यूचे लाडके जाधवकाका चित्राला आणि सगळ्यांना घरी घेऊन गेले आणि त्यांनी अभिमन्यूला समजावले. त्यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
खरे तर लग्नाचे कळल्यापासून अभिमन्यू त्याच्या वडिलांशी तुटक वागू लागला. त्यामुळे दीपक अतिशय दडपणाखाली आले होते. लग्नानंतर अभिमन्यू बरोबरचे नाते सुधारेल अशी चित्राला आशा होती. परंतु अभिमन्यूने मात्र तिच्यात आणि स्वतःमध्ये अदृश्य लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. सुरुवातीला तिने अभिमन्यूशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीलाच वडील नाहीत हे पाहून एकदा त्याने “माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नको व मी पुन्हा आठवण करून देतो, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नको” असे तिला स्पष्ट सांगून टाकले. लवकरच त्याने आयआयटी चेन्नईमध्ये निवड झाल्याचे सांगून चेन्नईला जाणार असल्याचे सांगितले. मुलाची आयआयटीमध्ये निवड झाल्याचा दीपकला अतिशय अभिमान होता. परंतु मुलगा लांब जाणार याचे दुःखही वाटू लागले. हे सगळे तो मुद्दाम तर करत नाही ना? असाही त्याला संशय आला. एकदा रात्री दीपक अभिमन्यूशी बोलायला गेला.
त्याला म्हणाला, “बरेच दिवसात आपण कुठे फिरायला गेलो नाही. आता कुठे जरा रिलॅक्स होतो असे वाटत होते, तेवढ्यात तूही निघालास. मी काय म्हणतो, आपण सगळे जण एखादा हिल स्टेशनला चार-पाच दिवस जाऊन येऊ या का?”
त्यावर अभिमन्यू म्हणाला “माझ्यासाठी माझे कुटुंब म्हणजे तुम्हीच आहात. मी आधीच स्पष्ट केले आहे की मला या सगळ्यात उगाच ओढू नका. तुम्ही तुमची काळजी घ्या. तिचीही काळजी घ्या. माझी काळजी करू नका. तुम्ही जर मला सोडायला आलात तर मला बरे वाटेल. तेवढेच आपले काही चांगले क्षण सोबत घालवता येतील. हिल स्टेशनला जाण्याऐवजी तुम्ही माझ्यासोबत चेन्नईला या.”
त्यावर दीपक म्हणाला, “ठीक आहे मग. काही हरकत नाही सगळेच मिळून चेन्नईला जाऊ.” त्यावर अभिमन्यू तोडत म्हणाला, “सगळे नाही, फक्त मी व तुम्ही.” निराश मनाने दीपक खोलीच्या बाहेर आला. चित्राच्या कानावर हा सगळा संवाद पडला होता. दीपक आणि अभिमन्यू चेन्नईला निघून गेले. जाताना अभिमन्यूने चित्राला ‘बाय’देखील केले नाही.
“आत येऊ ना?” अभिमन्यूच्या प्रश्नाने ती भानावर आली. इतका वेळ आपण दारातच त्याची वाट अडवून उभे आहोत, हे लक्षात येतात ती ओशाळली. दारातून बाजूला झाली. अभिमन्यू हॉलमध्ये आला. सगळीकडे नजर टाकून घर न्याहाळू लागला. चित्रा म्हणाली “फ्रेश हो. तोपर्यंत मी चहा टाकते.” अभिमन्यू म्हणाला, “नको जेवायची वेळ झाली आहे. मी जेवेनच आता. काही केले असेल तर वाढ. नाहीतर मी फ्रेश होऊन वरण-भाताचा कुकर लावतो.” चित्राने पटकन डाळ-तांदळाची खिचडी केली व पोह्याचे पापड तळून घेतले. खरे तर तिने स्वतःसाठी थालीपीठाचा एक गोळा तयार करून ठेवला होता. त्याचे एक थालीपीठ तिने लावले. अभिमन्यू फ्रेश होईपर्यंत गरम गरम थालीपीठ, दही, त्याच्या आवडीचे आंब्याचे लोणचे आणि गरम गरम खिचडी भात आणि पोह्याचे पापड असा मेनू तयार करून समोर ठेवला होता. आपल्या आवडीचे जेवण समोर पाहताच अभिमन्यूची भूक चाळवली. चार घास जास्तच खाल्ले त्याने. तेवढ्यात त्याचे लक्ष चित्राच्या ताटाकडे गेले. तिने केवळ डाळ-तांदळाची खिचडी खाल्ली. तिचे जेवण संपले होते व ती अभिमन्यूच्या समाधानाने भरलेल्या चेहऱ्याकडेच पाहत होती. अभिमन्यूला जरा लाजल्यासारखे झाले. संपूर्ण जेवण होईपर्यंत त्याला ती शेजारी आहे याचेदेखील भान राहिले नव्हते. खूप दिवसांनी घरचे जेवण जेवून तो खरे तर तृप्त झाला होता. ओशाळून तो चित्राला म्हणाला, “छान झालं होतं थालीपीठ. तू नाही घेतलं?” चित्रा म्हणाली, “अरे मी माझ्यापुरता एकच गोळा तयार केला होता. तू आवरून येईपर्यंत थोडाच वेळ होता. त्यामुळे डाळ-तांदळाची खिचडी टाकण्यात वेळ गेला. राहू दे. काही हरकत नाही. मी तर नेहमीच खाते. खूप दिवसानंतर आपल्या आपल्या पद्धतीचं जेवण बरं वाटलं असेल तुला. जेवण आवडलं, हे महत्त्वाचं.”
जेवणानंतर अभिमन्यू शतपावली करत होता. चित्राने त्याच्या हातावर त्याच्या आवडीचे बडीशेप,धना डाळ, ओवा व जवसाचे मिश्रण ठेवले. अभिमन्यू झोपायला गेला, तशी चित्रा मात्र खूप अस्वस्थ झाली.
का आला असेल अभिमन्यू? किती दिवस राहणार असेल? पुन्हा त्याच्या डोक्यात ही वास्तू विकायचा विचार तर आला नसेल ना? झोपताना चित्राच्या मनात हेच विचार घोळू लागले. पुन्हा एकदा जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. आयआयटीमधील शिक्षण चालू असतानाच त्याची गौरीशी ओळख झाली. तीदेखील कॉम्प्युटर इंजीनियर. एकाच वर्गात दोघेही शिकत असताना त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तिच्याशी लवकरच लग्न करणार असल्याचे अभिमन्यूने दीपकला फोनवरून सांगितले. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर अभिमन्यूला आणि गौरीला अतिशय चांगले पॅकेज मिळाले आणि दोघांनीही लग्न करून परदेशात स्थायिक व्हायचे ठरवले. गौरीचे बाबा आंध्र प्रदेशमधील व्यावसायिक होते. त्यांना अभिमन्यू जावई म्हणून पसंत होता. लग्नाची बोलणी करायला म्हणून चित्रा आणि दीपक मद्रासला जायला निघाले. अभिमन्यूसाठी त्याचे आवडते पदार्थ चित्राने अतिशय निगुतीने बनवून सोबत घेतले होते. शिवाय गौरीच्या घरी देण्यासाठीसुद्धा सोबत चांगला आहेर आणि मिठाई सोबत घेतली होती. पण नियतीला हे सगळे काही मान्य नव्हते. प्रवासातच दीपकना हार्ट अटॅक आला आणि दीपक हे जग सोडून गेले. गाडीतील प्रवाशांनी आणि टीसीने चित्राला लगतच्या येणाऱ्या स्थानकात उतरवून डॉक्टरांचे उपचार मिळवून देण्यास मदत केली होती. परंतु दीपकचे प्राण वाचू शकले नाहीत. चित्रासाठी हा जबरदस्त धक्का होता. तिला खरे तर काय चालले आहे आणि काय करावे हेच सुचत नव्हते. आपल्या वडिलांचे निधन झालेले कळताच अभिमन्यू धावत पळत घटनास्थळी आला. मग पुढचे सगळे सोपस्कार पार पडले. अभिमन्यूला खरे तर वडिलांच्या निधनाचा जबरदस्त धक्का बसला होता. दीपकचा मृतदेह पाहून तो धाय मोकलून रडत होता. चित्राला आता स्वतःला सावरावे की त्याला सावरावे हेच कळत नव्हते. चित्राने त्याही परिस्थितीत त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवून त्याला सावरायचा प्रयत्न केला, परंतु अभिमन्यूने तीच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. बारावे-चौदाव्याचे सोपस्कार पार पडेपर्यंत घरात भेटायला येणाऱ्या माणसांची नुसती रीघ लागली होती.
एका दिवशी संध्याकाळी बाबांचे जवळचे मित्र जाधवकाका घरी आले. “आता पुढे काय काय आणि कसे करणार आहेस?” असा प्रश्न त्यांनी अभिमन्यूला विचारला. त्याही परिस्थितीत अभिमन्यू सरळ म्हणाला की “मी परदेशात स्थायिक व्हायचे ठरवले आहे. त्यामुळे इथे जी काही मालमत्ता आहे, त्याचा निपटारा करून जावे असा विचार करत आहे.” हे ऐकताच जाधवकाकांना मात्र धक्का बसला. ते म्हणाले “अरे, काय बोलतोस हे अभिमन्यू? अरे, हे तुमचं पूर्वापार चालत आलेलं व तूझ्या बाबांनी कष्टाने बांधलेलं घर आहे. ही सगळी मालमत्ता विकायची म्हणतोस आणि मग चित्राचं काय?” त्यावर चित्र पटकन म्हणाली, “माझी नोकरी आहे. पेन्शनही मिळणार आहे. माझी जबाबदारी घेण्यास मी समर्थ आहे. पण अभिमन्यू, एक गोष्ट मात्र तुला मला सांगायची आहे. दीपक मला म्हणाले होते की काहीही झालं तरी हे घरटं अभिमन्यूसाठी कायम असंच राहिलं पाहिजे. त्याला जेव्हा कधी मायेची, आधाराची गरज असेल, त्या वेळी मी मायेने बांधलेलं हे घरटं त्याला ऊब देण्याचं काम करेल. त्यामुळे हे जे घरटं मी बांधून ठेवलेलं आहे, ते तसंच राखण्याची जबाबदारी तुझी आहे. अभिमन्यू, मला काही या घराचा मोह नाही. परंतु घर विकण्याची दीपकची कधीही इच्छा नव्हती. तुला जर वाटत असेल की मी या घरात राहू नये, तर मी इथून जवळच दुसरीकडे फ्लॅट घेऊन राहीन. फक्त मेंटेन करण्यासाठी या घरी कोणालातरी ठेवू या. परंतु हे घर विकण्याची त्यांची कधीही इच्छा नव्हती.” “मग काय प्रश्नच मिटला. तुला या घरात राहायचं असेल तितके दिवस राहा. आता बाबांनीच सांगितलं आहे म्हटल्यावर विषय संपला” असे म्हणून अभिमन्यूने तो विषय तिथेच तोडला. “काका, बाबांनी माझ्यासाठी ज्या काही एफडी आणि सेविंग ठेवलेल्या आहेत, त्या मला हव्या आहेत. परदेशी संसार थाटताना कामी येतील. उद्या मला थोडा वेळ द्या, मी बँकेत येतो” असे म्हणून तो तेथून निघून गेला. जाधवकाका अतिशय स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. चित्राला कळून चुकले की दीपकशी लग्न करताना तटस्थ वाटणारा अभिमन्यू चित्राबद्दल मनात कमालीचा तिरस्कार व द्वेष बाळगून होता. त्याच्या आयुष्यात तिला कुठेही स्थान नव्हते.
त्यानंतर महिनाभरातच जाधवकाकांना त्याने फोन करून लग्नाचे आमंत्रण दिले. लग्न मद्रासला होते. परंतु चित्राला मात्र त्याने फोन केला नव्हता. जाधवकाकांनी चित्राला जाण्याच्या नियोजनाबद्दल विचारले, त्या वेळी चित्राने याबद्दल अभिमन्यूने काहीही कल्पना दिली नसल्याचे सांगितल्यावर जाधव काका संतापले. त्यांनी फोन करून अभिमन्यूची चांगलीच शाळा घेतली. त्याचा परिणाम म्हणून असेल, अभिमन्यूने अगदी चार दिवस आधी लग्नाची पत्रिका चित्राला बँकेच्या पत्त्यावर पाठवून दिली. जाधवकाका कमालीचे नाराज झाले. त्यांनी चित्राला “मी काही अभिमन्यूच्या लग्नाला जाणार नाही” असेच स्पष्ट सांगितले आणि चित्रालाही जाऊ नकोस असे बजावले. परंतु चित्राने मात्र लग्नाला जायचे ठरवले. तिने तातडीने एका ट्रॅव्हल एजंटला गाठून मुंबईहून विमानाची सोय व बँकेच्या गेस्ट हाउसवर राहण्याची सोय करून घेतली आणि ती तातडीने मद्रासला निघाली. खरे तर आयुष्यात पहिल्यांदाच विमानप्रवास करण्याचे धाडस ती करत होती. परंतु दीपकने दिलेली एक जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्यामुळे तिने मोठ्या धाडसाने मद्रासपर्यंत प्रवास करण्याचे ठरवले.
ज्या वेळी ती लग्नात पोहोचली, त्या वेळी तिच्या ओळखीचे तिथे कोणीही नव्हते. तिने पुढे जाऊन अभिमन्यूला आपण आल्याचे हात करून दाखवले. अभिमन्यूने फक्त ओळखीचे भाव दाखवले व बसून घेण्याची खूण केली. परंतु कुठेही बोलावून मुलीच्या नातेवाइकांची ओळख वगैरे काहीही करून दिली नाही. कुठल्याही विधींमध्ये तिला बोलावलेदेखील नाही. लग्न पार पडले व रिसेप्शन चालू झाले. नवरा-बायकोला अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. शेवटी रात्रीचे अकरा वाजले, तशी चित्रा उठली आणि अभिमन्यूचा निरोप घेण्यासाठी त्याच्याजवळ गेली. ती जवळ येताच अभिमन्यूला आता मात्र बायकोशी तिची ओळख करून देणे भाग होते. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ तिला स्पष्ट दिसत होता. चित्रानेच पुढाकार घेऊन त्याचा गोंधळ दूर केला. ती गौरीला म्हणाली “मी चित्रा, अभिमन्यूच्या बाबांशी दुसरी बायको.” गौरी लगेच पाया पडण्यासाठी खाली वाकली. चित्राने मात्र तिला “अग राहू दे, राहू दे” म्हणून उभे केले. “सुखाचा संसार करा. एकमेकांना अतिशय चांगली साथ द्या” असे म्हणून मनापासून आशीर्वाद दिला. अभिमन्यू म्हणाला, “खूप उशीर झाला आहे. तू कुठे थांबली आहेस? तुला सोडायला गाडी पाठवतो.” गौरी म्हणाली, “अरे, एवढ्या रात्री त्या कशाला त्यांच्या रूमवर जातील? इथे आपल्यासोबतच राहतील. उद्या आणखी काही विधी होणार आहेत” असे म्हणताच अभिमन्यूने थोड्या रागानेच तिच्याकडे पाहिले, हे चित्राच्या लक्षात आले. त्यावर चित्राने तिला “नाही ग. मला पहाटेच्या विमानाने निघायचे आहे” असे म्हणत तिच्या हातात एक पिशवी ठेवली. त्या पिशवीत दागिन्यांचा डबा होता. “हे काय आहे? आम्हाला तुझ्याकडून दागिने वगैरे काहीही नको.” अभिमन्यू जरा नाराजीनेच म्हणाला.
“नाही अभिमन्यू. हे दागिने तुझ्या आईचेच आहेत. तुझ्या बाबांनी जपून ठेवले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की काहीही झालं, तरी हे दागिने मी लग्नामध्ये माझ्या सुनेकडे सोपवणार आहे. खरं तर हे मी आधीच तुझ्याकडे द्यायला हवं होतं. पण उशिरा का होईना, या गोष्टी मी गौरीकडे पोहोचवू शकले, याचं समाधान आहे. खरं तर यासाठीच मी इथे आले असं म्हटलं, तरी चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा! आणि हो, नाशिकला गावी नक्की या. ते तुमच्या दोघांचं हक्काचं घर आहे. शेवटी मी काय, फक्त तेथील राखणदार..” असे म्हणून ती तिथून निघून आली.
त्यानंतर मात्र चित्राने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. कितीही झाले, तरी ती एक स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान स्त्री होती. दीपक गेल्यापासून अभिमन्यूकडून तिला अगदी मुलासारखी नाही., परंतु एक माणूस म्हणूनदेखील चांगली वागणूक मिळाली नव्हती. नाही म्हटले, तरी आता तिची ‘सहनशक्ती’देखील दुखावली गेली होती. इतके का आपण वाईट वागलो आहोत त्याच्याशी? का या मुलाला आपल्याबद्दल इतका राग आहे? याचे तिला राहून राहून आश्चर्य आणि दुःख वाटत राहिले. ठरल्याप्रमाणे अभिमन्यू परदेशी निघून गेला, तो परत आलाच नाही. त्यानेही कधीही स्वतःहोऊन चित्राला फोन केला नाही. त्याच्याबद्दलच्या बातम्या कुणाकडून तिच्या कानावर यायच्या. त्यात अभिमन्यूला मुलगा झाल्याचे कानावर आले होते. परंतु तिने स्वतःहोऊन त्याच्याशी संपर्क साधण्याचा जराही प्रयत्न केला नाही. दीपकला दिलेला शब्द पूर्ण करायचा, या भावनेने ती नाशिकजवळचे घर मात्र मनापासून चांगले राखून होती. तिनेही मनाशी ठरवले होते, जेव्हा कधी अभिमन्यू स्वतःहोऊन तिच्याकडे येईल, तेव्हा मात्र कोणतीही अढी मनात न बाळगता त्याच्याशी नीट वागायचे.
कालांतराने चित्रा सेवानिवृत्त झाली. तशी ती अतिशय हरहुन्नरी स्त्री होती. चित्रकला, नृत्य,योग, वेगवेगळे पदार्थ करणे, बागकाम या सगळ्यांमध्ये ती निपुण होती. सेवानिवृत्तीनंतर तिने घराच्या अंगणामध्ये योग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पैसा मिळवणे हा त्यामागचा हेतू नव्हता. तिचा त्यामध्ये छान वेळ जायचा. शिवाय काही माणसे सतत ये-जा करायची, त्यामुळे तिलाही प्रसन्न वाटायचे. काळानुसार ती योगाचे कौशल्य वाढवण्यासाठी हृषीकेशलाही जाऊन आली. तिथे तिने योगाचे आणखी पुढचे आधुनिक प्रशिक्षण घेतले. ध्यानधारणा, योग या सर्वांचा तिने अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला आणि आता ती घरामध्ये याचे वर्ग घेऊ लागली होती.
अभिमन्यू राहायला येऊन आता आठ-दहा दिवस झाले होते. रोज सकाळी तो चित्राचा योगाचा क्लास चालू असायचा ते दुरुनच पाहत राही. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण केले की तो त्याच्या वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन बसे आणि त्यांचे जुने फोटो,रेकॉर्डिंग्स असे काही पाहत राही. संध्याकाळ झाली की जवळच्या देवळामध्ये जाऊन बसे आणि थेट रात्री जेवणाच्या वेळी परत येई. चित्राला मात्र त्याचे वागणे बुचकाळ्यात टाकत होते. याला काहीही विचारले तरी तो दुखावला जाऊ नये, याचीही तिला काळजी वाटत होती. आल्यापासून त्यांचेही कामापुरतेच बोलणे होत होते. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे अभिमन्यू स्वतःहोऊन तिला “माझं जेवायला करत जा. खायला हे करत जा” असे सांगत होता, हे विशेष! अन्यथा पूर्वीइतकादेखील तो संवाद तिच्याशी साधत नसे. शेवटी हिंमत करून एकदा रात्री जेवता जेवता तिने अभिमन्यूला विचारले, “एक बोलू का?”
“काय?” अभिमन्यू ने विचारले
“मला माहीत आहे. तुला असं विचारलेलं कदाचित आवडणार नाही. सहज म्हणून विचारत आहे. तू बरा आहेस ना? तुझं सगळं ठीक चालल आहे ना?”
अभिमन्यूचा हातातला घास तसाच हातात राहिला. डोळे भरून आले आणि अश्रू टप टप गालावरून ओघळू लागते. चित्रा अतिशय घाबरली.
“काय झालं अभिमन्यू? मी काही चुकीचं बोलले का? हे बघ, तुला दुखवायचं असं काही माझ्या मनात नव्हतं. फक्त सहज म्हणून मी तुला विचारलं. प्लीज, मला माफ कर. आपण यावर काहीच नको बोलायला. तू जेव आधी. प्लीज” म्हणून तिने त्याच्या हातातला घास त्याला भरवला व त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. अभिमन्यूला आणखीनच वाईट वाटले. त्याने शांतपणे जेवण संपवले आणि तो व्हरांड्याच्या पायऱ्यांवर जाऊन बसला. चित्रा तिथे बडीशेप घेऊन आली. ती त्यांची स्पेशल बडीशेप बघताच त्याला पुन्हा एकदा त्याच्या आईची तीव्रतेने आठवण झाली आणि त्याचे डोळे पुन्हा भरून आले. चित्राचा जीव गलबला. “अभिमन्यू, सॉरी, मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं. मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल?” अभिमन्यू - “नाही ग. तू खरंच सॉरी म्हणू नकोस. मला सांग, मी तुझ्या योगा क्लासेसला जॉइन होऊ का? मला शिकवशील का ते सगळं?”
चित्राला अतिशय आनंद झाला “का नाही शिकवणार? नक्की शिकवेन आणि मला आनंदच आहे. मी तुला उद्या सकाळी लवकर उठवते.” चित्राला खूप आश्चर्य वाटले. अभिमन्यू क्लास जॉइन करतो म्हणतोय, म्हणजे त्याला जाण्याची काहीही घाई नाहीये. याच्या जॉबचे काय? आल्यापासून त्याच्या बायकोचा एकदाही फोन आला नाही. अर्थात आपल्यासमोर आला नाही. माघारी आला असेल तर काय माहीत? एक ना असंख्य प्रश्न तिच्या मनात उभे राहिले. याबद्दल त्याला आताच काहीही विचारायचे नाही व जोपर्यंत तो स्वतःहोऊन काही सांगत नाही, तोपर्यंत शांत राहायचे तिने ठरवले. अभिमन्यूने आता सकाळी उठून योग करणे सुरू केले. सकाळी एक तास योग व त्यानंतर ध्यान या सगळ्यांची त्याला सवय लागली आणि त्याला जरा बरे वाटू लागले. तो आता अधिक आनंदी राहू लागला. चित्राशी मोकळेपणाने बोलू लागला. दोनच महिन्यांमध्ये त्याच्या वागणुकीत आधीपेक्षा बराच बदल झालेला चित्राला दिसला. एके दिवशी तो चित्राला म्हणाला की त्याला आता योगामध्ये आणखी पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यावर चित्राने त्याला हृषीकेशला जायचा सल्ला दिला. तिने जिथून याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते, तिथेच अभिमन्यूची जाण्याची व्यवस्था केली.
अभिमन्यू तिथे तीन महिने राहून आला. दरम्यान तो तिला वरचेवर फोन करून त्याच्या प्रशिक्षणाबद्दल चर्चा करीत असे. अभिमन्यू आता बराच मनमोकळा झाला होता. आल्यापासून तो तिथल्या कोर्सबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल चित्राशी भरभरून बोलत होता. तिथे पाठवल्याबद्दल त्याने चित्राचे आभारी मानले. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हृषीकेशमधून येताना त्याने चित्रासाठी लाल रंगाची एक सुंदर उबदार शाल भेट म्हणून आणली होती. चित्रासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. पण त्याहीपेक्षा मोठा धक्का अभिमन्यूने तिला हे सांगून दिला की यापुढे तो कायमचा इथेच राहणार आहे आणि ऑनलाइन योगाचे क्लासेस घेणार आहे. ऑनलाइन क्लासेस घेणार म्हटल्यानंतर चित्राने त्याला विचारले की “मग तुझ्या अमेरिकेतल्या जॉबचे काय? आणि मग गौरीचे व तुझ्या मुलाचे काय? आल्यापासून बघतेय तू त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीस.”
अभिमन्यू शांतपणे म्हणाला “आमचा घटस्फोट झाला आहे. गौरी मला सोडून गेली. खरं म्हणजे लग्नानंतरच आमच्यात फार काही सुरळीत सुरू नव्हतं. मला एका कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सहचारणीची गरज होती. परंतु गौरी अतिशय महत्त्वाकांक्षी स्त्री होती. कॉलेजमध्ये प्रेमात असताना या सगळ्या गोष्टींचा मी फार काही विचार केला नाही. परंतु लग्न झाल्यानंतर मात्र मला कुटुंब जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. गौरीचं घरात अजिबातच लक्ष नसायचं. त्यामुळे मला घरातली जबाबदारी जास्त घ्यायला लागली. यावरूनही तिचे माझे वाद व्हायला लागले. मला मूल हवं होतं, आम्ही लवकर चान्स घेतला. माझा मुलगा आठ महिन्याचा असताना गौरीला लंडनमध्ये एक असाइन्मेंट आली आणि गौरी चिरागला -आमच्या मुलाला घेऊन लंडनला गेली.तिने लंडनला प्रोजेक्टवर जाणं मला नको होतं. परंतु ती हट्टाने तिकडे निघून गेली. आमचे लोंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झालं. तिथे प्रोजेक्टमधील एका सहकार्याबरोबर तिचं अफेअर सुरू झालं. मला या सगळ्याची कल्पना फार उशिरा आली. मी जेव्हा तिला तिकडे भेटायला गेलो, तेव्हा सर्व गोष्टी हाताबाहेर निघून गेल्या होत्या. माझा मुलगादेखील माझ्याजवळ आला नाही. तो तिच्या बॉयफ्रेंडबरोबर खूप खूश होता. त्या दिवशी खरं म्हणजे मला जीव द्यावासा वाटला. पण त्याच वेळी आपलीच मुलं जेव्हा जाणता किंवा अजाणताही दु:ख देतात, तेव्हा बाप म्हणून काय वाटतं याची पहिल्यांदाच जाणीव झाली. मला बाबांची खूप आठवण आली. त्यांना शेवटी शेवटी काय वाटलं असेल असंही वाटून गेलं. मी त्या वेळी खूप निराश झालो होतो. त्या वेळी असं वाटलं की बाबाच मला यातून बाहेर काढू शकतील, म्हणून मी घरी परत आलो. मला आठवतंय तू म्हणाली होतीस, जेव्हा कधी मला माझ्या घरट्यात परत यावंसं वाटेल, त्या वेळी हे घर होतं तसंच राहायला पाहिजे. खरं सांगतो, त्या दिवशी गेटमधून आत पाऊल टाकताना तू हे घर मला त्या वेळी विकू दिलं नाहीस, याबद्दल मी तुझे लाखभर तरी आभार मानले. आता योगामुळे, ध्यानधारणेमुळे माझं मन बरंच स्थिर झालं आहे. मी माझ्या चुकांकडे आता तटस्थपणे पाहू शकतो. जे काही झालं, त्यात माझ्याही चुका होत्या, हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. जे झालं ते मी काही बदलू शकणार नाही. पण आता इथून पुढे तरी मला पैशापेक्षा मनःशांतीला जास्त महत्त्व द्यायचं आहे. माझ्या या कामात तू मला मदत करशील ना?”
चित्राने त्याला या कामात पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. दोघांनीही लवकरच एक चांगले ॲप तयार केले आणि त्याद्वारे ऑनलाइन क्लासची नोंदणी सुरू केली. चित्रा नेहमीप्रमाणे अंगणात जमेल तितक्या आजूबाजूच्या लोकांचे क्लासेस घेत होती. परंतु अभिमन्यूने मात्र लवकरच ऑनलाइन क्षेत्रात जम बसवला. चित्रा आणि त्याने स्वतःचे यूट्यूब चॅनलदेखील सुरू केले. त्यामध्ये तो चित्राचे व त्याचे योगविषयक आणि जीवनशैलीविषयक अनेक व्हिडिओज टाकू लागला. खरे तर चित्राला शूट जमत नव्हते. पण AIचा वापर करून अभिमन्यूने चित्राचे छान व्हिडिओ बनवले. जेव्हा तिने ते व्हिडिओ पाहिले, तेव्हा आपण स्वप्न तर पाहत नाही ना.. तिला आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने पुन्हा एकदा व्हिडिओ तपासला. हे कसे शक्य आहे? व्हीडिओ तर खरा वाटत होता. तिला काही कळेना. आनंदाने ती अभिमन्यूला म्हणाली “हे, हे तू कसं काय केलं? हा व्हिडिओ…?” त्यावर अभिमन्यू म्हणाला, “आता एक नवीन तंत्रज्ञान आले आहे - कृत्रिम बुद्धिमत्ता - आर्टीफीशिअल इंटेलिजन्स. आत्ताच्या काळात एआयमुळे असे व्हिडिओ बनवणं सहज शक्य आहे. मी तुझे फोटो व काही फूटेज घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे. तंत्रज्ञान हे शेवटी आपण त्याचा कसा उपयोग करतो यावर अवलंबून आहे.”
पारंपरिक कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञान अशा दोन पिढ्यांच्या एकत्रीकरणातून जन्माला आलेल्या त्यांच्या चॅनलला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला.
एके दिवशी असेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर अभिमन्यू आणि चित्रा अंगणात गप्पा मारत बसले होते. आपल्या नव्या ऑनलाइन क्लासेसच्या व यूट्यूब चॅनेलच्या यशामुळे अभिमन्यू अतिशय खूश होता. त्याने चित्राला विचारले, “मी आल्यापासून पाहतोय तू घरात अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली आहेस. या सगळ्या झाडांची तू खूप छान काळजी घेतेस. माझी आई जशी बनवायची, तशी अनेक चूर्ण,काढे व तेल तू बनवतेस व आजूबाजूच्या लोकांना देतेस. हे तू कधी आणि कुठे शिकलीस?”
“अरे, मलातरी कुठे काय येत होतं? हे तुझ्या आईनेच पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. ते पाहून तुझे बाबा घरात करायचे. त्यांनीच मला हे सगळं शिकवलं.”
“बाबांनी तुला शिकवलं?” अभिमन्यूला आश्चर्य वाटले.
“हो. अरे. ते म्हणायचे तुझी आई खूप हुशार होती. आयुर्वेदाचा अभ्यास करून तिने अनेक काढे,चूर्ण पुस्तकात लिहून ठेवली आहेत. तुझे बाबा तिला मदत करत हे शिकले. हे ज्ञान वाया जाता कामा नये, त्यामुळे तुझ्या आईने ज्या पद्धतीने हे घर ठेवलं आहे, तसंच हे घर कायम ठेवशील असं वचनच त्यांनी माझ्याकडून घेतलं होतं. म्हणून तर ही जी बडीशेप तुझी आई करायची, तशीच मीही करायला लागले. तुझ्या बाबांनी मला वेगवेगळे काढे, चूर्ण करायला शिकवलं. आम्ही दोघांनी मिळून घरीच औषधी वनस्पती अंगणात लावल्या.” चित्रा म्हणाली.
“बाबा तुझ्याशी आईबद्दल बोलायचे, तेव्हा तुला ऑकवर्ड व्हायचं नाही का?”
हसून चित्रा म्हणाली, “आम्हा दोघांना? आम्ही ‘दोघं’ असे होतोच कधी? आम्ही नेहमीच ‘चौघं’ होतो.” अभिमन्यूला काही कळेना, “म्हणजे?”
“अरे, म्हणजे तुझे बाबा आणि मी बोलायला लागलो, की ते नेहमीच तुझी आई आणि तुझ्याबद्दलच बोलत राहायचे. त्यांचं तुझ्या आईवर अतिशय प्रेम होतं. तुम्ही त्यांचं जगच होता म्हणाना. आमच्या दोघांची भेट ट्रेनिंगमध्ये झाली. तेव्हाही तुझे बाबा तुमच्या दोघांबद्दलच बोलत राहायचे. त्यांचं त्यांच्या कुटुंबावर किती प्रेम होतं, त्याची मला पुरती जाणीव लग्न करताना होती. आणि मीदेखील हे वास्तव स्वीकारलं होतं की त्यांच्या संभाषणातून तुम्हाला दोघांना वेगळं करता येणं शक्य नाही. खरं तर मला त्याची कधी आवश्यकताही वाटली नाही. ज्या वेळी मी दीपकला स्वीकारलं, त्याच वेळी तुझी आई आणि तू यांनादेखील स्वीकारलं होतं आणि कदाचित त्यामुळेच त्यांना माझ्यासोबत राहताना, वावरताना, बोलताना कधीही अवघडलेपणा आला नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही तुझ्या लहानपणीच्या, आईच्या आणि त्यांच्या आठवणी सांगत राहायचे. मलाही ते सर्व ऐकताना अतिशय छान वाटायचं. कारण ते सांगत असताना तुझ्या वडिलांच्या डोळ्यात जे समाधान आणि प्रेम दिसायचं, त्याने मी सुखावून जायचे. त्यांचं एक स्वप्न होतं. अर्थात त्यांनी ते तुझ्या आईबरोबर पाहिलं होतं. जेव्हा कधी नातवंड होईल, तेव्हा सर्वात आधी ते दीपकना हातात घ्यायचं होतं. तुझी आई त्यांना यावरून खूप चिडवायची. कारण दीपकना तुझ्या जन्मानंतर तुला हातात घेता आलं नव्हतं. त्या वेळी ते बँकेच्या कामाच्या निमित्ताने कुठेतरी लांब गेले होते. मला एकदा म्हणाले होते, त्यांनी तुझ्या आईबरोबर पाहिलेलं स्वप्न तर पूर्ण होणार नाही. परंतु आपण मात्र अभिमन्यूला बाळ झाल्यानंतर नक्की जाऊ. मला त्या बाळाला हातात घेतलं, तर अभिमन्यूला हातात घेता आलं नाही, ही सल भरून निघेल. पण दुर्दैवाने त्यांचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही.” चित्राचे डोळे भरून आले आणि तिने अनावर झालेला आवंढा गिळून स्वतःचा भावनावेग आवरला.
अभिमन्यूलादेखील हे सगळे ऐकून अतिशय वाईट वाटले. आपण चित्राबद्दल किती वाईट ग्रह करून घेतला, किती वाईट वागत राहिलो हिच्याशी. परंतु हिच्या मनात मात्र आपल्याबद्दल कोणतीही अढी नाही. इतके सगळे होऊनही बाबांशी किती प्रामाणिक आहे. त्यांच्यावर किती प्रेम करते. केवळ बाबांना दिलेल्या शब्दाखातर तिने हे घर माझ्यासाठी जसे आहे तसे ठेवले आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊन त्याला अतिशय शरमिंदे वाटले.पुढच्या दोन दिवसातच चित्राचा वाढदिवस होता. त्याने आपल्या मनाशी काही निश्चय केला आणि झोपायला गेला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चित्रा नेहमीप्रमाणे उठली. दोघांनीही आपापले क्लासेस घेतले. अभिमन्यू दिवसभर बाहेरच राहिला आणि रात्री उशिरा घरी आला. दोघांनीही मिळून जेवण केले आणि आपापल्या खोलीत झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तिने फोन तपासला. त्यात अभिमन्यूने केलेला मेसेज तिला दिसला. त्यांने एक व्हिडिओ पाठवला होता. व्हिडिओमध्ये तिला दिसले की, डॉक्टर एक छोटेसे बाळ घेऊन बाहेर येतात आणि “काँग्रॅच्युलेशन्स मिस्टर अभिमन्यू, इट्स अ बेबी बॉय” असे म्हणतात. अभिमन्यू, दीपक व चित्रा आनंदाने डॉक्टरांजवळ जातात आणि अभिमन्यू ते बाळ दीपकला हातात घ्यायला सांगतो.. दीपक त्या बाळाला उचलून घेतात. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर अपार आनंद दिसत असतो. तो व्हीडिओ पाहून चित्राला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात मागून अभिमन्युचा आवाज आला, “मला माफ कर. मी बाबांना सॉरी म्हणू शकलो नाही. पण आज तुझ्या रूपाने दोघांचीही माफी मागतो. तू सांगितलंस म्हणून बाबांची ही इच्छा आज पूर्ण करू शकलो. मनावरचं किती मोठं ओझं आज दूर झालं माझ्या. तू तूझ्या मायेच्या उबेने बाबांचं हे घरटं नेहमी उबदार ठेवलंस. खरं सांगतो, आज मी जिवंत आहे तो फक्त या घरट्यात मिळालेल्या उबेमुळे. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे आई.. वाढदिवसाचं हे गिफ्ट तुला कसं वाटलं?” चित्राच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शेवटी अभिमन्यूने तिला ‘आई’ म्हणून स्वीकारलेच.. आज उशिरा का होईना, खऱ्या अर्थाने चित्राला आणि अभिमन्यूला आपापले ‘घरटे’ मिळाले होते!
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 8:01 pm | कंजूस
आवडली कथा.
21 Oct 2025 - 11:01 am | श्वेता२४
तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला.
21 Oct 2025 - 12:27 pm | गोरगावलेकर
कथेतील भावना इतक्या वास्तव वाटल्या की डोळे पाणावले.
22 Oct 2025 - 10:42 am | श्वेता२४
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
22 Oct 2025 - 11:32 am | कर्नलतपस्वी
यांची जागा दुसर्या कुणीही घेतलेली मुलं सहजा सहजी स्विकारत नाहीत. तसेच नविन व्यक्तीला सुद्धा त्याने ज्याची जागा भरून काढली आहे त्या व्यक्तीचे अस्तित्व आपल्या आसपास सतत जाणवत असते.
महाभारतकालात कानन संतती सहज स्वीकारार्ह होती.
तडजोड आहे. गाठ पडणार आणी खुणा टोचत रहाणार.
समाजात सर्वत्र असे अनुभव दिसतात.
आजकाल घटस्फोट प्रकरण वाढल्यामुळे यात आणखीनच भर पडली आहे.
कथा आवडली हे वेगळे सांगावयास नकोच.
22 Oct 2025 - 3:52 pm | स्वधर्म
आई हा प्रत्येकाचा खास हळवा कोपरा असतो. कथा वाचताना 'आई' हा शब्द कधी येतोय याची वाट पहात होतो. तो शेवटी आला!
एकदा सुरूवात केल्यावर वाचतच राहिलो. आणखी लिहा.
22 Oct 2025 - 5:33 pm | श्वेता२४
आपल्याला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद!!
23 Oct 2025 - 11:49 am | चोपदार
परिचयातील लोकांच्या अशा काही घटना पाहिल्या आहेत. एका घटनेमध्ये सहज स्वीकार झाला, तर दुसऱ्या नातेवाईकांच्यात अगदीच तणाव नसला तरी पूर्ण स्वीकृती देखील नाही अशी परिस्थिती. कथेचा सकारात्मक शेवट अतिशय आवडला. भावुक करणारी कथा आहे.
24 Oct 2025 - 11:31 am | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
24 Oct 2025 - 11:55 am | निमी
खूप छान झाली आहे कथा.. मनाचा इतका मोठेपणा आणि उदारता आली पाहिजे..
25 Oct 2025 - 5:56 pm | श्वेता२४
आपल्याला कथा आवडली हे वाचून आनंद झाला.
26 Oct 2025 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा आवडली. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
26 Oct 2025 - 5:04 pm | श्वेता२४
तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. आपले प्रोत्साहन माझ्यासाठी मोलाचे आहे. मनापासून धन्यवाद ...
27 Oct 2025 - 5:34 am | चित्रगुप्त
कथा खूप आवडली. कथेत काळानुसार घडून येणार्या विविध बदलांचा, घटनांचा विस्तृत पट हळूहळू उलगडत जातो आणि कथा नवनवीन वळणे घेत अधिकाधिक समृद्ध होत जाते हे फार आवडले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करता येणारी निर्मिती आणि तिची व्यावहारिक, भावनिक उपयोगिता हे तर खासच. अशाच अनेकानेक कथा लिहीत रहा. अनेक आभार.
27 Oct 2025 - 10:37 am | श्वेता२४
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण कथेतील बारीक-सारीक तपशीलही नमुद केले आहेत. तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. पाठीवर कौतुकाची थाप पडली की लिखाणाला हुरूप व जबाबदारीची जाणीव होते. याचबरोबर कथेतील उणीवा/सुधारणा/सूचना यांचेही स्वागत आहे, जेणेकरून पुढील लेखनात चुका टाळता येतील....सर्वांचे आभार
27 Oct 2025 - 4:38 pm | सुधीर कांदळकर
मनातली अढी, सल, नातेसंबंधातला भावनिक ताण छान रेखाटले आहे. कथेचा प्लॉटही छान. कथेबद्दल धन्यवाद.
27 Oct 2025 - 8:57 pm | सस्नेह
छान सकारात्मक कथा !
29 Oct 2025 - 11:33 am | श्वेता२४
आपणास कथा आवडली हे वाचून आनंद झाला. प्रतिसादासाठी धन्यवाद....
30 Oct 2025 - 12:43 pm | श्वेता व्यास
कथा मस्तच आहे, रडवलंत खूप वाचताना.
आणखी कथा येउद्यात :)
30 Oct 2025 - 5:29 pm | श्वेता२४
आपण दिलेल्या प्रोत्साहनकरिता मनापासून आभारी आहे..
2 Dec 2025 - 11:26 am | कुमार१
कथा आवडली
4 Dec 2025 - 1:26 pm | श्वेता२४
आपल्याला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. मनापासून धन्यवाद सर.