फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट
फार, फार, फार, फार, फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. फार शब्द फार वेळा वापरला, नाही का हो? त्याला कारण आहे. कारण ही खरंच फाssssर जुनी अगदी प्राचीन कथा आहे. माझीच. मी प्राचीन आहे हे माझ्याच तोंडाने कबूल करणं एक स्त्री म्हणून मला शोभत नाही. पण आता माझं म्हातारपण 'छुपाए न छुपाया जाय' ह्या कॅटेगरीत आलंय. मी आज ७५ वर्षांची आहे आणि ही गोष्ट आहे माझ्या लग्नानंतर लगेच घडलेली. लग्नात मी होते चोविशी उलटलेली. म्हणजे ५० वर्षं झाली आहेत या हकिकतीला.
तर आमचं नवं नवं लग्न झालेलं होतं. घरात आम्ही दोघंच. मनःपूतं समाचरेत्। म्हणजे आमच्या लहरीप्रमाणे वागत होतो आम्ही! मला स्वयंपाकाचा कंटाळा. त्यामुळे मी बाहेर जेवायला जाऊ या म्हणायची. आणि माझा नवराही सुटकेचा निःश्वास टाकायचा आणि म्हणायचा, "वा वा! बाहेर जेवायला? जरूर, जरूर." मला त्यामागचा खरा अर्थ त्या वेळी कळायचा नाही.
माझ्या नवऱ्याची नवी नवी नोकरी. तेव्हा मी नोकरी करत नव्हते. थोडं काटकसरीने राहावं लागायचं. तशात एक घडलं. माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला एक सेकंड हॅंड पद्मिनी कार घेऊन दिली. त्या वेळी तिला फियाट म्हणायचे. नंतर पद्मिनी नाव रूढ झालं. तेव्हा मध्यमवर्गाला कार परवडतच नसे. सेकंड हँड पद्मिनी किंवा अँबॅसिडर कोणी घेतली तरच.
तर, नवरा ती कार चालवायला शिकला. असेच गणपतीचे दिवस होते. माझ्या नवऱ्याला एक आयडिया सुचली..
.. एक गोष्ट स्पष्ट करते. मी माझ्या नवऱ्याला "इकडून येणं झालं" म्हणण्याइतका जुना काळ नव्हता आमचा! पण "आमचे हे" असं म्हणण्याचा मात्र अद्याप होता. तरी मी माझ्या नवऱ्याला लहानपणापासून ओळखत असल्याने व तो माझा लांबचा नातलग असल्याने मी त्याला सासूसासऱ्यांसमोरही अरेतुरेच करायची आणि सासरचे सर्व जण मला माहेरच्या नावानेच हाक मारायचे. माझ्या नवऱ्यालाही अरेतुरेची इतकी सवय झाली होती की, मी कधी त्याला अहोजाहो म्हटलं तर तो गोंधळून जायचा. घाबरायचा आणि विचारायचा, "आता काय झालं तुला माझ्यावर चिडायला? 'अहो' का म्हणतेयस मला?"
तर नवरा म्हणाला, "आपण आपल्या कारमधून मस्तपैकी राउंड मारायला जाऊ या. बघ तर मी कशी गाडी चालवतो ते!"
"त्याचीच तर भीती वाटते. तू कार कशीबशी किंवा कशीतरीच चालवलीस तर माझा कपाळमोक्ष व्हायचा."
"अग, चल ग, मला जबरदस्त इच्छा झालीय कार चालवायची!"
"आत्ता बाहेर जायचं? नऊ वाजलेत. रस्त्यावर शुकशुकाट असेल." मी अनिच्छेने म्हटलं.
"कसं शक्य आहे? गणपतीचे दिवस आहेत. सगळे जण गणपती पाहायला बाहेर पडतात."
"मला आता तयार व्हायचा कंटाळा आलाय. माझ्या अंगावर फक्त गाउन आहे. तोही बाहीपाशी फाटलेला. इथे उजव्या बाजूला स्वयंपाकाचे हात पुसून पुसून मळलाय बघ किती! आता बाहेर जायचं म्हणजे कपडे बदलायला पाहिजेत."
"गाउनमध्येच चल. कोण बघतंय! सगळे गणपती बाप्पा पाहण्याच्या नादात असतात. आणि आपण काय गाडीतच बसणार आहोत. आपण खाली उतरायचंच नाही. कुणाला तू दिसणारच नाहीस. आपण गाडीच्या काचेतूनच गणपती बघायचे. हवं तर सगळे गणपती नको बघायला. ११च बघू."
"ओके, चल. छत्री घेऊ?"
"तू पण ना! मिडिल क्लास मेंटॅलिटी! गाडीतून जातोय आपण, गाडीतून! गाडीत छत्री?"
"माझे केस खूपच विस्कटलेत रे"
"आता केस विंचरत बसू नकोस हं. खूप वेळ लागतो तुला वेणी घालायला. विस्कटलेल्या केसांत तू जास्त सुंदर दिसतेस."
माझी स्तुती म्हणजेच याला मनापासून बाहेर जायचं आहे, हे माझ्या लक्षात आलं.
आम्ही दोघंही गाडीत बसलो. गाडी चांगली पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मी घरात घालायच्या रबरी स्लिपर्स घालूनच गाडीत बसलेय. बाहेरच्या चपला घालायला विसरले आहे. पण आता फक्त स्लिपर्स बदलण्यासाठी घरी जाणं शक्य नव्हतं. तो वैतागला असता. आमची याआधी बरीच भांडणं झाली होती. त्यांत आणखी एका भांडणाची भर नको म्हटलं.
आम्ही बरेच पुढे आलो. एका गणपतीपाशी थांबलो. मी कारमधूनच नमस्कार केला. त्यानेही नमस्कार केला. पण तो गणपतीला नसून त्याच्या ऑफिसातल्या त्याच्या बाॅसला होता, हे माझ्या लगेच लक्षात आलं. हा खाली उतरला. बाॅसपाठोपाठ त्याच्या बायकोलाही ह्याने नमस्कार केला. ती म्हणाली, "अहो, तुमच्या मिसेसनाही कारच्या बाहेर यायला सांगा ना! ओळख करून द्या." मला झक मारत खाली उतरावं लागलं. माझ्या एकूण अवताराकडे ती विचित्र नजरेने पाहत होती.
बाॅस म्हणाले, "वहिनी आजारी आहेत का?"
"हो. हो. ती थोडी आजारी आहे. आहे तसेच घरातून निघालो. डॉक्टरकडेच चाललोय." मी खोकला काढला. नाक वर ओढलं आणि डोळे आजाऱ्यासारखे केले.
गणपतीसमोर लाउड स्पीकर इतक्या मोठ्या आवाजात लावले होते की आम्हाला ओरडून ओरडून बोलावं लागत होतं. मला तर काही ऐकूच येत नव्हतं. तिथल्या आवाजाने कान किटत होते आणि माझ्या एक टाका वेळेवर न घातल्यामुळे पुढचे नऊ टाके उसवलेल्या आणि मळक्या गाउनमुळे मला कानकोंडंही होत होतं.
मी बाॅसच्या बायकोकडे पाहिलं. सटवी खूप नटलेली होती. दागिन्यांनी मढलेली होती आणि विलक्षण सुंदर दिसत होती. तिचा नवरा, म्हणजे ह्याचा बाॅससुद्धा ह्याच्यापेक्षा शतपटीने देखणा दिसत होता.
त्या दोघांसमोर आम्ही दोघंही अत्यंत बावळट दिसत होतो.
मी घाईघाईने म्हटलं, "मी गाडीत बसू का? मला चक्कर येतेय."
बाॅस म्हणाले, "हो, हो, जरूर. तुम्ही रेस्ट घ्या."
हा बाॅसला म्हणाला, "तुम्ही दोघे गणपती पाहायला आलात का?"
"नाही. नाही. माझ्या काकांकडे गणपती विसर्जन होतं, म्हणून आलो. त्यांनी जेवायलाच बोलावलं होतं. विसर्जन करून, जेवून आलो."
"आज लगेच विसर्जन?"
"दीड दिवसांचा गणपती होता. काल संध्याकाळी पाच वाजता आणला. आज संध्याकाळी विसर्जन केलं."
"मग एकच दिवस झाला की. दीड दिवस कुठे झाला?"
"चालतं हो."
"सर, तुमच्या काकांकडे गणपती आहे, तसा तुमच्याकडे नाही का?"
"आहे तर! आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची जपणूक करायला मला आवडतं."
"मग तुमच्याकडे किती दिवसांचा?"
"आमचा अर्ध्या दिवसाचा "
"आssss! अर्ध्या दिवसाचा?"
"आश्चर्य कसलं वाटतंय तुम्हांला? अर्ध्या दिवसाचा गणपतीही असतो."
"सर, पण मग आणलात कधी आणि विसर्जित केलात कधी?"
"सकाळी आणला, दुपारी विसर्जित केला."
"आणि सर, मोदक कधी केले?"
"विकत आणले."
"काय हो? तुमचा गणपती किती दिवसांचा?"
"सर, पाच दिवसांचा. पण ते सगळं काही आमचे थोरले बंधू करतात."
बाॅस म्हणाला, "चला. गणपतीचं जवळून दर्शन घेऊ या."
"यस सर." बाॅसची मर्जी संपादन करण्यासाठी हापण कंपल्सरी त्याच्या मागोमाग गेला. मी 'आजारी' असल्याने गाडीतच बसले.
आता तेवढ्यात ओळखीचे कोणी दिसून त्यांनी मला बघू नये, म्हणून मी मान फिरवली. तरीही अगदीच वेळ आली तर? म्हणून केस जरा नीट केले. गाउनच्या बाहीचा उसवलेला भाग काखेत लपवला. मळक्या भागावर हात ठेवला. पाय आत घेऊन स्लिपर लपवल्या.. तितक्यात माझा नवरा आला आणि मी हुश्श केलं. मी नवऱ्याला म्हटलं , "पुरे झाले गणपती. आधी घरी चल." इतक्यात आमच्या घराच्या जवळपास राहणाऱ्या एक बाई, ज्या माझ्या नवऱ्याच्या ओळखीच्या होत्या, (पण माझ्या ओळखीच्या नव्हत्या, जे मला आत्ताच कळत होतं आणि घरी जाऊन याबद्दल अधिक चौकशी करणं आवश्यक होतं.) त्या आमच्या गाडीजवळ आल्या. मी मान फिरवली. ती माझ्या नवऱ्याला म्हणाली, "मला जरा रिक्षास्टॅंडपर्यंत सोडता का?"
नवरा अत्यंत उत्साहाने म्हणाला, "कशाला? सरळ तुमच्या घरापर्यंत सोडतो ना! तुम्ही सी फायूमध्ये राहता ना?"
"थँक यू सो मच. सो काइंड ऑफ यू.." असं म्हणून तिने कारचा पुढचा दरवाजा उघडला. माझ्याकडे नजर टाकली आणि चक्क एकेरीत मला म्हणाली, "ए, जरा मागच्या सीटवर बसतेस का तू? मी साहेबांच्या बाजूला पुढे बसते. मी मागे बसले, तर त्यांना ड्रायव्हरसारखं वाटेल. म्यानरलेस मानतील मला."
मला धक्काच बसला आणि क्षणात माझी ट्यूब पेटली की ती मला कामवाली बाई समजते आहे आणि साहेब मला कारमधून बाजूला बसवून फिरवून आणत आहेत.. म्हणजे पुढे चमचमीत चर्चा करायला एक प्रकरणही झालं तिला..
माझा नवरा मात्र लग्नगाठीला जागून जरा चिडूनच म्हणाला, "अहो, माझ्या मिसेस आहेत त्या!"
"ओ! साॅरी हं! माझा गैरसमज झाला. एक्स्ट्रीमली सॉरी.." त्या बाईंचा चेहरा लालभडक आणि गोरमोरा झाला. "तुम्ही जा नाइट राइडला. मी उगीच डिस्टर्ब केलं.. मी रिक्षानेच जाते." अशी घाईघाईने दिलगिरी व्यक्त करत ती बाई निघून गेली. पण जी लाज निघायची ती निघाली होतीच.
आम्ही पुढे आलो. आता रस्त्यावर ट्रॅफिक दिसायला लागला. अचानक गाडी बंद पडली आणि त्या क्षणी पाऊस सुरू झाला. बस्स.. एवढंच बाकी होतं. गणपतीचा जणू आमच्यावर कोप झाला होता. हा पावसात भिजत बाॅनेट उघडून खाटखुट करायला लागला. त्याला तरी गाडीतलं कुठे काय कळत होतं! मग म्हणाला, "गाडी ढकलावी लागेल. तू स्टेअरिंग धरून बैस. मी गाडी ढकलतो."
स्टीअरिंग धरून बसायचं ह्या कल्पनेनेच मला धडकी भरली. मी नवऱ्याला म्हटलं, "नको रे बाबा! मला गाडीतलं ओ की ठो कळत नाही. गाडी अचानक सुरूच झाली, तर? मी काय करू? ट्रॅफिक किती आहे रस्त्यावर! तू स्टीअरिंगवर बैस, मी गाडी ढकलते."
नाइलाज को क्या इलाज.. मरती मैं क्या करती?
मी खाली उतरले. त्या मळकट, फाटक्या गाउनमधल्या मला रस्त्यावरच्या असंख्य माणसांनी पाहिलं. लाजून माझं पाणी पाणी झालं. दोन्ही हातांत, पाठीत आणि कमरेत पूर्ण ताकद एकवटून आणि चिंब भिजत मी गाडी ढकलू लागले. हाय रे माझ्या दुर्दैवा! गाउन अंगाला चिकटून आणखीच शोभा होणार, अशी भीती वाटायला लागली! गाउन चिखलात बुडायला लागला. कारमधून उतरायचं नाही असं ठरवूनदेखील आता काय इज्जत राहिली? आता पृथ्वी मला गिळेल तर बरं! असं वाटलं.. मग पायांतल्या स्लिपर्स ओल्या होऊन सटकायला लागल्या. ट्रॅफिक जाम होता. अचानक गाडी सुरू झाली. खिडकीतून बाहेर मान काढून माझा नवरा मला सांगत होता, "मी गाडी पुढे घेतोय. तू मागच्या वाहनांना हातवारे करून, थांबवून, मला गाडी डावीकडे घ्यायला वाट करून दे. गाडी सुरू झालीय, नशीब. किती वेळ चालू राहील माहीत नाही.. आत्ताच रस्त्याच्या बाजूला घेतो."
मी ओरडून म्हणाले, "मला आधी गाडीत घे. मग गाडी डावीकडे घे, उजवीकडे घे, नाहीतर खड्ड्यात घाल." त्याने मला गाडीत घेतलं. मी तशीच ओल्या अंगाने, कुडकुडत सीटवर बसून राहिले. लोकांचं पूर्ण मनोरंजन झालं.
नंतरचा वेळ आम्ही दोघंही भांडत राहिलो. आम्ही म्हणजे मी. मी एकटीच बडबडत होते आणि तो ऐकत होता.
"मी म्हणत होते, नको जाऊ या बाहेर. मला कपडे बदलायला पाहिजेत. मला कंटाळा आलाय. तर म्हणे तशीच चल. आपण कुथं उतलायचंच नाईयै! गाडी ढकलावी लागली मला! माझ्या गबाळ्या अवतारात सगळ्या दुनियेने पाहिलं मला! मी कामवाली बाई काय! मी आजारी काय!"
"अगं पण.."
"एक अक्षर बोलू नकोस माझ्याशी! तुझ्याशी लग्न करून पस्तावले मी!"
मी कपाळ बडवून घेऊ लागले, तशी हा घाबरला.
आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा खूप रात्र झाली होती. भूक लागली होती. दूध, बिस्किटं खाऊन रात्रीचं जेवण उरकलं.
पोटात दूध-बिस्किटं गेल्यावर जरा शांत वाटलं. मला झोपेने घेरलं होतं. झोपताना मनात विचार आला, उद्या सकाळी ह्याच्या डब्यात कुठली बरं भाजी करावी? त्याला बटाट्याच्या काचऱ्या आवडतात. त्याच करू या. बिचारा..
ताजा कलम -
दोन-तीन दिवसांनी भाजी घ्यायला बाजारात गेले, तर आमच्या कॉलेजातला लालू भेटला. मला भाजीवालीच्या समोर गाठून म्हणाला, "अगं.. एक बोलायचं होतं. राहवत नाहीये. त्या दिवशी तुला भर पावसात गाडी ढकलताना आपल्या वर्गातल्या शऱ्याने पाहिलं. त्याने सांगितलं मला. असा कसा तुझा नवरा! तुला गाडी ढकलायला लावतो! तुझ्या पायात स्लिपर होत्या म्हणाला.. तू सुखात आहेस असं मी समजत होतो. मी अजूनही आहे. कधीही लागलं तर हाक मार.. मी वाट पाहीन."
त्या भाजीवालीचं आणि आसपासच्या चौघींचंही कुतूहल लग्गेच कान टवकारून जागं झालं. कलकलाट करत त्या सगळ्यांनी मिळून विचारलं, "कुणाला नवऱ्याने पावसात गाडी ढकलायला लावली? तुम्हाला का ताई? नांदवत नाही का नवरा तुम्हाला चांगला? नवऱ्याची जातच असली.. आणि हे साहेब तुमचे कोण हो ताई, भाऊ का ?"
मी भाजी न घेता घरी परतले.
प्रतिक्रिया
9 Sep 2024 - 11:05 am | ज्ञानोबाचे पैजार
छान लिहीले आहे आवडले,
काही संवाद तर अगदी घरचेच वाटले
पैजारबुवा,
9 Sep 2024 - 11:14 am | टर्मीनेटर
अगंगंगं... कसला भन्नाट लेख आहे हा!
आजी... मजा आ गया 😂 😂 😂
10 Sep 2024 - 8:34 am | गवि
हा हा हा .
थोडक्यात आणि सुटसुटीत प्लॅनची चांगलीच वाट लागली म्हणायची.
कधी तरी उजव्या सोंडेचा गणपती आणून त्याचे कडक नियम असतात त्यातले काहीतरी करायचे हातून राहून गेले असेल.. म्हणून त्याने हे घडवून आणले असेल ;-))
गंमत अपार्ट.
लेख आवडला. शेवटचा लालूवाला प्रसंग तर फारच भारी. कॉलेज मधले असे अनेक लालू आठवले.
10 Sep 2024 - 9:19 pm | प्रचेतस
एकदमच भारी लेख झालाय आजी. संवाद तर कहर आहेत. मजा आली वाचून.
लिखाणाद्वारे प्रसंग डोळयांसमोर उभी करण्याची तुमची हातोटी अद्भुत.
11 Sep 2024 - 8:23 am | सोत्रि
खुसखुशीत लेख, आवडला!
- (आजींच्या लेखनाचा चाहता) सोकाजी
11 Sep 2024 - 10:05 am | नचिकेत जवखेडकर
ज ब री
11 Sep 2024 - 10:30 am | Bhakti
हा हा, मस्तच!
म्हणूनच मी गाऊनवर समोरच्या दुकानातही जात नाही.कोणीतरी भेटतच, युनिव्हर्सल प्रोब्लेम आहे हा ;)
11 Sep 2024 - 5:37 pm | खेडूत
खूपच छान आठवण आणि लेखनशैली आजीबाई!
(आमच्या हिला वाचायला देणार होतो, पण नको बाबा.
पंचवीस वर्षापूर्वीच्या जुन्यापान्या आठवणी काढेल - ज्या मी कधीच विसरून गेलो असणार..)
18 Sep 2024 - 12:21 pm | सौंदाळा
भारीच किस्सा.
18 Sep 2024 - 1:08 pm | वामन देशमुख
व्वा आज्जे! काय भारी लिहिलंय! वाक्यावाक्याला चिमटे-गुदगुल्या होताहेत...
असली पंचपेरणी म्हणजे आधीच खमंग झालेल्या चिवड्यात तळून टाकलेले खुसखुशीत खारे काजू!
खरंच हेवा वाटतो तुमच्या निवेदन शैलीचा!
अजून किमान पंचवीस वर्षे तुम्ही असेच लिहीत राहो ही गणपती बाप्पाला प्रार्थना!
_/\_
18 Sep 2024 - 1:19 pm | वामन देशमुख
त्या चिवड्यातली ही खरपूस लाल मिरची!
18 Sep 2024 - 4:13 pm | श्वेता२४
खुसखुशीत लेख...
19 Sep 2024 - 10:13 pm | अनन्त अवधुत
आजी, लेखा आधी सुचना हवी होती: ऑफिस मीटिंग मध्ये हा लेख वाचू नका, अन्यथा सगळ्या नजरा तुमच्याकडे वळतील.
21 Sep 2024 - 5:38 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
लै चित्रदर्शी लिव्हलंय ! समदं चित्र डोळ्याफुडं उबं राह्यलं बगा !
मस्त सिनेमा काढण्यासारखी सिच्युएशन आन पटक-कथा !
मजा आली आजी !
30 Sep 2024 - 1:37 pm | nanaba
धमाल आहे हे. तुमच्या आहोना आग्रह केल्या बद्दल थॅन्क्यू सान्गा.. आम्हाला खुसखुशीत लेख वाचायला मिळाला. :)