उपनिषदे म्हणजे भारतातील अनेक ऋषिमुनींच्या सखोल चिंतनाचा परिपाक आहे. विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांचे हे भांडार आहे. 'उपनिषद' या शब्दाचा अर्थ 'गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या' असा होतो. उप-नि-सद असा विग्रह केला, तर जवळ जाणे, रहस्य उलगडणे असाही एक अर्थ निघू शकतो. या विश्वाचे कार्य चालवणाऱ्या शक्तीच्या जवळ जाऊन तिचे रहस्य उलगडण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद.
उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असे म्हणतात. उपनिषदे ही वेदांचे अंतिम अंग आहे, म्हणून त्यांना 'वेदान्त' असेही म्हणतात.
ज्ञानाची उच्चतम परिसीमा म्हणजे उपनिषदे. यात प्रामुख्याने धर्म आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी तार्किक चिंतन केले आहे.
वेद आणि उपनिषदे ही अपौरुषेय आहेत किंवा ती देवांची निश्वासिते आहेत असे म्हणतात. याचा अर्थ इतकाच की हे दिव्य ज्ञान कोणाला तरी स्फुरलेले आहे. कोणत्याही जिज्ञासू माणसाला थोड्या प्रयत्नाने त्यांचा अर्थ सहज उलगडू शकतो. हे ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट शिक्षणाची किंवा पदवीची गरज नाही. म्हणून ते अपौरुषेय आहे, असे म्हणता येईल.
उपनिषदांची एकूण संख्या १०८ किंवा त्याहूनही अधिक आहे, पण त्यातली १० उपनिषदे अधिक प्रमाणात स्वीकारली / चर्चिली गेली आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे -
ईशावास्योपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, माण्डुक्योपनिषद, तैत्तिरीय, ऐतरेय, छान्दोग्य व बृहदारण्यक.
स्वामी विवेकानंद म्हणतात - 'उपनिषदे ही शक्तीच्या खाणी आहेत. ती अशा शक्तीने भरलेली आहेत की ती संपूर्ण जगाला शक्ती, शौर्य आणि नवीन जीवन देऊ शकतात.'
उपनिषदकार ऋषी हे यज्ञयाग, कर्मकांड यांच्या विरोधात होते, हे स्पष्टपणे जाणवते. मुंडकोपनिषदात अंगिरस ऋषी त्यांच्या शौनक नावाच्या जिज्ञासू शिष्याला सांगतात की "या जगात 'परा' आणि 'अपरा' अशा दोन प्रकारच्या विद्या आहेत. परा विद्या म्हणजे परम अर्थात अमर्याद जाणण्याची विद्या. अपरा विद्येला काही मर्यादा असतात आणि अशा मर्यादित विद्येने अमर्यादित असलेल्य्या ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य नाही." उपनिषदे वगळता इतर सर्व ज्ञान - ज्यात चारही वेद समाविष्ट आहेत, ती अपरा विद्या आहे, असे उपनिषदकार उच्चरवाने सांगताना दिसतात. परा विद्या तीच, जी नित्य अनादी अनंत अशा परब्रह्माचे ज्ञान करून देते.
ही परा विद्या ज्याचे दर्शन घडवते, ते ब्रह्म तरी कसे आहे, हे सांगताना ऋषी म्हणतात, "ते बघताही येत नाही किंवा दाखवताही येत नाही. ते केवळ अदृश्य आहे असे नाही, त्याला वास नाही, स्पर्श नाही, बुद्धीने किंवा मानाने ते ग्रहणदेखील करता येत नाही असे ते अग्राह्य असे ब्रह्म आहे. ब्रह्म हे 'सर्वगतम' अर्थात सगळीकडे आहे."
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
या शांतिमंत्राने ईशोपनिषदाची सुरुवात होते. हे पूर्ण आहे. ते पूर्ण आहे. (म्हणजे जगातील सर्व घटक अंतर्बाह्य परिपूर्ण आहेत. जरी ते एकाच दैवी शक्तीपासून निर्माण झाले असले, तरीही ते स्वतंत्र आणि पूर्ण आहेत.) पूर्णातूनच पूर्णाचा उगम होतो. पूर्णातून पूर्ण काढले तर पूर्णच उरते.
यत् चक्षुषा न पश्यति। येन चक्षूंषि पश्यति। तत् एव त्वं ब्रह्म विद्धि। यदिदमुपासते॥
ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ते डोळे पाहू शकत नाहीत, पण ब्रह्म मात्र डोळ्यांना सतत पाहत असते. कारण डोळ्याचे काम त्या ब्रह्मामुळेच होत असते. ज्याच्यामुळे हे डोळे कार्यरत आहेत, तेच ब्रह्म आहे हे तू ओळख. इतर प्रतीके म्हणजे ब्रह्म नव्हेत. ज्यांची उपासना केली जाते, ती प्रतीके ब्रह्माचे दर्शन घडवण्यास सर्वत: असमर्थ आहेत.
आणि मग ईशोपनिषदात उद्घोषणा होते -
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥
अर्थात या जगामध्ये जे काही आहे, ते सर्व ईश्वरी शक्तीने ओतप्रोत भरलेले आहे. ईश्वरी शक्ती हे चराचर ब्रह्माने अव्यक्तपणे व्यापले आहे, त्याचा तेवढ्याच अलिप्तपणे उपभोग घ्यावा.
कठोपनिषदाची सुरुवातच एका अद्भुत आख्यानाने होते.
नचिकेत हा बाजश्रवाचा पुत्र. एकदा बाजश्रवाने विश्वजित यज्ञ सुरू केला, ज्यात सर्वस्व अर्पण करायचे असते. नचिकेतने आपल्या वडिलांना विचारले, "तुम्ही मला कोणाला अर्पण करणार?" बाजश्रवा रागाने म्हणाला, “जा, मी तुला यमाला अर्पण केले.” पित्याचे वचन वाया जाऊ नये, म्हणून नचिकेत यमलोकात गेला. तेव्हा यम तिकडे नव्हता, म्हणून तो काही न खातापिता तसाच तीन दिवस यमाच्या दारात बसून राहिला. यम परत आल्यावर कानकोंडा झाला आणि त्याला तीन वर माग असे सांगितले. नचिकेतने पहिला वर मागितला की "मी घरी गेलो की पित्याने मला ओळखावे व प्रसन्नचित्ताने घरी घ्यावे." दुसऱ्या वराने आपल्या पित्याकरता स्वर्गप्राप्ती मागून घेतली. तिसरा वर मागून घेताना त्याने यमाकडे ब्रह्मविद्येचे ज्ञान मागितले. या उपनिषदामध्ये यमाने नचिकेताला सांगितलेल्या आत्मज्ञानाचे सविस्तर वर्णन आले आहे.
ॐ सहनाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवाव है । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे | ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
हा शांतिमंत्रदेखील या कठोपनिषदातलाच.
बृहदारण्यकोपनिषदात सहा अध्याय असून तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने दुसरा, तिसरा व चौथा हे तीन अध्याय महत्त्वाचे आहेत. पहिल्या अध्यायात सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी अनेक दंतकथा दिलेल्या आहेत. दुसऱ्या अध्यायात गार्ग्य ब्राह्मण आणि अजातशत्रू नावाचा शांतस्वभावी क्षत्रिय राजा यांचा सुप्रसिद्ध संवाद दिला आहे. तिसऱ्या व चौथ्या अध्यायात याज्ञवल्क्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. दुसऱ्या अध्यायात याज्ञवल्क्य आपली पत्नी मैत्रेयी हिच्याशी संवाद करताना दिसतात. तिसऱ्या अध्यायात ते जनक राजाच्या दरबारात तत्त्वज्ञांशी चर्चा करतात व चौथ्या अध्यायात प्रत्यक्ष जनक राजाशीच ते संवाद करतात. पाचव्या अध्यायात नीतिशास्त्र, सृष्टिशास्त्र, परलोकशास्त्र वगैरे विषय आले आहेत. शेवटच्या सहाव्या अध्यायात इंद्रियांमध्ये प्राण श्रेष्ठ आहे याविषयी प्रसिद्ध गोष्ट सांगितली आहे.
तमसो मा ज्योतिर्गमय
हे बृहदारण्यक उपनिषदातील हे एक प्रसिद्ध व आशयघन वचन आहे. केवळ तीन शब्दांत प्रचंड गहन असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. 'असत्'कडून 'सत'कडे, 'तमा'कडून 'ज्योती'कडे, 'मृत्यू'कडून 'अमृतत्वा'कडे.. थोडक्यात, 'रूपा'कडून 'स्वरूपा'कडे जाणारा जिज्ञासू मनाच्या उत्क्रांतीचा मार्ग या वचनात दाखवला आहे
दहा उपनिषदांतील आकाराने सर्वात लहान पण अत्यंत आशयघन असलेल्या माण्डुक्योपनिषदाच्या प्रारंभी
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्ँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायूः ।
हा शांतिमंत्र म्हटला जातो.
प्रत्यक्ष उपनिषदाचा पहिलाच मंत्र सांगतो -
ॐ ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम्। भूतं भवत् भविष्यदिति सर्वमोंकार एव। यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योंकार एव।’
भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळांत ॐकार भरून राहिला आहे. याव्यतिरिक्त त्रिकालातीत असे जे काही आहे, तेही ॐकारच आहे. ॐ हे केवळ एक अक्षर नसून ते सर्व काही आहे. माण्डुक्योपनिषदाच्या या पहिल्या मंत्रातूनच या उपनिषदाच्या प्रतिपादनाचा मुख्य विषय समजतो.
तैत्तिरीयोपनिषदात तीन वल्ली म्हणजे भाग आहेत. पहिल्या शिक्षावल्लीमध्ये वर्णोच्चारशास्त्राची चर्चा आहे. दुसऱ्या ब्रह्मानंदवल्लीत, नावाप्रमाणेच ब्रह्मज्ञान व त्यापासून होणारा आनंद यांचे वर्णन आहे. तर तिसऱ्या भृगुवल्लीत वरुणपुत्र भृगूची आत्मज्ञानप्राप्तीची कथा सांगितली आहे.
भृगू ब्रह्म जाणून घेण्यासाठी आपल्या पित्याकडॆ - वरुणाकडे गेला. पित्याने अनुक्रमे अन्न, प्राण, मन, विज्ञान हे ब्रह्म आहे असे सांगितले असे वाटून भृगू त्याबद्दल चिंतन करू लागला. या प्रत्येकाचे क्रमाक्रमाने चिंतन करूनही भृगूचे समाधान झाले नाही व तो पुन्हा पुन्हा मार्गदर्शनाकरता पित्याकडे गेला. शेवटी 'आनंद' हेच ब्रह्म आहे, असा त्याचा त्यालाच साक्षात्कार झाला. या आनंदमीमांसेलाच ‘भार्गवी विद्या’ किंवा ‘वारुणी विद्या’ असे संबोधले जाते. या विद्येच्या उपदेशात ब्रह्माचे तटस्थ लक्षण सांगणारा एक श्लोक आहे -
यतो वा एमानि भूतानि जायन्ते। येन जातानि जीवन्ति। यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति। तद्विजिज्ञासस्व। तद्ब्रह्मेति।
ज्याच्यापासून हे प्राणिमात्र निर्माण होतात, ज्याच्यामुळे जन्माला आलेले प्राणिमात्र जिवंत राहतात आणि शेवटी ते पुन्हा ज्याच्याकडे जातात आणि त्याच्यातच विलीन होतात, तेच ब्रह्म आहे.
सः एतेन आत्मना अस्मात् लोकात् उत्क्रम्य अमुष्मिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान आत अमृतः समभवत्'.
ज्याला या ज्ञानरूप आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो, तो लोकातीत होतो, देहातीत होतो. आपल्या वास्तव स्वरूपाच्या स्वानंदी अवस्थेत समरसून तो खऱ्या अर्थाने सुखी होतो, अमृतपद पावतो.
आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत्,
'हे विश्व प्रकटण्यापूर्वी प्रारंभी केवळ एकमा आत्मतत्त्वच होते' अशा घनगंभीर उद्गाराने ज्याचा आरंभ झाला, ते ऐतरेयोपनिषद 'प्रज्ञानं ब्रह्म' या उद्घोषाने परिपूर्ण झाले आहे. हे समग्र विश्व एकमात्र ज्ञानरूप ब्रह्माचाच आविष्कार आहे. या ज्ञानरूप आत्मतत्त्वाचा ज्याला साक्षात्कार होतो, तो निजानंदी प्रसन्नतेत वास्तवाशी समरसून असतो, असे आशयघन विधान करून हे उपनिषद समाप्त झाले आहे.
केनोपनिषदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात गुरू आणि शिष्य यांच्यातील संवादाच्या परंपरेतून ब्रह्मशक्तीची वैशिष्ट्ये, त्याचे सखोल अनुभव इत्यादींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
तिसर्या व चौथ्या भागात देवांच्या गर्वहरणाची कथा येते. ब्रह्माच्या शक्तीमुळे असुरांबरोबरच्या युद्धात देव विजयी झाले. पण हा विजय स्वसामर्थ्यामुळे मिळाला, असा देवांना गर्व झाला. देवांचा गर्व नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्म देवांपुढे प्रकट झाले (उपनिषदात ब्रह्माचा उल्लेख ‘यक्ष’ असा केला आहे), पण मदांध देव ब्रह्माला ओळखू शकले नाहीत. अखेरीस देवी उमा हेमवतीने इंद्राला सांगितले की "तुमच्यापुढे प्रत्यक्ष ब्रह्म प्रकट झाले होते आणि त्यामुळेच देवांना असुरांवर विजय प्राप्त करता आला." जे नम्र आहेत, त्यांनाच ब्रह्मज्ञान प्राप्त होईल हेच या कथेचे तात्पर्य आहे. तप, इंद्रियदमन, कर्म, वेद-वेदांगे आणि सत्य हे ब्रह्म जाणण्याचे आधार अर्थात साधने आहेत, असेही केनोपनिषदात सांगितले आहे.
ब्रह्मस्वरूपवर्णन आणि ब्रह्मज्ञानमहत्त्व हे या उपनिषदाचे मुख्य विषय आहेत.
श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत्। वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः।
चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः। प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति ॥
जे आपल्या श्रवणाचे श्रवण आहे, आपल्या मनाचे मन आहे, आपल्या वाणीची वाणी आहे, आपल्या जीवनाचे जीवन आहे - श्वास आहे आणि दृष्टीदेखील आहे. ज्ञानी लोक हे जाणून मुक्त होतात आणि या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते.
प्रश्नोपनिषदात पिप्पलाद ऋषी आणि त्यांच्या सहा ब्रह्मनिष्ठ शिष्यांचा संवाद आहे. या शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि पिप्पलादांनी त्यांना दिलेली समर्पक आणि मार्मिक उत्तरे हे याचे वैशिष्ट्य. या प्रश्नोत्तरस्वरूपी संवादामुळेच याला प्रश्नोपनिषद म्हणतात. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच नाव आहे. हे संपूर्ण उपनिषद गद्यात्मक असून यात एकूण ६७ वाक्ये आहेत.
सत्यमेव जयति, नानृतम….. हे वचन मुंडकोपनिषदातले आहे
सत्याचाच विजय होतो, देवांचा मार्ग सत्यानेच वेढलेला असून ज्यांच्या इच्छा तृप्त झाल्या आहेत, असे ऋषी याच मार्गाने सत्याच्या मार्गाने परमनिधानापर्यंत पोहोचतात, हे तत्त्व याच उपनिषदामध्ये येते.
मोक्षावस्थेचे अतिशय सुंदर वर्णन मुण्डकोपनिषदामध्ये केले आहे. जशा वाहणार्या नद्या समुद्राला मिळाल्यानंतर नामरूपरहित होतात, तसा ज्ञाता परमात्म्यात विलीन झाल्यानंतर नामरूपरहित होतो व दिव्य स्वरूप प्राप्त करतो.
हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिः तद्यदात्मविदो विदुः ।।
मानवी अस्तित्वाचे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे एकाहून एक सूक्ष्म कोष आहेत. सर्वांच्या आतील सूक्ष्मतम आनंदकोषाच्याही आत असणाऱ्या हिरण्मयकोषात अत्यंत शुद्ध आणि सात्त्विक असे स्वयंप्रकाशी ब्रह्म विराजमान असते.
छांदोग्य उपनिषदाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणसाला विचारप्रवृत्त करणाऱ्या अनेक कथा त्यात समाविष्ट झाल्या आहेत. या बोधकथांतून मर्मज्ञपणे वास्तव दर्शन घडवण्यात आले आहे
पिता-पुत्रांच्या उद्बोधक संवादातून 'तत् त्वं असि' या महावाक्याचा उद्घोष करणारे आणि गुरु-शिष्यांच्या संवादातून 'भूमा एव सुखम्' हा चिरंतन सुखाचा महामंत्र देणारे हे महान उपनिषद आशयाने जसे सखोल आहे, तसेच आकारानेही मोठे आहे.
आपले सारे अवयव, वाचा, प्राण, डोळे, कान आदी ज्ञानेंद्रिये अधिक सदृढ आणि सक्षम व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
सर्व अस्तित्वाचा मूलस्रोत असणारे वास्तव हे ब्रह्म आहे. या सर्वस्यपी वास्तवाचा विसर न व्हावा, आपल्याकडून अज्ञानाने ती नाकारली न जावी, 'अहं ब्रह्म मा निराकुर्याम्' अशी उत्कट सदिच्छा व्यक्त करतो. या वास्तवाची आपल्याला सखोल जाणीव व्हावी व उपनिषदांत गौरवलेले सर्व सद्गुण आपल्यात यावे, अशी प्रार्थना करून थांबतो.
प्रतिक्रिया
10 Sep 2024 - 11:31 am | कर्नलतपस्वी
उपनिषदांची प्राथमिक तोंडओळख अतीशय साध्या सोप्या सरळ भाषेत करून दिल्याबद्दल धन्यवाद.
या विषयात अजीबात गती नाही पण जाणून घेण्याची उत्सुकता जरूर आहे.
देवभाषा अवगत नसल्याने प्राकृत भाषेत कुठल्या विद्वानांनी याचा समर्पक उहापोह केला आहे कळाल्यास वाचण्याचा प्रयत्न करेन.
वर दिलेले संस्कृत श्र्लोक सर्वश्रुत व साधारण रोजच्याच पठणातले ,ऐकण्यातले असल्याने लेख अधिक सोपा व वाचनीय वाटला.
गणपती बाप्पा मोरया.
10 Sep 2024 - 1:03 pm | Bhakti
वाह ! वाह! अतिशय रसाळ भाषेत समजावून सांगितले.
वेद अपौरुषेय म्हणजे
.
माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाला स्फुरलेही नाही.स्फुरणे ही क्रिया स्व साठी होत असते ना?
ते ऋषींना दिसले,ते त्यांनी उतरून/लिहून घेतले.
जाणकारांनी यावर आणखिन भाष्य करावे.
10 Sep 2024 - 6:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
मला उलगडलेला अर्थ असा की पुण्याहून मुंबईला जाताना काही ऋषी एक्स्प्रेसवेने गेले, काही जुन्या हायवेने गेले, काही इगतपुरी कसाराघाट मार्गे गेले, काही विमानाने गेले, तर काही रेल्वेने गेले आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतल्यावर तो शब्दबद्ध करण्याचा प्रत्येक महर्षीने आपापल्या परी प्रयत्न केला.
त्यांना जे दिसले ते जरा त्यांनी जसेच्या तसे उतरवून घेतले असते (कॉपी पेस्ट) तर प्रत्येक उपनिषद इतरांपेक्षा वेगळे (युनिक) झाले नसते.
एडिसन ने विजेचा शोध लावला त्या आधी जगाला वीज माहीत नव्हती . विजेचा शोध कोणीही ऐरागैरा व्यक्ती लावू शकत नाही त्या करता विशेष बुद्धी, ज्ञान व कष्टांची गरज आहे.
ब्रह्मज्ञानाचे तसे नाही ते सर्वांकरता समान उपलब्ध आहे. ऋषींनी वर्णन करण्या आधी सुद्धा ते अस्तित्वात होतेच आणि ज्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्या प्रत्येकाला स्वतःलाच त्याचा स्वतंत्रपणे शोध घ्यावा लागतो.
या अर्थाने ते स्फुरले असा शब्द प्रयोग इथे केला आहे. पण जरा कोणाला या पेक्षाही जास्त चपखल प्रतिशद्ब सापडला तर त्याचे स्वागतच आहे.
11 Sep 2024 - 6:42 am | सोत्रि
वेदांमधे आणि उपनिषदांमधे काय समजावून सांगितलं आहे किंवा त्यात काय आहे हे महत्वाचं आहे. ते जर उपयुक्त आणि आचरण्यायोग्य असेल तर ते अपौरुषेय किंवा पौरुषेय असल्याने (कोणाला स्फुरले असेल नसेल) काही फरक पडायला नको असं मला वाटतं. चिंतन वेदांच्या आणि उपनिषदांच्या आशयावर केल्याने साध्य प्राप्तीकडे वाटचाल करता येइल न कि चिंतन त्यांच्या उगमावर केल्याने.
थोडक्यात, कोणि आणि कधी लिहीले आहे त्यापेक्षा काय लिहीले आहे हे महत्वाचं!
- (जाणकार नसलेला) सोकाजी
तळटीपः माझं मत मांडलं आहे, जाणकार नसलो तरी. त्याबद्दल क्षमस्व. :)
11 Sep 2024 - 3:19 pm | Bhakti
हे तर मान्यच आहे.पण अपौरुषेय हाच शब्द पहिल्यांदा वापरला जातो.याचा उहापोह करावा वाटतो.अपौरूषेय म्हणजे सृष्टी ज्ञान जे स्फुरत नाही ,ते नियम आहे म्हणजे आहेतच.ते कोणीच बनवले नाही ,रचले नाही.
चार वेदांतून हे ज्ञान समजल्यावर त्यावर जे प्रश्न ,जिज्ञासा निर्माण झाली ती उपनिषदे रचना घडली. ऋषींनी शिष्यांसाठी एका उपनिषदांत एका विशिष्ट जिज्ञासेचे समाधान दिले.अजूनही जिज्ञासावर मनुष्य रचना करीत राहतो.
10 Sep 2024 - 10:15 pm | Bhakti
उपनिषदे अपौरुषेय नाहीत..ते तर वेगवेगळ्या ऋषींनी अभ्यास करून लिहिले आहेत ना.
वेद अपौरुषेय-श्रुतींनी पुढे पुढे जात राहिले.त्यात आजपर्यंत किंचितही बदल झाला नाही कारण त्यांची पठण करण्याची पद्धती,मागचा श्लोक जोडून पुढचा म्हटला जातो.कृष्ण द्वैपायन व्यासांनी हे सारे वेद व्यवस्थित चार भागात विभागले.
11 Sep 2024 - 6:46 am | सोत्रि
असं खात्रीने म्हणता येऊ शकेल?
- (साशंक) सोकाजी
11 Sep 2024 - 3:08 pm | Bhakti
अहो संहिता,मंत्र बदलले नाहीत.कारण तेच ते श्रुति स्मृतिने ,कडक नियमात पुढे येत गेले.
बाकी ठिकाणी नक्कीच पाणी ओतून वाढीव काम झालं असणार.गमतीने म्हणतात की महाभारतात इतके श्लोक वाढवले गेले/जातात की काही दिवसांनी उंटावरून महाभारत घ्या पोथ्या वाहाव्या लागतील.
14 Sep 2024 - 11:03 am | प्रचेतस
व्वा.. माऊली, सुरेख लिहिलंय.
महाभारतातले उल्लेखलेले परब्रह्म हे उपनिषदोत्तर असल्याने त्याचे निर्गुण स्वरुपात न दिसता सगुण स्वरुपात आपल्याला दिसते.
परब्रह्म हेच जगताचे परम आदिकारण असून अत्यंत तेजस्वी आणि प्रकाशक आहे. त्यालाच योगी आपल्या अंतर्यामाने पाहतात. सूर्याला त्याचे ते ह्याच ब्रह्मापासून मिळालेले आहे. इंद्रियांना शक्तीदेखील त्याच ब्रह्मापासून मिळालेली आहे. त्या सनातन भगवंताचे दर्शन केवळ ज्ञानयोग्यांनाच होते.
रसैर्वियुक्तं विविधैश्च गन्धै; रशब्दमस्पर्शमरूपवच्च |
अग्राह्यमव्यक्तमवर्णमेकं; पञ्चप्रकारं ससृजे प्रजानाम् ||
न स्त्री पुमान्वापि नपुंसकं च; न सन्न चासत्सदसच्च तन्न |
पश्यन्ति यद्ब्रह्मविदो मनुष्या; स्तदक्षरं न क्षरतीति विद्धि ||
त्याला विविध प्रकारचे रस, गंध, शब्द, स्पर्श, रूप यांचा यत्किंतही संपर्क नसून ते अव्यक्त आहे. ते, स्त्री, पुरुष किंवा नपुंसकही नाही. ते सत् आहे असे नाही किंवा ते असत् आहे असेही नाही. ते सद्सत्ही नाही. केवळ ब्रह्मवेत्त्या मनुष्यांनाच सा़क्षात्कार होतो. ते केव्हाही नष्ट होणारे नसल्याने त्यला अक्षर म्हणतात.