दिवाळी अंक २०२५ - आम्हीही सिंदबाद, बावळट तरीही नशीबवान - भटकंती

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

आम्हीही सिंदबाद, बावळट तरीही नशीबवान

अनेक संकटे सोसून एक सागरी सफर संपवून बरीच संपत्ती मिळवून घरी परतल्यावर स्वस्थ न बसता सागरप्रवासाच्या ओढीने पुन्हा एकदा पुढील सफरीकरता तयार होणाऱ्या सिंदबाद खलाशाची प्रदीर्घ कथा आपल्याला माहीत असेलच. आम्ही अनेक जण एका (काही काळापूर्वी केलेल्या) सागरी सफरीत असेच भरकटलो, पण 'शेवट गोड' होऊन आम्हाला काही अविस्मरणीय पाहाता आणि अनुभवतादेखील आले, त्या इंडोनेशियात (जवळजवळ पुराणकाळात) केलेल्या प्रवासाची ही कथा.

या अजब सागरी सफरीत आम्ही का आणि कसे भरकटलो, हे समजून घेण्यासाठी तो काळ लक्षात घेणे आवश्यक आहे. आमच्या या सफरीच्या वेळी AI तर जाऊच द्या, Google Mapsदेखील अजून यायचे होते. Yahoo! Maps नुकतेच सुरू झाले होते आणि अर्थातच त्यांचा (किंवा Google Mapsदेखील) सागरी प्रवासाला काहीच उपयोग नव्हता. अगदी सिंदाबादच्या काळाप्रमाणे होकायंत्र, आकाशांशमापक (Sextant) अशी आयुधे वापरून (तरीही चुकतमाकत) सागरी मार्गक्रमण करण्याची आवश्यकता नसली, तरी आमच्यासारख्या क्वचितच समुद्रभ्रमण करणाऱ्यांना बऱ्याच गोष्टींची - उदा., वाऱ्याचा आणि भरती-ओहोटीचा शिडाच्या जहाजांच्या वेगावरचा परिणाम, ज्याबद्दल पुढे उल्लेख येईलच - काहीही माहिती तर नव्हतीच आणि तशी ती थोडक्या वेळात करून घेणे सोपेही नव्हते. त्यामुळेच कदाचित, पण आमचा हा प्रवास बराचसा 'हो जायेगा साहब' अशा तऱ्हेच्या आश्वासनावर आधारलेला होता. अहो, म्हणूनच आम्ही या सफरीत गंडलो ना!

आम्ही जकार्तात राहात असताना एकदा आमच्या मित्रमंडळात श्री. क्ष (नावात काय आहे?) यांच्याकडून एक विचारणा आली, "आपण सगळे जण मिळून पिनीसी जहाजाने २-३ दिवसांच्या समुद्रसफरीवर जाण्यात स्वारस्य आहे का?" श्री. क्ष काही ना काही जुगाड करून मित्रमंडळींसकट काहीतरी आगळेवेगळे करण्यात वाकबगार गणले जात. त्यांच्या या कर्तबगारीवर विश्वास ठेवून सहकुटुंब ठरत असलेल्या या समुद्रसफरीसाठी मी (आणि सौ.) आणि 'आपण सगळे'मधील इतरही काही या एका वेगळ्याच तऱ्हेच्या सफरीच्या विचारात सामील झालो.

'पिनीसी' जहाजांचा थोडासा इतिहास माहीत करून घेतल्यावर यामागचे कारण समजून येईल. काही शतकांपूर्वीपासून अजूनही वापरात असलेली ही खास तऱ्हेच्या शिडांची लाकडी जहाजे मुख्यतः मालवाहतुकीसाठी सगळ्याच इंडोनेशियात (जिथे सुमारे १७,००० बेटे विषुववृत्ताला समांतर अशा सुमारे ५,००० किलोमीटर लांबीच्या आणि १,५०० किलोमीटर रुंदीच्या क्षेत्रात पसरलेली आहेत) वापरली जातात. काही काळापासून अशा जहाजाना शिडांखेरीज इंजीनही लावून आणि त्यांची आतील रचना बदलून त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतरही केले जाते - जसे श्रीमंत मंडळींच्या अय्याशीसाठीचा तरंगता सुखनिवास (Resort) किंवा 'खास' लोकांसाठीचे आलिशान तरंगते हॉटेल किंवा शौकीन (आणि श्रीमंत) मासेमारांसाठी खोल समुद्रात फेरफटका मारत मासेमारी करण्याचे जहाज इ.इ. .

pinisi>
एक पिनीसी जहाज

https://unsplash.com/photos/a-large-boat-floating-on-top-of-a-body-of-wa...

जहाजाचा शोध घेऊन जहाजाची माहिती मिळवणे, सफरीचा कार्यक्रम (आणि budget) ठरवणे इ.इ. पूर्वतयारी पूर्वानुभवानुसार श्री. क्ष उत्साहाने करत होते. इतर सगळे जण आपापल्या नोकरीत व्यग्र आणि म्हणून श्री. क्ष यांच्यावर विसंबून आणि विश्वासून होते. गेलाबाजार आमचा हा mini cruise shipचा प्रवास साधारणपणे आमच्यापैकी कुणाच्याही आजवरच्या सुट्टीवरच्या राहण्याच्या कुठल्याही व्यवस्थेपेक्षा नक्कीच वेगळा असणार होता. निदान अशी आमची सगळ्यांचीच अशी समजूत श्री. क्ष यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या माहितीवरून झाली होती.

श्री. क्ष यांनी चौकशी, विचारविनिमय, वाटाघाटी वगैरे करून आमच्या 'Royal Pinisi Cruise'साठी एक पिनीसी जहाज नक्की केले आणि एकूण कार्यक्रम जहाजवाल्यांशी काही वेळा बोलून आम्हा सगळ्यांना कळवला, तो असा - शुक्रवारी जकार्तापासून पश्चिमेकडे असलेल्या मेराक बंदरातून संध्याकाळी साडेपाच वाजता 'पिनीसी'ने निघून ती संध्याकाळ आणि रात्र जहाजावर खाणेपिणे, मौजमजा करण्यात घालवून शनिवारी सकाळी 'उजुंग कुलॉन' या जावा बेटाच्या पश्चिम टोकावरच्या निसर्गारण्यात पोहोचणे आणि तिथे एक दिवस आणि एक रात्र राहून रविवारी सकाळी परत निघून समुद्रमार्गे संध्याकाळपर्यंत प्रथम मेराकला पोहोचणे आणि मग रस्त्याने जकार्ताला परतणे. म्हणजे आम्हा सगळ्यांना शुक्रवारी दुपारी साधारण साडेतीन वाजता जकार्ताहून निघून मेराकला संध्याकाळी साडेपाचच्या आधी पोहोचून, तिथे गाड्या ठेवून 'पिनीसी'ने निघायचे होते आणि रविवारी मेराकला परत आल्यावर मग पुन्हा रस्त्याने जकार्ताला परतायचे होते. आमचे 'पिनीसी' जहाज साधारणतः समुद्रकिनाऱ्याच्या समांतर जात प्रवास करणार होते.

अंतरे (रस्त्याने) आणि वेळेचा अंदाज येण्यासाठीची माहिती - जकार्ता ते मेराक सुमारे ११० कि.मी., मेराक ते अन्येर सुमारे २५ कि.मी., अन्येर ते ऊजुंग कुलॉन सुमारे १२५ कि.मी.

undefined
आमच्या प्रवासातील ठिकाणे (जकार्ताचे स्थान जावा बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वरील नकाशाच्या उजव्या सीमेच्या थोडेसेच बाहेर)

https://en.wikipedia.org/wiki/Sunda_Strait#/media/File:Sunda_strait_map_...

आमच्या mini/Royal cruise (नाव अजून पक्के ठरत नव्हते)नंतरच्या सोमवारी सुट्टी असल्यामुळे कार्यक्रम सुरू होण्याआधीच श्री. क्ष यांनी पुन्हा एकदा चांगला कार्यक्रम ठरवला असल्याची सगळ्यांना खातरी पटली होती.

कार्यक्रमाला आणखी काही दिवस होते. एकाएकी कुणाच्या तरी डोक्यात एकदम किडा वळवळू लागला, तो असा - आपण सगळे तर जकार्तापासून निघणार, आमचे जहाजदेखील तांजुंग प्रियोक या जकार्ताच्या बंदरातूनच मेराकला जायला निघणार असेल आणि सगळेच जण परत जकार्तालाच येत आहेत, मग आपण ते जहाज फक्त 'मेराक ते मेराक' असेच का वापरतो आहोत? जरूर पडल्यास द्या काहीतरी जास्तीचे 'पिनीसी'च्या मालकाला आणि 'तांजुंग प्रियोक ते तांजुंग प्रियोक' असे आपण ते जहाज वापरू, म्हणजे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता जकार्ताहून आपल्या वाहनाने मेराकला जाण्यासाठी निघण्याऐवजी साधारण त्याच वेळी (जकार्तातल्या) तांजुंग प्रियोकहूनच पिनीसीने प्रवासाला निघू आणि परततानासुद्धा तांजुंग प्रियोक, जकार्तापर्यंत पिनीसीनेच येऊ.

असा कुठेतरी किडा वळवळू लागल्यावर होते तशी कुजबुज, ताणाताणी, वाटाघाटी इ.इ. सगळे झाल्यावर एकदाचे श्री. क्ष यांनी जहाजाच्या मालकाला विचारले/सांगितले, "आपण शुक्रवारी मेराकहून साडेपाच वाजता निघण्याऐवजी तांजुंग प्रियोकहून दुपारी साडेतीन वाजता निघू या? नाहीतरी जहाज तांजुंग प्रियोक या जकार्ताच्या बंदरातच असणार आहे. तसेच परततानासुद्धा तांजुंग प्रियोक, जकार्तापर्यंत?" या बोलण्यानंतर श्री. क्ष यांना जहाजाच्या मालकाने नुसतीच मुंडी हलवून होकार दिला की टाळीदेखील दिली (कारण त्याचे जहाज कुठल्याही पर्यायानुसार तितकेच अंतर चालणार होते) याची काही कल्पना नाही, पण आमच्या 'Royal Pinisi Cruiseची सुरुवात झाली शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता तांजुंग प्रियोक, जकार्ताहून!

आमच्या Royal Pinisi Cruiseसाठीचे जहाज - चित्रावरून वाटलेले - Five Star वगैरे असणार होते. आम्ही सगळे (मुलाबाळांसकट ६-७ कुटुंबे किंवा सुमारे २५ लोक ) जहाजात चढल्यावर लगेच दिसणारा above deckचा भाग 'फाइव्ह स्टार' दर्जाचा छानच होता (ज्याचे फोटो आम्ही पाहात आलो होतो). below deckचा भाग मात्र जेमतेम २-३ starच वाटला. पण आम्ही सगळे तर जहाजावरचा बराच वेळ वरच्या deckवरच खाण्यापिण्यात घालवणार होतो ना? मग काय फरक पडणार होता ?

आमच्या 'Unique Experience'ची सुरुवात किंचितशी उशिरा - म्हणजे जरा उन्हे उतरल्यावर, सूर्यास्ताची चाहूल लागल्यावर - वरच्या deckवरच्या खाण्यापिण्याच्या टेबलाभोवती गोळा होत होत झाली आणि मग एकूणच कार्यक्रम रंगू लागला. तोपर्यंत पोराटोरांना वरच्या deckवरून एका जिन्याने खाली आणि खालच्या भागातून दुसऱ्या जिन्याने वर अशा लपंडावाचा खेळ छान रंगेल, याची खातरी पटली होती. त्यांच्या आयांनी "railingजवळ अजिबात जायचे नाही" असे धावणाऱ्या पोरांना अनेक वेळा बजावले. संध्याकाळी ८-९ वाजता जेवणाचे काय? याची चौकशी सुरू झाली. कुणाला तरी आठवण झाली की गरम गरम कांदाभजी बनवण्याचा सगळा सरंजाम जमवला असताना अजून भज्यांचे दर्शनदेखील झाले नव्हते, म्हणून त्यानंतर deckच्या एका कोपऱ्यात भज्यांसाठी कढईदेखील लागली. भजी खाऊन घेऊ आणि मग जेवायचे बघू, यावर सगळ्यांचे एकमत झाले.

एकूणच सिंदबादच्या सफरीत (नकळत) अतिप्रचंड कासवाच्या पाठीवर चूल पेटवून स्वैपाक करू लागणाऱ्या खलाशांच्या स्थितीला आम्ही सगळे एव्हाना अजाणतेपणे पोहोचलो होते.

आणि त्यानंतर कासवाचे हलू लागणेदेखील सुरू झाले.

आमच्यातल्या कुणालातरी काही काळापासून आपण फारसे हललो नाहीत अशी शंका येऊ लागली होती, म्हणून आतल्या गोटातील माहिती मिळवण्यासाठी त्याने जहाजावरच्या काही (खऱ्याखुऱ्या) खलाशांबरोबर "काय कसं काय पाव्हणं, कोण गांवचं" अशा तऱ्हेचे जरा अघळपघळ बोलणे सुरू करून पत्ता लावला होता की तांजुंग प्रियोकहून निघतानापासून बंदरातील वर्दळ,पडलेला वारा अशा अनेकविध कारणांमुळे आम्ही 'थोडेसेच' पुढे आलो होतो. उद्या सकाळपर्यंत जरी उजुंग कुलॉनला पोहोचू शकणार नसलो, तरी अन्येरला नक्की पोहोचू, असा 'अंदाज' होता. एकाच वेळी एखाद्या गोष्टीची खातरी देणे आणि त्याच वेळी 'इतर अनेक गोष्टीदेखील मात्र बरोबर जमल्या पाहिजेत, बरे का' असा provisoदेखील जाणवून देणे ही इंडोनेशियातल्या लोकांची खासियत.

'डुलणे' विसरून आमच्या सध्याच्या परिस्थितीची खबर मिळवू पाहणाऱ्या त्या (एकमेव) सिंदबादचे आम्हा अजूनही खाण्यापिण्यात मग्न असणाऱ्या मंडळींच्या घोळक्यात हे बातमीपत्र घेऊन पुन्हा आगमन झाले आणि "अजून भजी शिल्लक आहेत की नाही, आत्ता इथे असलेले आमचे पोरगे कुठे अचानक बेपत्ता झाले" असा चाललेला कलकलाट "असे कसे, आता काय" यात बदलू लागला. काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे, हे हळूहळू आम्हा सगळ्याच बावळट सिंदबादांच्या डोक्यात शिरले.

त्या वेळपर्यंत - म्हणजे रात्री ११-१२च्या सुमारास आम्ही फक्त जकार्ता आणि मेराकच्या मध्ये कुठेतरी पोहोचलो होतो आणि पुन्हा पुढे कसे किती वेगात जात राहू, हे सगळेच वारा असणे/नसणे (कारण ते Royal जहाज वेगासाठी शिडांच्या मदतीवरदेखील अवलंबून होते) अशासारख्या महत्त्वाच्या पण अनिश्चित घटकांवर अवलंबून होते. आधी ठरलेला कार्यक्रम बदलताना यातले काहीच श्री. क्ष तर सोडा, आमच्यापैकी कुणीच विचारात घेतले नव्हते.

अशा परिस्थितीत "उद्या सकाळी आधी अन्येरला तर पोहोचू आणि मग ठरवू" असा तात्पुरता ठराव पास झाला आणि सगळे जण मिळेल तेवढी झोप उरकावी, या विचाराने below deckवर आपापल्या खोल्यांत गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अन्येरला पोहोचल्यावर salvage operationच्या स्वरूपात अन्येरला सगळ्यांकरता एक रात्रीसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकेल, याची खातरी करून घेतल्यावर उजुंग कुलॉनचा (आणि पिनीसी जहाजाचा) नाद सोडून अन्येरलाच एक दिवस-एक रात्र काढून (आयत्या वेळी जमवता आलेल्या) बसने जकार्ताला परतण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला गेला. सगळ्याच गुंत्यातून बाहेर पडल्यावर सगळा हिशोब करून तो प्रत्येकात वाटून घेणे हाच मार्ग शिल्लक होता.

श्री. क्षला बोल लावत राहिलेला वेळदेखील फुकट घालण्याऐवजी तो कार्यक्रम जकार्तात करण्याचे ठरवून काही मंडळी हॉटेलच्या आवारातील Volleyballचे जाळे बांधून खेळ सुरू करण्यामागे लागली, तर काही अन्येरला काय करता येईल याचा शोध घ्यायला गेली. आणि त्यांनी एक आगळीच खबर आणली.

अन्येरहून दोन-तीन speedboats भाड्याने घेऊन आम्हा सगळ्यांना 'क्राकाताऊ' (English Krakatoa - पण इथे स्थानिक उच्चाराप्रमाणे लिहिले आहे) ज्वालामुखी असलेल्या बेटावर जाता (आणि अर्थात परत येता) येणार होते. तीन-एक तासांचा हा अतिशय आगळावेगळा (आणि सहजपणे पुन्हा पुन्हा न जमवता येण्यासारखा) कार्यक्रम होता.

आम्ही तिथे गेल्याच्या काही महिने आधीपर्यंत त्या बेटावरच्या एकेकाळच्या 'क्राकाताऊ' ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला 'अनक क्राकाताऊ' ज्वालामुखी अधूनमधून जागा होत डरकाळ्या फोडल्यासारखा दगडधोंडे, राख फुत्कारून बाहेर फेकत होता. जवळपास असणाऱ्या आणि जाणाऱ्या-येणाऱ्या जहाजांवरच्या लोकांना त्याने बऱ्याच वेळा जखमी आणि घाबरे केले होते. १८८३ सालातला 'तो' 'क्राकाताऊ' (Krakatoa) ज्वालामुखी (जिथे प्रत्यक्ष एकाशेजारी एक 'परबोआतान', 'दानान' आणि 'रकाता' असे तीन ज्वालामुखी होते) अतिप्रचंड उद्रेकानंतर कोसळला होता. त्याच्या उद्रेकाचा आवाज हा आजवरचा जगभरातला सगळ्यात मोठा (loud) आवाज समजला जातो. या उद्रेकानंतर त्याजागी फक्त रकाताचा बराच भाग आणि बाकीच्या दोन ज्वालामुखीच्या बाहेरचा काही भाग उरला आणि त्या बेटाचा बराच मधला भाग खचून समुद्रात बुडाला. पण १९२७ साली या बेटाच्या समुद्रात बुडालेल्या मध्य भागातून 'अनक क्राकाताऊ' (Baby Krakatoa) हा नवा ज्वालामुखी पाण्यातून बाहेर येताना दिसू लागला. १९३० सालापर्यंत 'अनक क्राकाताऊ' वाढत वाढत बराच मोठा झाला आणि त्याचेही अधूनमधून लहान मोठे उद्रेक होऊ लागले.

इ.स. १८८३नंतर क्राकाताऊ ज्वालामुखीत झालेले बदल
1

आम्ही अन्येरला पोहोचलो होतो, त्या वेळी आम्हाला ही सगळीच माहिती नव्हती - फक्त क्राकाताऊ ज्वालामुखीबद्दल 'एक अतिप्रचंड बऱ्याच काळापासूनचे धोकादायक गूढ' एवढेच काहीसे अंधुक माहीत होते. अनक क्राकाताऊ ज्वालामुखी अधूनमधून जागा होण्याबद्दलच्या उलटसुलट चर्चा खूप दूरच्या वाटत होत्या, पण आता आम्ही या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर पोहोचलो होतो. पुढे जावे की इथूनच परतावे?

आमच्यापुढे या अद्भुत बेटावर जाण्याचे काहीतरी वेगळेच आकर्षण आकस्मिक उभे झाले होते. अशा धोक्याच्या जागी, विशेषतः बरोबर लहान मुलेबाळेदेखील असताना जाणे कितपत शहाणपणाचे आहे, यावर खल झाला. अन्येरहून speed boats भाड्याने देणारे आम्हा सगळ्यांना अनक क्राकाताऊ ज्वालामुखी मागचे काही आठवडे शांत असल्याचे खातरीपूर्वक सांगत होते. आम्ही अन्येरला पोहोचल्यापासूनच्या काळात काही गडबड, आवाज झाल्याचे वाटले नव्हते. हॉटेलचे लोकदेखील या सगळ्याला दुजोरा देत होते. अनक क्राकाताऊला जावे की नाही?

आमच्या उजुंग कुलॉनला जाण्याच्या कार्यक्रमाचा बोऱ्या वाजलेलाच होता. अनक क्राकाताऊच्या उद्रेकाबद्दल (किंवा लहान-मोठ्या फुत्काराबद्दल) मागचे काही आठवडे तरी आलबेल असल्याचे वाटत होते. आम्ही काही गडबड वाटल्यास उलटे अन्येरला तत्काळ वळू शकत होतो. आणि तसेच म्हटले तर पुढच्या काही तासांत (काहीही चिन्हे आत्ता दिसत नसताना) इ.स. १८८३सारखा उद्रेक जर झालाच, तर जिथे आम्ही होतो, तिथे तरी कुठे सुरक्षित होतो ?

अशा उलटसुलट विचाराअंती अखेर अन्येरहून speed boats भाड्याने ठरवल्या आणि अनक क्राकाताऊच्या दिशेने हाकारल्या.

साधारण तासाभराच्या काहीही अनुचित न घडता झालेल्या प्रवासानंतरचे 'अनक क्राकाताऊ' असलेल्या बेटाचे प्रथम दर्शन इतर कुठल्याही उष्णकटिबंधावरील बेटासारखेच होते.

अनक क्राकाताऊ ज्वालामुखी

https://i0.wp.com/www.volcanocafe.org/wp-content/uploads/2024/04/krakata...

आमच्या बोटी साधारण पोटरीभर पाण्यात थांबल्या, त्यावरच्या मदतनीसांनी सगळ्यांना हात देऊन उतरवले आणि "तासाभरात परत निघायला तयार रहा" असे बजावून त्यांनी आम्हाला अनक क्राकाताऊच्या परिसरात फिरण्यासाठी सोडून दिले.

समोर दाट झाडी होती आणि त्यापलीकडच्या अनक क्राकाताऊच्या चढाची काहीशी कल्पना समुद्रकिनाऱ्यावरून येत होती. लहान मुलेबाळेवाल्यांनी समुद्रालगतच्या अरुंद वाळूच्या पट्टीवरच थांबण्याचे ठरवले. आम्ही ५-६ जणांनी (जरा धाडसी बायका-पुरुष) एकमेकांना "एकटेच कुठेतरी भटकू/भरकटू नका" अशा उपयोगी आणि "सदैव सावध रहा" अशा निरुपयोगी सूचना देत अनक क्राकाताऊकडे मोर्चा वळवला.

दाट वाटत असलेल्या झाडीतील पायवाटा थोडे जवळ गेल्यावर दिसत होत्या, पण पायाखालील लहान-मोठे दगडगोटे, तसेच काहीशी खरखरीत जाडसर काळ्या रंगाच्या वाळूसदृश माती - बहुतेक ज्वालामुखीतून कधीकाळी फेकली गेलेली - अशा अडथळ्यांमुळे पुढे चालणे फारसे सोपे नव्हते. सुमारे १०-१५ मिनिटांतच झाडी विरळ होत गेली आणि आम्ही चक्क अनक क्राकाताऊच्या चढावर पोहोचलो.

थोडा चढ चढून गेल्यावर अनक क्राकाताऊचे वेगळेपण चांगलेच जाणवू लागले. पायाखाली असलेली खरखरीत जाडसर काळी वाळू किंवा खडी जास्तच बोचरी, टोकदार, भुसभुशीत आणि ओबडधोबड होऊ लागली होती. त्यामुळे एक पाऊल उचलून दुसरे पाऊल रोवून पुढे चालत राहणे कठीण होऊ लागले. सगळी झाडी पार नाहीशी झाल्याने जर अनक क्राकाताऊच्या एखाद्या आकस्मिक फुत्काराने एखादा धोंडा गोफणीसारखा आमच्यावर आला, तर तो चुकवायला आता अजिबात जागा नव्हती. चालता चालता गरम वाटू लागलेली पायाखालील वाळू वरच्या उन्हाने तापलेली होती की त्याखाली चालू असलेल्या अनक क्राकाताऊच्या अंतस्थ हालचालीमुळे, हे कळायला काही मार्ग नव्हता. हे सगळे अनुभव ओरडून एकमेकांना ऐकवताना हेही जाणवू लागले होते की त्या पावलोपावली आणखीनच चढ्या होत चाललेल्या भुसभुशीत भूभागातून जर कोणी गडगडला आणि जखमी झाला, तर आजूबाजूला लगेच काहीही मदत पटकन मिळणार नव्हती.

सुज्ञपणे सगळ्यांनीच एकमताने अनक क्राकाताऊला अल्विदा करून ज्वालामुखीतून निघालेली वाळू, खडी आणि तप्त जमीन हे सगळे लक्षात ठेवत, अनक क्राकाताऊच्या इतक्या जवळ जाऊनही सहीसलामत परतल्याबद्दल 'त्या'चे आभार मानत आणि या सगळ्याच अविस्मरणीय अनुभवाबद्दल श्री. क्ष यांना "माफ कर दिया" असे सांगण्याचे ठरवत उतरायला सुरुवात करून मजल दरमजल करत आधी आमच्या अन्येरला परत नेणाऱ्या speed boats, नंतर अन्येर आणि मग यथावकाश जकार्ता गाठले.

कधीतरी त्यानंतर आम्ही सगळे भेटलो असताना "कुठे चुकले" याची उजळणी होताना हे लक्षात आले - मेराक ते ऊजुंग कुलॉन हे सुमारे १५० कि.मी.चे अंतर आम्ही आधीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार सुमारे १६ तासांत जाणार होतो (जे 'वारा पडला' वगैरे वगैरे काहीही झाले, तरी आमच्या Royal जहाजाला जमण्यासारखे होते). आम्ही कार्यक्रम बदलल्यामुळे आधी ठरलेल्या एकूण प्रवासात जकार्ता ते मेराक हे ११० कि.मी.चे अंतर जास्तीचे टाकले गेले, तरी त्याकरता लागणारा वेळ मात्र car speedच्याच अंदाजाने फक्त दोन तासांनीच वाढवला. मग सगळेच गणित चुकणार नाही, तर दुसरे काय होणार?

त्या Royal Pinisi Cruiseमध्ये सामील झालेल्या सगळ्यांनाच त्यानंतर हळूहळू पटत गेले की असे भरकटणारे आम्ही त्या वेळी जरी बावळट सिंदबाद ठरलो, तरी त्यानंतर समजले की तेवढ्यातही आकस्मिकपणे 'अनक क्राकाताऊ'ला (निदान चुटपुटती) भेट देता आल्याने - आणि सहीसलामत परतही आल्याने - नशीबवानदेखील नक्कीच ठरलो, कारण आमच्या भेटीच्या वेळी अनक क्राकाताऊने २०१८ साली (आमच्या Royal Pinisi Cruiseच्या नंतर बऱ्याच काळाने झालेल्या एका मोठ्या उद्रेकात) केला होता, तसा थयथयाट केला नाही.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

20 Oct 2025 - 7:55 pm | कंजूस

हाहाहा.

गोरगावलेकर's picture

21 Oct 2025 - 11:37 am | गोरगावलेकर

ठिकाणं ओळखीची नसली तरी आपल्या लिखाणातून प्रसंग अनुभवला.

श्वेता२४'s picture

21 Oct 2025 - 3:45 pm | श्वेता२४

तुमची वर्णन करण्याची शैली जरी विनोदी अंगाने व उपहासात्मक असली तरीही जे काही प्रत्यक्षात घडले ते मात्र खरे तर खूपच धाडसाचे होते मग हा असा निर्णय घेणे सुद्धा खूपच भयानक आहे अशा ठिकाणी तुम्ही सुखरूप जाऊन आला यामध्ये खरंतर नशिबाचाच भाग आहे म्हणायचा..
या बोलण्यानंतर श्री. क्ष यांना जहाजाच्या मालकाने नुसतीच मुंडी हलवून होकार दिला की टाळीदेखील दिली (कारण त्याचे जहाज कुठल्याही पर्यायानुसार तितकेच अंतर चालणार होते) याची काही कल्पना नाही
हे फार विनोदी होतं.... जाम हसले....

सुखी's picture

15 Nov 2025 - 2:02 pm | सुखी

थरारक सहल

एकदम क्लास!अशी जहाज भटकंती ,खरचं युनिक!

श्वेता व्यास's picture

24 Nov 2025 - 7:55 pm | श्वेता व्यास

थरारक अनुभव! जहाज आणि काही घोळ म्हटलं की आधीच भीती वाटते.

कुमार१'s picture

2 Dec 2025 - 11:25 am | कुमार१

थरारक अनुभव आवडला !