दिवाळी अंक २०२५ - निसटलेलं आकाश - कथा

SHRIPAD DAMODHAR TEMBEY's picture
SHRIPAD DAMODHA... in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

निसटलेलं आकाश

कोंबडा आरवायच्या खूप अगोदर भैरू उठला होता. बाहेर फटफटायचं होतं, तेव्हाच तो तयार होऊन बसला होता. बाहेर अंगणात झाडाकडे बघणाऱ्या नवऱ्यासमोर परश्याला घेऊन रखमा आली. फडक्यात बांधलेलं भाकरीचं गाठोडं त्याच्यासमोर ठेवत म्हणाली,
"निगता नव्हं!"
"निगायला तर हवंच, पर जीव आत्ताच उडून चाललाय."
"असं म्हणून कसं चालंल? काय बी बोलू नगा. नुसता ऐका अन् पोरीला हिकडं घिऊन या."
"त्येच हाय मनात, आणि तेवढंच करणार हाय."
"मग निगा, रातच्याला परतायचं हाय. ठावं हाय ना?"
भैरूने मन डोलावली. त्याच वेळी परश्याच्या चिमुकला हात त्याच्या हातात आला आणि तो त्याला ओढू लागला. भैरूने परश्याकडं बघितलं. बाहेर जायला मिळाल्याचा आनंद मुलाच्या नजरेतून ओसंडत होता. त्याने भैरूला उत्साह आला. तो उठत म्हणाला,
"सोबतीला लई मोटं माणूस हाय माझ्या."
"पोरासंगं बोलत कवा पायाखालची वाट सरंल, ये कळायचं बी नाय."
"परत न्हाय आलो तर काळजी नगं करूस."
"मुक्कामाला तिथं राहणार?"
"जावयाच्या घरी ? अजाबात न्हाय. वाटत कुठं बी रातच्याला राहीन."
"बरं, निगा आता."
घराबाहेर पडताना बाहेरच्या खोलीत झोपलेल्या मुलाकडे त्याची नजर गेली. गाढ झोपला होता.
भैरूच्या मनात आलं, या परश्याला चौथीनंतर शाळेतून काढलं अन् शेतावर घेतलं, या धाकल्याचं काय?
त्याने आभाळाकडं नजर टाकली.
‘त्यालाच समदी काळजी. म्या तरी कुटवर आन् काय काय बगणार?’
त्याने डोळ्याच्या कडा पुसल्या. रस्त्याला लागला आणि भैरूचा चालण्याचा वेग वाढला.
येळेत पोचावं तवा कुठं रातच्याला परतता येईल.
"ताईला घिऊन यायचं?"
"मग बेसच की."
"का रं?"
"माजी शाळा पुना सुरू होईल."
"कोण म्हणालं असं?"
"आई."
भैरूने चटकन पोराला जवळ घेतलं.
पोराची शाळा सुटून बी आता वरीस व्हईल. तरी बी ते काई त्याच्या मनातून जात न्हाय. शिकायची लई ओढ. अभ्यास बी बक्कळ करणार. पण म्या करू तरी काय? त्याचं गुरुजी बी यिऊन सांगून गेलं. मला काय कळत न्हाय. पोरच हाय माजा. फी माफी असली तरी काय लागतं न्हव? वह्या हायत, पुस्तकं हायत. त्यापायीच पैका कुठून आनू? अन् शेतात काम कोण करणार? शेती कामाला गडी कसा परवडेल?
भैरूने पोराकडे पाहिलं.
इकडेतिकडे बघत तो मजेत पावलं टाकत होता. आता त्याने भैरूचा हातदेखील पकडला नव्हता. स्वतंत्रपणे चालण्याचा त्याचा आविर्भाव भैरूला खूप सुखावून गेला.
या पोराला काय बी करून शिकवायला हवं.
"बापू?"
‘’काय रं ?"
"दाजींशी मी बोलनार न्हाय."
"का?"
"आईने सांगितलंय."
"पर तुज्यासंग तर ते लई गोड बोलतात न्हवं?"
"पर ताईशी? तिच्याशी कुठं चांगलं वागतात?"
त्याच्या या बोलण्याने भैरूला पोराबद्दल कौतुकाचं भरतं आलं.
"आई म्हणाली?"
"व्हय."
"सांगू अपुन त्यासनी, नगा असं वागू म्हनून."
"नगं. तुमी काय बी बोलू नगा. ताईला घिऊन घरी निघू या."
"बरं, तसं करू."
जावयाची समजूत काढायचा भैरूच्या मनातला विचार मात्र या पोराच्या सांगण्याने पार निघून गेला. घरने निघताना बायकोने तसं सांगितलं तरी, सांगून बगू पुना. सुधारलं ही आशा होतीच. बरं, पोरीला एकदा का अशा रितीने घरी आणली की पुन्हा सासरी पाठवणं अवघडच. तीही भीती मनात. पण आता त्या भीतीपेक्षा पोरीची काळजी त्याला वाटू लागली.
'उद्या कायी वंगाळ जालं तर?’
या मनातल्या शंकेने त्याला आणखीन घाबरवून टाकलं.
समोर बघितलं, तर पुढे जाऊन थांबलेला परश्या त्याला हात करून बोलावत होता. चटकन स्वत:ला सावरत त्याला गाठण्यासाठी तो भराभर चालू लागला.
तरीपण थोड्या वेळाने लेकीचा म्हनजे मंगलाचा विचार मनात परत आलाच.
पोरीचं लगीन कसं येळेत झालं. भरल्या घरचं सासर मिळालं. मांडवात काय बी कमी पडू दिलं न्हाय. पर पोरीच्या नशिबात सुख कुठाय? जावईच छंदीफंदी, समदे शौक. पैसा बक्कळ मिळतो आहे. मग आई-बापाचं कोण ऐकणार? त्या बिचाऱ्या माउलीनेच निरोप धाडला, 'या अन् पोरीला घिऊन जा.' कसा सुटायचा ह्यो गुंता? त्यालाच ठाव. सवयीने भैरूने आकाशाकडे बघितलं.
"देवाला काही सांगताय?"
"व्हय."
"ऐकू जातं का त्याला?"
"जातं नव्हं, तू बी सांगून बग. मागशील ते देईल."
"खरंच?"
"लबाड कशापायी बोलंन म्या?"
परश्या लगेच चालता चालता तिथेच थांबला. हात जोडून आकाशाकडे पाहत म्हणाला,
"देवा, शाळेत जावंसं लई वाटतं, काही तरी कर ना!"
सांगून झाल्यावर तो त्याच्या बापूला चिकटला. भैरू चेष्टेने म्हणाला,
"आरं पोरा, मनातल्या मनात सांगायचं."
"पुना सांगू."
"नगं , कळलंय त्याला. त्यो करेल बी."
भैरूचे डोळे भरून आले.
"बापू ह्यो मळा कोणाचा?"
"रावजी पाटलांचा."
"वळखतात तुम्हास्नी?"
"व्हय, मोठी मानसं, वळख ठिवावीच लागते."
परश्या रावजी पाटलांच्या मळ्यातलं वैभव बघण्यात रमून गेला होता.
"पानी आनतूस? हिरीपाशी पंप चालू हाय बग."
"आनतू की."
जेवताना पोराला पाणी लागेल म्हणून त्याच्या आईने प्लास्टिकच्या बाटल्या दिल्या होत्या. त्या त्याच्याकडे देत भैरूने विचारलं, "दमलास का पोरा चालून?"
"न्हाय" असं म्हणत तो पळालादेखील, जणू काय तो ते कृतीनेही दाखवत होता.
आंब्याच्या सावलीखाली भैरू बसला. गारवा अंगाला भिडल्याने त्याला बरं वाटलं. मनदेखील शांत व्हायला सुरुवात झाली होती. त्याने जेवणाचं गाठोडं बाहेर काढून ठेवलं आणि तो परश्याची वाट बघत मळ्याच्या हिरव्यागार रूपाकडे बघत राहिला.
पानी हवं, त्या बिगर कायबी खरं न्हाय. आपली बी इहीर खोल करून घ्यायला हवी. आणखीन बक्कळ पानी मिळंल. आपलं रान तसं मोठं हाय. पर पाऊस पडला तर पीक येणार. आजकाल तो बी नशिबासारखा दडी मारायला शिकला आहे. सगळे लई शिकले, शिकवून बी गेले, पण आपण आणि आपलं नशीब शिकायला तयार नाही.
रुसणाऱ्या नशिबाला नावं ठेवणाऱ्यातला भैरू नव्हता. कष्ट केले की त्याचं फळ देव नक्की देतो, हे त्याचं जगण्याचं सूत्र होतं. त्यामुळे समोर आलेल्या संकटांना, अडचणींना तोंड देतांना किंवा पराभूत झाल्यावरही निराशेचं सावट त्याच्या घरावर दीर्घकाळ टिकून राहात नव्हतं. अर्थात आशा-निराशेचा खेळ थांबणार थोडाच होता. समोर परश्याबरोबर रावजी पाटील येताना दिसले आणि तो आश्चर्याने उठून उभा राहिला.
"राम राम काका."
"राम राम, तुमचा पोरगा हुशार हाय बगा."
भैरू संकोचला, त्याने परश्याकडं बगितलं. त्याच्या हातात पाण्याच्या बाटल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे तो आणखीन गोंधळला. त्याची मन:स्थिती जाणून रावजी पाटील म्हणाले,
"म्या बी आता जेवायलाच बसणार व्हतो. चला तिकडंच, आता आपण संगच बसू."
नाही म्हणता येणं शक्यच नव्हतं. एवढा मोठा माणूस जेवायला बोलावतो हेच विशेष होतं. अर्थात मोठा असला तरी साधा होता. भैरूसारख्यांना तर तो आपल्यापैकीच वाटत होता. तरीही मनावर ओझं हे आलंच.
घरचं आता समदं सांगावं लागणार.
जेवायला बसेपर्यंत एवढा एकच विचार भैरूच्या मनाला त्रास देत होता. पण जेवतांना पोरीची सगळी हकिकत सांगितल्यावर त्याला खूप मोकळं वाटलं. रावजी पाटलांच्या आश्वासनानंतर तर त्याला चांगलाच धीर आला.
"समदं ठावं हाय मले. पर जरा दमाने घ्या. तुमचा जावई नादी हाय, हे खरं असलं तरी कष्टाळू हाय. शेताकडं जायची त्याची वेळ चुकायची नाय. वेळ बगून सांगू आम्ही त्याला. आता मातर पोरीला घराकडं घिऊन जा. ठरवीलयं तसच करा."
जेवणं झाली. भैरू रावजी पाटलांचा निरोप घेऊन उठायला लागला, तसं रावजी पाटलांनी त्याला बसायला सांगितलं. मळ्यातील फळं आणि भाजीपाला देण्यासाठी गड्याला पाठवलं. त्याच्या पाठोपाठ परश्या गेला.
"मनात एक विचार आलाय, बोलू?"
"असं का म्हनतासा? आपण मोठी मानसं. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं."
"तुमच्या पोराला म्हंजी परश्याला हितं राहू द्या. शाळंत घालतो अन् माज्या पोरांसारखा लई मोठा करतो."
"काय म्हनतासा?" भैरूला आश्चर्याचा धक्काच बसला.
"त्याला शाळंची लई ओढ हाय. सांगतांना डोळं भरून आलं त्याचं. हुशार असणारच. त्याचं नुकसान नगं व्हायला."
"इचार करायला हवा. घरी बी बोलायला हवं."
"तुमास्नी ठावं हायच, माजी दोनी पोरं हित येणार नाईत. त्यांची पोरं बी न्हाईत यायची. लेकींच्या पोरांचं बी त्येच हाय. तुमचं पोर राहिलं, तर आमा दोघांना सोबत व्हईल. अन् आमचा बी जीव रमंल."
रावजी बोलायचे थांबले. पण भैरू काहीच बोलला नाही. तसे ते पुन्हा म्हणाले, "पोराला ठेवलं तर आमास्नी दत्तक दिलाय असं समजायचं. सारके यायचं न्हाय, की न्ह्यायचं नाय. म्या सांगावा धाडीन तवाच यायचं. इथं राहिला तर त्याने आमच्या पोरांवानी अव्वल नंबरात यायला हवं."
"ते तर हायच म्हना." एकेक शब्द तोंडातून बाहेर पडताना भैरूला खूपच जड जात होतं.
"परत जातांना थांबा इथं, अन् सांगून जा. तवर म्या बी घरात बोलतो."
निघताना नेहमीसारखा भैरूने परश्याचा हात धरला. तो एवढ्या जोरात पकडला की पोराने कळवळून बापाकडे बघितलं.
बापूच्या डोळ्यात पाणी का बरं? चालतांना परश्याची नजर सारखी त्याचा बापाकडे जात होती.
भैरू आता फक्त चालत होता. बोलत नव्हता. मंगलाचा विचार एकदम मागे पडला होता आणि त्याची जागा रावजी पाटलांच्या बोलण्याने घेतली होती.
काय करावं? ठिवावं का परश्याला हितं? ठिवायलाच हवं. पोराच भलं त्यातच हाय. पर आपलं पोर असं दुसऱ्याकडं ठिवायचं? का? आपल्या हातने त्याची शाळा व्हनार नाय म्हनून? लोक काय म्हनतील? त्याची आये तरी राजी व्हईल? रावजी पाटलांची शिस्त ठाव न्हाय का आपल्याला ! पोरगं तिथं राहील म्हंजे त्याचं जालं. सोताच्या पोरांस्नीबी त्योच कायदा.
भैरूला काहीच सुचेना. त्याचं मन गोंधळून गेलं व्हतं. परत जाताना रावजी पाटलांना निर्णय देऊन जायचं होतं. त्याला एकदम परश्याची आठवण झाली. तो त्याच्या जरा दुरून चालला होता. त्याला कसंसंच वाटलं. त्याच वेळी परश्याने त्याच्याकडे बघितलं. पोराच्या नजरेतले भाव त्याला वेगळेच भासले. त्याच्या मनात आलं,
पोराने रावजी पाटलांवर एवढी कसली जादू केली? कवतुक कराया हवं.
मग तो परश्याजवळ गेला. त्याचा प्रेमाने हात धरला नि त्याला जवळ ओढलं. त्याच्या स्पर्शाची ऊब भैरूला खूप सुखावून गेली.
पोरगं शाळेत गेलं तर रावजी पाटलांच्या मुलांवानी मोठा व्हईल. तसंच व्हायला हवं. रखमेला सांगू, ती पण न्हाय नाय म्हणणार. उरावर धोंडा ठिवायला हवा. तो बाजूच्या झाडाच्या सावलीत गेला. खाली बसला. परश्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि त्याच्याकडे टक लावून बघत राहिला.
या त्याच्या कृत्याने परश्या बावरला. मघाशी त्याने बापूच्या डोळ्यातलं पाणी बघितलं होतं. आता हे बसणं, त्याला काही कळेना.
"पोरा तुजी शाळा बंद केली, लई वंगाळ केलं बग म्या."
बापूच्या डोळ्यातलं पाणी पुसत गोंधळलेल्या परश्याने समजूत मात्र छान काढली.
"असं का म्हणता बापू? शाळेतने मी एकटा का शेतावर आलो? सात पोरं हायती."
"व्हय, पर गुरुजी फकस्त आपल्याच घरी आलं."
‘नंबरात व्हतो नव्हं मी."
"पुना जावसंं वाटतं शाळेत?"
"व्हय, धाडाल?"
परश्याच्या डोळ्यातली चमक भैरूच्या काळजात शिरली.
इचारावं का ह्याला? रावजी पाटील पोरासंगं काही बोललं नसणार. माज्या मनात काय चाललंय हे त्या पोराला कसं कळावं?
बापू काही बोलले नाहीत, यावरून परश्या काय ते समजला आणि हिरमुसला झाला.
‘परश्या’ बापू लाडात आले की अशी हाक मारतात हे पोराला ठाऊक होतं. तो चट्कन मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागला.
"या रावजी पाटीलाला लई वाईट वाटलं."
"कशापायी?"
"तुजी शाळा बंद पडली म्हणून."
परश्याला काही कळेचना. तो गप्प राहिला. पण त्याची उत्सुकता मात्र कमालीची वाढली. ते त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं.
भैरूनेही लगेच महत्त्वाचं सांगून टाकलं.
"तुला शाळंत घालतु, असं रावजींनी सांगितलंय. पर त्यापायी तुला त्यांच्या संग रहायला हवं."
"तुमास्नी सोडून?"
त्याच्या स्वराने भैरू गलबलून गेला. पण खरं ते या वेळीच सांगावं, असं त्याने ठरवलं.
"व्हय पोरा.
शिकायचं तर सर्व सोसायला हवं. माज्या हाताने तुजं शिक्षण होईल असं न्हाय वाटतं. त्यात आता या मंगलाची भानगड उपटली न्हवं."
"तुमची आठवण आली तर भेटाया धाडतील ना ते?"
भैरू आपले सगळं बळ गोळा करत कठोरपणे म्हणाला, "त्या रावजी पाटलांची शिस्त लई कडक हाय. त्ये सांगतील तसं वागायलाच हवं."
यावर परश्या लगेच म्हणाला, "बापू, तुमी सांगाल तसं वागंन मी."
परश्याचं बोलणं ऐकून भैरूतला बापही निर्धास्त झाला.
मंगलाच्या घराचं राहिलेलं थोडंसं अंतर ती दोघं भराभर संपवू लागले.
मंगलाच्या घरी तिचा नवरा नव्हता. तो त्याच्या मित्रांबरोबर गावाला गेला होता. ते एका दृष्टीने बरंच झालं. मंगलाच्या सासू-सासऱ्यांशी तरी मोकळेपणाने बोलता आलं.
मंगला माहेरी जाण्यासाठी तयारच होऊन बसली होती. शेवटी शेवटी भैरूला राहावलच नाही. पोरीच्या या अवस्थेने त्याला रडूच फुटलं.
तशी मंगलाची सासू समजुतीने म्हणाली, "आमाला तरी कुठं चांगलं वाटतंय. लक्ष्मी हाय ती या घरची. तिला जपायला हवं. तुमच्या जावयाला अक्कल येत नाही, तोपर्यंत समद्यांनीच जरा सबुरीने घ्यायला हवं."
परततांना भैरूच्या मनाला त्या भल्या माणसांचाच, सासू-सासऱ्यांचाच आधार होता. हे दिवस जातील. सगळं काही नीट होईल, असं त्यामुळेच तो स्वत:ला समजावत राहिला. त्याला एकदम आठवलं - असा धीर रावजी पाटलांनी बी दिला व्हता.
रावजींची आठवण झाली आणि त्याने परश्याचा विषय मंगलाकडे काढला.
मंगला काय बोलणार? घरची परिस्थिती तिला ठाऊकच होती. त्यात आता तिचा भार पडला होता. ती काळजी वेगळीच, म्हणून तर सासूने दिलेले पैसे ती बरोबर घेऊन आली होती. तरीहि परश्याला रावजी पाटील यांच्याकडे ठेवणं तिला पटेना. पाटील तिच्या सासरी दोन-तीन वेळा येऊन गेले होते. त्याचं परखड बोलणं, कडक शिस्त आणि पंचक्रोशीतील त्यांच्या नावाचा दबदबा हे तिला ठाऊक होतं. आपल्या भावाचं त्यात कल्याणच आहे, हे तिला समजत होतं. हे कळत असलं, तरी असं बेवारश्यासारखं दुसऱ्याच्या घरी ठेवणं तिला कुठतरी खटकत होतं, हे नक्की. मंगलाने तिच्या वडिलांची निर्णय घेण्याबाबतची दोलायमान अवस्था तिने ओळखली आणि म्हणाली,
"आईचं काय म्हणणं हाय ते ऐका अन् मग ठरवा, मला नाय वाटत ती व्हय म्हणल म्हणून."
भैरू यावर पुढे काहीच बोलला नाही.

घरी आल्यावर भैरूने दिवसभरातील सगळी घटना रखमाला सांगितली.
रात्र झाली होती. घरात सगळं शांत. पण रखमाचं मन मात्र एक वादळ झालं होतं. अंगणात झोपलेली होती, चांदण्या बघत होती, पण मनात मात्र केवळ परश्याचं प्रतिबिंब होतं.
“पोरगं दुसऱ्याकडं सोडून येणं म्हणजे काय असतं, हे आईच जाणते. त्याच्या केसात हात फिरवणं, अंग झाकणं, शिळ्या भाकरीतलं पान लपवून ठेवणं.. आता या सगळ्याचं काय?”
ती अलगद उठली. टाक्याचा उशीर पडल्याने, पाठीवरून गार वारा जात होता. पण ती शंभर वेळा परश्याच्या गोष्टी मनात मांडत होती. परश्याचं बालपण तिच्या नजरेसमोरून सरकत होतं. त्याने शाळेतून येऊन एकदा तिच्या मांडीवर डोकं ठेवून विचारलं होतं,
"आई, मी मोठा झाल्यावर तुझ्या शेजारी राहीन का?"
हे परश्याचे शब्द आठवताच रखमाच्या गालावर अश्रू वाहू लागले.
“पोटचा जीव. शाळेत जायला वाटायचं तर, पण नशिबाने परत परत आपला झोका मागे ओढला.”
तिला काल भैरूच्या डोळ्यांतील भाव आठवले. तो काहीच बोलला नव्हता, पण परत येताना त्याच्या चेहऱ्यावरचं ओझं साफ दिसत होतं.
नक्कीच त्यालाही परश्याला तिथे ठेवताना खूप दु:ख झालं असेल. पण परिस्थितीसमोर दोघंही हरलेलो दिसत होते.
रखमा मनातल्या मनात देवाकडे म्हणाली,
"हे देवा, माझ्या लेकराला ताकद दे. त्याला शाळा आवडते, शिकणं आवडतं, त्याच्या पाठीशी रहा. आम्ही दोघं आज कमकुवत झालो आहोत. पण तू तरी मागे राहू नकोस..."
हळूहळू रखमाने ओंजळीत आपले अश्रू टिपले. त्या क्षणी तिने स्वतःशी एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे,
'परश्या परक्याच्या घरी नाही, त्याच्या उज्ज्वल भवितव्याच्या दारी गेला आहे. आता रडून चालणार नाही. शिकवायचं होतं, म्हणून सोडलं.'
रखमाच्या मनात पहिल्यांदा एक 'स्वीकार' उमटला. ती उठून घरात गेली. देवासमोर दिवा पेटवला. त्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. 'आपलं मूल आपल्यापासून दूर गेलं, पण नशिबाकडून काही मोठं घेऊनच येणार आहे.'
दुसऱ्या दिवशी रावजीच्या मळ्यापर्यंत पोहोचेपर्यंत एकच विचार त्याच्या मनात होता आणि तो म्हणजे परश्याचा.
परश्याला रावजीच्या पाटीलच्या बायकोने आत नेलं आणि बाहेर ओसरीवर बसलेल्या रावजी पाटलांनी भैरूला विचारलं,
"काय ठरविलं परश्याबद्दल?"
उन्हाचा कडाका केव्हाच कमी झाला होता. सायंकाळच्या सावल्या हळूहळू गडद होऊ लागल्या होत्या. वारा सुटल्यामुळे हवेतला गारवा शेतातल्या पाण्यामुळे हवाहवासा वाटत होता.
त्या वातावरणातही भैरू गंभीर आणि गप्प होता. रावजी पाटीलांना त्याची मन:स्थिती कळली. ते म्हणाले,
"जाऊ दे, इसरून जा, पोराशी बोललो अन् मनात आलं. शिकवावं त्याला, पर दुसऱ्याचं प्वार असं कसं राहील? मला म्हाताऱ्याला कळायला हवं. सोबतीचा मोह पडला ना!"
रावजी पाटीलांच्या या बोलण्याने भैरू गहिवरला.
"तसं न्हाय पाटील, तुमी योग्य त्येच बोलला, म्याबी."
परंतु त्याला पूर्ण न बोलू देता रावजी पाटील म्हणाले, "फकस्त विचारलं, कितवीत हायस रं पोरा? तर त्याला रडायाच आलं. शाळेत जात न्हाय इतकंच बोलला. त्ये दु:ख बगितलं अन् काळीज लकलकलं. माज्या पोरांची आठवण आली." रावजी पाटील भैरूला आत घेऊन गेले.

जेवतांना परश्याचा विषय कुणी काढला नाही. पण भैरूच्या चेहऱ्यावर त्याचा ताण स्पष्ट दिसत होता. रावजी पाटलांच्या घरी जेवायच्या कल्पनेने तो आधीच आक्रसला होता. सगळं त्यांनी अगोदरच ठरवलेलं होतं. नाही म्हणण्याजोगी परिस्थितीच नव्हती. त्यात मंगलाला माहेरवाशीण म्हणून म्हटल्याने बोलण्यासाठी जमवलेला थोडासा धीरही विरून गेला होता. जेवणं झाली, त्या वेळी चांगलाच अंधार पडला होता. आकाशातल्या चांदण्यांचा उजेड ओसरीवरही आला होता. चंद्राचं पूर्ण बिंब बसल्या ठिकाणाहून दिसत होतं. त्या उजेडात समोर पोहोचण्यासाठी उभी राहिलेली बैलगाडी दिसत होती.

या पाहुणचाराने भैरू आणखीन संकोचला. तसं बघायला गेलं तर सारं काही रितीला धरून होतं. ही रीत त्यांच्याकडं येणाऱ्या प्रत्येकाशी सहजपणे पाळली जात होती. परिसरात ते सर्वांना ठाऊक होतं, म्हणून तर त्यांच्यासाठी रावजी पाटलांचं घर आधारवड होतं. पण याला परश्याचा संदर्भ असल्याने भैरूला त्याचं ओझं वाटतं होतं. घरातल्या या माणुसकीच्या दर्शनाने त्याच्या मनातला विचार मात्र पक्का होत चालला होता.
ओसरीवर रावजी पाटलांच्या मुलांचे फोटो लागले होते. कुणी शाळेच्या, कुणी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं हातात धरून उभं. ते सगळं परश्या अक्षरशः देहभान विसरून बघत होतं. त्याच्या डोळ्यांत एक चमक होती कौतुकाची, आकांक्षेची.
भैरू त्याच्याकडे पाहत राहिला.
पोराच्या मनात काय चाललंय, हे मला वेळेवर समजलं असतं तर.. त्याच्या मनात वेदनेची लहर उमटली.
परश्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, मग थोडं गोंधळलेपण आणि त्याच क्षणी समाधान उमटलं.
आणि पटकन त्याला बिलगला.
भैरूला त्याच्या मिठीतून त्या पोराच्या मनाचं सगळं कळलं.
"हिथं रहायचं म्हणजे लई अभ्यास करावा लागेल. आजा-आजीला तरास अजिबात द्यायचा नाही, घरकामात मदत करावी लागेल, शिस्त पाळावी लागेल." भैरूने सांगितलं.
"सांगाल तसं वागेन बापू," परश्या ठामपणे म्हणाला.
"शहाण्या पोरावानी राहशील ना?"
"हो बापू."
भैरूला त्याच्या मिठीतून त्या पोराच्या मनाचं सगळं कळलं. भैरू त्याच्याकडे पाहत राहिला.
"तुमी परत कवा येनार बापू? आणि आईला संग आननार नव्हं?" तो निरागसपणे विचारत होता.
"कपडे आणायला आईसह लवकरच येऊ." भैरू म्हणाला.
तेवढ्यात रावजी पाटलांनी मध्ये येत भैरूचा हात हातात घेतला.
"आता हा माझा नातू, आहे, मी त्याचा आजा आहे. कपडे-बिपडे नको, सगळं हाय हिथे. फकस्त शाळेचा दाखला घेऊन लवकर या म्हंजी झालं. बाकी आम्ही पाहू."
भैरू परश्याकडे डोळे भरून पाहू लागला. परश्या पाटलांना बिलगत उभा होता. हात हलवत, खळखळून हसत.
ते हसणं, तेवढंच पुरेसं होतं भैरूसाठी. तो किती निरागसपणे बघत होता.
"कपडे आणायला आईसह लवकरच येऊ." स्वत:शीच पुटपुटत भैरू म्हणाला.
बसल्या जागेवरूनच परश्याकडे पाहत राहिला. परश्यानेही दोन्ही हात उंचावून, त्याच्या उजळलेल्या चेहऱ्याने जणू सगळं काही सांगितलं, “बापू, शिकेन मी... मोठा होईन!”
त्या आवाजात जी उत्सुकता होती, त्या नजरेत जी चमक होती, त्याने भैरूचा काळीजच हेलावून गेलं. ओसरीवर रावजींच्या मांडीशेजारी बसलेला परश्या दिसला. डोळ्यात अजूनही तीच चमक, पण चेहऱ्यावर आता एक नव्या जबाबदारीचं हलकंसं सावट होतं.
भैरूच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होती. आपल्या पोराने आपल्याविना मोठं व्हावं, पण हे खरंच हवंय का आपल्याला? की त्याच्या पाठीवरचा हात काढून आपण त्याच्या पाठीवरचा हात काढून जबाबदारी, किंवा आपल्या कर्तव्यापासून दूर पळतोय? आज जो पोरगा परक्या घरात राहतोय, तो उद्या मोठा होऊन आपल्याला ओळखेल ना? की हसत हसत सगळ्यांना आपली गोष्ट सांगेल, की माझ्या बापाने मला दत्तक दिलं होतं?
आभाळाकडे पाहत भैरू मनाशी पुटपुटला, "देवा, माझ्या परश्याला खूप शिकव, पण त्याच्या मनातली माझी जागा कधीच कमी होऊ देऊ नको. पोराला कळायला हवं, त्याचं स्वप्न हे माझंही होतं!"
गावाच्या वाटेवर वळणं घेताना भैरूला परत मागं पाहावंसं वाटलं. पण मनावर दगड ठेवून नाही पाहिलं. कारण, आता मागे पाहणं म्हणजे परश्याच्या भवितव्यावर शंका घेणं होतं. आता त्याच्या मनावर असलेलं ओझं, वजन नक्कीच कमी झालं होतं, कारण त्याच्या पोराचं भवितव्य पक्क्या एका सावलीखाली पोहोचलं होतं.
गाडी नजरेआड झाली, परश्याचे बापू नजरेआड सरले, तशी परश्याला वस्तुस्थितीची जाणीव झाली. रावजी पाटलांनी परश्याला त्याच्या अवघडलेल्या स्थितीतून मोकळं केलं.
"लेकरा मला आजा म्हनतो, म्हंजे तू माझा नातू जाला. नातवंडांच्या कपड्यांनी आतली कपाट भरलंय. आता कसलाबी घोर जीवाला लावून घिऊ नको लेकरा."
रावजी पाटलाच्या घरात वावरतांना परश्याच्या डोळ्यांत कौतुक आणि थोडीशी भीती दोन्ही दिसत होती. होती. इतकं मोठं घर, इतकी माणसं, झगमगणारे दिवे, सगळं त्याच्यासाठी स्वप्नासारखंच होतं. पण आई-वडिलांची उणीव मनात गडद सावलीसारखी बसली होती.
रखमा आणि भैरू निघाले होते, तेव्हा परश्याने त्यांच्या हाताला घट्ट धरलं होतं. “आई, उद्या भेटायला येशील ना?” त्याचा आवाज हलका थरथरत होता. रखमेच्या डोळ्यांतून ओघळ थांबत नव्हता. ती फक्त मान डोलावू शकली. भैरूने मात्र त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ठामपणे म्हटलं, “जा रे बाळा, मन लावून शिक. आम्ही रोज तुझ्यासाठी प्रार्थना करू. हे घर तुझंही आहे.”
रात्र गडद होत गेली. परश्याला त्याच्या झोपण्याची जागा दाखवली गेली. गादी, चादरी, उशा सगळं अगदी स्वच्छ, पांढरं. तो गाडीवर पडला खरा, पण अंगावर चादर असूनही अंगात शिरशिरी उठत होती. आईच्या कुशीतलं ऊबदार आसन आठवत होतं. वडिलांच्या खडबडीत हाताने केलेली डोक्यावरची थाप आठवत होती. खिडकीतून डोकावणाऱ्या आकाशाकडे पाहून त्याला प्रश्न पडला, 'हेच का ते आकाश जे माझ्या आई-बाबांच्या झोपडीतून दिसतं? पण हे इतकं दूर का वाटतंय आज?'
त्याच्या मनात धाकधूक आणि ओढ दाटून आली. एका क्षणी डोळे भरून आले, पण मग पाटलीणबाईंनी येऊन त्याला मायेने अंगावर चादर नीट घातली आणि हळू आवाजात त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, “रडू नकोस बाळा तू. तू शिकून खूप मोठा होशील. तुझं आईबाबांचं नाव उजळवशील.” त्या क्षणी परश्याला जाणवलं, निसटलेलं आकाश कदाचित नवीन आकारात परत मिळू शकेल.
इकडे आपल्या झोपडीत रखमा व भैरूही झोपायचा प्रयत्न करत होते. पण दोघांच्या मनात उचंबळणारे विचार, आठवणींची गर्दी आणि मुलाविना ओस पडलेलं घर. रखमा कुशीला वळून शांतपणे कुजबुजली, “भैरूचे बाबा, आपलं आकाश खरंच निसटलंय.”
भैरू बराच वेळ शांत राहिला. मग थरथरत्या आवाजात म्हणाला, “हो गं, निसटलंय... पण त्या आकाशाखालीच आपला परश्या पंख पसरून उडायला शिकतोय. त्याच्या स्वप्नांसाठी आपण थोडं दु:ख सोसलं तर काय झालं?”
रखमेच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं, पण त्या अश्रूंमध्ये वेगळाच उजेड होता. तिला जाणवलं - मुलासाठी ही वेदना सहन करणं म्हणजेच खरी आईची ताकद आहे .
बाहेर आकाशात तारकांची चांदणी चमकत होती. परश्याच्या खिडकीतून दिसणारं आकाश आणि रखमेच्या झोपडीतून दिसणारं आकाश दोन्ही एकच होतं, फक्त नजरेच्या उंबरठ्यावरचं अंतर वेगळं. पण त्या आकाशाखाली आई, वडील आणि मुलगा तिघेही आपापल्या पद्धतीने एकमेकांशी जोडलेले होते.
'निसटलेलं आकाश' खरं तर हरवलेलं नव्हतंच. ते आता एका नव्या वाटेवर नेत होतं, जिथे परश्याची स्वप्नं, भैरूचा निर्धार आणि रखमेचं ममत्व एकत्र येऊन नवीन क्षितिज तयार करणार होतं.
त्या रात्रीच्या शांततेत, आईबाप झोपडीत आणि मुलगा पाटलांच्या वाड्यात, तिघांच्याही मनात एकच संकल्प उमलत होता - आकाश निसटलं नाही, ते फक्त थोडं दूर गेलंय. आणि लवकरच ते परत आपल्या हातात येणार आहे!
=======================================================
श्रीपाद टेंबे,
मोबाईल – ९१५८०८८०४२
ईमेल- shripad.tembe@gmail.com
पत्ता- ए-३०१,पारिजातक कोऑप.हौ.सोसायटी,
नवश्या मारुती मंदिरा जवळ,
सिंहगड रस्ता,पुणे . ४११०३० .
================================================================

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

22 Oct 2025 - 9:51 pm | श्वेता२४

हृदयस्पर्शी लिखाण आहे....कथा आवडली...

कर्नलतपस्वी's picture

23 Oct 2025 - 10:54 am | कर्नलतपस्वी

पोटचा गोळा लांब ठेवण्याचे दुख काय असते,ते आईबापच जाणे.

छान लिहीलय.

वेगळी आणि वास्तव कथा..लिखाण छान!

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Nov 2025 - 7:46 am | बिपीन सुरेश सांगळे

कथा आवडली

नूतन's picture

19 Nov 2025 - 1:34 am | नूतन

कथा आवडली. बापाच्या मनातील घालमेल आणि लेकराच्या भल्यासाठी घेतलेला आईचा निर्णय.छान मांडलं आहे

श्वेता व्यास's picture

21 Nov 2025 - 12:21 pm | श्वेता व्यास

कथा आवडली. सर्वांच्या मनातील भावभावना उत्तम उतरल्या आहेत.