पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
24 Sep 2024 - 9:46 pm

ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज.

अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा. मात्र नाणेघाटात जाताना आपटाळ्यावरुन उजवीकडे जावे लागते तर सरळ रस्ता आंबोली गावात जातो. दार्‍या घाट, ढाकोबा करायचा असेल तर पुढे आंबोलीला जावे लागते. तर आंबे - हातविज करायचे असेल तर आपटाळ्याच्या पुढून लगेचच डावीकडे वळून सोनावळे -इंगळूण अशी गावे पार करत इंगळूणचा घाट चढावा लागतो. नाणेघाटात असंख्य वेळा येऊनही इकडे कधीच वळलो नव्हतो, ह्यावेळी पहिल्यांदाच ह्या भागात आलो. आपटाळ्यापर्यंत रस्ता अगदी चांगला आहे, शिवाय मध्ये मध्ये टपरीवजा हॉटेले आहेत त्यामुळे चहा नाष्ट्याची सोय इथपर्यंत सहज होते, मात्र एकदा तुम्ही आपटाळ्यावरुन सोनावळ्याच्या रस्त्याला लागलात तर पुढे शेवटपर्यंत काहीच मिळावयाचे नाही. आपटाळे सोडल्यावर पुढे रस्ता खूपच खराब आणि अरुंद आहे. इंगळूण सोडल्यावर लगेचच घाटाला सुरुवात होते. जवळपास ६/७ किमीचा हा घाट अरुंद आणि वळणावळणाचा आणि तीव्र चढ उतारांचा आहे. समोरुन मोठे वाहन समोर असल्यास काहीशी अडचण होऊ शकते. घाटात मध्ये मध्ये दरडी कोसळल्या आहेत आणि काही ठिकाणी मध्येच पाणी साचले असल्याने रस्त्याचा पटकन अंदाज येत नाही. अर्थात ह्या परिसरात रहदारी नगण्य असल्यामुळे समोरुन येणारी वाहने शक्यतो लागत नाहीत. आम्ही गेलो तेव्हा नेमके ३/४ दिवसांच्या उघडिपीनंतर एकदम पावसाळी ढगाळ वातावरण तयार झाले होते.

इंगळूण घाट

a

घाटात दोन तीन ठिकाणी धबधब्यांची ठिकाणं आहेत पण परिसर दरडप्रवण असल्याने आम्ही येथे न थांबता पुढे गेलो. घाट तीव्र चढाचा असल्याने आपण खूप उंचीवर आलेलो असतो. घाट संपताच उजवीकडे जाणारा रस्ता आंबे - हातविजला जातो. तर डावीकडे वळणारा रस्ता पिंपरवाडी, वरसूबाईवरुन आहुपेला जातो. आम्हाला आंबे हातविजला जायचे असल्याने उजवी पकडली. लगेचच एक प्रशस्त पठार लागते. आजूबाजूला सगळा कातळ आहे आणि कातळावर मोहक रानफुलांच्या बहराला सुरुवात झालेली आहे. येथे सध्या प्राबल्य दिसतेय ते सोनकीचे आणि अधूनमधून तेरड्याची जांभळी फुले फुललेली दिसतात.

a

येथे सोनकीचा गालिचाच पसरलेला दिसतो.

a

पावसाळ्यात हिरव्या गालिच्याने बहरलेले हे वार्‍याने थंड झालेले पठार उन्हाळ्यात मात्र रखरखीत, उष्ण होत असणार ह्यात काहीच शंका नाही.

a

खरे तर आंबे आणि हातविज अशी दोन गावे. गावे म्हणण्यापेक्षा दोन्ही लहानशा वाड्या. आम्हाला जायचे होते ते हातविजच्या अलीकडे असणार्‍या दुर्गवाडीतून पुढे २/३ किमी असलेल्या दुर्गाच्या देवराईत आणि तिथला कोकणकडा पाहायला. आंबे गावाच्या अगदी अलीकडे एक निसर्गनवल आहे ते म्हणजे घंटानाद करणारे दगड. दोन भलेमोठे प्रस्तरखंड तारेच्या कुंपणात बंदिस्त केलेले आहेत. त्या खडकांवर लहानश्या दगडाने आघात केल्यास लोखंडावर आघात केल्यागत नाद येतो. रस्त्याच्य बाजूलाच असल्याने हे अगदी सहजी बघता आणि वाजवता येतात.

घंटानाद करणारे दगड

a

आंबे गावातून सरळ पुढे गेल्यावर दुर्गवाडी लागते आणि डावीकडे जाणारा रस्ता हातविज आणि येथील सुप्रसिद्ध कांचन धबधब्याला जातो. हातविजला न जाता आम्ही दुर्गवाडीतून पुढे गेलो. येथून पुढचा दोनेक किमीचा रस्ता मात्र कच्चा आहे मात्र चारचाकी, दुचाकीवरुन व्यवस्थित जाता येण्यासारखा आहे.

दुर्गवाडीतून समोरच खड्या कातळांनी बनलेला आणि गर्द वनराईने वेढलेला दुर्ग किल्ला दिसतो. किल्ला म्हणजे केवळ नावाला, वरच काहीच अवशेष नाहीत, मात्र देवराईत असलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरामुळे ह्या स्थानाला दुर्ग नाव पडले आणि साहजिकच कातळकड्यांनी बनलेल्या भागाला दुर्ग किल्ला म्हणायला लागले. दुर्गवाडीच्या पुढे एक सुंदर तलाव आहे.

दुर्गाच्या देवराईला जाणारा कच्चा रस्ता व उजवीकडे दिसणारा ठेंगणा दुर्ग

a

दुर्गवाडीतून पुढे गेल्यावर लागणारा तलाव

a

a

तलावाच्या इथून दिसणारा दुर्ग

a

आतापर्यंत असणारे ढग नुकतेच विरळ झाले होते आणि दुर्ग आता स्पष्ट दिसू लागला

a

मात्र तलावाच्या पुढे जाताच सह्याद्रीतले लहरी हवामान सामोरे येऊ लागले. आतापर्यंत थोडेफार मोकळे असणारे आकाश पश्चिमेकडून येणार्‍या ढगांनी भरुन जाऊ लागले. पावसाचा शिडकावा होऊ लागला. आत्तापर्यंत मोकळे वाटणारे पठार क्षणार्धात धुकटात गडप होऊ लागले. लगेचच आम्ही दुर्गादेवीच्या राईपर्यंत येऊन पोहोचलो. इकडे ठिकठिकाणी बसायला बाकडी ठेवलेली आहेत.

दुर्गची देवराई

a

राईच्या पायथ्याला गाडी लावून देवराईत शिरलो. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. येथील काडीही कुणी तोडत नाही. भारतातल्या सर्वात जास्त देवराया महाराष्ट्रात आहेत मात्र त्याही आता कमी कमी होऊ लागल्या आहेत. देवराई राखलेलं जंगल असल्याने येथे झाडांमध्ये प्रचंड वैविध्य दिसते. उंच, वेलींनी बहरलेली आंबा, फणस, हिरडा, अर्जुन, खैर, ऐन अश्या विविध वैविध्याने नटलेली जुनी झाडे आपल्याला पाहता येतात. मंदिरात जाण्यासाठी येथे थोड्याश्या पायर्‍या आहेत. आपला प्रवेश येथे वेगळ्याच जगात होतो.

देवराई

a

धुकटात गुडूप होत असलेली गूढरम्य देवराई

a

येथूनच लगेच सामोरे येते ते दुर्गादेवीचे मंदिर. आजुबाजूला शेंदूर फासलेला खूपसे दगड आहेत, मंदिरात दुर्गादेवीचा तांदळा आहे.

a

येथून मंदिराच्या समोरच्या पायवाटेने दहाच मिनिटात दुर्ग किल्ल्यावर जाता येते, तर मंदिराला ओलांडून जाणारी पायवाट कोकणकड्याच्या दिशेने जाते. किल्ल्यावर न जाता आम्ही कोकणकड्याच्या पायवाटेला लागलो. इथवर येताना वातावरण ढगात अगदी बुडून गेले होते व जेमतेम काही फूटांवरचेही दिसेना.

a

राईतून बाहेर आलो तर एक अद्भूत जणू आमचीच वाट पाहात होतं.

a

सभोवार पसरलेली राई व त्यात गुडूप होऊन गेलेली पायवाट

a

येथे फक्त पायवाट मळलेली होती म्हणूनच, अन्यथा आमची वाटचाल केवळ अनिश्चिततेच्या दिशेनेच सुरु होती.

a

धुकटात मध्ये मध्ये चरांत साठलेले पाणी व त्याभोवती फुले दिसत होती.

a

a

येथे सर्वत्र मुरमाड आणि कातळांनी भरलेली जमीन आहे आणि त्यावर पसरलेला होता तो फुलांचा गालिचा. काससारखे वैविध्य जरी येथे नसले तरी जे दिसत होते ते अद्भूत होते. येथे प्राबल्य आहे ते कोकणपिंड, सोनकी आणि तेरड्याचे.

फुलांचा गालिचा

a

पांढरे कोकणपिंड आणि जांभळा तेरडा

a

सोनकी, कोकणपिंड, तेरडा

a

हे पाहून लॉर्ड ऑफ द रिंग्सचीच आठवण आली

a

येथून अगदी पुढ्यातच आहे ते दुर्गचा कोकणकडा, खरे तर येथून अगदी नाणेघाटापासून पिंपरगणे, आहुप्याची रिज अगदी सहज दिसते तर खालचे कोंकणही सुरेख दिसते मात्र ते सर्वच ढगांआड लपून गेले होते. वनखात्याने येथे रेलिंग लावले आहेत.

खोल तुटलेला कोकणकडा

a

a

येथून खाली सरळ धबधब्यावाटे पाणी हजार बाराशे फूट खोल सरळ तुटलेल्या कड्यावरुन कोसळत होते. चित्रात तुम्हाला याची कल्पना येणार नाही, कारण खालचे काही दिसतच नाही, मात्र प्रत्यक्ष बघताना हे दृश्य म्हणजे अगदीच भारी होते. अगदी फूटभर अंतरावर गडद ढगांनी सर्व काही भरून गेले आहे, सर्वच काही अज्ञात होते.

a

बराच वेळ तिथ पावसात नुसते ढग बघून तिथून निघालो. फुलांचा नजारा अफलातून होता.

a

खडकांवर हिरवळ साचली होती.

a

ही तर पाण्यात उमललेली झुडपे

a

हे बघून परत राईत आलो. राईतल्या गर्द झाडीमुळे धुकं कोंडत नव्हतं. पठारावर जे गच्च साचलेलं ते इथं थोडं मोकळं वाटत होतं.

a

पण वातावरण अतिशय गूढरम्य होतं.

a

राईतून बाहेर परत गाडीपाशी आलो, येथूनही दिसणारी वाट सरळ कोकणकड्यापाशी जाते ती मात्र ढगांत आणि पाण्यात पूर्णपणे बुडून गेली होती.

a

एकाच वाटेचं हे अजून एक छायाचित्र

a

येथून परतीच्या मार्गाला लागलो. धुकटाने वेढलेलं वातावरण दुर्गवाडीपर्यंत येईपर्यंत बरंसचं स्वच्छ झालं होतं. आता जायचं होतं ते आहुप्याला, खरं तर सह्याद्रीच्या कडेकडेने आहुपे आगदी जवळ, जेमतेम १५ किमीवर, मात्र इथला रस्ता पूर्णपणे कच्चा, डोंगरदर्‍यातून जाणारा, चिखलाने भरलेला त्यामुळे तेव्हा इथून जाणं शक्यच नव्हतं, आंब्यातूनही एक रस्ता जातो तोही कच्चाच, मात्र पुढे इंगळूण घाटमाथ्यावर घाट न उतरता सरळ पिंपरवाडी, वरसूबाईवरुन जाणारा रस्ता ओबडधोबड का असेना पण डांबरी असून आहुप्याला तासाभरात जवळपास ३५/४० किमी अंतर पार करुन पोहोचता येते असे स्थानिकांकडून समजले. मात्र येथे येईपर्यंत ४ वाजले होते व त्यामुळे आहुपेला जाणे रद्द करून घाट उतरून आपटाळ्याहून जुन्नरला पोहोचलो व तेथे जेवण करुन घरी.

इंगळूण घाट.

a

प्रतिक्रिया

प्रभू-प्रसाद's picture

24 Sep 2024 - 10:27 pm | प्रभू-प्रसाद

घरबसल्या छान निसर्ग सहल घड्वुन आनलीत..

कंजूस's picture

25 Sep 2024 - 4:09 am | कंजूस

पावसाळी निसर्ग सुंदर.

तिकडे जाऊनच अनुभवावे लागेल.
देवराई आणि ते नाद करणारे खडक - सुंदरच.
'पाण्यात उमललेली झुडपे' - ही नंतर जांभळ्या फुलांनी भरून जातात. उंची दहा बारा इंचच राहाते.
निसर्ग ठेवा. असाच राहो.
'पांढरी फुले' - यांचं 'कोकण पिंड' नाव फार आवडले.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2024 - 4:53 am | कर्नलतपस्वी

थोडीशी विश्रांती हवी असेल तर अधून मधून जमेल तसा निसर्ग संवाद साधला पाहिजे. कित्येक व्याधीवर हा चांगला उपाय आहे. निसर्ग बघण्यास जरूरी नाही की काश्मीर, उटी महाबळेश्वर इथेच जायला हवे. मनचक्षू मिचकावले की आजूबाजूस भरपूर दिसतो.

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू नवतरूणी काश्मीर....

असेच काहीसे.

लेख, प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर.

मस्तच!कोकणपिंड फुलं सुंदर आहे.
लॉर्ड ऑफ रिंगची का आठवण झाली? :)

प्रचेतस's picture

26 Sep 2024 - 12:04 pm | प्रचेतस

क्राऊन ऑफ द फॉलन किंगचा एक सीन आहे त्यात, दगडी पुतळ्याभोवती अशीच पांढरी फुले फुललेली दिसतात.

आंबे - हातवीज नाव पहिल्यांदाच ऐकले. सुंदर दिसतोय सर्व नजारा, फुलांचे गालीचे भारीच.

गोरगावलेकर's picture

25 Sep 2024 - 11:17 am | गोरगावलेकर

नेहमीप्रमाणेच सुरेख भटकंती . डोंगर, धुके , फुलांचे फोटो आवडलेच पण खडकांवरची हिरवळ आणि पाण्यात उमललेली झुडुपेही सुंदर

श्वेता२४'s picture

25 Sep 2024 - 12:21 pm | श्वेता२४

फोटो मस्तच. फुलान्चा गालिचा निव्वळ अप्रतिम.

झकासराव's picture

25 Sep 2024 - 2:46 pm | झकासराव

डोळे निवले
सह्याद्रीचे हिरवेगार सौंदर्य
हाच सह्याद्री उन्हाळ्यात राकट देशा वै होतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2024 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, मला वाटलं जुनंच दळन वर आणलय कोणी.
सध्या केवळ फोटो चाळले. लेखन वाचून सविस्तर दाद देईन.

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

किल्लेदार's picture

26 Sep 2024 - 6:44 am | किल्लेदार

आजकाल ओलं व्हायला जीवावर येतं त्यामुळं मिपावर घरबसल्याच अशा सहलींची मजा घेता येते.

अवांतर - सर्व फोटोज् 16:9 न ठेवता 4:3 इमेज रेशो मध्ये जास्त छान दिसतील. 16:9 मध्ये सेंसरचे पोटेन्शियल पूर्णपणे वापरल्या जात नाही. *कृपया आगाऊपणा मानू नये*

प्रचेतस's picture

26 Sep 2024 - 12:08 pm | प्रचेतस

धन्यवाद.
खरं तर मला हे फोटो अपलोड केल्यावर हे लक्षात आले. सर्व फोटो मोबाईलमधूनच काढलेले आहेत. १६:९ रेशोला मोबाईलवर पूर्ण स्क्रीन भरुन गेल्यामुळे फोटो अधिक सुंदर दिसतात मात्र हेच फोटो वेबसाईटवर अपलोड केल्यावर जरा ताणलेले दिसतात. आता ४:३ रेशो ठेवूनच फोटो काढेन. बदामीचे, ऐहोळेचे ४:३ मध्येच होते त्यामुळे ते अधिक चांगले वाटतात.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2024 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

फोटो पाहून आणि वाचून मजा आली . . !

नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन आणि छायाचित्रे.

कोणा ज्येष्ठ सदस्यांनी (मी इथे कोणाचे नाव घेत नाहीये) तुमच्या जुन्या लेखनाला दळण असे म्हटल्याचा खेद वाटला हे प्रांजळपणे नमूद करतो.

प्रचेतस's picture

1 Oct 2024 - 12:15 pm | प्रचेतस

त्यांचा विषयच वेगळाय भो.

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2024 - 9:52 pm | चौथा कोनाडा

व्वाह ... क्या फुटू .. क्या वर्णन .....
दिल बगीचा बगीचा जाहला !

NCqwqweL456

दिल बगीचा बगीचा जाहला,
मंत्रमुग्ध भुल वाटले मला !