कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड
(कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड म्हणजेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!)
कृ.बु.चा (AIचा) वाढता प्रभाव बघता, पारंपरिक वर-वधूच्या विचारसरणीवर, संशोधनावर काय परिणाम/बदल होईल? असा एक विचार मनात आला. उपजत लाभलेल्या प्रतिभेतून खालील शब्दसुमनांचा सडा पडला.
मुलगा शिकला, विकास झाला
आला लग्नाला.
"मुलगी शोधा" विनवू लागला
बाजीराव नानाला.
"काय अपेक्षा, कशी पाहिजे?"
विचारले नानाने.
"चाटगपटला विचारतो"
म्हटले शाण्याने..
"आखूडशिंगी, बहुदूधी,
आहे काळी सावळीच.."
सुचवले नानाने
"अरे, ही तर जाफ्राबादी"
म्हटले जेमिनीबाबाने.
मुलगी शिकली, प्रगती झाली
आली लग्नाला.
"मुलगा शोधा" विनवू लागली
बाजीराव नानाला.
"काय अपेक्षा, कसा पाहिजे?"
विचारले नानाने.
"चाटगपटला विचारून सांगते"
म्हटले कुमारी प्रज्ञाने.
"जाडाभरडा, अमीर/गरीब
कसाही असावा
फक्त एवढे बघा की..
आयटीवाला नसावा."
पाच आकडी पगार त्याला,
घरीच पडीक असतो
प्रश्न पडला, "का असे?"
म्हणून नाना विचारतो.
"काय सांगू नाना तुम्हाला
केव्हा काय सुचेल,
शेजेवरती डोळी माझ्या
ई-मेल त्याला दिसेल.
(लॅपटॉप) सवत माझी
वसे सदा मांडीवरी
मला सांगा नाना,
मी काय याची धुणी-भांडीवाली?
काय सांगू नाना तुम्हाला,
तर्हाच याची न्यारी.
मधुचंद्राला काय करावे,
तेही...!!!!!??????
चाटगपटला विचारील स्वारी!
एंडगेम, टार्गेट, डेडलाइन..
वसे सदा डोईवर
कसा प(फ)ळेल सांगा नाना,
आमच्या संसाराचा गाडा?"
(तंत्रज्ञान मागासवर्गीय बाजीराव नाना.)
बिलंदर बाजीराव नानाने थेट जेमिनीबाबाला काॅल लावला, विचारले, "बाबा, तुला काय वाटते?"
"सांग प्रज्ञा", नाना म्हणाला,
"खरी यातली गोम?
आयटीवाल्याबद्दल
अशी का आहे बोंब?"
कृ.बु. म्हणाली, "नाना,
सोडून तिजला,
ऑफिस ऑफिस खेळेल.
माळण्या गजरा त्याला
वेळ कुठून मिळेल?
ऑफिस जाता जाता
तो चुंबिल लल्लाट.
लवकर येतो म्हणता म्हणता
होईल पहाट!"
नाना हसले आणि म्हणाले,
"प्रज्ञा, तू बी लईच भारी..
बरे झाले, आमच्या काळी
नव्हतीस आमच्या दारी."
- बेतुक्या.
(मस्त रॅप संगीत बनेल, यो.यो. मधू शार्दूल, आजचे प्रथितयश, आघाडीचे रॅप गायक, संगीतकार यांना विचारार्थ पाठवले आहे.)
____________________________________________________
फटाके.. काही फुसके, काही हटके
मिपाकरांची दिवाळी म्हटली की अर्थातच साहित्यिक फटाके, फुलबाज्या, भुस(ई)नळे हवेतच. (चारचौघात बसून एखादी चारोळी, जोक वाचताना भसकन हसू येते, म्हणून भुसनळे.)
आठवले तसे लिहिले. हे म्हणजे वांझोटीने बाळंतपणावर निबंध लिहिल्यासारखेच आहे. (माझा आयटीशी दूरान्वयानेही संबध नाही.) बाकी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात भर घालावी, अशीच विनंती.
फेबुवर दिसला, इन्स्टावर भेटला
लिंक्डइनवर केला फायनल.
..रावांशी लग्न ठरलं म्हणून,
कायप्पावर केलं व्हायरल.
एंगेजमेंटआधी वाॅलपेपर चेंज केला
सख्या पाटलाचा काढून तुक्या पाटलाचा टेपला.
फाइव्ह जीने केला थ्री जी भ्रतार
लोडिंग लोडिंग कण्हत होतोय बेजार
डेटिंगचं ॲप, लग्नाचा घाट
शंकुतलेची मेल, दुष्यंताचं चॅट
तू नळीवरचा पंडित आणि,
आभासी अंतरपाट..
राणी आयटीवाली
राजा आयटीवाला
दोघांचं बी सेम सेम
सांजच्या पारी सासूचा एंडगेम
आयटीची माया
वसे दूर काया
त्याचे चॅट, तिचे चॅट
घरांमंदी उताणी खाट
ऐन वक्ताला
राजाला काॅल आला,
"आप कतारमें है"
म्हणत राणीने फोन बंद केला.
मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 5:33 pm | निमी
भारी लिहिलं आहे..
22 Oct 2025 - 6:08 pm | श्वेता२४
पहिले गाणे भोंडल्याच्या चालीवरती म्हणावे व आताच्या काळातले भोंडल्याचे गाणे म्हणून गायला काही हरकत नाही.... "सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर" या चालीवरती म्हणता येते. ... ;))
22 Oct 2025 - 7:04 pm | स्वधर्म
खरं सांगायचं तर ही विनोदी कविता नसून सत्य परिस्थितीच अशी बनत आहे असे वाटून गेले.
23 Oct 2025 - 7:59 am | Bhakti
मस्त!