मेघालय हे ईशान्य भारतातील सात बहिणी (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा) या राज्यांतील नितांतसुंदर निसर्ग लाभलेले एक राज्य. हिरवेगार डोंगर, जंगले, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, नद्या, धबधबे, खनिजसंपत्ती आणि अनोखी पारंपरिक संस्कृती लाभलेले हे राज्य 'ढगांचे निवासस्थान' म्हणून ओळखले जाते.
मेघालयच्या उत्तर-ईशान्य बाजूस आसामचे खोरे, तर दक्षिणेस बांगला देशाचा सखल प्रांत. भौगोलिकदृष्ट्या खासी, जैंतिया आणि गारो हिल्स अशा तीन भागांत मेघालयची विभागणी होते. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश येथे आले, त्यापूर्वी या भूभागांवर खासी, जैंती आणि गारो या स्थानिक जमातींची सत्ता होती. ऐतिहासिकदृष्ट्या या प्रदेशाची जास्त माहिती मिळत नाही. स्वातंत्र्यानंतर मेघालय हा आसामचा भाग होता. तथापि १९६०मध्ये जेव्हा आसामीला राज्याची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा या प्रदेशातील स्थानिक गटांमध्ये वेगळ्या राज्यासाठी आंदोलन सुरू झाले. २१ जानेवारी १९७२ रोजी शिलॉंग ही राजधानी असलेल्या मेघालय राज्याची स्थापना झाली.
येथे मातृसत्ताक पद्धती असून वारसा हक्काने मोठा वाटा लहान मुलीकडे जातो. असे असले, तरी प्रत्यक्षात आजही वडिलांनाच कुटुंबप्रमुखाचे सन्माननीय स्थान असते.
दोन वर्षांपूर्वी केलेल्या सहलीचा वृत्तान्त लिहिण्यास काही कारणाने उशीर झाला. तरीही फोटोंवरची वेळ, काही नोंदी, आंतरजालावरील माहिती व काही आठवणी मिळून हा लेख लिहायचा एक प्रयत्न.
सहलीचा दिवस उजाडला आणि मुंबईहून निघणारे प्रवासी टिळकनगर टर्मिनसला दाखल झालो.
या वेळी सहलीत माझी अकरा महिन्यांची नातही सामील होणार होती. लांब पल्ल्याचा प्रवास, थंडीचे दिवस, त्यात डोंगराळ आणि उंचावरच्या प्रदेशातली मोठी सहल हे एक आव्हानच होते.
गाडी वेळेवर निघाली. उरलेले पर्यटक जळगावहून गाडीत बसले. स्मिरासाठी वरच्या दोन बर्थला बांधून साडीची झोळी तयार केली.
जवळपास २६०० कि.मी. व ४५ तासांचा प्रवास करून गाडी पहाटे चारला कामाख्या येथे पोहोचली. आमच्या पुढील प्रवासासाठी ठरवलेल्या गाड्या सकाळी सातला येणार होत्या. रात्री आठ ते सकाळी आठ अशा १२ तासांसाठी स्टेशनलाच IRCTCच्या पाच AC खोल्या आधीच राखून ठेवल्या होत्या. तेथे फलाटावरूनच पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरील या खोल्यांकडे जाता येते. दोन तास आराम केला.
पहाटेचे कामाख्या रेल्वे स्टेशन आणि परिसर
साडेसहालाच स्टेशनच्या स्टॉलवर चहा घेतला आणि गाडीवाल्याला फोन केला.
एक सतरा सीटर ट्रॅव्हलर आणि आणि एक स्विफ्ट डिझायर अशा दोन गाड्या घेऊन सारथी दुर्गादास आणि 'बिष्णु' हजर होते. मोठी सहल असल्याने आणि महिलांची संख्या जास्त असल्याने कपड्यांच्या बॅगा वाढल्या होत्या. त्यातच टपावर सामान लादण्यास मेघालायमध्ये बंदी असल्याचे सांगण्यात आले होते, म्हणून गाडीतच सर्व सामान ठेवायचे होते. याच कारणाने एक जास्तीची गाडी करावी लागली.
कामाख्या स्टेशन
रेल्वे स्टेशनहून निघालो. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या एका बाजूचा भाग मेघालायमध्ये, तर दुसरा भाग आसाममध्ये असल्याचे कळले.
एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि नंतर शिलॉंगच्या रस्त्याला लागलो.
साधारण सव्वाशे कि.मी.च्या प्रवासाला तीन तास लागतात. पण आम्हाला वाटेत काही ठिकाणे बघत जायचे असल्याने वेळ लागणार होता. शिलॉंगच्या आधी साधारण १५-२० कि.मी.वर असणारे 'उमिअम लेक' हे ठिकाण पर्यटक मेघालय सहलीच्या सुरुवातीलाच करतात किंवा सहलीच्या शेवटी. १९६०च्या दशकात वीजनिर्मितीच्या उद्देशाने उमिअम नदीवर धरण बांधले गेले व त्यामुळेच हा कृत्रिम तलाव तयार झाला, जेथे जलक्रीडेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उमिअम लेकला जास्त पाणी असल्याने बडापानी म्हणजेच 'बारापानी' असेही म्हणतात. आज कुणीतरी मोठा नेता काही कार्यक्रमानिमित्त तेथे भेट देणार असल्याने आज तिकडे जाण्यास मज्जाव असल्याचे कळले. रस्त्यावरच्या व्ह्यू पॉइंटहूनच तलावाचे दर्शन घेतले. खूप मनोहर दृश्य होते.
थोड्याच वेळात शिलॉंगमध्ये दाखल झालो. शिलॉंग ही मेघालयची राजधानी असून धबधबे व डोंगर-दऱ्या वगैरेने खूप समृद्ध आहे .
हॉटेलवर जायच्या आधी आणखी एक ठिकाण पाहायचे ठरले, ते म्हणजे 'डॉन बॉस्को म्युझियम'. षटकोनी आकाराच्या सात मजली इमारतीत हे म्युझिअम साकारले आहे. हे ईशान्य भारताच्या आदिवासी संस्कृतीचे व जीवनशैलीचे दर्शन घडवते. येथे १७ गॅलऱ्या असून प्रत्येकीत ईशान्य भारतातील वेगवेगळ्या आदिवासी जमातींची जीवनशैली दाखवलेली आहे .
संग्रहालय पाहून स्मिराने तोंडात बोटेच घातली!
इमारतीच्या वर स्काय वॉक आहे व येथून शिलॉंग शहर व डोंगररांगांचे अप्रतिम दृश्य दिसते.
म्युझिअम बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले. आता हॉटेलवर निघालो.
आज भटकंतीचा दुसरा दिवस. सकाळचा नाश्ता आटोपून निघालो शिलॉंगपासून २५ कि.मी.वरील 'मावफ्लांग'' (Mawphlang) हे पवित्र वन किंवा देवराई पाहायला. मावफ्लांग हे दोन शब्दांचे मिश्रण असून मॉव म्हणजे दगड आणि फ्लांग म्हणजे गवत. याचाच अर्थ गवताळ दगडांची जमीन किंवा शेवाळाने झाकलेला दगड. ही देवराई खासी जमातीच्या धार्मिक श्रद्धा-परंपरांशी जोडलेली आहे. शेकडो वर्षे जुनी ओक, रुद्राक्ष, रॉडोडेंड्रॉन,औषधी झाडी, झुडुपे या वनराईत आढळतात .
जंगलाच्या प्रवेश ठिकाणी मोनोलिथ आहे.
स्थानिक गाइड येथील प्रथा, दंतकथा वगैरे सांगत जंगल दाखवतात. स्थानिक लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे प्राण्यांचा बळी देत.
असे मानले जात असे की बिबट्याचे दर्शन झाले, तर विधी करणे शुभ (गावाचे रक्षण करण्यासाठी देवता बिबट्याचे रूप घेतो, अशी समजूत ) व सापाचे दर्शन झाले, तर ते अशुभ मानून विधी रद्द केला जात असे .
जंगलातील धार्मिक विधीची जागा
येथील सोनेरी गवतावर थोडा वेळ विसावलो.
स्मिरा तर या खासी हिल्समध्ये खूपच बागडली.
खूप आल्हाददायक वातावरण होते आजचे. देवराई फिरून परत शिलॉंगकडे निघालो. वाटेत एक धबधबा पाहिला. शिलॉंगपासून १२ कि.मी.वर असलेला या धबधब्याचे नाव आहे 'एलिफंट फॉल'. ब्रिटिश काळात या धबधब्याच्या शेजारी हत्तीच्या आकाराचा एक खडक होता, यावरून धबधब्याला हे नाव मिळाले. पुढे भूकंपात हा दगड नष्ट झाला, पण नाव तेच राहिले. धबधबा तीन टप्प्यात खाली कोसळतो. धबधबा पाहण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरत खाली जावे लागते.
पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो, पण हिवाळ्यात तो खूप कमी असतो.
पुढचे ठिकाण कॅथोलिक कॅथेड्रल चर्च म्हणजेच 'Cathedral of Mary Help of Christians'.
सन १९३६मध्ये बांधकाम झालेले हे चर्च ईशान्य भारतातील एक प्रसिद्ध चर्च म्हणून ओळखले जाते. चर्चचे बांधकाम गॉथिक शैलीत असून निळसर रंगात ते खूप सुंदर भासते.
आम्ही फक्त बाहेरूनच एक नजर टाकून पुढच्या ठिकाणास भेट देण्यासाठी निघालो. रस्त्यात फूटपाथवर ठिकठिकाणी खायच्या पानांची विक्री दिसली. मेघालय राज्यात 'क्वाय' म्हणजेच पान, सुपारी आणि चुना यांचा संगम. पानात ओली सुपारी वापरली जाते (मेघालयच्या काही भागात सुपारीचे खूप उत्पादन होत असल्याने). खासी, जैंतिया आणि गारो जमातींमध्ये पाहुण्यांचे स्वागत करताना 'क्वाय' देणे ही आदर आणि आपुलकी दाखवण्याची पारंपरिक प्रथा आहे. आम्ही खाऊन पहिले हे पान. थोडीशी चक्कर आल्यासारखे वाटले होते.
वॉर्ड्स लेक
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला व ब्रिटिश काळात तयार झालेला हा एक कृत्रिम तलाव आहे.
शिलॉंगचे मुख्य आयुक्त सर विल्यम वॉर्ड यांच्या नावावरून हा तलाव वॉर्ड्स लेक म्हणूनओळखला जाऊ लागला. तलावाच्या आवतीभोवती सुंदर बगिचा असून त्यात रंगीबेरंगी फुले, दगडी पायवाटा आहेत.
तलावाच्या मध्यावर एक सुंदर लाकडी पूल आहे.
संध्याकाळ झाली. तलावाजवळच असलेल्या 'पोलीस बाजार' भागात थोडीशी पायी भटकंती केली. पोलीस बाजार ही एक गजबजलेली बाजारपेठ व चौक आहे. ब्रिटिश काळात शिलॉंग ही आसाम प्रांताची राजधानी होती, तेव्हा या भागात पोलीस मुख्यालय व पोलीस निवासस्थाने होती. या परिसरात बाजारपेठ विकसित झाल्याने यास पोलीस बाजार हे नाव पडले. खरेदी करावे असे काही वाटले नाही. थोडेसे भटकून हॉटेलवर परत आलो.
शिलॉंग मुक्कामात आमचे जेनीरा (Janeira) हे जवळपास बहुतेक सर्व महिला कर्मचारी असलेले हॉटेल. उत्कृष्ट जेवण, चांगल्या खोल्या, उत्तम सेवा.
आज भटकंतीचा तिसरा दिवस. पोटभर नाश्ता करून बाहेर पडलो.
आजचे पहिले ठिकाण शिलॉंग पीक. शिलाँग शहरापासून १०-१२ कि.मी.वरील हे ठिकाण शिलॉंगमधील सर्वात उंच ठिकाण आहे. खासी जमातीच्या 'लेई शिलॉंग' या देवतेच्या नावावरून शहरास शिलॉंग हे नाव पडल्याचे कळते. त्यामुळेच या ठिकाणाला पर्यटनाबरोबरच धार्मिक श्रद्धेचीही जोड आहे. शिलॉंग पीक येथे भारतीय हवाई दलाचे रडार स्टेशन असल्याने ओळखपत्र दाखवूनच प्रवेश मिळतो. आपल्या गाड्या ठरावीक अंतरावर ठेवून तेथील नेमून दिलेल्या गाड्यांमधूनच पुढे जाता येते.
येथून शिलॉंग शहर, हिरवेगार डोंगर याचे विहंगम दृश्य दिसते.
येथे पारंपरिक कपडे घालून फोटोची सुविधाही मिळते. स्त्रियांचे कपडे - जैनसेम (Jainsem) व धारा (Dhara), तर पुरुषांचे कपडे - जिमफॉंग (Jymphong) व धोतर (Dhoti).
येथून पुढे निघालो शिलॉंगपासून २५-३० कि.मी.वरील पूर्व खासी टेकड्यांच्या 'लेटलुम कॅन्यन' (Laitlum Canyon) या ठिकाणास भेट द्यायला. खासी भाषेत Laitlum या शब्दाचा अर्थ डोंगराचा शेवट असा होतो. डोंगराच्या शेवटच्या टोकाला कडेकडेने चालण्यासाठी एक सुंदर मार्ग बनवला आहे. येथे डोंगराच्या कड्यावर उभे राहिले की खोल दरी, हिरवेगार डोंगर नजरेस पडतात.
आज आम्हाला पश्चिम जैंतिया टेकड्यांमधील जोवाई या ठिकाणी मुक्कामी जायचे असल्याने वाटेतील नार्तियांग मोनोलिथ्स (Nartiang Monoliths) पाहणार होतो. नार्तियांग हे जैंतिया हिल्समधील सर्वात जुन्या गावांपैकी एक. जैंतियापूर (आता बांगला देश ) ही जैंतिया राजाची राजधानी होती. उष्णतेपासून वाचण्यासाठी नार्तियांग ही त्यांची उन्हाळी राजधानी असल्याचे वाचनात आले.
जोवाईपासून २४ कि.मी.वरील या ठिकाणी अखंड दगडांचे उंच स्तंभ आणि कमी उंचीची टेबलच्या किंवा बाकाच्या आकाराच्या दगडी रचना दिसतात, ज्याला स्थानिक मोनोलिथ असे म्हणतात. काही स्तंभ ३० फुटापेक्षाही उंच आहेत. उभे दगड पुरुष स्मृती व आडवे दगड मादी स्मृती दर्शवतात.
हे मेघालयमधील / आशियामधील सर्वात मोठे मोनोलिथ स्थळ मानले जाते. १५००-१६०० या काळात राजा गारो वंशातील लोकांनी आणि जयंतिया प्रमुखांनी याची निर्मिती केली होती. प्रत्येक दगडी स्तंभ काही विशिष्ट व्यक्तीच्या किंवा युद्धाच्या स्मरणार्थ उभारल्याचे समजते. हे स्थळ राज्य वारसा स्थळ म्हणून नोंदवले गेले आहे.
नार्तियांग येथेच दुर्गा मंदिर आहे, जे ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते, मंदिर ५०० वर्षे जुने असून पूर्वी लाकडाचे असल्याचे कळते. नंतर मात्र ते दगडी / सिमेंट-काँक्रीटचे झाले. जयंतिया राजे देवीचे भक्त होते आणि त्यांनी येथे दर वर्षी बळीदान व पूजेची परंपरा ठेवली होती. येथे सतीचा डाव्या मांडीचा भाग पडल्याचे सांगण्यात येते.
संध्याकाळ झाली आणि आम्ही जोवाई येथील नियोजित मुक्कामस्थळी पोहोचलो.
आजचे हॉटेल 'Jowai Odyssey Stays'. येथे फक्त राहण्याची व्यवस्था आहे. जेवण गेटच्या बाहेरच असलेल्या ढाब्यावर मिळाले. आम्हाला फक्त रात्री अंग टाकण्यापुरती जागा हवी होती. त्या दृष्टीने वाजवी दरात खूप चांगली व्यवस्था.
आज सहलीचा चवथा दिवस. आज डावकी (Dowki)मार्गे सोहरा/चेरापुंजीला पोहोचायचे होते. हॉटेल्सच्या उपलब्धतेनुसार सहलीचा प्लॅन आखल्याने आज थोडा लांबचा व वेळखाऊ कार्यक्रम असणार होता. मेघालयामध्ये बसमधून फिरताना बऱ्याच ठिकाणी दुकानांवर काही आकडा लिहिलेले बोर्ड दिसले. जालावर शोधताना पुढील माहिती मिळाली - मेघालयात 'Teer' नावाची लॉटरी चालते. या दुकानांना तीर काउंटर किंवा तीर हाउस म्हणतात. 'तीर' लॉटरी मेघालय सरकारमान्य आणि नियमनाखालील आहेत. तीर फक्त सट्टा नाही, तो खासी पारंपरिक खेळावर आधारित आहे.
आज पहिले ठिकाण 'क्रांगसूरी फॉल्स'.
उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे हा निर्माण झालेला हा एक सुंदर धबधबा. पाण्यामुळे पायथ्याशी एक सुंदर तलाव निर्माण झाला आहे. धबधबा पाहण्यासाठी जवळपास एक कि.मी. अंतराच्या पायऱ्या उतरत जावे लागते. पण घनदाट जंगल व शांतता यामुळे येथे पोहोचणे हाही एक सुखद अनुभव.
येथून पुढे निघालो डॉवकी/डॉकी (Dowki)साठी.
खासी हिल्समधून उगम पावणारी उमंगोट नदी डावकीमार्गे बांगला देशात जाते.
नदीवर गाड्या जाऊ शकतील असा झुलता पूल आहे, जो 'डावकी ब्रिज' म्हणून ओळखला जातो.
नदीचे पाणी अतिशय स्वच्छ व पारदर्शक आहे. यामुळे नदीचा तळ स्पष्ट दिसतो. येथे बोटिंगची सुविधा असून तो एक सुंदर अनुभव आहे.
आम्हाला सोहरा येथे मुक्कामाला जायचे होते. वाटेत भारत-बांगला देश सीमेवरील कुंपणांजवळ.
सोहरा पोहोचायचच्या आधी डावकीहून १७ कि.मी.वरील मेघालीमधील स्वच्छ गाव 'मावलिनॉंग'ला भेट देण्याचे ठरले. २००३ साली डिस्कव्हर इंडिया मासिकाने 'स्वच्छतेचे आदर्श उदाहरण' म्हणून गौरवले. येथील लिव्हिंग रूट ब्रिज, पॉइंट, गावात फिरताना सुंदर वाटा व ठिकठिणी सुंदर फुले ही येथील काही वैशिष्ट्ये. आम्हाला येथे पोहोचता पोहोचता अंधार झाला. थोडासा फेरफटका मारला व मोबाइलच्या उजेडात झाडांच्या मुळापासून बनवलेल्या 'लिव्हिंग रूट ब्रिज'चे दर्शन घेतले व सोहराकडे निघालो. आज थोडा उशीरच होणार होता.
रस्त्यात एका ठिकाणी रात्रीच्या अंधारात दोन मिनिटे गाडी थांबवली होती. दहा-बारा कि.मी. पुढे आल्यावर कळले की नवऱ्याचा फोन जागेवर नाही व तो थोड्या वेळापूर्वी थांबलो होतो तेथे पडला असावा. जेथे थांबलो, ते ठिकाण लक्षात राहण्यासारखी एखादी खुणही नव्हती. फोन मिळणे कठीणच होते. उशीर झाला असतानाही ड्रायव्हरने बस वळवली. "कोणीही रिंग करू नका, कारण अंधारात फोन चमकला, तर कोणीतरी उचलेल" अशी सगळ्यांना सूचना केली. बरेच मागे आल्यावर "आता रिंग करा" असे सांगितले. रिंगचा आवाज आला नाही. आणखी थोडे मागे आल्यावर परत रिंग केली आणि काय आश्चर्य! दुरूनच रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाइल चमकताना दिसला. चालकाचे आभार मानले व परत वळून आमच्या रिसॉर्टकडे निघालो. कामाची वेळ संपली, तरी तेथील कर्मचारी आमची वाट पाहात थांबले होते. गरम गरम जेवण करून सर्व जण आपापल्या खोलीकडे निघाले.
आज सहलीचा पाचवा दिवस.
चेरापुंजी हे पूर्व खासी हिल्समधील 'पावसाचे शहर' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण. स्थानिक लोक यास 'सोहरा' म्हणून ओळखतात. भरपूर पाऊस असल्याने असंख्य धबधबे, हिरवेगार डोंगर यामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण.
'नॉंगरियाट' (Nongriat) येथील डबलडेकर रूट ब्रिज हे येथील एक मुख्य आकर्षण असले, तरी ग्रूपमधील सर्वांना साडेतीन हजार पायऱ्या उतरून व परत चढून येणे शक्य नव्हते, म्हणून तेथे जाणे रद्द केले. (हेच ते सध्या गाजत असलेले 'हनिमून मर्डर मिस्ट्री' ठिकाण)
रद्द झालेले दुसरे एक ठिकाण म्हणजे भारतातील सर्वात उंच एकसंध धबधबा - 'नोकालिकाई धबधबा' (Nohkalikai Falls). तेथील दोन गावांमध्ये काही कारणावरून तणाव निर्माण झाल्याने जमावबंदी करण्यात आली होती, असे समजले.
आजचे पहिले ठिकाण म्हणजे चेरापुंजीपासून १२ कि.मी.वरील Kynrem Falls (कायनेरम फॉल्स). तीन टप्यात वाहणारा हा धबधबा भारतातील ७वा उंच धबधबा असल्याचा उल्लेख मिळतो. पावसाळ्यात याला खूप पाणी असले, तरी आत्ता पाणी खूपच कमी होते .
तीच गोष्ट सेव्हन सिस्टर्स फॉल्सबद्दलही झाली. सात प्रवाहांमध्ये कोसळणारा हा धबधबा एका व्ह्यू पॉइंटहून खूप सुंदर दिसतो, पण तोही कोरडाच बघणे नशिबी होते.
मॉस्माई गुहा (Mawsmai Cave)
चुनखडीच्या खडकात तयार झालेली ही एक नैसर्गिक गुहा आहे. आतमध्ये खडकांचे वेगवेगळे सुंदर आकार तयार झालेले दिसतात (stalactites आणि stalagmites). लाखो वर्षांपासून झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबांमध्ये विरलेली खनिजे साचत जातात व त्यापासून छताच्या खाली लोंबत्या आकारचे स्तंभ तयार होतात.
'इको पार्क' हे मेघालय टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाने विकसित केलेले सुंदर नैसर्गिक उद्यान आहे. डोंगराच्या कड्यावर वसलेल्या या उद्यानातून बांगला देशचा मैदानी प्रदेश व आजूबाजूच्या डोंगरातील धबधबे दिसतात.
सुंदर फुलांनी बहरलेल्या बागा, झरे, छोट्या-मोठ्यांसाठी खेळण्याची साधने यामुळे फॅमिली पिकनिकसाठी हे एक उत्तम ठिकाण.
थोड वेळ आम्हीही लहान झालो.
ऑरेंज रूट्स (Orange Roots)
सकाळी पोटभर नाश्ता केला होता, तरी चांगली भूक लागली होती. मेघालय पर्यटन विभाग चालवत असलेले ऑरेंज रूट्स (Orange Roots) हॉटेल आम्हाला सुचवण्यात आले. शुद्ध शाकाहारी व चांगला नाश्ता / जेवण मिळाले.
अरवाह गुहा (Arwah Cave)
चुनखडीच्या खडकांपासून तयार झालेली ही गुंफा आहे. भिंतींवर आणि छतावर दिसणारे Fossils हे येथील वैशिष्ट्य. फॉसिल्स म्हणजे 'लाखो वर्षांपूर्वीच्या शिंपले, मासे, समुद्री जिवांचे ठसे. गुहा पाहण्यासाठी काही अंतर चढत चालावे लागते. चालतांना परिसरातील डोंगर-दऱ्यांचे सुंदर दृश्य नजरेस पडत राहते.
आज चांगले धबधबे जरी पाहायला मिळाले नसले, तरी इतर ठिकाणे मात्र आवडली. संध्याकाळी रिसॉर्टला परत आलो. खूप थकलो होतो. मस्त शेकोटी पेटवली. गाण्यांच्या ठेक्यावर फेर धरला. संपूर्ण रिसॉर्ट बुक केले असल्याने आमच्या गोंधळाचा इतर कोणाला त्रास होणार नव्हताच. जेवण करून सर्व आपापल्या खोलीत गेले.
आज सहलीचा सहावा दिवस. येथील मुक्कामातील खूप सुंदर रिसॉर्ट मिळाले होते आम्हाला. अगदी शांत जागा आणि तीसुद्धा डोंगराच्या अगदी एका कड्यावर. कड्याच्या पलीकडे दिसत होता बांगला देशाचा मैदानी प्रदेश.
अजून येथेच राहावे असे वाटत होते, पण निघायला हवे. आज दक्षिण खासी हिल्समधील काही ठिकाणे पाहावयाची होती.
वाटेत जक्रेम गावाजवळ गरम पाण्याचे झरे आहेत, ते ठिकाण पाहिले. 'जक्रेम हॉट स्प्रिंग' म्हणून हे झरे ओळखले जातात. हे ठिकाण पश्चिम जैंतिया हिल्स भागात येते. मुख्य रस्त्यापासून एका छोट्या पण सुंदर वाटेने थोडेसे चालत जावे लागते. पाणी गंधकयुक्त असून त्वचेचे, सांधेदुखीचे आजार बरे होतात असा स्थानिकांचा विश्वास आहे. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी स्नानगृहे आहेत. आजूबाजूचा परिसरही खूपच नयनरम्य आहे.
आता एका रिसॉर्टला थांबायचे होते, पण राहिलेली दोन ठिकाणे पाहूनच संध्याकाळी रिसॉर्टला जाण्याचे ठरले.
पुढचे ठिकाण मावरंगलांग व्ह्यू पॉइंट (Mawranglang View Point)
दक्षिण-पूर्व खासी हिल्समधील मावकिरवतपासून (Mawkyrwat) सुमारे ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. येथून एका सुंदर दरीचे दर्शन होते. दरीतून वाहणार्या 'Rilang River' किंवा 'Wah Rilang' नदीचे रमणीय दृश्य हरखून जावे असेच.
त्यानंतर निघालो आजचे तसेच आमच्या मेघालय सहलीतील शेवटचे पण आठवणीतील एक महत्त्वाचे ठिकाण.
माव्किरदुक मोनोलिथ (हेरिटेज साइट)
दक्षिण खासी हिल्स जिल्ह्यातील Mawkyrduk गावाजवळ हे स्मारक आहे,
या मोनोलिथ वारसा स्थळी अनेक मानवनिर्मित उंच उभे स्तंभ (मेनहिर) वर्तुळाकृती संरचनेत दिसतात, तसेच सपाट दगडी टेबल (डॉमेन्स ) आहेत, ज्यांचा संबंध पुरुष व स्त्रिया स्मृतीशी जोडला जातो. निर्मितीचा काळ निश्चित नसला, तरी १६ ते १९ या शतकातील असू शकतो.
पूर्वजांची पूजा आणि सामाजिक बंध वाढवण्याचे कार्य यामध्ये या स्मारकांचा विशेष वाटा आहे.
ऐतिहासिक व राज्य वारसा स्थळ असूनही येथे खूप कमी पर्यटक दिसले. कदचित वेळ कमी असल्याने पर्यटक फक्त काही प्रसिद्ध पर्यटन स्थळेच पाहत असावेत. बऱ्याच वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या आमच्या ड्रायव्हरनेही या स्थळाला पहिल्यांदाच भेट दिली होती.
सूर्यास्त झाला आणि आम्ही निघालो.
जास्त पर्यटक असणाऱ्या समूहासाठी या भागात हॉटेल / रिसॉर्ट कमीच. तरीही आमची गरज भागू शकेल असे एक सुंदर रिसॉर्ट आम्हाला सापडलेच - 'Nonglang Tai Resort'.
एका तलावाच्या काठी असलेले, अत्यंत वाजवी दर व उत्तम जेवण हे येथील वैशिष्ट्य.
एक जण सकाळी तलावात मासेमारी करीत होता. मीही गळ टाकून पहिला.
याच सहलीत आसाममधील काही ठिकाणे पाहिली, परंतु लेख फक्त मेघालयाशी संबंधित असल्याने येथेच समाप्त करीत आहे.
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 8:19 pm | कंजूस
फारच आवडलं मेघालय.
सूर्यास्ताचा फोटो भारीच. इतरही फोटो झकासच. थोडे वर्णन आणि फोटो या नेहमीच्या पद्धतीने लेख वाचायला मजा आली.
20 Oct 2025 - 11:00 pm | श्वेता२४
मला तुमचे प्रवास वर्णन व भटकंती विषयक लेख वाचायला खूप आवडतात. आताही या लेखामध्ये बरीच नवीन ठिकाणे कळली. तुमच्या भटकंतीच्या लेखामध्ये विस्तृत वर्णन असल्यामुळे प्रवास नियोजन करणे खूप सोयीचे होते. दिवाळी अंकात एकाच लेखामध्ये सर्व काही लिहायचे असल्याने वर्णन आटोपते घेतले आहे असे वाटले. छोटी स्मिरा अगदीच गोड आहे... भविष्यात मी मेघालय भटकंती करणार आहे त्यामुळे हा लेख माझ्यासाठी प्रवास नियोजनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे शक्य झाल्यास तुम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये राहिलात त्यांची नावे व संपर्क क्रमांक देण्याचे विनंती करीत आहे अगदी प्रतिसादात लिहिणे योग्य वाटत नसेल तर कृपया व्य.नि. करावा ही विनंती.
22 Oct 2025 - 11:03 am | किल्लेदार
वाह. सुंदर. मावफ्लँग आणि द्वाकी नदी कधीपासून विशलिस्ट मधे आहे.
23 Oct 2025 - 11:46 am | चोपदार
सर्व फोटोज अतिशय उत्तम आलेले आहेत. वर्णनही छानच. सर्व टूरिस्ट कंपन्या डावखि सोहरा जोवाई इत्यादी भागच दाखवतात. तुम्ही त्याही पलीकडे काही पाहिले आहेत. मेघालयचा गारो भागही पाहण्यासारखा आहे.
24 Oct 2025 - 2:22 pm | गोरगावलेकर
@कंजूस:आपल्याला मेघालय आवडले हे वाचून आनंद झाला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@श्वेता२४:सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. हॉटेल्सची नांवे दिलेली आहेतच.
@किल्लेदार:सुंदरच आहेत ही ठिकाणे. ती बघायची आपली इच्छा लवकरच पूर्ण होवो.
@चोपदार:प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मेघालयमध्ये निसर्ग सौंदर्य भरभरून आहे. थोडी विविधता हवी म्हणून गारो हिल्स रद्द करून शेवटचे तीन दिवस आसाममधील अभयारण्य, ब्रम्हपुत्रेत बोटीतून फेरफटका, मंदिरे इ. सहलीत सामील केले
27 Oct 2025 - 4:52 pm | सुधीर कांदळकर
काही वर्षांपूर्वी उत्तर पूर्व सात राज्यांचा दौरा आखला आणि करोनाचे संकट आले आणि दौरा बारगळला. तेव्हा महाजालावरून माहिती जमवतांना मोहरून गेलो होतो.
या लेखामुळे त्य पर्यटनाची तहान थोडीफार भागली. धन्यवाद.