झणझणीत वरणफळं उर्फ चकोल्या : बालपणीच्या आठवणींसह :-)

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in पाककृती
24 Dec 2008 - 2:00 pm

माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची....

त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे :-)......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गावात असल्याचे बरेच फायदे होतात..त्यातलाच हा एक..) मग परत आज्जीकडे जायचं म्हटल्यावर लगेच वरणफळं खाउन हातावर पाणी पडल्यावर लगेच कोण आपापल्या घरी जातंय...शाळेची सुट्टी विचारात घेउन २-४ दिवस तिथेच राहायच्या बेताने ( आणि अजुन २-३ चविष्ट बेत जोडीला ठरवुन..) चकोल्या चा प्रोग्रॅम ठरायचा...

वरणफळं म्हणजे आमटी आणि पोळी यांचा काला नसतो...हे तु आईला पूर्वी का शिकवले नाहीस असं आज्जीला विचारलं की ती म्हणायची..अगं तुझ्या आईला सगळ शिकवलं असतं तर आपल्या या चकोल्या पार्ट्या कशा झाल्या असत्या...? :-) हे ही खरंच होतं बरका....आज्जी,आजोबा,मी आणि माझी धाकटी बहीण आमची मस्त पार्टी असायची...झणझणीत आज्जीस्टाईल चकोल्या,त्यावर भरपूर साजुक तूप,दाण्याची किंवा लसणीची चटणी,पापड-कुर्डया,आणि ताजं ताक असा मेन्यु असायचा....कोण किती मोठयांदा भुरका मारुन चकोल्या हाणु शकतो अशी जणु चढाओढच असायची...चकोल्यांचं भलं मोठं पातेलं बघता बघता खाली जायचं..
आणि या सगळ्या सरंजामाला बाहेर धो धो पडणारर्‍या पावसाचं बॅगराउंड म्युझिक मिळालं तर आहाहा.....

अजुनही आज्जीचा फोन आला की ती विचारते,कराड ला कधी येणार आहेस? एकदा चकोल्यांचा बेत करुयात...माझा मन लगेच माग पोचतं.चकोल्या पार्ट्यांसोबतच इतरही अनेक आठवणी मनात फेर धरुन नाचु लागतात....आणि मग मी लगेच चकोल्या करायचा "बेत" करते..आज्ज्जी नं शिकवल्यात तश्शाच :-)

तर अशा या माझ्या आज्जी फेम चकोल्या....

१.कणीक भिजवताना त्यात मीठ,तिखट,हळद,आणि थोडे गुळाचे पाणी घालवे.तेलाचा हात लावुन कणीक भिजवावी.

आमटीची कॄती:
१. १/२ छोटा कांदा,१/२ टोमॅटो,४-५ काळी मिरी,२ लवंगा,१ तमालपत्र,थोडी दालचिनी,४ चमचे ओलं खोबरं,भरपूर लसूण,कोथिंबीर हे सगळं छान बारीक वाटुन घ्यायचं

२.मग थोड्या तेलात मोहरी,जिरे,मेथ्या,हिंग,हळद,कढिपत्ता याची फोडणी करुन त्यात वरील वाटण नीट परतून घ्यावे.त्यात २ वाट्या शिजवलेली तूरडाळ घालावी.भरपूर पाणी घालावे ( वरणफळांना पोहता आले पाहिजे).गुळ,चिंच,मीठ,तिखट,आणि गोडा मसाला घालावा...व उकळी येउ द्यावी...

आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि कातण्याने मोठया शंकरपाळ्या कापुन उकळणार्‍या आमटीत सोडाव्यात...मस्त शिजु द्याव्यात ..आणि गरमगरम वरपाव्यात :-)

टीपः या चित्रात जरी चकोल्या बाऊलमद्धे दिसत असल्या आणि शेजारी चमचा वगैरे दिसत असला तरी हे प्रकरण चमच्याने वगैरे खाण्याची चुक अजिबात करु नये...पाप लागेल :-)...हे सगळं मस्तपैकी ताटात ओतायचं,ताटाला गरज असल्यास टेकण वगैरे लावायचं ( त्यासाठी मी त्या चमच्याचा वापर केला ) आणि हातने भुरकायचं....मग कोपरपर्यंत ओघळ आला तरी चालेल :-)

-(आज्जीच्या चकोल्यांना मिस करणारी) स्मिता श्रीपाद

प्रतिक्रिया

सहज's picture

24 Dec 2008 - 2:22 pm | सहज

आवडता पदार्थ.

लवकर केला पाहीजे.

जय हो स्मिताताई!

पाथंस्थानी चांगली सवय लावली आहे.

श्रावण मोडक's picture

24 Dec 2008 - 4:30 pm | श्रावण मोडक

छे. ताट नव्हे. थाळा घ्या, थाळा. किंवा एखादं मोठं तसराळं. या छायाचित्रातल्या बाऊलच्या दुप्पट आकाराचं.
आणि तूप?
एवढं जमवल्यावर शेजराच्या कांदा-टोमॅटोची गरज लागत नाही.
यालाच डाळफळं असंही म्हणतात.

विसोबा खेचर's picture

24 Dec 2008 - 5:15 pm | विसोबा खेचर

वफ लै भारी! :)

स्मिता, औरभी पाकृ आने दो..!

तात्या.

मनस्वी's picture

24 Dec 2008 - 5:36 pm | मनस्वी

चकुल्या खूप छान. आज्जीची आठवण झाली.

वरपाव्यात :)
थाळा घ्या, थाळा. किंवा एखादं मोठं तसराळं

+ १

मैत्र's picture

24 Dec 2008 - 5:40 pm | मैत्र

काय मस्त लागतात... सातारकडे चकोल्या म्हणतात याला.
फार वर्ष झाली खाऊन... काय आठवण काढलीत ... आता मुहूर्त लावलाच पाहिजे...
मस्त फोटो.. आणि हो तूप असल्याशिवाय मज्जा नाही!

खुप धन्यवाद!

विनायक पाचलग's picture

24 Dec 2008 - 8:03 pm | विनायक पाचलग

कालच खाल्या होत्या
लय भारी

रेवती's picture

24 Dec 2008 - 8:29 pm | रेवती

करते चकोल्या. पाकृ मस्तच.
त्याबरोबरच्या आठवणी पदार्थाची लज्जत वाढवतात.
मला वाटते बहुतेक सगळ्या आज्ज्यांच्या हातचा निदान एक तरी
असा पदार्थ नातवंडांना अतिषय प्रिय असतो.
माझी आज्जी शेंगोळे नावाचा पदार्थ फर्मास करायची, मला वाटतय बाजरीच्या पिठापासून केलेला असावा.
तसेच दुसरी आज्जी बाजरी कांडून त्याचा खिचडा करायची तोही आवडायचा.
तूपात पोहणार्‍या चकोल्या व खिचडा अजून आठवतात.

रेवती

सुक्या's picture

25 Dec 2008 - 3:01 am | सुक्या

मला वाटतय बाजरीच्या पिठापासून केलेला असावा.

लहान असतानाचा माझा एकदम आवडता प्रकार. शेंगोळे कुळीथ नावाच्या कडधान्यापासुन बनवतात. कसे असते आता माहीत नाही.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

स्मिता श्रीपाद's picture

25 Dec 2008 - 12:31 pm | स्मिता श्रीपाद

मला वाटते बहुतेक सगळ्या आज्ज्यांच्या हातचा निदान एक तरी
असा पदार्थ नातवंडांना अतिषय प्रिय असतो.

बरोबर आहे तुझं....आज्जी आणि तिचे पदार्थ हा एक फारच जिव्हाळ्याचा विषय आहे.या विषयावर एक धागा काढता येइल :-)

(आज्जीवेडी)स्मिता

चतुरंग's picture

24 Dec 2008 - 8:45 pm | चतुरंग

माझी आवडती पाकृ. पावसाळ्याच्या/थंडीच्या दिवसात गरमागरम चकोल्या तूप सोडून हादडायला मला फार आवडतात.
टीप आवडली.
त्या वाडग्यातल्या चकोल्या मला वाकोल्या दाखवताहेत असा भास झाला! ;)
आजच कारभारणीला सांगतो असे म्हणेपर्यंत तिने ओळखलेच! (मनकवडी आहे)

चतुरंग

घाटावरचे भट's picture

24 Dec 2008 - 9:06 pm | घाटावरचे भट

आईच्या हातच्या वरणफळांची आठवण आली आणि हळहळलो. उत्तम पाकृ.

पांथस्थ's picture

24 Dec 2008 - 9:51 pm | पांथस्थ

आपला एकदम आवडता पदार्थ आहे. आमच्या घरी याला चिकुल्या म्हणतात आणि बायकोकडे चकोल्या.

मस्त ताटात वाढुन घ्याव्या. बाजुला मस्त आंबटगोड लोणचे. कांद्याची फोड. आहाहा.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्राजु's picture

25 Dec 2008 - 2:08 am | प्राजु

जबरदस्त फोटो.
आठवणीही एकदम खास..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुक्या's picture

25 Dec 2008 - 2:49 am | सुक्या

यालाच आमच्या घरी दाळ चिखल्या म्हनतो. (खान्देशात बहुदा हेच म्हणतात). अगदी झटपट होनारा प्रकार. खायलाही तेव्हडाच रुचकर.
मोठया ताटाला टेकण लाउन गरमागरम चिखल्या पाची बोटे भरेपर्यंत भुरकल्यात. अगदी पोटाला तड लागेपर्यंत. तुपाच्या धारेशिवाय इतर काही अजुन तरी याबरोबर खाल्ले नाही.

फोटो जबरा. धन्यवाद.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

घाटावरचे भट's picture

25 Dec 2008 - 2:52 am | घाटावरचे भट

खांदेशाकडे याच्या बरोबर झणझणीत लसणाचं तिखट पण खातात. तुपापेक्षा माझा प्रेफरन्स कधीही त्यालाच.

चिंचाबोरे's picture

25 Dec 2008 - 3:00 am | चिंचाबोरे

वा वा !! अगदी लहानपणी मैत्रिणिकडे खाल्लेल्या चकोल्यांची आठवण झाली.
आणि शेंगोळ्यांचा स्वादही अजून आठवतो.

रेवती's picture

25 Dec 2008 - 6:34 am | रेवती

आत्ताच चकोल्या केल्यात. मस्तच झालीये चव.
मी जरा वेगळ्या करत होते पण अश्याप्रकारे केलेल्या जास्त चांगल्या झाल्या आहेत.
धन्यवाद!

रेवती

चतुरंग's picture

25 Dec 2008 - 10:20 am | चतुरंग

आजच लगोलग आमच्या कारभारणीने ह्या पाकृप्रमाणे चकोल्या केल्या होत्या आणि मी जाम म्हणजे जाम म्हणजे जाम ओरपल्या!
चाबूक झाल्या होत्या, एकदम वंटास!!
पाकृबद्दल धन्यवाद स्मिताताई. :)

चतुरंग

स्मिता श्रीपाद's picture

25 Dec 2008 - 12:28 pm | स्मिता श्रीपाद

सर्वांचे प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार....

रेवती आणि चतुरंग, चकोल्या करुन पाहिल्याबद्दल धन्यवाद :-) अजुन पाकॄ द्यायला हुरुप आला :-)

-स्मिता

अनिरुध्द's picture

25 Dec 2008 - 1:34 pm | अनिरुध्द

हाच पदार्थ घसरपोळी ह्या नावाने खाल्ला आहे. बाकी नावात काय आहे. तयार झालं की नुस्त वरपा. :P

Shreemant's picture

27 Dec 2008 - 7:49 am | Shreemant

Hari OM!
Dear Smita Ji,

Sincere thanks fo this great recipe.I am sorry I am responding in English since I am not so fluent in typing the Marathi response. I sinerely apologize. I am still learning to write in Marathi on this web site.
You have indeed taken us all, down the beautiful memory lane.

I live here in Fort worth (Texas USA) and we have a beautiful Hindu Mandir in Irving City. We are a group of volunteers who co-ordinate the cooking for Sunday School for Children every Sunday. More than 650 children come to the school for learning the Bhagavt-Geeta and other Hindu scrptures.Normally we cook for 1000-1200 devotees and all the food( We call it a Maha-Prasaad) is served free to everyone.

Atleast once in 2 months we make it a point to make this recipe.Since it is so popular with Gujuu dvotees too, when we plan to make it for 1200 people, so many devotees come to help us that it truley becomes an experience to remember.To explain it to the Indian Children (who are born here -the American Hindus) we call this dish a Indian Ravioli. Whenever we make this all the devotees just relish it. It tastes so good especialy when you offer it to God and make it as a Mahaprasaad item.Since we don't use any onion and Garlic in the mandir we slightly modify this recipe.

Once again Sincere thanks for this recipe.
Sincerely,
Shreemant
Hari OM !

अबोलि's picture

29 Dec 2008 - 10:45 pm | अबोलि

स्मिता,
झकास ! मी चिन्च गुळाच्या आमटीत जिरे खोबरे लसुण पेस्ट घालुन करते. आज हि पाकक्रुति वाचुन तोन्ड खवळ्ले आहे. घरी जाउन करतेच.

खादाड_बोका's picture

30 Dec 2008 - 4:34 am | खादाड_बोका

मी आजच बनविले वरणफळं ...माझी आई नेहेमी करायची.
माझी बायको वरणात फुलकोबी, मटर, टमाटर, गाजर सारख्या भाज्याही टाकते. म्हणजे पुर्ण जेवण होऊन जातो. :)

मला तर स्वप्नातही भुक लागते....

चित्रादेव's picture

10 Feb 2009 - 7:59 am | चित्रादेव

का माहीत नाही पण मी ह्या पदार्थापासून चार हात लांबच राहीले अजूनपर्यन्त. बहुधा ह्या पदार्थाची ओळख मला जेव्हा झाली तेव्हा तो पदार्थ करणारीने नीट केला न्हवता तेव्हा तो एक चिकट बूळबूळीत लगदा असा डाळीत पोहतोय असे वाटले तोंडात घातल्यावर. त्या बालपणीच्या आठवणीने मी कधीच खल्ला नाही चाखायची संधी नंतर बर्‍यचदा आली तरी. आता इतक्या वर्षानी कुणास ठावूक पुन्हा चित्रात पाहून करून पहावसा वाटतोय खरा. बघुया कधी मुहुर्त लागतोय ते. ते कणी़केच्या स्ट्रीप्स चिकट न होण्यासाठी काही टीप्स?

महेंद्र's picture

10 Feb 2009 - 11:44 am | महेंद्र

आमच्या घरी एक असाच पदार्थ शेंगोळे केला जायचा .त्यात कडबोळ्यांच्या आकाराचे (कणक+ज्वारी पिठ+ बेसन )याचे गोळे करुन लसुण, खोबरं आणि काहितरी मसाला घातलेल्या पाण्यात आई उकळवऊन शिजवायची..चव एकदम मस्त लागायची..
अजुनही आई कडे गेलो की हा पदार्थ करायला सांगतो आईला.

स्मिता श्रीपाद's picture

10 Feb 2009 - 11:51 am | स्मिता श्रीपाद

आता भिजवुन ठेवलेल्या कणकीची तेल लावुन (पीठी लावु नये नाहीतर चाकोल्या फारच गिजगोळा होतात) पोळी लाटावी...आणि कातण्याने मोठया शंकरपाळ्या कापुन उकळणार्‍या आमटीत सोडाव्यात...मस्त शिजु द्याव्यात .

कणकेची पोळी लाटताना पिठी वापरली कि मग त्या पिठीमुळे सगळं मिश्रण असं चिकट लगदा होतं...
त्यामुळे शक्यतो कणीक भरपूर तेल घालून घट्ट मळावी आणि तेल लावुन (गरज पडली तर प्लास्टिक कागदाचा वापर करुन)पोळी लाटावी...आणि चकोल्या नीट शिजल्या नाहीत तरीही त्या बुळबुळीत लागतात...

आता या वेळेस वर दिलेल्या पद्धतीने करुन पाहा...कदाचित या वेळेस तुम्हाला आवडतील..

शुभेच्छा...

-स्मिता श्रीपाद

चित्रादेव's picture

10 Feb 2009 - 11:55 am | चित्रादेव

वरच्या रेसीपीत पिठ भिजवताना तेल घालायचे लिहिले नाहीये ना म्हणून गोंधळ झाला. करून पाहीन आणि सांगेन.

स्मिता श्रीपाद's picture

10 Feb 2009 - 11:59 am | स्मिता श्रीपाद

वरच्या रेसीपीत पिठ भिजवताना तेल घालायचे लिहिले नाहीये ना म्हणून गोंधळ झाला. करून पाहीन आणि सांगेन.

चुक सुधारली :-)
धन्यवाद

-स्मिता

हरकाम्या's picture

23 Mar 2009 - 5:28 pm | हरकाम्या

बाई ग माझा आवडता पदार्थ दाखवलास ग तुला किती धन्यवाद देऊ तूच सांग ??

स्मिता श्रीपाद's picture

23 Mar 2009 - 5:50 pm | स्मिता श्रीपाद

बाई ग माझा आवडता पदार्थ दाखवलास ग तुला किती धन्यवाद देऊ तूच सांग ??

या एका वाक्यात तुमचे धन्यवाद पोचले :-)

-स्मिता

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2009 - 5:47 pm | स्वाती दिनेश

चकोल्या आत्ता पाहिल्या ग स्मिता, लय म्हणजे लयच भारी.. आठवणी पण मस्त !
मी ह्याची आमटी थोड्या वेगळ्या प्रकाराने करते,आता ह्या तुझ्या रेशिपीने करुन पाहिन.
फोटू तर मस्तच.. आता लवकरच करणार मी चकोल्या..(खूप दिवसात केल्या नाहीत...)
स्वाती

स्मिता श्रीपाद's picture

23 Mar 2009 - 5:49 pm | स्मिता श्रीपाद

नक्की करुन पाहा... :-)

मी ह्याची आमटी थोड्या वेगळ्या प्रकाराने करते,

आम्हाला तुझी वेगळी आमटी पाहायला आवडेल.तुझी पाकॄ टाक ना...

-स्मिता

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 6:21 pm | समीरसूर

वा वा, खूप छान आहे रेसिपी. कधी येऊ खायला? अश्विनी म्हणते की आपण स्मिताकडे जाऊनच खाऊ या म्हणजे रेसिपी नीट कळेल. ;-)

--समीर

निमीत्त मात्र's picture

1 Jan 2010 - 11:17 pm | निमीत्त मात्र

चकोल्या आवडल्या. आजच करुन पाहतो.

जेपी's picture

7 Mar 2014 - 6:31 pm | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:

लक्ष्या's picture

7 Mar 2014 - 8:16 pm | लक्ष्या

माझा आवडता पदार्थ....

स्मिताताई---कित्ती छान.....माझी आईपण सुंदर चकोल्या करते...मी भुरकते बर का.!!!!!

संतोषएकांडे's picture

9 Mar 2014 - 11:26 am | संतोषएकांडे

इकडे गुजरात मधे याच वरणफळांना दाळ ढोकळी असं म्हणतात. पा़कृ. जवळजवळ हीच. पण फोडणी आधी न करता अगदी शेवटी भरपूर लसणाचे तुकडे, लाल मिरची, मोहरी याची तेलात खमंग फोडणी करुन वर घालतात.आणी तूपाच्या जागी कच्चं तेल वर घालून ओरपतात. यात तूरी चे दाणे, गवारीचे तुकडे वगेरे पण घालतात.