भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग १

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
11 Mar 2024 - 1:56 pm

जानेवारीत बातमी आली की महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च दरम्यान MTDC च्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये बुकिंग कारणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट दिली जाईल. निश्चित कोणा कोणाला सूट मिळेल ते बातमीतून समजत नव्हते. मंडळाकडे चौकशी केली असता कळले कि ज्या महिलेच्या नावावर बुकिंग आहे तिच्या सोबत पुरुष व्यक्तीही येऊ शकतात. अट मात्र अशी होती की जिच्या नावावर बुकिंग आहे ती महिला हॉटेलमध्ये प्रवेश करते वेळी तेथे हजर असावी.
व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा होऊन आम्हा तीन मैत्रिणींच्या नांवे गणपतीपुळे आणि हरी हरेश्वर या दोन ठिकाणी एक एक मुक्कामासाठी रुमही बुक झाल्या. तिघींचे नवरे सोबत येणार होते. त्यामुळे सहलीचे नियोजन, गाडी, ड्रायव्हर, सामानाची उचलठेव तसेच चुकांचे खापर फोडण्यासाठी हक्काची व्यक्ती अशा छोट्या मोठ्या गोष्टींची आपोआप व्यवस्था झाली. एकंदरीत महिला दिन मजेत साजरा होणार होता.

असाच एक दीड महिना गेला आणि १ मार्चला परत चर्चा सुरु झाली.गणपतीपुळ्यापर्यंत लांबचा प्रवास करून परत यायचे तर अजून एखादा मुक्काम हवा. गोवा हायवेने प्रवास करत थेट रत्नागिरी गाठून पुढे कशेळीपर्यंत जायचे ठरले. तेथे मुक्काम करून परतीच्या प्रवासात किनारपट्टीने गणपतीपुळे व हरिहरेश्वर करायचे निश्चित झाले.
सहलीचा दिवस उजाडला. पहाटे साडेपाचलाच नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला. आमच्या दोन चारचाकी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून निघून पळस्पे फाट्याजवळ गोवा हायवेला लागणार होत्या. पण वडखळजवळ रस्ता खराब आहे असे समजल्याने पाली मार्गे गोवा हायवेला पोहचायचे ठरले. गाड्या थोड्या मागे पुढे झाल्या तरी पालीला पुन्हा एकत्र भेटायचे ठरवून प्रवास सुरु केला.
आज रहदारी खूपच कमी होती. अपेक्षेपेक्षा खूप लवकर रत्नागिरी ओलांडून पुढे आलो. त्यामुळे कार्यक्रमात थोडा बदल करून पावसच्या नंतर समुद्रकिनारी असलेला पूर्णगड बघायचे ठरले.
मुचकुंडी नदीच्या तीरावर खाडीच्या मुखाशी पूर्णगड गावाजवळ हा किल्ला आहे. कान्होजी आंग्रेंच्या काळात इ.स. १७२४ मध्ये किल्ला बांधल्याचे समजते. गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत गाड्या जातात पण किल्ल्याजवळ रस्ता कच्चा व दगडगोट्यांचा असल्याने आम्ही थोड्या दूरच गाड्या लावल्या. चालायला सुरुवात केली.रस्त्याच्या बाजूने आमराई व काजूच्या बागा होत्या.

पाच-सात मिनिट थोडा चढ चढून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहचलो. दरवाजाच्या आधी हनुमानाचे एक मंदिर आहे.

किल्ल्याचा लाकडी दरवाजा अलीकडचा असला तरी बाजूचे बांधकाम उत्तम स्तिथीत दिसते. दरवाजाच्या वरच्या भागात चंद्र, सूर्य व मध्ये गणेशाची प्रतिमा आहे.


दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस देवड्या आहेत.

देवड्या पार केल्यावर अजून एक दगडी कमान आहे. देवडीच्या बाजूने व कमानीच्या आतील बाजूने भिंतीवर फुल शिल्प दिसते.

किल्ल्याच्या आत बांधकामाची जोती दिसतात

किल्याच्या पश्चिम दरवाजा मार्गे समुद्राकडे जात येते. बाहेरून दिसणारा दरवाजा. दरवाजाच्या आतील एका बाजूस देवडी आहे.

किल्ल्याचा उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भागापेक्षा थोडा उंचीवर असून काही पायऱ्या चढून तेथे जाता येते. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडात आहे. किल्ल्याचे संवर्धन खूपच चांगल्या प्रकारे केल्याचे जाणवते.

वरच्या भागातून दिसणारी किल्ल्याची तटबंदी व सागरी परिसर

किल्ल्याच्या तटबंदीस बाहेरील बाजूने फेरी मारतांना

किल्ला बघून निघालो. पूर्णगड ला खडकाळ समुद्र किनारा आहे. तेथे थोडा वेळ थांबलो.समुद्र व गावखडी किनाऱ्यावरील सुरूचे बन खूप सुंदर दिसत होते.

मुचकुंडी नदीच्या एका तीरावर पूर्णगड तर दुसऱ्या तीरावर गावखडी गांव . दोन्ही तीरांना जोडणाऱ्या पुलाचे सुंदर दृष्य.

पूल ओलांडून कशेळी गावात पोहचलो. अजूनही सूर्यास्तास बराच वेळ होता. त्यामुळे येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर 'कनकादित्य' पाहून घ्यायचे ठरले.कनक म्हणजे सोने परंतु या नावाबद्दल एक वेगळीच कथा सांगितली जाते. गावात एक कनका नावाची सूर्योपासक स्त्री होती. तिला मिळालेल्या दृष्टांतानुसार शोध घेतला असता किनाऱ्यावरील घळीत (सध्याची देवघळ) मूर्ती आढळली. गावकर्यांनी मूर्ती गावात आणून मंदिर स्थापन केले. कनका या स्त्रीच्या नावामुळेच मंदिराला कनकेश्वर नाव मिळाले. मंदिराच्या विश्वस्थांकडे एक ताम्रपट आहे असे समजते. त्यानुसार मंदिर ८०० वर्षांपेक्षाही जुने असल्याची नोंद मिळते.

मंदिराला दोन बाजुंनी प्रवेश द्वारे आहेत.

मंदिर प्रांगणाच्या बाजूने भिंत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आतल्या बाजूने दरवाजाच्या दोन्ही बाजूस दीपमाळा दिसतात.

मंदिराला जोडून भव्य लाकडी, कौलारू सभागृह आहे.

त्यामागे गाभाऱ्यात साधारण एक मीटर उंचीची काळ्या पाषाणात घडवलेली सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे.
(फोटो घेऊ दिला नाही)
आवारात विहिरीचे पाणी काढण्यासाठी जुन्या काळातील व्यवस्था पाहण्यास मिळते . तिला 'कोटंब' म्हणतात असे समजले.

सूर्य अस्ताला जाण्याची वेळ होत आली होती. जवळच समुद्र किनारी असलेल्या कड्यावर पोहचलो. येथे येण्याआधी थोडी चौकशी करून आलो होतो. पूर्वी मुंबईस नोकरीला असलेले संदीप भाऊ लॉक डाऊनमध्ये गावी परतले. परत मुंबईस जाण्याऐवजी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी, राहण्यासाठी काहीतरी सोय करावी या हेतूने त्यांनी कड्यावरच एक स्टॉल/हॉटेल सुरु केले. सध्या ते एक पॅकेज देतात. त्यात चहा, नाश्ता, व्हेज/नॉनव्हेज जेवण व राहण्यासाठी तंबूची व्यवस्था करून देतात.

संदीप भाऊंनी स्वागत केले.. हॉटेलच्या बाजूलाच मोकळ्या जागेत गाड्या लावल्या. व्ह्यू पॉइंटला पायऱ्या उतरून जायचे नसेल तर हॉटेलच्या मागेच कड्याच्या खडकांहूनही सूर्यास्त चांगला दिसतो असे सांगिल्याने तेथेच थांबायचे ठरवले. संदीपभाऊ चहा नाष्ट्याच्या तयारीला लागले.
कड्याचा वरचा भाग ते समुद्र किनारा याच्या साधारण मध्यावर व्ह्यू पॉईंट/टेबल पॉईंट आहे.

हळू हळू सूर्य अस्ताला जाऊ लागला. हातात चहाचा कप,सोबत गरमागरम कांदा भजी समोर दिसणारा सागरी किनारा आणि बुडत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य .

येथे विजेची सोय नाही. सर्व काही चार्जिंगच्या दिव्यांवर. दिवसभरात सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या संपत आल्या होत्या. संदीपभाऊ मोटारसायकलने सगळयांचे मोबाइल व चार्जर घेऊन गावात त्यांच्या घरी जाऊन चार्जिंगला लावून आले.
अंधार पडायला सुरुवात झाली. जेवणात व्हेज-नॉनव्हेज काय हवे ते विचारून संदीप भाऊ व त्यांची पत्नी स्वयंपाकाला लागली. खडकांच्या बाजूलाच असलेल्या सपाट जागेत चटई अंथरून तिघाही नवरोबांची बैठक सुरु झाली. आम्ही तिघीही बाजूच्या खडकावर बसून, काजू-शेंगदाण्यांचा आस्वाद घेत त्यांच्या गप्पांमध्ये सामील झालो. खाली खडकांवर आदळणाऱ्या लाटांचा आवाज आणि गार वारा याच्या संगतीत एक दीड तास भर्रकन निघून गेला. संदीपभाऊंनी जेवणासाठी आवाज दिला तेव्हा पटकन आवरून जेवायला आलो.

रात्री आमच्यासाठी टेन्ट लावून देण्यात आले. एका टेन्ट मध्ये चार जण झोपू शकतात पण आमच्यासाठी स्वतंत्र तीन टेन्ट लावून मिळाले. सर्व दिवे विझले. बाकीचे सगळे तंबूत झोपायला गेले. आम्ही दोघे मात्र थोडा वेळ बाहेरच गप्पा मारत उभे होतो. मिट्ट काळोख, निरभ्र आकाश आणि आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे. नवरा सांगू लागला डोक्यावर थोडेसे दक्षिणेस दिसते ते मृग नक्षत्र, त्याखाली दक्षिण-पूर्वेला ठळक तारा दिसतो तो व्याध, मृगाच्या पोटात तीन तिरक्या चांदण्या दिसतात तो व्यधाने सोडलेला बाण, मृगाच्या थोड्या वर पंचकोन दिसतो ते रोहिणी, दोघांच्या मध्ये ताऱ्यांचा पुंजका दिसतो ते कृत्तिका, उत्तरेस थोडा अंधुक दिसणारा ध्रुव तारा, पूर्वेकडून उगवणारे अनुराधा, त्याच्या बाजूस चित्रा, स्वाती अशी एक ना अनेक नावे त्याच्या तोंडून भरभर बाहेर येत होती. मी आवाक झाले. म्हटलं तुम्ही गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मुंबईत आहात, कधी स्वच्छ आकाश बघायला मिळत नाही, तुम्हाला एव्हडी माहिती कशी. तेव्हा त्याने सांगितले, साधारण १९७४--७५ चा काळ, आम्ही ८वी -९वीत असतांना नंदुरबारला गावाबाहेरच्या घरात रहात होतो तेव्हा महाराष्ट्र टाइम्सला आकाश दर्शनाचे सदर यायचे. तेव्हा घराच्या गच्चीतून तासनतास आकाश निरीक्षणाचा छंद लागला होता. आता असं कुठेतरी बाहेर गेल्यावर संधी मिळाली तर सर्व आठवण्याचा प्रयत्न करतो.गारवा जाणवायला लागला होता. तंबूत शिरलो. झोपायला गाद्या होत्या. त्यावर अंथरायला गोधडी, पांघरून, छोट्या उशा घरुन आणलेल्या होत्याच. रात्री बाहेर पडावे लागले तर टॉर्च हाताशी ठवून झोपी गेलो.
पहाटे उठून बाहेर पडलो. दव पडल्याने तंबू बाहेरून पूर्ण ओले झाले होते.

थोडासा आजूबाजूला फेरफटका मारला.

आता चांगले उजाडले होते. बिचवर जायचे राहिले होते. डोंगरकडा आणि त्यावरून दिसणारा अप्रतिम समुद्रकिनारा हे येथले वैशिष्ट. असे मानतात की अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर आक्रमण करून आला तेव्हा मूर्तींची नासधूस होऊ नये म्हणून पुजाऱ्याच्या मदतीने एक व्यापारी प्रभासपट्टण येथील येथील काही मूर्ती गलबतात घेऊन दक्षिणेकडे निघाला. त्याला मिळालेल्या दृष्टांतानुसार त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील एका घळीत सोडली. यामुळेच या किनाऱ्यास कशेळी बिच किंवा देवघळी बीच असेही म्हणतात. पायऱ्या उतरून व्ह्यू पॉइंटला आलो.

सूर्योदय आणि देवघळ

येथून अजून थोडं खाली उतरलं कि आपण समुद्र किनाऱ्यावर पोहचतो. अगदी छोटासा बिच आहे हा. देवघळ येथून अगदी बाजूलाच दिसते. घळीतील ज्या गुफेत मूर्ती होती असे सांगतात तेथपर्यंत जाऊन परत फिरलो.

चहा, नाश्ता घेतला व आजच्या भटकंतीसाठी प्रवास सुरु केला.

क्रमश:
भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग २

प्रतिक्रिया

फारच सुंदर परिसर. स्वच्छ आहे अगदी. पूर्वी सगळे कोंकण असे स्वच्छ होते. आता रत्नागिरी सह मोठी शहरे अस्वच्छ होत चालली आहेत असे ऐकतो. रत्नागिरीत पांढरा समुद्र अगदी शहराला लागून असूनही अत्यंत स्वच्छ असायचा. आता तिथेही घाण झाल्याचे कळले. त्यामुळे एकूण जावेसेच वाटत नाही.

खूप पूर्वी साखरपा ते मुचकुंद ऋषींची गुहा असा ट्रेक केला होता. शालेय वयात. गेले ते दिवस.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2024 - 2:58 pm | कर्नलतपस्वी

भटकंती आणी फोटो एकमेकास पुरक कसे? लेख डोक्यात ठेवून फोटो काढता की फोटो बघून लेख लिहीता?

नेहमी प्रमाणेच सुंदर लेख.
पु. भा. प्र.

छांयाचित्रांमुळे कोकणची नैसर्गिक श्रीमंती दिसून येते... जुने असले तरी बांधकाम सुस्थितीत व रेखीव आहे. स्वच्छता नक्कीच वाखाणण्याजोगी.
'कोटंब' हा जुना प्रकार नव्याने माहित झाला..

पुलेशु

मस्तच! कोकण सुंदर दिसत आहे ♡
आकाश निरीक्षण छानच झाले.
माझा पण ८-१० कोकणचा प्लॅन होता,अचानक लेक आजारी पडली .

कंजूस's picture

11 Mar 2024 - 5:52 pm | कंजूस

सहल झकास झाली आहे. नवरे लोकांचे आभार.
(हल्ली माझे काम मोटरमनचेच असते. )

गोरगावलेकर's picture

13 Mar 2024 - 6:15 pm | गोरगावलेकर

@गवि : खरंच. खूप सुंदर व स्वच्छ वाटला अजूनपर्यंत पाहिलेला भाग.

@कर्नलतपस्वी :तुमचे प्रतिसाद आवडतात. हल्ली ग्रुपमधील सर्वच जण फोटो काढत असतात. कुठला ना कुठला तरी फोटो लेखाला पूरक ठरतो.

@नपा : कोटंब हे नाव मी सुद्धा प्रथमच ऐकले/वाचले. अजून एका मंदिरात हाच प्रकार पाहिला. तेथे मात्र थोडे वेगळे नांव कळले. पुढच्या भागात याचे प्रात्यक्षिकही पाहायला मिळेल.

@Bhakti: धन्यवाद प्रतिसादाबद्दल. लेकीला लवकर आराम पडो. सहल काय होईल केव्हाही

@ कंजूस: चालायचंच. घरोघरी .....

अतिशय सुंदर फोटो आणि ओघवते वर्णन. काही फोटो तर अगदी कलासंग्रहातल्या जुन्या अभिजात तैलचित्रांसारखे आहेत. संदीपभाऊंकडे जाऊन रहायला हवे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

14 Mar 2024 - 5:39 pm | टर्मीनेटर

छान! पुर्णगड आणि गावखडी बीच माझ्याही आवडीचा 👍
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

पावस, पूर्णगड यांबद्दल अधिक सांगायचे तर १९८० च्या दशकापर्यंत (साधारण १९८२-८३ पर्यंत) रत्नागिरीहून पावसला जायला थेट रस्ता नव्हता. राजिवडा ते भाट्ये तरीतून जावे लागत असे. मग फणसोप, कसोप करत पावस. किंवा मग फारच लांबून फिरून जगाला वळसा घालणे. जे कोणी करत नसत.

ती खाडी काही फार खोल नव्हती. म्हणजे वल्हे न वापरता तळापर्यंत पोचणारा बांबू वापरून ती तर (होडी) चालवली जात असे. जरा पोहता येणारी व्यक्ती वाटल्यास पोहत किंवा विशिष्ट वेळेस काहीशा खोल पाण्यातून चालत देखील तो भाग पार करू शकत असे.

भाट्ये खाडीपूल झाला आणि सगळेच चित्र बदलून गेले. वरून दिसणारा सीन त्या पुलाने रेखांकित झाला.

स्टोरी पुढे चालू. तर १९८४ किंवा १९८५ साली भाट्ये पूल सुरू झाल्यावर पावस पर्यंत जाता आले तरी पूर्णगडसाठी पुन्हा एकदा होडी किंवा तरीला पर्याय नव्हता. मग ९८ सालच्या आसपास पूर्णगड पूल पण बनला आणि त्या दोन्ही तरी बंदच झाल्या. अर्थातच त्याचे काही वाईट वाटायला नको. बसने थेट प्रवास करता येऊ लागणे ही मोठीच सुविधा.

पण सांगण्याचा उद्देश हा की कोंकण अगदी अलीकडे पर्यंत अगदी कमी विकसित होते. ९० व्या दशकापर्यंत रेल्वेच नव्हती म्हणजे बघा. आताच्या प्रवाशांना त्या वेळचा अंदाज येणे कठीण. पावसाळ्यात बहुतांश वर्षी कोकणाचे बरेच भाग मुंबई पासून तुटायचे. कशेडी घाट कोसळणे ही नित्य घटना. की लाल एस्टी हा एकमेव पर्याय बंद.

आणखी दहा वर्षांत कोकण बदलणार.
कोस्टल रोड पुढे पुढे नेत गोव्यापर्यंत नेणार. पण आता जसे मुंबईतील हाजी अली, महालक्ष्मी, अमरसन्स, प्रियदर्शनी पार्कची वाट लागली तसेच कोकणातील समुद्र किनाऱ्यावरून पूल नेतील आणि सूर्यास्त वगैरे दिसणार नाही.

रीडर's picture

14 Mar 2024 - 8:37 pm | रीडर

किल्ला छानच आणि स्वच्छता पाहून प्रसन्न वाटलं

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2024 - 11:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त सहलीची सुरुवात. कनकादित्य मंदिर आणि पुर्णगडाचे फोटो आवडले. येउंद्या पुढचे भागही पटापट.

रच्याकने- एकदा समुद्री किल्ल्यांची सफर्/ट्रेक करायला पाहिजे. मुंबई पासुन खाली पुर्णगड्,यशवंतगड, आंबोळगड पावेतो.

Bhakti's picture

15 Mar 2024 - 10:48 am | Bhakti

+१
हा एक नकाशा महाराष्ट्रतील किनारपट्टीवरचे किल्ले-जरा स्पष्ट नाही पण उपयुक्त आहे.
A
रेवदंडा खाली कोणता किल्ला आहे?कोणी सांगू शकेल का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Mar 2024 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान नकाशा मिळाला, वाखुसा.

रेवदंड्याखाली आणि रोह्या जवळ--म्हणजे तो अवचितगड असावा. पण नक्की सांगु शकत नाही.

जयगड जेट्टीला किनारपट्टीच्या नकाशाचा एक फोटो मिळाला तो देत आहे

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2024 - 5:04 pm | चौथा कोनाडा

असेल नकाशे पुर्वी कोकणात दुकानांमधून रंगीत किंवा झेरॉक्स मिळायचे... फार उपयोग व्हायचा !

कोकण म्हणजे स्वर्ग आहे अन
गोरगावलेकर यांचा धागा म्हणजे भटकंतीचा संसर्ग आहे

कर्नलतपस्वी's picture

10 Apr 2024 - 10:12 pm | कर्नलतपस्वी

९२-९३ च्या भटकंतीत एक रूपायात मिळाला होता. गुगलबुवा नसल्याने खुप फायदा झाला.

प्रचेतस's picture

15 Mar 2024 - 9:00 am | प्रचेतस

सुरेख आहे.
कशेळी भाग बघायचा राहिला आहे. आपला वृत्तांत वाचल्यावर तेथे जाण्याची इच्छा प्रबळ झालीय. लवकरच जावे लागणारच.

गोरगावलेकर's picture

17 Mar 2024 - 10:08 pm | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल चित्रगुप्त, टर्मीनेटर, गवि,कंजूस, रीडर, राजेंद्र मेहेंदळे,Bhakti, प्रचेतस तसेच सर्व वाचकांचे धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2024 - 5:02 pm | चौथा कोनाडा

व्वा... माहितीने परिपुर्ण सुंदर धागा !
वृतांत, माहिती आणि प्रचि एक नंबर !